Thursday 6 December 2018

स्वार्थ-परमार्थ


स्वार्थ-परमार्थ

माणूस हा किती स्वार्थी असतो ह्याचा प्रत्यय साधारणपणे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात नक्कीच येतच असणार नाही का ?  म्हणजेच एका माणसाला दुसऱ्या माणसाचा स्वार्थ नक्कीच कशात आहे हे तर कळतच असणार की !  तरीही माणूस अशाही परिस्थितीत जीवन जगतच असतो अगदी ह्याच स्वार्थी माणसांच्या सहवासात ह्याचे फारसे काही आश्चर्य वाटण्याचे कारणच नाही.  कारण शेवटी जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला हे जीवन, त्या विधात्याने जसे लिहून दिले आहे तसेच जगावे लागते हे मात्र निश्चित आहे.  माणसांनी उगीच टीव टीव करू नये !  म्हणजे मी हे केले, ते केले, असे केले, तसे केले, माझ्याच मुळे हे सगळे झाले, मी नसतो तर हे शक्यच नव्हते वगैरे वगैरे.  ह्या सगळ्या फुकटच्या वल्गना वाटतात. माणसाने फक्त न बोलता कर्म करीत राहावे.

स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे काय?  हेच काय ते माहित नाही.  स्वार्थ कशाला म्हणायचे, तर जे जे माणसाला स्वत:च्या सोयीनुसार हवे आहे अथवा ते ते तो येनकेन प्रकारे मिळवतोच ह्यालाच स्वार्थ म्हणायचा, नाही तर काय !  आणि परमार्थ म्हणजे स्वार्थाने मिळविता मिळवता जर का जमलेच तर थोडेफार दान दुसऱ्याच्या पदरात टाकता आले अथवा तशी तजवीज करता आली म्हणजे परमार्थ होय असे मला तरी वाटते.  हे सुद्धा सगळ्यांनाच जमते असेही नाही ! चूक की बरोबर हे ज्याने त्याने ठरवावे.

स्वार्थ कधीही वाईट नसतो.  एखादे कर्म करतांना साधलेला स्वार्थ, तो कोण कोणासाठी,  कोणावरही अन्याय न करता अगदी सात्विक आणि समंजसपणे साधला असेल तर तो योग्य ठरतो.  नाहीतर त्याला अन्यायच म्हणावे लागेल.  जोरजबरदस्ती,  बळजबरी, मनाविरुद्ध एखादी गोष्ट करायला लावून स्वार्थ साधता येत नाही आणि तो लाभतही नाही.  परमार्थ दैवी कृपेनेच होतो असे मला तरी वाटते.  त्याचे कारण, परमार्थ करण्यासाठी माणसामध्ये माणुसकीचा एक दुर्मिळ असा गुण असावा लागतो आणि त्याच्यात स्वत:कडे जे आहे ते देण्याची दानत असावी लागते.  येथे दुसऱ्यांना लुबाडून केलेला दानधर्म अजिबात अपेक्षित नाही.  ज्या माणसाच्या नशिबात असेल तोच परमार्थ साधून पुण्य कमवू शकतो, हा माझातरी अनुभव आहे.  अहो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला परमार्थ साधता येऊ शकतो.  वंचित आणि गरजवंत माणसाना सढळ हाताने, कुठेही कसलाही आडपडदा न ठेवता केलेली मदत (भिक नव्हे)  म्हणजेच परमार्थ होय.  परमार्थाने माणसाच्या मनाला खूप आनंद होतो आणि त्यामुळे माणसाचा जीव प्रसन्न होवून जातो.  आयुष्य समाधानी होते.

आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपापले कर्म करीतच असतो.  काही कर्मे आपण फळांची अपेक्षा न करता करत असतो तर काही कर्मे ही मुळातच फळांचीच अपेक्षा ठेवून केलेली असतात आणि हीच कर्मे म्हणजे माणसाचा स्वार्थीपणा असतो.  ह्यात तसे पहायला गेले तर वाईट काहीच नाही.  जोपर्यंत ही कर्मे दुसऱ्या कोणाचे वाईट करत नाही तोपर्यंत ती स्वार्थी जरी असली तरी आयुष्यात जगण्यासाठी तितकीच गरजेची असतात.  अशाच आपल्या कर्मांमधून काही कर्मे अशी असतात की ज्यांची फळे आपल्या संचितात जमा होत असतात आणि जेंव्हा ही फळे परिपक्व होतात तेंव्हा ती माणसाचे प्रारब्ध म्हणून समजली जातात.  अर्थात वाईट किंवा दुष्कर्मे ही दु:खदच असतात तसेच त्यांची फळेही तेवढीच वाईट असतात.  म्हणूनच माणसांनी कर्म करतांना आपल्या संचितात जेवढा म्हणून चांगल्या कर्मांचा ठेवा करता येईल तेवढा करावा. म्हणजे हीच फळे जेंव्हा परिपक्व होऊन आपल्या प्रारब्धात येतील तेंव्हा ती आयुष्यात एक प्रकारचा गोडवा,  आनंद, सुख आणि समाधान देऊ शकतील.  जसे आपण आपल्या बँके मध्ये पैशाचा संचय करून आपल्या प्रारब्धाची सोय करत असतो ना, अगदी तसेच सत्कर्म करून परमार्थाचा संचय आपल्या आयुष्यात करावा आणि चांगल्या प्रारब्धाची सोय करून ठेवावी.

हे सगळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की स्वार्थातून परमार्थ जर साधता आला तर तो अगदी सहजपणे आणि साधेपणाने साधावा व संचितात त्याचा ठेवा करावा,  जेणेकरून प्रारब्धात उत्तरोत्तर चांगले फळ मिळून आपले आयुष्य सत्कारणी लागेल.  विधात्याने आपल्याला दिलेले माणसाचे हे जीवन सफल झाल्याचा एक आगळा वेगळा आनंद मिळेल.  शेवटी प्रत्येकाचे नशीब हे ज्याच्या त्याच्या कर्मावरच अवलंबून असते असे मला तरी वाटते आणि मला म्हणावेसे वाटते.....

आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे,
आशा निराशांचे वलय जसे, सांगावयास उरे काही नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

गेलेला क्षण परतुनी येत नसे, तडजोडीतच आयुष्य जात असे,
संघर्ष हेच आयुष्याचे गमक असे, कष्टा शिवाय आयुष्यास अर्थ नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

स्नेह हेच आयुष्याचे गमक भासे, तंट्यात आयुष्याचा पेचच दिसे,
त्यागातच सुख कमविण्याचे असे, सुख दु:ख हे तर प्रारब्ध जसे,
आयुष्य नेमके आहे कसे ?

जगण्याची कला हीच संचित असे, माणुसकीला आयुष्यात पर्याय नसे,
आयुष्य नेमके आहे कसे ? हीच तर एक मेख असे ||

रविंद्र कामठे


“जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”


जगावं की मरावं”, “जगावं की मरावं”...”To be or not to be”

