Tuesday 30 March 2021

"उसणीने क्षणात घालवलेले उसने अवसान"

 

Thursday 18 March 2021

अग्निकर्म

अग्निकर्म 

आज कोंढव्याला आमच्या कामठे परिवारातील प्रसिद्ध डॉक्टर कुणाल कामठे यांच्याकडे मी लिहिलेल्या 'चपराक प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या 'शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार वीर येसाजी कामठे' ह्या पुस्तिकेच्या १०० प्रती द्यायला गेलो होतो. 

त्यावेळेस डॉक्टरांनी माझ्या नुकतेच झालेल्या मणक्याच्या दुखण्याची चौकशी केली. बोलता बोलता माझ्या नकळत माझ्याकडून काय काय होतेय ते विचारत मला आयुर्वेदातील उपचारांची माहिती दिली. माझ्या तळहातांना व तळपायांना जळवाताचा होत असलेला त्रास पाहून त्यावर जालीम उपाय सांगितला आणि औषधही लिहून दिले. 

माझ्यासाठी बाजूच्या गुऱ्हाळातून उसाचा रस मागवला. इतपर्यंत ठिक होते. त्यांनी त्यांच्या मदतनीसाला सांगून आतमध्ये कसलीतरी तयारी करायला सांगितली. आणि मला सहज म्हणाले, ‘की काका आता आलाच आहात ना तर आपण तुमच्या ह्या सांधेदुखीवर अग्निकर्मचे उपचार करुन घेऊ, म्हणजे तुम्हाला लवकर आराम पडेल.’ मी थोडा संकोचलो. कारण मी पुस्तकं द्यायला आलो होतो, उपचार घ्यायला नाही! पण डॉक्टरांनी प्रेमाने आदेशच सोडले आणि आत जाऊन झोपा सांगितले.

गेले वर्षभर त्यांचे चाललेच होते की, ‘काका तुम्हाला मी माझ्या आयुर्वेद्यकिय उपचारांनी नक्कीच बरा करेन.’ पण योगच येत नव्हता आणि त्यांच्या क्लिनिकला जायची वेळच येत नव्हती. आज नेमकी चपराकमुळे मला ही संधी मिळाली होती, तीचा अतिशय प्रेमाने व हक्काने, माझ्याच भल्यासाठी डॉक्टरांनी लाभ घेतला.  डॉक्टर कुणाल ही मुळव्याध, भगंदर, फिशर, सांधेदुखी ह्यावरील आयुर्वैद्यकिय उपचारांसाठी खूप प्रसिद्ध आहेत.  त्यांचे नावही खूप आदराने घेतले जाते. अतिशय कमी वयात त्यांनी ह्या क्षेत्रात त्यांचे नाव कमावलेले आहे.  ह्याचा आम्हा कामठे परिवाराला सार्थ अभिमान आहे.

माझ्या आधी ७४वर्ष वयाचे येवलेवाडीचे निंबाळकर आजोंबा उपचारासाठी आलेले होते. गेले चार पाच वर्षे त्यांनी खूप उपचार घेतले होते पण त्यांना काही गुण येत नव्हता. म्हणून डॉक्टरांचे नाव ऐकून ते त्यांच्याकडे पहिल्यांदाच आले होते. डॉक्टरांनी त्यांना चालायला सांगितले व त्याचा एक व्हिडीओ काढला.  त्यानंतर त्यांची फाईल तपासली. थोडावेळ विचार करून त्यांनी त्यांच्यावर अग्निकार्माचे उपचार केले.  थोड्या वेळाने पुन्हा एकदा त्यांना चालायला लावले व त्याचा पुन्हा एकदा व्हिडीओ काढला.  आधीच्या आणि नंतरच्या चालण्यात खूप फरक जाणवला. मला त्यांनी अग्निकर्माचा फायदा व योग्यता सांगितली व पटवून दिली.

