Tuesday 6 September 2022

लेखक सुनील पांडे यांचा "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील अभिप्राय

*अनोख्या* *रेशीम* *गाठी* :

*लिव्ह* *इन* *रिलेशनशिप* *काळाची* *गरज* *असलेली* *सामाजिक* *कादंबरी* .
आवडीच्या पाहुण्यांची निघायची वेळ आली की वाटणारी हुरहुर पुस्तक संपायला आलं की वाटू लागली की लेखक जिंकला असं समजावं . अशीच काहीशी अनुभूती सुप्रसिद्ध लेखक श्री रवींद्र कामठे यांचे *अनोख्या* *रेशीम* *गाठी* ही कादंबरी वाचताना आली .
साधी , सोपी , तरी ओघवती शैली आणि जसं घडलं तसं सांगण्याची हातोटी ही लेखक रवींद्र कामठे यांच्या लेखनाची विशेष खासियत .
एसटी , लोकल ट्रेन ही माझ्या वाचनप्रवासाची साधनं . गुरूवारी रात्री आॕफिसातून घरी आल्यानंतर अनोख्या रेशीम गाठी हे साहित्य चपराक प्रकाशनाने पाठविलेले पुस्तक हातात पडले . तब्बल १९१ पानांची ही कादंबरी वाचून होणार कधी ? याचे सुरूवातीला काहीसे दडपण आले परंतु कादंबरी वाचायला हातात घेतल्यानंतर ती वाचून कधी संपली हे कळलेही नाही .
लिव्ह इन रिलेशनशिप हा कादंबरीचा विषय . आपल्या भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला अतिशय महत्त्व दिले आहे . पाहून आणि ठरवून लग्न करणे ही लग्न करण्याची पारंपरिक पद्धत . दुसरीकडे प्रेमविवाहाला अजूनही अनेक ठिकाणी कुटुंबातून , नातेवाईकातून , समाजातून विरोध होताना दिसतो . प्रेमात दोन मनाचा विचार असतो तर लग्न करताना समाजाचा विचार ( का ? ) करायलाच लागतो हे तितकेच खरे आहे . त्यातही विवाह झाल्यानंतर पुढे जाऊन तो विवाह यशस्वी होईल कि नाही असे छातीठोकपणे सांगणे अशक्य . या सगळ्या पार्श्वभूमीवर लिव्ह इन रिलेशनशिप हा लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा नवीन ट्रेंड पाश्चात्तय देशांप्रमाणे आपल्या भारतातही आला आहे .
मुंबई सारख्या महानगरात ही कथा घडते . प्रभाकर पूजा आणि सई आणि दीपक यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा . रक्ताच्या नात्यांपेक्षाही मानलेली नाती किती महत्त्वाची असतात हे कादंबरी वाचून अधोरेखित होते .
कादंबरीत लेखक रवींद्र कामठे यांनी कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण वाचताना आपणही कोकणातच असल्याचा अनुभव आपणास येतो . ही लेखकाच्या लेखनीची जादू म्हटली पाहिजे .
कड्यावरचा गणपती , निसर्गरम्य अशा वाडीचे वर्णन , अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र , तेथिल सुर्योदय , सुर्योदयाचे नयनमनोहर दर्शन , उकडीचे मोदक तसेच कोकणातील जेवणातील सुग्रास रूचकर अशा रसभरीत जेवणांचे वर्णन वाचून वाचक तृप्ततेने ढेकर देतो .
आंजर्ले सारख्या छोट्या गावात राहूनही प्रभाकरच्या आईची समज , तिचा दृष्टिकोन , तिचे प्रगत विचार , कालानुरूप नवीन गोष्टींचा स्विकार करणे आणि सुन म्हणून पूजाचा स्वीकार करणे हे पाहून आजीबद्दलचा आदर अधिकच वाढू लागतो तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरात राहूनही प्रभाकर आणि पूजाच्या नात्यांकडे कलुषित नजरेने पाहून त्यावर खोचकपणे टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांची किवही येऊ लागते .
लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने मान्यता दिली असली तरी अजूनही समाज असे सबंध स्वीकारायला तयार नाही . ही सुद्धा कटू वस्तुस्थिती आहे . प्रभाकर आणि पुजा हे जेव्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतात . त्यासाठी वकिलांचा ते योग्य तो कायदेशीर सल्ला घेऊन आणि सामंजस्य करार करून . हा करार कशासाठी ? तर लेखक म्हणतात ,
*आपल्याकडे* *समाज* *नावाच्या* *टोपीखाली* *काही* *विकृत* *विचारसरणीचे* *लोक* *वावरत* *असतात* . *त्यांना* *एक* *सणसणीत* *चपराक* *द्यायला* *म्हणून* *हे* *अस्त्र* *असावे* .
प्रस्तुत कादंबरीतून रवींद्र कामठे यांनी दोन पिढ्यांची कथा सांगितली आहे . एकूण २० प्रकरणातून ही कादंबरी फुलत जाते . कादंबरी वाचताना वाचकांची उत्कंटा शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात लेखक रवींद्र कामठे यशस्वी झाले आहेत .