सारखे सारखे हेच विचार डोक्यात घोळत होते अगदी शेक्स्क्पिअरच्या नाटकातील त्या वाक्यासारखे.. “To be or Not to be”.
ही अशी वाक्ये नाटकांमधल्या पात्रांच्या तोंडून ऐकायला छान वाटतात.  परंतु तीच वाक्ये जेंव्हा आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात डोकावू लागतात ना तेंव्हा काळजाचं पाणी पाणी होतं हो ! ह्या वाक्यांचे अर्थच डोक्यात घुसत नाहीत,  अर्थ तर त्याहून लागत नाहीत ! होय मी हा अनुभव नुकताच घेतला आहे.  अगदी मनापासून सांगतो की असं मला वाटणं हेच मुळी माझ्या स्वत:च्या पचनी पडलं नव्हतं.  माझा सुद्धा ह्यावर विश्वासच बसत नव्हता हे मात्र खरं !  असं काय झालं की ज्यामुळे मला जगावं की मरावंअसे वाटले असेल ! तसं फारस काही गंभीर प्रकरण नाही.  म्हणजे माझ्याच मनाचा वेडेपणा म्हणा हव तरं.  पण असं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात.  हे मात्र मी अगदी निष्ठून सांगू शकतो.  म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण कधी तरी आलेला असतो की ज्यामुळे आपण थोडेसे व्यथित होतो आणि काही काळासाठी तो एक क्षण तुम्हांला मानसिकरीत्या ढासळूनही टाकतो अथवा आयुष्याला नवी उभारी देऊन जातो.  मनाच्या कोपऱ्यात कित्येक वर्ष जतन केलेला तो एक क्षण असा असतो जो आपल्या काळजात अगदी शांतपणे विसावलेला असतो.  आयुष्याच्या उतरणीला तो क्षण आपसूकच पुन्हा एकदा आपल्या जवळ येतो, आपल्याला स्पर्श करतो आणि अलगदपणे आला तसाच लगेचच दूर निघूनही जातो.  आपण त्या क्षणाकडे,  अगदी तो पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत पहात राहतो. त्यावेळेस आपल्याला काहीच म्हणजे काहीच सुचत नाही.  नंतर जेंव्हा तो क्षण आपल्यापासून दूर गेल्याची जाणीव होते ना,  तेंव्हा त्या क्षणाला वाटतं.. जगावं की मरावं... ”To be or not to be”.  प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादाच क्षण असतोच की ज्यामुळे आपल्या मनात तात्पुरती हा होईना ही भावना उत्पन्न होते आणि तीच खुण असते आपण माणूस संवेदनशील माणूस असल्याची.  स्वत:शी प्रामाणिक असल्याची. एक नक्की सांगतो की हा क्षण जपण्यात आपण कधीही कमी पडता कामा नये.  मनाच्या एका कोपऱ्यात अगदी अलगदपणे जतन करून ठेवलेला हा एकच क्षण असा असतो की जो आपल्याला हे आयुष्य जगण्यास मदत करत असतो.  बऱ्याचदा हाच तो एक क्षण आपले सारे आयुष्य व्यापून टाकतो . आयुष्याच्या ह्या बहुरंगी आणि बहुढंगी नाटकाचा हा एकच क्षण सूत्रधार असतो, जो आपल्याला एखाद्या कठपुतलीच्या बाहुली सारखे नाचवत असतो आणि आपणही त्याच्या तालावर बेलाशकपणे नाचत असतो.  त्यालाच तर आयुष्य म्हणतात !  म्हणजे आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जे काही जगतो त्याला आयुष्य न म्हणता ह्या एका क्षणाला आयुष्य म्हणायचे की काय ! तो एक क्षण कुठलाही असू शकतो.  अर्थात तो प्रत्येकाला थोडेसे आत्मपरीक्षण करून मनाच्या कप्यात खोल खोल जाऊन,  अगदी काळजाच्या तळाशी जावून शोधायचा असतो.  तो क्षण कसा असतो,  काय असतो,  आयुष्यात केव्हा आलेला असतो,  कुठे आलेला असतो,  कोणाबरोबरचा असतो,  कशामुळे अवतरलेला असतो,  त्याचे त्यावेळेस चांगले वाईट काय परिणाम झालेले असतात,  त्यात कोणी सुखी तर कोणी दु:खी झालेले असते का ?  असे आणि अंजून किती तरी प्रश्न आपल्याला पडतात.  अर्थात ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे सापडतातच असेही नाही.  आणि हो जरी उत्तरे अथवा उत्तर सापडले तरी,  शेवटी एकच प्रश्न उरतो तो म्हणजे जगावं की मरावं”.. To be or not to be..

तरीही असं वाटतं की..

आयुष्य इतकंही सोपं नाही, जितकं आपण समजत असतो |
आयुष्य इतकंही अवघड नाही, जितकं आपण ते करून ठेवतो ||


रविंद्र कामठे

“सुखी माणसाचा सदरा”


सुखी माणसाचा सदरा

गेले कित्येक दिवस मी सुखी माणसाचा सदरा आणि त्या सदरयातील सुखी माणूस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे.  का कोण जाणे पण मला अजून तरी माझ्या ह्या प्रयत्नांस म्हणावे असे यश काही लाभलेले नाही ! त्यामुळे मला सर्वात आधी सुखाची व्याख्याच शोधावी की काय असे सारखे वाटू लागले तर नवल नको !  सुख म्हणजे काय असते ?  काय केलं की ते मिळतं ? सुख कसं असतं ? सुख कसं दिसतं ? सुख कसं लाभतं ? काय पुण्य केलं की ते मिळतं ? सुख कशाला म्हणायचं ? दु:ख नसणं म्हणजेच सुख का ? दु:खात सुख शोधायचं असतं का ? वगैरे वगैरे.  दु:ख म्हणजे तरी नक्की काय असतं ? सुख आणि दु:ख ह्याची विभाजनी कशी करायची ?  त्यांच्यातला फरक कसा ओळखायचा ? मन अगदी भंडावून गेलं आहे हो माझं ह्या आणि अशाच मारुतीच्या शेपटा सारख्या कधीही न संपणाऱ्या प्रश्नांनी !  जीव अगदी मेटाकुटीला आलायं.

त्यांच कारण की, मध्यंतरी मी आमच्या सोसायटीच्या मिटींगला गेलो होतो.  बऱ्याच दिवसांनी सर्व सभासदांची निवांत भेट होईल आणि त्यांची ख्याली खुशाली कळेल आणि त्यात एखादातरी सुखी माणूस भेटल अशी एक भाबडी आशा मनात घेऊनच मी ह्या मिटींगला गेलो होतो.  परंतु काय सांगू ह्या मिटिंग नंतर तर मी थोडासा अंतर्मुख झालो होतो.  माझ्या सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधाला यश काही येत नव्हते.  मला खात्रीच वाटायला लागली की ह्या जगात सुख नावाचे असे काही नसतेच !  सुखाच्या आपल्या सगळ्या कल्पना ह्या भ्रामक वाटायला लागल्या होत्या.  जे काही आहे ते म्हणजे दु:ख, समस्या, अडचणी, अडथळे, दुरवस्था, नैराश्य, कटकट, शारीरिक व्याधी, मानसिक ताणतणाव, कष्ट, ओढाताण, असमाधान, दुर्दैव, अंधार  आणि अंध:कार इत्यादी इत्यादी.

मिटिंगला सोसायटीच्या अध्यक्षांनी सुरवात केली. त्यांचाकडे पहात असतांना माझी नजर सहज त्यांच्या पायवर टाकलेल्या पंच्याकडे गेली आणि काही क्षण मी सुन्न झालो होतो.  होय, त्यांचा उजवा पाय खोटा होता त्या पंच्यामधून पायाची गुलाबी बोटे दिसत होती पण त्यांची बराच वेळ हालचाल होत नव्हती म्हणून मी जाणीव पूर्वक पहिले आणि मला गुढघ्याच्या खालील तो पाय खोटा असल्याचे जाणवले.  मला अगदीच कसतरी झालं.  मी हलकेच नजर थोडीशी बाजूला केली तर मला बाजूला त्यांच्या खुर्ची जवळ एक पांगुळगाडा दिसला. काय बोलावे काही सुचतच नव्हते.  मी मनाचा धीर करून शेवटी त्यांना अगदी हळूच विचारले की, अण्णा (सगळे त्यांना अण्णा म्हणतात) हे कधी झाले.  त्यावर ते अगदी सहजपणे म्हणाले अरे ही तर माझ्या सखासोबती मधुमेहाची कृपा दुसरे काय !  झाले ५-६ महिने.  आता हा खोटा पाय आलाय ना त्यामुळे लागलोय परत जोमाने कामाला.  मला काय बोलावे हेच सुचेना.  ह्या माणसाचे वय आहे साधारण ७०-७२ त्यात मधुमेहाची आणि हृदयविकाराची व्याधी गेली १५-२० वर्षे सोबतीला.  तरीही त्यांच्या कामाची ही तडफ व त्यांच्या जिद्दीला मला सलाम करावासा वाटला आणि ह्या एवढ्या दु:खातही खचून न जाता पूर्वी इतक्याच सचोटीने काम करण्याच्या त्यांच्या ईर्षेला मी साष्टांग दंडवत केला आणि मनोमन विचार केला की त्यांच्या अंगावर जो आत्ता असेल तोच असले का, मी सोधत असलेला सुखी माणसाचा सदरा आणि त्यातला सुखी माणूस !

