Saturday 27 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – १९८४, सूरच न होता संपलेली एक प्रेम कहाणी


अनुभवाच्या शिदोरीतून – १९८४, सूरच न होता संपलेली एक प्रेम कहाणी
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

१९८४ला लॉ कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेंव्हाची ही गोष्ट.  मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉं कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो.  खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असतांना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘रव्या’ तिला आपण तिचे नाव विचारायचे का !  मी त्याला म्हणालो; कशाला उगाच गडबड करतो ! मला म्हणाला; मला ती फारच आवडली आहे, असे म्हणून त्याने स्कूटर त्या मुलीच्या सायकलच्या जवळ नेली.  तो पर्यंत आम्हीं गुडलक चौकात पोचलो होतो आणि नेमका त्याच वेळेस चौकात लाल सिग्नल लागला होता.  मित्राने स्कूटर त्या मुलीच्या सायकल जवळ उभी केली आणि तिच्या कडे बघून हसला !  तिने दुसरीकडे तोंड फिरवले आणि आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने तिला इंग्रजीत हेलो केले आणि सरळ सरळ तिचे नाव विचारले.  ती मुलगी एक सेकंद गोंधळून गेली. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला.  आम्हीं पुढे त्यांच्या मागे फर्गुसन कॉलेज रस्त्याला ज्यायला लागलो. 

आता मात्र मी मित्राला म्हणालो की; जरा गाडी त्या मुलीच्या जवळ घे !  त्याने स्कूटर जवळ नेल्यावर मी त्या मुलीला सरळ सरळ विचारले की, रूपालीत येतेस का !  तुझ्याशी जरा बोलायचे आहे.  तुमचा विश्वास बसणार नाही !  जी मुलगी मघाशी आमच्याकडे ढुंकून बघायला तयार नव्हती ती चक्क; हो म्हणाली !  मनातल्या मनात स्वत:ला शिव्या घालत होतो.  कशाला उगाच झक मारली रावं !  आपल्याला जर त्या गावाला जायचेच नव्हते तर कशाला त्या गावाच्या गाडीची चौकशी केली !  आता भोगा आपल्या कर्माची फळे !

गमती जमतीत जाता जाता माझ्या मित्राने केलेला हा खेळ आपल्या अंगांशी तर येणार नाही ना ! ह्या भीतीनेच माझी घाबरगुंडी झाली होती. मला ह्या मुली जरा बिनधास्तच वाटल्या. त्यातल्या त्यात जीला मी रूपालीत येतेस का विचारले होते, ती एकदमच घारी-गोरी आणि दिसायला खूपच सुंदर होती.  माझ्या मनाची थोडीशी चलबिचल झाली, पण मित्राला ती आवडली असल्यामुळे, मी थोडी माघारच घ्यायचे ठरवले होते व तसेही माझ्यात अजूनतरी असले काही उद्योग करण्याचा साधा विचारही मनात डोकावलेला नव्हता आणि येणेही शक्य नव्हते.

आमची नजरा नजर झाली. ती गालातल्या गालात हसली आणि तिच्या डाव्या गालाला पडलेली खळी पाहून तर माझा जीवच कासावीस झाला, हे मात्र मी अतिशय प्रांजळपणे कबूल करतो.
 
बसता बसता तिने आपणहूनच मला स्वत:ची ओळख करून दिली व तिने नावासहित आपले कोकणस्थी आडनाव सांगितले आणि मला नाव विचारणार तेवढ्यात माझ्या मित्राने, तिला आधी त्याचे कोकणस्थ आडनाव सांगून स्वत:ची ओळख करून दिली आणि नंतर माझी; ते सुद्धा चक्क खोट्या आडनावाने ! म्हणजे एका क्षणात माझे नाव रवी देशपांडे झाले होते, का तर ती मुलगी कोकणस्थ होती आणि मी मराठा होतो हे तिला समजले असते, तर ती आमच्याशी बोललीच नसती, म्हणे !

ह्या प्रकारामुळे मी माझ्या ह्या मित्रावर अतिशय चिडलो होतो.  परंतु त्यांच्या ह्या पहिल्याच भेटीच उगाचच तमाशा नको म्हणून आमच्या मैत्रीखातीर गप्प राहिलो.  ती मुलगी ह्या पहिल्याच भेटीत का कोण जाणे माझाशीच बोलण्याचा प्रयत्न करत होती.  मला राहून राहून वाटत होते, की तिला ओरडून सांगावे की माझे नाव ~~~~रवी कामठे आहे ~~~ देशपांडे नाही !
 
आमची एकमद छान मैत्री जमली होती.  दर गुरवारी आमच्या गाठी भेटी ठरल्याप्रमाणे रूपालीत होत होत्या.  असेच अजून काही दिवस गेले आणि एक दिवस तीने मला जरा बाजूला घेवून; आज संध्याकाळी जरा भेट म्हणाली.  त्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघं लॉं कॉलेजच्या मैदानावर भेटलो.  ह्या भेटीत तिने मला जे सांगितले ते ऐकून तर माझी अवस्था त्रिशंकू सारखीच झाली होती.  ती सांगत होती की, मी तिला पहिल्याच भेटीत आवडलो होतो आणि माझ्याशी लग्न करण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती.  आमची ओळख झाल्यावर जेंव्हा जेंव्हा आंम्ही भेटत होतो तेंव्हा तेंव्हा फक्त मी बोलावतो आहे म्हणून ती भेटायला येत होती, ह्याचा मला त्यावेळेस उलगडा होत होता.
  
आता आली का पंचाईत रावं ! मला ह्या मुलीच्या, ह्या धारिष्ट्याचे खूपच कौतुक वाटले होते.  आमच्या दोघांच्या घरच्या परिस्थितीत जमिन अस्मानाचा फरक होता.  त्यात ती ब्राम्हण, मी मराठा, कसे जमेल आमचे? लग्नाचा विचारही माझ्या मनाला अजून तरी शिवलेला नव्हता ! त्यात माझ्या मित्राने माझे खोटे आडनाव सांगून तिची फसगत केलेली होती व मला तिचा अजिबात विश्वासघात करायचा नव्हता, अगदी तिने माझ्याशी मैत्री तोडली तरी चालेल, ह्या विचाराला त्या क्षणाला मी आलो होतो.  तसेही माझ्या मित्राबरोबरच्या मैत्रीला तर तिने केंव्हाच पूर्णविराम दिलेला होता. 

बोलता बोलता मी ह्या गोड मुलीला विश्वासात घेऊन जे काही खरं आहे ते सांगितले आणि मी तिच्या, कसा योग्य नाही हे पटवून देत होतो.  तिची समजूत घालता घालता माझी तर पुरेवाट लागली होती.  तिला नाही सांगताना माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं; हे आजही आठवलं तरी मन हळहळतं.  ती रडता रडता हातातल्या काडीने मैदानावर एक खड्डा करत होती, ज्या खड्ड्यात आमच्या दोघांच्या, सुरूही न होता संपलेल्या प्रेमाची कहाणी गाडली जात होती...

तास दोन तास आम्हीं आमच्या ह्या सूरही न झालेल्या प्रेम कहाणीचा अंत कसा करायचा ह्याचा विचार करत होतो.  एकदाचे तिचे चित्त थोडे थाऱ्यावर आले.  तिने माझ्या बोलण्यावर गांभीर्याने विचार केला.  मी तिला का नाही म्हणतोय हे पटले, व ती शांत झाली. 

निरोप घेण्याची वेळ जवळ आली तशी ती एकदम भावूक झाली.  तिने माझे, माझ्या प्रांजळ विचारांचे व माझ्यावर असलेल्या सुसंकृत संस्कारांचे तोंडभरून कौतुक केले आणि तिला मी फारच मोठ्या समस्येतून बाहेर काढले, म्हणून माझे मन:पूर्वक आभार मानले होते. 

मला तुझ्यासारखा प्रांजळ मित्र लाभला हे सांगून, निघतांना आयष्यात परत काही भेटलास तर ह्या मैत्रिणीला ओळख दाखवायला कचरू नकोस, असं म्हणून सायकलला टांग मारून माझ्या डोळ्यासमोरून निघूनही गेली.  भरल्या डोळ्यांनी मी आमचे हे सुरूही न होता संपलेलं प्रेम काळजाच्या एका कप्प्यात बंद करून, किल्ली तिथेच मैदानावरच्या त्या ‘खड्ड्यात’ ठेवून निघून आलो.