मुळचे पुण्यातील असलेले लेखक रवींद्र कामठे यांनी कादंबरीत कोकणातील आंजर्ले गावाचे केलेले चित्रण अतिशय उत्तम आणि फार बारकाईने केले आहे . कादंबरी वाचून लेखक रवींद्र कामठे मुळचे कोकणातील रहिवासी असावे असे वाटते .
फार वर्षापूर्वी लेखक गो.नी.दांडेकर यांनी *शितू* या कादंबरीत कोकणातील गावाचे चित्रण केले होते . कादंबरीतील विधवा असलेल्या शितूचे विसू या नायकावर प्रेम असूनही ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही . आपल्या सारख्या विधवा स्त्रीशी विसूने लग्न करून स्वतःचे वाटोळे करू नये असे ती त्याला सांगते आणि खाडीत जीव देऊन स्वतःचे आयुष्य संपवते . विसूच्या आयुष्यातून कायमची निघून जाते . अनोख्या रेशीम गाठी कादंबरी वाचताना त्या शितू कादंबरीची मला आठवण झाली . अर्थात शितू कादंबरीच्या त्याकाळची सामाजिक परिस्थिती आत्ता कितीतरी बदलली आहे . अर्थात आज शितू यदा कदाचित असती तर विसू बरोबर लग्न न करता लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये नक्कीच राहिली असती .
दोन पिढ्यांची ही प्रेमकथा असली तरी त्या प्रेमात कुठेही उथळपणा दिसून येत नाही . हे लेखकाच्या लेखनीचे मोठे कसब आहे . कादंबरीत आपल्याला प्रभाकर पूजा आणि सई दीपक अशी सयंमशिल , आदर्श आणि सुसंस्कृत पात्रे भेटतात . उतारवयात पुरूषालाच नव्हे तर स्त्रीलासुद्धा आधाराची किती गरज असते हे पटवून देण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे .
प्रभाकर मुंबईत नोकरी करत असला तरी गावाला आणि घराला तो विसरला नाही . अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा गावाला येऊन गावातील लोकांना भेटतो . त्यांच्या सुख दुःखात तो सहभागी होतो . एक मुलगा म्हणून आई विषयी आणि घराविषयी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतो . शेवटी एका कवीने म्हटल्याप्रमाणे
*माता* *आणि* *माती* *यात* *फक्त* *वेलांटीचाच* *फरक* *आहे*
*जो* *दोन्हीला* *विसरेल*
*त्याचे* *जीवन* *नरक* *आहे*
आदर्श भाऊ कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभाकर आणि दिवाकर हे दोघे भाऊ होत . त्यांच्या बंधू प्रेमाने आपले मस्तक नतमस्तक होते .
दिवाकरची पत्नी अर्पणा ही प्रभाकरची फक्त वहिनी नाही तर लहान लाडकी अशी बहिणही आहे . प्रभाकर आणि अर्पणामध्ये जसे भाऊ बहिणीचे प्रेम पहायला मिळते तसेच प्रभाकरची भावी बायको म्हणून अर्पणा ही पूजाचा मोठ्या मनाने आणि आनंदाने स्वीकार करते . पूजा आणि अर्पणा यातील खेळीमेळीचे सबंध लेखकाने उत्तम पद्धतीने दाखवले आहे . आदर्श आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन कादंबरीत घडवले आहे .
ज्या ठिकाणी प्रभाकरच्या गाडीला अपघात होऊन त्याच्या पत्नीचा दीपाचा मृत्यू होतो त्याच जागेवर आंजर्लेहून मुंबईला गाडीने परत येताना पूजा प्रभाकरला त्या ठिकाणी गाडी थांबायला सांगून त्याजागी हळद कुंकू वाहून हात जोडून मृत दीपाला श्रद्धांजली वाहते ते पाहून कुणाही वाचकांच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही . इतका तो प्रसंग लेखकाने हदयकारी लिहिला आहे .
कादंबरीत विजयकाका , अनंता , कुसुमवहिनी , मंदामावशी , इन्स्पेक्टर शेवाळेसाहेब , रानडेसाहेब , डाँक्टरकाका काकू , वकीलकाका अशी अनेक जीवाला जीव देणारी आणि माणूसकी असलेली पात्रे आपल्याला भेटतात .
कादंबरीच्या शेवटी दीपकने केलेले भाषण मुळातूनच वाचण्यासारखे असे झालेले आहे .
एक चांगला आणि महत्त्वाचा सामाजिक विषय कादंबरीच्या माध्यमातून मांडल्याबद्दल मी लेखक रवींद्र कामठे यांचे
अभिनंदन
करतो आणि त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा व्यक्त करतो .
*अनोख्या* *रेशीम* *गाठी*
( *कादंबरी* )
*लेखक* *श्री* *रवींद्र* *कामठे*
पाने : १९१
किंमत : ३००/ -
चपराक प्रकाशन पुणे .
आस्वादक : सुनील पांडे
मो . ९८१७८२९८९८ .

No comments:

Post a Comment