ह्या प्रकारामुळे माझे काही केल्या ह्या मिटिंग मध्ये लक्ष लागेना.  माझी नजर त्यात काहीतरी वेगळेच शोधत बसली होती.  एक एका सदस्याकडे मी एक नजर टाकली.  जवळ जवळ १५ सदस्य जमलेले असावेत.  सगळेच साधारण ५०-७५ वयोगटातील असतील, एखाद दुसरा ४०-४५ असावा. मी माझ्या बाजूला बसलेल्या अजून एका वयस्कर सदस्याकडे पहिले आणि त्यांच्या मनगटावर चिकटवलेल्या रक्त तपासणीच्या चिकटपट्टीकडे माझी नजर गेली.  काका नुकतेच मधुमेहाची तपासणी करून तसेच मिटींगला आले होते.  आता मला जरा जास्तच अस्वस्थ व्हायला झाले.  मी विचार करायला लागलो की इथे बसलेल्या एका तरी माणसाच्या अंगावर सुखी माणसाचा सदरा असायलाच हवा.  मलाच तो का दिसत नाही ?  माझी नजर पुन्हा एकदा तो सुखी माणसाचा सदरा शोधू लागली.  माझ्याही कळत नकळत मी मिटींगला जमलेल्या प्रत्येक सदस्यास न्याहाळू लागलो.  उपस्थित प्रत्येक सदस्याला काही ना काही तरी समस्या अथवा अडचण होतीच.  तरीही कोणाची तक्रार नव्हती. कोणाला नुकताच स्वादुपिंडाचा आजार जडला होता तर कोणाला हृदयविकाराचा, अगदी माझ्या सारखा.  मधुमेह तर जवळ ८० प्रतिशत लोकांचा साथीदार झाला होता.  माझ्याच वयाच्या एका सदस्याला तर कर्क रोग झाला होता आणि त्यातून तो सुधारून आज अतिशय उत्साहाने चक्क मिटींगला आला होता.  काही सदस्य उतार वयामुळे थोडेसे थकल्या सारखे वाटत होते एवढेच.  त्यात एका दोघांची मुले परदेशात असल्यामुळे एकटेपणामुळे थोडेसे उदास वाटत होते परंतु त्यांचाशी बोलतांना त्यांचा तसा काही फारसा तक्रारीचा सूर दिसून येत नव्हता.  उगाचच मलाच तसे वाटत असावे बहुधा !  नुकेतच एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते तरी त्यांचा मुलगा आणि त्याची आई ते दु:ख विसरून अगदी सर्वसामान्यपणे वागत होते. असो.  एका काकांना वयाच्या ७५ला आहे हे घर पाडून पुन्हा नव्याने बांधून त्यांच्या दोनही नातवांची सोय, ह्याची देही ह्याची डोळा करून पाहण्याची जिद्द होती.  कर्मधर्म संयोगाने अजूनतरी त्यांना फारशी शाररिक समस्या भेडसावत नव्हती.  नाही म्हणायला नुकतेच त्यांचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली होती तरीही काका अजूनही त्यांचा व्यवसाय करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यात यशस्वी झाले होते.  त्यांच्या ह्या महत्वाकांग्शेमुळेच की काय त्यांच्या अगावरील सदरा मला सुखी माणसाचा भासला होता.  तरी अजून मनाची खात्री होते नव्हती !

माझ्या डोक्यातले हे विचार चक्र असेच चालू होते.  त्याच नादात मिटिंग कधी संपली तेच मला कळले नाही.  मी नियमाप्रमाणे तिथे ठेवलेल्या वहीतील नोंद केलेल्या जागी माझी स्वाक्षरी करून बाहेर पडलो आणि माझ्याच नादात घरा कडे चालू लागलो.  सुखी माणसाचा सदरा शोधण्यासाठी.....

एकदम माझ्या मनात विचार आला की, जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती जी कोणी असेल तिच्या अंगावर तर नक्कीच सुखी माणसाचा सदरा असणार आणि त्यात तो सुखी माणूस दडलेला असणार !  अगदी माझ्या डोळ्यासमोर अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, किर्लोस्कर, गरवारे, ह्यांची नावे तरळून गेली.  तसेच एकदा वाटले की भारताच्या पंतप्रधानांच्या अंगावर तर नक्कीच असणार सुखी माणसाचा सदरा !  एकदा असेही वाटले की सध्याच्या काळातील साधू (बुवा-बाबा), संत-महात्मे (म्हणजे तशी बिरुदावली लावणारे), थोर राजकारणी, सत्ताधीश, शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, इत्यादी ह्याच्यापैकी कोण्याच्या तरी अंगावर सुखी माणसाचा सदरा तर नक्कीच असायला हवाच.  शेवटी मला वाटायला लागले की माझेच काही तरी चुकते आहे.  मला माझा ह्या सुखी माणसाच्या सदरयाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलायला हवा.  ज्यासाठी मी जीवाचा आटापिटा चालविला होता त्यासाठी शेवटी मला माझा दृष्टीकोन बदलण्याचा एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा कौल माझ्या मनाने दिला.  मी आता वेगळ्याच चष्म्याने ह्या जगाकडे पाहायला लागलो आणि काय आश्चर्य मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता दिसू लागली.

इतका वेळ मी वेड्यासारखा सुखी माणसाचा सदरा आणि त्या सदरयातील सुखी माणूस शोधत बसलो होतो आणि तिथेच गफलत झाली होती माझी दुसरे काही नाही !  आता हळू हळू माझ्या एक गोष्ट लक्षात यायला लागली होती ती म्हणजे जन्माला आल्यापासून ते मरे पर्यंत माणसाला फक्त आणि फक्त समस्यांचाच गराडा पडलेला असतो, अर्थात समस्या कशाला म्हणायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.  जन्म आणि मरण ह्यामधील जे काही अंतर असते तेच म्हणजे आयुष्य आहे हेच मी विसरलो होतो.  ह्या आयुष्यात अडी-अडचणी तर येणारच ना ! चांगले-वाईट प्रसंग तर खच्चून भरलेल असणारच ना ! कडू-गोड घटनांचा रांजण तर भरलेलाच असणार ना  !  दु:खाचा डोंगर समोर उभारलेला असतोच ना ! त्यावर मात करत हे जीवन हर्षौउल्हासाने जगणे म्हणजेच सुख असावे असे मला तरी वाटले.  उगाच रडतकढत हे आयुष्य काढणे म्हणजे दैवाने दिलेला सुखी माणसाचा सदरा स्व:ताच्या हाताने टराटरा फाडून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेऊन, मिळालेले हे आयुष्य कुढत काढणे होय, असे मला वाटायला लागले होते आणि हाच काय तो सकारात्मक बदल मला अगदी प्रकर्षाने जाणवत होता हो.

आपण आयुष्यभर जगण्यासाठी वणवण करतो, का तर मेल्यावर जळण्यासाठीचे सरपण साठवायचे असते म्हणून.  आपण जगतोच कशासाठी हेच उमगतच नाही, कारण ह्या सरपणाचे जगतांनाही आपल्या मनावर एकप्रकारचे दडपण असते.  अहो, जर जन्मताच मृत्यूही नशिबी लिहिलेला असेल, तर मरण्याच्या दडपणातही जगण्याचेही एक वेगळेपण आहे हे नको का कळायला.  शेवटी काय मातीतून जन्मून मिसळावे मातीतच लागते ना !  म्हणुनच वेगळेपणाने जगण्यात मृत्यूचेही एक अजाणतेपण आहे हे लक्षातच येत नाही आपल्या.  शेवटी काय हो, प्रतिभेने मिळवलेली आपली ही प्रतिष्ठा आणि ह्या अजाणतेपणातच आपल्या प्रतिष्ठेचे देवपण असते हेच मुळी आपल्याला उमगत नाही.  शेवटी काय सरपणासाठीचीच आपली ही एक धडपड मला वाटते आणि त्यातूनच ह्या धडपडीच्या देवपणातून शेवटी मृत्यू हे एक समर्पण आहे असे भासावे, हेच तर सुखी माणसाचे लक्षण नाही का ?

मानले तर आयुष्यात खूप सुख असते हे म्हणतात नाही तर दु:खच दु:ख असते हे अगदी खरं आहे हो.  ह्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनाला कंटाळून मी शेवटी उगाचच सुखी माणसाचा सदराविकत घ्यायला अनेक दुकानांतून फिरत होतो.  अगदी खूप नावाजलेल्या संस्थांच्याही दुकानात जावून आलो.  सगळी कडे एकच उत्तर मिळाले मला,  ‘आमच्याकडे अतिशय मौल्यवान अशा कापडाचा, उत्तम कारीगिरी आणि रेशमी धागा वापरून तुमच्याच मापाचा शिवलेला सदरा आहे.  त्याला एक खिसा ठेवला आहे त्यात ते जे काय सुखकी काय म्हणताय ना तुम्हीं तेवढे मात्र तुमचे तुम्हांलाच शोधून भरून ठेवावे लागेल.  त्यांची कुठलीही किमंत आम्ही तुम्हांला लावणार नाही.  फक्त सदऱ्याच्या पैसे द्यावे म्हणजे झाले’.  आता हे सुखम्हणजेच भावनिक, मानसिक, शारीरिक, आत्मिक, सात्विक, आर्थिक, बौद्धिक, शाब्दिक, तात्विक, तांत्रिक, अलौकिक, तारांकित, मानांकित, पारंपारिक, संसारिक, व्यावहारिक, प्रासंगिक, शृंगारिक, वैयक्तिक, सामाजिक, अध्यात्मिक, कौटुंबिक, प्रापंचिक, आधुनिक, वैज्ञानिक, असे समाधान वगैरे वगैरे जे काही आहे ते ज्याचे त्यानेच ज्याच्या त्याच्या प्रारब्धातील संचीतानुसार जमा करून ह्या खिशात भरायचे आणि हा सुखी माणसाचा सदराअंगावर घालून मिरवायचे.  हे उमजल्यावर, आपण इतके कसे काय वेडे होतो आणि इतके साधे गणित आपल्याला कसे कळले नाही ! असे म्हणत मी मनातल्या मनात स्वत:लाच कोसत होतो.

