Monday 26 September 2022

“मेट्रोचे पुणे” प्रत्यक्षात आलेले एक स्वप्न.

 मेट्रोचे पुणे प्रत्यक्षात आलेले एक स्वप्न.

मस्त थंडीचे दिवस होते.  रात्रीच्या वेळेस तर हवेतला गारठा वाढला होता.  दूरचित्रवाणीवर नुकतेच; पुण्याचे तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे’, अशी बातमी झळकली होती आणि रवीला एकदम अचानक ही बातमी पाहून हुडहुडी भरायला लागली होती.  त्याने लगोलग बायकोला सांगितले आणि त्याचा स्वेटर,  मफलर,  कानटोपी, हातमोजे,  पायमोजे, काढून त्याच्या खोलीत ठेवायला सांगितले.  तसेच झोपतांना एक रजई त्यावर एक सोलापुरी चादर जोडून त्याचे पाघारून तयार ठेवायला सांगितले.  खोलीच्या खिडक्या आणि पडदे बंद असुदेत कारण आजकाल मला थंडी अजिबात सहन होत नाही, असे तो म्हणत म्हणत दूरचित्रवाणीवरील बातम्या पहात सगळा जामानिमा करून स्वत:ला गुरफटून घेऊन बसलेला होता.

संध्याकाळच्या शिळ्या बातम्या म्हणजे त्याच त्या बातम्या बातमीदार चघळत बसला होता.  आजकाल पुण्यात पदपथांचे काम जोरात चालू आहे,  त्यावरचा राडा रोडा ठेकेदाराने अजूनही काढला नाही.  त्यात भरीला भर पादचारी मार्गावरील अतिक्रमणे अजूनही महानगरपालिकेने हटवलेली नाहीत.  पादचारी मार्गावरच महावितरण कंपनीने त्यांचे डीपी,  नोटीसा देवूनही योग्य जागी हलवलेले नाहीत.  बहुधा एखाद्या मोठ्या दुर्घटनेची ते वाट पाहत असावेत असे बातमीदार सांगत होता.  मधेच सातारा रस्त्यावरील सायकलसाठीच्या केलेल्या मार्गाचे उद्घाटन माननीय महापौरांच्या हस्ते पार पडलेल्याची चित्रफित दाखवली जाते आणि लगेचच त्याला लागुनच पुढची बातमी असते की ह्या सायकल मार्गाचा स्थानिक दुकानदारांनी त्यांच्या आणि येणाऱ्या ग्राहकांच्या गाड्या लावण्यासाठी केलेला बेकायदेशीर उपयोग दाखवण्यात येतो.  सातारारोडवर कात्रज ते स्वारगेट मार्गावर बीआरटीचे काम कासवछाप गतीने चाललेले काम आणि अजून पाच सहा महिने लागतील असे दिलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे.  सातारा रस्त्यावरील उड्डाणपूल बहुतेक पाडावा लागेल की काय अशी निर्माण केलेली शंका कारण, स्वारगेट ते कात्रज मेट्रोसाठी ह्या पुलाचा अडथळा होतो आहे असे काही तज्ञांचे मत आहे वगैरे वगैरे.  देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रिंगरोडची कामे सुरु करण्यात आली आहेत.  त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरु करण्यात आले आहे आणि तो राडारोडा सध्या रस्त्यावरच टाकण्यात येत आहे व त्यामुळे आंबेगाव कात्रज रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होते आहे व ह्या रस्त्यावर मंगल कार्यालयांच्या बेकायदा आणि बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांचा मोठा अडसर वाहतुकीस होत असतो.  अशातच ह्या रहदारीत एक रुग्णवाहिका अडकून पडली व त्यातील रुग्णाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू ओढवल्याची दु:खद घटना घडली होती; ही ब्रेकिग न्यूज झळकत असते.  कात्रज कोंढवा रिंगरोडचे काम एका ठेकेदारास देण्यात आले आहे त्यांनी नुकताच आपल्या कामाचा नारळ फोडून श्रीगणेशा केला आहे असे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले आहे.  काही सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांनी मिळून महानगरपालिकेवर शहरात चाललेल्या विकास कामांचा पाठपुरवठा करण्यासाठी मोर्चा नेला आहे, त्यात त्यांची काही अधिकारी वर्गाशी बाचाबाची झाली.  पोलिसांनी मध्यस्ती करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे, तरी त्याचे पर्यावसन एका छोट्या दंगलीत झाले आणि कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली व रस्त्यावरील चार पाच बसेस फोडून त्यांचे नुकसान केले.  मनुष्यहानी झाली नाही परंतु महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे.  अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.  पोलीस पुढील तपास करत आहेत.  मेट्रोचे काम व्ह्नाज पासून पुढे पौडरोड पर्यंत आले आहे.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच दुहेरी उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे व पुढील कामास ताबडतोब सुरवात करण्यात आली आहे.  