Monday 14 February 2022

तारेवरची कसरतचे रसग्रहण

 

वाकचौरेसर अगदी नेमक्या शब्दांमध्ये माझ्या मनातल्या भावना शब्दरूपांत व्यक्त करुन तुम्ही मला खरंतर पुरस्कृतच केले आहे. ह्या सहज व अर्थपूर्ण भावस्पर्शी रसग्रहणात तुमच्या प्रतिभेचे प्रतिबिंबच दिसते आहे. एवढे भरभरुन लिहून माझ्या तारेवरच्या कसरतीचे तुम्ही अक्षरशः सोने करुन मला धन्य करुन लिहिते राहण्याचे बळ दिले आहे हे नक्की.

वाकचौरेसर तुमच्या, घनश्याम पाटील दादांच्या ऋषीतुल्य कै. प्र. चिं. शेजवलकर सरांच्या आणि वाचकांच्या ऋणात राहणे पसंत करतो.🙏🙏

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10216154861264353&id=1835772995&sfnsn=wiwspwa

Thursday 10 February 2022

"आंजर्ले" माझ्या जीवाभावाचे गाव...

  "आंजर्ले" माझ्या जीवाभावाचे गाव 

(शेवटी काही फोटो दिले आहेत ते जरूर पहा)

आज खूप दिवसांनी(१० महिन्यांनी) आंजर्ल्याला आलोय. खरंतर एप्रील २०२१ मध्ये अनंता दादाचे (मेव्हण्याचे) निधन झाल्यापासून इकडे यावेसेच वाटत नव्हते. परंतू अमृता वहिनीमुळे यावेच लागले.

मी तर घरात गेल्यावर दादाच्या आठवणीने व्याकूळ होऊन दोन तास झोपाळ्यावरच बसून होतो.

२०२०च्या निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त झालेली वाडी आणि घर दादाच्या पाठीमागे ज्या जिद्दीने वहिनीने पुन्हा उभारलेली पाहून तीला नमनच करावेसे वाटले.

 *****

आज आंजर्ल्यातील दुसरा दिवस २४ जानेवारी २०२२. काल रात्री प्रचंड थंडी होती. माजघरात आम्ही सगळेजण दारंखिडक्या बंद करुन दोन दोन गोधड्या घेऊन झोपलो होतो. तरीही कौलांच्या फटीतून येणाऱ्या वाऱ्याने अंगात हुडहुडी भरली होती. मी तर जागाही बदलून बघितली तरी थंडी काही जाईना. शेवटी पहाटे कधीतरी माझा डोळा लागला. अनंता दादाची उणीव मात्र क्षणाक्षणाला भासत होती.

दुपारी वहिनीने केळफुलाची भाजी केली होती. मी ती नाक मुरडतं खाल्ली. पण नंतर मात्र मला ती आवडली हे विशेष.

थंडी असल्यामुळे घराबाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. बाहेर अंगणात उन्हात बसलो तरी गार वाऱ्यामुळे काहीच उपयोग होत नव्हता. थोडासा आराम करुन वाजता कड्यावरच्या गणपतीच्या दर्शनला गेलो होतो. आंजर्ल्यात आल्यावर एकदातरी कड्यावर जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्याचा माझा शिरस्ताच आहे. देवस्थानाने मंदीर परिसरात खूप चांगल्या सोयीसुविधा केल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाने उधव्स्त केलेल्या गणपतीच्या पाऊलाची जागा तर आता रंगबिरंगी फरश्या घालून सुशोभित करण्यात आली आहे. मंदिराच्या आवारातही खूप चांगल्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. ठरल्याप्रमाणे माझ्या आवडत्या वडाच्या पारावर फोटो काढला. चक्रीवादळात उन्मळून पडलेल्या वडाला पुन्हाएकदा पालवी फुटलेली पाहून मन भरुन आले. शेवटी तो निसर्ग आहे जो त्याच्या नियमानुसारच वागणार!

इतक्या वर्षात पहिल्यांदाच कड्यावर प्रविण भोसले यांच्या टपरीवर अतिशय चविष्ट वडापाव खाल्ला. तिकडे मावळतीला सुर्यरावांची समुद्रात डुबकी मारण्याची घाई चालू होती. रवीच तो ! दुनीया इकडची तिकडे होऊ देत, तो त्याच्या वेळापत्रकानुसारच वागणार हे नक्की. आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार रेतीवादळामुळे वातावरण धुसर धुसर होते. आसमंतही खूप शुभ्र होते. मावळतीला सुर्यास्ताला पडणाऱ्या केशरी छटाही नेहमी सारख्या नव्हत्या. थंडीमुळे धुकंही पसरलं होतं. हवेत गारवा वाढला होता. सागरदादाही थोडासा शांत शांत होता. का कोण जाणे! बहुदा वादळ येऊन गेले होते असे भासत होते.

