Friday 29 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – भूखंड खरेदीचा कानाला खडा


अनुभवाच्या शिदोरीतून भूखंड खरेदीचा कानाला खडा

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

ह्या गोष्टीला आता १५ वर्षे झाली असतील.  अचानक मला माझ्या एका भूखंड व्यवहाराची आठवण झाली व तो एक विलक्षण अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला, कारण आपल्या प्रारब्धात जे असते तेच घडते ते कसे...

२००३ला मी पुण्यातल्याच एका छोट्याशा कारखान्यात नोकरी करत असतांना काहीसे वेगळे करायची इच्छा होती आणि सहज विचार करता करता माझ्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली की; आमच्या शेजारचा भूखंड सद्य स्थितीत असलेल्या घरासाहित विकत घ्यावा व त्याचे रुपांतर एका होस्टेलमध्ये करावे किंवा अगदीच काही नाही झाले तर भाड्याने देवून त्यातून उत्पन्न घ्यावे.  हे सगळे डोक्यात यायचे कारण आमच्या येथे भारती विद्यापीठ जवळ असल्यामुळे बरेचशे विद्यार्थी भाड्याने खोली मिळेल का अथवा कॉट बेसिसवर राहायची सोय होईल का विचारायचे.

माझ्या डोक्यात एकदा का किडा वळवळायला लागला की काही विचारू नका !  माझ्या स्वभावानुसार, जो पर्यंत तो विचार, एकतर पूर्णत्वास जाईपर्यंत अथवा तो अयोग्य आहे हे सिद्ध होईपर्यंत मी काही शांत बसत नसे !  झालं, मी लगेचच त्या दृष्टीने कामाला लागलो.  सर्व प्रथम ही कल्पना बायकोच्या कानावर घातली.  अर्थातच तिचा होकार मिळवला ! पण तिने योग्य असा, राहत्या घरावर कुठलाही बोजा न करता, तुला जे काही करायचे आहे ते कर, बजावले होते.
 
सगळ्यात पहिल्यांदा शेजारच्या भूखंडांच्या मालकास गाठले.  कारण त्यांनी ते घर भाड्याने दिलेले होते.  पण एक सांगतो इच्छा तिथे मार्ग, ह्यावर माझा तरी विश्वास बसला होता.  ह्या भूखंडाचे मालक गेली कित्येक वर्षे त्यांचे घर भाड्याने देत आले होते, कारण का तर; ते त्यांना लाभत नव्हते.  त्यामुळेच मी जेंव्हा त्यांना भेटून माझी इच्छा, त्यांचा भूखंड सद्यस्थितीत असलेल्या घराच्या योग्य किमतीसहित म्हणजे; साधारण ८ लाखांना विकत घ्यायची तयारी दाखवली होती.  त्यांचा मी सहा महिने पिच्छा पुरविला होता आणि शेवटी तो भूखंड १० लाखांना द्यायला तयार केले.

हे सगळे उपद्व्याप चालू असतांना माझ्या खिशात एकही दमडी नव्हती, ह्यावर तुमचा विश्वास बसणार नाही ! मला नोकरीत मिळत होते महिना रुपये १५०००/-.  समजा ८-१० लाखांचे कर्ज काढले तर महिना साधारण ८-१० हजार रुपये तरी हप्प्ता बसणार होता.  आधीच राहत्या घरावर दुरुस्तीसाठीचे दीड लाखाचे कर्ज होते, त्यात मारुती८०० चा हप्ता होता. माझ्या पगारातून जेमतेमत २-३ हजारच उरायचे व मी नोकरीच्या जोडीला आयुर्विम्याचा अधिकृत विक्रेता म्हणून काम करत होतो, त्यातून मला ४-५ हजार महिना उत्पन्न मिळत होते.  असे मिळून माझे ७-८ हजारच उरणार होते घर खर्चाला. बायकोची नोकरी असल्यामुळे फार ओढाताण होणार नव्हती.  पण ते म्हणतात ना उथळ पाण्याला खळखळाटच फार” !  माझ्या नोकरीच्या पगारावर (जिची शाश्वती नाही) मी ही जोखीम घेऊ शकत नव्हतो.  परंतु सरते शेवटी ही जोखीम मी स्वबळावर घ्यायची ठरवले.  कारण एकच होते की; असा माझ्या घराला लागूनचा हा भूखंड परत मिळणे शक्य नव्हते.  पुढे मागे दोन्ही भूखंड एकत्र करूनही काहीतरी करता येण्यासारखे होते.  असेही तो सद्यस्थितीत असलेल्या घरा सहित घेणार असल्यामुळे त्यातून लगेचच भाड्याचे अथवा होस्टेलचे उत्पन्न सुरु करता येणार होते.  शेवटी अगदीच काही नाहीच जमले तर हा शेजारचा भूखंड विकता येऊ शकत होता.  फार नफा नाही झाला तरी नुकसान तर नक्की होणार नव्हते ! शेवटी स्थावर मिळकत होती आणि ती ही आमच्या सारख्या सुनियोजित सोसायटीत होती; म्हणजे तिला दिवसेंदिवस चांगलीच किंमत येणार होती हे निश्चितच होते.  शक्यतो ही मालमत्ता विकायची नाही, पण तशी वेळ पडली तर मात्र राहत्या घरावर कुठल्याही परिस्थीतित आच येऊ द्यायची असं ठरलं होतं.

मी एका बँकेला त्या घराची कागदपत्रे आणि मला कंपनीतून मिळणाऱ्या पगाराचे पत्र दाखवले आणि काय सांगू, त्या अधिकाऱ्याने मला चक्क ८ लाख रुपये कर्ज देण्याची ग्वाही दिली.  ८ हजार हप्ता बसेल सांगितले.  माझ्या मार्गातील फार मोठा अडसर ह्या कर्जाने दूर झाला होता.  प्रश्न उरलेल्या २ लाखांचा होता.  थोडीफार शिल्लक होती आणि उरलेली गरज माझ्याच एका मामेभावाला, आम्हीं माझी मारुती ८००, दीड लाखाला विकून भागवली.  बँकेचे कर्ज घेतले.  रीतसर करार केले.  ते लुघुनिबंध कार्यालयात नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क भरून, सोसायटीची हस्तांतरण वर्गणी इत्यादी भरून, कायदेशीर मार्गाने सर्व करारांची पूर्तता केली.  घराचा ताबा घेवून काही किरकोळ दुरुस्त्या करून, ते भाड्याने देण्यासाठी तयार करून घेतले.  नेमके त्याच वेळेस पलीकडच्या काकांनी त्यांचे राहते घर पाडून तिथेच दोन मजली घर बांधायचे ठरवले व मला माझे हे नवीन घर भाड्याने देतोस का विचारले.  हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे, असे झाले. लगेच व्यवहार ठरवला.  महिना ५ हजार भाडे ठरले. माझ्या ह्या नवीन मिळकतीतून, माझ्यावर लक्ष्मी प्रसन्न होवून, लगेच अर्थार्जनही सुरु झाले.  मला माझे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल असे वाटूही लागले !

