Tuesday 7 March 2023

तळजाई वनातली ती सांजवेळ

तळजाई वनातली ती सांजवेळ










तळजाई वनातली ती सांजवेळ https://ravindrakamthe.blogspot.com/2023/03
अहाहा...
आजची (मंगळवार, ७ मार्च २०२३) तळजाई वनातली ती सांजवेळ केवळ अविस्मरणीय अशीच म्हणावी लागेल. कालच होळी झालेली. त्यामुळे वातावरण थोडेसे तप्तच होते. परंतू अवकाळी पावसाचे सावटही होते. ऐन होळीच्या वेळेस संध्याकाळी पुणे शहरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला होताच. अजून दोन तीन दिवस तो येईल असा हवामान खात्याचा अंदाजही होता. तसा तो काल आलाही. आजकाल हवामान खात्याचे अंदाज खरे ठरायला लागलेत बुवा !
आज सगळीकडे तरुणाईची धुलवडीच्या नावाखाली रंगपंचमीची खेळण्याची लगबग होती. हवेत थोडासा उकाडा होता. तीनसाडेतीनलाच वातावरण थोडेसे ढगाळ व्हायला लागले होते. मी, वाघबकरी’ चहाचे घुटके घेत विचार करत होतो की, आज संध्याकाळी पावसाने घोळ घालायच्या आत आपली तळजाईची रतीबाची पायपीट उरकून घ्यावी. म्हणजे उगाच खाडा नको. "आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास" असे व्हायला नको, मनातल्या मनात असे घोकत घोकत जायच्या तयारीला लागलो. त्याचं काय आहे, सकारात्मक विचार केला की सगळे कसे मनासारखे घडते !
बरोबर चारला म्हणजे रोजच्यापेक्षा पाऊण तास आधीच तळजाईला जायला निघालो. अर्थातच बायको घरी नसल्यामुळे गपगुमान चारचाकी काढली. एका दृष्टीने पाऊस आला तरी वांधे होणार नव्हते. जय्यत तयारीनीशी म्हणजे पावसात भिजू नये व चिखल उडू नये म्हणून अर्धी विजार (हाफपँट) घातली. खास चालण्यासाठीचे घेतलेले बूटही थोडेसे भीतभीतच घातले. पावासात भिजले तर काय ह्या काळजीपोटी हो ! पैशाचे पाकीट आणि भ्रमणध्वनी एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून विजारीच्या खिशात कोंबला. कानात कापसाचे बोळे कोंबले (हो मला थंड हवेचा त्रास होतो म्हणून काळजी घ्यावी लागते). डोक्यावर बफ अर्थात टोपडे चढवले (टक्कलही झाकले जाते आणि थंडीपासून संरक्षणही होते). रोजची २०० मिलीची खिशात मावणारी प्लास्टिकची पाण्याची बाटली (हो पाण्याचीच) घेतली, उगाच शंका नको. "ती" सोडून आता सहा वर्षे झालेत. न विसरता छोटी छत्री घेतली, जी माझे पावसापासून बचाव करणार होती. तोंडाला मास्कही न विसरता लावला.
तुम्हाला वाटेल मी काही युध्दाला वगैरे निघालो की काय ! पण त्याचं काय आहे मंडळी, ह्या जगात आपणच आपली काळजी घ्यायची असते. कारण सर्दी, पडसे, ताप, मनस्ताप वगैरे वगैरे जर काही झालेच तर आपले शरीरभोग आपल्याच भोगावे लागतात की नाही ! म्हणून हा सगळा जामानिमा करुन ‘कामठे’ सरदार तळजाईच्या वनात रोजची अडीच किलोमीटरची पायपीट करायला निघाले होते. होय मी गेले दोन महिने झाले अगदी नित्यनेमाने तळजाई वनात जातो आहे. तेवढाच चालण्याचा व्यायामही होतो व जरासे मोकळ्या हवेत फिरल्याचे समाधानही लाभते. त्याचं काय आहे, पूर्व तयारीनीशी केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही.
