Friday 23 June 2017

“व्यसनमुक्ती”


व्यसनमुक्ती

व्यसन कसले असावे, कशाचे असावे, ते का होते ?  केंव्हा जडते ? कसे जडते ? कोणामुळे होते ? कधी होते ? कशासाठी होते ? असे आणि अजून काही प्रश्न आपल्याला पडतात तेंव्हा समजावे की लवकरच आपण ह्या व्यसनातून मुक्त होणार आहोत.

अर्थात व्यसन हे काही फक्त दारू, सिगरेटचेच असते असेही नाही.  ते एखाद्या छंदाचे, खेळाचे, पुस्तकाचे, नाटकाचे, चित्रपटाचे, अभिनेत्याचे, अभिनेत्रीचे, आपल्या आवडत्या व्यक्तीचे, एखाद्या ठिकाणाचे, आवडत्या गायकाचे, त्याच्या गाण्यांचे असू शकते ! 

अर्थात दारू आणि सिगरेट हे व्यसन आपल्या तब्बेतीला घातक आहेत हे सांगूनही समजत नाही.  बाकीची व्यसने शरीराला तशी फारशी अपायकारक नाहीत. उलट ती आपल्यामध्ये जगण्याची एक नवी उमेद आणि उर्जाच देत असतात हे समजते पण उमजत नाही हे निर्विवाद सत्य आहे.

हेच व्यसन जर का आपल्या आवडत्या व्यक्तीचे असेल ना तर काय विचारू नका.  त्या व्यक्तीला न्याहाळत बसण्याचे, तिच्याशी गप्पा मारण्याचे, तिचे रूप पाहून मनात साठवण्याचे, तिचे गुण गाण्याचे आपल्याला व्यसनच लागते.   ह्या व्यसनात धुंद होऊन मग आपण त्या व्यक्तीवर स्तुती सुमने उधळायला लागतो.  ती व्यक्ती आपल्यापासून थोडीशीही लांब गेलेली चालत नाही.  ह्या व्यसनाने मनात आलेला उल्हास त्या व्यक्तीवर स्तुती सुमनांची अशी उधळण करतो.. व्यसन मला तुझ्या......धुंद स्वासांचे | आंतरिक गंधाचे | व्यसन मला तुझ्या......कोमल हृदयाचे | निर्मल मनाचे | व्यसन मला तुझ्या......लाघवी बोलण्याचे | खळखळून हसण्याचे | व्यसन मला तुझ्या......मादक डोळ्यांचे | रसरशीत ओठांचे | व्यसन मला तुझ्या......लांबसडक केसांचे | गुबगुबीत गालांचे | व्यसन मला तुझ्या......नकट्या नाकाचे | सुबक कानांचे | व्यसन मला तुझ्या......डौलदार चालण्याचे | सुडौल बांध्याचे | व्यसन मला तुझ्या......मिश्किल स्वभावाचे | प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे | व्यसन मला तुझ्या......टापटीप राहण्याचे | वक्तशीर पणाचे | व्यसन मला तुझ्या......तुझ्यातील माणुसकीचे | सामजिक बांधिलकीचे | व्यसन मला तुझ्या......अधिकार वाणीचे | समय सूचकतेचे | व्यसन मला तुझ्या......मैत्रीच्या धाग्याचे | प्रगतशील कर्तृत्वाचे | व्यसन मला तुझ्या......माझ्यावरील निस्सीम प्रेमाचे | तुझ्यातील माझ्या अस्तित्वाचे |

आज हे सगळे आठवण्याचे कारण की १९७८ साली ( मी दहावीत असतांना ) मला सिगरेटचे व्यसन लागले होते त्यानंतर ओघाओघाने दारूचेही व्यसन लागले.  ही दोनही व्यसने माझ्या आयुष्याला जवळ जवळ ४० वर्षे चिकटून राहिली.  माझ्या शरीराची कधीही न भरून येणारी हानी करून गेली, हे मला फार उशिरा उमजले.  २२ मे २०१७ ला मी स्वत:ला ह्या व्यसानांतून मुक्त केले त्याला आज बरोबर एक महिना झाला.  आता मी माझ्या आवडत्या छंदात, आवडत्या व्यक्तींमध्ये रमू शकतो.  आयुष्याच्या ह्या संधेवर त्यांच्या सोबतीचा आनंद घेऊन उरलेले हे आयुष्य सत्कारणी लावू शकतो असे वाटते.  ४० वर्षे ह्या व्यसनांनी माझी दुरावस्था केली.  आयुष्यातले खूप चांगले क्षण ह्या व्यसनांमुळे वाया गेले असे वाटते.  गेलेले क्षण तर मी परत आणू शकत नाही.  त्यामुळे झाले गेले विसरून जातो.  आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. 

माझ्या ह्या व्यसनमुक्तीचे श्रेय कोणा कोणाला देवू असे झाले आहे. एकाला दिले तर दुसऱ्याला राग येईल.  त्यापेक्षा हे श्रेय कोणालाच द्यायला नको.  हे श्रेय मी नियतीला देतो.  नियती म्हणजे जी की जिने मला हे व्यसन सोडायला भाग पाडले.  तीने माझ्याशी अक्षरशः एक प्रकारचे मानसिक द्वंदच  केले असे म्हणायला हरकत नाही.  माझ्या समोर दारू आणि सिगारेट सोडण्याशिवाय पर्यायच ठेवला नाही.  त्या नियतीला मी मनापासून दंडवत घालतो आणि तिच्या उपकाराच्या ओझ्यातच राहणे पसंत करतो.  

वाल्याचा वाल्मिकी झाल्यासारखे वाटते आहे रावं” ! 

Wednesday 21 June 2017

आयुष्यावर बोलतो काही

आयुष्यावर बोलतो काही! http://www.chaprak.com/2017/06/raivndra-kamthe-abt-life/ via @echaprak

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे
कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे
नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल
तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस
दु:ख हे सर्वांनाच असते, नाही त्यातून तुझी सुटका
दु:खातही सुख शोधावे, हेच जीवनाचे सार्थक आहे


