Monday 18 April 2022

वरदची मुंज एक अविस्मरणीय सोहळा

वरदची मुंज, एक अविस्मरणीय सोहळा

१३ एप्रिल २०२२ला वंदनाच्या भाच्याच्या अमेयच्या मुलाच्या म्हणजे वरदच्या मुंजीसाठी दापोलीत जालगावला ब्राम्हणवाडीत जाणे झाले. दोन दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीत १२ तारखेलाच दुपारी इकडे पोहचलो होतो व चक्क पाच दिवस मुक्काम ठोकला. निवृत्तीमुळे मी आणि वंदना जरा जास्तच निवांत होतो. खूप वर्षांनी बायकोच्या माहेरचा सगळा गोतावळा भेटला आणि ह्या भेटीचे सार्थक झाले.

त्याच दिवशी संध्याकाळी, वाजत गाजत जाऊन गावातल्या गणपती बाप्पाला, विघ्नहर्त्याला मुंजीचे रितसर आमंत्रण करण्यात आले. सगळे कसे रितीरिवाजानेच होणार ह्याची ही नांदी होती.

१२ तारखेलाच अमेयचा मेव्हणा म्हणजे पल्लवीचा नवरा मंदार याने "मन रिचार्ज रिचार्ज" हा अतिशय प्रेरणादाई कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

अमेयने पुढच्या अंगणातच भव्य मंडप टाकलेला होता. शेजारच्यांच्या अंगणातही मंडप टाकून तिकडे सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती. आजूबाजूच्यांची लगबग, धावपळ, तळमळ, कळकळ, आस्था, प्रेम, स्नेह, उत्साह, आपुलकी, जिव्हाळा पाहून ह्या सगळ्यांचा खूपच हेवा वाटला आणि खूप कौतुकही वाटले. जो तो न सांगता आपापली कामे अगदी मनलावून करत होता. हो अगदी वय वर्ष ८ ते ८० असा कार्यकर्त्यांचा ताफा ह्या एका सोहळ्यासाठी अहोरात्र राबत होता. मुंजीआधी विधीवत् ग्रहमखाने छान सुरवात झाली.  गुरुजींच्या मंत्रांनी वातावरणात प्रसन्नता व मंगलमयता दरवळत होती. मला तर जाम धमाल येत होती. अगदी शाळेतले दिवस आठवत होते. गेले कित्येक वर्षे मी दापोलीला येतोय, परंतु असा सोहळा पहिल्यांदाच अनुभवत होतो. लहानपणी अनुभवलेले माझ्या मामीच्या आजोळचे राहुरीचे काही सोहळे आपसूकच एकएक करुन डोळ्यासमोरून धावत होते.

उषाताई-काका, अमेय-सानिका, महेश-प्रज्ञा, सलील-प्राची, मंदार-पल्लवी, निषाद-अनुश्री, ओंकार, प्रसाद, अनुराग, अनुजा, अनुष्का, स्वरा, अंतरा, चिन्मयी, संयुक्ता, तसेच मानस, सौमिल, प्रियल आणि वरद ह्या चिल्लीपिल्यांशी छान गट्टी जमली होती. मंदारचे बाबा भुस्कुटेकाकांशी तर छान गप्पा रंगल्या होत्या. महाडला येण्याचे अगत्याच्या निमंत्रणाने मला फार आपुलकी वाटली. अभयमामाची फोटोची लगबग न थकता अखंडपणे चालू होती. माधव-ममता खास गाडीकरुन रत्नागिरीहून आहे होते. अमृतावहिनीही आंजर्ल्याहून दोन दिवस आधीच मुक्कामाला होती. महेशच्या मोठ्याभावाची योगेश अत्रे दादा वाहिनींची खूप वर्षांनी भेट झाली.

ग्रहमखापासून गेले तीन चार दिवस रोज ५० एक माणसांचा नाष्टा, जेवण, संध्याकाळचे खाणे, चहापान, रात्रीचे जेवण, कुठेही कटकट, गडबड न करता आपुलकीने चाललेले पाहून, आपण शहरी माणसे उगाचच ह्या सगळ्याचा किती बाऊ करतो असे वाटले.