एसएनडीटी कॉलेज पासून चक्राकार रहदारीस सुरवात करण्यात आली आहे ह्याची नागरिकांनी दाखल घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.  ह्यामुळे व्हनाज-डेक्कन-शिवाजीनगर-रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला गती येईल असे मेट्रोच्या प्रवक्त्याने सांगितले.  नदीपात्रील मेट्रोचे काम वेगात चालू आहे.  पिपरी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम युद्ध पातळीवर चालू आहे आणि ते २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा मानस मेट्रो अधिकाऱ्यांनी नुकताच एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.  शिवाजीनगर-रामवाडी पर्यंतच्या मेट्रोच्या कामास लवकरच सुरवात करण्यात येणार आहे.  त्यासाठीच्या आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत.  तसेच चांदणी चौकाच्या भू-संपादनाचे कामही लवकरच पुरे करून तेथील उड्डाण पुलाच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे.  हिंजेवाडी-बालेवाडी-शिवाजीनगर मेट्रोला राज्यमंत्रीमंडळाचा हिरवा कंदील मिळाला आहे.  हाच प्रकल्प लवकरच चांदणी चौकापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे व स्वारगेटहून मेट्रो सिंहगडरोड मार्गे धायरी-खडकवासला येथपर्यंत नेण्याचे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरले आहे व त्यासंदर्भातील कायदेशीर पूर्तता झालेली आहे असे एका नगरसेवकाने सांगितले आहे.  मुंबई पुणे द्रुतगती मार्गाजवळील किवळे ह्या गावाजवळ ‘हायपरलूप’ ह्या वेगवान वाहतुकीसाठी प्रसिद्ध असेलेल्या नवीन प्रकल्पासाठी जागा देण्यात आली आहे आणि ह्या प्रकल्पाची चाचणी दोन वर्षात पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.  हा प्रकल्प यशस्वी झाला तर पुणे ते मुंबई हे अंतर केवळ २० मिनिटांत गाठता येईल अशी खात्री प्रकल्पाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी ह्या वाहिनीच्या प्रतिनिधीस दिली आहे.  पुणे महानगरपालिकेने बीआरटीच्या मार्गाचा विस्तार करायचे ठरवले आहे.  नगररोड,  हडपसर,  आळंदीरोड,  सातारारोड ह्या ठिकाणी सुरु असलेली अर्धवट कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे आणि साधारण १०००-१५०० नवीन बसेस ह्या मार्गावरून सोडण्यात येणार आहेत व त्यांची खरेदीची व्यवस्था महानगर पालिकेने केलेली आहे.  बीआरटी आणि मेट्रो मार्गांची सांगड घालून पुणेकरांचा शहरांतर्गत प्रवास सुखकर करण्याचा हा एक महत्वाकांशी उपक्रम राबवण्यात येत आहे आणि त्याची पूर्तता साधारण २०२० पासून सुरु होऊन २०२२ पर्यंत संपणार आहे असा विश्वास ह्या अधिकाऱ्यांनी समस्त पुणेकरांना देवून त्यांच्या सहकाराची मागणी केली आहे.  कृषीमहाविद्यालयाच्या जागेत भूमिगत मेट्रो प्रकल्पाला सुरवात झाली आहे तसेच स्वारगेट येथेही त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या खड्ड्याच्या खोदाईचे काम सुरु करण्यात आले आहे.  लवकरच बुधवार पेठेतील जागेचे भू-संपादन पूर्ण करून तेथील भुयारी मेट्रोच्या कामास सुरवात करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट ते शिवाजीनगर ह्या भुयारी  मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  नुकत्यात हाती आलेल्या बातमीनुसार, पुण्यात ‘ड्रोन ट्याक्सी’ सुरु करण्याची योजना आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर बोलणी झाली असून हा महत्वाकांशी प्रकल्प २०२२ पर्यंत अमलांत आणण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.  पर्यावरण मंत्रालय आणि वाहतूक मंत्रालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे तसेच पुण्यात मुठानदीवर तीन धरणे असून महानगरपालिकेच्या कृपेने सांडपाणीही मुठेच्या जलप्रवाहात सोडल्यामुळे मुठा नदी बारा महिने भरून वाहत असते त्यामुळे ह्या नदीवर खडकवासला धरणापासून ते येरवडा येथील बंडगार्डन पुलापर्यंत ‘जल वाहतूक’ करण्याचे योजिले आहे व ह्या प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याची मान्यता प्राप्त झाली आहे हे विशेष नमूद करण्यात आले आहे व हा प्रकल्पही साधारण २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.  एकूण काय तर २०२०/२०२२ मध्ये पुण्याचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे व मेट्रोचे पुणे म्हणून नक्कीच नावारूपास येईल असे वाटते.