त्याच वेळेस मला एका नुकत्याच पाहिलेल्या चित्रफितीची आठवण झाली.. त्यामधील नवऱ्याला दोन्ही पाय नसतात आणि त्याच्या बायकोला एक हात नसतो आणि दुसरा हात अर्धा असतो.  घरातील कामे अथवा बाहेरील कामे करण्यासाठी त्यांनी ह्या समस्येवर उपाय शोधून काढलेला असतो.  तो म्हणजे, बायको आपल्या पाठीवर एक बकेट लावते व त्यात नवऱ्यास बसवते व ती नवऱ्याचे पाय होते तसेच नवरा तिच्या पाठीवरील बकेट मध्ये बसून तिचे हात होतो.  त्यांच्या शारीरिक व्याधीवर अथवा समस्येवर ह्या दोघांनी मिळून काढलेला हा भावनिक आणि मानसिक तोडगा मला खूप काही शिकवून गेला.  डोळ्यात नुसतेच पाणी नाही आले तर माझा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा एक दृष्टीकोनच मिळाला आणि इतका वेळ वेड्यासारखा सुखी माणसाचा सदराजो मी इकडे तिकडे सर्वदूर शोधत होतो तो मला माझ्याच अंगावर आपसूकच मिळाला.  म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा”, तशीच काहीशी माझी गत झाली होतो, नाहीतर काय !

माझ्याच अंगावरचा सुखी माणसाचा सदराआणि त्याच सदरयातील सुखी माणूस मलाच दिसत नव्हता हो आणि शब्द सुचले की...
जेंव्हा आयुष्य माझे ढळायला लागले,
तेंव्हा आयुष्य मला कळायला लागले ||

रविंद्र कामठे

Saturday 15 September 2018

“आंजर्ले - पृथ्वीवरील एक स्वर्ग/नंदनवन"





आंजर्ले - पृथ्वीवरील एक स्वर्ग/नंदनवन

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामधील आंजर्लेहे एक अतिशय नयनरम्य असे गावं.  अगदी ह्या पृथ्वीवरील स्वर्ग अथवा नंदनवन म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही, ह्याची प्रचीती तुम्हांला माझ्या ह्या लेखातून येईलच ह्याची मला खात्री आहे.

तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीत वसलेलं, नारळ आणि पोफळीच्या उंचच उंच वाड्यांनी गच्च भरलेले एक अतिशय सोज्वळ, सात्विक असे गावं म्हणजेच आंजर्ले”.  ह्याला वाकडं आंजर्लेही म्हणतात, जेंव्हा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस दापोलीहून वाट वाकडी करून ह्या गावाला पोहचायची तेंव्हाची गोष्ट आहे ही.  आता हर्णे बंदरा जवळील (मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेलं हेच ते बंदर) खाडीवर पूल झाल्यापासून दापोलीहून बसने थेट गावात येता येते.  आंजर्ले गावं हे कड्यावरचा गणपतीमुळे सर्वदूर प्रसिद्ध आहे.  ह्या गणपतीच्या खूप आख्यायिका आहेत आणि आंजर्ले गावाचीच काय पण येथे येणाऱ्या प्रत्येकाची ह्या गणपतीवर श्रद्धा आहे.  खूप प्रसन्न भावमुद्रा असलेली ही मूर्ती खूप मनमोहक आहे.  माझ्या पाकिटात मी ह्या गणपतीचा एक फोटाच ठेवलेला आहे. कड्यावर म्हणजे आंजर्ले गावाच्या बाजूला जो डोंगर आहे त्यावर ह्या गणपतीचे खूप सुंदर पुरातनकालीन मंदिर आहे.  ह्या डोंगराची उंची साधारण पुण्यातल्या पर्वती एवढी असेल.  आता मात्र मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे व तिथे भक्तांसाठी एक निवासस्थानही बांधण्यात आले आहे.  कड्यावरून पहिले की तीनही दिशांना म्हणजे दक्षिण, पश्चिम, उत्तरेस नजर संपेपर्यंत निळाशार अथांग समुद्र आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो.  त्यात पूर्वेस डोंगराच्या हिरव्यागार कुशीत वसलेलं छोटसं आंजर्ले हे गावं म्हणजे ह्या पृथ्वीवरील स्वर्गच नव्हे तर नंदनवनच होय.

माझ्या बायकोचे हे आजोळ.  तिच्या मामाची वाडी ह्या पृथ्वीतलावरील स्वर्गात / नंदनवनात आहे.  मामा मामी (आता देवाघरी असतात), दोन मेव्हणे, वहिन्या आणि त्यांची प्रत्येकी दोन चिल्लीपिल्ली (अर्थात जी आता खूप मोठी झाली आहेत), एक मेव्हणी जिचे २५ वर्षांपूर्वीच लग्न झालेलं.  असे छोटेखाणी खाऊन पिऊन सुखी असलेलं कुटुंब.  त्यातील लहान मेव्हणा शहरामध्ये नोकरीला असतो आणि मोठा मात्र गावातच असतो.  मी ह्या नंदनवनात गेले २५ वर्षे अगदी नित्यनेमाने जवळ जवळ दर वर्षी ३-४ दिवसांसाठी का होईना जात असतो.  आम्हीं मेव्हणीच्या लग्नाचा सोहळा मामाच्याच अंगणात पाहिला आहे आणि त्याचा मनसोक्त आनंदही लुटला आहे हो.  आंजर्ल्याला पोचण्यासाठी मी सर्व प्रकारच्या पद्धतीने प्रवास केला आहे अगदी बस, बैलगाडी, तर(होडी) दुचाकी, व चारचाकी.  पृथ्वीवरील ह्या नंदनवनाचा मी मनमुराद लाभ घेतला आहे हे माझे नशीबच.

बसचा शेवटचा थांबा जिथे आहे तिथे पाठ करून उभे राहिले की समोरच्या पाखाडीत (ह्याला पाखाडी का म्हणतात हे मला अजून समजले नाही !) मामाची वाडी आहे.  नारळ पोफळीच्या बागेने गच्च भरलेली वाडी, एखाद दुसरे आंब्याचे झाडं, फणसाचं झाडं, मिरी, जायफळ आणि खूप सारी फुलझाडे असलेली, त्यात लाल जांभाच्या दगड मातीतून, लाकडाच्या मोठ मोठ्या पटया वापरून बांधलेले दुमजली घर नव्हे ही तर मामाची माडी.  पुढे मागे भरपूर मोठे आंगण.  आत पडवी, त्यावर प्रत्येकाला हवाहवासा आणि जिव्हाळ्याचा वाटणारा लाकडी पाट वापुरून, लोखंडी सळइने जोडलेला, तीनचार धष्ट्पुष्टांचे वजन पेलू शकणारा एक झोपाळा.  पडवीच्या उजव्याबाजूला गाईंचा गोठा (ज्यात दोन गाई, अजूनही असतात), त्याच्याच थोडेसे बाजूला, त्यांच्या वैरणींचा करून ठेवलेला मुबलक साठा.  पडवीच्या जरा वरच्या बाजूला एक भली मोठी ओसरी आणि त्यात मामीची लाकडी खाट (मामी आजारी असायची तेंव्हा).  आले गेलेल्याची उठबस ह्या पडवीत आणि ओसरीत.  ओसरीच्या मागच्या बाजूला भले मोठे स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली.  अर्थात येथे सगळ्यांनी जमिनीवर मांडी घालूनच पंगतीला जेवायला बसण्याची पद्धत आहे.  गेले ४-५ वर्षे झाले दूरचित्रवाणी आली आहे.  तरीही जेवायला मात्र एकत्रच बसण्याचा एकदम कडक नियमच आहे.  स्वयंपाक घराला लागूनच थोडेसे बाजूला एक भली मोठी मोरी आहे, जिथे धुणीभांडी केली जातात तसेच गेले काही वर्ष झाली बंद न्हाणीघर तसेच संडासही बांधले आहेत.  थोडेसे बाहेर मागील अंगणात एक तुळशी वृंदावन, त्याच्या बाजूलाच एक पहारी सारखं जाडजूड लोखंडी धारदार नारळ सोलण्यासाठीचं पातं (जे नेहमी पोकळ बांबूने झाकलेलं असायचं).  दहा वर्षांपूर्वी मात्र घराच्या मागच्या बाजूला असलेल्या वाडीतच सगळ्यांना परसाकडे जावे लागायचे !  हो वाडीतच नारळाचे दोन ओंडके एका खड्ड्यावर दोन बाजूला उभे टाकलेले असायचे.  त्याला नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या झापांचा आडोसा केलेला असायचा.  मागच्या ओसरीत एक बादली ठेवलेली असायची.  ती जर जागेवर नसेल तर समजायचे की कोणीतरी परसाकडे गेलेलं आहे.  आमच्या सारख्या शहरातून आलेल्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टींची गंमतच वाटायची आणि पोट बिघडलं असेल तर मात्र थोडाफार ओशाळल्या सारखंही वाटायचं.  बायामाणसांची जरा अवघडल्यासारखी अवस्था व्हायची पण पर्यायही नसायचा.  असो. 