मुंजीच्या दिवशी पंचक्रोशीतून, पुण्या मुंबईतून व इतर शहरांतून साधारण ३५० पाहुण्यांनी पलिकडच्या मांडवात, जिलेबी, मठ्ठा, मसालेभात, अशा सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. कुठेही गोंधळ नाही. कांगावा नाही. घाई नाही. एकाबाजूला जेवणाचा कार्यक्रम चालू असतांना नातेवाईकांच्या उपस्थितीत घरासमोरच्या अंगणात गुरुजी मुंजीचे सर्व विधी अगदी मनापासून करुन बटूवर छान संस्कार करत होते.

मुंजीनंतरच्या भिक्षावळ सोहळ्याने तर समारंभास वेगळीच रंगतच आणली होती. सजवलेल्या बैलगाडीतून देवदर्शनाला निघालेली मिरवणूक व त्यामागे पांढऱ्या साड्या नेसलेल्या महिला वर्गाने वरातीची शोभा अजूनच वाढवली होती. बालगोपाळ, लहान थोर सगळे पारंपारिक वेशात नटून थटून ह्या वरातीच्या पुढे मागे नाचत वाजत गाजत चालतांना पाहून मलाही नाचावेसे वाटत होते.

जमलेल्या पै पाहुण्यांनी ह्या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला होता.  बाहेर सूर्यनारायण आग ओकत होता, पण मांडवात कोणाला त्याचे काहीच पडले नव्हते. जो तो सोहळ्याच्या प्रत्येक क्षणाला आपल्या स्मृतीपटलात साठवून जमेल तेवढ्या आनंदाचा साठा करुन ठेवत होता. आजकाल शहरात हे असे एवढे साग्रसंगीत संस्कार पहायलाही मिळत नाहीत. त्यात आपण भौतिक सुखाच्या मागे धावण्याच्या नादात अशा प्रसंगाना किती मुकलेलो आहोत ते जाणवते. एकत्रितपणे गोतावळ्यात घालवण्याचे फार थोडे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात. ते ही आपण अहंकारापोटी व्यर्थ घालवतो असे प्रकर्षाने जाणवले. अर्थात हे आपल्या परिवारावर, परस्पर संबंधांवर व संस्कारांवर अवलंबून असते हे मात्र नक्की.

ग्रहमखाच्या रात्री आलेल्या सगळ्या पाहुण्या मंडळींनी अंगणातल्या मांडवात मस्तपैकी गप्पांचा फड मांडला होता. विनोद, चेष्टा, एकमेकांची खेचणे, हसणे, खिदळणे, मध्येच कुल्फीवर ताव मारणे चालू होते. इकडच्या मोकळ्या हवेमुळे कितीही खाल्ले तरी सहज पचते व भूकही खूप लागते आणि महत्वाचे म्हणजे वजन वाढत नाही. खाल्लेले अन्न अंगी का लागते त्याचे उत्तर मिळाले.

आजूबाजूच्या  घरातलीही आप्तेष्ट, नातेवाईक व शेजारी मंडळीही हक्काने मांडवात जमून धमाल करत होती. माझ्यासारख्या शहरी मानवाला, माणसांच्या उत्साहाने व आनंदाने खळखळणारा हा समुद्र पाहून खूपच प्रफुल्लित व्हायला झाले होते. मध्यरात्री कडक काफीचाही बेत तर ठरलेलाच होता.  मनात आणले तर सुखी, समाधानी कसे जगायचे ह्याचा हा परिपाठच होता.

एवढ्या पाहुण्यांच्या रामरगाड्यात अमेयची रोजच्या कामांचीही धावपळ, गडबड चालू होती. त्यात आंब्यांचा हंगाम असल्यामुळे बागेतल्या कामावरही लक्ष ठेवणे चालूच होते. अमेयचे बाबा स्वतः गडीमाणसांवर देखरेख ठेवत होते व स्वतः त्यांच्याबरोबरीने राबतही होते. ह्या धावपळीत अमेयला तर दुपारी गायींच्या धारा काढाव्या लागत होत्या. त्याच्याशिवाय हे काम दुसरे कोणास करणे शक्य दिसत नव्हते.