अधून मधून, हा बातमीदार अजूनही काही किरकोळ बातम्या देत होता,  म्हणजे,  कुठे एखाद्या अल्पवयीन मुलीवर तर कुठे एखाद्या महिलेवर बलात्कार झालाय, कुठेतरी तरुण मुलीचा विनयभंग झालाय, कौटुंबिक कलहातून एखादा खून झालाय, दुष्काळग्रस्त शेतकरी शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे तोट्यात चाललेल्या शेतीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करताहेत, मराठा, धनगर आरक्षण मोर्चा शांततेत निघालाय, मुस्लीमही आरक्षण मागण्यासाठी मोर्च्याच्या तयारीत आहेत.  तुरळक ठिकाणी आग लागून काही जीवित आणि वित्तहानी झाली आहे.  अनधिकृत बांधकाम कोसळून काही लोकं मृत्युमुखी पडलेत तर दिल्लीत प्रदूषणाने कहर केला आहे.  उदबत्ती पेटवलीत तरी धोक्याची पातळी ओलांडली जातेय आणि कित्येक लोकांना श्वसनाच्या विकारांचा त्रास होतो आहे.  मुंबईत तर चार पाच ठिकाणी जुन्या इमारती पडून मोठी दुर्घटना घडल्या आहेत.  पावसाने लोकल सेवा ठप्प होऊन मुंबईतील चाकरमान्यांचे हाल झाले आहेत आणि तरीही कुठलीही तक्रार न करता हे मुंबईकर तितक्याच उत्साहाने आपले जीवन कंठीत आहेत.  पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात थैमान घातले आहे त्यामुळे उभी पिके वाहून गेली आहेत.  शेतकरी हवालदिल झाले आहेत.  सरकारने नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश जारी केले आहेत.  विजय मल्ल्या, निरव मोदी परदेशामध्ये त्यांचे आयुष्य अगदी छानछोकीत ऐशोआरामात जगत आहेत असे काही सूत्रांनी सांगितले आहे.  त्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार खात्यास बाजूला सारून स्वत: पंतप्रधान कार्यालयाने कामास लागावे का ह्याचा सध्या विचार चालू आहे.  लवकरच सार्वत्रिक निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सध्या बऱ्याच प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांमध्ये युतींचा ताळमेळ बांधण्याचे काम अगदी जोरात चालू आहे व त्यामुळे जनतेच्या कामास तसेच काही सामाजिक प्रकल्पांस थोडासा उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वाहिन्यांवर त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या विषयांवर रोखठोक अथवा बेधडक अशा निष्फळ चर्चा चालू आहेत त्यावरून घरामध्ये नवरा आणि बायको मध्ये फक्त भांडणे होत आहेत कारण बायकोला तिच्या आवडीची ‘झी’ वरील मराठी मालिका पहायची आहे तर नवऱ्याला ह्या निष्फळ बातम्या आणि चर्चा पहायच्या आहेत.  ह्यात खरा जीव जातो तो त्या रिमोटचा हे मात्र नक्की..

