Friday 6 January 2023

विणले तर कळतात, कष्ट घरट्याचे

 विणले तर कळतात, कष्ट घरट्याचे

हा माझा लेख थिंक पॉझिटिव्ह ह्या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

हा लेख आपल्याला वाचता यावा यासाठी खाली देत आहे. 

 

 




 

 गेले आठ दिवस झालेत मी दिवसभर माझ्या शयनगृहाच्या खिडकीत ठाण मांडून बसलेलो आहे.  त्याचे कारण ही तसे विशेष आहे. आजवर म्हणजे ५९ वर्षात एवढा निवांतपणा कधी मिळालाच नव्हता.  जशी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे तसा मात्र थोडा निवांत झालो.  नाही म्हणायला लिखाण आणि वाचन चालू आहेच.  मनसोक्त गाणी ऐकणेही चालू आहे.  त्यात माझा आवडत्या किशोर कुमारची गाणी म्हणजे जीव की प्राण.  तसेच ‘चपराक प्रकाशन’च्या कार्यालयात आठवड्यातून दोन तीनदा तरी जाणे ही होतेच आहे.

तुम्ही म्हणाल तुमची ही दिनचर्या आता आम्हालाही पाठ झाली आहे.  उगाच वेळ दवडू नका आणि शयनगृहाच्या खिडकीत बसून कुठले नवे ’पाखरू’ (म्हणजे ???) ते ही ह्या वयात न्याहाळत बसला आहात ते सांगा.  असेही लोकसंगीतात उगाचच म्हणत नाही, “पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!”

माफ करा तुमच्या कल्पनाशक्तीला जरा जास्तच ताण बसलेला दिसतोय !  ते म्हणतात ना, “चोराच्या मनात चांदणे.”  असो.  तुमच्या मनातले ‘पाखरू’ नव्हे तर खरे खुरे एक पाखरू म्हणजे ‘सनबर्ड’ नावाच्या पिटुकल्या पक्षाच्या मादीची आमच्या बागेतल्या लिंबाच्या झाडाच्या एका फांदीवर घरटे बांधण्याची धडपड न्याहाळत बसलोय.  माझ्या हाताच्या अंगठ्या एवढास तिचा तो जीव. पण जगण्यासाठी आणि त्यात निसर्गाचा नियम पाळण्यासाठीची म्हणजे प्रजननासाठीची ही तळमळ पाहून मन थक्क झाले होते.  माणूस सोडला तर सगळेच प्राणी, पक्षी सृष्टीचा नियम अगदी निगुतीने पाळत असतात.  म्हणूनच आपण अजून तरी जिवंत आहोत हे जाणवले.  तेच आपण, विकासाच्या नावाखाली करत असलेली वृक्ष तोड व करत असलेला पर्यावरणाचा ह्रास, कधी एके काळी नंदनवन असलेल्या पुण्याचे वाळवंटात रुपांतर करायला हातभरच लावतो आहोत असे आता मला प्रकर्षाने जाणवायला लागले आहे.  असो.  विषय थोडासा भरकटला...