मुंज उरकल्यावर त्या रात्रीतर आपापले वय विसरून सगळ्यांनी मिळून जी काही धमाल केली होती ते पाहून मला तर अचंबितच व्हायला झाले होते. कोकणातली अशी प्रशस्त घरे व त्यात ठासून भरलेली आपुलकी आणि ओसंडून वाहणारी माणुसकी पाहिली की वाटते आपलेही असेच एक घर असावे, त्यात आपणही असे माणसांचे मेळावे भरवावेत. संमेलने करावीत. मनात साठवून ठेवलेल्या भावना उचंबळून आल्यावर ह्या आपल्या आप्तेष्टांच्यावर उधळून आयुष्याचे सोने करावे, असे राहून राहून वाटत होते.

दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं उरकल्यावर आम्ही २५-३० जणं २२ किलोमीटरवर असलेल्या "पन्हाळेकाजी" ह्या प्राचीन काळातील बौध्द लेण्यास भेट द्यायला गेलो होतो. नदीच्या बाजूला डोगरात कोरलेली ही लेणी पाहून प्राचीन काळातील मानवांच्या इच्छाशक्तीने व अफाट कल्पनाशक्तीने डोळे दिपून गेले.

माझ्या एर्टीगात ५ जणं आणि उरलेले सगळे अमेयच्या टेम्पोत असा हा रोमांचित करणारा जो प्रवास आम्ही केला, तो तर कदापी विसरता येणार नाही असाच होता. लाल मातीचा तो घाट रस्ता गाडीची आणि आतल्या माणसांची सत्वपरिक्षाच पहात होता. टेम्पोतल्या माणसांची अवस्था तर मिक्सरमधल्या दाण्यांसारखी झाली होती. आम्ही सोडून प्रवासात सगळेजण लालमातीने अक्षरशः माखलेले होते.

एवढे दमल्यानंतरही रात्रीची धमाल मात्र कोणीही चुकवली नव्हती. रात्री दीडदोन पर्यंत गप्पा, नाच गाणी रंगलेलीच होती. फुगडी, झिम्मा, मंगळागौरीच्या खेळांनी तर पोरींचा व पोक्त महिलावर्गाच्या शारीरिक क्षमतेचा कस अधोरेखित करत होती.  ह्या सगळ्यात आजूबाजूच्या घरांतील सर्व पोरीबाळींचा व महिलावर्गाचा दांडगा उत्साह पाहून मन ताजेतवाने झाले होते.  अतिउत्साहाच्या भरात अगदी प्लन्चेट करुन पणजोबा, आजोबांच्या आत्म्यास बोलवून त्यांना प्रश्न विचारुन अपेक्षित उत्तरेही ह्या पोरांनी मिळवली होती.

इकडच्या काकवा, मावश्या, आत्या, माम्या, आजी, पणजी, काका, काकू, आजोबा, लहानसहान पोरांचा दांडगा उत्साह पाहून शरीरात नवचैतन्याचे धबधबेच फुटून वाहत होते.

आम्हांला येऊन चार दिवस झाले होते. तरी आम्ही निघायचे नाव घेत नव्हतो आणि यजमानही आम्हाला जा म्हणत नव्हते.

आज संध्याकाळचा बेत तर लईच भारी होता. आमचा सगळा लवाजमा, दोन किलोमिटरवरील लागात म्हणजे काजू आणि आंब्याच्या बागेत निघाला होता. तिकडे तर्रीबाज मिसळ पाव असा बेत आखला होता. अमेयच्या टेम्पोत २०-२२ जण आणि पणजीआजी, उषाताई, मंदार, महेश, सलील, मी आणि वंदना माझ्या गाडीतून गेलो होतो. बागेचा तो लालमातीचा मुरमाड रस्ता, त्यात गाडीत आम्ही सात माणसे एर्टीगाची अग्नीपरिक्षाच होती. त्यात ती पास झाली हे विशेष.