प्रविण दादांनी तेवढ्यात गरमागरम चहाही आणला, तो घेतल्यावर जरा बरे वाटले. आज जरा निवांतच होतो कारण कड्यावर चक्क गाडी घेऊन आल्यामुळे निघायची घाई नव्हती. सुर्यास्ताचा आनंद घेत होतो. पण नेमका ह्या वादळाने भ्रमनिरास केला होता. कातकरी लोकांची अंधार पडायच्या आत आपापल्या घरी पोहाचण्याची लगबग चालू होती.

कड्यावरुन पाखाडीत घरी पोहचेपर्यंत चांगलेच अंधारलेले होते. वहिनीने शेजारच्या आशिष भोसलेंच्या अंगणात गाडी लावण्याची सोय केल्यामुळे निश्चिंत होतो. कोकणातला हा असाही शेजारधर्म फारच महत्वाचा आहे हो.

एकमात्र नक्की की, निसर्गाचं सगळं चक्रच विस्कळीत झालंय. कधीही पाऊस काय पडतोयं, दुपारी उकडतयं, रात्री प्रचंड थंडी वाजतेयंं! ह्याला जबाबदार आपण माणसचं आहोत ह्याची जाणीव प्रकर्षाने होत होती. पर्यावरणाचा ह्रास दुसरं काय!

 ****

आंजर्ल्यामधील आजचा तिसरा दिवस २५ जानेवारी २०२२, मी थोडासा आरामातच काढलाय. का कोण जाणे फारसा उत्साहच जाणवत नाहीय ह्यावेळेस. दादा-वहिनींना एकत्र बघण्याची सवय असल्यामुळे असेल कदाचित ! त्यात ही प्रचंड थंडी !

झोपाळ्यावर बसूनही झुलायचा कंटाळा आला म्हणून वहिनीच्या बरोबर वाडीत ती शिपणं कसे काढते हे बघण्यासाठी गेलो होतो. शिपणं म्हणजे वाडीला पाणी घालणे होय. जसं ऊसाला दारे धरतात अगदी तसचं काहीसं. वहिनीच्या हातात एक फावडे होते. त्याने ती वाडीतली मातीची केलेली आळी फोडून पाण्याला वाट करुन देत होती वाडीतले एक अन एका झाडाला पाणी देत होती. दादाने काही वर्षांपूर्वीच पीव्हीसीची पाईपलाईन संपूर्ण वाडीत फिरवली आहे दर दहा फुटांवर वाडीच्या दुतर्फा पाईपला बुचं लावून ठेवली आहेत. मागच्या अंगणातला पंप चालू केला की एकावेळेस दोन बुचं उघडायची. त्या बाजूची बाग भिजवायची. काही ठिकाणची आळी फावड्याने तोडायची दुसरीकडून बुजवायची. काही झाडांना पाणी पोहचत नाही तीथे पायाने किंवा हाताच्या ओंजळीने पाणी द्यायचे. पुढे जाऊन एक बुच उघडायचे. परत मागे यायचे दोन मधले एक बुच बंद करायचे म्हणजे पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण राहते. बापरे सगळं अजबच तंत्रज्ञान आहे. आपल्याला फक्त खायचं आणि टाकायाचं कळतं राव. हे सगळं ह्या कुडकुडत्या थंडीत करायचे. वहिनीचे हे कष्ट बघतांना एवढ्या थंडीतही मला घाम फुटला होता. हे सगळं काम करत असतांना ती सतत देवाचे नामस्मरण करत होती. बोलता बोलता एकीकडे ती देवावर रागही व्यक्त करत होती. का तर दादाला त्याने तीच्या आधी का नेले? मी बापडा तरी काय म्हणणार! नियतीचा हा खेळ उघड्या डोळ्यांनी पाहत होतो मनातल्या भावना काबूत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो.

ह्या सहा महिन्यात वहिनीने सुपारी, केळी, जायफळाची खूप झाडे लावली आहेत. सगळी वाडी पुन्हाएकदा नव्या उमेदीने उभी केली आहे. अजून पाच वर्षांनी फळं येतील म्हणे! तीची ही जिद्द पाहून तर मी अचंबितच झालो होतो. एका डोळ्यात आसू आणि दुज्यात हासू होते. देवाची करणी आणि नारळात पाणी.

बोलता बोलता विषय निघाला की, आजकाल माकडं, रानडुकरं आणि कोल्ही कुत्री वाडीची फार वाट लावतात. केळीचे घडचे घड खातात. जरा फणस, पपणस, रामफळ पिकायला आले की अर्धामूर्धा खाऊन टाकून देतात. असं हाता तोडांशी आलेला घास ही जनावरे काढून नेतात. स्वतःही खात नाहीत आणि ह्यांनाही खाऊन देत नाहीत. पूर्वी गावात खूप गिधाडं असायची. त्यामुळे ही जनावरे बिचकून असायची. पण वादळानंतर गिधाडांचा अधिवास नष्ट झालाय, त्यामुळे ह्यांचे चांगलेच फावले आहे.