माझ्या मागे राहणाऱ्या सरांच्या बागेतल्या लिंबाच्या एका फांदीवर जी आमच्या बागेच्या बाजूला वाढली आहे त्या फांदीवर ह्या सनबर्डच्या मादीने घरटे बांधायला एक आठवड्या पासून सुरवात केली आहे.  मला तिच्या दूरदृष्टीची, सचोटीचे, सातत्याचे व कल्पकतेचे फारच कौतुक वाटले.  तिने त्यातल्या त्यात एक चांगली मजबूत फांदी घरट्यासाठी निवडली होती.  त्या फांदीला छोट्या छोट्या दोन उपफांद्या फुटलेल्या होत्या.  तिने मोठ्या फांदीचा आधार घेऊन वरच्या बाजूने घरटे विणायला सुरवात केली होती हे पाहून मला अचंबितच व्हायला झाले.   आठ दिवसांपूर्वी माझे खिडकीतून सहज मागच्या बागेत, मीच ठेवलेल्या पाण्याच्या मातीच्या भांड्याकडे लक्ष गेले व त्याच वेळेस ही सनबर्डची करड्या रंगाची मादीची लिंबाच्या त्या फांदीवर लगबग चालू असलेली दिसली.  मी खिडकीतून बघत असल्यामुळे तिला माझी चाहूल लागली नसावी.  ती तिच्याच नादात घरट्यासाठी दूर कुठून तरी नारळाच्या झाडाच्या झावळीच्या तुसा सारखे अगदी नाजूक व लवचिक काहीतरी घेऊन येत होती. तिला तिच्या त्या इवलुश्या चोचीत एका वेळेस जेवढे आणता येईल तेवढे ती बिचारी ते आणत होती आणि मोठ्या फांदीच्या वरच्या भागावर बसून चक्क गोलाकार पद्धतीने विणत होती.  तिच्या विणण्यातही एक नाजुकशी लकब होती.  जशी एखादी नर्तकी गायकाच्या तानेवर कशी कमरेत लचकत गिरकी घेते ना, अगदी तशी.   एका तुसाला एक दोन आढे घालून ती पुन्हा एकदा उडून जात होती.  पुन्हा एक दोन मिनिटांनी परत तेच.  चोचीत अलगद धरून आणलेले तूस, ती आता फांदीच्या दुसऱ्या बाजूने घेऊन विणायला सुरवात करत होती.  दिवसभर चाललेली तिची ही गडबड न थकता संध्याकाळी ६.३० पर्यंत अर्थात अंधार पडे पर्यंत चालू होती.  तिने आजच्या दिवसभरात मोठ्या फांदीला धरून बाजूच्या दोन लहान फांद्यानाही त्या तुसाने विणत विणत जवळ जवळ दोन ते तीन इंचांचा भाग विणून पूर्ण केला होता.  मी तहान भूक हरपून तिची घरटे विणण्याची ती कला व नजाकत पाहून थक्क झालो होतो.  मला त्याच वेळेस आमच्या लग्नानंतरच्या आयुष्यातील संघर्षाची आठवण झाली.  मी आणि बायकोने असेच एक एक करून दिवसरात्र कष्ट करून आधीचे घर दुरुस्त करून आत्ताचे घर उभे केले होते ते ही एका टप्प्यात शक्य नव्हते म्हणून तीन टप्प्यात पूर्ण केले होते.  आज ह्या पक्षामुळे मला आयुष्यातील ते अविस्मरणीय क्षण आपसूकच आठवले व मन भरून आले.

आजचा दुसरा दिवस. मी सकाळी नेहमीप्रमाणे माझे आवरून झाल्यावर बागेत पक्ष्यांसाठी ठेवलेल्या मातीच्या भांड्यात पाणी भरलेले आहे का ते पाहत होतो.  त्यात जर काही झाडाचा पाला पाचोळा पडला असेल तर ते भांडे स्वच्छ करून त्यात पुन्हा पाणी भरून ठेवायचे, हा माझा नित्यनियम आहे, जो मी गेली २५ वर्षे पाळतो आहे.  उन्हाळ्यात तर जरा जास्तच लक्ष द्यावे लागते.  घरात पंख्याखाली बसूनही आपल्या अंगाची लाहीलाही होत असते, तर ह्या बिचाऱ्या पक्ष्यांची काय हालत होत असेल.  हा नुसता विचार जरी मनात आला तरी अस्वस्थ व्हायला होते. 