आपले आयुष्य हे आपणच घडवायचे असते, हे सांगावयास का लागते हे मात्र मलाच काय पण बर्‍याचजणांना कळत नाही. म्हणूनच मला माझ्या ‘जगावे परी कीर्तिरूपे उरावे’ ह्या कवितेच्या ओळी आठवल्या. आयुष्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान ह्यात आहे असेच मला भासायला लागले. जन्मापासून मरणापर्यंत आपली जी काही धडपड, वणवण, तडमड चाललेली असते ती पाहिली की हे सारे आपण कशासाठी करतो आहोत असा एक प्रश्‍न मला तरी नेहमीच पडतो! त्याचे उत्तर त्या प्रश्‍नातच असते आणि ते आपल्याला सापडत नसते. म्हणूनच संपूर्ण आयुष्य आपण ह्या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यात खर्ची घालतो. शेवटी त्याचे उत्तर मिळते का? तर हो पण आणि नाही पण, असे उत्तर आहे. कारण जिवंतपणी उत्तर सापडले तर आपले हे आयुष्य सार्थकी लागले असे वाटते आणि नाही असे उत्तर असेल तर, हे आयुष्य अपूर्ण राहिले असे म्हणावे लागते.  परंतु हे जो जातो ना त्याला कधीच कळत नाही. त्याच्या मागे राहिलेल्यांना ह्या प्रश्‍नांची उत्तरे शोधावी लागतात आणि तसे करताना तेही त्यांचे आयुष्य त्यात खर्ची घालतात. काही सफल होतात आणि काही असफल!  हा सगळाच खेळ असतो नियतीचा, आपल्या संचिताचा आणि प्रारब्धाचा! आपल्याला आयुष्यात बर्‍याच गोष्टी कळतातच असे नाही.
विणले तर कळतात – कष्ट घरट्याचे ।
पाहिले तर कळते – कारण घडल्याचे ।
लिहिले तर कळतात – अर्थ शब्दांचे ।
वाचलेच तर कळते – मन लिहिणार्‍याचे ।
स्पर्शानेच तर कळते – विश्‍व भावनांचे ।
डोळ्यांनाच तर कळतात – भाव मनाचे ।
कळते परंतु वळत नाही, हेच तर गमक आहे हृदयाचे ।

आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आपल्याला सगळ्या प्रश्‍नांची सोपी अशी उत्तरे देवू शकतो, असा माझा तरी अनुभव आहे. म्हणूनच, मला आयुष्यावर काहीतरी लिहावे असे वाटले आणि आजवरील माझ्या आयुष्याचा हा प्रवास मला कसा वाटला हे शब्दांकीत करावेसे वाटले. प्रत्येकाचे आयुष्य हे निराळेच असते, ज्याची त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते आणि ते जगण्याची पद्धतही निराळीच असते. तरीही बर्‍याचशा गोष्टींमध्ये काही साम्य तर नक्कीच असते. नेमके तेच टिपून त्यावरून काही उद्बोधक असे विचार जर मांडता आले तर हे एकप्रकारचे समाजप्रबोधन होऊ शकते अशी मला पुसटशी आशा वाटली व मी माझ्या लेखणीला साद घातली की चल मी आज आयुष्यावर बोलतो काही आणि तू ती त्याच उत्कटतेने व्यक्त कर!
माझे बालपण बेताच्या परिस्थितीत परंतु अतिशय सुसंस्कृत वातावरणात गेलेले. माझे वडील तर माणुसकीचे प्रतिष्ठानच नव्हे, तर माणुसकीचे एक अधिष्ठानच होते. आई माझी खूपच सुशील! आमच्या आयुष्याचा ती तर एक कंदील. मला माझ्या आईवडिलांकडून वारसाहक्काने मिळालेली कष्ट, स्वाभिमान, नीतिमत्ता, सचोटी, इमानदारी, प्रामाणिकपणा आणि माणुसकी, हीच काय ती अमुल्य अशी दौलत, जी आज माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन गेली आहे. त्यामुळे आनंदाने आणि स्वाभिमानाने कसे जगता येते ह्याचे उत्तम उदाहरण, जो काही आज मी तुमच्या समोर उभा आहे तो रवी, कवी, लेखक होय. मन लावून प्रामाणिकपणे कष्ट करणे हा तर माझा छंदच आहे म्हणा!  त्यात मला आनंदही खूप मिळतो आणि समाधानही मिळते.
नियतीच्या खेळाचे एक रूप मला माझ्या पन्नाशीलाच जाणवले. आमच्या लहानपणी आम्ही भावंडे नारायण पेठेतील प्रेसमधून छापून झालेले कागद मुडपायला घरी आणायचो व त्याचे आम्हाला 10000 कागदांना एक रुपया असे पैसे मिळायचे. बेताच्या परिस्थितीमुळे आई वडिलांच्या संसाराला, आम्हा भावंडांचाही थोडाफार हातभार लागावा, हेच काय ते आमचे संस्कार आम्हाला सांगत होते. तोच मी जेव्हा नारायण पेठेतल्या एका प्रेसमध्ये माझा ‘प्रतिबिंब’ हा काव्यसंग्रह, वयाच्या पन्नाशीनिमित्त छापण्यासाठी घेऊन गेलो होतो तेव्हा माझे ऊर कसे अभिमानाने भरून आले होते. स्मृती पटलावरून तो सगळा काळ अक्षरशः एका क्षणात आपसूकच तरळून गेला आणि डोळे पाणावले.  त्या अश्रुंमध्ये मला माझ्या आईवडिलांच्या अथक कष्टाचे, त्यांच्या प्रामाणिकतेचे, स्वाभिमानाचे आणि सचोटीचे प्रतिबिंब पडताना पाहून, मन गलबलून गेले होते.  क्षणभर वाटले की, हे स्वप्न तर नाही ना! जेव्हा प्रतिबिंबची पहिली प्रत मी हातात घेतली तेव्हा नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आई जशी आपल्या छातीला लावते, कुरवाळते, माया करते, अगदी तीच भावना माझ्या मनात दाटून आली होती. होय आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तुमच्यावर झालेल्या संस्काराचे प्रतिक जेव्हा तुमच्या हातात पडते तेव्हा आपल्या ह्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते. आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याची एक भावना मनात त्याक्षणी येऊन जाते तिला ह्या जगात तोड नाही असेच मला वाटते. म्हणूनच मला ह्या आयुष्यावर बोलावेसे वाटले. मला तुम्हांला सांगावेसे वाटते की, आयुष्यात कुठलीच गोष्ट कठीण नाही हो! आपल्याकडे फक्त महत्त्वाकांक्षा, जिद्द आणि इच्छाशक्ती असायला हवी, बाकी काही नाही.
आयुष्य आपल्याला पदोपदी काही ना काहीतरी शिकवत असते. प्रत्येक घटना अथवा प्रसंग हा वाईटातून काहीतरी चांगले आपल्यासमोर ठेवतच असतो. फक्त आपल्याला संयम राखून, परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याचा दृष्टिकोन असण्याची गरज मात्र नक्कीच असावी लागते. मी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता त्यावेळेस माझ्याकडे एक सायकल होती. अंगावर घालायला जरा बरे परंतु आमच्यापेक्षा बर्‍या परिस्थितीत असलेल्या एका भावाचे वापरून झालेले जुने कपडे होते. ते रफू करून, मापाचे करून, धुऊन, इस्त्री करून वापरायचो. ही परिस्थितीची अथवा काळाची गरज होती आणि मला ह्या गोष्टीची कधीही लाज वाटली नाही. उलट अशा परिस्थितीतही आम्ही सर्वांशी मिळून मिसळून व स्वाभिमानाने रहायचो. त्याचं काय आहे!  गरजा आपल्या संपतच नाहीत, आशा माणसांच्या थकतच नाहीत, परिस्थितीचेही भान रहात नाही. महत्त्वाकांक्षांचा हा सागर गरजेतूनच आकार घेतो आणि ह्या गरजा भागविण्यासाठी मग तो एल्गार करतो.
प्रत्येकाने आपल्या आयुष्याचे गणित एकदा तरी मांडून पहावे असे मला कायम वाटते. तेव्हाच त्याला कळेल की काहीतरी राहून गेले आहे ते! आयुष्याचे गणित मांडायला आपल्याला जमतच नाही असे वाटू लागते आणि तो किती अवघड प्रकार आहे हे उमजायला लागते. हे गणित मांडायला आपल्याला आपल्या आयुष्याचा, घडलेल्या घटनांचा, प्रसंगांचा, तसेच आपल्यावर झालेल्या संस्कारांचा खूप अभ्यास असावा लागतो, जो कुठल्याही पुस्तकात शिकवला जात नाही.  ज्याने त्याने हे गणित आपल्या अनुभवातूनच मांडायचे असते. जर का हे गणित मांडायला आपण चुकलो तर आपले आयुष्य मात्र भरकटत जाते. तसेच ते जर जमले तर मात्र आयुष्यच सफल झाल्याचे भाग्य लाभते. आयुष्याच्या गणितात फक्त भावनांनाच फार मोठे आणि मानाचे स्थान असते हे विसरू नका. ह्या भावनांचा संख्याशास्त्राच्या नियमानुसार गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी करायची असते आणि त्यातूनच आयुष्याला एक आकार द्यायचा असतो. गणितात शून्याला अनन्यसाधारण किंमत असते बरं का!  कारण जो हे गणित व्यवस्थित मांडू शकतो, तो मात्र नक्कीच शून्यातूनच विश्‍व निर्माण करू शकतो. जरी हा संख्याशास्त्राचा खेळ असला तरी त्यात आपल्या जीवनातील बहुमूल्य अशा भावनांचा सुरेख मेळ घालावा लागतो. म्हणूनच, मला म्हणावेसे वाटते की,