अशीच दोन वर्ष गेली असतील... आमची लॉं कोलेजच्या मित्रांची १२-१५ जणांची टोळी गणपती बघायला रात्री बाहेर पडली होती.  आमच्या ह्या टोळक्यात माझी होणारी बायको आणि तिची एक मैत्रीणही होती. आम्हीं, आमच्याच धुंदीत नारायण पेठेतून गप्पा ठोकत चाललो होतो आणि अचानक समोरून माझी ही गोड मैत्रिण अवतरली.  रवी~~ऐ रवी~~~ म्हणून तिने मला हाक मारली.  एवढ्या रात्री आपल्याला कोण मुलगी हाक मारते आहे, असे म्हणून मी बघतोय तर काय; तर समोर ही उभी.... तीचे ते लाघवी हास्य आणि डाव्या गालावर पडणारी ती खळी पाहून, एक क्षण मी अजूनही लॉं कॉलेजच्या मैदानावरच आहे की काय; असाच मला भास झाला !

मी एकदम भानावर आलो.  तिची आणि माझ्या होणाऱ्या बायकोची ओळख करून दिली.  अर्थात माझ्या होणाऱ्या बायकोला आमच्या ह्या सुरूच न होता संपलेल्या प्रेम कहाणीची थोडीशी कल्पना असल्यामुळे, माझ्या आयुष्यात पुढे येणारा फार मोठा पेच प्रसंग टळला होता, हे ही तितकेच खरं आहे हो...

रविंद्र कामठे

Monday 22 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – कविता सादरीकरण


अनुभवाच्या शिदोरीतून कविता सादरीकरण
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
२०१४ च्या मार्च मध्ये मला माझ्या प्रतिबिंबह्या काव्यसंग्रहामधील काही कविता सादर करण्याची संधी मिळाली होती.  आमच्याच कंपनीमधील लोकांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविधगुणदर्शनाचा हा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्यात मला माझ्या कविता सादरीकरणासाठी दहा मिनिटे वेळ देण्यात आली होती.
  
माझ्या समोर एक मोठा प्रश्नच उभा राहिला होता की; दहा मिनिटां मध्ये मी किती कविता वाचू शकतो आणि त्यातूनही कुठल्या कविता वाचाव्यात आता आली का पंचाईत !  त्यातही संयोजकांनी मला आधीच सांगितले होते की; आपल्या कार्यक्रमाच्या निवड समितीने सर्वांच्या आग्रहाखातीर तुम्हांला हे कविता वाचन करावयास सांगण्याचे ठरवले आहे, कृपया नाही म्हणू नका.  (मनात मी म्हणालो, तुम्हांला नाही म्हणायला, मला अजून तरी वेड लागलेलं नाही. अशी सुवर्ण संधी कोण सोडेल हो ! )

सर, तुमच्या प्रेम आणि विरह ह्या विषयावरील कविता तर आपल्या कंपनीतल्या तरुण पिढीला खूपच भावल्या आहेत.  तुम्हीं ह्या वयातही (५३-५४) प्रेमावर इतकं सुश्राव्य काव्य कसं काय लिहू शकलात ह्याचे सगळ्यांचा आश्चर्य वाटते आहे !  तुमच्यावरील कामाचा ताण, तुमचे वय, तुमचं एकंदरीत कडक शिस्तीचे वागणे इत्यादी पाहून; तुम्हीं एवढे रसिक असाल, असे कधी वाटलच नव्हतं, आम्हांला !  असं म्हणून आमच्या ह्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाच्या निवड समितीमधील चारपाच जणांची ही टोळी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकून; आमच्यातल्याच दुसऱ्या एका कलाकाराकडे मोर्चा वळवून, माझ्या चेंबर मधून निघूनही गेली...

मी जरा विचारातच पडलो होतो !  ही पोरं गेल्यावर एक क्षण माझ्यावर थोडेसे दडपणच आले होते.  कविता लिहिणे ठीक आहे हो, पण त्या सादर करणे मला तरी खरच खूप अवघड वाटत होते.  कविता सादर करणे ही एक प्रगल्भ कलाच आहे नाही !  मला तसा कविता वाचनाचा काहीच अनुभव नव्हता.  नाही म्हणायला, काव्यसंग्रहांचे प्रकाशन झाल्यापासून अधूनमधून काही छोटेखानी कार्यक्रमात एखाद दुसरी कविता सादर करायची संधी लाभली होती इतकेच.  तसेच मित्रमंडळीत, आप्तेष्टांच्यात थोडेसे कौतुक म्हणून अधून मधून काही कविता सादर करायचो.  पण असं रीतसर रंगमंचावर वगैरे सादरीकरणाचा योग म्हणा अथवा संधी कधी मिळाली नव्हती.  घरगुती मैफिली मध्ये एखाद दुसरी कविता ऐकवणे वेगळे आणि अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काही कविता ऐकवणे वेगेळे !

सादरीकरणाचा अनुभव तर सोडाच पण तशा पद्धतीचे मार्गदर्शनही आयुष्यात कधी कोणा कडून मिळालेले नव्हते.  तरीही एक वाटायचं की ह्या कविता सादर करतांना त्यामधील मला अभिप्रेत असलेलं भाव, कविता सुचतांनाची संवेदना, रसिकांपर्यंत पोचवण्याची ही एक उत्तम संधीच असावी, कवी साठी !

एकतर वयाच्या पन्नाशीत अगदी अपघातानेच कवीझालेला हा रवी’ !  त्यात हौसेला मोल नाही म्हणून पदरमोड करून स्वत:च्या पन्नाशीच्या कार्यक्रमात प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह !  परंतु, ‘रवीतू खूप चांगल्या कविता करतोस रे...अशी अगदी मनापासून दादही मिळवलेली होती.  अर्थात माझ्या ह्या काव्यप्रतिभेवर मी आजवर कधीच जबरदस्ती केली नाही व ला लावून कविता करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, जसं सुचलं तसं मांडलं आणि रसिक वाचकांना ते रुचलं, आवडलं आणि बघता बघता रवी’, ‘कवीझाला...
 
मी जेंव्हा पहिल्यांदा कविता करायला लागलो होतो, तेंव्हा वास्तविक पाहता मला माझ्या कवितेबद्दल खूप बोलावेसे वाटे.  ती कविता लिहितांना मनात आलेले विचार मांडावेसे वाटायचे.  कवितेमधल्या ह्या ओळी मला कशा सुचत गेल्या व त्या कशावरून सुचल्या तर काही काही ओळींचा मला अभिप्रेत असलेला अर्थ उलगडून सांगण्याचा माझा अट्टाहास असायचा आणि अजून बरचं काही द्वंद्व मनात चालू असायचं. आपल्या कविता सादरीकरणात जर का मला हे सगळं योग्य पद्धतीने मांडता आले तर; कसली गंमत येईल ना, असे वाटायचं...त्यातच मी माझे गुरुवर्य कै. सुधीर मोघे ह्यांच्या कविता पानोपानीह्या कार्यक्रमाच्या प्रेरणेतून, कविता सादरीकरणाची सतत तयारी करायचो. माझ्याच आवडीच्या काही कविता, माझ्या खोलीत आरशा समोर उभा राहून मोठ मोठ्याने म्हणायचो.. (अर्थात दारं खिडक्या बंद करूनच !). न जाणो कधी संधी मिळाली तर; तयारी असावी म्हणून..आणि मला आपण फार मोठा कलाकार, म्हणजे कवी सुधीर मोघेंच्या सारखा प्रतिभावंतच झाल्याचा भास होऊ लागायचा !

आमचा हा कार्यक्रम पुण्यातल्या कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षणच्या सभागृहात एका शनिवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित केला होता.  तरुणाईला आवडणारा विषय म्हणजे प्रेम.  ह्याच विषयावरील माझ्या ४-५ कविता (ज्या दहा मिनिटां मध्ये पूर्ण होऊ शकतील तसेच सर्वांना भावतील) मी सादर करायचे ठरवले.  चांगले महिनाभर आधी सांगितल्यामुळे मी भरपूर तयारी करून ठेवली होती.  तरीही कार्यक्रमाच्या आधी पोटात फुलपाखरे उडायची ती अगदी मुक्तपणे उडतच होती !  एक तर माझे पाठांतर खूपच कच्चे असल्यामुळे मला प्रचंड ताण आला होता.  उगाच जोखीम नको म्हणून मी चक्क माझ्या ह्या कविता छापून घेतल्या होत्या आणि त्या तशाच पद्धतीने वाचून सादर करण्याचे पक्के करून स्वत:ची मनशांती केली होती.  अर्थात मला हे कागद फक्त मानसिक आधार म्हणूनच जास्त उपयोगी पडले होते.