आता मी ह्या सनबर्डच्या मादीचे चक्क नामकरण करून टाकले आणि तिला मी हिरोईन म्हणायला सुरवात केली.  अहो तिचे वागणेच मुळी तसेच होते. एक तर ती दरवेळेस आली की चिवचिवाट करतच यायची.  तिची झाडाच्या फांदीवर बसण्याची लकब तर इतकी भारी होती की काही विचारू नका.  तिची घरटे विणण्याची एक वेगळीच अदाकारी मला पाहायला मिळत होती.  आपल्याच नादात ती इतकी गुंग होऊन चिव चिव असे गुणगुणत घरटे विणण्यात गढून गेलेली पाहून मलाच खूप मानसिक आनंद मिळत होता. आपल्यालाही असेच काहीसे करता आले पाहिजे असे वाटत होते. तिच्या सारखे उडता आले पाहिजे, आकाशात मनसोक्त बागडता आले पाहिजे असे वाटत होते.  मला तिचा खूप हेवा वाटत होता.

आपल्या इवल्याश्या चोचीत तिच्या शरीरापेक्षा मोठे तूस अथवा तत्सम काहीतरी असायचे.  त्यात ती आधी आमच्या चिक्कूच्या झाडावर बसून इकडे तिकडे निरीक्षण करायची.  सगळे आलबेल आहे ना ते तपासायची.  तिला काही धोका नाही ना हे पाहायची.  पंख फडकावत ती लिंबाच्या फांदीवर घरट्याच्या जवळ यायची.  त्या फांदीवर बसायची आणि चोचीत आणलेले ते तूस थोडासा विचार करत जिथपर्यंत ते घरटे विणून झाले आहे त्याच्या खालच्या भागात आधी घुसवायची.  त्यानंतर ते पुन्हा एकदा व्यवस्थितपणे दुसऱ्याबाजूने थोडेसे बाहेर काढून आली तशी उडून जायची.  असे तिचे चक्र आता दिवसभर चालू राहणार होते. 

कदाचित माझ्या आयुष्यातील हा निसर्गानुभव पहिलाच असेल. म्हणूनच की काय मला त्याचे जरा जास्तच अप्रूप वाटत होते.  दूरदर्शनवर अथवा डिस्कव्हरीवरील चित्रफित पाहणे वेगळे आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणे हे खूपच वेगळे असते.  खरं सांगू का, मला हे सगळे शब्दांत व्यक्त करणे फार मुश्कील वाटते आहे.  म्हणजे शब्दांच्याही पलीकडले काहीतरी आपल्या डोळ्यासमोर घडते आहे हे पाहून मन अतिशय प्रसन्न झाले होते.   

ह्या हिरोईनने आजच्या दिवसभरात अजून दोन इंच घरटे विणले होते.  आज ह्या घरट्याला तिने बाजूच्या दोन छोट्या फांद्यानाही त्यात सामावून आपल्या घरट्याची रूपरेषाच तयार करून घेतली होती.  तरीही मला अजूनही ती हे घरटे कसे पूर्ण करणार ह्याचा काही केल्या अंदाजच येत नव्हता.  निसर्गाची ही तर फार मोठी कमाल होती.  तिला कोणी शिकवले असेल असे घरटे विणायला ?  चिमटीएवढा तिचा तो जीव.  तिच्या डोक्यात घराचा कुठला आराखडा तयार असेल ?  त्यासाठी लागणारे सामान कुठे, कसे, मिळेल? ते कसे आणायचे ? कोणाकोणाची मदत घ्यायची ? घरात कोणा कोणासाठी कोणती खोली असायला हवी वगैरे अनंत प्रश्न तिला नसतील का भेडसावत ? 

