Thursday 8 September 2022

भैरवनाथ दादांचा "अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील अभिप्राय


२५ ऑगस्ट पासून मी रोज एक नव्या आनंददायी अनुभवातून जातो आहे, तो म्हणजे माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे वाचकांकडून होणारे कौतुक होय!

आपल्या देशाच्या सीमेवर निधड्या छातीने रक्षण करणाऱ्या भैरवनाथ दादांचे माझी कादंबरी वाचून झाल्यावर आलेले सोबत जोडलेले हे अतिशय भावस्पर्शी पत्र म्हणजे माझ्यासाठी एक फार मोठा पुरस्कारच नव्हे तर अविस्मरणीय असा सन्मान आहे. लेखक ह्या नात्याने माझ्या साहित्य संपदेचा अजून काय सन्मान व सत्कार व्हायला हवा!
भैरवनाथ दादांनी माझी कादंबरी दिल्लीला मागवून घेतली. ती वाचली आणि लगोलग मला फोन करुन त्यांनी लिहिलेला हा स्वर्गानुभव ऐकवला आणि मला भावविवश केले. 
२५ आॕगस्टच्या प्रकाशना आधीच त्यांनी पूर्वनोंदणी केली होती आणि मला फोनकरुन कादांबरी शक्यतो ३१च्या आत पाठवा अशी विनंती केली होती. कारण त्यानंतर त्यांचे बटालीयन दिल्लीहून सीमेवर रवाना होणार होते.
भैरवनाथ दादांची ही तळमळ माझ्यातल्या साहित्यिकाला घायाळ तर करुन गेलीच पण माझ्यातला माणसाला निःशब्द करुन गेली.
घरदार, संसार सर्वकाही सोडून दादांसारखे जवान आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात म्हणून आपण सुखाने जगतो आहोत ही भावना उजागर झाली आणि मनोमन दादांना दंडवत देऊन गेली.
भैरवनाथ दादांची कादंबरी वाचून झाल्यावर लगोलग ती त्यांच्या साथीदाराने वाचण्यासाठी पळवली. बटालीयनमध्ये आता ती एका जवानाच्या हातून दुसऱ्याच्या हातात जाईल, वाचली जाईल. त्यामधील भावनांशी ते एकरूप होतील. काही क्षण का होईना त्यांना विरंगुळा लाभेल, त्यांना सीमेवर शत्रूशी लढण्याचे बळ देऊन जाईल हे उमजून माझे डोळे डबडबले होते.
वाचन संस्कृती लुप्त होत चालली आहे, ही एक भाकड कथा आहे असेच मला वाटले.  जर का चांगले साहित्य वाचायला मिळाले तर वाचकही त्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते.
भैरवनाथ दादांना माझी कादंबरी त्यांच्या गावाला घरी कुटुंबाला वाचण्यासाठी पाठवायची होती, पण आता ती परत कधी हाती लागेल याची काही खातरी नव्हती. तशी खंत ते बोलता बोलता व्यक्त करून गेले.  त्यांच्याकडून गावचा पत्ता मिळाल्याबरोबर चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी, आत्मियतेनी आजच ही कादंबरी त्यांच्या गावाला पोस्टाने पाठवून देऊन मला उपकृत केले हे नक्की.
अजून काय लिहू.  
भैरवनाथदादांचे सोडत जोडलेला अभिप्राय नक्की वाचा.
रवींद्र कामठे.

भैरवनाथ यांचा माझ्या कादंबरीवरील हा उत्स्फुतपणे लिहिलेला अभिप्राय नक्की वाचा. 
(दादांचेच शब्द मी फक्त वाचकांसाठी वाचता यावेत म्हणून टंकलेखन करून काह्ली दिले आहेत)

प्रसिद्ध लेखक आणि कवी श्री. रवींद्र कामठे सर यांची अनोख्या रेशीमगाठी ही कादंबरी, कथा आणि त्यातील वर्णन खूप सुंदर पद्धतीने लिहिण्यात आले आहे.   या कादंबरीमध्ये "लिव्ह इन रिलेशनशिप" हा विषय अतिशय सुबकपणे हाताळला आहे.  प्रभाकर आणि पूजा यांच्यासह दीपक आणि सई अशा दोन पिढ्यांच्या भावभावनांचे प्रगटीकरण या कादंबरीतून झाले आहे.  या  कादंबरीमध्ये एकाच इमारतीतील एक बाप आणि मुलगा आणि एक आणि तिची मुलगी सहवासातून एकत्र येतात आणि त्यांचे ऋणानुबंध निर्माण होतात. यामध्ये कोकणातील आंजर्ल्याचे आणि त्या परिसराचे आलेले मनोहरी वर्णन हे तर या कादंबरीचा आत्मा आहे.   यामध्ये  आंजर्ल्याहून परत येत असताना जिथे दीपाचा मृत्यू झाला होता तिथे पूजाने ओटी भरणे, यामध्ये स्वत:च्या साखरपुड्यातील दीपकचे भाषण प्रसंगात या कादंबरीने कमालीची उंची गाठली आहे.
सर, तुमच्या लेखनीची जादू आहे.  दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही.  आणि ही कादंबरी कधी वाचून झाले हे समजलेच नाही.  खूप छान विचार मांडले आहेत कामठे सरांनी.  कादंबरी वाचून झाली असे वाटले मी कोकणातच आहे. 
माझी ही पहिली कादंबरी आहे की ही कादंबरी वाचताना डोळ्यातून पाणी आलेले समजलेही नाही.  खरंच खूप छान कादंबरी आहे कामठे सर.
"लिव्ह इन रिलेशनशिप" सारख्या विषयावर मार्मिक भाष्य केल्याबद्दल रवींद्र कामठे सरांचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
"जय हिंद सर"
भैरवनाथ  

No comments:

Post a Comment