Wednesday 30 March 2022

“विनोदाचा व्हेंटिलेटर” नसून “विनोदाचा एलीव्हेटर” पुस्तक परिचय




“विनोदाचा व्हेंटिलेटर” नसून “विनोदाचा एलीव्हेटर”

'चपराक प्रकाशन'च्या १-१५ एप्पारिल २०२२च्या पाक्षिकात प्रकाशित करण्यात आलेला हा पुस्तक परिचय नक्की वाचा.

‘विनोद’ म्हटले की आपल्याला आपसूकच हसू येतेच असे नाही.  त्याचे कारण विनोद कोणी, कसा, किती प्रगल्भतेने व सहजतेने केला आहे, तसेच तो अचूक वेळेला केलेला असेल तरच त्याचा परिणाम होतो, तो आपल्याला भावतो. आपल्याही कळत नकळत आपल्याला हसायला भाग पाडतो.  विनोदाची हीच तर खरी गमंत आहे.  आजकालच्या ह्या धकाधकीच्या व आधुनिकतेच्या काळात विनोद आपल्या हातातच एका यंत्रात विसावलेला आहे.  फक्त आपल्याला तो शोधावा लागतो व त्यावर वेळ काढून हसावे लागते ही शोकांतिका आहे.  ह्यालाच उत्तर म्हणून की काय, पुण्याच्या ‘चपराक प्रकाशन’ने, विनोदी लेखक डॉ. आनंद देशपांडे यांनी लिहिलेले “विनोदाचा व्हेंटिलेटर” हे अतिशय वाचनीय पुस्तक प्रकाशित केले आहे.  प्रत्येक प्रकरण वाचतांना मनातल्या मनात हसत होतो आणि लेखकाला व प्रकाशकाला धन्यवाद देत होतो.
“विनोदाचा व्हेंटिलेटर” ही संकल्पनाच अफलातून आहे.  त्यात “व्हेंटिलेटर” हा शब्द चांगलाच प्रचलित आहे.  “व्हेंटिलेटर” म्हटले की आपल्याला मरणासन्न अवस्थेतला रुग्ण आठवतो आणि आता तो गेलाच म्हणजे देवाघरी जाणारच आहे असे समजून आपण श्रद्धांजलीही वाहून मोकळे होतो. अगदी त्याच भावनेने लेखकाने आपल्यातील हरवत चाललेल्या म्हणा किंवा प्रत्येकात असूनही न सापडणाऱ्या विनोद बुद्धीला चालना मिळावी म्हणून “विनोदाचा व्हेंटिलेटर” प्रस्तूत केला आहे असे वाटते.
दिवसेंदिवस आपण सगळेच समाज माध्यमांद्वारे सतत व्यक्त होत असतो.  त्यात आपली बुद्धी आणि शक्ती नाहक खर्च करत असतो.  पण जगण्यासाठी लागणारा प्राणवायू म्हणजेच “विनोद” मात्र हरवून बसतो.  आपल्या आजूबाजूला इतक्या विनोदी घटना, प्रसंग घडत असतात, परंतू विनोदाचे अंग हरवलेले आपण, त्याकडे अगदी निरिच्छपणे बघत असतो.  त्याचे कारण आपण सतत काहीतरी पाहत असतो, ऐकत असतो, परन्तु वाचत मात्र नाही.
सध्याच्या काळात विनोदी लिहिण्याचे फारसे धाडस कोणी करतांना दिसत नाही.  नाही म्हणायला दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील त्याच त्या विनोदी मालिका पाहून पाहून आपल्याला हाच काय तो विनोद आहे असे वाटायला लागले आहे की काय असे वाटते.  पुरूषांनी स्त्रियांचा पोशाख करून आचकट विचकट हावभाव केले म्हणजे तो विनोद असतो असे आपली भाबडी भावना झालेली आहे.  काही अपवादात्मक कायर्क्रम सोडले तर बाकी सगळा दुष्काळाच आहे असे म्हणालो तर वावगे ठरणार नाही.
ह्या सगळ्या भाऊगर्दीत लेखक डॉ. आनंद देशपांडे यांनी ३५ प्रकरणांतून आपल्या रोजच्याच आयुष्यात घडत असलेल्या प्रसंगातून, घटनांतून, माणसांच्या वागणुकीतून, बोलण्यातून, प्रतिक्रियेतून, अभिप्रायातून व्यक्त होत असलेल्या भावनांतून प्रतिध्वनित होणारा विनोद अतिशय सहजपणे परंतु तितक्याच विनोदी शैलीने मांडून खळखळून हसायला भाग पाडले आहे.  उदाहरणार्थ, संक्रांत असते कुणावर, याला म्हणतात प्रवास वर्णन, टीआरपी-अर्थात ताई रडलीच पाहिजे, कायम यौवनात मी, बोलीभाषा पर्भनीची, कोरोनासुराशी लढा, इत्यादी, सगळीच प्रकरणे लेखकाने त्यांच्यातील विनोदी शैलीने आणि अनुभवाने फुलवून जिवंत केली आहेत व विनोदाला चांगल्या अर्थाने व्हेंटिलेटरवर ठेवून उर्जित केले आहे. 
हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेऊन वाचून आपल्या आयुष्यात हरवलेला विनोद परत मिळवायला काहीच हरकत नाही असे मला वाटते. माझ्या दृष्टीने हा “विनोदाचा व्हेंटिलेटर” नसून “विनोदाचा एलीव्हेटर” आहे.  म्हणजे लेखकाने अगदी मोजक्या शब्दांत विषयानुसार मांडणी करून त्या त्या घटनेतील अथवा प्रसंगातील नेमका विनोद, ‘राजहंस जसा दुधातून पाणी वेगळे काढतो’, तसा विनोद टिपून काढला आहे.  लेखक मुळचे परभणीचे असल्यामुळे तिकडच्या बोलीभाषेचा एक वेगळा बाज त्यांच्या लेखनात जाणवतो आणि तो मनाला खूपच भावतो.  अर्थात भाषेच्या सामर्थ्यामुळे व तिच्या अचूक वापराने ह्या पुस्तकातील विनोदाला एक वेगळीच उंची लाभली आहे.  ह्या पुस्तकाने मराठी साहित्यातील लुप्त होत चालले विनोदी लेखन पुनर्जीवित होईल व नवनवीन लेखक लिहिण्यास उद्युक्त होईल ह्याची खातरी वाटते व त्याचे श्रेय विनोदी लेखक डॉ. आनंद देशपांडे सरांना तर आहेच परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या प्रकाशन व्यवस्थेवर मात करून हे अतिशय उल्लेखनीय विनोदी पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस करणाऱ्या ‘चपराक प्रकाशन'लाही द्यावयास हवे.
सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे सरांनी ह्या पुस्तकाचे इतके समर्पक मुखपृष्ठ साकारले आहे की ते पाहूनच हसू फुटते व पुस्तकातील लेखनाची चाहूल लागून आपल्या नकळत हे पुस्तक हातात येते.  आपण ते कधी वाचायला सुरवात करतो व एक एक प्रकरण वाचता वाचता मनातल्या मनात हसत राहतो.  आपल्या मनावर, शरीरावर आलेला ताण कुठल्याकुठे नाहीसा होतो हेच कळत नाही.  माझ्या बाबतीत तरी हे असेच घडले आहे हे मी आवर्जून सांगतो आहे व  हीच तर खरी जादू आहे ह्या विनोदाच्या व्हेंटिलेटरची.
‘चपराक’ ची खासियत म्हणजे अतिशय सुबक मांडणी, उत्तम दर्जाचा कागद व तितकेच उच्च दर्जाचे मुद्रण हे ह्या पुस्तकाच्या नेपथ्यात भरच घालतात व हे पुस्तक विकत घ्यायला भाग पाडतात.  मला तरी हा मोह आवरला नाही.  तुम्हीही हा मोह आवरू नका.