शेजारच्यांच्या घराचे एक वर्षात काम झाल्यावर त्यांनी घर सोडले आणि मी माझे घर ताब्यात घेवून तिथे माझ्या आईवडिलांच्या हस्ते गृहप्रवेशही केला.  अहो आमच्या घरच्यांना माझ्या ह्या यशामुळे इतका आनंद झाला होता म्हणून सांगू !  कौतुक करून करून सगळे थकले होते व माझ्या दूरदृष्टीला दाद देवून माझी वाहवा केली होती.  पण हे सुख सगळे किती क्षणभंगुर होते हे काही दिवसांतच जाणवले.

कोणाची दृष्ट लागली माहित नाही, पण गृहप्रवेश केल्यानंतर आठच दिवसांत माझी नोकरी गेली व मी अक्षरश: फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो.  त्यात नवीन वास्तूत भाडेकरीही मिळण्यास अडचण यायला लागली.  सोसायटीने विद्यार्थी ठेवण्यास मनाई केली.  ते म्हणतात ना, ‘वाईट काळ आला की सगळीकडूनच कोंडी होते’.  शेवटी माझ्या अडचणी काही संपेनात आणि त्यात नवी नोकरीही मिळेना.  असेच त्याच घराच्या पायरीवर बसून सिगरेटी फुकत ४-५ महिने कसेबसे काढले. ही वास्तू त्याच्या मालकाला लाभतच नाही असे काहीसे आधीच्या मालाकांडूनच ऐकले होते, त्यावर माझा विश्वास बसू लागला होता.  त्यात ह्याच्याकडून त्याच्याकडून हातउचल करून मी इतके दिवस कसबसे भागवले होते, पण असे किती दिवस ढकलायचे हा माझ्या समोर गहन प्रश्न होता !  माझ्या स्वाभिमानाने आता मला डिवचले होते.  एक तर मी हा सगळा उद्योग स्वत:च्या उन्नतीसाठी केला होता; त्यात माझ्या घरच्यांचा व बाकीच्यांचा काहीच दोष नव्हता.  त्यांना अडचणीत आणण्याचा मला काहीएक अधिकारही नव्हता. 

झालं, एकदा का आपली सटकली की विषय संपतो...
जसे हा भूखंड घेतांना तत्परतेने विचार केला होता तसाच तो विकण्याचाही निर्णय घेतला. जसा घेतला तसा दोन वर्षात परत ११ लाखाला विकून टाकला.  अर्थात पुन्हा एकदा सगळे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करूनच.. ह्या भूखंडाचे एक लाखाचे श्रीखंड खायला मिळाले; पण माझी भविष्यातील योजना धुळीला मिळाली ह्याचा मनस्ताप फार होता. त्यामुळे डोक्याला व्यखंड लावायची वेळ आली होती.  आपल्या नशिबात आणि पत्रिकेत स्थावर जंगम बाळगण्याचा योग नाही असे समजून तो विषय कायमचा डोक्यातून काढून टाकला होता.  आयुष्याकडे सकारात्मक दुर्ष्टीकोनातून बघण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे मला फारसा त्रास होत नाही व मी करूनही घेतला नाही.  चक्क झालेल्या एका लाखाच्या नफ्यात चौगुले मध्ये जावून नवी कोरी मारुती झेन बुक केली, बाकीच्या रकमेचे कर्ज घेतले आणि इथून पुढे भूखंडाच्या खरेदी विषयी कानाला खडा लावून मोकळा झालो.

रविंद्र कामठे

अनुभवाच्या शिदोरीतून – वेश्या-मंदिरातील एक तास


अनुभवाच्या शिदोरीतून वेश्या-मंदिरातील एक तास
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख  
१९८० चा तो काळ.  तेव्हा मी अवघा १७वर्षांचा होतो.  त्यावेळेस मी आमच्या ओळखीच्यांच्या, डेक्कन बस स्थानकाच्या पाठीमागील, एका फोटो स्टुडीओत अर्धवेळ काम करायचो.  तिथेच माझी आणि हर्षदची ओळख झाली.  एक दिवस संध्याकाळी आमचे काम संपल्यावर हर्षद मला म्हणाला; रव्या चल तुला एक गंमत दाखवतो’, असे म्हणून तो मला समाधान हॉटेलच्या मागच्या एका गल्लीत घेवून गेला.  आजवर मी ह्या बाजूला कधी फिरकलोच नव्हतो त्यामुळे आपण कुठे चाललो आहोत हे मला कळतच नव्हते.  पूर्ण अनभिज्ञ होतो मी ह्या सगळ्यापासून आणि ते समजून घेण्याचे माझे वयही नव्हते हो !

रस्त्याच्या दुतर्फा दोन मजली घरे होती आणि जिकडे पहावे तिकडे खिडक्यांतून परकर पोलकं घातलेल्या, भडक मेकअप केलेल्या पोरीच पोरी उभ्या होत्या.  काही घरांच्या खाली पुरुषांशी म्हणजे त्यांच्या ग्राहकांशी बोलत उभ्या होत्या.  देहविक्री करण्याऱ्या त्या पोरी आलेल्या गिऱ्हाईकाला पटवण्याचा अगदी कौशल्याने प्रयत्न करत होत्या.  माझ्या तरी हे सगळे आकलनशक्ती पलीकडले होते.  मनातल्या मनात हर्षदला एक सारख्या शिव्या हासडत होतो; की आरे कुठल्या नरकात घेवून चालला आहेस रे मित्रा, मला !

एक दोन गल्ल्या पार करून शेवटी हर्षद एका घराचा जिना चढू लागला.  दुसऱ्या मजल्यावरच्या एका मोठ्ठ्या खोलीत मला हर्षदने बसवले आणि तो मी आलोच १५-२० मिनिटांत असे सांगून आत कुठे तरी निघून गेला.  मी बसलो होतो त्या खोलीत १०-१२ पोरी विचित्र (हिडीस) हावभाव करत इकडून तिकडे फिरत होत्या.  अजून दोघे जण त्या खोलीत बसलेले होते.  ह्या पोरी त्यांच्याकडे पाहून; ऐ चल ना ! आज मेरे साथ बैठ ना ! एक बार बैठ मेरे साथ, जिंदगी भर याद रखेगा !  पोटाची खळगी भरण्यासाठी स्वत:च्या देहविक्रीसाठीचे ह्या पोरींची चाललेली ही जीवघेणी तडफड पाहून मला मनातल्या मनात खूप गलबलून येत होते व माझ्या अंगावर काटा उभा रहात होता.