जगण्यासाठी जगायचे नसते,
कारण जगण्याचे गणित निराळेच असते ।
गंमत खरी जीवनात असते,
हसत हसत हे जीवन जगायचे असते ।
हार जीत ही नेहमीच असते,
हारता हारता जिंकायचे असते ।
जिंकण्याचे ध्येय अभेद्य असते,
फिरुनी परत पहायचे असते ।
प्रेम करावे जगण्यावर,
जगण्याच्या प्रत्येक घडीवर,
रचता जीवन पायात येई हो गोळे,
हे तर नियतीचे एक प्रारूप असते ।
तत्त्व हे जीवनाचे मूळ असते,
स्वाभिमानच जीवनाचे तत्त्व असते ।
अभिमान हा जगण्याचे साधन असते,
ज्ञान तर जीवनाचे सत्त्व असते ।
अपमान गिळून जगायचे असते,
स्वार्थातूनच परमार्थ साधायचे असते ।
नीतिमत्ता तर जीवनाचे अंगच असते,
भक्ती हीच जीवनाची शक्ती असते ।
जीवन हे असेच असते,
जगण्यासाठी जगायचे नसते ॥

आयुष्याच्या एका संध्याकाळी मला सहज वाटले की आपण अगदी सहजच आपल्या पन्नास वर्षांच्या ह्या आयुष्यात जरा डोकावून पाहुयात! आणि काय सांगू तुम्हाला, मला माझ्या ह्या फाटक्या आयुष्याला ठिगळे लावावीत की काय असे वाटू लागले. मग काय,
मी घेतली ठिगळे लावायला,
किती लावू,  कशी लावू,
असे मी विचारले ठिगळांनाच।
एक ठिगळ घेतले बालपणाचे,
दुजे ठिगळ लावले तारुण्याचे,
मला जाणवले की संपतच चाललेत,
दिवस आता आयुष्याचे ।
तिजे ठिगळ घेतले कष्टाचे,
चौथे ठिगळ शिवले कर्तृत्वाचे,
मला समजले की
थकत चालले आहे शरीर हे हाडा मासाचे ।
पाचवे ठिगळ विणले स्नेहाचे,
सहावे ठिगळ काही प्रेमाचे,
तेव्हा मला भासले,
जणू रिक्तच होत चाललेत,
मांडवच माणसांचे ।
शेवटी, कंटाळून ठिगळच मला म्हणाले,
कशासाठी हा अट्टाहास चाललाय तुमचा.
अहो विरलय तुमच आयुष्य,
प्रयाण करावे आता वैकुंठास ।