मला तर तिच्या आसपास कोणी शिक्षक, आई बाबा, काका, काकू, मामा, मामी, वास्तुविशारद, कंत्राटदार वगैरे कोणी कोणीच दिसले नाही.  एवढेच कशाला मला तिचा हिरो म्हणजे सनबर्डही अजून तरी दिसला नाही.  तिची एकटीचीच ती धडपड पाहून माझेच मन कासावीस होत होते.  त्यात आमच्याकडे दोन तीन बोके व मांजरी असल्यामुळे थोडी धास्ती होती. पण एक सांगतो.  मला ह्या हिरोईनचे फारच कौतुक करावेसे वाटते.  तिने लिंबाच्या झाडाची अशी काही फांदी निवडली होती की त्या फांदीवर मांजरीही उड्या मारू शकणार नाहीत.  सापांचा तर आमच्या इथे प्रश्नच नाही.  कारण मुंगुस खूपच आहेत. गेलेच तर इतर पक्षी जाऊ शकतील.  परंतु त्याच्यातही थोडी समजदारी असावी, काही नियम असावेत, काही संकेत असावेत.  ज्याने त्याने आपले घरटे आपणच विणायचे असावे.  उगाच दुसऱ्याच्यात लुडबुड करायची नाही.  आपले कर्तृत्व सिद्ध करावे. बहुतेक ते ही त्यांची त्यांची घरटी विणण्याच्या कामात गुंग असावेत. असो. निसर्गाचे नियम हे फक्त प्राणी आणि पक्षी यांनाच लागू आहेत, माणसांना नाहीत हे ह्यावरून सिद्ध होते.

असाच एक एक दिवस पुढे चालला होता.  हिरोईन एकदम तल्लीन होऊन घरटे विणत होती.  आजचा बहुतेक चौथा दिवस असावा.  मध्ये एक दोन दिवस मी फारसे लक्ष दिले नव्हते.  पण आज एकदम अचानक, तुकतुकीत जांभळ्या रंगाच्या सनबर्डला म्हणजे हिरोईनच्या हिरोला त्या घरट्याच्या जवळ पहिले आणि थक्क झालो.  हिरोईनने त्याला आपले घरटे बघायला बोलावले होते.  बहुतेक ती त्याला आकृष्ट करण्यासाठी हे करत असावी.  विणीचा हंगाम चालू होता.  त्याला जर का तीचे हे घरटे पसंत पडले तर तो तिच्याशी नाते जुळवून आपली वंशावळ पुढे वाढवणार होता.  अगाध ही निसर्गाची किमया आणि अगाध हे त्याचे नियम.  अर्थात हे ज्ञान मला माझी मुलगी पृवाकडून मिळाले होते हे सांगायला नकोच.  तिचा ह्या विषयात अभ्यास आहे. असो.

हिरोने घरटे पहिले.  चिवचिवाट केला आणि उडून गेला. असेही ही जोडी आमच्याच घराच्या पुढील बाजूला असलेल्या लवंगीमीरची जास्वंदावर पडीक असते.  म्हणजे ह्या जास्वंदाच्या फुलांमधील मध हे त्यांचे अन्न आहे व ते त्यावरच गुजराण करतात हे मला नंतर कळले.  त्यामुळे ह्या घरट्याचे आपल्याच बागेत असणे किती योग्य आहे हे ही कळले.  म्हणूनच की काय मी आता मागच्या अंगणात दोन बाजूला ही लवंगीमिरची जास्वंदाची रोपे लावून घेतली आहेत.

नाही तर आपण सकाळ झाली की आवरतो आणि दूर कुठे तरी म्हणजे ५०-५० किमी वर ऑफिसला जातो, दिवसभर राब राबतो, संध्याकाळी मरत मरत त्या गाड्यांच्या गर्दीतून आणि प्रदूषणापासून कसा बस जीव वाचवत घरी येतो.  आल्यावर बाहेरचा राग घरच्यांवर आणि हक्काच्या बायकोवर काढतो आणि कुढत कुढत झोपी जातो.  दुसऱ्यादिवशी परत तेच.  असेच आयुष्य कधी उतरणीला लागते तेच कळत नाही.  त्यात घरटे विणायला घेतलेलं असते.  त्यावर कर्जाचा डोंगर असतो.  त्याच्या व्याजापोटी आपण आपली ओढाताण करून घेत असतो.  हप्ते भरता भरता जीव नकोसा होतो.  शेवटी २०-२५ वर्षे हप्ते भरून झाल्यावर आपल्याला कळते की आपण हे जे काही घरटे विणले आहे त्यात रहायला पिल्ले कुठे आहेत.  ती तर मोठी झाल्यावर उडूनच जाणार आहेत, त्यांच्या त्यांच्या अवकाशात.  आणि हो, समजा यदाकदाचित आपली पिल्ले अथवा पिल्लू आपल्या ह्या घरट्यात राहिलेच तर ते आपला सांभाळ करेल की नाही, ह्याची खात्री कुठे आहे ? 