१५-२० मिनिटांत आलो म्हणून सांगून गेलेला हर्षद आत जावून ४० मिनिटे होऊन गेली होती तरी परत आला नव्हता; त्यामुळे माझा जीव नुसता वर खाली होत होता.  त्यात तो आत कुठे गेला आहे हे समजायलाही मार्ग नव्हता.  का कोण जाणे, इतक्यावेळात ह्या मुलींबद्दल माझ्या मनात एक प्रकराची सहानुभूतीची भावना निर्माण झाली होती.  देहविक्री हा त्यांचा धंदा होता व तो त्या अतिशय प्रामाणिकपणे आणि निघुतीने करत होत्या, त्यात त्यांचे काहीच चुकत नव्हते.  मीच चुकीच्या ठिकाणी गेलो होतो. असतील त्यांच्या काही कथा, व्यथा, असे मनातल्या मनात म्हणत मी आहे तिथेच बसून हर्षदची वाट बघत होतो.

एकदाचा हर्षद आला आणि माझ्या हाताला धरून मला आत घेवून जायला लागला.  मला त्याची शंका आली.  मी त्याला म्हणालो; हर्षद, माझा हात सोड ! मला हे असले घाणेरडे उद्योग अजिबात करायचे नाहीत ! तुझे तुलाच लखलाभ !  मला इथे आणून तू आज फार मोठी चूक केली आहेस.  मी तुझे हे सगळे उपद्व्याप तुझ्या घरी सांगणार आहे !  मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही.  आज पासून आपली मैत्री संपली....

हर्षद्वर माझ्या बोलण्याचा काही एक परिणाम होत नव्हता.  तो माझे काही एक न ऐकता मला आत कुठेतरी घेवून चालला होता.  माझ्या समोर ह्या दिव्व्यातून बाहेर पडण्यासाठी, त्याच्या बरोबर जाण्याशिवाय काही पर्यायही शिल्लक राहिला नव्हता.  अरुंद अशा, एका मोठ्या चिंचोळ्या खोलीत हर्षद मला घेवून चालला होता.  त्यातच एका बाजूला साधारण ५ फुट रुंद व ८ फुट लांब अशा निमुळत्या खोल्या होत्या आणि त्यांना सरकती दारे होती.  एक एक खोली ओलांडताना आतून नको नको ते आवाज आणि संवाद कानावर पडत होते.  एक प्रकारचा कोंदट आणि कुबट वास सगळीकडून येत होता.  मी तर जीव मुठीत धरूनच हर्षदच्या बरोबर चाललो होतो, नव्हे फरफटत जात होतो.  मला कुठल्याही क्षणी उलटी होईल असे वाटे होते.

सरते शेवटी हर्षदच्या त्या पोरीची ती खोली आली.  जेमतेम एक खाट मावेल एवढी ती खोली होती, त्यावर गलिच्छ गादी होती व त्यावर कळकटलेली, मळकटलेली, कसले तरी प्रंचड डाग पडलेली एक चादर घातलेली होती. भिंतीला गडद निळा रंग होता, काही भागाचे पोपडे उडालेले होते आणि वर एक पंखा जीवावर आल्यासारखा फिरत होता.  अशा खोलीत हर्षद इतका वेळ काय करत होता हेच मला समजत नव्हते मी सुन्न होऊन त्याच्या बाजूला उभा होतो.  हर्षदने मला आत घेतले आणि खोलीचा सरकता दरवाजा बंद केला.  त्या क्षणाला मी मात्र पुरता घाबरून गेलो होतो.  मला तर दरदरून घामच फुटला होता.  माझी तत पपच झाली होती.  माझी ही अवस्था बघून हर्षदने फार वेळ न दवडता माझी त्या मुली बरोबर म्हणजे, त्या रूपा बरोबर; त्याची बहिण म्हणून ओळख करून दिली आणि क्षणार्धात माझी बोलतीच बंद झाली. 

नाकीडोळी नीटस, सर्वसामन्य घरातली वाटणारी २५वर्षांचीच असावी ती; अवघ्या २० व्या वर्षीच तिच्या आयुष्याची नियतीने ह्या धंद्याला लावून राखरांगोळी करून ५ वर्षे लोटली होती.  चांगले चारचौघीसारखे कपडे घालून जर का ही रूपाताई बाहेर पडली असती तर ती एक वेश्या आहे हे सांगूनही कोणाचा विश्वास बसला नसता.  परिस्थिती माणसाला काय काय करायला लावेल ह्याचे रूपाताई हे एक ज्वलंत उदाहरणच होती.  त्या रुपाकडे पाहून माझे तर काळीजच हळहळले आणि डोळेच भरून आले. 

एकतर मी इतक्यावेळ हर्षदला त्याने मला ह्या नरकात आणल्याबद्दल घाल घाल शिव्या घातल्या होत्या.  पण त्याच नरकात एक रूपा नामक मायेने ओथंबून वाहणारी त्याची ही ताई होती, जीने हर्षदला ह्या नरकात पहिल्यांदा आल्यावर पुढे जाण्यास नकार देवून; त्याच्या आयुष्याची होणारी विल्हेवाट वाचवली होती !  आज म्हणूनच तर तीच ती रूपाबाई हर्षद्ची सर्वात लाडकी ताई झाली होती आणि तिलाच भेटायला हा पठ्ठ्या ह्या सगळ्या नरकात नियमितपणे येत होता, हे कोडं उलगडल्यावर माझे दोन्ही हात आपसूकच जोडले गेले होते आणि त्या दोघांपुढे मी नतमस्तक झालो होतो.

हर्षदचे हे रूप पाहून मला त्याचे पाय धरून त्याची माफी मागावीशी वाटत होते.  गेले एक वर्ष हर्षद महिन्यातून एकदातरी आपल्या ह्या रूपाताईला भेटायला ह्या नरकात येत होता.  ते ही आज नाही तर उद्या रूपाताई ह्या व्यवसायाला रामराम म्हणेल व एखाद्या चांगल्या मार्गला लागेल ह्या आशेने...

हर्षद तिला ह्या नरकातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होता, पण रूपा मात्र त्याची समजूत काढत होती कारण तिची ह्या नरकातून बाहेर पडून आगीतून फुफाट्यात जायची मनाची तयारी होत नव्हती !

गेले तास भर माझ्या मनावर आलेला तो प्रंचड मोठ्ठा ताण, एकदम हलका झाला होता.  ज्या वातावरणाची इतका वेळ मला किळस आली होती, ज्या पोरींची भीती वाटत होती, त्यांची घृणा वाटत होती, ती सगळी एकदम नाहीशी होऊन मला त्यांची सहानुभूती वाटायला लागून त्यांच्या बद्दल एक आस्था आणि आदराचीच भावना निर्माण झाली होती. 