हे पाहिल्यावर न राहवून, गेले १४ वर्षे माझ्या दोन्ही पायांचे घोटे झिजल्यामुळे प्रचंड दुखतात व  रात्रीतर लवकर झोपच लागत नाही, त्यामुळे झोपेची गोळी घ्यावी लागते. हे सगळे मी डॉक्टरांना सांगितले. मग तर ते म्हणाले जा आत जाऊन पडा. मी आलोच.

गपचूप आतल्या खोलीत जाऊन पडलो. मदतनीसाने पॅन्ट वर करायला सांगितले.  पण ती काही केल्या गुडघ्याच्या वर जाईना. शेवटी मी ती उतरवून ठेवली व त्याच्याकडून एक चादर पायावर ओढून पडून राहिलो. डॉक्टर कुणाल आले. ‘काका तुमचे पायाचे सांधे कुठे कुठे दुखतात, असह्य वेदना नक्की कुठे होतात’, त्या सांध्याच्या आसपास दाबत विचारले.  डाव्या पायाला त्यांना तीन ठिकाणे व घोट्याची जागा सापडली. उजव्याला घोट्याला एकच जागी ठणकत होते. त्यांनी पेनाने गोल खुणा केल्या. नंतर आतल्या बाजूला जाऊन काहीतरी आणले व चक्क ह्या खुणा केलेल्या ठिकाणांवर गरम डाग दिले. त्यांच्या हातात काय होते ते झोपलेलो

असल्यामुळे कळलेच नाही. थोडेसे चटका बसल्या सारखे झाले, पण सहन होईल इतपतच दुखले. नंतर त्यावर त्यांनी कसलातरी मलम लावला. त्याने एकदम गार वाटले. डॉक्टर म्हणाले,  'काका आता असेच पडून रहा पंधरामिनिटे'. मग काय करणार बिचारे काका. आलीया भोगासी, गपगुमान पडून राहिले. पडल्या पडल्या विचार करत होतो की, आपल्यावर किती माणसे प्रेम करताता! अगदी हक्काने व अधिकाराने सर्वकाही

करायला तयार असतात. हेच काय ते माझे संचित आहे ! मी किती समृध्द व श्रीमंत आहे. माणुसकीचे असे अजून किती अनुभव माझ्या वाट्याला येणार आहेत ! मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो ह्या बाबतीत!

डॉक्टर कुणाल यांना तरी यश दे रे बाबा. माझे काय! मला आता वेदना सहन करण्याची सवयच झाली आहे. शरीराचा कुठलाच अवयव राहिला नाही, की ज्याने त्याचे माझ्यावरील अतोनात प्रेम दाखवले ना ही! चालायचंच. मी आहेच प्रेमाच्या अथवा स्नेहाच्या लायकीचा! असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेतली.

उपचार झाल्यावर डॉक्टरांनी मला काही सुचना केल्या आणि शनिवारी पुन्हा एकदा या हेच अग्निकर्म परत करु म्हणजे लवकर बरे व्हाल म्हणाले.

निघतांना डॉक्टरांना मी गमतीने म्हणालो, ‘मी की नाही, देहदान करणार आहे’.  तेवढेच वैद्यकीय शास्त्राला मदत होईल.  आजवर केलेल्या उपचारांच्या सर्व फाईली जपून ठेवल्या आहेत.  त्या ही देईन पाहिजेतर बरोबर. म्हणजे डॉक्टरांना नीट संशोधन करता येईल.

हे सर्व ठिक आहे. पण ह्या सगळ्याच्या मागचे मूळ कारण काय आहे माहिती आहे का ?  मी ते नेहमीच सांगत असतो, ते म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम करा व स्वत:ला फिट ठेवा, पण जर का तुम्ही कुठलेही व्यसन करत असाल तर, तुम्हांला शारीरिक व्याध्यींपासून अजिबात सुटका मिळणार नाही.  इथे केलेल्या पापांची, मस्तीची फळे इथेच फेडून जावे लागेत हे मात्र नक्की. 

मी काही उगाच मुक्ताफळे उधळत नाहीय... स्वानुभव सांगतो आहे.  जे काही घ्यायचे ते घ्या... बाकी तुम्ही आणि तुमचे नशीब...

ता.क.