निसर्गाचा नियम काही जरी असला तरी, ह्या माणसांनी बनवलेले त्याच्या त्याच्या सोयीनुसारचे नियम हे अजूनही निसर्गाला सुद्धा कुठे कळले आहेत.  मग शेवटी तो ही एकदिवस आपला सगळा राग काढतो व क्षणार्धात होत्याचे नव्हते करून मोकळा होतो.  तरी माणूस त्यातून काही शिकेल अथवा बोध घेईल असे काही वाटत नाही.  विकासाच्या नावाखाली तो पुन्हा तितक्याच जोमाने उभा राहतो, पुन्हा पडतो.  हे दुष्टचक्र अनादी काळापासून असेच चालू आहे.  थकला भागला जीव शेवटी घरट्यात विसावतो.  तोवर आयुष्यभर खाल्लेल्या खस्तांमुळे त्याला आता विविध व्याधींनी त्रस्त केलेले असते.  नुसता निवारा असून काहीच उपयोग नसतो हे त्याच्या जरा उशीरच लक्षात आलेले असते.  पण तोवर वेळ निघून गेलेली असते. आपले पक्षी किंवा प्राण्यांसारखे नसते हे कळायला थोडा उशीरच झालेला असतो. मग आपण नियतीला किंवा नशिबाला दोष देत बसतो.  त्याचे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे, निसर्गाने माणसाला दिलेले मन व विचार करायला दिलेला मेंदू आणि त्या मेंदूत घातलेले विकासाचे अथवा भौतिक सुखाचे किडे हे होय.  असो.  थोडे विषयांतर झाले त्याबद्दल क्षमत्स्व.

आता हिरोईनच्या घरट्याला चांगलेच रंगरूप आले होते.  शंखासारखा आकार आलेला होता. तिचे काम अतिशय तन्मयतेने व अविरतपणे चालूच होते.  आता मी थोडे जवळ जाऊन निरखून पहिले तर तिने घरट्याला बाहेरच्या बाजून थोडेसे प्लास्टीक व फोमचे तुकडे लावलेले दिसले.  हे पाहून मला तर काहीच कळेना की हिने हे असे का केले असेल.  तिला आमच्या बाजूच्या घराचे काम चालू आहे तिथून हे सामान मिळाले असणार असे वाटले.  पण तिने प्लास्टिक का वापरावे हेच काही कळले नाही.  अर्थात ते काही फार प्रमाणात नव्हते तरीही तिने ते आतून न वापरता घरट्याला बाहेरून वापरले होते त्याचे जास्त आश्चर्य वाटत होते.  कदाचित, पावसापाण्यापासून संरक्षण करण्याची तिला निसर्गानेच बुद्धी दिली असावी.  त्यानंतर मलाच राहवले नाही म्हणून मी, नारळाच्या झावळीचा एका भाग आमच्या घराच्या बागेत आणून ठेवला.  मला आपले उगाचच वाटले की, तिला कदाचित त्याचा उपयोग होईल.  घराला मजबुती देण्यासाठी.  उगाचच माझे मन तिला मदत करायला पुढे धावले.  आपण नाही का आपल्या पोरांना मदत करत तशी.  पण हा निसर्ग आहे.  त्याचे नियम फारच वेगळे आहेत.  इथे “दे रे हरी खाटल्यावरी” असे काही नसते हे मला कधी कळले, जेंव्हा तिने मी ठेवलेल्या झावळी कडे ढुंकूनही पहिले नाही, तेव्हा.  मग मला माझी चूक कळली, की आपल्या आगंतुक भावनेला इथे अजिबात थारा नाही.  त्यात हिरोईनचे काहीच चुकलेले नव्हते.  माझेच चुकले होते !