एक नक्की वाटते की आयुष्याच्या प्रत्यके टप्प्यावर माणसाने आत्मपरीक्षण करावे.  आपले कुठे चुकले व कसे चुकले हे समजेल आणि त्यात जर का कोणी दुखावले अथवा दुरावले गेले असेल तर त्यांची माफी मागण्याची एक संधीतरी ह्या जन्मी मिळून जाईल. चुकतो तोच माणूस असतो आणि त्या चुकांमधून शिकून स्वत:ला सुधारतो तोच माणूस आपले आणि आपल्या आप्तेष्टांचे आयुष्य सुखी व समाधानी करू शकतो ह्याचा मला आत्मविश्वास आहे.
आयुष्यात आपण खूप चढ उतार अनुभवतो.  कधी कधी काही घटना आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करून जातात.  अशा घटनांमुळे आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन एकदम नकारात्मक होऊन जातो आणि भावनांच्या हिंदोळ्यावर असे हे झोके खात असतांना, शेवटी वाटायला लागते की कोणासाठी कशासाठी, आजवर उभारले हे इमले ! पडणारच होते सारे, मग उभारलेच कसले ! हे असेच का असते सारे, तंत्र हे मज ना उमगले ! कशासाठी, कोणासाठी, आयुष्यभर हे झमेले. तडफडत, तडमडत केले सारे, का न मज हे आजवर समजले ! अंतरा अंतरावरती, होते किती अडथळे, उभारताना ही मज, नाही कोणी अडवले ! पडतांना पाहत होते सारे, जे कधी उभारतांनाही नाही दिसले.
माणूस ही एक अशी चीज आहे की त्यात हेवे दावे, भांडण तंटे, रुसवे फुगवे, क्रोध, त्रागा, एकमेकांचा दुस्वास, हे मला तर एका माणसाला निसर्गाने दिलेल्या एखाद्या शापा सारखेच वाटतात.  त्यातच मानवाच्या आयुष्यातील बराचसा वेळ हा हे रुसवे फुगवे काढण्यातच जातो असे मला राहून राहून वाटते. रुसवे फुगवे काढण्यातच, आयुष्य जायचं, कोणी किती रुसायचं,  किती फुगायचं, ज्याचं त्यानेच ठरवायचं ! कधी आमचं चुकायचं,  तर कधी तुमचं. चुकण्यातूनच नाही का आपण सुधारायचं, भांडता भांडता ही असत,  थोडंस हसायचं !  मुद्दा कळीचा, अथवा नळीचा, प्रत्येकाने आपलाच घोडं किती दामाटायचं, कधी तरी ऐकून दुसर्‍याच, असत समजून घ्यायचं !
हे सगळे तत्वज्ञान मी का पाजळत आहे हे मलाच अजून तरी समजले नाही बर का !. त्याचे कारण आपल्या आयुष्यात आपल्या कळत नकळत खूप काही घडत असते आणि तर्क वितर्कातच आपले जीवन झुंजत राहते. जगण्याच्या आशेवरच जीवन फुलत जाते.  आशेच्या पंखावर अपेक्षांचे वादळ उठते तर कधी कधी आयुष्याच्या संधेवरतीही मळभ दाटते.  तेंव्हा, पंख असूनही आपले आकाशच हरवते आणि हे जीवनच दिशाहीन भासू लागते.  उगवताच सूर्यास,  मावळून टाकते, आठवणींच्या हिंदोळ्यांवर मन मात्र तरंगत राहते.  आठवणींचे हे ओझे,  मानगुटीवर बसते, वाट फुटेल, तिकडे चालतच राहते. असूनही दृष्टी, अंध ते होते, जन्म-मरण विधी लिखितच असते, मरण्यासाठी जगायचे नसते,  मरण्यासाठी जगायचे नसते. जरी मरण्यासाठी जगायचे नसते हे माहिती असले तरी मनुष्य स्वभावानुसार प्रत्येकजण ह्या चुका आयुष्यभर करतच राहतो आणि जेंव्हा त्याला हे उमजते तेंव्हा खूप उशीर झालेला असतो.
आयुष्यात थोडेसे मागे वळून पहिले की वाटते की,  आपल्याला ना ह्या जीवनाचा अर्थच समजत नाही ! कसे जगावे तेच उमजत नाही !  परिस्थितीवर मात होतच नाही ! कळते सारे, पण वळतच नाही !  निष्कलंक जीवन लाभतच नाही आणि हातून एखादे उदात्त कर्म घडतच नाही !  कस्पटा समान हे जगणे वाटू लागते ! स्मशानातही शांतात लाभेल का हो असा एक प्रश्न निर्माण करून कोणाच्या खांद्यावरून आपण जाणार आहोत हे काही कळत नाही ! पण आईची कुस मात्र आठवत राहते ! ते हे आयुष्य तसे पाहायला गेले तर निष्फळ वाटू लागते अर्थात हा ज्याच्या त्याच्या कर्माचा एक भाग असतो.  त्याने आपले आयुष्य कसे व्यथित केले आहे त्यावरच ह्या भावना अवलंबून असव्यात असे वाटते आणि हो प्रत्येकाला त्या लागू असतील असेही नाही !.
सर्वसाधारण माणसाने तसेही फारसे कोणाशी वैर केलेले नसते हो आणि त्यात निसर्गाचा एक नियमच तो आयुष्यभर पाळत आलेलो असतोच की, पाण्यात राहून त्याने माशाशी कधीही वैर केलेले नसते आणि त्याला त्यात फारसे काहीही  गैर केले आहे असे वाटतच नाही !  तो कित्येकदा केलेले करार मोडत असतो आणि त्याचेच मन त्याला सांगत असते की बघ जिंदगी आता तुझी,  काही खैर नाही !  तो नियतीच्या तालावर, आयुष्यभर नाचत असतो कारण आयुष्याच्या तमाशात असाही तो कधीही स्वैर नसतो ! नियती त्याला एका हाताने देत असते आणि दुज्या हाताने काढून नेत असते तरीही त्याचे मन सैरभैर होत नाही तो खरा प्रगल्भ माणूस ! हा माणूस मरतो आहे जगतांना खुपदा तरीही त्याला मरत मरत जगण्यातही,  काही गैर नाही असेच वाटत राहते !  त्याला एकच तत्वज्ञान माहिती असते की मोठा मासा खाई, लहान माशास, आणि व्यवहारात असे होणे, तसेही फारसे काही गैर नाही. आहे की नाही गमतीशीर असे हे आपले आयुष्य.  काय बोलावे त्यावर हेच कधी कधी सुचत नाही.
म्हणूनच, मी बर्‍या वाईटाचा फारसा विचारच कधी केला नाही हो.  चूक काय बरोबर काय हे ही मला कधी समजलेच नाही, जे जे नियतीने घडवले तसे ते ते घडले, मी निमित्त मात्र होतो बाकी काहीच नाही. सूर्याने रोज उगवायचे आणि मावळायचे, चंद्र चांदणे दिवसा कधी दिसायचे नाही.  विचार करुन करुन मन कधी कधी थकते, नियतीवर अजूनही नियंत्रण कोणाचे नाही असे वाटते.  पंखात बळ असे तोवर असते की उडायचे, थांबला तो संपला नाही, असे कधी घडायचे नाही.  नशिबाला दोष देण्यात जाते हयात आपली, कर्मावर बोट ठेवण्याची आपली हिंमत नाही.  पाषाणाला असते की हृदय हे, दगडास फुटतो पाझर पण नियतीस नाही.  धर्म जात कुळ गाव राज्य आणि राष्ट्र काय, हे सारे आपल्या उपयोगाचे असतच नाही.  करावी भक्ती आणि असावी श्रध्दा कर्मावरी, दैव देते आणि कर्म नेते हे काही शास्त्र नाही.  जगावे परी किर्ती रुपे उरावे म्हणातात सारे, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केलेच नाही.  जगणे हे अजिबात मुष्किल झाले वाटते. जिवंत असे पर्यंत जगण्यास पर्याय नाही.
कधी ना कधी, कुठे ना कुठे, अशी एक भावना माणसाच्या आयुष्यात येत असते की, ह्या जगण्याने मला झिडकारले होते, त्याच मरणाने मला, स्वीकारले होते. केलेत मी परिस्थितीशी, दोन हातही येता जाता कित्येकांनी, नाकारले होते. टिपरी गत पाण्यावर, मज फेकलेही, तरंगही पाण्यावर मी,  साकारले होते. बांधुनी पायी चाळ  मज नाचविलेही.  बोर्डास अदाकारीने मी  झंकारले होते.  नथ माझी ही सैलावली कुठे जराशी,  बारीने तेंव्हाच मज धिक्कारले होते. अनंत वेदनांनी भरलेली,  ही झोळी रिती करण्या, यमास मी पुकारले होते. अर्थात माणसाने कुठेतरी थांबायचे असते हे त्याला कळले तर त्याचे आयुष्य सुखकर होऊ शकते.
तरीही माणूस ह्या आयुष्यासाठी वणवण करतच राहतो.  आपण केलेली वणवण म्हणजे काय सांगू आणि कसे सांगू हेच कळत नाही.  आयुष्यभर जगण्यासाठी केली, वणवण आहे, मेल्यावर जळण्यासाठी साठवितो,  सरपण आहे ! जगतोच आपण कशासाठी, उमगतच नाही, सरपणाचे जगतांनाही मनावर,  दडपण आहे !  जन्मताच मृत्यूही असतो नशिबी लिहिलेला, दडपणातच जगण्याचेही,  एक वेगळेपण आहे !  मातीतून जन्मून मिसळावे मातीतच लागते, वेगळेपणातच मृत्यूचेही एक अजाणतेपण आहे ! प्रतिभेने मिळवावी लागते,  आपली प्रतिष्ठा, अजाणतेपणातच,  प्रतिष्ठेचे देवपण आहे !  सरपणासाठीचीच ही, एक धडपड वाटते, देवपणातून शेवटी, मृत्यू हे समर्पण आहे !.
हे सगळे असेच होत राहते आणि आपल्याला कळतच नाही की, माझे मलाच ना कळले, आयुष्य हे कसे ढळले !  होते दु:ख मी खूप सोसले, सुख हे मज नाही झेपले !  सुखास मी एकदा पाहिले, दु:खच मज आपुले वाटले !  वळून मी मागे पाहिले. दु:खच मज सांगाती राहिले ! दु:खाकडे हसून मी पाहिले, दु:खातही सुख मज दिसले.  ह्या आयुष्याच्या वादळात एक अतिशय उत्कट अशी भावना आपल्या मनात कायमच येत असते की, आसवेच आज माझी फितूर होती, वाहण्यास ती ही आज आतुर होती !  मोकळ्या कुठे होत्या पापण्या तेंव्हा, आसवेही आज माझी लाचार होती !  तुफान एक भावनांचे घोंगावत आले, आसवांनाही भावनांची लकेर होती !  वेगात येऊन एक वादळ गेले होते, लोचनी उदासीची झालर होती !  क्षणात सारे विस्कटूनी गेले होते, आसवेच माझी माझा आधार होती !  मुकाट सोसले घाव मी उरावरी, आसवांचीच माझ्याकडे तक्रार होती !
ह्याचे एकमेव कारण की आपल्याला माणसांचा अंदाज कधी बांधता येतच नाही.  त्यामुळे माणूसही असा कधी कळलाच नाही.  ह्या जगात आता साधा भोळा असा कोणही राहिलाच नाही.  भावनांचे अनंत सागर जरी आपण पार करून आलो, तरीही माणुसकीचा किनारा काही लाभत नाही. त्यामुळेच की काय नियतीला सांगतो आहे की, तू दूर कुठेही अगदी सागरीही घेऊन जा, कारण माणूस अजूनही गवसलाच नाही. त्यामुळेच की काय मला आता निवृत्तीचे वेध लागू लागलते.  हे क्षण निवृत्तीचा कसे असतील असे मी जरा माझ्या मनाशी मांडून पाहत होतो आणि हे क्षण माझ्याशी बोलायलाच लागले हो. क्षण निवृत्तीचा,  असतो दुभाषी, एक मन म्हणते,  निष्क्रिय झालासी, दुजे मन सांगते,  सक्रीय व्हावेसी !  क्षण निवृत्तीचा,  असतो विलक्षण, एक मन करते,  भूतकाळाचे परीक्षण, दुजे मन सांगते, भविष्याची उजळण !  क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ, एक मन म्हणते, स्मृती तू उजळ, दुजे मन सांगते, क्षण हे उधळ !  क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी, एक मन म्हणते,  उरलास सकळासी, दुजे मन सांगते,  जुळवून घे समाजासी ! त्यातूनच मला जगण्याचा एक मंत्र सापडला. मोह ना कशाचा मजला आहे
रवींद्र कामठे
9822404330