घरातली सर्व जमीन ही मातीची आणि ती आठवड्यातून दोन ते तीन वेळा गाईच्या शेणाने सारवलेली.  मी मामीला आणि दोन्ही वहिनींना, आई आपल्या लेकराच्या डोक्यावरून कसा हात फिरवेल त्या मायेने ही मातीची जमीन शेणाने सारवतांना पाहिलं आहे.  त्यामुळे ह्या जमिनीवर बसतांना बस्कर, चटई, चादर, सतरंजी घेऊच नये असे वाटायचं, इतकी ऊब ह्या जमिनीतून मिळायची.

स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला अजून एक ओसरी आहे ज्या मध्ये मामाची स्वयंपाकाची वेगळी भट्टी आहे.  ह्या भट्टीत लाडू, चिवडे, खोबऱ्याच्या वड्या, पातळ पोह्याच्या चिवडा, तळलेले फणसाचे गरे, आलेपाक, बुंदीचे लाडू, रव्याचे, बेसनाचे लाडू इत्यादी पदार्थ बनवले जात.  हा मामाचा आणि माझ्या मेव्हण्याचा जोड धंदा होय.  कारण नारळ आणि सुपारीच्या उत्पन्नावर घरखर्च चालवणे तसेही मुश्कीलच होते.  त्यात मुलांचे शिक्षण त्यांची लग्ने वगैरे तर जरा अश्यकच होते !  माझा मोठा मेव्हणा आणि वाहिनी अक्षरशः दिवसरात्र त्यांच्या संसारासाठी कसे खपतात हे आम्हीं जेंव्हा जेंव्हा सुट्टीला जायचो तेंव्हा पाहायचो.  आम्हाला खूप संकोचल्यासारखे व्हायचे.  परंतु एक वर्ष जरी आम्हीं नाही गेलो तर आम्हांला दूरध्वनी करून येण्याची गळ घालायची ही मंडळी.  इतकं प्रेम आणि जिव्हाळा ह्या कुटुंबाचा आमच्यावर. त्यामुळे त्याचं मन मोडण्याचा मला तरी धीर व्हायचा नाही आणि त्यात आंजर्ल्याला जायचे म्हणाले की बायको आणि मुलगी तर एका पायावर तयारच असायचे. असो. 

मोठा मेव्हणा हे सगळे जिन्नस तयार झाले की ते पितळेच्या डब्यांमध्ये भरायचा, सायकलला पिशवी लावायचा आणि ठरलेल्या गिऱ्हाईकाकडे पोहचवण्याचे कामाला लागायचा.  तो अगदी दूर केळशी, दापोली आडे वगैरे गावांपर्यंत हे डबे पोहचवायचा.  मी सुद्धा एक दोनदा त्याच्या बरोबर माझ्या चारचाकीतून दापोलीला गेलो होतो.  त्याचे हे कष्ट पाहिल्यावर आपण किती सुखात आणि मजेत आहोत ह्याचीच प्रचीती मला आली होती.  एक मुलगा एक मुलगी असा माझ्या दोन्ही मेव्ह्ण्यांचा चौकोनी संसार.  मोठ्याचा मुलगा देवरूखला वेदशाळेत शिकायला (जो आता खूप प्रसिद्ध गुरुजी आहे) आणि मलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होती (जी आता लग्न होऊन मुंबईत राहते आहे).  तर लहानाच्या मुलगा मुलगी दोघेही आंजर्ल्यातच शाळेत जात होते तेंव्हा.  आता मात्र मोठ्याची दोन्ही मुले मुंबईत आपापल्या संसारात छान रमलेली आहेत.  धाकट्याच्या मुलीचे नुकतेच लग्न होऊन ती रत्नागिरीस राहते आहे आणि मुलगा चक्क लेखा परीक्षकाचे शिक्षण रत्नागिरीत घेतो आहे.  धाकट्या मेव्हण्याचे मात्र अजूनही विंचवाचे बिर्हाड पाठीवरच आहे, तो आपला मुबई, पुणे, बडोदा, अहमदाबाद, असे कामानिमित्त फिरतच असतो, पण तक्रार कसली ती नाही. असो.

कोकणाची एक खासियत अशी की, गावात जेमतेम दोन किंवा तीन मुख्य रस्ते.  अगदी तसचं आमचं हे आंजर्ले.  एका बाजूला डोंगराच्या कुशीत समुद्र किनारी वसलेलं गावं.  गावात एक शाळा, एक पोस्ट कार्यालय, एक बँक, एक पार, चावडी, तीन चार मंदिरे, एक रामाचे, एक देवीचे, एक गावं देवीचे, ग्रामपंचायत कार्यालय, एखादा दवाखाना, छोटी छोटी टपरीवजा दुकाने, एक बस थांबा, लाल मातीचे रस्ते आणि रस्त्यांच्या दुतर्फा घरे.  पुढे मोठे आंगण, कौलारू दुमजली माडी आणि मागच्या बाजूला मोठी ओसरी, त्यामागे साधारण एकर दीड एकराची नारळ पोफळीची वाडी. शेजारी शेजारी वाड्या, पण कुठेही बांधावरून वाद नाही की तंटा नाही. (म्हणजे मला तरी जाणवला नाही).  साधारण दोन तिन वाड्यांमध्ये एक गोड्या पाण्याची विहीर मात्र नक्की असणार.  हो समुद्र किनारी घर असल्यामुळे गोड्यापाण्याची विहीर किती जरुरीची असते ते तिथे राहायला गेल्यावरच कळते.  आजकाल ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केलेली दिसते.  विहिरीवर एक पंप लावलेला त्या ठरलेल्या प्रमाणे दिवसाआड वाडीला आलटून पालटून पाणी सोडण्यात येते, सगळे कसे एकदम शिस्तबद्ध.  अगदी आखीव रेखीव कार्यक्रम.  जसे काही नांदा सौख्यभरे ! घरात सदैव माणसांचा राबता असायचा.  आलेगेलेल्या प्रत्येकाचे आदरतिथ्य चालू असते.  शेजारी पाजारी तर आमच्याबरोबर जसे काही त्यांचेच पाहुणे असल्यासारखे वागतात आणि प्रत्येक भेटीत एकदा तरी आळीतील एका शेजाऱ्याकडे जेवणाचे अथवा नाश्ताचे निमंत्रण आवर्जून असणारच.  शहरांमध्ये कुठे दिसतो असा जिव्हाळा !  जाऊदेत नको तो विषय.

मामाने पंप चालू केला की आमचा विहिरीवर आंघोळ करण्याचा कार्यक्रमच ठरलेला असायचा.  आंघोळ करून आवरून झालं की स्वयंपाक घरातून वहिनीची हाक यायचीच की, चला नाश्ता तयार आहे, गरम गरम मऊभात त्यात मेतकुट घातलेलं त्यावर गाईच्या साजूक तुपाची धारच धरलेली असायची, तोंडी लावायला मिरगुंड, कैरीच्या लोणचे काय विचारूच नका.  सगळा शाही थाट असायचा.  तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असणार हे वाचून ! इतका स्वादिष्ट नाश्ता असायचा की त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे हो.  कधी कधी हातसडीचे पोहे असायचे तर कधी मस्त शिरा, उपमा असायचा.  पोटभर नाश्ता झाला की थोड्यावेळाने वाटलेच तर आपल्या शहरी सवयीनुसार एक कप चहा प्यायचा.  थोडेसे झोपाळ्यावर बसून झुलायचे, पोट गच्च झालेलं असायचं, डोळ्यावर झापड यायला लागायची, कधी कधी एखादी डुलकी लागूनही जायची तेच कळायचे नाही.  मामाची, मेव्हण्याची, वाहिनीची त्यांची आपली रोजची कामाची गडबड चालूच असायची, त्यात भरीला भर आमच्या आदरातिथ्याची असायची.  पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी आठी पडलेली नसायची.  दोघांची दोन्ही पोरं सकाळी सकाळीच शाळेत गेलेली असायची.  आम्ही मात्र तंगड्या ताणून आळशी गंगारामासारखे झोपाळ्यावर किंवा पडवीत पसरलेलो असायचो.