पुस्तकाचे नाव - “विनोदाचा व्हेंटिलेटर”
प्रकाशक – घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन
लेखक – आनंद देशपांडे
पृष्ठे – ११२,
मूल्य – रु. २००/-

रवींद्र कामठे
९४२१२१८५२८

Tuesday 29 March 2022

अतुलचा अविस्सेमरणीय वापूर्ती सोहळा

अतुल,


मित्रा आज तुझ्या सेवापूर्ती सोहळ्यात तुझ्या सहकारी व अधिकारी वर्गाकडून तुझे कौतुक ऐकताना मन भावविवश झाले होते. तू तुझ्या आई बाबांची, भावा बहिणींची व सर्व कुटुंबाची आम्हा मित्र मैत्रिणींची मान अभिमानाने उंचावलीस.

हेमा, ऐश्वर्या, अथर्व आणि अमेरिकेत स्थाईक झालेली अदिती आणि जावई ह्यांची सुध्दा अवस्था तीच असेल हे नक्की.

तू जमवलेला गोतावळा, मित्र परिवार आणि सहकारी पाहून मला तुझे फार कौतुक वाटले व मी तुझा मित्र असल्याचा गर्वही वाटला. ३५ वर्षांच्या आपल्या निखळ व निस्वार्थी मैत्रीचा प्रवास एखाद्या चित्रफितीसारखा माझ्या स्मृतीपटलावरुन हळूहळू सरकत होता व मन भावनेने ओथंबून वाहत होते.