Monday 5 June 2017

पुणे - आंबोली – वेंगुर्ला - आंबोली – पुणे – कुटुंब रंगले सहलीत...



पुणे - आंबोली – वेंगुर्ला - आंबोली – पुणे – कुटुंब रंगले सहलीत...
 
कधी नव्हे ते मी बसने घरच्यांबरोबर सहलीला जाण्याचे मान्य केले होते.  कारण, आजवर मी कधीच माझ्या गाडीशिवाय सहलीला गेल्याचे मला आठवतच नाही !  मला की नाही स्वत: वहान चालवत प्रवास करायला फार आवडते.  म्हणजे गाडी चालवणे हा माझा सगळ्यात आवडता छंद आहे.  त्यात जर का किशोर-मुकेश गाणी लावली ना तर मग काय बघायलाच नको.  गाडी आपोआप एका वेगळ्या लयीतच चालत राहते.  मी सगळ्यांमध्ये असूनही कोणात नसतो.  हीच तरी खरी मज्जा असते सहलीची.  
 
२७ मे २०१७, भल्या पहाटे ६ वाजता (माझ्या साठी ही भली पहाटच आहे) माझी स्वारी सगळे आवरून तीन दिवसांचे लागणारे सामान पिशवीत भरून तयार होऊन बसलो होती.  बरोबर ६ वाजता मिनी बस दारात येऊन थांबली होती.  पण आमचे बंधुराज व त्यांचे कुटुंब पाषाणहून रवाना व्हायचे होते.  झाले माझे पित्त खवळले होते.  कारण कोणी जर वेळ नाही पाळली ना की माझी चिडचिड होते !  असो तरी मी खूप प्रयत्नांती स्वत:ला शांत केले.  त्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता व मी चिडचिड कडून तो लवकर येऊही शकत नव्हता.  जवळ जवळ तास भर वाट पाहिल्यानंतर ही स्वारी उगवली.  शेवटी आम्ही सगळे एकदाचे ७ वाजता बस मध्ये बसून आंबोलीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
 