बापरे किती बोलावे लागते नाही का ह्या बातमीदारांना.. बिचारे घरी गेल्यावर झोपेतही हेच बडबडत असावेत बहुधा.. असा विचार मनातल्या मनात करत रवीला कधी एकदम गाढ झोप लागली हेच कळले नाही.  बायकोनेही त्याला अजिबात उठवले नाही.

त्याच्या मनावर ह्या बातम्यामधील विविध प्रकल्पांचा एवढा प्रभाव झाला होता की तो स्वप्नातच २०२०/२०२२ साली पुणे कसे असेल ते पाहू लागला.  ते असे....

नेहमीप्रमाणे पहाटे लवकर उठून रवी ४ किलोमीटर फिरून आला.  स्वत:चे आवरले, देवपूजा केली, चहा नाष्टा केला आणि सोफ्यावर बसून वृत्तपत्र वाचीत बसला होता.  कार्यालयास जायला अजून अर्धा तास होता.  आज त्याचा बेत जरा निराळाच होता.  त्याने बायकोला सांगितले की मी आज जरा १५ मिनिटे लवकरच निघतो.  गाडी काही नेत नाही आणि रिक्षाचाही कंटाळा आला आहे.  आज मी कार्यालयात सार्वजनिक वाह्तुकीनेच जातो आहे.  काय ! चालेल ना.  बायको म्हणाली चालेल की, त्यात काय एवढे !  फक्त तुमच्या तराजुतून ह्या सार्वजनिक उपक्रमांचे विश्लेषण करू नका.  म्हणजे प्रकल्पाच्या सुरवातीला तो डिसेंबर २०२० पर्यंत पुरा होणार आहे ह्याचा अर्थ तुम्हीं लगेचच म्हणजे आजच ते ही आज ३१ डिसेंबर २०२०ला तो अजमावण्याची गरज नाही.  काही कामे अपूर्ण असतील तर उगाचच स्वत:ची चीड चीड करून रक्तदाब वाढवून घेऊ नका आधीच आपल्याला हृदयविकाराने ग्रासले आहे हे लक्षात ठेवा.