मी विचारत पडलो होतो की, आपल्या समाज व्यवस्थेमध्ये जर का ह्या देहविक्री करणाऱ्या (वेश्या) नसत्या तर आपल्या आया-बहिणी, सुरक्षित राहिल्या असत्या का ???

ह्या विचारांत गढून जात मी, माझ्याही नकळत ह्या वेश्या मंदिराच्या पायऱ्या उतरत होतो आणि ह्या मंदिरात घालवलेल्या त्या एक तासाचे व हर्षदचे अंतर्मुख होऊन मनोमन उपकारच मानत होतो...

रविंद्र कामठे
१० मार्च २०१९

Thursday 14 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – “भरारी मिग२१ची ”


अनुभवाच्या शिदोरीतून – “भरारी मिग२१ची


चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
१९९०ला मी जसा महिन्यातून एकदा चंद्रपूरला जायचो तसाच महिना दीडमहिन्यातून एकदा नाशिक जवळील ओझर येथील हिंदुस्थान एरोनौटिक्स ह्या मिग विमानांच्या कारखान्यात जात असे.  आमच्या कंपनीला हिंदुस्थान एरोनौटिक्स (एचएएल) ह्या कंपनीचे त्यांच्या विमानांच्या सुट्या भागांच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या टाक्या बनवण्याचे व बसवण्याचे कंत्राट मिळालेले होते.  त्यामुळे मला ओझरयेथील एचएएलच्या कारखान्यात जावे लागायचे.  मला माझ्या कंपनीने ह्या कामासाठी मोठ्या विश्वासाने मुखत्यारपत्र देवून माझी ह्या प्रकल्पाचा मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केलेली होती व माझ्यावर ह्या प्रकलपाची संपूर्ण जबाबदारी टाकलेली होती.  माझ्या आयुष्यातला हा खूप अभिमानाचा क्षण होता, जो मी आयुष्यात कधीच विसरूच शकत नाही. 

ह्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या आकुर्डीच्या कारखान्यात वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करण्याच्या विविध आकाराच्या, लोखंडी व त्यावर शिश्याचा लेप असेलेल्या, तसेच काही फायबर ग्लासच्या टाक्या तयार केल्या जायच्या व त्या ह्या ओझरच्या कारखान्यात नेवून बसवल्या जायच्या.  त्यासाठी आधी एचएएल कडून आलेल्या रेखाचीत्रावर आमच्याकडील आरेखन तज्ञांच्या चर्चा घडवून आणायच्या, त्याचे सगळे सोपस्कार एचएएल च्या नियमाने करून घ्यायचे व त्यांच्या आरेखन विभागाची रीतसर कागदोपत्री संमती मिळवायची.  ही संमती मिळवली की आमच्या कारखान्यात ह्या टाक्या बनवण्यास प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हायची.   ह्या टाक्या बनवत असतांना वेगवेगळ्या वेळी (कंत्राटात ठरल्याप्रमाणे) एचएएलच्या अधिकाऱ्यांना ओझरहून आमच्या आकुर्डीच्या कारखान्यात आणणे, त्यांची राहण्या, खाण्याची व्यवस्था करणे.  टाक्यांची गुणवत्ता तपासणी करून झाल्यावर त्यांना परत ओझरला पोचवणे हे सगळे मलाच करावे लागायचे.  अर्थात ती माझी जबाबदारीच होती म्हणा ! 

पुन्हा एकदा अंतिम गुणवत्ता तपासणीसाठी काही अधिकाऱ्यांना आकुर्डीला आणावे लागायचे.  गुणवत्ता तपासणीतून पास झाल्यावर आमचे ६०% काम पूर्ण व्हायचे.  हे काम पूर्ण झाल्याचा अहवाल भरून त्यावर ह्या अधिकाऱ्यांची सही शिक्का घेवून त्याला आमच्या कामाचे ६०% चे बिल तयार करून घेवून ते ओझरच्या कारखान्यात लेखा विभागात जमा करायला जायचे.  लेखा विभागात हे बिल जमा करायच्या आधी तीन ते चार वेगवेगळ्या विभांगामध्ये जावून त्यांच्या संमतीच्या सह्या व शिक्के घेणेही जरुरी असायचे.  हे करतांना कधी कधी दोन दिवस तर कधी कधी तीन चार दिवसही लागत असतं.  शेवटी ते त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असयाचे.   त्यांच्या समंती नंतरच हे बिल लेखा विभागात घेतले जायचे.  एकदा का ते जमा केले की ते पुढे लेखा-परीक्षा विभागाकडे सुपूर्द व्हायचे.  अर्थात हे सगळे त्यांचे अंतर्गत काम असायचे.  पण मी निर्माण केलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे मला आमच्या बिलाचा लेखा विभाग ते धनादेश पर्यंतचा सर्व प्रवास सुरळीत पार पडायचा.  जर का कुठे अडथळा आला असेल तर तो मला तत्काळ समजण्याची सोय होती व आलेला अडथळा पार करण्याची सोयही होती.  अर्थात त्यासाठी मी कारखान्याच्या समोरच्याच बाजूला असलेल्या अधिकारी वर्गाच्या वसाहतीत आपुलकीची आणि जिव्हाळ्याची एक चक्कर नक्की मारलेली असायचीच.  साधारणपणे हे ६०% पैसे, बिल जमा केल्यापासून १५ दिवसांमध्ये आम्हांला मिळून जायचे.
 
हे झाले ६०% कामाचे.  त्यानंतर खरी मजा असायची.  ह्या तयार टाक्या ट्रकने ओझरला न्यायच्या.  त्याच्यासाठी ओझर कारखान्यातून त्या आत घेण्यासाठीची परवानगी घ्यावी लागायची, कारण ह्या टाक्या आकाराने मोठ्या म्हणजे ९-१० फूट व्यासाच्या व वजनाने खूप जड म्हणजे ३-४ टन असायच्या.  त्यांच्या सुट्टीच्या दिवशीच रविवारीच ही परवानगी मिळायची व ती सुद्धा काही तासांचीच असायची.  त्या दिलेल्या नियोजित वेळेतच आम्हांला ह्या टाक्या ट्रक मधून उतरवून त्यांनी ठरवून दिलेल्या रासायनिक प्रक्रियेच्या गाळ्यात त्या नेऊन ठेवाव्या लागायच्या.  ह्या कामासाठी क्रेन आणि जवळच्या गावातील काही माथाडी कामगार लागायचे व ह्या सगळ्याची पूर्व परवानगी त्यांची सुरक्षारक्षक चाचणी वगैरे सर्व सोपस्कार मला योग्य वेळात पूर्ण करून ठेवावे लागायचे.  परत एकदा सगळे सोपस्कार म्हणजे टाक्या मिळायची पोच, त्या बसवल्याचे पत्र व गुणवत्ता चाचणीत पास झाल्याचे पत्र हे सगळे मिळावयाचे.  हे सगळे बाड घेऊन परत आकुर्डीला यायचे.  उरलेल्या ४०% रकमेचे बिल बनवायचे व ६०% बिलाच्या वेळेस केलेले सगळे सोपस्कार पुन्हा एकदा करायचे व ओझरला जावून बिल जमा करायचे आणि पैसे मिळावयाचे.  उगाच नव्हते काही मला मुखत्यारपत्र दिले होते ते ! 

