Wednesday 29 August 2018

“विश्वास”


विश्वास

विश्वास ह्या शब्दावरच विश्वास कसा ठेवायचा हे खरं तर खूप शिकण्यासारखं आहे आणि ज्याला हे जमतं त्यालाच आयुष्याचा अर्थ समजला आहे असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

माणूस विश्वास कोणावर, कशासाठी, का ठवतो हे त्याचे त्यालाच माहित !  विश्वास म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज, जो आपल्या अंत:करणातून येतो आणि आपल्या काळजाला भिडतो व शब्दरूपी भावनांतून व्यक्त होतो.  तसं पहायला गेले तर जगातले सर्वच व्यवहार, सुविचार, आचार, प्रचार, प्रकार, स्वैराचार, अत्याचार, तक्रार, सरकार, पुरस्कार, तिरस्कार, नकार, बलात्कार, देकार, आकार, विकार, दुराचार, प्रतीकार, सोपस्कार, फेरफार इत्यादी, हे त्या त्या गोष्टींवरील सलग्न असलेल्या त्या त्या माणसांच्या विश्वासावरच तर अवलंबून असतात नाही का !  थोडासा मनाला ताण देऊन पहा म्हणजे तुम्हांला मी हे जे काही विधान केलेले आहे ते पटल्याशिवाय राहणार नाही, ह्याची मला खात्री आहे. 

वर नमूद केलेल्या ह्या गोष्टींवरील आपला त्या त्या गोष्टींच्या संदर्भातील विश्वास हा इतका दृढ असतो की समोरच्याने आपल्याला त्याविरुद्ध अथवा त्याच्या बाजूने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला ना तरी ते पटत नाही.  त्याचे कारण आपल्या मनातील रासायनिक प्रक्रियाच इतकी खतरनाक आहे की आपले मन कळत नकळत ह्या विचारांच्या आधीन होवून बसते, त्यावर विश्वास ठेवते आणि त्यामुळेच की काय, जे घडायला नको असते नेमके तेच घडून जाते आणि शेवटी आपण नियतीकडे बोट दाखवून स्वत:ची सुटका करून घेतो.  अर्थात हे चांगले आणि वाईट ह्या दोन्ही घटनांच्या बाबतीत तितकेच लागू पडते हे मात्र निश्चित आहे.

आपल्याकडे एक म्हण आहे की विश्वास कमवायला आपले आयुष्य खर्ची घालायला लागते, पण विश्वास गमवायला एक क्षण, एक छोटीशी चूकही पुरेशी असते”.  असे का !  ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतच नाही असेच वाटते.  उत्तर मिळाले तरी प्रश्न सुटतोच असेही नाही.

माणूस माणसावर अथवा व्यवस्थेवर आपल्या सोयीनुसार विश्वास टाकतो अथवा ठेवतो असे मला तरी वाटते.  म्हणजे ज्या गोष्टींमुळे माणसाची गैरसोय होते तिथे माणसाचा त्या व्यक्तीवरील अथवा व्यवस्थेवरील विश्वास उडायला सुरवात होते.  माणसाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यामुळे एकमेकांवरील विश्वासाला तडा जातो आणि आपल्यातील नातेसंबंधात, मित्रत्वात, व्यावहारिक संबंधात, व्यवस्थेत एक प्रकारचा दुरावा निर्माण होऊन बसतो.  आयुष्यभर मोठ्या कष्टाने कमावलेला हा विश्वास काही क्षणात गैरसमजामुळे म्हणा अथवा असंवेदनशील अशा अहंकारातून निर्माण झालेल्या हट्टापायी म्हणा, किवा संदर्भित प्रसंगाकडे ह्या व्यक्तींच्या बघण्याच्या दृष्टिकोनामुळे, नाहीसा होतो आणि कधीही न भरून येणारी हानी करून जाते.  माणसांची नाती तर विश्वासावरच अवलंबून असतात !  एकदा का ह्या विश्वासाला तडा गेला तर परत ही नाती जुळून येणे जरा कठीणच होऊन बसते आणि समजा यदाकदाचित जुळून आलीच तर ती पुन्हा परत पहिल्यासारखी, पहिल्या इतक्याच विश्वासाने वृद्धिंगत होतील ह्याची शास्वती देणे अंमळ कठीणच !  अगदी काचेला गेलेल्या तड्या सारखी अवस्था होऊन बसते.  ह्यात ज्यांचा काही दोष नसतो अशी काही माणसे निष्कारण भरडली जातात.  त्यांच्या प्रामाणिकपणाची कसोटी लागते.  परंतु त्याला काही पर्यायही नसतो.  ज्याचे चुकत असते त्याला जर कळत असते तर शेवटी ते घडलेच नसते ना ! असो.  हा खेळ आपल्या भावनांचा असतो आणि ह्यात भरकटत जाण्याशिवाय काही गत्यंतर नसते हो.  शेवटी काय तर प्रामाणिक माणसांनाच आयुष्यात सत्व परीक्षा म्हणा अथवा अग्नी परीक्षा द्यावी लागते, अगदी सीते सारखी, हे ही सत्य नाकारून चालणार नाही !

म्हणूनच विश्वास कमवायचा असतो आणि तो आयुष्यभर कसा टिकेल ह्यासाठी कष्ट घ्यायचे असतात हे नक्की.  हीच तर आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्यामुळेच ती सर्व जगात श्रेष्ठ ठरली आहे आणि माझा ह्यावर ठाम विश्वास आहे.


रविंद्र कामठे