शेवटी तो हवा हवासा वाटणारा दिवस उजाडला.  माझे सहावे सादरीकरण होते.  एक एक करून माझ्या आधीचे कलाकार त्यांचा कार्यक्रम सादर करत होते.  मी विंगेतून पहात होतो.  बालशिक्षणचे ते ३००-३५० आसनांचे प्रेक्षागृह आमच्याच कंपनीतल्या सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खचाखच भरलेले होते.  तो भला मोठ्ठा रंगमंच पाहून तर माझे डोळेच विस्फारले होते.  मनावर तणाव जाणवत होता.  घशाला कोरड पडत होती.  हाताच्या पंज्यांना घाम सुटला होता.  सारखं पाणी पित होतो आणि मूत्राशय रिकामे करत होतो.  हे असे एकट्यानेच रंगमंचीय सादरीकरणाचा हा माझा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे पहिलटकरीणीस जे जे काही होत असेल ते ते मला निसर्गनियमानुसार होत होते !

निवेदक मित्र विकास जोशीने माझे नाव पुकारले आणि मी एका हातात ध्वनिक्षेपक आणि दुसऱ्या हातात कवितांचा कागद घेवून.. नमस्कार मंडळी.. म्हणून विंगेतून, अगदी अनुभवी कलाकाराप्रमाणे डुलत डुलत रंगमंचावर, प्रेक्षकांच्या समोर जावून उभा राहिलो.  तो क्षण...अ हा हा हा...असाच होता.  खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात अंधुकसा प्रकाश होता.  समोर पहिल्या रांगेत आमच्या कंपनीचे मालक, अधिकारी वर्ग आणि प्रमुख पाहुणे बसलेले होते.  सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्याकडे होत्या, हे त्या अंधुकशा प्रकशातही मला जाणवत होते.  माझ्या डोक्यावर एक प्रकाशझोत सोडलेला होता.  माझे पाय थोडेसे लटलट कापत होते.  हातातला कागद आणि ध्वनिक्षेपक थोडासा थरथरत होता. माझ्याही नकळत मी उगाचच पायांची हालचाल करत होतो. एक आवंढा गिळला. हे सगळे मी नमस्कार.. उच्चारल्यापासून साधारण ५-१० सेकंदातली ही माझी अवस्था होती...आणि....थोडीशी प्रस्तावना करून मी माझी पहिली कविता सादर करायला सुरवात केली...
तू…..नाही म्हणशील….. ह्या भीतीने, तुला……कधी…… विचारलेच नाही....
पहिल्याच चरणाला प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्या आणि वाहवा हे शब्द कानावर पडले आणि माझ्यातल्या कलावंताच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा एक अविस्मरणीय असा जो काही अनुभव मला आला, तो शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. रसिक प्रेक्षक माझ्या कवितांना दाद देत होते आणि मी पण उत्साहाने त्यांच्या ह्या अनमोल प्रतिक्रियेस दाद देवून माझ्या प्रेमाच्या कविता सादर करत होतो.  प्रेमाचं कोडं.. कधी हसवतं, तर कधी रडवतं ही कविता तर रसिकांना खूपच भावली होती.

कविता वाचनाचे एक शिवधनुष्य मी पेलल्याचा मला आलेला हा अविस्मरणीय अनुभव माझ्यातल्या एका कलाकाराला नक्कीच सुखावून गेला व माझ्या साहित्यक्षेत्रामधील पुढील वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरला.
 
रविंद्र कामठे
७ मार्च २०१९

अनुभवाच्या शिदोरीतून – चीनची सफर


अनुभवाच्या शिदोरीतून – चीनची सफर
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

२००९च्या ऑक्टोबर मध्ये मला चायनाला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी जाण्याचा योग आला होता.  चिंदाव ह्या उत्तर चायना मधील शहरातील एका शैक्षणिक विद्यापिठाबरोबर करार करून काही विशिष्ट कौशल्य ह्या चायनीज मुलांना शिकवण्याचा हा करार होता.  त्यानुसार २६ ऑक्टोबर २००९ला मी आणि माझे अजून दोन सहकारी मुंबईहून शांघाई आणि शांधाईहून ह्या चिंदावला गेलो होतो.

शांघाई ते हुंदाव हा साधारण २ तास विमानाचा प्रवास करून आम्ही हुंदाव विमानतळावर उतरलो तेंव्हा रात्र होती. हुंदाव विमानतळावर तिकडचा अमेरिकन सहकारी मित्र आम्हांला न्यायला गाडी घेवून आला होता.  विमानतळाबाहेर पाऊल ठवले आणि थंडीमुळे जी काही हुडहुडी भरली म्हणून सांगू ! माझी तर दातखिळीच बसली होती.  त्यात अंगावर इतक्या वेळ चढवलेला ओझं म्हणून नकोसा वाटलेला तो कोट होता म्हणून वाचलो होतो.  मी तर अक्षरश: थंडीने कुडकुडत होतो.  कसा बसा सामान सांभाळत एकदाचा आम्हांला न्यायला आलेल्या गाडीत जावून बसलो.
 
हुंदाव ते चिंदाव हे अंतर साधारण ५०-६० किलोमीटर असेल.  मध्यरात्र झाली होती.  आम्हीं इनोव्हा सारख्या एका मोठ्या गाडीत होतो.  त्यांच्या तिकडच्या द्रुतगती मार्गावरून गाडी चालली होती.  बाहेर प्रचंड थडी होती म्हणून गाडीत हिटर लावलेला होता.  अचानक गाडी थांबली.  गाडी एका टोल नाक्यावर होती.  तिथल्या कर्मचाऱ्याने पुढचा रस्ता धुक्यामुळे बंद आहे सांगितले.  खूप धुके दाटले होते आणि वादळी वारे सुटलेले होते.  त्यात मध्यरात्र.  अनोळखी देश आणि शहर.  डोळ्यात बोटं घातले तरी समोरचे दिसत नव्हते.  आयुष्यतील पहिलीच परदेशवारी आणि सलामीलाच हे असले निसर्गाचे तांडव पाहून माझी तर फाटलीच होती.

भल्या पहाटे आम्हीं चिंदाव ह्या शहरात पोचलो.  आमची रहाण्याची सोय ह्या विद्यापीठातील होस्टेलमध्ये करण्यात आली होती.  ह्या शहरातील वातावरण सुद्धा अतिशय थंड म्हणजे २ डिग्री होते आणि अधून मधून बर्फही पडत होता.  थंड वातावरणामुळे तिकडचे लोकं येता जाता गरम पाणी किंवा ग्रीन टी पीत होते व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवत होते हे समजले.
 
दुसऱ्या दिवसापासून लगेचच कामाला सुरवात केली. परंतु भाषेची फारच अडचण येत होती.  आम्हांला जे काही जुजबी चायनीज शिकवले होते त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यात त्यांच्याकडे कोणालाच इंग्रजी येत नव्हते त्यामुळे आमचे तर खूपच वांदे झाले होते.  नाही म्हणायला तो अमेरिकन होता म्हणून बरं आणि अजून एक दुभाषा होता ज्यामुळे आमचा इतरांशी संवाद होत होता.  त्यामुळे मी तर दुभाषाला इतका जीव लावला होता की काही विचारू नका.  मी तर त्याला तळहाताच्या फोडा सारखे जपले होते.  ह्या महिनाभरात तो माझा तर तो खूपच चांगला मित्र झाला होता व अजूनही माझ्या संपर्कात असतो हे विशेष.
 