ह्या सगळ्यात माझी फार शारीरिक आणि मानसिक दमणूक व्हायची.  त्याचे कारण ह्या ओझरच्या कारखान्यात एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरायचे म्हणजे पायाचे तुकडे पडायचे.  अहो विचार करा मिग विमानांच्या सुट्ट्या भागांची जुळवाजुळाव करून ते बनवण्याचा तसेच तयार झालेल्या व वापरात असलेल्या ह्या मिग२१ विमानांची देखभाल करण्याचा हा कारखाना म्हणजे अजस्त्र प्रकरण होते, त्यात त्यांचा स्वत:चा एअर पोर्टही आहे हो.  एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक एक विभाग होता व त्याच्या त्या अवाढव्य शेडस.  असे किती तरी न मोजता येणारे विभाग होते ते मला आता आठवतही नाहीत.  येथील निम्नअधिकारी वर्ग मात्र आतमधील प्रवासासाठी लम्ब्रेटा नावाची स्कूटर तर उच्चवर्गीय अधिकारी जीप वापरत असतं.  नशीब फळफळले तर माझी ही पायपीट वाचायची, तर कधी कधी त्यांच्या कॅन्टीन मध्ये जेवणाचा आस्वादही घेता यायचा.

एक सांगतो ह्या काळात मी ओझरच्या ह्या कारखान्यात शेकड्याने रशियन बनावटीची मिग २१ विमाने पहिली आहेत.  कधी कधी तर ती जीपला आकडी लावून एका विभागातून दुसऱ्या विभागात नेतांना सुद्धा पहिली आहेत. आकाशात आवाजाच्या दुप्पट तिप्पट वेगाने धावणारे हे विमान असे ह्या कारखान्यात अगदी आपल्या खेळातल्या विमानासारखे भासायचे.  मला कामानिमित्ताने मिग२१चे कॉकपिट अगदी जवळून पहायची संधी मिळायची.  दरवेळेस मी धन्य होऊन मनातल्या मनात मिग२१ मधून एक भरारी मारून यायचो.  मला खरं तर माझ्या शाळेतील आठवी नववीचे ते दिवस आठवायचे जेंव्हा मी शाळेतल्या एनसीसीत होतो आणि एअरफोर्सचा कॅडेट होतो ह्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.  माझ्या उंचीने मार खाल्ला हो, नाही तर आज मी नक्की एअरफोर्स मध्ये वैमानिक होऊन खरेखुरे मिग२१ उडवले असते, कागदी नव्हे !  काही गोष्टी घडायला नशीब तर असायला लागतेच, पण कर्तुत्वही तेवढेच महत्वाचे असते !

ह्या ओझरच्या कारखान्यात जाण्याचा मला कधी कंटाळा आलाच नाही.  तसाही मला माझ्या कामाचा कधीच कंटाळा येत नाही.  नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे व नेटाने करणे हा तर माझा मूळ स्वभावच आहे.

मी पुण्यातून सर्वात शेवटच्या म्हणजे रात्री २३.३०च्या एशियाडने नाशिकला जात असे.  जी भल्या पहाटे कधी ४ तर कधी ५ वाजता नाशिकला पोहचवत असे.  नाशिक एसटी स्थानकात उतरले की समोरच चालत अंतरावर बसेरानावाचे जरा चांगले लॉज आहे.  तिथे कधीही गेले तरी मला एक खोली नेहमी मिळायची.  सामान टाकायचे, एक तासभर झोप काढायची.  प्रवासाचा व जागरणाचा शीण घालवायचा, सकाळी ७ वाजता उठून आवरून नाष्टा, चहा उरकून पुन्हा नाशिक बसस्थानकात यायचे.  येथून सकाळी दर अर्ध्यातासाने ओझरला जाणारी बस असायची.  मिळेल ती बस (लालडबा) पकडायची आणि तासाभरात ओझरला पोहोचायचे.  एक मात्र आहे की ह्या गाड्यांना कायमच खूप गर्दी असायची व त्यात प्रवेश मिळवणे महाकठीण असायचे.  पण मला तर आत इतक्या वर्षांनी ह्या सगळ्याची सवयच झालेली होती व हे सगळे इतके अंगवळणी पडले होते की, गर्दी नसेल तरच चुकल्या सारखे वाटायचे.  कधी कधी एका दिवसांत काम व्हायचे तर कधी तीन ते चार दिवसही लागयचे.  तेंव्हा बऱ्याच वेळेचा माझा सवेरा ह्या बसेरातच व्हायचा आणि आमची स्वारी कायमच स्वप्नवत मिग२१च्या भरारीतून जमिनीवर यायची !


रविंद्र कामठे

Tuesday 5 March 2019

अनुभवाच्या शिदोरीतून - “एक मुलाखत”

अनुभवाच्या शिदोरीतून सफल आयुष्याची गुरुकिल्ली – “एक मुलाखत

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
 
१९८९ चा तो काळ होता म्हणजे त्याला आज जवळ जवळ ३० वर्षे झालीत, तरीही असं वाटतंय की हे सगळ अगदी काल पर्वाच घडलंय की काय !  हो अगदी खरं आहे हे.  हे माझ्याच नाही तर तुमच्या सुद्धा बाबतीत असचं काहीस घडलेलं असणार, घडत असणार.  मी फक्त मन मोकळं करून हे अनुभव शब्दबद्ध करून माझ्या ह्या अविस्मरणीय स्मृतींचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय. तसेच त्यानिमित्ताने तुम्हां रसिक वाचकांशी संवाद साधण्याचे हे एक उत्तम असे साधन समजतोय.  चूक भूल माफ असावी !