ह्या अडचणीवर एक उपाय म्हणून मी एक शक्कल लढवली. पीण्याच्या पाण्याच्या पॕल्स्टिकच्या बाटल्यांमधून कुंकवाचे पाणी भरुन त्या सुतळीने वाडीत जागोजागी बांधून ठेवल्यात. हे प्राणी लाल रंगाला घाबरतात म्हणे. पुण्यात मी हा प्रयोग आमच्या सोसायटीत करुन पाहिलाय. कुत्रीतरी यायची बंद झालीत. बघू इकडे ह्या जनावरांवर काही उपयोग होतो आहे का ते ! होणारे नुकसान टळले तर हे ही नसे थोडके. असेही सोलरवर चालणारे लाल दिवे मिळतात हल्ली. पण ते खूप महाग आहेत म्हणे. पंधरा फुटात कोणीही आले की लाल दिवा पेटतो त्यामुळे जनावर घाबरुन पळून जातात. तो ही प्रयोग नंतर करायचे ठरले आहे. तोवर हा साधा प्रयोग !

निसर्गचक्रीवादळ आणि त्यानंतर आलेल्या तोक्ते वादळाने कोकण किनारपट्टीवर विपरीत परिणाम केला आहे. पर्यटनावरही त्याचा परिणाम झालेला दिसतोय. स्थानिकांच्या तब्बेतीवरही तो जाणवतो आहे. त्यात बरेचजणांनी ६० ओलांडली आहे. घरटी एकजण तरी उत्पन्नांसाठी पुण्या मुंबईसारख्या शहारात वास्तवाला आहे.

नाही म्हणायला दोन तीन स्थानिक डाॕक्टर मात्र सामाजिक भान ठेवून गावाला सेवा देत आहेत हे फारच कौतुकास्पद आहे. एक डाक्टर कुटुंब तर वहिनीच्या समोरच असल्यामुळे फारशी काळजी वाटत नाही. तसेच शेजारीपाजारीही तीची खूप काळजी घेतात. हे पाहून मी तरी कधी नव्हे इतका निर्धास्त झालोय. असो.

सगळीकडे शांत शांत आहे. मी ही तसा यंदा शांतच आहे. असो. आलीया भोगासी, असावे सादर.

****

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना भारतमय शुभेच्छा

आजचा आंजर्ल्यामधील चौथा दिवस २६ जानेवारी २०२२ म्हणजे अजून एक अविस्मरणीय दिवस! सकाळचा वेळ जरा निवांतच होता. थंडी थोडी कमी झाल्याने रात्री झोप झाल्यामुळे मन प्रसन्न होते. सकाळचे आवरुन थोडासा व्यायाम करुन निवांत बसलो होतो.

दुपारी पुण्याहून मयुर, अमृता, तनिष्का आणि अनय येऊन धडकले. त्यांची आजी आमच्याबरोबर आली होती त्यामुळे पोरांनाही इकडे यायची घाई होती. पोरांच्या शाळेमुळे त्यांचे येणे तळ्यातमळ्यात होते पण सकाळी वाजता निघून वाजता पोहचलेही. अश्विनी, आदिती, राजेश, पूर्वा, मयुरेश कामामुळे नाही येऊ शकले.

गाडीतून उतरल्या उतरल्या अनय, तनिष्का वंदनामामीला घेऊन लगेचच वाडीतच पळाले. फेसबुकवरचे फोटो पाहून त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. वाडीतून आल्याबरोबर सगळे हातपाय धूवून जेवायलाच बसले. जेवून थोडावेळ मागच्या अंगणात विहीरीवर गेले. पोरं एकदम खुश झाली होती. आॕनलाईन शाळा करुन वैतागलेली होती. त्यामुळे ह्य निसर्गरम्य वातावरणाने एकदम प्रफुल्लीत झाली होती. प्रवासाचा शीण कुठच्याकुठे पळून गेला होता. सगळ्यांनी दुपारी थोडी वामकुक्षी काढली. उठल्यावर चहा घेऊन पाच वाजता सगळे चालतच कड्यावर गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. अर्थात बाई आणि वहिनी घरीच थांबल्या होत्या.

मी कड्यावर कधीही गेलो तरी एक प्रत्येक वेळेस मला वेगळीच अनुभूती येते. आज मात्र सुर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेतला. सारा आसमंत केशरी रंगाने फुलून गेला होता. आज प्रजासत्ताकदिन असल्यामुळे वातावरणात देशभक्तीपर उत्साह होता. गणपतीच्या पाऊलाच्या बाजूने हर्णेच्या बंदरात छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला सुवर्णदुर्ग आज अजूनच दिमाखादार दिसत होता. पाऊल मंदिरावरील भगवा सुवर्णदुर्ग पाहून मन काही क्षण शिवरायांच्या इतिहासात रमले होते. मी तिथूनच शिवरायांना मानाचा त्रीवार मुजरा केला. मावळतीला सुर्यनारायणाने भगव्या रंगाची उधळन करुन महाराजांना दंडवत घातला होता तो क्षण काळजात साठवून घेतला आणि घराकडे बिगीबिगी निघालेल्या कातकरी मंडळींना लांबूनच नमस्कार करुन हे सगळे क्षण कॕमेऱ्यात टिपून काढले.

