Saturday 29 August 2020

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र... हा माझ्यावरील घनश्याम पाटील सरांनी लिहिलेला लेख

सच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र... 

हा माझ्यावरील चपराक प्रकाशनचे सर्वेसर्वा श्री. घनश्याम पाटील सरांनी लिहिलेला लेख एकदा तरी जरूर वाचा. माझ्या व्यक्तिमत्वाचा इतका सुंदर आणि प्रगल्भ धांडोळा मला स्वत:लाही घेता आला नसता. म्हणूनच तर तो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग वरून सगळ्यांपर्यंत पोहचवण्यावाचून मला राहवले नाही...

https://chaprak.com/2020/08/sachchai-aani-achchai-japnare-mitr/ via @echaprak

रसिकहो, 

गेल्या चार वर्षात घनश्याम पाटील ह्या धुरंधर व्यक्तिमत्वाची माझी ओळख होते काय आणि माझा कायापालट होतो काय; हा सगळा नियतीचा खेळच म्हणायला हवा.  ह्या माणसाने माझ्यातल्या साहित्यिकाला ओळखून त्याला नुसतेच लिहायला नाही लावले तर माझे हे लिखाण प्रसिद्ध केले व मला ह्या क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख करून दिली आहे हे मात्र नक्की.  त्यामुळेच मी माझ्या शारीरिक व्याधींना विसरून २०१९ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली ती केवळ 'चपराक प्रकाशन' व अर्थात घनश्याम पाटील माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणूनच. मी आयुष्यात खूप काही गमावले आहे, पण आयुष्याच्या शेवटाच्या टप्प्यावर घनश्याम पाटील सरांसारखा मित्र लाभणे म्हणजे नियतीची माझ्यावर कृपाचा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काहीतरी पुण्य मी ह्याच जन्मी नक्कीच केले असेल म्हणून तर आज त्यांनी माझे हे असे केलेले कौतुक वाचतांना डोळे पाणावतात, मन भावनेने काठोकाठ भरून येते, भावना उचंबळून वाहतात आणि म्हणतात..

आभाळाची मैत्री जशी धरणीशी,
नाळ ही अशीच जुळते मैत्रीची ||







पुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती!

ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.

समोरून त्यांनी सांगितलं, ‘‘मी रवींद्र कामठे बोलतोय. तुमचा नियमित वाचक आहे. तुम्हाला भेटायचंय…’’

माझ्या भेटीसाठी कुणी ताटकळत रहावं इतका काही मी मोठा नाही. मात्र त्यावेळी ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची तयारी अंतिम टप्प्यात असल्यानं मी त्यांना भेटीचं प्रयोजन विचारलं. त्यांनी सांगितलं की ‘‘मला माझा कवितासंग्रह तुमच्याकडून प्रकाशित करायचाय!’’

मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, मुलगी अजून काळी की गोरी हेही मी बघितलं नाही आणि तुम्ही लग्न ठरवताय! प्रकाशक मी आहे. त्यामुळे तुम्ही कवितासंग्रह आमच्याकडून ‘प्रकाशित करायचाय’ असं माझ्या वतीनं जाहीर करू नका! आधी तुमच्या कविता घेऊन माझ्याकडं या! त्या मला आणि माझ्या सहकार्‍यांना वाचू द्या! आवडल्या तर पुढचं ठरवू!!’’

नेहमीच्या कामात व्यत्यय नको म्हणून मी त्यांना रविवारी भेटायला बोलावलं.

त्यांना जी वेळ दिली होती त्या वेळेच्या बरोब्बर पाच मिनिटं आधी ते कार्यालयात हजर झाले. ओळखपरेड झाल्यावर त्यांनी त्यांच्या कवितासंग्रहाची संहिता माझ्याकडं दिली आणि ती पाहताक्षणीच मी जाम भडकलो.