आयुष्यात जर का केले असेल दुष्कर्म,

तर काही केल्या चुकत नाही अग्निकर्म.......

रवींद्र कामठे

गुरुवार, १८ मार्च २०२१

Wednesday 17 March 2021

 एक उत्स्फूर्त व मनापासून मिळालेली दाद,



 मंडळी,

मला काल मिळालेला हा अभिप्राय पहा....

 तुम रहो सदा हसते खेलते..... खिलखिलाते 

यू ही तुम मिलते रहना....

ताकी हमारी खुशी बनी रहे....

आप जैसे लोग मिलते है नसीब से..

शुक्रगुजार है हम अपने भगवान के....

😊😊😊😊😊😊😊

keep smiling

मनिष पुराणिक

ISO Lead Auditor

International Certification Services, (ICS) Pune.

मला सांगा मंडळी अशी उत्स्फुर्त व मनापासून आलेली दाद मिळाली तर...

आज फिर जीने की तम्मना है,

आज फिर मरने का इरादा है...   असं नाही वाटलं तरंच नवल आहे की नाही!

अहो ही दाद मला मिळाली आहे मनिष पुराणिक सरांकडून.

ह्या सगळ्यामुळे मी अचानक माझ्या त्या अविस्मरणीय गतस्मृतींत गेलो...

मी जेव्हा विंसिस VINSYS ह्या माझ्या कंपनीत ISO 9001:2015 Surveilance Audit च्या दरम्यान सर्वांना सहज भेटायला गेलो होतो तेंव्हा मिळाली ही दाद. 

अर्थात मनिष सरांनी आज मला खास फोन करून माझी आठवण काढली होती व मी ऑडीटला नाही याची उणीव व्यक्त केली होती.  मग काय ! काढली गाडी आणि गेलो त्यांना भेटायला. 

माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सर्व प्रथम पहिल्या मजल्यावरी Accounts मधील शंकर महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. अमित, मनीषा, निलेश, सुवर्णा, उदय, आणि सहकाऱ्यांशी थोडेसे हितगुज करून दुसऱ्या मजल्यावर गेलो.  मनिष सरांच्या ऑडीटमध्ये कुठेही लुडबुड न करता, माझ्या बाकी सर्व सहकाऱ्याना भेटलो व थोड्या गप्पा ठोकल्या.  सर्वात पहिले विक्रांत पाटील सरांना भेटलो.  त्यांचे थोरले चिरंजीव कुणाल पाटील भेटले. तो आता सरांना व्यवसायात चांगलाच हातभार लावायला लागलाय हे पाहून छान वाटले. दुबईचा व्यवसाय आता हा पठ्ठा सांभाळतो आहे हे पाहून आनंद झाला. विनया मॅडम तब्बेत बरी नसल्यामुळे आल्या नव्हत्या. नितीनही बंगलोरला असल्यामुळे हजर नव्हता. तिथेच विशाल नलावडेही खूप दिवसांनी भेटला. त्यांची मिटिंग चालली होती त्यामुळे फार वेळ न घेता तिथून सटकून तिसऱ्या मजल्यावर सदानंद, इम्रान, गौतम, ज्योती, वृषाली, मानसी, प्रिया आणि माझ्या बाकी सर्व सहकाऱ्यांना भेटलो.  चक्क आज खूप दिवसांनी अवीनाशही भेटला.  ऑडीटच्या मिटिंगला मला खास निमंत्रित म्हणून हजेरी लावता आली हा माझ्या साठी सन्मानच होता.  मिटींगला, सदानंद, उमेश, सुशील, विशाल, प्रथमेश, स्मिता, आकांक्षा व राजश्री मॅडम एवढी मोजकीच मंडळी होती. नेमके सुरेंद्र पटवर्धन सर आज त्नायांची तब्च्याबेत बरी नसल्यामुळे हजर नव्हते. पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून सुरक्षिततेच्या चौकटीत राहून हे ऑडीट पार पाडले होते.  ऑफिसचे कर्मचारी, सावंत, जावेद, वीरेंद्र, साई, सुरक्षारक्षक राणे, ही मंडळी जातीने माझ्याकडे काही हवे नको ते पाहत होती.  त्यात मणक्याच्या दुखण्यामुळे हातात काठी पाहून तर बरेच जण हळहळले होते. 

