Monday 7 May 2018

पक्षांसाठी “दाणापाणी”- प्रयोग २






पक्षांसाठी दाणापाणीहा माझा ह्या वर्षीचा प्रयोग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सफल झाला आहे हे मला सांगताना खूप खूप आनंद होतो आहे. तसेच माझ्या ह्या प्रयोगाची दखल घेऊन चपराकप्रकाशनने माझा हा उपक्रम त्यांच्या साप्ताहिकात छायाचीत्रांसाहित छापून हा प्रयोग महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील वाचकांपर्यंत पोहोचवला ह्याचे मला सर्वात जास्त अप्रूप आहे.  माझ्या ह्या प्रयोगाची मूळ संकल्पनाच ही आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग आपल्या घरी करावा आणि पक्षांना जीवनदान देवून पर्यावरण वृद्धीस हातभार लावावा हीच सदिच्छा.  चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांचे ह्यासाठी खास आभार.

 

तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मला अजून चेव आला आणि मी कालच्या सुट्टीचा भरपूर फायदा उठवायचे ठरवले.  त्यात माझ्या कार्यालयातील एका मित्राने त्याच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीत पक्षांसाठी पाणी ठेव्यासाठी एक पात्र मागितले.  परंतु त्याची अडचण अशी होती की त्यांच्या सदनिकेला बाल्कनी नसल्यामुळे त्यांची इच्छा असूनही पक्षांसाठी त्यांना दाणा-पाणी ठेवता येत नव्हते.  मग काय मी लागलो कामाला.  थोडासा विचार केला आणि माझ्या डोक्यात ह्या समस्येवर उपाय म्हणून एक वेगळीच कल्पना डोक्यात घोळू लागली.  विचार करता करता मी कागदावर ह्या कल्पनेस साकारण्याचा प्रयत्न करू लागलो.  मला अगदी सहज, सोपं, कोणालाही हाताळता येईल व वापरण्यास उपयुक्त असे हे दाणापाणी पात्र बनवायचे होते.  शक्य असल्यास टाकाऊतून टिकावू करायचे होते.  मी माझ्याकडे असलेले प्लास्टिकचे pvc पाईप वापरून इंग्रजी Uआकाराचा (आडवं) एक शिंकाळ तयार केले.  त्याला आडवे केलं आणि काय सांगू माझ्या डोकातील कल्पना प्रत्यक्षात आली. लगेच एक बाटलीला भोक पाडून तिला माशांसाठीच्या टाकीत वापरात येणाऱ्या ऑक्सिजनच्या नळीचा वापर करून ठिबक सिंचन योजना अमलांत आणली आणि पक्षांसाठीचे पाणीपात्र तयार झाले.  कोणालाही आपल्या खिडकीतून हात घालून हे पात्र बांधता येऊ शकते आणि बाटलीतील पाणी संपले की बाटली काढून त्यात पुन्हा पाणी भरून ती बाटली ह्या शिंकाळ्यात परत अडकवता येऊ शकते.  शिंकाळ्याच्या खालील बाजूस पाणी गोळा करण्यासाठी एक कचकड्याचे पात्र (थाळी) जोडलेली आहे त्यावर पक्षी बसून निवांतपणे त्यांची तहान भागवू शकतात.  थेंब थेंब पाणी ह्या पात्रात पडल्यामुळे ते पाणी गरम होत नाही आणि वायाही जात नाही.

असाच विचार करता करता पाण्याची सोय तर झाली आता ह्याच शिंकाळ्यात दाण्याची सोय कशी करता येईल असा विचार डोक्यात घोळत होता आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.  वर सांगितल्या प्रमाणे इंग्रजी “u” (आडवा) करून जो प्रयोग केला होता त्यावरच उत्तर म्हणजे इंग्रजी ‘E” आकाराचे अजून एक शिंकाळ बनवले आणि वरच्या बाजूस एक हुक करून दाणा पात्र लटकवले आणि दुसऱ्या दांडीवर पाण्याची ठिबक सिंचन पद्धतीने तयार केलेली बाटली लटकवली तसेच सर्वात खालच्या दांडीवर पाण्यासाठीचे पात्र (थाळी) चिटकवूली.  झालं माझ्या डोक्यातील पक्षांसाठीचे दाणा-पाणीतयार झाले आणि माझा जीव भांड्यात पडला.  दिवसभर राबलो ह्यासाठी, पण माझी संकल्पना पूर्ण झाल्याचे एक अभूतपूर्व समाधान माझ्या सर्वांगात जाणवत होते. 

