Wednesday 7 September 2022

प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय

प्रतिभा खैरनार, नांदगाव यांचा माझ्या "अनोख्या रेशीमगाठी" कादंबरीवरील समर्पक अभिप्राय नक्की वाचा.

नमस्कार सर...
तुमची अनोख्या रेशीम गाठी ही कादंबरी कालच मिळाली आणि एकाच दिवसात ती वाचूनही झाली. "लिव्ह इन रिलेशनशिप हा विषय खरंतर इतका वेगळा आहे आणि यावर कादंबरी होवू शकते हा विचार सहसा कोणाच्या डोक्यात ही येणार नाही. माणसं कितीही सुशिक्षित असली तरी ह्या अश्या नात्याला प्रत्येकाचा विरोध च असतो. बुरसटलेल्या विचारातून आत्ता कुठे समाज प्रेम विवाहाला मान्यता द्यायला लागलाय तरी अजूनही खेडोपाडी आंतरजातीय विवाहाला बंदीच आहे. आणि जर कोणी केलाच तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला असह्य वेदनेतून तिरस्कारातून जावे लागते.
समाजाचा विचार करून समाजातच रहाणारे, एकाकी जीवन जगणारे किती तरी विधूर आणि विधवा आहेत. ज्या सगळ्या संकटानां सामोरे जात एकटेपणा ने आयुष्य रेटताय, अशा वेळी तुमची लिव्ह इन रिलेशन ही कादंबरी त्यांच्या साठी एक आशेचा किरण घेऊन आलीय.
कादंबरीची मांडणी मुद्देसूद अन् अगदी सोप्या साध्या भाषेत केलीय. वाचतांना कुठेही थांबावसं वाटत नाही किंवा कंटाळवाणे प्रसंग नाही. पूजा आणि प्रभाकर यांच्या एकाकीपणा मुळे मैत्रीतून प्रेमात रूपांतर हे सहजगत्या मांडलयं. प्रभाकर च्या मनात वासनेचा लवलेश दाखवला नाही हे खूप महत्त्वाचे. नितळ आणि निरागस नातं...त्याच प्रमाणे इतक्या कमी वयात ही दीपक आणि सईच्या समजूतदारपणा मुळे आज त्यांचे आईबाबा एक होवू शकले, प्रभाकर आणि पूजाला त्यांनी समजून घेतले ही खूप मोठी गोष्ट आहे.
पूर्ण कादंबरीतून तुम्ही कोकण दर्शन घडवलयं, गणपती दर्शन, खाद्यपदार्थ, लालमाती, समुद्राच्या लाटा किनारपट्टी, तिथली पायाला चिटकणारी रेती हे सगळं स्वतः अनुभवतोय असं वाटत. त्यातल्या त्यात काही गोष्टी ना घरच्यांचा तीव्र विरोध असतो पण इथे खेड्यात राहूनही आजी आणि दिवाकर अपर्णा हे तुम्ही किती उच्च विचारसरणी चे दाखवलेत. त्यांनी सहजपणे स्वीकारलेले नाते त्याबद्दल त्यांचा आदर छानच... आणि त्यापलिकडे ही समाजाचा विचार न करता एका विधवेला पुजेला बसवणे म्हणजे चांगल्या चांगल्या सुशिक्षितांच्या विचारांना तुम्ही चपराक दिलीय. दीपक आणि सईच्या साखरपुड्याच्या वेळी दीपकचे भाष्य आणि त्याने अनपेक्षित केलेला प्रभाकर आणि पूजाचा एकमेकांना माळा टाकून केलेला नात्यांचा स्वीकार हा समारोप सुंदरच...
त्यात कादंबरी ला घनश्याम सरांची प्रस्तावना मिळालीय म्हणजे "सोने पे सुहागा"....कादंबरी अतिशय वाचनीय झालीय . तुमच्या या कादंबरी साठी आणि पुढील प्रकाशित होणाऱ्या अनेक साहित्यासाठी , यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा...
प्रतिभा खैरनार....

Pratibha Pawar Khairnar प्रतिभाताई तुमचे मनःपूर्वक आभार आहेत. तुम्ही फार समर्पक शब्दांत माझ्या कादंबरीचे विलेक्षण केलेत त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहणे पसंत करेन. घनश्याम सरांनी तर माझ्या कादंबरीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रस्तावना आणि पाठराखण सदृश्य आहे, परंतू कादंबरीवरील त्यांचे संस्कार मी ह्या जन्मीतरी विसरू शकत नाही.
आपला इतका उत्स्फुर्तपणे दिलेला अभिप्राय इतरांनाही कादंबरी वाचण्यास नक्कीच प्रवृत्त करेल.
पुन्हा एकदा आपले आभार.🙏🙏

No comments:

Post a Comment