बायकोचे बोलणे हवेत विरेपर्यंत रवी घरातून निघाला होता.  घरासमोरील टेलिफोन कार्यालयाजवळ असलेल्या सार्वजनिक सायकलचा वापर करायचे त्याने ठरवले.  भ्रमणध्वनीवरून कुठलेतरी माध्यम चालू करून त्या सायकलचे कुलूप काढून घेतले आणि सायकलला टांग मारून तो चक्क सातारा रोडला लागला.  बालाजी नगरला आल्यावर त्याने ती सायकल तेथील सार्वजनिक सायकल स्थानकावर सोडली.  भ्रमणध्वनीवरून मागण्यात आलेले पैसे ‘रूपे’च्या माध्यमातून दिले आणि चक्क ‘बीआरटी’ मार्गावरील बसस्थानकात प्रवेश केला.  काय आश्चर्य एका मिनिटात स्वारगेटला जाणारी बस आली.  अगदी वातानुकुलीत बस.  स्थानकावर आल्याबरोबर खाडकन दरवाजे उघडले, रवी आणि बाकीचे प्रवासी आत चढले आणि दार बंद झाले.  बसायला खिडकीजवळची जागा मिळाली.  वाहकाने स्वारगेटचे तिकीट रवीच्या हातावर टेकवले आणि एवढेच पैसे म्हणून तो आश्चर्यचकितच झाला.  त्याचे कार्यालय कोथरूडला आहे आणि त्याला धनकवडीहून कोथरूडला जायला स्वारगेट मार्गेच जावे लागते हे बायकोने सांगितले होते कारण ह्या पठ्ठ्याला स्वत:ची चारचाकी किंवा रिक्षा हीच दोन प्रवासाची साधने आहेत असे वाटत होते !  ‘बीआरटी’ मुळे मोजून वीस मिनिटात बस स्वारगेटला पोचली होती.  रस्त्यात त्याला स्वारगेट-कात्रज मेट्रोचे काम चालू असलेले दिसले होते.  त्याचा मार्केटयार्ड चौकात मेट्रोचा मार्ग थोडासा वळवून बिबवेवाडी मार्गे नेलेला जाणवला होता आणि पदाम्वती ते भारतीविद्यापीठ दरम्यान नुकताच बांधलेल्या उड्डाण पुलास जीवनदान दिलेले पाहून त्याला समाधान वाटले होते.  कामाच्या प्रगतीवरून बहुतेक २०२२ पर्यंत मेट्रोचा हा मार्ग नक्की पूर्ण होईल ह्याची रवीला खात्री पटली होती.  हे ही नसे थोडके असे म्हणून त्याने स्वत:च्या मनाचे समाधान करून घेतले.

रवी स्वारगेट स्थानकावर आल्यावर बसमधून उतरला आणि पादचारी मार्गावरून चालत जावून ‘मेट्रो’ स्थानकात प्रवेश केला.  हे भले मोठे स्थानक बघून त्याचे तर डोळेच दिपले होते. (तसे पाहायला गेले तर अजून बरीचशी कामे चालू होती. कदाचित ती पूर्ण व्हायला २०२२ तर नक्की उजाडणार होते. परंतु प्रगती खूपच चांगली झालेली होती हे निर्विवाद होते.)  आपण नक्की ‘स्वारगेट’लाच आलोय ना का कुठे परदेशात आलोय अशी त्याची मानसिक अवस्था झाली होती.  जिकडे पाहावे तिकडे माणसेच माणसे.  इतकी कामे चालू असली तरीही इतकी स्वच्छता, शिस्तबद्धता.  छे छे, हे काहीतरी वेगळेच आहे,  कदाचित आपण सिंगापूर, मलेशियाला आलोय की काय असेच त्याला वाटले.  सगळीकडे माहिती देणारे फलक होते, कुठेही चुकायला होणार नाही असे दिशा दर्शक होते आणि त्यातही जर वाटले तर मी आपणास मदत करू का” !  असे सौजन्याने विचारणारे काही कर्मचारीही होते.  भुयारी मेट्रोचे काम अजून अपूर्ण होते ते ही डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होईल असे तिथे प्रकल्पाची माहिती देणाऱ्या एका फलकावर लिहिलेले रवीला दिसले आणि तो पुन्हा एकदा मनोमन सुखावला.