आता हिरोईनचे घर चांगलेच आकाराला आले होते.  तिने आता घराला एक छान प्रवेशद्वार बनवले होते.  त्यात आत जाऊन ती ढूसक्या मारून मारून ते बाहेरच्या बाजूला फुगवत होती.  त्याचे कारणही तसेच होते.  तिचे घरटे थोडेसे निमुळते झाले होते.  म्हणजे मला, जरा शंका आली की, आतमध्ये ती कशी काय बसू शकेल.  त्यात जर तिला अंडी घालून ती उबवायची असतील तर?  तिचे कसे होणार.  मला की नाही जरा जास्तच घाई झालेली होती हे सगळे समजून घ्यायला.  हिरोईन तिच्या पद्धतीने घरट्याचे काम अगदी सराईतपणे करत होती.  पुन्हा एकदा मला खूप प्रश्न पडले होते.  पण मी ते मनातच ठेवले.  हिरोईनने आजच्या दिवसांत तिच्या घरट्यात तिला स्वत:ला अगदी व्यवस्थितपणे जाता येईल व पुन्हा परत बाहेर येता येईल एवढी जागा करून घेतली होती.  आणि हो, तिच्या ह्या ढूसक्या मारण्याच्या प्रयत्नात तिचे घरटे अजिबात हलले नव्हते की फांदीवरून निसटलेही नव्हते.  थोडक्यात काय, तर हिरोईन तिच्या घरट्यातील जागा करतांना त्याची मजबुती तपासून पाहत होती.  अचंबित करणारे होते हे सगळे माझ्यासाठी. मला राहवले नाही त्यामुळे सूर्यास्तानंतर हिरोईन निघून गेल्यावर त्या घरट्याच्या अगदी जवळ जाऊन तपासून पाहिल्यावर तर मी आश्चर्यचकितच झालो.  हिरोईनने अतिशय सुबकपणे तिच्या घरट्यातील जागा बनवली होती.  त्याची खोली, उंची, दाराची उंची, दारातून आत येणारी हवा, घरट्यात आगंतुक पाहुणे येऊ नये याची घेतली गेलेली काळजी.  तसेच तिच्या अंड्यांची व नंतर होणाऱ्या पिल्लाची सुरक्षेच्या दुर्ष्टीने केलेला विचार पाहून माझी हाताची दहाही बोटे तोंडात गेली होती.  आपल्याकडे वास्तुविशारद जेवढा विचार करतो ना त्याही पुढील विचार तिने एकटीने करून तिच्या मनातील घरटे स्वत:च्या चोचीने विणले होते.