गाडी सतरा माणसांची आणि माणसे आठ होती.  एकंदरीत सगळीच धमाल होती.  ‘बबलू’ नामक उत्तरप्रदेशी चालक त्याच्याच धुंदीत गाडी चालवत होता.  थोडा वेळ मी त्याच्या बाजूच्या जागेवर बसलो, पण नंतर मला त्याच्या चालवण्याच्या पद्धतीच्या इतका कंटाळा आला की मी आपला सरळ त्याच्या मागच्या सीटवर जाऊन बसलो.  ह्यात त्याची काहीच चूक नव्हती.  कारण त्याने कितीही ताणले तरी ती बस ताशी ७० च्या पुढे जाऊच शकत नव्हती.  मग काय रमत गमत, मजल दरमजल करत सकाळी ७ वाजता घरातून निघालेले आम्ही साधारण दुपारी ४ वाजता आंबोलीला पोचलो.  ३५० किलोमीटर प्रवासाला साधारण ९ तास लागणे म्हणजे माझ्या साठी शिक्षाच होती म्हणा !  पण माझा नाईलाज होता.  साधारण ८-१० वर्षांपूर्वी आम्हीं स्वत:च्या गाडीने जेंव्हा आंबोलीला आलो होतो तेंव्हा जेमतेम ५ तासातच पोचलो होतो.  हाच तर फरक आहे ना कार आणि बस मधे, हे समजायला मला जरा वेळच लागला.  नाहीतर सगळ्यांनी एकत्र जाण्यात जी मजा आहे ती कशी अनुभवता आली असती म्हणा.  ते काहीही असो, गाडीत नुसते बसून राहणे आणि ती मला चालवायला न मिळणे ही एकप्रकारची शिक्षाच वाटते हो.
 
सगळे कसे भुकेने कडकडले होते.  तसाही साताऱ्यात ९ वाजता भरपेट नाश्ता झाला होता सगळ्यांचा.  तरीही ४ म्हणजे अंमळ उशीरच झाला होतो. त्यामुळे गाडीतून उतरल्याबरोबर आम्हीं सगळे जेवायला गेलो.  रुममध्ये जाऊन सामान वगैरे टाकण्याच्या भानगडीत न पडता ‘पूर्वा आणि ‘चैत्याच्या’ पडत्या फळाची आज्ञा समजून आधी पोटपूजा केली आणि नंतर आपापल्या रूम मध्ये जाऊन आवराआवरी केली.  ‘पूर्वा’ म्हणजे माझी मुलगी जी आमच्या सहलीची लीडर होती आणि तिच्या मदतीला तिचा एक मित्र ‘चैतन्य’ आला होता, ज्याला आंबोलीच्या जंगलाची खडान्खडा माहिती होती.  अर्थात ही जबाबदारी आमचे जावई ‘मयुरेश’ ह्यांची होती परंतु त्यांना  ताडोबाच्या जंगल सफारीला जावे लागल्यामुळे, त्यांची चैत्यावर ही जबाबदारी टाकून पूर्वाच्या मदतीला धाडले होते. तसेही हे दोघेही एकतर जंगलप्रेमी आणि प्राण्यांची, पक्षांची, झाडांची, फुलांची, सापांची, बेडूक, फुलपाखरू, बांडगुळ, तसेच अगदी तिथल्या निसर्ग चक्राची इतम्भूत माहिती असलेले असल्यामुळे आमच्या सहलीबरोबर ज्ञानातही भर पडत होती हे मात्र निश्चित.
 