आकुर्डीतील एका खाजगी कंपनी मध्ये १९८९-१९९४ ह्या काळात मी कामाला होतो.  त्याच कंपनीमधील नोकरी साठीच्या माझ्या मुलाखतीचा हा एक अविस्मरणीय असा अनुभव माझ्या आयुष्यात मला खूप काही शिकवून गेला आणि खूप काही देवून गेला.  ह्या मुलाखतीच्या सफलतेमुळे १९८९-१९९४ हा पाच वर्षांचा सुवर्णकाळ माझ्यासाठी आणि आमच्या संसारासाठी अनमोल ठरला आहे हे काही वेगळे सांगायला नको.  ह्याच काळाने आमच्या उर्वरित सुखी आणि समाधानी आयुष्याची भक्कम पायाभरणी केली होती हे विसरून कसे चालेल !  “इमारतीचा काय अथवा तुमच्या उद्दिष्टांचा काय, पाया जर आत्मविश्वासाने भरून भक्कम केलेला असेल तर कितीही संकटे आली तरी इमारत कधीही कोसळत नाही अथवा उद्दिष्टांपासून तुम्हांला कोणीही दूर लोटू शकत नाही”, हाच काय तो अनुभवाचा ठेवा मला आजवर लाभला आहे हे इथे नमूद करावेसे वाटते.

ह्या आधी मी १९८३ सालापासून १९८५ पर्यंत दोन अगदी छोट्याशा कारखान्यांमध्ये एक एक वर्षे नोकरी केलेली होती.  ते करत असतांनाच कायद्याचे पदवीधर होण्याचे ठरवलेले होते.  कारण आयुष्यात पुढे जावून काही उद्दिष्ट गाठायचे असेल तर नुसते पदवीधर होऊन चालणार नव्हते.  थोडे उच्च शिक्षण तर हवेच होते, परंतु आपल्या खिश्याला परवडेल व बुद्धिमत्तेला झेपेल असेच काहीतरी शिकायला हवे होते, जेणेकरून चांगली नोकरी मिळवता येईल.   अर्थात हे तीन चार वर्षांचे शिक्षण व त्याचा खर्च मला एखादी अर्धवेळ नोकरी करूनच करावे लागणार होते.  त्यामुळेच वडिलांच्या ओळखीने मला त्यांच्याच नोकरीच्या ठिकाणी म्हणजे कृषी महाविद्यालयात बदली कारकून म्हणून कंत्राटी पद्धतीवर नोकरी मिळाली होती.  सकाळी कॉलेज करून १० वाजता कृषी महाविद्यालयात मी जवळ जवळ दीडएक वर्ष कारकुनी केली आहे हे सांगताना मन कसं त्याही स्मृतींमध्ये अलगद गुरफटून जातं. 

असा एकंदरीत पाच वर्षांचा अनुभव माझ्या गाठीशी होता.  त्यात मी वाणिज्य आणि कायदा ह्या शाखेंचा पदवीधर होतो.  १९८७ सालीच माझे लग्न होवून १९८८ ला आमच्या संसारवेलीवर एक गोंडस फुल उमलून आम्हांला एक धनाची पेटी लाभलेली होती.  संसाराच्या जबाबदारीच्या जाणीवेने मी आता आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी शोधायला हवी अशा विचारत होतो.  त्याच विचारांती १९८९ साली वृत्तपत्रातील जाहिरात पाहून मी ह्या आकुर्डीच्या एका कंपनी मध्ये अर्ज केला होता.  ह्या कंपनी मध्ये माझी मुलाखती साठी निवड करण्यात आली होती.  ऑफिस असिस्टटअशी एकच जागा ती ही त्यांच्या आकुर्डी मधील कारखान्यात होती. 

जवळ जवळ ५०-१०० जणांनी ह्या नोकरी साठी अर्ज केले होते व त्यातून त्यांनी १५-१६ उमेदवारांना मुलाखतीला बोलावले होते.  त्यांच्या बंडगार्डन येथील मुख्य कार्यालयात सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभवाचे दाखले व दोन ओळखीची पत्रे घेऊन ह्या मुलाखतीला बोलावण्यात आले होते.  वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच मी लागणारी सर्व कागदपत्रे (सरकारी अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानिशी) व तयार केलेल्या प्रती घेऊन त्यांच्या कार्यालयात पोचलो होतो.  सुरक्षारक्षकाने रीतसर चौकशी करून, कुठल्याश्या यंत्राने माझी अंगभर तपासणी करून नंतरच मला आत सोडले होते.  माझ्या आधी काही जण आत गेलेले होते आणि माझ्या मागेही एक दोन जण उभे होते.  बापरे इतके जण एका जागे साठी !  मला तर धडकीच भरली होती.  आपले कसं निभवायचं ह्या सगळ्यांच्यात असे वाटलं होतं.  मनात धाकधूक होत होती. 

स्वागत कक्षा मधील महिलेस मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेलं पत्र दाखवले.  त्यांनी ते पाहून त्यावरील माझ्या वेळेची त्यांच्या एका वहीत नोंद करून घेतली आणि मला इतर उम्देवारांच्याबरोबर बसण्यास सांगितले.  त्यांच्या बोलण्यातील नम्रपणा, आदरातिथ्याची भावना व कार्यालयाचा नीटनेटकेपणा, प्रशस्तपणा माझ्या मनाला तर खूप भावून गेला.  हीच ती चांगली नोकरी जी मी गेले वर्ष दोन वर्ष शोधत होतो असे मला वाटले होते.  मनावर थोडेसे दडपणही आलेलं होते, घशाला कोरड पडली होती, त्यामुळे मी कोचावर बसायच्या आधी एक पेला पाणी पिऊन घेतलं.  तहान भागली व अस्थिर मन स्थिरावण्यासाठी त्याची थोडी मदतही झाली.  तुम्हीं कितीही काहीही म्हणा, पण प्रत्येकाला ह्या अशा मुलाखतींचे दडपण नक्कीच येत असणार, मी काही त्यातून निराळा नव्हतो.  माझ्या आजूबाजूला बसलेले इतर उमेदवार एकदम आत्मविश्वासाने बसलेले होते व त्यांच्या मनावर कुठलेही दडपण, तणाव मला जाणवत नव्हता. काहीजण तर अगदी सुटा-बुटात आलेले होते तर काहींनी छान टाय घातलेला होता.  मी मात्र जरा साधाच पण व्यवस्थित इस्त्री केलेला पंधरा सदरा, काळी विजार व छान चकाकी केलेले काळे बूट घालून आलो होतो.   असेल बाबा त्यांना अशा मुलाखतींची सवय, असे मनातल्या मनात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्षच करून बरोबर आणलेली सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून मनाचे समाधान करून घेतले.  मला बोलवेपर्यंत मी मनातल्या मनात आपल्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माझ्या आकलनशक्तीनुसार उजळणी करत बसलो होतो.   ही नोकरी काहीही करून मिळवायचीच असा मनाचा हिय्या करून मी मनातल्या मनात मुलाखतीची तयारी करून ठेवली होती त्यामुळे थोडासा निर्धास्त झालो होतो.