त्यांनी त्यांच्या सर्व कविता व्यवस्थित टंकलिखित करून, त्याचं एक व्यवस्थित पुस्तक करून आणलं होतं. त्यावर पहिल्याच पानावर ‘चपराक’चा लोगो होता. आत प्रकाशक म्हणून माझं नाव, पत्ता असं सारं काही सांग्रसंगीत होतं.

मी त्यांना विचारलं, ‘‘अजून मी कविता वाचल्या नाहीत, आपली ही पहिलीच भेट आहे. तुम्हाला मी कविता घेऊन बोलावलं होतं पण यावर माझं नाव, पत्ता, लोगो वापरण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली?’’

ते थोडे गांगरले. त्यांनी सांगितलं, ‘‘सर मी ज्या कंपनीत काम करतो तिथं प्रेझेन्टेशनला महत्त्व असतं. त्यामुळं सवयीचा भाग म्हणून माझ्याकडून हे झालं.’’

दरमहा एक ते दीड कोटी रूपयांची उलाढाल करणारा हा माणूस इतका नम्र आहे हे पाहून माझा राग निवळला. मी त्यांना ‘‘कविता वाचून कळवतो,’’ असं सांगितलं.

त्यांचा ‘प्रांजळ’ हा कवितासंग्रह ‘चपराक’कडून प्रकाशित करायचं ठरलं आणि आमच्या भेटीगाठी वाढल्या. मनानं अतिशय निर्मळ, नितळ असलेली अशी माणसं आजकाल कमी आहेत. आमची दोघांची गट्टी जमली आणि लक्षात आलं की उद्योगक्षेत्रात कार्यरत असल्यानं आपल्या दृष्टिनं जे काही दुर्गुण आहेत ते सगळे या माणसात ठासून भरलेत. मद्यपान, धुम्रपान यामुळं हा माणूस पोखरला गेलाय. त्यांचे आधीचे प्रकाशक होते त्यांनी यांच्या लेखनाकडं कधी लक्षच दिलं नव्हतं. फोन केला की मद्यालयात बसायचं, रात्री जागवायच्या, यांनी प्रकाशकांचे सगळे लाड पुरवायचे आणि पुस्तकं प्रकाशित करायची असा सगळा मामला… बरं हा माणूस इतका प्रांजळ की अशा सगळ्या उचापल्या ते स्वतःच सांगायचे.

‘चपराक’मध्ये एकही सदस्य व्यसनी नाही याचं त्यांना अप्रूप वाटायचं. मग त्यांनी त्यांचं व्यसन आटोक्यात आणायचं ठरवलं. डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात मी सहभागी होतो याचा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झालेला. त्यांनी आदेश सोडला, ‘‘माझ्या गाडीतून आपण डोंबिवलीला जायचं. आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं.’’

त्या संमेलनातील ग्रंथदालनात त्यांनी सगळ्या प्रकारची मदत केली. त्यांनी आणि त्यांची मुलगी पूर्वाताई, जावई मयूरेशदा या सगळ्यांनी आमच्यासह अक्षरशः पुस्तकांचे गठ्ठे उचलले. ‘चपराक’चा बॅनर लावण्या-काढण्यापासून ते ग्रंथ दालनातील विक्रीकेंद्रात बसण्यापर्यंत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली. आपण कुणीतरी वेगळे आहोत, मोठ्या पदावर काम करतोय अशी हवा त्यांच्या डोक्यात सुरूवातीपासून कधीच नाही. किंबहुना त्यांच्या घरातील सर्वच सदस्य अतिशय प्रेमळ, सहकार्यशील आणि उत्साही आहेत. अल्पावधीतच त्यांचा ‘चपराक’च्या प्रत्येक उपक्रमातला, निर्णयातला सहभाग वाढला. इतका की, एकेकाळी न विचारता लोगो वापरला म्हणून त्यांच्यावर रागवणारा मी… मीच त्यांना ‘चपराक’च्या नव्या लोगोबाबतच्या सूचना विचारल्या. त्या अंमलातही आणल्या. त्यांचे पुस्तक करायचे की नाही म्हणून कधीकाळी संहिता ठेवून घेतल्या होत्या. आता ‘चपराक’कडे येणारी पुस्तके प्रकाशित करायची की नाही? याच्या निर्णयप्रक्रियेतही ते सहभागी असतात. हे सगळं घडलं ते त्यांच्या स्वभावतील सच्चाई आणि अच्छाईमुळं.