कामा निमित्त आम्ही आजूबाजूच्या काही शहरांमध्ये खूप फिरलो आणि जाणवले की ह्या चायनीज मंडळींनी खूपच चांगली प्रगती केलेली आहे. मात्र खाण्याचे फार हाल होते हो.  एखादा शाकाहारी असेल तर संपलाच हो ! अर्थात त्यांच्या कडील मांसाहार सुद्धा आम्हांला जरा न झेपणाराच होता.  एकतर आमची जेवणाची सोय हॉस्टेलच्या मुलांच्या कॅन्टीन मधे असल्यामुळे एका वेळेस २००-३०० विद्यार्थी मांसाहारी जेवण करतांना त्या वासानेच कसतरी व्हायचे.  त्यात ही पोरं पोर्कच्या लालचुटुक मांसावर चांगला ताव मारायची.  आपल्या सारखे चिकन नसायचे !  भले मोठे कदाचित बदकच असावे.  आपण भारतात खातो तसले चायनीज जेवण तर कुठेच दिसले नाही.  माझे खायचेच वांदे झाले होते.  मी आपला मालाथांग नावाचे शाकाहारी वाटणारे सूप आणि त्यात आपल्याकडे मिळणाऱ्या म्यागी सारखे नुडल्स घालायचो व एक उकडलेल अंडे असा जेवणाचा बेत ठेवायचो.  जेंव्हा बाहेर जायला मिळेल तेंव्हा शहरात जावून जरा बरे काहीतरी खायचो.  आपल्या सारखे बिस्कीट, पाव वगैरे मिळणे जरा दुरापास्तच होते.  जे काही मिळायचे ते एक तर काय आहे ? कसले असेल ह्याची शंका आल्यामुळे खाणे तर लांबच राहिले ते हातात घेणे सुद्धा जड जायचे.  पण ह्या दुभाष्यामुळे खुपदा आमचे आयुष्य सुखकर झाले होते.  सतत आमच्या बरोबर असायचा; म्हणून मी तरी एक महिना काढू शकलो नाही तर अवघडच होते.

कामानिमित्त आम्हांला त्यांच्या वेगवगळ्या शहरातील मेयरना (महापौरांना) भेटायला लागायचे. त्यांच्या पद्धतीने आम्हांला जेवायला घालायचे.  त्याचे आदरतिथ्य खरोखर खूपच वाखाणण्याजोगे होते. परंतु काय खायचे व कसे खायचे हा एक यक्ष प्रश्न आमच्या समोर उभा ठाकायचा. त्यांच्या त्या चॉपस्टिकने, भात, दाणे, शिजवलेले हे भले मोठे मासे, चिकन वगैरे खाणे म्हणजे कसरतच वाटायची.  एक तर भल्यामोठ्या गोल टेबलावर एका वेळेस १५-२०जण जेवायला बसणार त्यात ते त्यांच्या भाषेत आम्हांला हे घ्या ते घ्या करणार.  त्यात त्यांचे आणि आमचे एकमेकांची भाषा येत नसल्यामुळे झालेले निर्विकार चेहरे पाहून आमचा दुभाषी गोंधळून ज्यायचा व आमच्या मदतीला धावून यायचा. तो जे आम्हांला खाण्यायोग्य वाटेल ते बरोबर सांगून आमची वेळ भागवायचा.
 
ह्या ३० दिवसांत मी तिकडच्या सहकाऱ्यांमध्ये, माझ्या मनमोकळ्या स्वभावामुळे खूप प्रसिद्ध झालो होतो.  विद्यार्थी सुद्धा माझ्याशी खूप हसून खेळून वागायचे.  आम्ही आमच्या काही सहकारी मित्रांच्या घरी एक दोनदा जेवायला गेलो होतो व तिकडे एकदा आपल्या भारतीय पद्धतीचे जेवण म्हणजे फ्लॉवर बटाटा भाजी आणि मैद्याच्या पोळ्या केल्याचे मला चांगले आठवते.  पोळ्या लाटायला पोळपाट लाटणे नव्हते तर चक्क ओट्याचा पोळपाट केला होता आणि बिअरच्या बाटलीचे लाटणे केल्याचे अजूनही आठवले की खूप हसायला येते.  मला मासे खूप आवडता हे कळल्यावर तिकडच्या एका सहकारी मैत्रीनेने; मी भारतात परत यायच्या आधी माझ्यासाठी घरून छान तळलेल मासे कार्यलयात आणून मला खाऊ घातले होते हे आजही आठवले तरी छान वाटते.

एकतर मी ह्या सगळ्यांमध्ये ४६ वर्षांचा जेष्ठ होतो.  त्यामुळे ही सगळी मंडळी, तसेच तिकडच्या संस्थेचे संचालक आणि संचालिका माझी अगदी जातीने चौकशी करायचे व तेवढीच काळजीही घ्यायचे.  एका सहकारी मित्राने घरी बोलावून केलेल्या पार्टीमध्ये मी गायलेले किशोर कुमारचे फुलों के रंग से..हे गाणे तर सर्वांना इतके आवडले होते की त्यांना शब्द कळो अथवा न कळो त्यांनी चक्क रिकाम्या डब्यावर ताल धरून मला उत्फूर्त साथ देवून आमची ही जगा वेगळी पार्टी रंगतदार केलेली अजूनही आठवले तरी झकास वाटते.  भाषेची सर्व बंधने ह्या संगीतमय मैफिलीत कधीच गळून पडायची आणि आम्हांला भरभरून आनंद देवून जायची. 

मला आजही आठवते की एक महिन्यांनी मी माझा व्हिसा संपला म्हणून भारतात परत यायला निघालो होतो तेंव्हा तिकडच्या संचालकांनी खूप मोठी पार्टी दिली होती.  महिन्याभरातल्या माझ्या सहवासाचे, माझ्या आचरणाचे आणि माझ्यातल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे तोंड भरून कौतुक केले होते.  मला त्यांच्याकडील सर्वांत उंची वाईन आणि ग्रीन टी खास भेट देवून गौरवण्यात आले होते आणि माझ्या बरोबर पार्टीतील प्रत्येक सदस्याने त्यांच्या पद्धतीने नाच करून माझा सन्मान केला होता हे आजही आठवले तरी मन कसे गहिवरून येते हो !

प्रेम, लळा, जिव्हाळा जो काही असेल तो असेल, जो मला माझ्या ह्या चीनच्या सफरीत अगदी भरभरून मिळाला होता आणि माझी ही एक महिन्याची चीनची सफर आयुष्यभरासाठी यादगार मात्र नक्की करून गेला होता.  

अगदी नवरात्रात आपण जसे धान्य पेरतो व दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याला ह्या पेरलेल्या धन्याला आलेले हिरवे हिरवेगार तन पाहून मन कसे प्रफुल्लीत होते ना अगदी तसंच काहीसं मला वाटत होतं !
 
“जसं पेरतो तसं उगवतं”.

रविंद्र कामठे
०८ एप्रिल २०१९

Tuesday 16 July 2019

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण
चपराक साप्ताहिकात गुरूपौर्णिमेनिम्मित लिहिलेला हा एक लेख  