रवीला कोथरूडला जायचे होते.  त्याने स्वारगेट स्थानकाला लागुनच असलेल्या ‘पीएमटी’कडे आपला मोर्चा वळवला आणि डेक्कनला जाणारी बस पकडली.  एक तर रवीने पीएमटीने फारसा प्रवास केलेलाच नाही त्यात त्याला ही नवी कोरी वातानुकुलीत ई बस फारच भावली.  त्याने डेक्कनचे तिकीट काढले कारण त्याला आता डेक्कन वरून मेट्रोने व्ह्नाजकडे जायचे होते कारण मेट्रोने नुकताच व्ह्नाज ते डेक्कन आणि पिंपरी ते कृषिविद्यापीठ-शिवाजीनगर हा मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला केला होता.  रवीला त्याचाच तर लाभ घ्यायचा होता.  साधारण २० मिनिटांत रवी स्वारगेटवरून डेक्कनला पोचला.  त्याच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय असा क्षण होता.  पुण्याच्या उज्वल भविष्याची ग्वाही देणारा हाच तो क्षण रवीला आजमावता आला हेच त्याचे भाग्य होते.

डेक्कन मेट्रो स्थानकात पोचल्यावर रवीची हाताची दहाही बोटे तोंडात गेली.  डेक्कन स्थित पुलाची वाडी ह्या त्याच्या जन्मस्थळा पासून जेमतेम हाकेच्या अंतरावर असेलेले हे ‘मेट्रो स्थानक’ पाहून आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यासारखे वाटत होते रवीला. तो पूर्ण भंजाळून गेला होता.  सगळेच इतके अजब होते की काही विचारूच नका.  ते सरकते जिने काय, लख्ख दिव्यांचा झगमगाट काय, प्रत्येक भितींवर पुण्यातील ऐतिहासिक घडामोडींचे अतिशय सुबक आणि सुंदर चित्रे रंगवून ह्या स्थानकाच्या वैभवात भर टाकत होती.  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्याच भिंतींवर अप्रतिम कलाकुसरीने रेखाटून वातावरण भारावून टाकत होता आणि अभिमानाने ३-४ इंच छाती फुगवत होता.  थोडेसे वर एक जिना चढून वर गेलात की मुख्य रस्त्यावर जाता येत होते, तेथून तुम्हीं रिक्षा, ट्याक्सीने पुणे शहरात जावू शकत होता.

रवी डेक्कनवरून-व्ह्नाजकडे जाणाऱ्या मेट्रोत बसला. नदीपात्रातून सुरु झालेला मेट्रोचा तो प्रवास, पहिले स्थानक ‘गरवारे कॉलेज’ आले.  मेट्रो काही सेकंद त्या स्थानकात थांबली आणि रवीच्या स्मृती पटलावर १९८०-८३ गरवारे महाविद्यालयातील तो सुवर्ण काळ हलकेच तरळून गेला.  एकएक करत साधारण दहा मिनिटांत मेट्रो ‘मयूर कॉलनी’ स्थानकात घुसली.  रवीला ह्याच स्थानकावर उतरायचे होते कारण त्याला कर्वे पुतळ्याकडे जायचे होते.  मेट्रो स्थानकाच्या बाहेर येऊन त्याने सार्वजनिक सायकल स्थानकावरील एक सायकल घेतली आणि टांग टाकून तिथून अगदी १ किलोमीटर लांब असलेल्या आपल्या कार्यलयाकडे मार्गस्थ झाला.  पाच मिनिटात गडी कार्यलयाच्या जवळ पोचला.  तेथील जवळच्या सार्वजनिक सायकल स्थानकावर त्याने सायकल सोडली. भ्रमणध्वनी द्वारे पैसे दिले आणि चालत म्हणजे फक्त ५०च पावले चालत कार्यालयात पोचला.  घरून निघाल्यापासून फक्त ४० मिनिटात रवी कुठलीही दगदग न करता चक्क रोजच्या पेक्षा अगदी निम्म्या खर्चात कार्यलयात पोचला होता आणि मनोमन आपल्या पुण्याच्या सार्वजनिक प्रवास व्यवस्थेला, महानगरपालिकेला, प्रशासकीय यंत्रणेला प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि मुख्यमत्री, पंतप्रधान, पुण्याचे महापौर,  आमदार,  खासदार, व सर्व राजकारण्यांना धन्यवाद देत होता. 