बहुतेक सहा दिवस झाले असतील तिने घरटे विणायला घेऊन.  आज सकाळी पाहिले तर, हिरोईनने तिच्या घरट्याच्या प्रवेशद्वारावर चक्क सज्जा विणायला घेतला होता.  ५० प्रतिशत काम सकाळी सकाळी पूर्णही झालेले होते.  मला तिच्या ह्या सुपीक डोक्याचे फारच कौतुक वाटले.  आपण नाही का, पावसाचे पाणी खिडकीतून अथवा दारातून आत येऊ नये म्हणून सज्जा तयार करतो, अगदी तसाच हुबेहूब सज्जा तिने विणला होता.  मी तर हिरोईनच्या प्रेमातच पडलो होतो.   तिचे कौतुक करताना माझे मन फारच हळवे होत होते, हे मला आणि बायकोलाही जाणवत होते.  त्यात गेले दोन दिवस पावसाळी हवा होती.  प्रंचंड उकाडा होता.  तापमान ३९ अंशावर गलेले होते.  मला आता जर का पाउस पडला तर हिरोईनचे कष्ट वाया जाणार की काय ह्या विचारानेच कसेतरी होत होते.  मी बायकोला म्हणालोही की, मी तिचे घरटे ज्या फांदीवर आहे ती फांदी थोडीशी आपल्या पत्र्याच्या खाली घेऊ का, म्हणजे जरी पाउस आला तरी तिचे घरटे पावसात भिजणार नाही.  बायको म्हणाली, असला काही उद्योग करू नकोस. तिला जर का ते समजले आणि असुरक्षित वाटले तर ती पुन्हा येणार नाही.  जे व्हायचे असेल ते होईदेत.  निसर्ग तिला बरोबर योग्य वेळी योग्य ती दीक्षा देईल.   उगाच भावनेच्या भरात तिच्या कामात अडथळा आणू नकोस.  तिचे ही बरोबर होते.  हिरोईनने जर माझ्यामुळे घरटे विणायचे काम अर्धवट टाकले तर मला जास्त त्रास झाला असता.  शेवटी निसर्ग आहे, तो घेईल तिची काळजी असे म्हणून मी स्वत:ची समजूत काढून थोडा आडवा पडलो होतो.  तेवढ्यात, हिरोईनचा हिरो सनबर्ड आज पुन्हा एकदा हे जवळजवळ पूर्ण झालेले घरटे पाहायला आला होता.  त्या दोघांचा तो चिवचिवाट माझ्या कानावर आला. मी तटकन उठून खिडकीतून पाहिले आणि वेडाच झालो.

हिरोईनचा हिरो चक्क तिच्या घरट्यात आत घुसून तिचे घरटे पाहत होता.  ती बाजूच्याच फांदीवर बसून त्याच्याकडे एकटक पाहत होती.  मला काय बोलावे हेच कळत नव्हते.  ह्या मुक्या प्राण्यांच्या/पक्षांच्या एकमेकांवरील विश्वासाला, आपुलकीला, कौतुकाला, स्नेहाला, प्रेमाला, जिव्हाळ्याला, त्यांच्यातील त्या बंधनाला काय म्हणावे हेच तर सुचत नव्हते.  हिरोला, तिचे घरटे आवडेल असेल का?  त्याने तिला होकार दिला असेल का? तो तिच्याशी संसार करेल का? त्यांना पिल्ले होतील का? एक नाही शंभर प्रश्नांनी माझ्या डोक्यात नुसता गोंधळ घातला होता.  मी मनातल्या मनात विचार करून करून थकलो होतो.  माणूस म्हणून मी स्वत:ला खूप भारी, विचारवंत, बुद्धिवंत भाग्यवंत समजत होतो.  पण गेले आठ दिवस ह्या हिरोईनने माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला होता.  इतकी सकारात्मकता तिने माझ्या मनात भरली होती की काही विचारू नका.

दोन तीन तास झाले तरी हिरोईन काही घरट्याकडे आली नाही.  मला आता काळजी वाटू लागली होती.  बहुतेक हिरोने घरटे नाकारले असावे.  मला उगाचच उदास वाटायला लागले होते.  आणि काय आश्चर्य, लांबून मला तिचा तो नेहमीचा चिवचिवाट ऐकायला आला आणि माझाच जीव भांड्यात पडला.  हिरोईन आज खूपच खुशीत दिसत होती.  तिच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.  ती मस्त गुणगुणत होती.  तिच्या हिरोने तिला होकार दिल्यामुळे तिच्यातला उत्साहाला उधाण  आले होते.  ती ह्या झाडावरून त्या झाडावर मनसोक्तपणे बागडत होती.  तिच्या सवंगड्यांना चिवचिवाट  करून सांगत होती हे अगदी स्पष्टपणे जाणवत होते.  तिची स्वत:शीच चाललेल्या संभाषणाची भाषा मला आताशा कळायला लागलेली होती.  आपल्यालाही असा स्वत:शी संवाद साधता आला पाहिजे असे राहून राहून वाटत होते.   