मी कड्यावर कधीही आलो की एका सड्यावर बसून भरपूर फोटो काढतो. आजवर माझ्याबरोबर खूप आपतेष्टांना इथे आणले आहे. भरपूर फोटोही काढलेत जे इतके अविस्मरणीय आहेत की काही विचारु नका.

वाटेत येता येता बापट काका काकूंना, विध्वंस काकांना भेटलो. नंदूला, सुभाषला, स्वप्निलला रामराम केला. खाम्बेट्यांच्या दुकानातून सब्जाचे बी घेऊन आलो. ते रात्री भिजवून ठेवायचे सकाळी प्यायचे. हा माझ्या जळवाताच्या त्रासावर जालीम उपाय आहे. कारण दोन्ही पाय फुटल्यामुळे चालायला खूप त्रास होत होता. तरीही तसाच गेलो होतो ह्या पोरांबरोबर.

पण एक सांगतो कड्यावरच्या गणपतीचे दर्शन झाले की सगळा थकवा दूर होतो माझा!

आजतर मंदिराचे व्यवस्थापक गोखले काकांचीही भेट झाली होती. त्यामुळे छान वाटले. अहो ह्या सर्व मंडळींना मी जेव्हा जेव्हा आंजर्ल्याला जातो ना तेव्हा तेव्हा एक नमस्कार तरी करतोच करतो. त्यांनाही छान वाटते आणि मलाही आनंद मिळतो.

****

आंजर्ल्यातील पाचवा दिवस २७ जानेवारी २०२२ हा भाचरं अनय आणि तनिष्काच्या आॕनलाईन शाळेनेच उजाडला. मोबाईलला नेटवर्क असल्यामुळे त्यांच्या आई बाबांच्या मोबाईलचा हाटस्पा घेऊन आणि पटापवर त्यांची शाळा भरली होती. कायपण ती शाळा! मुलांचे आणि शिक्षकांचे जे काह चालले होते त्याला थोडक्यात शाळा म्हणायचे एवढेच काय ते कौतुक! मला तर अक्षरक्षः 'शिक्षणाचा आयचा घो' म्हणावेसे वाटले.

एकीकडे मयुर पुढच्या अंगणात त्याच्या मोबाईलवरून मिटींग मिटींग खेळत होता.

मागच्या अंगणात चुल ढणढणत होती. त्यावर एक हंडा पाणी भरुन कायमच ठेवलेले असतो. सुपारीच्या वाळलेल्या दोन फाट्या त्यात धगधगत होत्या. जसजसे पाणी तापत होते तसतसे ज्याला ज्याला वेळ होईल तो मध्येच वेळात वेळ काढून अंघोळी उरकत होता. अनयला तर वहिनीने विहीरीवर नेऊन आंघोळ घातली होती. अर्थात थंडी असल्यामुळे गरम पाणी घेतले होते. पठ्ठ्याची जाम धमाल चालली होती. घरभर हुंदडत बसला होता.

वेळातवेळ काढून सगळ्यांनी नाष्ट्याला साबुदाणा खिचडीवर आडवा हातही मारला होता.

तेवढ्यात वहिनीकडे एक कारागीर आला होता. माजघर, ओटी आणि पडवीत फरशी घालण्याचे तीचे प्रयोजन होते. कारण गुरं कमी झाल्यामुळे जमीन सारवायला शेण मिळत नाही बाईही मिळत नाही म्हणून फरशी घालण्याचा घाट घातला होता. तीचेही बरोबर होते. असेही आता शेणांने एवढे मोठे घर सारवायचे तर कमरेचे आटेच ढीले व्हायचे.

कारागीराने घराची मापं घेतली थोडी चर्चा केली. बाहेर अंगणातही पत्र्याची शेड करायचे ठरलेले. दादाचे हे नियोजन होते ते त्याच्या पाठीमागे पूर्ण करण्याची वहिनीची ही धडपड वाखाणण्याजोगीच आहे.

पुढच्या ओटीत दिडतासापूर्वीच खाल्लेली खिचडी पचून भुकेने पोटात कावळे कोकलायलाही लागले होते. इकडच्या प्रदुषण विरहीत मोकळ्या हवेमुळे भूकही खूप लागते. अगदी कुठलेही शारीरिक कष्ट घेता हे विशेष.

दुपारी मयुरने आणलेले मोदक आणि भरीला गवारीची भाजी पोळी, वरणभात असे रेमटून जेवल्यावर हातावर पाणी पडताच पडवीतल्या खाटेवर आडवा झाल्या झाल्या गुडूप झालो.