हा माणूस इतका प्रामाणिक आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात मद्यपान आणि धुम्रपानावर तब्बल 43 लाख रूपये खर्च केलेत हे त्यांनी मला पुराव्यासह दाखवून दिलं. फक्त दाखवून थांबतील तर ते रवींद्र कामठे कसले? त्यांनी त्यावर ‘चपराक’मध्ये एक लेख लिहिला आणि या व्यसनामुळे आरोग्याची कशी हेळसांड झाली हे अनुभवही मोकळेपणाने लिहिले. मनाशी ठाम निर्धार करून इतक्या वर्षांचं व्यसन एका क्षणात सोडलं. 2017 पासून त्यांनी कधीही दारूला किंवा सिगारेटला हात लावला नाही. एकदम व्यसन सोडल्यानं त्यांना त्याचा त्रासही प्रचंड झाला पण मोठ्या निश्‍चयानं आणि धीरोदात्तपणे ते त्यांच्या निर्णयावर अढळ राहिले.

अपेक्षेप्रमाणं त्यांच्या तब्येतीवर याचा परिणाम झाला होता आणि त्यातच त्यांची अँजिओप्लास्टी झाली. मग मात्र त्यांनी त्यांच्या सगळ्या सवयी बदलल्या. योग्य व्यायाम, आहार याकडं जाणीवपूर्वक लक्ष दिलं. आवडीच्या क्षेत्रात मन रमवलं. वाचन वाढवलं. समाजमाध्यमावरचा सहभाग वाढवला. ‘चपराक’ परिवाराचे तर ते अविभाज्य घटक बनले. यातून त्यांना कसली प्राप्ती होत असेल तर ती फक्त आत्मानंदाची! तरीही त्यांनी धाडसानं आम्हाला साथ दिली. इतकंच कशाला! त्यांची गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना केवळ साहित्यसेवा करता यावी म्हणून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कुणालाही आश्‍चर्य वाटावं असंच त्यांचं हे वर्तन होतं.

‘चपराक’च्या निमित्तानं आमचे भारतभर दौरे सुरू असतात. या प्रत्येक दौर्‍यातील त्यांचा सहभाग अटळ ठरला. अनेकदा तर ते त्यांचीच गाडी घेऊन यायचे. ती सोबत घ्यायचा आग्रह धरायचे. मी चारचाकी गाडी घेतल्यावर त्यांनी मला ती कशी चालवायची याचं बारीकसारीक गोष्टीसह प्रशिक्षण दिलं. त्यात मी तरबेज झाल्यावर मात्र त्यांनी सांगितलं, ‘‘आता मी असताना तुम्हाला कोणतीही गाडी चालवायला मिळणार नाही. माझ्याकडं ड्रायव्हिंगचं कौशल्य आहे. त्यामुळं तुम्ही शेजारी बसून तुमची कामं करा. फोनवर संपर्क साधा. विचार करा किंवा आराम करा. तुम्हाला निवांतपणा मिळावा यासाठी तुमचं सारथ्य मीच करणार. तो माझा अधिकार आहे…’’ मग त्यांनी अक्षरशः हजार-हजार किलोमिटरचा प्रवास मला सोबत घेऊन केला.