मनिष सरांनी ऑडीट यशस्वी झाल्याची घोषणा केल्यावर तर माझे मन खूप भरून आले होते.  गेले १२ वर्षे मी ह्या क्षणाची दर वर्षी आतुरतेने, जीव मुठीत धरून वाट पाहिलेली आहे.  जेव्हा मनिष सर म्हणतात की; “ऑडीट यशस्वी झाले आहे व तुम्हांला आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे अथवा पुढे चालू ठेवण्यात आले आहे”, तेंव्हा जीव जो काही भांड्यात पडतो ना ते काही विचारू नका.  एका फार मोठ्या जबाबदारीतून मुक्त झाल्याची भावना त्या क्षणी मनात येते व आपल्या सहकाऱ्यांचा, व्यवस्थापनाचा आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ केल्याची भावना निर्माण होते व स्वत:चा अभिमानही वाटतो. स्मिताच्या मनात नेमकी हीच भावना असणार ह्याची मला खात्री होती.  कारण मनिष सरांनी ऑडीट यशस्वी झाले आहे हे शब्द उच्चारात तिने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकला होता.  हे म्हणजे अगदी क्रिकेटचा सामना असतो ना तसे वाटते.  जिंकलो तर यश सर्वांचे असते आणि हरलो तर मात्र ते फक्त आपले स्वत:चे असते.  अर्थात आजवर ह्या सामन्यात हार काही पहायला मिळाली नाही कारण ही एक सांघिक कृती आहे हे ही तितकंच खरं आहे आणि ह्यात तुमचे नेतृत्वगुण, तुमचे स्वत:चे कर्तुत्व आणि तुमचे सांघिक व्यवस्थापन तावून सलाखून निघत असते.  दरवेळेस नवीन धार तुमच्या ह्या अवजारांना येत असते.  तुम्ही घडत जाता व हळू हळू लोणचे जसे मुरते तसे मुरत जाता.

मित्रहो मी ३१ मार्च २०१९ला Vinsys मधून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. तरीही अजूनही मला CEO विक्रांत पाटील आणि CFO विनया पाटील ह्या दांमप्त्यांकडून वैयक्तिक पातळीवर जो काही मान सन्मान आणि आदर मिळतो त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे पुराणिक सरांची ही दाद होय !

मला Vinsys च्या प्रत्येक सदस्याकडूनही अतिशय आदर व सन्मान मिळतो. अर्थात माझ्या ह्या सहकाऱ्यामुळेच मी हे यश संपादले आहे ही तितकेच खरे आहे. उलट ह्यात माझे काहीच कौतुक नाही.

Vinsys मध्ये २००८ला मी आलो आणि २००९ ते २०१९ सलग ११वर्ष MR होतो. त्या दरम्यान माझे पुराणिक सरांचे, सुरेंद्र पटवर्धन सरांचे, राजश्री मॅडम आणि आकांक्षाताईशी कळत नकळत व्यावसायिकतेच्याही पलिकडले जिव्हाळ्याचे स्नेहबंध जुळले गेले ते आजतागायत कायम आहेत व पुढेही असेच राहणार आहेत ह्यात काही शंकाच नाही.

स्वेच्छा निवृत्ती नंतर माझी MR ह्या मोठ्ठ्या जबाबदारीची माळ मी माझ्या बहिणीच्या स्मिताच्या गळ्यात घातली आणि तीनेही ही जबाबदारी व्यवास्थित पध्दतीने पेलून मला आदराने अंजून एका उंचीवर नेण्यास बहुमोल साथ देऊन धन्य केले आहे.  तिचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