वामकुक्षी झाल्यावर वाडीत शिपणं काढायचे ठरले. ह्या पोरांना हा काय प्रकार असतो ते दाखवल्यावर मंडळी पाण्यात खेळायला मिळतयं म्हटल्यावर एकदम खूश झाली. पोरांनी आणि थोरांनीही शिपण्याचा आनंद लुटला. वाडीत केळीचा एक घड बुंध्यासहीत आडवा झाला होता. तो मयुरने कोयतीने छाटून घरात आणला बुंधा खाजणात नेऊन टाकला. जाम धमाल आली सगळ्यांना.

ते झाल्यावर चहा घेऊन ५ला बंदराला भेट दिली. आजचा सुर्यास्त बंदरावरूनही बघायला जाम मजा आली.

बंदरावर काही कोळ्यांच्या होड्यांची समुद्रात मासेमारीसाठी निघण्याची लगबग चालू होती. दुसरीकडे बंदराच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे हर्णेच्या दिशेने खाडीतल्या तरीचीही (तर म्हणजे होडी) घाई गडबड चालू होती. आज एकच तर होती. हर्णेच्या बाजूने चारपाच जणांना घेऊन ती आंजर्ल्याच्या बाजूला वल्हवत निघाली होती. दापोलीहून एसटीने यायचे तरीतून पलीकडे आंजर्ल्यात येण्यासाठीचा हा खूप जुना मार्ग आहे. ज्याचा वापर अजूनही गावकरी करताहेत. होडीवाल्यांना त्यामुळे रोजंदारी मिळते हे ही खरे आहे.आता खाडीवर पूल झाल्यामुळे मुरडी गावातून आंजर्ल्यात अगदी दारात गाडीने येता येते हा फरक पडलाय. त्यामुळे पर्यटनाला चांगला वाव मिळालाय.

सुर्यास्त बंदराहून पाहणे म्हणजे रेतीत एक एक पाऊल रुतवत चालत चालत निसर्गाची कमाल मनात साठवत फिरायचे. आज तर सागराला भरती चालू होती. जणूकाही मी त्याला भेटायला आल्यामुळे त्याला अत्यानंदाने उधाणच आहे होते. क्षितीजावर रवीची रंगाची जोरदार उधळण चालू होती. एक रवी दुसऱ्या रवीचे असे मनस्वी स्वागत करत होता की ज्याचे नाव ते. ह्या नादात मी जमेल तेवढे क्षण कॕमेऱ्यात िपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. पिटुकले खेकडे उगाच ह्या बिळातून त्या बिळात शिवणापाणीचा खेळ खेळून आमची करमणूक करत होते. फेसाळलेल्या लाटांवर लाटा आमच्या पाठलागच करताहेत असे भासत होते. ह्या लाटांवर तांबूस पिवळसर किरणांच्या छटांमुळे मावळतीच्या रवीचे लोभसवाणे प्रतिबिंब पडत होते जे थोडे भावूक करत होते. तनिष्काने सूर्याला चिमटीत धरायचा थोडा प्रयत्नही करुन पाहिला. मी दोन ती वेळा रेतीत माझे नाव लिहीण्याचा प्रयत्न केला, पण भरातीच्या लाटांनी तो निष्फळ ठरवला. सूर्यास्ताचा हा विलोभनीय सोहळा सकारात्मक उर्जा देऊन गेला.

तेवढ्यात वंदनाचा फोन वाजला. तीची मुरडीची भावजय भेटायला आली होते कळले. आम्ही लगोलग घरी आलो. तीला भेटलो. ख्याली खुषाली कळली. छान वाटले. ती एकटीच आली होती. त्यात रात्र झाली होती. बाहेर मीट्ट काळोख होता. ती एकटीच घरी निघाली होती. नाही होय करत मी आणि वंदनाला तीला किलोमीटरवरील मुरडीला गाडीतून सोडायला गेलो. कोकणातले निमुळते रस्ते. कीर्र अंधार. गाडी वळवायला जागा मिळेल की नाही ह्या सगळ्याचा विचार करत तीला सोडून तीच्या दादा वहिनीला भेटलो. चहा पिऊन परत आंजर्ल्याला आलो. थंडी वाढली होती. त्यामुळे वेळेत जेवून रजईत घुसलो.

 ****

२८ जानेवारी २०२२. आज सहा दिवस झालेत आंजर्ल्यात येऊन. आज सकाळी आवरून आम्ही दापोलीला जाऊन वहिनीचे एक महत्वाचे काम करुन परत आलो. दापोलीत अमेयचीही भेट झाली. जातांना घाटमाथ्याच्या बाह्यवळण रस्त्याने गेलो होतो. येतांना दुपारची गर्दी कमी असेल म्हणून हर्णे गावातल्या रस्त्याने सहजच आलो.

