Wednesday 1 November 2023

‘हसू’ आणि ‘आसू’

 ‘हसू’ आणि ‘आसू’






‘हसू’ आणि ‘आसू’ ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत.  तसेच त्या आपल्या सुखी आणि समाधानी जीवनाच्याही दोन मूलभूत गरजाही आहेत.  आईच्या उदरातून बाळ जेव्हा जन्माला येते तेच मुळी रडत रडतच.  अर्थात जर का बाळ रडले नाही तर डॉक्टर अथवा परिचारिका त्याला उलटे करून पाठीवर हलकेसे थोपटून किंवा तोंडात हवा भरून त्याला रडायला लावतात.  त्याचे कारण हेच की बाळ जर जन्मतःच रडले नाहीत तर श्वास कोंडून त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो.  हा निसर्गाचा नियम आहे व त्याचा उद्देश आईच्या उदरातून नऊ महिने नऊ दिवस जे काही ब्रम्हांड बाळाने पाहिलेले असते, अनुभवलेले असते त्याचा जल्लोष म्हणजे बाळाचे रडणे होय.  एवढे निरामय रडणे माणसाच्या आयुष्यात परत कधी येतच नाही.

आपल्या आईने आपल्यासाठी नऊ महिने ज्याकाही खस्ता खाल्लेल्या असतात त्यासाठी आईच्या उदरातून बाहेर आल्याबरोबर तिच्या देहामासाच्या ह्या गोळ्यात निसर्गाने जीव भरला आहे ह्याची जाणीव करून आईचे उपकार मानण्याची नियतीची ही आगळीवेगळी पद्धत असावी.  त्यानंतर डॉक्टर बाळाला एका दुपट्यात गुंडाळून प्रसववेदनेने थकलेल्या परंतु बाळाला छातीशी कवटाळून घेण्यासाठी कासावीस झालेल्या त्याच्या आईच्या कुशीत जेव्हा देतात ना, तेव्हा नुकताच जन्मलेला जीवही, (ज्याची अजून नाळही तुटलेली नसते), आईच्या पहिल्या स्पर्शाने जो काही शांत होतो आणि गालातल्या गालात असा काही गोड हसतो ना (जे फक्त त्याला जन्म दिलेल्या आईलाच ऐकायला जाते)  ते हसणे म्हणजे बाळाने आईला दिलेला तिच्या आयुष्यातला सर्वोच्च सुखद क्षण!  मातृवाचे दान तिच्या पदरात टाकून तिला उपकृत केल्याची ही नांदी असते.

            आपले हे जे काही पहिले रडणे आहे ते मुळातच रडणे नसून आपल्या ह्या पृथ्वीतलावरील अस्तित्वाची जाणीव आहे असे मला वाटते.  त्यानंतर आपले जे काही आयुष्य सुरु होते त्यात आपले बालपण अगदी आनंदात पार पडते.  आई बाबांच्या, आप्तेष्टांच्या मायेच्या सावलीत, शाळेतल्या मास्तरांच्या मार्गदर्शनात आपण कधी लहानाचे मोठे होते तेच मुळी आपल्याला कळत नाही.  हळूहळू बाल्यावस्था संपून आपण कुमारवस्थेत जातो आणि तिथून पुढे आपल्या आवडी निवडी बदलत जातात.  आजूबाजूच्या परिस्थितीचा, वातावरणाचा आपल्या जडणघडणीवर चांगला वाईट परिणाम होत जातो. 

ह्या सगळ्यातून आपण बाळाचे कुमार कधी होतो तेच आपल्या लक्षात येत नाही.  आपण तारुण्यात प्रवेश करतो आणि तिथेच आपल्यातील निरागसता एकदम लुप्त व्हायला लागते.  आपल्याला नको नको तेही कळायला लागते. जे कळायला हवे ते कळत असते पण, आपल्यातील अहं भाव उफाळून यायला सुरवात होते आणि कळूनही आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत.  एकंदरीत काय तर कळत नकळत आपण एका तणावपूर्ण वातावरणात आपसूकच प्रवेश करतो.  काय चांगले, काय वाईट, आपल्या हिताचे काय, काय चूक, काय बरोबर, हे सुद्धा कळत नाही आणि कळले तरी वळत नाही.  आईबाबा व इतर थोरामोठ्यांचा राग यायला सुरवात होते. मित्र जास्त जवळचे वाटू लागतात.  सर्वसाधारणपणे आपण आपल्याही नकळत भरकट जातो.