मी १९८३ पासून VINSYS मध्ये येईपर्यंत १२ नोकऱ्या केल्या होत्या.  २००८ साली VINSYSला आलो तेंव्हाच ठरवले होते की आता ही शेवटची नोकरी.  ह्या नोकरीतूनच निवृत्त व्हायचे.  बरोबर ११ वर्षे काही महिने मी ही नोकरी नव्हे, तर मालकी हक्कानेच काम करत होतो, पण ऑक्टोबर २०१७ला अचानक अन्जिओप्लास्टी झाली व त्यांनंतर तब्बेतीच्या कारणामुळे मला मनाविरुद्ध स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली.  गेले ३६ वर्षे व त्याही आधीपासून अहोरात्र केलेल्या कष्टांचे फळ, शरीराची केलेली हेळसांड आणि झालेली झीज व त्यात भरीला भर दारू आणि सिगरेट सारख्या व्यसनांच्या मस्तीची जोड होती, मग काय जे व्हायचे ते होणारच होते.  २७ ऑक्टोबर २०१७ला एका झटक्यात मला जमिनींवर आणले.  हे सांगण्याचे कारण म्हणजे, कितीही कष्ट करा, शरीराची आबाळ करू नका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलेही व्यसन करू नका.  व्यसन सोडण्याचे उशिरा का होईना सुचलेले शहाणपण येऊन आता चार वर्षे झाली आहेत.  आता मी मात्र आनंदात माझे स्वेच्छा निवृत्त जीवन जगतो आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे माझी बायको वंदना ही ने ही मागील वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेऊन मला साथ दिली आहे.

माझे तर काय लिखाण, वाचन चालू आहे. ‘चपराक प्रकाशन’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील यांच्या बरोबर त्यांचा मित्र व सहकारी म्हणून माझा छंद जोपासतो आहे.  त्यामुळे विविध क्षेत्रामधील व साहित्यक्षेत्रातील दिग्गजांशी भेटी गाठी होत आहेत व मी अनुभवाने अजून समृद्ध होतो आहे. माझीही अजून काही पुस्तके लवकरच चपराक कडून प्रकाशित होणार आहेत. ह्याच बरोबर मी २०१९ पासून ‘शूरयोद्ध येसाजी कामठे प्रतिष्ठान’ चा उपाध्यक्ष म्हणून सामजिक कार्य करतो आहे.  आमचे पूर्वज ‘वीर येसाजी कामठे’ यांचे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळातील योगदान व त्यांचा इतिहास सर्वदूर पोहचवून कामठे परिवार संघटीत करण्याचे व त्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम करण्याचे काम ट्रस्टच्या माध्यमातून करतो आहे.  अर्थात इथेही मला एक लेखक व साहित्यिक म्हणून कामठे परिवारात व ‘शिवजयंती सोहळा समिती’, पुणे यांच्या ‘शिवजजन्मोस्त्व स्वराज्य रथसोहळा’ समितीचे प्रवर्तक अध्यक श्री. अमितदादा गायकवाड यांच्याकडून व बाकींच्या सरदार घराण्यात जो काही मान सन्मान दिला जातो ते पाहून वाटते की, ही सर्व माझ्या आई-वडिलांचीच पुण्याई आहे, मी फक्त निमित्तमात्र आहे.

स्वेच्छा निवृत्ती पश्चात मी माझ्या आयुष्यात एकच धोरण ठरवले आहे की, काहीही झाले तरी आता पैसे कमवायचे नाहीत. म्हणजे पैशांसाठी अथवा कुठलाही मोबदला घेऊन काम करायचे नाही.  जे काही करायचे ते बिना मोबदला व समाजासाठी कार्यरत राहायचे. समाजाकडून आजवर जे काही मिळाले ते त्याला आपल्या परीने परत करायचे.  अर्थात ह्यात कोणी आपला गैरफायदा घेत नाही ना हे ही पहायचे आहे.  गेली दोन वर्षे मी माझ्या ह्या धोरणावर ठाम आहे व पुढेही राहणार आहे.  नियतीच्या मनात काय आहे ते माहित नाही.  तब्बेतीची साथ ‘उन्नीस बीस’ असते, पण जिद्द आणि सकारात्मकता ठाई ठाई भरलेली असल्यामुळे लढत आहे, ते ही केवळ आणि केवळ कुटुंबाच्या व तुमच्या सारख्या मित्रांच्या, आप्तेष्टांच्या, नातेवाईकांच्या, हितचिंतकांच्या, निंदकांच्या शुभेछ्या आणि आशीर्वादामुळेच.