संध्याकाळी काही पाहुणे घरी आले होते.  त्यांनी माझी ही संकल्पना पहिली आणि मला मन:पूर्व दाद दिली आणि आम्हांलापण असे पात्र बनवून द्या अशी विनंती केली.  दुपारीच मी प्रयेकी तीन दाणा आणि पाणी पात्र बनवलेले होतेच.  त्यातील एक एक मी ह्या दोन्ही पाहुण्यांना लगेचच भेट म्हणून देवून मोकळा झालो.  अर्थात उन्हाळ्याच्या दिवसांत मी ही पात्रे बनवून ठेवतच असतो त्यामुळे कोणीही मागितले की मला जरा जास्तच आनद होतो.  त्याचे कारण अजून एक कुटुंब आपल्या ह्या पक्षी रक्षणास तयार झाले ह्याचेच मला जास्त कौतुक आणि आनंद असतो.  सोबत दोन छायाचित्रे देत आहे यावरून तुम्हांला  ह्या प्रयोगाची कल्पना येईल.

तुम्हीं म्हणाल काय सारखं सारखं तेच तेच सांगता आहात आणि अशा पद्धतीने सांगता आहात की जसे काही इस्त्रोने एखादे यान मंगळावर / सूर्यावर पाठवल्याचा आव आणता आहात ! फक्त तुम्हांलाच काय तो ह्या पक्षांचा पुळका आहे हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करता आहात असे काहीना वाटू शकते ! असो. 

तरीही माझा हे सगळे तुम्हांला सांगण्याचा अट्टाहास एकाच उद्देशाने आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग करून पहावा. काही अडचण अथवा मदत लागल्यास मला कळवा.  मी माझ्या कुवतीने तुम्हांला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

ह्या प्रयोगास मला लागलेले सामान आणि साधारणपणे आलेल्या खर्चाचा (रु. १७०-१८०/-) तपशील खाली देत आहे.  जेणेकरून तुम्हांला अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्हीं हा प्रयोग पुढे न्याल ह्याची मला खात्री आहे.

एक दाणापाणीपात्र बनविण्यास लागलेले साहित्य आणि त्याचा खर्च खाली देत आहे:

  1. प्लास्टिक pvc पाईप १/२” – ५ फुट  (रु. ७०/-)
  2. प्लास्टिक pvc T – ३ नग – (रु. ३६/-)
  3. प्लास्टिक pvc येल्बो २ नग – (रु. २०/-)
  4. प्लास्टिकची थाळी २ नग (रु. २०/-X  = ४०/-) बागेतल्या कुंडीच्या खाली ठेवायला जी थाळी मिळते ती वापरावी. स्वत आणि टिकाऊ आहे.
  5. प्लास्टिक बाटली – (रु. शून्य ) साधारण जाड प्लास्टिकची बाटली वापरावी.
  6. प्लास्टिक – pvc सोलुशन एक ट्यूब
  7. तुमचा बहुमुल्य वेळ साधारण १ २ तास. (वेळेची किंमत आपापल्या परीने ठरवावी)

प्रयोगाचा फायदा अथवा नफा:

  1. प्रचंड मानसिक समाधान.
  2. अगणित उत्साह.
  3. आपल्यातील माणुसकीचा आणि आपुलकीच्या भावना जागृतीचा अनुभव.
  4. सात्विक आनंद.
  5. ताण तणाव नष्ट करण्याचे साधन.
  6. निसर्गाशी आपली नाळ जुळल्याची भावना.
  7. वेळ आणि पैसे घालवून काही अनमोल क्षण कमावल्याची जाणीव.
  8. पक्षांना जीवनदान दिल्याची उपरती.

 

ह्या निमित्तीने माझी कळते पण वळत नाहीही कविता मला आठवली ..

 

 

विणले तर कळतात,

कष्ट घरट्याचे ||

पहिले तर कळते,

कारण घडल्याचे ||

 

लिहिले तर कळतात,

अर्थ शब्दांचे ||

वाचलेच तर कळते,

मन लिहिणाऱ्याचे ||

 

स्पर्शानेच तर कळते,

विश्व भावनांचे ||

डोळ्यांनाच तर कळतात,

भाव मनाचे ||

 

कळते परंतु वळतच नाही,

हे तर गमक आहे हृदयाचे ||

******* 

चला तर मग... लागा कामाला...

रविंद्र कामठे

०७ मे २०१८