थोडावेळ असेच पडून राहायचे आणि मग हळूच अंगणात सायकल आहे का बघायचे.  मेव्हण्याला एकदा विचारायचे त्याला सायकल लागते आहे का, तो नाही म्हणाला की लगेचच सायकलला टांग मारून उंडारायला बाहेर पडायचे हा माझा नित्य नियम.  चांगले ५-६ किलोमीटर सायकलवरून फेरफटका मारायचा.  म्हणजे मामाच्या वाडीतून निघायचे ते थेट बंदरावर जायचे,  बंदरावर थोडासा वेळ घालवायचा, हर्णे बंदरावरून आंजर्ले गावात यायला मध्ये एक खाडी पार करायला लागायची त्यासाठी तर (म्हणजे छोट्या होड्या) असतात, अजूनही आहेत.  आम्ही सुद्धा पूर्वी कितीतरी वेळा ह्याच तरीतून आंजर्ले गावात यायचो.  आता थेट चारचाकीने मामाच्या दारात जातो एवढाच काय तो फरक ! बंदरावरून निघायचे आणि खाडीच्या कडेकडेने अगदी मामाच्या वाडीच्या मागच्या बाजूने जवळील मुरडी गावात एक फेरी मारायची.  जातांना रस्त्यामध्ये जो दिसेल त्याला नमस्कार करायचा त्यांची विचारपूस करायची, म्हणजे सायकल चालवत चालवतच (आपली लई ओळख आहे असे दाखवयाचे).  त्यातले काही नेहमी येत असल्यामुळे मला चांगले ओळखायचे. कधी आले पुण्याहून पाव्हणेअसे पाच सहाजण तरी त्यांच्या कोकणी भाषेत हेल काढून हमखास विचारायचेच.  तेवढीच आमची नसलेली कॉलर ताठ व्हायची.  फिरत फिरत सायकल शेवटी बस थांब्याजवळ आली की जरा वेळ तिथल्या पारावर विसावा घ्यायचा.  तिथे रिकामटेकड्या असलेल्या एक दोघांशी जरा टवाळक्या करायच्या, तेवढीच गंमत म्हणून.  एकंदरीत गावातील माणसांची लगबग पाहायला मिळायची.  काही कोकणी लोकं, कोळी, कातकरी दिसायचे.  काहीं कोळणींच्या डोक्यावर वैरणीचे भले मोठे हारे असायचे.  ते ह्या गावात विकायला यायचे.  त्यांचा व्यवहार (वस्तू विनिमय खरेदी विक्री) म्हणजे एका हाऱ्याला ५ नारळ आणि नारळाच्या झावळी पासून बनवलेले झाप, खराटे इत्यादी.  मी मामाला आणि मेव्हण्याला हे झाप, खराटे बनवतांना पाहिले होते त्याचे गमक मला उमगले होते.  दुपारच्या वेळेस थोडीशी शांतता असते आणि विश्रांतीची वेळ असते तेंव्हा ही मंडळी हे असले झाप वगैरे बनवण्याचे उद्योग करायचे. तेवढाच संसाराला हातभार आणि टाकाऊतूनही चार पैसे कसे करता येतील ते पहाणारी ही साधी भोळी आणि पर्यावरणाची पुरेपूर जपणूक करणारी माणसे !

माझ्या ह्या फेर फटक्यास म्हणजे गावचे उकिरडे फुंकून होईपर्यंत दुपारचे १२ वाजलेले असायचे आणि रिकामटेकडेपणामुळे सायकल चालवण्याच्या उद्योगामुळे उगाचच पोटात खड्डा पडायला लागल्याची चाहूल व्हायची आणि सायकल आपसूकच घराकडे वळायची.  तुम्हीं म्हणाल तुमचा कुटुंबकबिला बरोबर असायचा की नाही, का आपले एकटेच बाजीराव दौडायचे की काय !  कुटुंब तर बरोबर असायचे पण त्यांचे माहेरपणाचे जे काही लाड असतील ना, ते आपल्या मामी आणि वाहिनीकडून येथेच्छ पुरवून घेत, झोपाळ्यावर झुलत बसलेले असायचे.  अगदी मामा मामी देवाघरी गेल्यानंतरही ह्यांचे लाड माझ्या दोन्ही मेव्हण्यांनी आणि वहिनींनी पुरवलेत हो.  फारच नशीबवान आहे आमचं कटुंब ह्या बाबतीत.  नाही म्हणायला संध्याकाळी कड्यावर मात्र आम्ही सगळे बरोबरच जात असू.  अधून मधून बंदरावरही जात असू आम्ही सगळेजण एकत्र.  एक मात्र आहे की आंजर्ल्याचा समुद्र पोहण्यासाठी अजिबात योग्य नाही (असंही कोणाला येत एवढं पोहायला !).  पाण्यास खूप ओढ असल्यामुळे गावातील लोकं समुद्रात अजिबात जावू देत नाहीत.  दरवर्षी काही अप्रिय घटना घडत असतात त्यामुळे कुणीही जोखीम घेऊन देत नाही.  आम्हीं आपले शहाण्यासारखे बंदरावरच गुडघाभरपाण्यात पाय बुडवून वाळूतून जमेल तेवढे शंक शिंपले गोळा करायचो (म्हणजे पुण्यात परत आल्यावर बाकीच्यांना दाखवायला की आम्हीं समुद्रात खेळून आलो आहोत ते ), वाळूत मस्त पैकी किल्ले करायचे, चिटुकल्या खेकड्यांची पळापळ पहायची.  आता तर कासव महोत्सवही होत असतो आंजर्ल्यात दरवर्षी.  घरूनच आणलेला खाऊ खायचा, येथेच्छ गप्पा मारायच्या आणि दमून भागून डुलत डुलत घरी परतायचे.  एक मात्र आहे की इतक्या वर्षात मामा कडे कधीही मासे मात्र काही खायला मिळाले नाही आणि तसे कधी खावेसेही वाटले नाही, अगदी आवडत असूनही.  का कोण जाणे, पण मामा कडे सगळे शाकाहारी असल्यामुळे आणि माझी बायकोही शाकाहारी असल्यामुळे मला फारसा फरक पडला नसावा बहुधा.  असो. 

फेर फटका मारून आलो की सायकल अंगणात लावायची, सगळ्यांशी थोड्याशा गप्पाटप्पा मारायच्या, मामाला त्याच्या कामात थोडीशी मदत करायची, म्हणजे त्यांचे काम न वाढवून ठेवता थोडीशी झाडलोट वगैरे, तर कधी कधी मेव्हण्याला त्याच्या भट्टीत (बुंदीचे/रव्याचे/बेसनाचे) लाडू वळण्यास मदत करायचो. खूप मजा यायची हे सगळे करतांना.  मला झेपतील एवढीच कामे मी करायचो.  थोडासा वेळ जातो ना जोतो तोच स्वयंपाक घरातून मामीची किंवा वाहिनीची जेवायला चला सगळ्यांनी अशी आवई यायचीच.  चुलीवरची गरम गरम चपाती / भाकरी, भाजी, लसणाची आमटी, लोणचं, मिरगुंड, चवदार भात, आणि नारळाची हवी तेवढी बर्फी असा बेत त्यावर येथेच्छ ताव मारायचा आणि हातावर पाणी पडले रे पडले की लगेचच माडीवर जावून तास दोन तास ताणून द्यायची, हा माझा आंजर्ल्यात गेल्यावरचा वेळापत्रकानुसार ठरलेला बेतच असायचा.  ह्याच्या सारखे दुसरे सुख ते काही नाही हो ह्या जगात असेच वाटायचे.  मी तर अगदी स्वत:ला पेशवाच समजून वागायचो. तसाही मी आंजर्ल्याचा जावई होतो ना !

दुपारची कुंभकर्णाची वामकुक्षी उरकली आणि थोडीशी उन्हं खाली आली की आम्हांला सगळ्यांना कधी एकदा कड्यावरच्या गणपतीला जातोय असे व्हायचे.  वाहिनीने गरम गरम चहा तयारच ठेवलेला असायचा.  तो झाला की आम्हीं सगळे, जमले तर लहान मेव्हणा (जेंव्हा केंव्हा तो गावाला आलेला असेल तेंव्हा), दोन्ही मेव्ह्ण्यांची मुले असा लवाजमा कड्यावर निघायचा.  अर्थात मोठा मेव्हणा, दोन्ही वाहिन्या मात्र घरातच थांबायच्या.  त्यांच्या हाताला दम असेल तर त्या येतील ना आमच्या बरोबर हुंदडायला ! आंजर्ल्यातील आमचा मुक्काम हा कमीत कमी तीन दिवस तरी असायचाच.  ह्या तीनही दिवसांत संध्याकाळी कड्यावरच्या गणपतीस जाण्याचे वेधच लागलेले असायचे आम्हां सगळ्यांना.  त्याचे कारण कड्यावरून दिसणारा आंजर्ल्याचा तो नयनरम्य निसर्गरम्य सोहळा अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.  आजवर कितीतरी संध्याकाळी मी ह्या कड्यावर घालवल्यात हे मी विसरूच शकत नाही.  गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे.
 