‘देवाची करणी, नारळात पाणी’.

एक म्हणावेसे वाटते;

आयुष्य इतकंही सोप नाही

जितकं आपण समजत असतो !

आयुष्य इतकंही अवघड नाही

जितकं आपण ते करून ठेवतो !!

मनिष सरांची इतकी उत्स्फूर्त दाद मिळाल्यावर मला माझी एक हिंदीतील रचना आठवली....

!!दोस्ती!!

जिंदगीसे और कुछ नही चाहीये मुझे

वक्त से थोडीसी मोहलत चाहीये मुझे !

हर दर्द हर गम सह लुंगा मै जिंदगी

तुझपर मिटाने के लिये एक पल चाहीये मुझे !

यू ही सालों बितायें मैने दोस्तों के लियें

वक्त आनेपर जान देनेवाला दोस्त चाहीये मुझे !

मै खफा नही हूं अपने दोस्तोंके दोस्ताने पर

कुछ गलतीयां सुधारणे का मौका चाहीये मुझे !

जवानी से लेकर आज की इस तारीख तक

दुवां कर रहा हूं, दोस्तोंकी हसीं चाहीये मुझे !

मै आपके लिये इतना खास तो नही रहां दोस्तो

मुझ को समझने वाला एक दोस्त चाहीये मुझे !

१७ आँक्टोंबर २०२. सहज सुचलेली एक हिंदी रचना.

मित्रहो, तुम्ही म्हणाल की, एक एवढीशी ती घटना, एक इतुकासा तो अभिप्राय, दाद, त्यावर तुम्ही एवढे मोठे पुराण काय लिहिलेत आणि आमच्या डोळ्यांना उगाचच त्रास दिलात...

तर तसे काही नाही हो,

आपल्या आयुष्यात ह्या अशा छोट्याशा, लहानशा वाटणाऱ्या घटनांचेच महत्व खूप असते. अगदी ‘खारीच्या वाट्या’ सारखे.  ह्यातून भावनांचा हा सेतू बांधला जातो.  संबध वृद्धिंगत होतात.  नवे मित्र जोडले जातात. नवी नाती निर्माण होतात. जुनी नाती अजून घट्ट होतात.  काही नात्यांना जर का कुठे ठेच पोहचली असेल तर ती निट व्हायला अथवा त्यावर उपाय करायला ह्या अशा घटनांमुळे एक दिलासा मिळतो व प्रांजळपणे जगण्याची नवी उर्जा व शक्ती मिळते हे ही तितकेच खरं आहे.  आपले आयुष्य ही एक “तारेवरची कसरत” आहे. ती अतिशय प्रांजळपणे मनात कुठलीही अढी न ठेवता जीवन जगायचे असते. कचकच करून, तकतक करून, भांडण तंटा करून, वादविवाद करून, हाणामाऱ्या करून, दुफळी माजवून, हिंसाचार करून, विध्वंस करून, दुराचार करून, भ्रष्टाचार करून, द्वेष करून, दुराचार करून, काहीच साध्य होत नाही.  उलट आपले आयुष्य अजून क्लिष्ट व असमाधानी बनत जाते. आपण जसे जन्मत: मोकळ्या हातांनी येतो ना तसेच इथे जे काही कमावले आहे ते इथेच ठेवून जायचे असते.  जातांना जर का पुण्य अथवा चांगले काही केले असेल तर तुमच्या मृत्यू पश्चात तुमच्या आत्म्यास शांती नक्कीच लाभत असेल असे मला तरी वाटते. म्हणूनच म्हणतो;

आयुष्य खूप सुंदर आहे,

जगले तर खूप महान आहे...

 चला खूप झाले तत्वज्ञान....

रवींद कामठे

मंगळावर,१६ मार्च २०२१.