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला वेगवेगळे लोकं; मार्गदर्शक, सल्लागार, मित्र, मैत्रिणी, सहकारी, नातेवाईक, आप्तेष्ट, वाचक, रसिक, विरोधक, निंदक ह्या रुपात भेटत असतात.  हेच ते आपले खरे गुरु असतात.  यंदाच्या गुरूपौर्णिमेनिम्मित्त मला लाभलेल्या ह्या गुरूंची आठवण झाली व अतिशय कृतज्ञपणे मला ह्या लेखाद्वारे माझी गुरुदक्षिणा अर्पण करावीशी वाटली.  आयुष्यात मला लाभलेल्या ह्या गुरुंबद्दल मला कायमच आकषर्ण वाटले आहे. गुरुत्वाकर्षण म्हणा हवे तर !
माझ्याच काय पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली आई हीच आपली पहिली गुरु असते हे निर्विवाद सत्य आहे.  आईच्या गर्भात असतांनाच ती आपल्यावर अतिशय प्रेमाने वेगवेगळे संस्कार करून निस्वार्थीपणे आपल्याला घडवत असते. त्याच प्रमाणे आपले बाबा ही आपल्यावर सर्वोत्तम संस्कार करून आपल्याला घडवायचा प्रांजळ प्रयत्न करत असतात.  हेच खरे तर आपले गुरु !  त्यांनी आपल्या साठी खाल्लेल्या खस्ता, आपल्याला घडवण्याचे घेतलेले कष्ट ह्यांची जाणीव ठेवून त्यांच्या उतरत्या काळात त्यांचा नीट संभाळ करून त्यांचा वृद्धापकाळ जितका सुखद करता येईल तितका तो करणे हीच काय ती त्यांना दिलेली गुरुदक्षिणा आहे, असे ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने ठरवले पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे.
मला कळायला लागल्यापासून मी माझ्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आयुष्यात मार्गक्रमण करतो आहे. ह्या जन्मदात्या गुरूंकडून मला स्वाभिमान, इमानदारी, प्रामाणिकपणा, सचोटी, कर्तव्यदक्षता, निष्ठा, कष्ट करण्याची मानसिकता, दुसऱ्यांचा आदर सन्मान करण्याची वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन असे आणि अजून कितीतरी जीवनावश्यक संस्कार भरभरून मिळाले आहेत.  जीवनातील खूप महत्वाची तत्वे आणि मुल्ये मला माझ्या आईवडिलांकडून ह्या संस्कारातून मिळाली आहेत. ह्या संस्कारांच्या बळावरच माझी गेले ५६ वर्षांची कारकीर्द अविरत चालू आहे आणि पुढेही अशीच चालू राहील ह्याची मला खात्री आहे.
आपल्या शालेय जीवनात तर आपले शिक्षकच आपले खरे गुरु असतात.  त्यांनी जीवतोडून आपल्याला केलेले ज्ञानार्जन, कलेचे दिलेले दान आपल्याला आयुष्यभर जगण्यासाठी खूप उपयोगी पडते.  माझ्यावरही शालेय जीवनात शाळेतील शिक्षकांनी तर उत्तम संस्कार केलेच, परंतु त्याच जोडीला माझ्या मोठ्या मामांचेही (जे स्वत: एक आदर्श शिक्षक होते) अमुल्य असे संस्कार माझ्यावर झालेत.  मी आज हो काही आहे अथवा घडलो आहे तो माझ्या ह्या मोठ्या मामांनी मजवर केलेल्या संस्कारांची देण आहे.  त्यांनी मला सर्व प्रथम शिस्त म्हणजे काय ते अगदी प्रेमाने समजावून सांगितले.  तसेच वेळेच भान, वेळेच गणित व महत्व इतके प्रभावीपणे समजावून सांगितले की; मी त्याचीच री ओढत आजवरच्या आयुष्यात यशस्वी झालो आहे.
माझे चुलतेही माझे खूप चांगले गुरु तर होतेच पण आमच्या वयातले ३० वर्षांचे अंतर कमी होऊन ते माझे खूप चांगले मित्रच होते असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.  माझ्या ह्या गुरुंनी मला व्यवहारिक ज्ञानाचे खूप चांगले धडे अगदी वयाच्या १० व्या वर्षापासून दिले आहेत.  त्यामुळेच मी वयाच्या १५ व्या वर्षापासूनच कमवायला लागलो व स्वत:च्या पायावर अभिमानाने उभा राहिलो.
मला उमजलेले एक गुपित तुम्हांला सांगतो; ते म्हणजे आपले मित्र हे आपले खूप चांगले गुरु असतात.  माझ्या आजवरच्या अनुभवातून मी हे तुम्हांला सांगतो आहे.  माझ्या अनेक मित्रांकडून मी वेळोवेळी खूप काही शिकलो आहे.  वयाच्या १५ व्या वर्षी मला लाभलेला माझा गुरु मित्र, ज्याने मला वेश्यागमन का करू नये ह्याची शिकवण प्रत्यक्ष त्या स्थळी नेऊन दिली होती, ज्यामुळे आयुष्यात मला त्याच्या ह्या संस्काराचा खूपच उपयोग झाला व आजवर माझे पाऊल कधीही वाकडे पडले नाही.  योग्य वयात योग्य ती शिकवण जर मिळाली तर ती आपले आयुष्य भरकटण्यापासून वाचवू शकते हे स्वानुभवावरून मी तरी सांगू शकतो.  माझ्या ह्या गुरुंमित्रांनी कुठल्याही गुरुदाक्षिणेची अपेक्षा न ठेवता मला त्यांच्याकडील ज्ञान, कला-गुण, विद्या, क्लुप्त्या अतिशय सढळ हाताने दिल्यात आणि आज जो काही आहे तो मी घडत गेलो.
माझे एक मेव्हणे आहेत ज्यांच्या बरोबर मी वयाच्या १७ व्या वर्षी त्यांच्या फोटोस्टुडीओत काम करत होतो व त्यांच्या कडून व्यवहारिक ज्ञाना बरोबर सामाजिक, प्रासंगिक गोष्टींचे ज्ञानार्जन करत होतो.  हे माझे असे गुरु आहेत की ज्यांनी मला आयुष्यात संघर्ष करायला शिकवले. आयुष्याशी तडजोड कशी करायची ह्याचे त्यांनी मला त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातल्या घडामोडींवरून उदाहरणासहीत नुसतेच समजून सांगितले नाही तर, मला ह्या धकाधकीच्या व बेभरवश्याच्या समाजात स्वत:ला खंबीरपणे उभे राहण्याची कायमची शिकवण दिली.  माझ्या ह्या गुरुंनीच माझ्यातल्या वाहन कौशल्याची जाणीव ठेवून मला उत्तम चालक बनवले आहे. जोखीम कशी, कधी, केंव्हा, कुठे, कशासाठी, कोणाविरुद्ध, कोणासाठी, का घ्यायची ह्याचे अतिशय अफलातून प्रशिक्षण माझ्या ह्या गुरुकडून मला लाभले आहे हे ह्या लेखाच्या निमित्ताने नमूद करतो.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्था; तडजोड, त्याग, प्रेम आणि संयम ह्या चार खांबांवर कशी उभी आहे हे, ३२ वर्षे निघुतीने आमचा संसार करून माझ्या सह्चारीणीनेही माझ्या गुरूचा मान तर नक्कीच मिळवला आहे.
नोकरीच्या काळात मला खूप चांगले सहकारी लाभले.  जे नंतर माझे मित्रच झाले.  हे सहकारी सुद्धा आपले खूप चांगले गुरु असतात.  ह्या सहकाऱ्यांच्या निस्वार्थी भावनेने केलेली मदत सुद्धा एक प्रकारची गुरुविद्याच असते असे माझे तरी मत आहे.  माझ्या ४० वर्ष्याच्या नोकरीत खूप सहकारी मित्र/मैत्रिणी मिळवलेत ज्यांना मी माझ्या आयुष्यातले आदरार्थी गुरूच समजतो.  मी ४० वर्षात जवळ जवळ १४ नोकऱ्या केल्यात.  माझ्या पहिल्याच नोकरीत मी ज्या कारखान्यात होतो त्या कारखान्याचे मालक हे माझे आदरणीय गुरु होते.  आपल्या कामाबद्दलची निष्ठा किती आणि कशी असावी ह्याचे हे मालक म्हणजे मूर्तिमंत उदाहरण होते.  त्यांच्या बरोबर एक वर्ष काम करत असतांना मला जे काही अनुभव आलेत व त्यांनी स्वत: मला ज्या काही दीक्षा एक गुरु ह्या नात्याने दिल्यात त्याच्या जीवावर मी उरलेल्या १३ नोकऱ्या अगदी व्यवस्थित आणि समाधानकारकरित्या करू शकलो. 
नुकताच मी माझ्या शेवटच्या नोकरीतून निवृत्ती घेतली.  ह्या माझ्या शेवटच्या नोकरीत मी माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्ठा म्हणजे जवळ जवळ ११ वर्षांचा काळ अतिशय स्वमिभामाने आणि अभिमानाने व्यतीत केला.  माझ्या ह्या ११ वर्ष्यांच्या प्रवासात ह्या कंपनीचे मालक-संचालक आणि संचालिका ह्या दोघांनी; एक मराठी माणूस जर मनात आणले तर, व्यवसायात कसा यशस्वी होऊन शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हे दाखवून दिले आहे. माझ्यासाठी हे दोघेही माझ्या नोकरीतले आदर्श गुरूच म्हणायला हवे. जरी माझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान असले तरी मी त्यांना त्यांच्या ह्या कर्तृत्वाबद्दल गुरुस्थानीच मानतो. व्यवसाय म्हणजे स्पर्धा ही आलीच ! त्यात जोखीम घेऊन आलेल्या संधीचे सोने कसे करायचे ही एक कला आहे.  त्यात ह्या मराठी दांपत्याने व्यवसायात अशी उत्तुंग भरारी घेवून आपल्या जिद्दीने हे व्यावसायिक यश प्राप्त केले आहे ते वाखाणण्याजोगे तर आहेच, परंतु त्यांच्या ह्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे.  त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मलाही काम करण्याची संधी मिळाली व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला हे माझे अहं भाग्यच आहे.
माझ्या नोकरीतील व्यापातून आणि माझ्या ह्या अनंत गुरूंकडून मिळालेल्या दीक्षेतून मी रोज काही ना काही तरी शिकत होतो व स्वत:ला घडवत होतो.  आयुष्याच्या अशाच एका वळणावर वयाच्या पन्नाशीला मला माझ्यातील काव्यप्रतीभेची जाणीव झाली आणि मी चक्क रवीचा कवी झालो.  माझ्या कवी होण्यात खरं पहाता सर्वात मोठा हात हा नियतीचा होता.  माझ्या मते आपली परिस्थिती हीच आपला खूप मोठ्ठा गुरु असते आणि माझ्या बाबतीत तर ते अगदी तिने सिद्धच करून दाखवले आहे.  एक दोन नाही तर चक्क चार काव्य संग्रह प्रकाशित करून घेतलेत माझ्याकडून ह्या माझ्या गुरूने ! माझ्यातील काव्यप्रतिभेला उमजून, समजून, तिच्यावर अतिशय समंजसपणे, प्रामाणिकपणे  व हळुवारपणे रुचेल, पटेल असे साहित्यिक संस्कार करून, मला सातत्याने लिहिते ठेवून, योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्चाहित केले ते माझे साहित्यक गुरु म्हणजे चपराकचे संस्थापक संपादक हे होय ! माझ्या ह्या साहित्यिक वाटचालीत त्यांचे फार मोठे योगदान आहे.  मी त्यांचा ऋणी आहे. तसेच चपराक परिवारातील सदस्य, जेष्ठ लेखक, कवी, साहित्यिक, समीक्षक, परीक्षक, टीकाकार, माझे सर्व रसिक वाचक ह्यांना सुद्धा मी गुरुस्थानीच मानतो !  माझ्या ह्या सर्व गुरुजनांना मी आज सादर प्रणाम करतो व त्यांच्या ऋणात राहतो, हीच काय ती माझी गुरुदक्षिणा समजावी.