कड्यावरून आपली नजर जेथपर्यंत पोहोचेल तेथ पर्यंत पाहिले तर सर्वदूर अथांग सागराचे निळेशार पाणी आणि आकाश ह्यांचे अविस्मरणीय असे मिलन दिसून येते.  तिन्हीसांजेची वेळ, सूर्यास्त होऊ घातलेला असतो, वातावरणात संध्याकाळची निरव शांतता पसरलेली असते.  आपण ह्या गर्दीतून लांब जावून मंदिराच्या पाठीमागील कड्यावर जावून विसावायचे आणि निसर्गाची ही अदभूत किमया पहायची.  सूर्य महाराजांनी आकाशात नारंगी रंगाचा भंडारा उधळायला सुरवात केलेली असते.  आपल्या हातातील छायाचित्रक (कॅमेरा) सरसावून बसायचे.  मी तर शेकडो छायाचित्रे काढली असतील आजवर ह्या जागेवरून.  परंतु निसर्गाचा हा सोहळा ह्याची देही ह्याची डोळा पाहण्यात जी काही मजा आहे ती छायाचित्रात नाही बरका !  थोडसं अंधारून यायला लागलेलं असतं.  आपल्या डोक्यावरून असंख्य पक्षांचे थवेच्या थवे घरट्याच्या ओढीने उडत असतात.  त्यांचा तो किलकिलाट आपल्या कानाला एखाद्या संगीतकाराने रचलेल्या नादमधुर रचने सारखा भासतो आणि मन कसे प्रसन्न करून जातो.  समुद्राकडे एक नजर टाकली की क्षितिजावर सूर्यास्ताच्या नारंगी छटेमध्ये दूरवर काळे काळे ठिपके दिसू लागतात.  हो हे म्हणजे दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर परतीच्या वाटेकडे चाललेले आपले कोळी बांधव, त्यांच्या शिडाच्या होड्या हाकून किनाऱ्याच्या ओढीने येतांना दिसतात.  सूर्य अस्ताला गेल्यावर काही क्षण अगदी उदासवाणे वाटते.  पण लगेचच त्याने उधळलेली नारंगी रंगाची छटा वातावरणात एक आल्हाददायक उत्साह आणते.  असे वाटते ह्या कड्यावरून उठूच नये.  इथेच बसून रहावे.  मंद वाऱ्याची एक थंड झुळूक मन कसे हलके करते आणि आपसूकच दोन्ही कर जुळतात ते ह्या निसर्ग निर्मात्याच्या कारीगीरीवर.

गेल्या काही वर्षात दापोलीहून हर्णे बंदरामार्गे आंजर्ल्यात येण्यासाठी मुरडीच्या खाडीवर एक पूल बाधण्यात आला आहे.  त्यामुळे आता दापोली पासून ते अगदी केळशी पर्यंत सर्व गावांचा संपर्क वाढला आहे आणि पर्यटकांचीही सोय झाली आहे.  ह्या वाटेने हर्णे बंदराच्या डोंगरावरून संपूर्ण आंजर्ल्याचे निसर्गरम्य कड्यावरून पाहिलेल्या दृष्यासारखेच जसे काही भल्यामोठ्या नैसर्गिक आरशातच पहिल्या सारखे मनाला वेडं लावणारे ह्या नंदनवनाचे दर्शन होते.  अगदी तीनही बाजूचा अथांग समुद्र आणि डोंगराच्या एका कुशीत वसलेले हे छोटसं आपुलकीचं, माणूसकीच तसेच माझ्यासाठी असलेलं पृथ्वीवरील स्वर्ग / नंदनवन.

कड्यावरून सभोवताली दिसणारे आंजर्ल्यातील नारळ पोफळीच्या वाड्यांचे विहंगम दृश्य इतके मनमोहक असते की वाटते ह्या कड्यावरच आपले एक घर असावे.  दिवेलागणीची वेळ गावात सगळीकडे चुली पेटल्याची जाणीव करून देतात.  हलकासा धूर आसमंतात पसरतांना दिसू लागतो.  वरून लाल मातीचे रस्ते एखाद्या अजगराने गावाला विळखा घातल्या सारखे भासतात.  एखाद दुसरी बैलगाडी लाल मातीचा धुराळा उडवत चाललेली असते आणि आता आपल्यालाही घरी परतावे लागणार ह्याची जाणीव होते. आम्हीं सगळे जण मनात नसतांनाही परतीच्या वाटेला लागतो.  हो पण आता आलो त्या रस्त्याने नाही तर मंदिराच्या मागील बाजूच्या वाटेने उतरायला लागतो.  कारण ह्या बाजूला व्यवस्थित पायऱ्या केलेल्या आहेत तसेच जाता जाता कड्यावरील गणपतीच्या पावलाचे ठसे जिथे उमटले आहेत त्याचे दर्शन घेऊन घ्यायचे असा आमचा परिपाठ आहे.  त्याच वेळेस मामीने सांगितलेली एक आख्यायिका आठवते, की, ‘गणपती बाप्पाने एक पाय समुद्रात आणि एक पाय कड्यावर ठेवला होता व त्याच्या पावलांच्या खुणा ह्या दगडात उमटल्यात म्हणे’.  परतीच्या वाटेवर, कोणी आपली आवडती गाणी गुणगुणत तर कोणी एकमेकांशी गप्पा मारत तर कोणी आपल्याच धुंदीत पायऱ्या उतरायला लागतो.  तसा अंधुकसा प्रकाश असतो अजून, पण शेवटी आपण कोकणात आहोत त्यामुळे खाली बघून पाय उचलत चाललेले बरं म्हणून जरा धास्तावलेलेच असतो.  मामाने तशी दिलेली ताकीदच आठवते.  गावाच्या वाटेला लागलो की रामाचे मंदिर, ग्रामपंचायत, बँक ऑफ बडोदा आणि प्राथमिक शाळा आली की समजायचे की आपण आता घराच्या जवळ पोहोचलो आहोत.

ह्या वाटेला लागले की घराचे वेध लागलेले असतात.  कड्यावरून उतरेपर्यंत संध्याकाळचे ७ वाजलेले असतात.  दोन्ही मेव्हणे-वहिन्या आमची वाट पाहत अंगणात भली मोठी सतरंजी अंथरून निवांत गप्पा मारत बसलेले दिसतात.  त्यांना असे निवांत पाहून माझ्या मनाला एक सुखद धक्काच बसतो, पण छान वाटतं.  त्यांनी आमच्या साठी मस्त पैकी सुक्या भेळीचा कार्यक्रम आखलेला असतो.  एखाद दिवस कधी बटाटेवडा तर कधी भजी तर कधी पावभाजी असाही बेत असतो.  काही विचारू नका.  आमची एवढी बडदास्त ही मंडळी ठेवतात की काही विचारू नका.  कुठून आणतात एवढी माया, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे वेळ, ही माणसे, हेच मला कळत नाही.  मला काही ह्या प्रश्नाचे उत्तर आजवर २५ वर्षात एकदाही मिळाले नाही आणि ते मी शोधण्याचा प्रयत्नही करू नये असेच मला वाटते.  आहोरात्र कष्ट करणारी ही माणसे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एकही आठी मी कधी पहिली नाही, की त्यांना कधी चिडचिड अथवा रागराग करतांना पहिले नाही.  पहाटे चार साडेचार पासून ते रात्री नऊ साडेनऊ पर्यंत त्यांचे हातपाय अखंड चालूच असतात.  दुपारी तासभर जी काय ती विश्रांती घेत असतील तेव्हढीच, ते सुद्धा पाठ जमिनीवर टेकायची म्हणून, बाकी काम, काम आणि काम.  ह्याची प्रचीती मला अनेक वेळा आलेली आहे.  सहज एक गंमत सांगतो.  मामी असतांनाची गोष्ट आहे.  तीनचार दिवस राहून आम्ही उद्या सकाळी परत निघणार होतो.  मामीचे सारखे चालले होते अजून एक दिवस थांबा, गाय विणार आहे, छान ताजा ताजा खरवस खाऊनच जा.  मामीच्या आग्रहाखातर आम्ही एक दिवस मुक्काम वाढवला.  आम्ही सगळे ओसरीवर गाढ झोपेत होतो.  मामा मामी, दोन्ही मेव्हणे आणि वाहिन्यांची चाललेली लगबग आमच्या गावीपण नव्हती आणि अचानक रात्री अडीच तीन वाजता गोठ्यात धप्प असा आवाज झाला.  आम्हांला जाग आली तेंव्हा कळले की गाईने एका गोंडस वासराला जन्म दिला आहे.  मग काय दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्यासाठी ताजा ताजा खरवस तयार.  मामीची मला खरवस खायला घालायची इच्छा पूर्ण झाली आणि माझी तो खाण्याची हौस फिटली.  ह्या खरवसाची मामीच्या हाताची, तिच्या मायेची, चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे असे वाटते.  अजूनतरी मी असा खरवस माझ्या आजवरच्या आयष्यात खाल्ला असेल असे वाटत नाही.

