Wednesday 7 September 2022

माझी पंढरीची वारी.

 माझी पंढरीची वारी.



ह्या जगात माझ्या एवढा भाग्यवान मीच. त्याचे कारणही तसेच आहे मंडळी. काय सांगू ! कसे सांगू ! मला तर काही सुचतच नाहीयं. माझे मन प्रचंड भावविवश झाले आहे व डोळेही पाणावले आहेत. कंठ दाटून आला आहे. परंतु माझा आजचा अनुभव तुम्हाला सांगायलाच हवा असाच आहे. ज्या क्षणाची प्रत्येक वारकरी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन होय, पांडुरंगाच्या चरणी लीन होणे होय ! ‘भेटी लागी जीवा ! लागलीसी आस !’ हो मंडळी, मीच तो भाग्यवान ज्याच्या मनीध्यानी नसताना ५९ वर्षातल्या आयुष्यात चक्क पहिल्यांदा पंढरपूरला जाणे झाले व पांडुरंगाच्या पायाशी लीन होता आले. तेही अजिबात घाई गडबड न करता. गेले कित्येक वर्षे आपल्या सगळ्यांच्या व माझ्याही लाडक्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाची आस मी धरून होतो पण योगच येत नव्हता. हा योग जुळून आला तो आमच्या कामठे परिवाराचे ज्येष्ठ सदस्य व वयाच्या ८०तही पंढरीची वारी करणारे श्री. नेताजी कामठे काका यांच्यामुळे. काकांचे हे ऋण मी ह्या जन्मातच काय पण कितीही मनुष्य जन्म मिळाले तरी फेडू शकणार नाही हे नक्की.