रविंद्र कामठे

Monday 15 July 2019

“माझे मलाच न कळले, आयुष्य हे कसे ढळले”

माझे मलाच न कळलेआयुष्य हे कसे ढळले
चपराकच्या जुलै महिन्याच्या मासिकात छापून आलेला माझा हा लेख 

जिंदगी का सफर है ये कैसा सफर...कोई समझा नही कोई जाना नाही...सफर ह्या हिंदी चित्रपटामधील स्वर्गीय किशोर कुमार ह्यांनी गायलेले हे एक अजरामर गाणे ऐकतांना त्यावर लिहावेसे वाटले. ह्या गाण्यास गीतकार इंदीवर ह्यांचे शब्दत्यावर कल्याणजी आनंदजींनी चढवलेला सोनेरी सुरांचा साजअप्रतिम छायाचित्रण तसेच राजेश खन्ना-शर्मिला टागोर ह्या द्वयीचा कथेला आणि प्रसंगाला साजेसा संवेदनशील असा अभिनय आणि त्यावर कळस म्हणजे आपल्या कर्णमधुर आवाजाने हे गाणे आज ४८ वर्षांनीही आपल्या ओठांवर गुणगुणायला लावणारा किशोरदांचा स्वर्गीय आवाजम्हणजे निसर्ग निर्मित अशी एक अविस्मरणीय कलाकृतीच म्हणावयास हवी.

ह्या गाण्यात गीतकाराने आपल्या शब्द संपदेने कथेला साजेसे असे आयुष्याचे अतिशय क्लिष्ट असे गणित आदी सोप्या भाषेत आपल्या समोर मांडले आहे.  हे जरी सफर’ ह्या चित्रपटासाठी लिहिलेलं गीत असलं तरीप्रत्यके माणसाला आपल्या आयुष्याबद्दल पडलेल्या प्रश्नाचं प्रतिनिधित्व करणारच आहे असेच वाटते आणि हीच तर प्रतिभावंत कलाकाराची ओळख असावी ह्यात काहीच वाद नाही. म्हणूनच मला हे गीत पुन्हा एकदा लिहून माझ्या प्रतिभा शक्तीस उजाळा द्यावायासा वाटला.

जिंदगी का सफरहै ये कैसा सफरकोई समझा नही..कोई जाना नही...
है ये कैसी डगर.. चलते है सब मगर..कोई समझा नही..कोई जाना नही...
जिंद्गी को बहुत प्यार हमने किया...मौतसे भी मोहोब्बत निभायेंगे हम...
रोते रोते जमाने मे आये मगर..हसते हसते जमानेसे जायेंगे हम..
जायेंगे पार किधर.. है किसे ये खबर..कोई समझा नही..कोई जाना नही...
ऐसे जीवन भी है,, जो जिये ही नही..जिनको जीनेसे पहले मौत आ गई..
फुल ऐसे भी है..जो खिले ही नही...जिनको खिलनेसे पहले फिजा खा गई.
है परेशान अगर थक गये चार अगर..कोई समझा नही.. कोई जाना नही..

एक मात्र आवर्जून नमूद करावेसे वाटते कीगीतकाराचे शब्द आणि संगीतकाराची सुरांची रचना रसिकांपर्यंत बेमालूमपणे पोचवण्याची खरी जबाबदारी असते ती गायक/गायिकेची.  ह्यात जर का हा गायक/गायिका कमी पडला/पडली तर मात्र सोन्यासारख्या कलाकृतीचेही पितळ उघडे पडते हे मात्र निश्चित.  स्वर्गीय किशोरदांनी हे गाणे आपल्या धीरगंभीर आवाजात ज्या कमालीने गायले आहे त्यास तोड नाही.  कितीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही.  किशोरदांचा तो सुमधुर आवाज काळजात खोलवर रुतत जातो आणि आयुष्यतील एक एक उकल आपल्या नकळत उकलत जातो.  हे गाणे तुम्हीं कधीहीकुठल्याही वेळीकुठेही ऐकले तरी तुम्हांला हाच अनुभव परत परत आल्याशिवाय रहात नाही,ह्याचे संपूर्ण श्रेय हे किशोरदांच्या गायकीला द्यायला हवे.

किशोरदांच्या अनेक चाहत्यांपैकी मी ही एक त्यांचा निस्सीम भक्त आहेचाहता आहे.  त्यांनी गायलेली सर्वच गाणी उच्च तर आहेतच पण आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाहीत.  ह्या सर्व गाण्यांचे श्रेय नक्कीचगीतकारसंगीतकारदिग्दर्शकनिर्माते, चित्रपटांमधील कलाकारांचे तर आहेचपरंतु ह्या उपर किशोरदांची एक वेगळीच छाप ह्या सर्व गाण्यांमधून दिसून येते हे नक्की.  गायकीचे कुठल्याही प्रकारचे शास्त्रोक्त शिक्षण न घेतलेला हा अवलियाआपल्या पर्यंत गीतकाराला अभिप्रेत असलेले त्याच्या शब्दांमधील एक न एक भाव सहजरीत्या उलगडत जोतो आणि मग ते गाणे त्या चित्रपटातले न राहता आपले गाणे होते व ते आपण तहहयात गुणगुणत राहतो.  हीच तर खरी दाद किशोरदाला आहे.

किशोरदांच्या गाण्यांमधील प्रत्येक शब्द अन शब्द मला काहीतरी नवीन देऊन जाते. ह्या गाण्यामुळे मला माझ्या प्रांजळ ह्या काव्यसंग्रहातील वणवण’ ह्या कवितेच्या दोन ओळी आठवल्या...

आयुष्यभर जगण्यासाठी केलीवणवण आहे,
मेल्यावर जळण्यासाठी साठवितोसरपण आहे |

म्हणूनच म्हणावेसे वाटले की.......माझे मलाच न कळलेआयुष्य हे कसे ढळले...