            ह्या नादात आपण आपल्या आयुष्यातील काही मोलाचे क्षण घालवलेले असतात.  ते फार उशिरा कळतात.  वय वाढत जाते तसतसे आपल्या आयुष्यातील समस्या वाढत जातात.  आपल्या मनावर ह्या सगळ्याचे दूरगामी परिणाम होत असतात हे आपल्याला फार उशिरा उमगते.  पण जेव्हा उमगते तेव्हा उशीर झालेला असतो.  ह्या सगळ्यासाठी आपल्या शालेय जीवनात आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण मिळणे हे खूप गरजेचे असते.  वास्तविक पाहता बालपणातच आयुष्याचा पाया मजबूत होत असतो आणि नेमके त्याच वेळेस मन चंचलही झालेले असते, हेकेखोर होते व गर्विष्ठही होते. आयुष्यातली ही फार नाजूक अवस्था आहे.  कळत नकळत आपल्यातील अहंकार जागा होतो व तो आपला सर्वात मोठा वैरी आहे हे कळायला कधीकधी संपूर्ण आयुष्य जाते.  ह्या सगळ्यात जे कोणी आपल्यातील दुर्गुण ओळखून स्वत:वरील सदगुणांवर लक्ष देऊन त्यावर काम करून चांगल्या संस्कारांचा, विचारांचा उपयोग आचरणात आणतात ते पुढे आयुष्यभर सुखी समाधानी रहातात व इतरांनाही सुखी ठेवतात.

            हे एवढे प्रास्ताविक करण्याची मुळात गरज काय !  ह्या मागील एक अतिशय महत्वाचे कारण म्हणजे, आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन किती सूक्ष्म आहे हे पदोपदी जाणवत राहते.  मी गेली काही वर्षे पाहतो आहे की माणूस प्रगतीच्या आणि विकासाच्या नावाखाली स्वत:ची फारच ओढाताण करतो आहे.  त्यात भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्या आयुष्याची होळी करतो आहे.  अर्थात ह्यात त्याची एकट्याची फरफट होत नाही तर त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाची फरफट होत असते हे त्याला कळतच नाही.  ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काही कारण नसताना एक प्रकारचे तणावपूर्ण आयुष्य तो जगत राहतो.

            आपल्या जीवनात ‘हासू’ आणायचे असेल तर आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मकच ठेवला पाहिजे. आता सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे काय तर, आयुष्यात जेवढे चांगले असेल तेवढेच स्वीकारावे अथवा अंगीकारावे आणि वाईट तेवढे सोडून द्यावे.  राग, लोभ, द्वेष, हव्यास, घृणा, तिटकारा इत्यादी दुर्गुणांपासून लांबच राहावे.  दुसऱ्याचे नेहमी चांगलेच चिंतावे.  त्याबरोबर आपलेही चांगलेच होते.  सतत चांगले विचार जर का मनात घोळत असतील तर तुमच्या चेहऱ्यावर कायम ‘हासू’च राहील.  तुमच्या चिंता कमी होतील.  ज्याचा परिणाम तुमच्या मनाला सतत सकारात्मक विचारांचीच रेलचेल लाभेल.  सतत पैसा पैसा करून जिवाचे, मनाचे आणि तनाचे हाल करू नयेत.  ‘जरुरी पेक्षा जास्त आणि आपल्या प्राक्तनात लिहिलेल्यापेक्षा कमी काहीच मिळत नाही.’  त्यामुळे उगाच जिवाची ओढाताण करून आयुष्य वाया घालवू नये.  आपल्या संत साहित्यात ह्या विषयात खूप काही लिहून ठेवले आहे, जे अगदी आपल्या कळत्या वयापासून जर का आपण अमलात आणले तर आपल्या आयुष्यातील ‘हसू’ कायम राहून ‘आसू’ ढाळायची वेळच यणार नाही. हे मी स्वानुभवावरून सांगतो आहे. 