आम्ही सहा वाजता आंबोलीतील सनसेट पोइंटला पोचलो. सूर्यास्त होण्यास थोडा वेळ होता.  जवळ जवळ ६.४५ला सूर्यास्त होणार असा अंदाज आला.  ह्या ठिकाणावरून आंबोलीचा संपूर्ण घाट रस्ता एखाद्या अजस्त्र अजगरासारखा पसरलेला दिसत होता.  त्यात सूर्याची सोनेरी किरणे डोंगरावर पडल्यामुळे हा रस्ता एखाद्या हिऱ्या सारखा चमकत होता. आंबोलीचे वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर बाराही महिने हिरवागार असतो व एवढ्या उन्हाळ्यातही वातावरण आल्हाददायक करतो.  आमचा एक तास निसर्गाच्या ह्या विहंगम दृशाने कधी गेला ते कळलेच नाही.  सूर्यास्त होतांना आकाशाच्या सोनेरी छटा आणि त्यात ढगांची होणारे निरनिराळे आकृतिबंध पहिले की मन कसे प्रसन्न होऊन गेले होते.  ह्या ठिकाणावरून जावूच नये असे वाटते.  जस जसा अंधार पडू लागला तसे आमचे पाय आपसूकच बस कडे वळायला लागले.  कारण सूर्यास्तानंतर मनात एक प्रकारची धाकधूक वाढायला लागते.  कारण गर्द झाडी, एकदम झालेला अंधार, रातकिड्यांची सुरु असलेली किरकिर, घनदाट जंगल.  त्यात इथेतर माणसांची वर्दळच नव्हती.  आम्हीं परत बस कडे जायला निघालो तर, चैत्याला रस्त्यावर “हरणटोळ” नावाचा एक साप दिसला, पठ्याने त्याला धरला व उचलून एका झाडावर ठेवला.  नाहीतर तो गाडीखाली आला असता.  त्यादरम्यान आमची सगळ्यांची जी काही फाटली होती ना की विचारू नका.  अहो, साप म्हटले ना की माझी तर बोबडीच वळते हो.  एकतर हा प्राणी बिनडोक आणि थंड रक्ताचा त्यात विषारी आहे का विनविषारी आहे हे कळतच नाही.  अर्थात ह्या पोरांना चांगली माहिती आहे हो, तरी आमचा जीव वरखाली होत होता.  त्याचा जीव वाचवला ह्या आनंदात आणि एकदाचा ह्या जंगलात एकतरी साप दिसला ह्या खुशीत आम्हीं त्या ठिकाणाहून परत जायला निघालो.  जाता जाता वाटेत बराच अंधार झाला होता.  चैत्या म्हणाला की वाटेत एक भूतबंगला आहे तो पाहून मगच पुढे जाऊ.  झाले भूतबंगला म्हणाल्याबरोबर आमची फाटली होती.  पण अंधाराचा फायदा घेऊन सगळे कसे आपल्याला अजिबात भितीवागैरे वाटत नाही असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.  एकदाची बस त्या भूतबंगल्याच्या जवळ पोचली.  हा भूतबंगला म्हणजे पूर्वीच्या सावंताची गढी आहे.  तिचा शेकडो वर्षात वापर नसल्यामुळे आणि ती घनदाट जंगलात असल्यामुळे तिथे प्रांण्याच्याच अधिवासच जास्त असतो.  तसेही ह्या अंधारात साधारण ५० ते ६० मीटर चालत जाऊन तो भूतबंगला पाहणे म्हणजे आम्हीं एखाद्या लढाईला चालल्यासारखे सगळ्यांना भासत होते.  अर्थात पूर्वा आणि चैत्या आमच्या पुढे होते.  ते जय्यत तयारीने आलेले होते.  त्यांनी लगेच त्यांच्या पिशवीतील चार पाच विजेऱ्या (टोर्च) काढून आम्हांला दिल्या आणि चालू लागले.  कोण कोणाशी बोलत नव्हते.  गपचूप त्यांच्या पाठीमागे चालत होते.  एकदाचा तो भूतबंगला आला.  भले मोठे आवर होते.  अगदी फुटबॉल खेळता येईल एवढे मोठे.  बंगल्यात आत शिरलो , एका मोठ्या दरवाज्यातून थोडेसे आत डोकावले, तर थोडीशी फडफड झाली.  झालं आमची भीतीने गाळण उडाली.  परतू विजेरीच्या उजेडात एक मलबार...नावाचा दुर्मिळ अशा पक्षी दिसला.  अंधार आता आणखी गडद झाला होता.  आकाश ही भरून आले असल्यामुळे चंद्र चांदणेही दिसत नव्हते.  जवळपास कुठेही उजेडाचा मागमूसही नव्हता.  आणि एकदम अचानक आमचे लक्ष एका झाडा कडे गेले.  ते झाड काजव्यांनी लगडलेले होते आणि चमचम चमकत होते.  अतिशय विलोभनीय असे हे दृश्य त्या भयाण भूतबंगल्याच्या परिसरात पाहून त्यातल्या त्यात मनाला हलके करून गेले.  आम्हीं तसेच पुढे चालत चालत आमच्या बसच्या दिशेने निघालो होतो.  आता आम्ही रस्त्याच्या खूप जवळ येऊन पोचलो होतो आणि मनातली भीतीही थोडी कमी झाली होती.  आणि काय आश्चर्य ज्या रस्त्यावर आमची बस उभी होती ना तिथपासून ते दूर दूर साधारण ५०० ते १००० मीटर अंतरावरील सर्वच्या सर्व झाडे काजव्यांनी लगडलेली होती आणि चमकत होती.  डोळ्याचे पारणे फेडणारे हे दृश्य होते की, जे आमच्या स्मृतीपटलावर कायमचे कोरले गेले होते.  हे पाहून न राहवून आम्हीं ‘बबलू’ चालकाला सांगितले की तू बस घेऊन पुढे जा, आम्ही चालतच येतो. अर्थात मी मात्र बसमध्ये बसून पुढे गेलो कारण माझे पाय आता चांगलेच दुखायला लागले होते. त्याच आनंदात सायली रिसोर्ट वर परत आलो.  थोडेसे आवरून जेवायला बाहेर पडलो आणि पाहतो तर संपूर्ण आंबोलीचा परिसर धुक्याच्या दुलईत गायब झालेला.  नार्वेकरच्या खाणावळीत मस्तपैकी सामिष्ट भोजनावर ताव मारण्याशिवाय गत्यंतरच नव्हते हो.  प्रवासाचा शीण तर कुठल्याकुठे गायब झाला होता.  जेवण झाल्यावर पूर्वा आणि चैत्याने चला जंगलात थोडेसे फिरून येऊ असा आवाज टाकला.  सगळे लगेच तयार झाले.  फक्त एकच अट होती की चालत जायचे आहे.  त्यामुळे मी आपोपाप कटाप झालो.  कारण आता माझे पाय चालणे अशक्य होते.  जरी माझी मानसिक इच्छा होती तरी शारीरिक तयारी नसल्यामुळे मी थोडासा खट्टू होतो.  अर्धा पाऊन तास सगळे भटकून परत आले आणि अशा रीतीने सहलीचा पहिलाच दिवस छान गेल्याच्या आनंदात खोलीवर आल्याबरोबर अंथरुणाला पाठ लागताच गुडुप्प झालेले होते.
 
२८ मे, दुसरा दिवस, जो उजाडला तो एक नवचैतन्य घेऊनच.  जसे काही त्याला महिती होते की अरे ही शहरातली माणसे दमतात, थकतात कष्ट करून, भौतिक सुखाच्या मागे लागून लागून त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला असतो.  त्यांना तुझ्या ह्या निसर्ग सौंदर्याने थोडसा दिलासा दे, मन हलक कर त्याचं. काय सांगू, रात्रीच्या धुक्याच्या दुलईतून आंबोली अजूनही बाहेर आलेली नव्हती हो.  कोकणातली ती लाल माती, पानाफुलांवर पडलेली दवबिंदुंची ती मखमली चादर.. नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत निसर्गाचा हा अनमोल नजरा मनात साठवता साठवता दमायला झालं होतं.  जस जसा सूर्य वर येऊ लागला तस तशी, आंबोली जागी होऊ लागली होती.  पक्षांच्या किलबिलाटाने सगळे वातावरण कसे मंत्रमुग्ध करून टाकले होते.  त्याच उत्स्च्हात आम्ही नाश्ता केला आणि बस मधून आंबोली घाटमार्गे वेंगुर्ल्याला जायला निघालो.  आंबोली घाट म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला अतिशय विलोभनीय असा परिसर आहे.  साधारण ११ वाजता आम्हीं वेंगुर्ल्यातल्या समुद्र किनारी पोचलो.  तेथील ‘मर्मेड’ नावाच्या एका हॉटेल मध्ये नाश्ता केला.  समुद्रात त्याच वेळेस भरती चालू असल्याचे कळले व आम्हांला सांगण्यात आले हीच ती उत्तम वेळ आहे समुद्राच्या पाण्यात खेळण्याची.  अहो खेळ कसला, एक तर पावसाळी वातावरण त्यात भरती चालू होती आणि समुद्र खवळलेला होता.  मी बापडा मस्तपैकी वाळूत बसून राहिलो आणि सगळ्यांचे कपडे आणि मोबाईल सांभाळण्याचे तसेच फोटो काढण्याचे आवडते काम करत बसलो.  एकेकाची गमत पाहत होतो.  माणूस निसर्गापुढे किती शुद्र आहे ह्याचे प्रत्यंतर पहात होतो.  एक एक लाट किनारी येत होती आणि एखाद्या पुस्तकाची पाने उलटावी तशी माणसाना उचलून इकडून तिकडे फेकत होती.  आमची तर हसून हसून पुरेवाट लागली होती.  समुद्रात भिजायला काही वाटत नाही.  परंतु त्या नंतर अंघोळीची जर सोय नसेल ना तर खरी वाट लागते राव.  तसे आमची सोय ‘मर्मेड’ मध्ये झालेली होती त्यामुळे काळजी नव्हती.  दुपारच्या जेवणात मस्तपैकी मासे आणि माश्याचे कालवण भात असा बेत आखल्यामुळे सगळ्यांची तब्बेत खुश होती.  आज मी जवळ जवळ ७ वर्षांनी मासे खाणार होतो.  सगळे पथ्यपाणी बाजूला ठेवून मी आज मनसोक्त जेवलो.  सौद्ल आणि प्रोम्प्लेट हाणला.  मनोमन आचाऱ्याला आशीर्वाद दिले आणि आंबोलीच्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली.  वाटेत सावंतवाडीस थांबलो.  काही लाकडी खेळणी घ्यायची होती.  तेथील तळ्याच्या काठी बस लावली आणि तळ्यातील मासे पहात बसलो होतो. बाकी सगळे खरेदीला गेले होते त्यामुळे मी जरा निवांत होतो.  समोर एक वडापावची गाडी होती, त्यांच्याकडून वडापाव आणि एक चहा असा बेत उरकून तळ्याकाठी बसलो होतो.  तेवढ्यात कोणीतरी जोरात ओरडले साप, साप.  झाले माझी फाटली.  बघतो तर काय तळ्यात ६ फुटी एक पाणसाप माश्याच्या शिकारीचा प्रयत्न करत होता.  अर्थातास त्याचा हा प्रयत्न आपलेच काही भाऊबंद वरून पावाचे तुकडे पाण्यात टाकून फसवत होते.  सगळे आले.  चहा घेतला आणि आम्हीं आंबोलीकडे जायला निघालो.  साधारण ५ वाजेले होते.  संध्याकाळ झाली होती.  सूर्य अस्ताला चालला होता आणि आम्हीं आंबोली घाट चढत होतो.  घाटमाथ्यावर पोहचेपर्यंत सूर्यास्त होत होता आणि पुन्हा एकदा निसर्गाचा तो अद्भुत नजरा डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न सगळे करत होतो.  समुद्रसपाटीपासून साधारण १२०० मीटर वर आल्यानंतर हवेतील तो आल्हाददायी बदल अंगावर रोमांच उभे करीत होता.  असे वाटत होते की इथून जाऊच नये परत.  पण काय करणार ! खोलीत परत आल्याबरोबर सगळ्यांनी परत एकदा अंघोळ करण्याचा बेत ठरवला.  मी मात्र कोरडा होतो त्यामुळे आंघोळीचा प्रश्नच नव्हता.  संध्याकाळचे समधुर वातावरण न्याहाळता, न्याहाळता, आनंद ह्या चित्रपटातील, मुकेशे गायलेले अप्रतिम असे गाणे माझ्या ओठावर आले आणि माझी संध्याकाळ अजून भावूक करून गेले.   
कही दूर जब दिन ढल जाये, सांज की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये
मेरे खयालोन्के आंगण मै, कोई सापनोके दीप जलाये...
 