मिसळ पावाची पूर्व तयारी घरुनच करुन घेतली होती. बागेत चूल मांडून तिच्यावर सगळ्यांनी मिळून मिसळ बनवली. ती शिजेपर्यंत पोरे-पोरी मस्तपैकी  लगोरी, विषामृत खेळले. आमच्यासारखे थोडे वयस्करांनी काजूच्या बिया वेचण्याचाही कार्यक्रम उरकून घेतला. पोतंभर काजूच्या बिया गोळा करुन टेम्पोत भरुनही ठेवले होते.

अमेयने हापूस आंब्याची व काजूची शे-दीडशे कलमे लावलीत. सगळी झाडे हिरव्या जर्द कैर्यांनी व पिवळ्या धम्मक काजूंनी लगडलेली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याचा मोसम सुरु होणार होता व घरचा हापूस आंबा खायला आजून एक महिना प्रतिक्षा करावी लागणार हे कळले. मन थोडे खट्टू झाले. काजूच्या बीया वाळवून नंतर त्यावर काही प्रक्रीया करुन त्यातून आपण जो खातो तो काजू तयार होतो. हे सगळे खूपच कष्टाचे काम आहे हे जाणवले.

सकाळी सकाळी एवढ्या गडबडीत अमेयचे मांडव उतरवून ते सामान परत करण्याचे काम चालू होते. त्यात तो टेम्पोत हजार लिटरच्या दोन टाक्या भरून पाणी २ किलोमिटर दूर असलेल्या बागेत जाऊन आंब्यांच्या झाडांना घालत होता. चार पाच तासात त्याने चार खेपा मारल्या होत्या.   अतिउष्णतेने झाडांना पाणी देणे गरजेचे होते व वरती डोंगरावर बोअरला पाणी नसल्यामुळे त्याला हा उद्योग करावा लागत होता. किती काबाडकष्ट करावे लागत होते ते उमजले.  ह्या कष्टांचे फळ म्हणूनच आपल्याला आंबे गोड लागतात हे कोडे आज उलगडले होते.

उद्या सकाळी म्हणजे रविवारी पुण्याला प्रस्थान ठेवायचे ठरले होते. त्यामुळे आंजर्ल्याला वहिनीकडे धावती भेट देऊन आलो. आंजर्ल्याचा उत्सव उद्यापासून सुरु होतो आहे.  उभागरात देवीचे दर्शन घेऊन नंतर पाखाडीत आलो. आंजर्ल्यात आलो की दापोलीत एकतरी चक्कर मारणे तसेच दापोलीत आलो की आंजर्ल्यात चक्कर मारणे क्रमप्राप्त आहे नव्हे हा माझा शिरस्ताच आहे.

खूप वर्षांनी वरदच्या मुंजीमुळे आम्हाला ही सगळी मज्जा करता आली. मला मंदार, सलील , महेश, ओंकार, प्रसाद, निषाद सारखे नवे मित्र मिळाले. सौमिल आणि प्रियल सारखी आस्ट्रेलियात जन्मूनही भारतीय संस्कृतीशी घट्ट नाळ असलेली पिल्ले सापडली. अर्थात प्राची आणि सलीलचे त्यासाठी फार कौतुक वाटले. मानससारखा मंदार-पल्लावीचा महाराष्टाच्या मातीतला भरूच गुजरातमध्ये वाढणारा गुणी मुलगा सापडला. अमेय-सानिकाच्या व उषाताई-काकांच्या, स्वरा-अंतरासारख्या बहिणींच्या मायेच्या संस्कारात वाढणारा बटू वरदही खूपच भावला व आपली संस्कृती पुढील काही पिढ्यातरी अबाधित राहील ह्याची खातरी पटली.

आमचा तर पाय दापोलीतून निघत नव्हता. पण परत येण्याशिवाय पर्यायच नव्हता.

अतिशय सकारात्मक उर्जा घेऊन आम्ही गाडीत  शरीराने बसलो होतो. मन मात्र अजूनही दापोलीतल्या अंगणातल्या झोपाळ्यावरच झुलत बसलेले होते. ते बहुधा तिथेच राहणार असावे.

हे अविस्मरणीय क्षण शब्दबध्द करुन जतन करावेसे वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

रवींद्र कामठे

९४२१२१८५२८

ravindrakamthe.blogspot.com