रविंद्र कामठे

Friday 12 July 2019

पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१





पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१

१२ जुलै १९६१, पानशेत धरण फुटून पुण्यात पुराने हाहा:कार उडाला होता. आज मला ह्या घटनेची आठवण येण्याचे कारण म्हणजे माझ्या नर्मदा आजीने (म्हणजे वडिलांची आईेने) ३६ वर्षांपूर्वी ह्या घटनेची इतंभूत माहिती सांगितली होती (तेंव्हा मी २० वर्षांचा होतो), त्याची आठवण ताजी झाली. माझ्या आजीच्या डोळ्यासमोर आमचे डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीतील राहते घर ह्या प्रलयात पहिल्याच फटक्यात म्हणता म्हणता तिच्या डोळ्या समोर वाहून गेले होते व एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. माझा तर तेंव्हा जन्मही झालेला नव्हता. माझ्या वडिलांचे नुकतेच लग्न झाले होते व ते नगरला नोकरीला होते. त्यांना पुराची बातमी मिळाल्याबरोबर ते त्या दिवशी संध्याकाळी पुण्यात हजर झाले तेंव्हा आमच्या घराचा फक्त मातीचा ढिगारा राहिला होता. काडी काडी करून काबाड कष्ट करून जमवलेला संसार क्षणार्धात डोळ्या समोरून वाहून गेला होता आणि ते काहीही करू शकले नाहीत. पुराच्या दुसऱ्या दिवशी सर्वजण हे मातीचे ढिगारे उपसून काही सामान मिळत आहे का ते पाहत होते, तेंव्हा पुन्हा एकदा पाणी आले म्हणून अफवा पसरली आणि सगळे जण हातातले सामान तिथेच टाकून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळत सुटले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चोरांनी हेच गोळा केलेले सामान पळवून नेले व त्याच बरोबर ह्या लोकाची उरली सुरली आशाही चोरून नेली. आजी सांगत होती की; इतका भीषण प्रलय होता हा की विचारू नकोस. त्या प्रसंगाची आठवण जरी आली तरी मन विषण्ण होते. त्यांना सगळ्यांना मधुमालती गुणे (आताचे cross word) हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर ठेवले होते. सगळ्या बाळंतीणी आणि वाडीतील काही मंडळी ह्या मजल्यावर सुरक्षित होती. वरून हा प्रलय इतका भयानक दिसत होता की छातीत धडकीच भरत होती. डोळ्या समोरून कित्येक माणसाची, प्राण्याची मढी वाहून जात होती. काही जिवंत लोकं जीवाच्या आकांताने आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. लष्कराचे जवान त्यांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. लकडीपूल उध्वस्त झालेला होता. शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, टिळक रोड, फर्गुसन रोड, भांबुर्डे सगळे सगळे पाण्याखाली होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसलेले होते. उध्वस्त घरांचे सांगाडे पाहून लोकं गलीतगात्र झालेले होते. जीवाच्या आकांताने आक्रोश करत होते. कोणी आपल्या घराच्या ढिगाऱ्यावर बसून टाहो फोडत होते. काही म्हणजे काही शिल्लक राहिले नव्हते. दु:खात सुख म्हणजे आमच्या वाडीत फारशी मनुष्यहानी झालेली नव्हती. अगदी मन हेलावून टाकणारा हा प्रसंग, गोधडी शिवतांना आजी मला त्यावेळेस सांगत होती. हा प्रसंग ऐकतांना माझ्या अंगावर तर काटाच आल होता, पण आजीच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. तिचे डोळे पाणावले होते. आमच्या पुलाच्या वाडीतील जमीनदोस्त झालेलं हे घर नंतर माझ्या आजीने व वडिलांनी, काकांनी पुन्हा बांधले, तोवर ते सगळे रास्तापेठत एका अंधाऱ्या खोलीत रहात होते. विशेष म्हणजे एवढे सगळे रामायण-महाभारत घडूनही ही मंडळी पुन्हा एकदा आयुष्य उभारणीसाठी तयार होती. समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने नव्याने आपले आयुष्य जगण्यास सुरवात केली होती. आज ह्या गोष्टीला ५८ वर्षे पूर्ण झालीत, परंतु ह्या प्रलयाचा फटका बसलेल्या आपाद्ग्रस्तांसाठी कधीही न भरून येणारा असा हा घाव आहे हे मात्र नक्की.
माझी आजी, वडील, काका, काकू ह्या जगात नाहीत, पण त्यांच्या सुखद आणि दु:खद आठवणी मात्र नक्कीच जागरूक आहेत. माझ्या आईच्या स्मृतीत (आज रोजी तिचे वय ७९ आहे) ह्या सगळ्या कठीण प्रसंगांची आठवण काल परवा इतकी ताजी आहे हे विशेष.
आज शुक्रवार, १२ जुलै २०१९-आषाढी एकादशी आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही आलबेल आहे. आज ह्या जागेवर माझ्या काकांनी चार मजली इमारत उभी केली आहे व त्यात माझी बहिण व चुलत भावंडे रहात आहेत.

Sunday 7 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – तांडव मृत्यूचे


अनुभवाच्या शिदोरीतून तांडव मृत्यूचे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
अंगावर काटा आणणारा तो काळा कुट्ट दिवस असेल माझ्या आयुष्यातला ! १९९०च्या मे मधील मन विषण्ण करणारा तो दिवस !  माणूस नियतीपुढे किती शुद्र आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव होते आणि हतबल व्हायला होते.

तो गुरवार होता.  दुपारची १ ची वेळ होती.  कामाला सुट्टी असल्यामुळे मी नुकताच माझी आयुर्विम्याची कामे उरकून घरी पोचलो होतो.  थोडे लिंबू सरबत घेवून पंख्याखाली जरा शांतपणे बसलो होतो आणि बघता बघता माझा डोळा लागला होता.  इतक्यात दिवाणखान्यातला दूरध्वनी खणखणू लागला.  समोरून अतिशय घाबरलेल्या आणि रडकुंडीला आलेल्या अवस्थेत माझा आत्येभाऊ बोलत होता.  त्याने तो जो काही निरोप मला फोनवरून दिला तो ऐकून त्या क्षणी मी स्तब्धच झालो होतो.  इतक्यात बायको आतल्या खोलीतून आली आणि कोणाचा फोन आहे हे विचारल्यावर मी खाडकन भानावर आलो.  माझ्या दोन नंबरच्या आत्येबहिणीचा वडकी गावाजवळ एसटीच्या अपघातात मृत्यू झालाय, तिच्या नवऱ्याला आणि दोन लहान मुलांनाही बहुतेक खूप लागले आहे असे त्याने मला सांगून, तू जसा असशील तसा ताबडतोब निघून वडकीला ये म्हणाला.  एकतर तो निरोप ऐकून माझाच धीर खचलेला होता हो. ह्या बातमीने माझी छाती धडधडत होती.  काय करावं ह्या अशा वेळेला तेच सुचत नव्हतं.  कसं बसं स्वत:ला सावरले आणि बायकोला अगदी थोडक्यात ही वाईट बातमी सांगितली. 

दुसऱ्या क्षणाला डेक्कनला घरी फोन केला.  काकूने फोन घेतला.  तिला विचारले तर अण्णा कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेत आणि त्यांना यायला उशीर होणार आहे.  माझे वडील तर भल्या पहाटेच त्यांच्या मित्राबरोबर नाशिकला लग्नाला गेले होते व त्यांनाही यायला संध्याकाळ होणार होती.  काकूला ही वाईट बातमी देवू का नको असे झाले होते. तिला हा धक्का सहन होईल का नाही ! असे एक क्षण मला वाटून गेले, पण निरोप देण्याव्यतिरिक्त माझ्यासमोर दुसरा काही पर्यायही नव्हता.  घरात मोठे माणूस कोणीच नव्हते.  त्यामुळे ह्या अकल्पित प्रसंगामुळे आलेल्या जबाबदारीची जाणीव होऊन निरोप देवून पुढील कामास लागलो.  सारासार विचार करून बायकोला डायरीत लिहून ठेवलेल्या काही नातेवाईकांना फोन करून ही बातमी देण्याची जबाबदारी टाकली.  मोटरसायकल काढून तडक दिवेघाटाच्या खाली असलेल्या वडकी गावा कडे धाव घेतली.