आता तर हिरोईनने घरट्यातल्या आतल्या बाजूच्यासाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळांसाठी थोडेसे ओले गवत आणून नीटपणे ठेवायला सुरवात केली होती.  तिला माहित असणार की हे ओले गवत काही फार काळ ओले राहणार नाही.  तरीही ते घरट्यात वाळेल तेंव्हा ते तिच्या अंड्यांसाठी व नंतर त्यातून बाहेर येणाऱ्या लेकरांसाठी उपयुक्त असणार.  मला तर हिरोईनचे खूपच कौतुक वाटत होते.  तिची दूरदृष्टी तर वाखाणण्याजोगीच होती.  तिला तिचा भविष्यकाळ नीट व सुखाचा जावा असे वाटत असेल तर आत्ता वर्तमानात कष्ट करायला हवेत हे समजत होते.  निसर्गनियमाने तिला दिलेला आयुष्याचा जो काही काळ असेल तो ती कुठलाही ताण न येऊ देता अतिशय सुखासमाधानाने, कष्टाने, आत्मविश्वासाने, निगुतीने, सचोटीने, सातत्याने, प्रामाणिकतेने, जोडीदारावरील विश्वासाने, आदराने, मायेने व्यतीत करण्यास कटिबद्ध दिसत होती.  त्यात मला तरी कुठेही, हेवेदावे, कुचेष्टा, द्वेष, अपमान, भय, कचकच, तकतक, भांडण, तंटा, मत्सर, घृणा दिसली नाही. कदाचित हे काय ते निसर्गाचे वरदान असावे जे माणसाला त्या मानाने फार कमी वेळा लाभते. अर्थात हे ज्याच्या त्याच्या संचिताचा किंवा प्रारब्धाचा भाग असावा. असो.  पुन्हा एकदा भरकटलो बघा.  काय करणार, विषयच असा आहे की, अधूनमधून भरकटत जायला होतेच.

 हिरोने हिरोईनला होकार तर दिला होताच, पण बहुतेक तिला अपेक्षित असलेला तो हवाहवासा वाटणारा सहवास ही दिला होता, जो तिला तिच्या पिल्लांना जन्माला घालण्यासाठी उपयोगी पडणार होता.  मला आता हिरोईनचा हा संसार फुलताना पहायचा होता.  त्यासाठी मी मागच्या बाजूच्या बागेतही मिरचीजास्वंदाची रोपे लावून घेतली होती.  पुढील वर्षी मला अशा एक नव्हे तर दोन चार हिरोईन त्यावर बागडताना पहायच्या होत्या.

आपणही ह्या सृष्टीचा एक भाग आहोत, जसे हे हिरो-हिरोईन आहेत.  त्यांना जगण्याची रीत भात कळली व त्यांनी त्यांचे ते छोटेसे आयुष्य आनंदी व समाधानी केले.  आपण तर समजूतदार माणसे आहोत.  चला आपणही आपले हे आयुष्य आनंदी व समाधानी करू.  फार काही करायला नाही लागत त्यासाठी.  फक्त थोडासा समजूतदारपणा, खिलाडूवृत्ती, एकेमेकांवरील विश्वास, स्नेह, प्रेम, जिव्हाळा, तडजोड करण्याची वृत्ती, वेळ पडली तर त्याग करायची प्रवृत्ती, इमानदारी, परिस्थितीची जाणीव आणि उणीवांवर मात करण्याची इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आयुष्याकडे नैसर्गिकरीत्या पाहण्याची प्रगल्भता.

“देवाची करणी आणि नारळात पाणी” ह्या म्हणीचा खरा अर्थ मला उमगला होता आणि आपसूकच म्हणावेसे वाटले की, 

“विणले तर कळतात, कष्ट घरट्याचे,

कळते परंतु वळत नाही,

हेच तर गमक आहे हृदयाचे”


रवींद्र कामठे