स्वागत कक्षामधील महिलेने कंपनीचे चार संचालक व दोन अधिकारी मिळून ही मुलाखत घेणार आहेत हे त्यांच्या कंपनीच्या रिती-रिवाजानुसार आलेल्या प्रत्येक उमेदवारास सांगितले होते, तसे मलाही सांगितले.  हे कळल्यावर माझी तर पाचावरच धारण बसली.  मनावर अजून थोडासा ताणही आलेला होता.  असाही मला इतक्या मोठ्या कंपनीत मुलाखत देण्याचा फारसा अनुभवही नव्हता आणि तसा मी कधी प्रयत्नच केलेला नव्हता.  कारण पदवीधर झाल्याबरोबर एक दोन छोट्याशा कारखान्यात लगेचच नोकरी मिळाली होती आणि ती मुलाखत म्हणजे एक सोपस्कार होता असे मला इथली सगळी व्यवस्था व गर्दी पाहून वाटायला लागले होते.  माझ्या बरोबरची सगळीच पोरं चांगलीच हुशार वाटत होती, म्हणजे त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून तरी ते उच्च शिक्षित आणि हुशार वाटत होते. असो.  एक एक करून आम्हांला आत बोलावले जात होते.  काहींची मुलाखत १० मिनिटे तर काहींची १५-२० मिनिटे चालत होती.  असे करता करता माझा नंबर आला व मला आत बोलावले गेले.
 
मला बोलावल्यावर मी दारावर टकटक करून ते हलकेसे उघडून मी आत येऊ काअशी त्यांची परवानगी घेतली.  त्यांनी ती दिल्यावरच त्यांच्या त्या प्रशस्त चेंबर मध्ये प्रवेश केला व ते मला बसण्याचा आदेश कधी देतात ह्याची वाट पहात तसाच उभा राहिलो.  ते सर्वजण माझ्या आधी गेलेल्या उमेदवाराबद्दल चर्चा करत असावेत बहुधा !  साधारण एक १५-२० सेकंदच मी उभा होतो.  त्यांच्यातील मुख्य व्यवस्थापकांनी मला समोरच्या खुर्चीत हाताने खुणावून बसण्यास सांगितले.  त्यांचे आभार मानून मी त्यांनी सांगितलेल्या खुर्चीत विसावलो.  अर्थात हे सगळे संभाषण इंग्रजीत झाले होते हे वेगळे सांगायला नको.  (मी ह्या लेखामध्ये शक्यतो इग्रजी शब्द टाळण्याच्या प्रयत्न करतो आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच).  कंपनीचे तीन मालक-संचालक, एक कार्यकारी अधिकारी, आकुर्डीच्या विभागाचे मुख्य व्यवस्थापक आणि मुख्य कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक असे सगळे मिळून पाच जण आत एका मोठ्या टेबलाच्या समोरच्या बाजूला अगदी थाटात बसलेले होते.  

सर्व प्रथम मला माझ्याबद्दलची माहिती सांगण्यास सांगितले.  माझ्या अर्जात मी जसे लिहिले होते अगदी तसेच थोड्याफार फरकाने सांगून मी मोकळा झालो.  त्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास थोडासा बळावला होता आणि मनावरचा ताणही थोडासा हलका झाला होता.  आपल्याला समाधानकारक पद्धतीने इंग्रजी बोलता येते आहे हे उमजल्यामुळे माझ्याही नकळत मी खुर्चीत जरा सावरून आरामात बसलो होतो.  त्यानंतर मला माझ्या कामाच्या अनुभवाबद्दल काही प्रश्न विचारले गेले.  त्यांच्या प्रत्यके प्रश्नाचे अगदी मोजक्या शब्दांमध्ये मी उत्तर देत होतो.  तसेच माझे उत्तर त्यांना योग्य वाटले आहे की नाही वा पटले आहे की नाही हे ही आजमावून पाहत होतो.  जवळ जवळ २० मिनिटे माझ्या मुलाखतीला झालेली होती आणि कंपनीच्या संचालक आणि अधिकारी वर्गाच्या चेहऱ्यावरील हावभावावरून मी त्यांना समाधानकारक उत्तरे देत आहे हे मला जाणवत होते.  

आता मुख्य व्यवस्थापकांनी मला माझ्या कामाचे स्वरूप काय असणार आहे ते सांगितले व त्या संदर्भातील काही प्रश्न विचारून माझी ह्या जागेसाठीची पात्रता पडताळून पाहू लागले.  मला त्यांनी विचारलेल्या प्रत्यके प्रश्नाचा रोख काय आहे ते समजत होते.  जर का एखादा प्रश्न मला समजला नाही तर मी त्यांना तो परत विचारून खात्री करून घेत होतो व त्यानुसार नीट विचार करूनच उत्तरे देत होतो.  सर्वात महत्वाचे म्हणजे मी मला जे समजत होते आणि कळत होते त्याच प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देत होतो.  उगाचच आघाऊपणा करून आपल्याला सर्व काही येत आहे असा अट्टाहास न करता आणि अजिबात खोटे न बोलता त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होतो.  एक एक करून उपस्थित असलेल्या सर्वच जणांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती केलेली होती.  मी पण त्यांच्या प्रत्यके प्रश्नास अतिशय आत्मविश्वासाने उत्तरे देत होतो.  माझ्या कडे कामाचा जेमतेम पाच वर्षांचा अनुभव होता तो ही अगदीच लहान कारखान्यातला होता, परंतु मी जी काही कामे केलेली होती, ती अतिशय मन लावून प्रामाणिकपणे केलेली होती, त्या अनुभवातून जे काही शिकलेलो होतो, जे मला माझ्या ह्या मुलाखती दरम्यान खूप उपयोगी पडत होते, हे मला पदोपदी जाणवत होते.  मुलाखतीला जवळ जवळ ३० मिनिटे होवून गेली होती आणि अजूनही काही प्रश्न त्यांना विचारवेसे वाटत होते, त्यामुळे मी अगदी योग्य मार्गावर आहे असे मला वाटू लागले होते, त्याचेच प्रत्यंतर आकुर्डीच्या मुख्य व्यवस्थापकांनी विचारलेल्या प्रश्नात आले.  ते म्हणजे तुम्हीं राहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला, त्यात आमच्या कंपनीची येण्याजाण्यासाठीची कुठलीही व्यवस्था नाही.  त्यामुळे तुम्हांला जर आम्हीं ही नोकरी देऊ केलीत तर तुम्हीं कसे काय येणार जाणार.  त्यांचा हा प्रश्न अतिशय कळीचा होता आणि माझी खरी परीक्षा पाहणारा होता.  माझ्या एकंदरीत एक गोष्ट लक्षात आली होती की आपली निवड जवळ जवळ ठरलेली आहे.  परंतु आपल्या ह्या प्रश्नाच्या सकारात्मक उत्तरावरच ती शिक्कामोर्तब होऊ शकते.  मी मुलाखतीला येण्या अगोदरच ह्यावर विषयावर माझ्या बायकोशीही सविस्तर चर्चा केलेली होती व त्यावर मार्गही शोधून ठेवलेला होता.  नेमकी तीच गोष्ट मला त्यांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देतांना खूप उपयोगी पडली.  ते म्हणजे, मी त्यांना आमच्या दोघांमध्ये झालेला संवाद अगदी थोडक्यात सांगून टाकला व त्यावरील उपाय म्हणजे मी एक मोटरसायकल विकत घेऊन माझी येण्याजाण्याची व्यवस्था करणार आहे, कारण मला तुमच्या ह्या नावाजलेल्या कंपनीत नोकरी करून माझे उर्वरित भविष्य घडवायचे आहे !  माझे हे उत्तर उपस्थित सर्वच जणांना अगदी मनापासून पटले आणि त्यांनी मला थोडावेळ स्वागतकक्षा मध्ये बसण्यास सांगितले. 

मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ह्या ४० मिनिटांमध्ये व विचारलेल्या प्रश्नांमधून आणि मी दिलेल्या समर्पक उत्तरांमधून समोर बसलेली अनुभवी आणि जाणकार मंडळी माझ्यातल्या प्रामाणिकपणा, हजरजबाबीपणा, संयमितवृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन, कामाप्रती असलेली आत्मीयता, तत्त्वनिष्ठता, कष्ट करण्याची तयारी, सचोटी आणि ध्येयवादीवृती अशा व इतर काही गुणांची तसेच माझ्यातल्या काही उणिवांची पारख करत होत्या, हे मला आज २५-३० वर्षानंतर जाणवले.  जवळ ४० मिनिटे माझी मुलाखत चालली होती त्यामुळे माझ्या नंतरच्या चार पाच उमेदवारांचे चिंताग्रस्त झालेले चेहरे मला बाहेर आल्यावर जाणवले.  एक दोघांनी हळूच विचारायचा प्रयत्नही करून पाहिला, पण तिथे फारसे बोलता येत नसल्यामुळे माझी आपसूकच सुटका झाली होती.  कारण त्यांना माझी मुलाखत सकारात्मक झालेली आहे व मला बाहेर बसण्यास सांगितले आहे हे सांगावयास लागले असते हो.  असो.  तसेही त्यांना त्यांचा अंदाज आलेलाच होता हे ही तितकेच खरे होते. 

मला मात्र हुश्श झाले होते.  मी स्वागत कक्षात येवून पुन्हा एकदा पेलाभर पाणी प्यायले व कोचावर डोळे बंद करून शांत बसून राहिलो.  साधारण ४०-४५ मिनिटांनी मला पुन्हा एकदा आत बोलवण्यास आले.  तोवर बाकीच्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती झालेल्या होत्या व अजून एक उमेदवार सोडून बाकीचे सर्व बहुतेक त्यांनी सांगितल्याप्रमाणे निघून गेलेले होते.

मला आत बोलवून माझी मुलखात चांगली झाली आहे व माझी ह्या जागे साठी निवड करण्यात आली आहे हे सांगण्यात आले.  मला महिना ३५०० रुपये पगार ठरवण्यात आला होता.  कंपनीच्या नियमाप्रमाणे बाकीचे भत्ते इत्यादी देण्यात येणार होते.  हे सगळे मला मान्य आहे का आणि असले तर मी कधीपासून कामावर रुजू होवू शकतो हे त्यांनी मला विचारले.  एका क्षणाचीही उसंत न घेता मी सर्व गोष्टी मान्य करून १ तारखेपासून कामावर रुजू होऊ शकतो सांगितले.  (मुलाखतीची तारीख २० होती, त्यामुळे मला १० दिवसांचा अवधी तयारी साठी मिळणार होता).  व्यवस्थापकांनाही सर्वानुमते माझी संमती मान्य केली आणि माझी ह्या जागे साठी निवड झाली आहे हे शिकामोर्तब केले व मला पुन्हा एकदा बाहेर थांबण्याची विनंती केली. 

माझ्या बरोबर अजून एका उमेदवाराला त्यांनी थांबवले होते, त्याला आत बोलवण्यात आले आणि साधारण १० मिनिटांनी तो बाहेर आला व मला शुभेछ्या देवून निघून गेला.  त्याचे काम झाले नाही हे माझ्या लक्षात आले.  मनोमन मी त्याचे आभार मानले व त्यालाही पुढील मुलाखतीसाठी शुभेछ्या देवून मला कधी आत बोलावताहेत ह्याची वाट पाहू लागलो.  ५ मिनिटांत मला पुन्हा एकदा आत बोलावण्यात आले आणि ह्या वेळेस मात्र सर्वांनी माझ्याशी हस्तालोन्दन करून माझी ह्या जागे साठी निवड करून मला ही नोकरी बहाल करण्यात आली आहे असे जाहीर केले.  एक क्षण माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या परंतु मी माझ्या भावनांना आवर घातला आणि उपस्थित सर्वांचे मन:पूर्वक आभार मानले.  मला दोन दिवसांमध्ये कार्यलयात येवून पुढील सर्व सोपस्कार पुरे करण्यास सांगण्यात आले व आता आपली भेट आकुर्डीच्या कारखान्यातच होईल असे सांगतिले.

मनातल्या मनात नाचतच मी ह्या कंपनीच्या कार्यालयातून बाहेर पडलो.  एसटीडी बुथवर जावून बायकोला घरी दूरध्वनी करून ही आनंदाची बातमी दिली व जवळच्या एका टपरीवर मस्तपैकी गरमागरम वडापाव हाणला, एक चहा घेऊन इतक्या वेळ मारलेली पोटाची भूक शमवली आणि आज आपण जगच जिंकल्याच्या आविर्भावात घराकडे जायला निघालो.

ही यशस्वी मुलाखत म्हणजे माझ्या आयुष्यातला फार मोठा मैलाचा दगड होती ह्याचे प्रत्यंतर मला माझ्या आयुष्यातल्या पुढील प्रवासात कायमच जाणवत राहिले व तीच तर खरी माझ्या सफल आयुष्याची गुरुकिल्ली ठरली”.  आज ३० वर्षांनी मागे वळून पाहतांना माझ्या आयुष्यातल्या ह्या सुखद अनुभवाची आठवण येणे स्वाभाविकच आहे की नाही हो !

रविंद्र कामठे