काल रात्री नेताजी काकांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारले की उद्या पंढरपूरला येतोस का? त्यांचीच गाडी घेऊन जायचे होते. अर्थात त्यांचा चालक संतोष होताच गाडी चालवायला. मला फक्त मागे बसून जायचे होते. त्यांचे एक नातेवाईक शिंदे वकीलही बरोबर होते. मी एका क्षणाचाही विचार न करता काकांना होकार दिला. ही सुद्धा पांडुरंगाचीच मर्जी होती असे मला वाटले. एकतर माझी तब्बेत गेले आठवडाभर ठीक नव्हती. त्यात माझा उजव्या पायाचा तळवा जळवाताने फुटलेला होता. मला चालतानाही खूप वेदना होत होत्या. पाय टेकवत नव्हता. पण काय झाले कोणास ठाऊक मी त्यांना येतो म्हणालो. घरात आलो आणि वंदनाला (बायकोला) सांगितले की मी उद्या काकांबरोबर पंढरपूरला चाललो आहे. तीलाही मी हो म्हणाल्याचे आश्चर्य वाटले. ती पण जा म्हणाली. ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ असेच काहीसे होते हे.
सकाळी ८.३०ला निघून आम्ही पंढरपूरला १.१० मिनिटांनी पोहचलो. मंदिरा जवळच्या एका दुकानात चपला ठेवल्या. उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. अनवाणी पायाने चालत निघालो. पाय भाजत होते. नेताजी काका मला म्हणाले, रवींद्र चल लवकर, काही होणार नाही तुझ्या पायाला. उलट जरा चटके बसले की तुझे दुखणे कुठच्या कुठे पळून जाईल. आणि खरंच तसेच झाले. मंदिराच्या आवारात थोडी गर्दी होती. मुख दर्शनबारी चालू होती असे कळले. आम्ही धावतच तिकडे गेलो. आत दर्शनबारीत घुसलो. आतील पोलीस काकांनी आवाज दिला. दहा मिनिटांत दर्शन बंद होणार आहे. पटपट चला. माझी तर धाकधूक वाढली. समजा आपला नंबर नाही लागला तर, कमीतकमी तासदोनतास तरी बारीत उभे राहावे लागणार होते ! विचार करत करत तसाच गर्दीतून वाट काढत पुढे पुढे चालत होतो आणि माझ्या एकदम लक्षात आले की आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. मंडळी त्या, क्षणाला एवढ्या गर्दीतून मी पांडुरंगाच्या मुखाचे दर्शन घेतले आणि काय सांगू ! माझ्या सर्वांगात नवचैतन्य संचारले. अवघे विश्व आपल्या डोळ्यासमोर विटेवर उभे असल्याचे जाणवले. विठूरायाच्या भाळीवरील चंदनाच्या टिळ्याने डोळे दीपून गेले. का, ज्ञानेश्वर माऊली, आणि करोडो वारकरी पाडुरंगाच्या भेटीसाठी एवढे आतूर आसतात ते, कळले.
त्या गर्दीतून आपोआप पुढे पुढे ढकलला जात होतो, आणि कधी पांडुरंगाच्या, विठूरायाच्या चरणी लीन झालो तेच उमगले नाही. जवळ उभ्या असलेल्या महिला पोलीस चला लवकर म्हणून हाकलत होत्या. मी मात्र माझ्या धुंदीत होतो. पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श करून त्याच्या चरणी डोके ठेवण्याचा माझ्या आयुष्यातील भाग्याचा तो क्षण आला आणि मी एक आवंढा गिळला. डोळे पाणावले. सर्वांगाला कंप जाणवला. हातात “अनोख्या रेशीमगाठी” ह्या माझ्या नुकत्यात प्रकाशित झालेल्या कादंबरीची प्रत होती. ती पांडुरंगाच्या चरणी ठेवली आणि तशीच ती जवळ उभ्या असलेल्या गुरुजींच्या हातात देऊन विठूरायाला समर्पित करून पुन्हा एकदा त्याच्या चरणी नतमस्तक झालो. आश्चर्याचा दुसरा धक्का म्हणजे, नेताजी काकांनीही माझ्या कादंबरीची एक प्रत पांडुरंगाच्या चरणी ठेवण्यासाठी आणलेली होती. अजून काय हवं माझ्यासारख्या साहित्य सेवेच्या वाटेतील एका वारकऱ्याला / लेखकाला !
भावविवश होऊन तसाच गर्दीतून मार्ग काढीत म्हणजे ढकलला जात होतो. काका माझा हात धरून मला अगदी एखाद्या लहान मुलासारखे ओढत होते. गर्दीत चुकलो तर काय ? आम्ही असेच पुढे सरकत रुक्मिणी मंदिरात कधी पोहचलो तेच कळले नाही. इथेही तोच अनुभव आला. रुक्मिणी मातेची विलोभनीय व प्रसन्न मूर्ती पाहून तिच्या चरणी कधी लीन झालो तेच कळले नाही. कादंबरी मातेच्या चरणी ठेवली आणि तिथे उपस्थित गुरुजींच्या हातात दिली. त्यांनी मुखपृष्ठ पाहून व नाव वाचून लगेचच प्रतिक्रिया दिली, छान दिसतेय कादंबरी”. त्या क्षणाला मी एकदम भावूक झालो. महिला पोलीस आम्हाला पुढे चला म्हणून ढकलत होत्या. त्या गर्दीत मी गुरुजींना विनंती केली की जमले तर रुक्मिणीमातेच्या चरणी ही कादंबरी ठेवून एखादा फोटो काढून मला पाठवता आला तर पहा. माझा नंबर आहे कादंबरीत. ते ही मोठ्याने हो, हो पाठवतो म्हणाले. अर्थात माझ्या ह्या विनंतीला काहीच अर्थ नव्हता. कारण मंदिरात मोबाईल व कॅमेरा न्यायला परवानगी नव्हती. तसेच फोटो काढायला ही परवानगी नव्हती. पण माझी एक भोळी आशा होती. कोण जाणे, विठूराया माझा हा हट्टही पुरवू शकतो. अहो, ज्याने एवढ्या मायेने,आपुलकीने, मला स्वत:कडे भेटीला बोलवून घेतले, त्याच्या चरणी नतमस्तक होऊ दिले, तो पांडुरंग काहीही करू शकतो. मी मात्र ह्या सुखद अनुभवाने खूपच भावूक झालेला होतो.
२५ ऑगस्ट २०२२ ला आणि तिथीने ऋषीपंचमीला, गुरुवार १ सप्टेंबर ला वयाच्या साठीत प्रवेश केलेला मी इतका भाग्यवान असू शकतो ह्यावर माझाच विश्वास बसत नव्हता.
चक्क २० मिनिटात विठ्ठल रुक्मिणी दर्शन होऊन आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा घालत होतो. जत्रेत हरवलेल्या लहान मुलाला जेव्हा त्याची आई सापडते आणि ती त्याला मायाने जवळ घेऊन कुरवाळते त्यावेळेस जसे वाटत असेल ना, अगदी तसेच मला वाटत होते. विठ्ठल रुक्मिणीच्या रूपाने आज मला माझे दिवंगत आई-वडील भेटल्याची भावना मनात दाटून आली होती.
काकांच्या आदेशाने आम्ही लगेचच म्हणजे दुपारच्या दोन वाजता पुण्याकडे प्रस्थान ठेवले. वाटेत अकलूज येथे स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. पुढे मोरगावच्या बाप्पाच्या मंदिराच्या कळसाचे गाडीतूनच दर्शन घेतले. समोर मळभ दाटून आले होते. तिन्हीसांजेला सुरवात झालेली होती. बघता बघता गाडी जेजुरीला पोहोचली होती. मावळतीला रवीने जेजुरीचा गड सुवर्ण किरणांची उधळण करून संपूर्ण गाडला सोन्याची मखर केली होती. आभाळ हळू हळू फाटायला लागले होते. पुण्यात ढगफुटी सदृश पाऊस चालू असे असा फोनही काकांना येऊन गेला होता. ह्या गडबडीत सोपानदेवांचे सासवड कधी मागे राहिले तेच कळले नाही. बोपदेवषघाट रस्त्याला दूरवर उत्तरेकडील पर्वतावर रंगीबिरंगी दिव्यांनी रोषणाई केलेल्या कानिफनाथ गडाकडे आपसूकच लक्ष वेधले केले.
आजच्या एका दिवसात जीवनभराची पुण्याईने ओसंडून भरुन वाहणारी झोळी घेऊन, प्रचंड वाहतुकीतून मार्गक्रमण करीत घरी पोहचलो तेच कळले नाही.
रवींद्र कामठे
शनिवार, ३ सप्टेंबर २०२२
पांडुरंग हरी. जय हरी विठ्ठल.
विठ्ठल रखुमाई






No comments:

Post a Comment