हर्णे गावाशी जडलेल्या खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. २५ वर्षांपूर्वी आम्ही ह्या रस्ताने जेव्हा एसटीने यायचो तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येक घराच्या कौलांवर अथवा पत्र्यांवर मासोळी वाळत घातलेली असायची. संपूर्ण परिसरात मासोळीचा नुसता घमघमाट सुटायचा. शाकाहारी लोकांना तर ह्या वाटेने जायचे म्हणजे एका दिव्यातूनच जावे लागायचे. नाकाला रुमालच लावायला लागायचा. एसटीच्या खिडकीतून हात बाहेर काढला तरी मासोळी हाताला लागायची इतकी घरे रस्त्याला लागून होती आणि आजही तशीच आहेत. हर्णेचा मासोळी बाजार खूप प्रसिध्द आहे. पुण्या मुंबईतले व्यापारी तसेच पर्यटकही इथे भरपूर मासे खरेदी करतात.

हर्णे बंदराच्या बाजूने तरीकडे जायच्या रस्त्याला लागलो थोडी उजवी टाकून पुन्हा घाट रस्त्याला लागलो खाडीपुलावरून मुरडीमार्गे घरी आलो. दुपारचा दिड वाजला होता. थंडी धूम ठोकून कुठच्याकुठे पळालेली होती त्यात मी गाडी चालवत असल्यामुळे फोटो काढता नाही आले राव. दुपारचा दिड वाजला होता त्यामुळे हवेत थोडा उकाडा जाणवत होता. अर्थात वातानुकुलीत गाडीत असल्यामुळे बरे, नाहीतर उकडून जीव कासावीस झाला असता.

ठरल्याप्रमाणे २च्या आत घरी येऊन तोंडल्याची भाजी, पोळी, वरण भात असे स्वादिष्ट जेवून थोडावेळ आराम केला.

जातांना हर्णेच्या सड्यावरुन संपूर्ण आंजर्ल्याचे अतिशय विहंगम दृष्य बघितल्यावर तर आंजर्ल्याच्या प्रेमातच पडायला होते. त्यामुळे संध्याकाळी सगळ्यांना घेऊन यायचे मनोमन ठरवले.

आजचा सूर्यास्त हर्णेच्या सड्यावरुन पाहिला आणि डोळ्यांचे पारणेच फिटले. "जिवनसे भरी तेरी आॕखे मजबूर करें जीने के जीने के लीये" असेच काहीसे वाटल्या शिवाय राहवत नाही. कितीही वेळा हा सोहळा पाहिला तरी मन काही भरत नाही. "तेरे बीना जिंदगीसे कोई शिकवा नही, शिकवा नही, तेरे बीना जिंदगीभी लेकीन जिंदगी तो नही"....काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या.  डोळ्यांच्या कडा पाणावल्या. 

सड्यावरुन खाली पाहिले की समोर पश्चिमेला अथांग सागर बाहू पसरून "सखी मंद झाल्या तारका, आता तरी तू येशील का" असे म्हणत आपल्या कडे आपुलाकीने पहात असल्यासारखं भासते. डावीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सुवर्णदुर्ग कातळावर सोनेरी किरणे झेलत डौलाने उभा दिसतो आणि आपसुकच महाराजांना मुजरा घालण्यासाठी मी कमरेत वाकतो. त्याच्याच थोडे खाली पाचपंढरीचे रामाचे मंदिर वातावरण मंगलमय करतेय असे भासते. बाजूला एक मशीदही उठून दिसते. सागरात मासेमारीसाठी गेलेल्या कोळ्यांच्या काही होड्या परतीच्या वाटेवर किनाऱ्यावर येण्यासाठी धावपळ करताना दिसतात. " माझी रे, अपना किनारा, नदीयां की धारा है" असे म्हणत त्या शीडात हवा भरत किनार्यावर येतांना दिसतात. आपल्या नजरेतही मावणारे निसर्गसौंदर्य पाहून मन प्रफुल्लीत होते. बरोबर .१५ला सूर्य महाराज संथगतीने पृथ्वीच्या पूर्वेकडील प्रवास संपवून मावळतीला समुद्र स्नानास प्रस्थान ठेवतो. पृथ्वीच्या पश्चिमेकडील सृष्टी त्याची आतुरतेने वाट पाहत असल्याची जाणीव त्याच्या लगबगीत असते.