वाटेत तळजाई वसाहतीमधून जावे लागते त्या रस्त्यावर तिथली पोरं-पोरी, कुठल्याशा पांढऱ्या शुभ्र पावडरीने धुलवड खेळत होते. पोत्याने ती पावडर आणलेली होती त्यात ही पोरे रस्त्याच्या मधोमध वाहनांना अडवून ती पावडर अंगावर टाकत होते. माझ्या तर काळजाचा ठोकाचं चुकला होता. मला धुळीची व रंगाची अॕलर्जी आहे. असो. नशिबाने मी गाडीत होतो व नेहमीप्रमाणे काचा बंद होत्या म्हणून वाचलो. तरी पोरांनी गाडीवर ती पावडर उधळीच. मी हाॕर्न वाजवून निषेध नोंदवला व बाजूला व्हायला सांगितल्यावर त्यांच्यातल्या एका सुज्ञ मुलाने माझ्या गाडीला वाट करुन दिली. फार काही गडबड न होता सुटलो एकदाचा. हुश्श झाले. पण पुढे अशीच भरपूर रंगलेली भुते-भुतीणी दुचाकीवरुन बागडत होते. काही टोळक्यांनी तर तळजाईच्या गेट बाहेरही धुळवडीचा खेळ मांडलेला होता. परंतू ते बाकी कोणाला त्रास देत नव्हते हे एक बरं होते.
ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, बिचकतं बिचकतंच बरोबर चार वाजून पाच मिनिटांनी मी तळजाई वनाच्या फाटकातून आत प्रवेश केला आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरवात झाली. हवामान खात्याचा अंदाज बरोबर निघाला होता आणि पूर्वतयारीनिशी आल्यामुळे मी ही थोडा सुखावलो होतो.
वादळाने आधीच सुरु असलेल्या पानगळतीला उधाण आले होते. मळलेल्या वाटांवर पानांचा खच पडत होता. पन्नास मीटर पुढे गेलो असेल नसेल, तेवढ्यात ढगांचा प्रचंड गडगडाट सुरु झाला, विजांचाही कडकडाट सुरु झाला. विजा तर अशा चमकत होत्या की अंगावर पडते की काय अशी भीती वाटत होती. आज सणाची सुट्टी असल्यामुळे काही कुटुंबेही आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन आलेली होती. त्यांची थोडी घाबरगुंडीच उडाली होती. अशा वातावरणात एकदम धुवांधार पावसाला सुरवात झाली.
सुरवातीला तळजाईच्या वनातल्या पानगळतीवर पडणाऱ्या पावसाने एक वेगळाच कुंद दर्प पसरला होता. त्यात अंधारुन आल्यामुळे व अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे एक फुटावरीलही काही दिसत नव्हते. अशातच मी छत्री काढली व तसाच पुढे चालू लागलो. थोडा पुढे गेल्यावर वनात नवखे असलेले एक कुटुंब घाबरुन आसरा शोधत होते व एका पडक्या घरात जायला निघाले होते. मी त्यांना हाका मारून तिथे जाऊ नका सुचवले. कारण अशा ठिकाणी विंचू काट्याचे भय असते. मागच्याच आठवड्यात मला दोन वेळा पडलेल्या पानांमध्ये व बांबूच्या झाडांवर साप दिसलेला. तसेच वनातल्या एका बागेच्या बाजूला जथ्थ्याने मोरही दिसतात. त्या कुटुंबाला माझ्या बरोबर चला सांगितले व जवळच असलेल्या ध्यानमंदिराच्या शेड मध्ये नेले व तिथेच थांबायला सांगितले. त्यांनी माझे आभार मानले.
आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. मातीचे रस्ते असल्यामुळे चिखल झाला होता व त्यामुळे पायही घसरायला लागले होते. थोडा संयम ठेवून अजिबात शूरपणा न करता, मी ही गपगुमान पावसाचा जोर कमी होईपर्यंत तिथेच थांबायचे ठरवले. जवळपास २५-३० जणांनी त्या शेडचा आधार घेतला होता. सगळेजण ह्या अवकाळी आलेल्या पावसाने निर्माण झालेल्या धुंद करणाऱ्या वातावरणाचा आस्वाद घेण्यात व फोटो काढण्यात गुंग झाले होते.
तापलेल्या मातीवर पावसाच्या झालेल्या वर्षावाने थोड्याच वेळात वनात दरवळलेल्या मातीच्या सुगंधाने मंत्रमुग्ध व्हायला झाले होते. मी तर वर्षभराचा सुगंध फुफ्फुसात भरुन घेतला व पावसाचा जोर थोडा कमी झाल्यावर छत्रीला भिजवायचे ठरवून तसाच पुढे रोजच्या अर्ध्यातासाच्या पायापिटीला निघालो. न राहवून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला भ्रमणध्वनी बाहेर काढला व हे अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात टिपले.
बराच वेळ मी एकटाच चालत निघालो होतो कारण फक्त माझ्याकडेच छत्री होती. थोडासा पुढे गेल्यावर वनकर्मचारीवर्गाची एक चेकपोस्ट लागते, तिच्यात नेहमी फिरायला येणारी बरीच मंडळी आसऱ्याला उभी होती. त्यातील एक काका माझ्याकडे पाहून हसले, व मला म्हणाले;
“तुम्हाला बरे माहित होते की आज पाऊस येणार आहे ते, छत्री घेऊन आलात म्हणून विचारले.”
मी ही त्यांना हसून उत्तर दिले की;
“आजकाल हवामान खात्याचा अंदाज अगदी अचूक असतो बरका, कालच बातम्यांमध्ये पुण्यात पुढील तीन चार दिवस पाऊस पडणार आहे असे सांगितले होते”.
काका माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसले, व म्हणाले;
“पुणेकर दिसताय.” “हजर जबाबी आहात.” (बहुतेक त्या काकांनी मला ध्यानकेंद्रात थांबलेलो असताना प्लास्टिकच्या पिशवीतून भ्रमणध्वनी काढताना पाहिलेले असणार !)
ह्या धुंद वातावरणातही थोडासा हशा पिकला आणि आमची स्वारी पुढे चालायला लागली.
परतीच्या वाटेवर निघालो तोवर पाऊस थांबला होता. जाता जाता पावसाने माझे एक फार मोठे काम केले होते, ते म्हणजे, माझ्या गाडीवर उधळलेली ती पांढरी पावडर स्वच्छ करून टाकली व माझे गाडी धुण्याचे कष्ट वाचवले होते. परत येताना मात्र मी वाट बदलली व दुसऱ्या वाटेने घरी आलो. उगाच त्या टवाळखोर पोरांच्या वाटेला नको जायला असे म्हणून......
एवढ्या पावसातही मी ठरल्याप्रमाणे रोजचा चालण्याचा कोटा पूर्ण करूनच तळजाई वनातून घरी परतलो. ते ही मनात एक सुखद गारवा आणि फुफ्फुसात मातीचा सुगंध घेऊनच. मानतल्या मनात किशोरदांचे, " रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...." गुणगुणतच .
एकंदरीत काय तर, जर का आपण एखादा संकल्प केला असेल तर कितीही अडचणी आल्या तरी पूर्ण करायचा निश्चयच करायला हवा, जो मी केला आहे.
आश्चर्य म्हणजे आज एकही मोर दिसला नाही. तरीही माझ्या मनातील मोराचा पिसारा मात्र फुललेला होता. लतादीदींच्या "बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला" ह्या सुमधूर गाण्याची आठवण झाली.
सर्वाना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा.
रवींद्र कामठे.
मंगळवार, ७ मार्च २०२३.
आजचा हा सुखद आणि अविस्मरणीय अनुभव नक्की वाचा आणि ताजेतवाने व्हा.