अपघातस्थळी पोचल्यावर जे काही दृश्य पहिले ते मात्र फारच भीषण भयानक होते हो.  अक्षरश: मृत्यूने तांडव घातलेले होते, असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. दिवे घाट संपल्यावर वडकी नाक्याच्या उतारावर एसटीच्या चालकाचा ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे गाडीवरील ताबा सुटला व त्याने ती एसटी सरळ तिथल्या बसथांब्यावर घालून मोठा अपघात टाळायचा प्रयत्न केला होता.  पण त्याच्या ह्या प्रयत्नात ह्या बस थांब्यात माझ्या आत्येबहिणीचा आणि अजून तीन जणांचा जागीच बळी घेतला होता.  बिचारी ती, तिचा नवरा आणि दोन पोरं नुकत्यात मांढरदेवीचे दर्शन घेवून आले होते व मांजरीला घरी जायला बसची वाट पाहत ह्या बस थांब्यावर उभे होते.  तिला कुठे माहिती होते की तिचा आज तिचा काळ ह्या थांब्यावर तिची वाट पाहतो आहे ते ! 

प्रत्यक्ष अपघात पाहिलेल्या एक दोन जणांनी अक्षरश: थरथर कापत मला सांगितले की, ही बाई फारच जिगरबाज होती हो.  बसथांब्यावर उभ्या असलेल्या कोणाला काही समजायच्या आतच एसटी ह्या थांब्यात घुसली होती.  बहूतेक तिने भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत येणारी ही एसटी पाहिली असावी व तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी.  थांब्याचा पहिलाच खांब ह्या एसटीने तोडला. त्याचवेळेस एका क्षणात ह्या बाईने जीवाच्या आकांताने तिच्या डाव्याबाजूला उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याला आणि दोन्ही पोरांना हाताने बाजूला ढकलले होते. म्हणूनच ते वाचले. पण तो खांब मात्र तिच्या पोटात घुसला आणि बिचारी जागेवरच गतप्राण झाली.  हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले हो.  तिच्या बरोबर अजून तीन लोकांचा जीव घेवून ती एसटी ह्या बस थांब्यातच अडकून पडली होती व रस्त्यावर पडलेल्या रक्तामांसाच्या सड्यामुळे मृत्यूने घातलेल्या तांडवाची मला स्पष्ट जाणीव झाली.  मृत आणि जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पोलीस घटनास्थळी येवून पंचनामा करत होते
  
मी मागचा पुढचा फारसा विचार न करता तडक तसाच सुसून रुग्णालय गाठले.  आयुष्यात पहिल्यांदाच मी ससूनची पायरी चढत होतो. तिथल्या धीरगंभीर वातावरणाने माझ्या पोटात भीतीने गोळा आला होता.   बाहेरच धायमोकलून रडत बसलेला माझा आत्येभाऊ दिसला.  बिचारा एकटाच होता.  मला पाहिल्याबरोबर माझ्या गळ्यात पडून खदखदून रडत होता बिचारा आणि मी मात्र स्थितप्रज्ञासारखा खांद्यावर पडणाऱ्या त्याच्या आसवांनी भिजून जात मनोमन थिजून उभा होतो.  कुठून एवढं मानिसक बळ मला आलं होतं हेच काही समजत नव्हतं !

आत्येभाऊ थोड्यावेळाने शांत झाल्यावर त्याच्याकडे मी बहिणीची चौकशी केली तेंव्हा त्याने तिचे आणि अजून तीन जणांचे पार्थिव तिकडे डेडहाउसमधे पोस्टमार्टेम साठी नेले आहे सांगितले.  आमच्या मेव्हण्याची आणि तिच्या दोन पोरांची चौकशी केल्यावर तो म्हणाला की ते काय तिकडे आत वार्डात आहेत.  एवढ्या मोठ्या अपघातात त्या तिघांना फक्त खरचटले होते.  आमच्या बहिणीने स्वत:चा जीव देवून ह्या तिघांचे प्राण वाचवलेत होते ह्याची प्रचीती मला आली आणि त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली अपघाताची घटना एकदम माझ्या नजरेसमोर तरळून गेली.  केवढी समय सूचकता दाखवली होती तिने त्या समयी, हे प्रत्यक्षात ह्या तिघांना जिवंत पाहिल्यावर मला जाणवले !
 
संध्याकाळचे ७ वाजून गेले होते.  दुपारी ४ वाजल्यापासून डेडहाउस मध्ये पोस्टमार्टेम नेलेले आमच्या बहिणीचे शव अजूनही आमच्या ताब्यात देण्यात आले नव्हते. त्यामुळे मी जरा चौकशी करून येतो म्हणून चक्क ह्या डेडहाउस मध्ये गेलो होतो.  सगळी कडे स्पिरीटचा वास येत होता.  नाकाला रुमाल लावून मी तसाच पुढे जात होतो.  एका वार्डच्या आवारातून दुसऱ्या एका मोठ्या खोलीत प्रवेश करत असतांना माझ्या हातून चुकून बाजूच्या एका खोलीचा दरवाजा ढकलला गेला आणि काय सांगू मला आतले दृश्य पाहून भोवळच आली. 

अहो एका मोठ्या टेबलावर माझ्या ह्या आत्येबहिणीचे शव तिच्या पोटात घुसलेल्या बांबूसहित तसेच पडून होते आणि आजूबाजूला त्याच अपघातात मृत झालेले अजून तीनही शव तसेच पोस्टमार्टेमच्या प्रतीक्षेत होते.  त्याचे कारण दुपार पासून ह्या विभागातल्या डॉक्टरांना वेळेच मिळाला नव्हता इतक्या अपघाताच्या केसेस आज आल्या होत्या.  धीर करून मी तसाच पुढे त्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कार्यालात गेलो.  नशिबाने मला तिथे दोन डॉक्टर आणि वार्ड कर्मचारी भेटले त्यांना विनंती करून माझ्या बहिणेचे शव जेवढे शक्य होईल तेवढे लवकर आमच्या ताब्यात देण्याची तजवीज केली, जी त्यांनी मान्य करून तासाभरात ते पार्थिव आमच्या ताब्यात दिले.  तोवर माझे वडील, काका आणि बाकी सगळे नातेवाईक ससूनमध्ये जमलेले होते व मला आता थोडा धीर आला होता.  त्याच रात्री आम्हीं मांजरीला जावून तिच्या पार्थिवाला अग्नी देवून काळाचा हा घाला कसा बसा सहन करून जड अत:कारणाने परतलो होतो.

इतक्या वर्षांनी हा सगळा अनुभव लिहितांना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता व काळजावर झालेले ते घाव ताजे करून गेला. 

वास्तविक पाहता हे असले अनुभव कधी कोणाच्या आयुष्यात येऊच नये असे वाटते.  परंतु एक मात्र नक्की की; जी नियती आपल्यावर हे असे घाव घालत असते, तीच नियती आपल्याला ह्या अशा प्रसंगातून मार्ग काढायला आणि सावरायलाही शिकवत असते. हेच काय ते निसर्गाचे चक्र असावे ! 

अमावस्ये शिवाय पौर्णिमेचे महत्व कसे कळणार !
   
रविंद्र कामठे

Monday 1 July 2019

दैनिक पुण्य नगरी-साहित्य सेवेच्या वाटेवरील वारकरी- साहित्यकट्टा- ओळख सारस्वतांची-मधील माझा साहित्य प्रवास

दैनिक पुण्य नगरी वुत्तपत्रात साहित्यकट्टा ह्या सदरामधे माझ्या आजवरच्या साहित्य प्रवासाबद्दल माहीती आली आहे हे वाचून आणि पाहून डोळे भरुन आले. माझ्या आजवरच्या ह्या प्रवासात मला मोलाची साथ देणारे चपराक प्रकाशनचे श्री घनश्याम पाटील सरांचा मी ऋणी आहे व पुण्य नगरीच्या स्वप्नील कुलकर्णी ह्यांचा आभारी आहे. माझ्यासाठी हा एक फार मोठा पुरस्कारच आहे व मला आज त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. जबाबदारीची जाणिवही आहे. रसिक वाचाकांचे शुभ आशीर्वाद लाभोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.