"ये दिल तुम बीन कहीं लगता नही, हम क्या करें" असे म्हणत बघता बघता सप्तरंगांची उधळण आसमंतात करुन रवी राजे आंम्हाला सोडून पुढील प्रवासास निघूनही जातात. "अच्छा तो हम चलते है, कल फिर मिलेंगे" गुणगुणत असल्याचा भास होतो ते एकदम अंधारुन आल्यावरच उमजते. लागोपाठ तिसऱ्या दिवशी सूर्यास्ताचा अविस्मरणीय अनुभव घेऊन आमची स्वारी घराकडे जायला निघते. हर्णेच्या सड्यावरुन घाटातून आंजर्ले गावाचा दिसणारा नजारा तर नजरेत भरुन घेता घेता मन अजूनच उल्हासीत होते. एखाद्या सुहासीनीच्या गळ्यातील मोहनमाळेसारखे डोंगराच्या कुशीत विसावलेले नारळ पोफाळीच्या सौंदर्याने नटलेले आंजर्ले गाव खूपच विलोभनीय दिसते. "तुम बीन जाऊ कहां, के दुनिया मै आके कुछ ना फीर चाहां कभी" असे गुणगुणत दोन बाजूला फेसाळणारा अथांग सागर एका बाजूला पसलेली खाडी पाहून मन गलबलून येते. गावचा शिरोमणी कड्यावरील गणपती अगदी ऐटीत तुमचे स्वागत करतोय असे वाटते. तरीवरील बोटींची लगबग, हे सगळे न्याहळत घाट उतरतांना गाडी थांबवण्याशिवाय पर्यायच रहात नाही. ही दृश्ये कॕमेऱ्यात कैद करता करता स्मृतीपटलावरही कधी विसावतात तेच समजत नाही. सूर्यास्त झाल्यामुळे दूर उत्तरेला सावण्यातील दिपस्तंभ लुकलुकतांना दिसतो तर कड्यावरील मंदिर परिसरातील दिव्यांमुळे आसमंत उजळून निघतो.

माझे मन एखाद्या माहेरवाशीणीसारखे भावविवश होऊन डोळ्यांच्या कडा ओलावून जाते. "आजसे पहले आजसे ज्यादा इतनी खूशी कभी हुई नही" हे गाणं म्हणता म्हणता

छे इतके काही लिहावेसे वाटते पण हा सगळा अवर्णनीय सोहळा ह्याची देही ह्याची डोळ्यांनीच पाहणे जास्त उचीत आहे असे वाटते "येवा आंजर्ले आपलेच असा", असे आपुलकीने म्हणावेसे वाटते.

सातवा आणि आठवा दिवस तसा आळसावलेलाच गेला.  थंडीमुळे जाम झालो होतो. 

****

आज आंजर्ल्यातला वा दिवस. वहिनीच्या काही कामांसाठी दापोलीला आलो होतो. अपेक्षेपेक्षा लवकरच काम झाले. ठरल्याप्रमाणे वहिनीला तीच्या डोळ्यांचे डाॕक्टर रानडेंच्याकडे घेऊन गेलो. दवाखान्यात खूप गर्दी होती. तासदिडतासतरी आमचा नंबर यायला लागणार होता. वंदना वहिनीबरोबर आत बसली होती. मी बाहेर व्हरांड्यात बसलो होतो. तिथेच करंजाणीच्या श्री जयराम कालेकर काकांनी गाडीवरील प्रेसचा स्टीकर पाहून माझ्याशी गप्पा मारायला सुरवात केली.

कालेकर काका छत्रपती शिवाजी महाराज ग्राम वाचनालय, करंजाणी. ता. दापोली. जि. रत्नागिरी. ४१५७१२ ह्या वाचनालयाचे संचालक आहेत. ज्या वाचनालयात २३००० हजार पुस्तके आहेत हे ऐकून मी अचंबितच झालो. १९७६ साली स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील इतर वर्ग मध्ये सर्वात पहिले वाचनालयाचा मान असलेले करंजाणीचे हे वाचनालय म्हणून प्रसिध्द आहे हे ऐकल्यावर तर मला खूपच आनंद झाला त्यांच्या ग्रथालयासाठी मी आणलेली पुस्तके भेट द्यायचे मनोमन ठरवूनच टाकले.

मी पुण्याहून येतांना माझ्या ग्रथालयातील काही पुस्तके आंजर्ल्याच्या शाळेला भेट देण्यासाठी आणली होती. परंतू शाळाच बंद असल्यामुळे ही पुस्तके गाडीत तशीच योग्य वाचकांच्या प्रतिक्षेत पडून होती. काय योगायोग आहे पहा ना! गेले दिवस ही पुस्तके माझ्या संगतीने प्रवास करताहेत. माझी तगमग एकच होती की माझ्या साहित्यिक मित्रांची आपल्या चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या वाखाणण्याजोग्या ह्या साहित्य कलाकृती रसिक वाचकांच्या हातात पडायलाच हव्यात हा माझा प्रयास होता.

कालेकर काकांना चपराकने प्रकाशित केलेली खालील पुस्तके भेट दिली माझा जीव शांत झाला;

थांब ना रे ढगोबा, गीत नवे गाऊ, मित्राची गोष्ट, समूदादा, महाराष्टाचे विचारदुर्ग, श्रीराम, शाब्बास गुरुजी, जोकर बनला किंगमेकर, दिवाळी अंक २०२१, शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे.

कालेकर काका तर ह्या अनपेक्षित भेटीमुळे एकदम हर्षोल्हासित झाले. ह्या पुस्तकांची पोच तर ते पाठवणार आहेतच तसेच चपराकच्या संकेतस्थळावरुन काही पुस्तकेही मागवणार आहेत.