आंजर्ल्याशी गेल्या २५ वर्षातील खूप आठवणी माझ्या स्मृती पटलावर अगदी ताज्या आहेत.  त्या जर लिहायचे झाले तर एक छान कादंबरीच तयार होईल असे वाटते.  बघुयात पुढे मागे हा योग जर जुळून आला तर नक्कीच तसा प्रयत्न करेन म्हणतो.  हे ही नसे थोडके असेच वाटेल मला. 

आंजर्ल्यातच एक मात्र आहे की उदरनिर्वाहनाचे फारसे साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि उत्पन्नाच्या मर्यादेमुळे घरातील एका तरी व्यक्तीस अथवा कुटुंबास मुबई पुणे अशा शहरांमध्ये राहावे लागते.  तिथेही ही माणसे कष्ट करून आपला संसार अतिशय गुण्यागोविंदाने करतात ह्यातच सगळे आले. परंतु आयुष्याच्या सरते शेवटी त्यांना त्यांचे हे गावं मात्र परत खेचून आपल्या भूमीत घेऊन येते ही मात्र इथल्या मातीची, वाडीची किमयाच आहे.

अताशा मलाही असे वाटायला लागले आहे की निवृत्तीनंतर मेव्हण्याला सांगून आंजर्ल्यातच दोन खोल्या भाड्याने (विकत घेणे शक्य नाही) घेऊन राहावे म्हणजे उर्वरित आयुष्य तरी ह्या शहरी वातावरणाच्या धकाधकीपासून दूर, तणावरहित आणि शांत जाईल व सुखासुखी ह्या पृथ्वीवरील स्वर्गाचा/नंदनवनाचा म्हणावा तसा आनंद लुटता येईल.  भरपूर वाचायला वेळ मिळेल.  मनात आले की कड्यावर जायला मिळेल, खूप खूप लिहिता येईल आणि स्वास्थ्यही उत्तम राहील अशी एक आशा मनात उत्पन्न झाली ह्याचेच नवल वाटते आणि गेल्या २५-३० वर्षांची आंजर्ल्याशी जोडलेली माझी ही नाळच असावी असेही वाटते. 

समुद्राच्या पाण्यातील खारटपणा ह्या कोकणातील माणसांच्या स्वभावात काय पण वागण्यातही दुरान्वये दिसून येत नाही.  उलट भर समुद्रात गोड्या पाण्याचे तळे असावे असे ही माणसे !  ह्या सगळ्या पापभिरू माणसांच्या माणुसकीमुळेच त्यांनी ह्या मतलबी, स्वार्थी, पातळधुंडी, मत्सरी, पापी, माणसांच्या भाऊगर्दीतही ह्या पृथ्वीतलावर एक स्वर्ग / नंदनवन साकारले आहे असे वाटते.   ह्या माझ्या जिवाभावाच्या लोकांना तितक्याच प्रेमाने, मायेने, जिव्हाळ्याने, मला साष्टांग दंडवत करावासा वाटतो म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे.
पुणे

Wednesday 29 August 2018

“विश्वास”


विश्वास

विश्वास ह्या शब्दावरच विश्वास कसा ठेवायचा हे खरं तर खूप शिकण्यासारखं आहे आणि ज्याला हे जमतं त्यालाच आयुष्याचा अर्थ समजला आहे असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

माणूस विश्वास कोणावर, कशासाठी, का ठवतो हे त्याचे त्यालाच माहित !  विश्वास म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज, जो आपल्या अंत:करणातून येतो आणि आपल्या काळजाला भिडतो व शब्दरूपी भावनांतून व्यक्त होतो.  तसं पहायला गेले तर जगातले सर्वच व्यवहार, सुविचार, आचार, प्रचार, प्रकार, स्वैराचार, अत्याचार, तक्रार, सरकार, पुरस्कार, तिरस्कार, नकार, बलात्कार, देकार, आकार, विकार, दुराचार, प्रतीकार, सोपस्कार, फेरफार इत्यादी, हे त्या त्या गोष्टींवरील सलग्न असलेल्या त्या त्या माणसांच्या विश्वासावरच तर अवलंबून असतात नाही का !  थोडासा मनाला ताण देऊन पहा म्हणजे तुम्हांला मी हे जे काही विधान केलेले आहे ते पटल्याशिवाय राहणार नाही, ह्याची मला खात्री आहे. 

वर नमूद केलेल्या ह्या गोष्टींवरील आपला त्या त्या गोष्टींच्या संदर्भातील विश्वास हा इतका दृढ असतो की समोरच्याने आपल्याला त्याविरुद्ध अथवा त्याच्या बाजूने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला ना तरी ते पटत नाही.  त्याचे कारण आपल्या मनातील रासायनिक प्रक्रियाच इतकी खतरनाक आहे की आपले मन कळत नकळत ह्या विचारांच्या आधीन होवून बसते, त्यावर विश्वास ठेवते आणि त्यामुळेच की काय, जे घडायला नको असते नेमके तेच घडून जाते आणि शेवटी आपण नियतीकडे बोट दाखवून स्वत:ची सुटका करून घेतो.  अर्थात हे चांगले आणि वाईट ह्या दोन्ही घटनांच्या बाबतीत तितकेच लागू पडते हे मात्र निश्चित आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे की विश्वास कमवायला आपले आयुष्य खर्ची घालायला लागते, पण विश्वास गमवायला एक क्षण, एक छोटीशी चूकही पुरेशी असते”.  असे का !  ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतच नाही असेच वाटते.  उत्तर मिळाले तरी प्रश्न सुटतोच असेही नाही.

माणूस माणसावर अथवा व्यवस्थेवर आपल्या सोयीनुसार विश्वास टाकतो अथवा ठेवतो असे मला तरी वाटते.  म्हणजे ज्या गोष्टींमुळे माणसाची गैरसोय होते तिथे माणसाचा त्या व्यक्तीवरील अथवा व्यवस्थेवरील विश्वास उडायला सुरवात होते.  माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यामुळे एकमेकांवरील विश्वासाला तडा जातो आणि आपल्यातील नातेसंबंधात, मित्रत्वात, व्यावहारिक संबंधात, व्यवस्थेत एक प्रकारचा दुरावा निर्माण होऊन बसतो.  आयुष्यभर मोठ्या कष्टाने कमावलेला हा विश्वास काही क्षणात गैरसमजामुळे म्हणा अथवा असंवेदनशील अशा अहंकारातून निर्माण झालेल्या हट्टापायी म्हणा, किवा संदर्भित प्रसंगाकडे ह्या व्यक्तींच्या बघण्याच्या दृष्टिकोनामुळे, नाहीसा होतो आणि कधीही न भरून येणारी हानी करून जाते.  माणसांची नाती तर विश्वासावरच अवलंबून असतात !  एकदा का ह्या विश्वासाला तडा गेला तर परत ही नाती जुळून येणे जरा कठीणच होऊन बसते आणि समजा यदाकदाचित जुळून आलीच तर ती पुन्हा परत पहिल्यासारखी, पहिल्या इतक्याच विश्वासाने वृद्धिंगत होतील ह्याची शास्वती देणे अंमळ कठीणच !  अगदी काचेला गेलेल्या तड्या सारखी अवस्था होऊन बसते.  ह्यात ज्यांचा काही दोष नसतो अशी काही माणसे निष्कारण भरडली जातात.  त्यांच्या प्रामाणिकपणाची कसोटी लागते.  परंतु त्याला काही पर्यायही नसतो.  ज्याचे चुकत असते त्याला जर कळत असते तर शेवटी ते घडलेच नसते ना ! असो.  हा खेळ आपल्या भावनांचा असतो आणि ह्यात भरकटत जाण्याशिवाय काही गत्यंतर नसते हो.  शेवटी काय तर प्रामाणिक माणसांनाच आयुष्यात सत्व परीक्षा म्हणा अथवा अग्नी परीक्षा द्यावी लागते, अगदी सीते सारखी, हे ही सत्य नाकारून चालणार नाही !

म्हणूनच विश्वास कमवायचा असतो आणि तो आयुष्यभर कसा टिकेल ह्यासाठी कष्ट घ्यायचे असतात हे नक्की.  हीच तर आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्यामुळेच ती सर्व जगात श्रेष्ठ ठरली आहे आणि माझा ह्यावर ठाम विश्वास आहे.


रविंद्र कामठे