त्यांनी आजवर एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा आंतरराष्ट्रीय कंपन्यात महत्त्वाच्या पदावर काम केलंय. या सगळ्या कंपन्या सावरताना त्यांचं अनुभवाचं कौशल्य पणाला लागायचं. वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक टक्केटोणपे खाल्लेत. या सगळ्या गोष्टी ते इत्यंभूतपणे आणि अतिशय मोकळेपणाने सांगतात. त्यांच्या अनुभवाची शिदोरी इतकी भक्कम आहे की ते ऐकून कुणालाही प्रेरणा मिळावी. त्यामुळं मी त्यांना सांगितलं की ‘‘दर आठवड्याला तुम्ही यावर एक लेख लिहा. अनुभवाच्या शिदोरीतून याच नावानं आपण ते आपल्या साप्ताहिकातून प्रकाशित करू.’’ त्या सदराला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि आम्ही ‘तारेवरची कसरत’ याच नावानं त्याचं पुस्तकही प्रकाशित केलं. व्यवस्थापन क्षेत्रातील आंरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची त्या पुस्तकाला प्रस्तावना घेतली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपत आली आहे.

‘चपराक’ने एक चरित्रात्मक पुस्तकांची मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. अगदी थोडक्यात पण त्या-त्या महापुरूषांविषयी आजच्या पिढीत जिज्ञासा निर्माण व्हावी, त्यांची माहिती मिळावी असं त्याचं स्वरूप आम्ही ठरवलं. महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात स्वराज्याचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे यांचा एक उल्लेख आहे. तेवढ्याच संदर्भाच्या आधारे आम्ही त्यांचं एक छोटेखानी चरित्र प्रकाशित करायचं ठरवलं. ‘‘ते तुमचे पूर्वज आहेत तर तुम्हाला ही जबाबदारी पार पाडावीच लागेल’’ म्हणून रवींद्र कामठे सरांच्या गळ्यात ही जबाबदारी मारली.

अत्यंत अभ्यासूपणे त्यांनी ही कामगिरी पार पाडली आणि हे लघुचरित्र वाचकांच्या भेटीस आले. पंधरा दिवसात आठ हजार प्रतींच्या विक्रमी विक्रीचा टप्पा या पुस्तकानं गाठला.

आता तर त्यांची भट्टी जोरात पेटलीय. कादंबरी, कथा, बालकथा, समीक्षा अशा सगळ्या साहित्यप्रांतात त्यांनी यशस्वी मुसाफिरी केलीय. त्यांची पाच-सहा पुस्तकं नजिकच्या काळात ‘चपराक’तर्फे प्रकाशित होत आहेत.

रवींद्र कामठे हे एक वेगळंच रसायन आहे. कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नाही, जे आहे ते कसलीही पर्वा न करता बोलून मोकळे व्हायचे, इतरांना कौतुकाची मनमोकळी दाद देताना हातचं काही राखून ठेवायचं नाही, कसलेही पूर्वग्रह न ठेवता प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण करायचे, अर्थात ते करताना त्याच्या भल्याच्या दृष्टिने चार गोष्टीही स्पष्टपणे सुनावताना अजिबात मागेपुढे पहायचे नाही, देश-विदेशात प्रवास करून, तिकडे काम करताना आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवूनही प्रत्येक लहान-थोरांसोबत तितक्याच आदबीने वागायचे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे.

आज त्यांचा जन्मदिन. तब्येतीच्या काही किरकोळ कुरबुरी सुरू असल्या तरी त्यांची उमेद दांडगी आहे. मनानं ते खंबीर आहेत. ‘चपराक’च्या माध्यमातून भविष्यात आणखी काही मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत. त्यातील त्यांचा वाटा सिंहाचा असेल हे वेगळे सांगायला नकोच.

मित्र, ज्येष्ठ सहकारी, मार्गदर्शक, साहित्यिक अशा सर्व अंगांनी त्यांचा सहवास मला नेहमी आनंददायी वाटतो. त्यांना उत्तम दीर्घायुरारोग्य लाभावे याच जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देतो.

– घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

https://chaprak.com/2020/08/sachchai-aani-achchai-japnare-mitr/ via @echaprak