 ***

आज फेब्रुवारी २०२२. आजचा आंजर्ल्यातील दहावा दिवस. पण आज सकाळी आवरुन पुण्याला यायला निघालोय. वहिनीला दापोलीला उषाताईकडे सोडून महाबळेश्वर मार्गे निघालो आहे. थोडे लांब पडेल पण रस्ता चांगला आहे.

चार पाच दिवस घर बंद ठेवायला लागणार असल्यामुळे सगळा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तरी वाडीत,आणि पुढच्या आणि मागच्या अंगणातले सामान उघड्यावरच,ठेवावे लागते. चूल मात्र आज बंद करुन ठेवली आहे.

येता येता खाडी पुलावरून आलो तर कोळी लोकांची होड्यांची तयारी चालू होती.

एकदंरीत हा दहा दिवसांचा दौरा उत्तम झाला. पण कोकणातल्या थंडीने मात्र परिक्षा बघितली.

येता येता पु.के.परांजपे मुर्डी येथील रॕंगलर परांजपे यांच्या वाचनालयात चपराकचा दिवाळी अंक कथाविशेषांक देऊन आलो.आपले साहित्य गावोगाव पोहचावे हा त्यामागचा उद्देश. सो. भेटूच पुण्यात.

****

मंडळी आज दहा दिवसांनी आंजर्ल्याहून निघून घरी सुखरूप पोहचलो. पर्यटनाला नव्हतो पण काही कामासाठी गेलो आणि सहज फिरता फिरता तुमच्याशी संवाद साधला नी काय सांगू आपसुकचं पर्यटनही झाले.

खूप वर्षांनी आंबेनळीत घाट ने चढायला मिळाला. घाटात माकडांचे जथ्थेच्या जथ्थे बागडतं होते. दुपारचं ऊन असल्यामुळे बाकी मात्र शांतता होती. काही पक्षी आकाशात विहरतांना दिसले.काही वेळा मी आंजर्ल्याला आंबेनळी घाटातून ने उतरुन गेलो आहे. एकदा तर रात्री १वाजता हा चित्तथरारक घाट राम राम म्हणतच उतरला आहे. त्यावेळेस माझ्याकडे स्विफ्ट डिझायर होती. महाबळेश्वर सोडल्यावर रस्त्यात एखाद दुसरीच गाडी पास झाली होती तेंव्हा. ती ही तरकारी वाल्यांची पिकअप. बाकी तर चिटपाखरुही नव्हते रस्त्यावर. नाही म्हणायला दोन तीन उदमांजरे दिसली होती. सह्याद्रीच्या ह्या रांगा दिवसासुध्दा अंगावर येतात! रात्री तर काय सांगायलाच नको. तसे आम्ही तिघे होतो गाडीत. अर्थात गाडी मी चालवत होतो. मयुरेश बाजुला बसून कीर्र काळोखात जावळीचं खोरं कसं दिसत ते अनुभवत होता. आणि माधव मागे डुलक्या घेत बसला होता.

वाटेत जेंव्हा प्रतापगड लागतो ना तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मनोमन मुजरा करायला मान झुकतेच हो जय भवानी जय शिवाजी

सह्याद्रीच्या ह्या अक्राळ विक्राळ डोंगर रांगांमधून महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कसे हो हे स्वराज्य उभारले असेल नाही .

आज मात्र घाटात चढतांना गाडी चालवायला जाम मजा आली.त्यात टोमेटीक एर्टीगाने धमाल आणली. अपेक्षापेक्षा खूपच सुख वाटले चालवतांना. वरंध घाटानंतर मला हा घाट प्रचंड आवडतो. तसे पाहायला गेले तर ताम्हीणी घाट खूप पसरट आहे. आजकाल तिकडूनच जाणे होते. परंतू घाटातला रस्ता सोडला तर बाकी माणगांव ते मंडणगड रस्ता खूप खराब आहे. मध्यंतरी दोन वेळेस आंबेतचा पूल कामासाठी बंद असल्यामुळे वांदे झालेत.

आज महाबळेश्वरही तसे बर्यापैकी शांत शांत होते. तुरळक गर्दी होती. काही हनिमुनला आलेल्या जोड्या दिसत होत्या. हाॕटेल बगीचात आम्ही मस्तपैकी जेवलो आणि फारवेळ दवडता निघालो. वाटेत स्ट्राबेरी घेण्याचा कार्यक्रमही उरकला.

महाबळेश्वर मार्गे आंजर्ले ४० कि मी लांब पडते, पण रस्ता एक नंबर आहे. पण माझ्यासारख्या डायव्हिंग हा छंद असलेल्याला त्याचा काही फरक पडत नाही.

माझ्या ह्या दहा दिवसांच्या आंजर्ल्याच्या वृतांकनास आपण भरघोस अभिप्राय दिले त्यासाठी मी आपला ऋणी आहे. काही मित्रांनी फोनही केले. खूप छान वाटले.

रवींद्र कामठे 

९४२१२ १८५२८