एकंदरीत पुणे शहराचा संपूर्ण मेट्रो प्रकल्प साधारण २०२२ पर्यंत पूर्ण व्हावा असे रवीला सध्याच्या प्रगतीवरून वाटले व त्याच्या साथीला बीआरटी तसेच रिंगरोडचीही सुविधा पाहून पुणे शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अगदी निर्धोकपणे जाता येऊ शकते ह्याची खात्री त्याला पटली.  ह्या सर्व प्रकल्पांच्या कामांमुळे सध्या पुण्यात खूपच वाहतूक कोंडी होते आहे हे मान्य आहे.  परंतु पुढील ५० वर्षे जर का सुखकर प्रवासात काढायची असतील आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर हा त्रास सहन करणे हे एक पुणेकर ह्या नात्याने आपले सामाजिक कर्तव्यच आहे असे रवीला अगदी मनापासून वाटले.  

रवीची खात्री पटली की २०२० साली नाही तरी २०२२ पर्यंत तरी हे सगळे प्रकल्प पूर्णत्वास जातील आणि त्याने त्याच्या स्वप्नातल्या पुण्याला रामराम केला.  मधेच अपरात्री त्याला जाग आली तेंव्हा त्याच्या समोर दूरचित्रवाणी संच चालूच होता आणि तोच बातमीदार पुन्हा पुन्हा त्याच त्या बातम्या परत परत आळवत होता.  तो तरी काय करणार बिचारा!  चोवीसतास कुठून पैदा करायच्या हो नवीन नवीन बातम्या.....

आणि इतक्यात त्या बिचाऱ्या बातमीदारावर एक अतिशय धक्कादायक बातमी देण्याची वेळ आली ती म्हणजे; कोरोना नावाचा एक विषाणू आला आहे. त्याने सर्व जगभर धुमाकूळ घातला आहे. त्याच्या प्रादुर्भावाने चीन, युरोप, अमेरिकेत लाखो लोकं मृत्युमुखी पडले आहेत व लवकरच हा विषाणू भारतातही आपला प्रादुर्भाव दाखवायला सुरवात करतो आहे. परदेशातून आलेल्या लोकांच्या मुळे हा संसर्गजन्य रोग भारतात आपले पाय पसरू लागला आहे. काळजीचे कारण म्हणजे ह्या विषाणूवर अजूनही लस सापडलेली नाही व त्यावर कोणताही औषध उपचार सापडलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.  संसर्गाने हा विषाणू लगेचच पसरतो आहे.  त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात ने येणे हाच काय तो मुख्य उपाय आहे. त्यामुळे पुढील काही काळासाठी सरकरने लॉकडाऊन जाहीर केले आहे. अक्षरश: ‘संचार बंदी’ लागू करण्यात आली आहे...

रवीला ही बातमी ऐकून थोडी चिंता वाटू लागली. त्याच्या मेट्रोच्या पुण्याचे काय होणार ? असा एक भोळा भाबडा प्रश्न त्याला पडला... तो सकारात्मक विचार करत करत स्वत:च्या मनाशी म्हणाला... हे तर काही काळा पुरते संकट आहे. थोडी काळजी घेतली व जनसंपर्क टाळला तर जाईल ते ही निघून.. जसा प्लेग, स्वाईन फ्ल्यू गेला तसाच.....

रवींद्र कामठे

टीप ;

मेट्रोचे पुणे” हा लेख काव्यानंद दिवाळी अंक २०२०मध्ये प्रकाशित झालेला आहे. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे म्हणून न राहवून हा लेख पुन:प्रकाशित करत आहे. फोटो मात्र सध्याचे म्हणजे जून २०२२ मधील आहेत. 

No comments:

Post a Comment