जेवण झाल्यावर रात्री जंगलात फिरायला जायचे असा बेत पूर्वा आणि चैत्याने आखला होता.  जेवण उरकायला रात्रीचे दहा वाजले.  हॉटेल बाहेर आलो आणि अक्षरश: एका फुटावरचे सुद्धा दिसेनासे झाले.  इतके गडद धुके पसरले होते.  मन एकदम प्रसन्न झाले.  बबलू नामक चालकाला बस काढायला सांगितली तर पठ्ठ्या चक्क नाही म्हणाला.  म्हणतो कसा, साहब, ‘इस वातावरण मै गाडी चलाना मुश्कील है’.  त्याचेही बरोबर होते.  आम्हीं पण फार गळ नाही घातली त्याला.  चक्क चालत जंगलात निघालो.  चेकपोस्ट पर्यंत गेलो आणि आमच्या लक्षात आले की ह्या वातावरणात चालतही जाणे मुश्कील आहे.  गपुचूप परत हॉटेल वर आलो आणि बदाम सात खेळत बसलो.  मला २ -३ डाव झाल्यानंतर कंटाळा आला.  मी सगळ्यांना तीन पत्ते खेळा असे सुचविले आणि ज्ञानदा, शुश्रुतला डाव शिकवून खोटे पैसे लावून शेवटी खेळलो.  वंदना, संध्या, किशोर, पूर्वा आणि चैत्या खोटे का होईना खेळले मजा आली.  धमाल केली.  पोरं खुश झाली.
 
२९ मे, तिसरा आणि शेवटचा दिवस.  सकाळी ७ वाजताच नाश्ता करून आम्हीं आंबोलीतून प्रस्थान ठेवले कारण परतीच्या वाटेत कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते.  ठरल्याप्रमाणे दुपारी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.  सोमवार असल्यामुळे तुरळक गर्दी होती.  तरीही १ तास दर्शनास रांगेत उभे राहायला लागले.  पण एक आत्मिक समाधान लाभले देवीचे दर्शन झाल्यावर.  पुढचा बेत तर आधीच ठरलेला होता.  कोल्हापुरात आल्यावर हॉटेल पदमा मध्ये तांबडा पांढरा रस्सा चिकन / मटन थाळी नाही खाल्ली तर मला तरी पाप लागते आणि मी ते पाप लागून घेत नाही.  मनसोक्त जेवलो अगदी चालक बबलू सुद्धा ताव मारून जेवला.  त्याला मी फक्त एकदा विचारले की गाडी चालवतांना झोपणार नाहीस ना !  म्हणजे मनाची खात्री करून घेतली.  पण पठ्ठ्याने एकदम सुरक्षित आणि नियोजित वेळेत आम्हांला अगदी सुखरूप आमच्या घरी पोहोचवले.
 
एक मात्र नक्की सांगतो की आपल्या सह्याद्रीच्या कुशीत अमुल्य असे जैववैविध्य आहे आणि ते जर तुम्हांला अनुभवायचे असेल ना तर, मयुरेश, पूर्वा, चैतन्य, मकरंद, शौरी असे त्याचे गाढे अभ्यासक व त्याचा ध्यास असलेल्या मंडळींबरोबर सहलीला जाणे जास्त संयुक्तिक वाटले.  एक तर आपल्याला निसर्गाचा आनंदही लुटता येतो आणि त्याची अगाध महिमाही ह्या पोरांमुळे अनुभवायला मिळते. माझा तरी असा अनुभव आहे.  तुम्हीं सुद्धा एकदा ह्याची अनुभूती घेऊन पहाच.   
 
एकंदरीत दोन रात्रींची का होईना पण एक छोटीशी कौटुंबिक सहल पार पडल्याचे आत्मिक समाधान मनाला मिळाले व पुन्हा एकदा रोजच्या रामरगाड्यासाठी वाहून घेण्याची उर्जा देवून गेले.  लय भारी वाटलं रावं !
  
रविंद्र कामठे,