मला तर तुझे कौतुक करण्यास शब्दही सुचत नव्हते. फक्त एवढेच वाटले की;

अतुल म्हणजे माणुसकीचे अधिष्ठान,
अतुल म्हणजे जिव्हाळ्याचे प्रतिष्ठान,
अतुल म्हणजे संस्कारांचे संविधान !

तुझ्यातला एक सच्चा मित्र व तू पदोपदी अडीअडचणीच्या काळात माझ्या आणि वंदनासाठी धावून आलेले क्षण आपसुकच स्मृतीपटलावर अश्रुरुपातून घरंगळत होते. आपण एकत्रीतपणे घालवलेले सर्व क्षण भाऊगर्दी करुन व्यक्त होण्यासाठी धडपडत होते. त्यांची ती रस्सीखेच पाहून मन गलबलून गेले होते वा त्या नादात मला व्यक्त होण्याचेही भान नाही राहिले.

ह्या सोहळ्यामुळे मला तुझ्या कामातील संघर्ष प्रकर्षाने जाणवला. तुझी जिद्द, प्रामाणिकता, नियोजनात्मक वागणूक, आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन, प्रगल्भ वैचारिक बैठक, शाखेचे व संघ परिवाराचे तुझ्यावर झालेले संस्कार, सचोटी, सुसंस्कारी विचार व तितकेच त्यांना आचरणात आणण्याची तुझी यशस्वी धडपड अगदी सहजपणे जाणवली. तुझी सामाजिक व सांसारिक जडणघडण तर वाखाणण्याजोगीच आहे.

अतुल,
तू एक आदर्श मुलगा आहेस. कुटुंबाचा व गोतावळ्याचा जीव की प्राण आहेस.
तू, हेवा वाटावा असा हेमाचा नवराही आहेस.
तू, तुझ्या लेकरांचा तर श्वास आहेसच, परंतु त्यांच्यासाठी तू सुसंस्कारांचे चालते बोलते विद्यापीठच आहेस.
तू, प्रगल्भ शिक्षक तर आहेसच, परंतू सेवाभावी वृत्तीने ज्ञानदान करणारा दाताही आहेस. तुझ्या विद्यार्थी व सहकार्यांचा तू फार मोठा आधारही आहेस.
तू, मित्रांसाठी तळमळणारा सच्चा दुवा आहेस, म्हणूनच मित्रांनाही हवाहवासा आहेस.
तू, एक उत्तम वक्ता आहेस, तितकाच अभ्यासूही आहेस. तुला इतिहासाची जाण आहे व तो सांगण्याची तहानही आहे.
तुझ्यासारख्या प्रगल्भ व्यक्तिमत्वांची समाजाला व संसाराला खरी गरज आहे.

तुझ्या सारख्या मित्रामुळे मी खूप समृध्द झालो आहे. मला आणि वंदनाला तर तुझा फार आधार आहे. म्हणूनच, सहज म्हणावेसे वाटते की;

जीवनात मित्र हा विचार आहे
तो नसणे हा तर आजार आहे ।।
सुख दुःखात ह्या जीवनाच्या
मित्र हाच एक आधार आहे ।।
लाभणे मित्र सुदाम्यासारखा
हा तर एक दैवी प्रकार आहे ।।

अतुल,
आयुष्याच्या ह्या सुखद वळणावर, पुढील सुखकारक प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा.

आजचा सेवापूर्ती सोहळा अप्रतिमच झाला. संतोष देशपांडेने जेवणही खूप स्वादिष्ट बनवले होते.
स्मृतींचा आणि भावनांचा हा सुरेख मेळ होता. जो तुझ्या कर्तृत्वाला शोभेसा असाच होता.

आता तू, मी, वंदना आणि हेमा मिळून निवृत्ती पश्चात आयुष्यात धमाल करु. आपली लेकरं तर असतीलच आपल्या बरोबर, त्यांच्या त्यांच्या सोयी सवडीने.

रवी आणि वंदना
सोमवार २८ मार्च २०२२.

जाता जाता माझी एक समर्पक कविता,
|| क्षण निवृत्तीचा ||

क्षण निवृत्तीचा, असतो दुभाषी,
एक मन म्हणते, निष्क्रिय झालासी,
दुजे मन सांगते, सक्रीय व्हावेसी ||

क्षण निवृत्तीचा, असतो विलक्षण,
एक मन करते, भूतकाळाचे परीक्षण,
दुजे मन सांगते, भविष्याची उजळण ||

क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ,
एक मन म्हणते, स्मृती तू उजळ,
दुजे मन सांगते, क्षण हे उधळ ||

क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी,
एक मन म्हणते, उरलास सकळासी,
दुजे मन सांगते, जुळवून घे समाजासी ||

रविंद्र कामठे!🤓