            स्वार्थातूनही परमार्थ साधण्याची कला अवगत करा.  जीवन खूप सुखकर होईल.  आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन जेवढा सकारात्मक असेल तेवढे तुमच्या आयुष्यातील ‘हसू’चे प्रमाण जास्त राहील आणि ‘आसू’चे प्रमाण नगण्य राहील.  अर्थात सगळेच ‘आसू’, काही नकारात्मक नसतात.  काही ‘आसू’ हे आनंदाश्रू म्हणून अपवाद आहेतच की !  आयुष्यातील ह्या आनंदाश्रूचे प्रमाण तुमच्या सकारात्मकतेवर अवलंबून आहे.

            मंडळी हसणारी व्यक्तीच सर्वांना प्रिय असते त्याचे कारणही अगदी नैसर्गिक आहे.  हसण्यात एक प्रकारची उर्जा भरलेली असते, जी आपल्याला नवचैतन्य देऊन जाते.  नवजात शिशु प्रमाणे निरागस ‘हसू’ हे सुद्धा आयुष्याच्या एका टप्प्यावर जर का तुम्हाला आणता आले तर तुमच्या एवढा सुखी आणि समाधानी कोणीही नाही.  मी जेव्हा बाळाचे निरागस ‘हसू’ आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा असे म्हणतो, तेव्हा त्याचे कारणही तसेच आहे.  नवजात बाळा इतके निरागस व्हा असे मला म्हणायचे आहे. प्रयत्न तर करून पहा. जमेल ! तान्ह्या बाळाला तरी कुठे माहिती असतात, हेवे दावे, राग लोभ, द्वेष, अहंकार, गर्व, इत्यादी.  त्याची ही निरागसता जर का आपल्याला अनुभवायाची असेल तर त्या दृष्टीने वाटचाल करून चांगले तेवढेच स्वीकारा आणि वाईट अव्हेरा. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेल ही गळे,”  ही अवस्था तुम्हाला ह्या निरागस ‘हसू’चा लाभ नक्की मिळवून देईल आणि त्यावेळेस तुमच्या डोळ्यात जे ‘आसू’ असतील ते तुमच्या आयुष्याचे सार्थक झाल्याची पावती असेल.

            आजच्या आपल्या ह्या धकाधकीच्या काळात, ताण तणावात आपण आपले ‘हसू’ विसरलोच आहोत असे वाटते.  ‘आसू’ मात्र आपल्या संगतीला कायमच असतात.  अर्थात हे चित्र बदलणे सर्वस्वी आपल्याच हातात आहे.  अगदी शक्य असेल तिथे व शक्य असेल त्यांनी तर हास्य क्लब संस्थेत जाऊनही, आपली विसरलेली अथवा हरवलेली हास्यकला पुन्हा प्राप्त करून घेण्यास काहीच हरकत नाही. ह्या संस्थांनी खास करून ज्येष्ठांच्या आयुष्यात तर खूपच सकारात्मक बदल घडवून आणले आहेत हे नक्की.

आयुष्याच्या उतरणीला लागला असाल तर शक्य तेवढे आनंदी राहा.  हसण्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी राहू शकता हे त्रिकालाबाधित सत्य आहे.  आयुष्याची उजळणी करताना आयुष्यात मागे वळून पाहताना जे काही करायचे राहून गेले असेल असे वाटत असेल व आता जर ते करणे शक्य असेल तर तसा प्रयत्न जरूर करून पहा.  कुठे ना कुठे तरी हरवलेली, सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली सापडून जाते आणि उर्वरित आयुष्य सुखात घालवते.  

“हसाल तर असाल”, असे म्हणलो तरी काहीच हरकत नाही. माझ्या कवितेच्या ओळी मला ह्या निमित्ताने फारच समर्पक वाटतात,

आयुष्य इतकंही सोपं नसतं, जितकं आपल्याला दिसत असतं,
आयुष्य इतकंही अवघड नसतं, जितकं आपण करून ठेवलेलं असतं...

            मंडळी मी नुकताच वयाच्या साठीत प्रवेश केला आहे.  गेले तीन वर्षे झाली मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन उर्वरित आयुष्याचा सकारात्मकतेने आनंद घेतो आहे.  मला पन्नाशीत माझ्यातील कवी सापडला व पुढे ह्याच कवीने माझ्यातील लेखकाला जन्म दिला.  मला माझ्या सुखी, समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली जरा उशीराच पण पन्नाशीत मिळाली, पण कुलूप मात्र वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी सापडले.  उशिरा का होईना मला कुलूपही मिळाले आणि अजिबात वेळ न दवडता मला सापडलेल्या गुरुकिल्लीचा उपयोग करून माझा साहित्य क्षेत्रातील प्रवास सुरु करून मी नव्या उमेदीने आयुष्याची वाटचाल करायला सुरवात केली आहे.  ह्याचा परिणाम असा झाला की, नुकतीच माझी सातवी साहित्यसंपदा “अनोख्या रेशिमगाठी” ही कादंबरीही प्रकाशित झाली. मला माझेच हे उदाहरण द्यावेसे वाटले त्याचे कारण म्हणजे, वर नमूद केलेल्या सगळ्यात अनुभवातून मी गेलेलो आहे.  आयुष्याच्या भट्टीत तावून सुलाखून निघालो आहे.  माझे हे अनुभव जर का तुमच्यात थोडीफार सकारात्मकता जागृत करण्यासाठी उपयोगी पडली, तरी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटेल.

          कधी स्वत:वर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले,
          इतकी आसवे ओघळीत की, आसवांनाही रडू आले....

            जगण्यासाठी ‘हसू’ आणि ‘आसू’ दोन्ही तितकेच जरुरी असतात.  पण त्याचे योग्य ते प्रमाण आणि उपयुक्तता ही आयुष्याला आकार देण्यासाठी गरजेची वाटतात. एक आहे की दुसऱ्याच्या हरण्यावर ‘हासू’ नका आणि स्वत:च्या दु:खावर ‘आसू’ गाळत बसू नका.  ह्या जगात आनंद आणि समाधान कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळत नाही.  ते विकतही घेता येत नाही.  ते आपण आपल्या कर्तृत्वाने आणि सिद्धीने मिळवायचे असते हेच काय ते सत्य आहे.

‘हसू’ने अहंकार जागृत होऊ देऊ नका आणि ‘आसू’ ने नकारात्मकता.  जशा रक्तात लाल पेशींची गरज असते तशीच पांढऱ्या पेशींचीही गरज असते हे लक्षात असू द्या. दोन्ही पेशींचे प्रमाण ठरलेले आहे व त्याचे योग्य व अयोग्य प्रमाण आपल्या तब्बेतीवर परिणाम अथवा दुष्परिणाम करतात, तसेच ‘हसू’ आणि ‘आसू’ चे ही आहे.  त्यामुळे एका डोळ्यात ‘हसू’ असेल तर दुसऱ्या डोळ्यात ‘आसू’ ही ठेवा. ज्याला ह्या दोन्हीचा ताळमेळ साधता येतो तो आयुष्यात कधीच दु:खी कष्टी राहत नाही.

‘संवेदनशील ‘हसू’ आणि कृतीशील ‘आसू’ ही समृध्द जगण्याची रीत आहे.’  एक लक्षात ठेवा, अती ‘आसू’ तुमचे ‘हसू’ करते.  तसेच अती ‘हसू’चे शेवटी ‘आसू’त रुपांतर होते.  आपल्या आजूबाजूला सगळीकडे नकारात्मकता इतकी ठासून भरलेली आहे की तुमच्यातली सगळी शक्ती त्याच्याशी लढण्यातच वाया जाते.  त्यामुळेच नकारात्मकतेला सकारात्मकतेने सामोरे जा.  ‘तुमचे ‘हसू’ हीच तुमची शक्ती आहे आणि ‘आसू’त तुमची भक्ती आहे.’


रवींद्र कामठे.
(रवींद्र कामठे यांची 'तारेवरची कसरत', 'अनोख्या रेशीमगाठी', '' आदी पुस्तके 'चपराक'ने प्रकाशित केली आहेत.)
हा लेख साहित्य चपराक, दिवाळी अंक २०२३ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.