Wednesday 24 January 2018

चपराक दिवाळी महाविषेशांक २०१७-... एका वाचकाचा मनापासून दिलेला हा अभिप्राय














बुधवार, २२ नोव्हेंबर २०१७
 
प्रती,
श्री. घनश्याम पाटील,
संस्थापक संपादक,
चपराक प्रकाशन,
शुक्रवार पेठ,
पुणे.
 
विषय : चपराक दिवाळी महाविषेशांक २०१७-... एका वाचकाचा मनापासून दिलेला हा अभिप्राय...
 
महोदय,
 
चपराकचा दिवाळी महाविषेशांक २०१७ मिळाला तो मी संपूर्ण वाचला आणि आपल्या सृजन वाचकांसाठी एका वाचकाच्या नजरेतून मनापासून आलेला हा अभिप्राय आपल्या सुपूर्त करतांना मला आज खूप आनंद होत आहे.
 
गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात चपराकच्या २०१७च्या दिवाळी महाविषेशांकाचे प्रकाशन  प्रसिद्ध वात्रटिकाकार श्री. रामदास फुटाणे ह्याच्या हस्ते झाले. सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री श्रीमती आशाताई काळे, जेष्ठ उद्योजक श्री. कृष्णकुमार गोयल, मनसेचे शहर उपाध्यक्ष रणजीत शिरोळे आणि सोहळ्याचे अध्यक्ष सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, ह्या सर्व प्रथितयश मान्यवरांनीही काहीही हातचे न राखून ठेवता चपराक समुहाचे भरभरून केलेले कौतुक हे ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.  त्याचा मी एक साक्षीदार आहे.  सर्व स्तरामधील साहित्यिकांचा आणि बोलीबाषेतील/प्रादेशिक साहित्याचाही समावेश करून, अतिशय प्रगल्भ आणि दर्जेदार साहित्याची एक मेजवानीच ह्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने चपराकने यंदाही करून साहित्य विश्वात एक क्रांतीच घडवून आणली आहे असे म्हणाले तर वावगे होणार नाही.  अगदी चांद्या पासून बांद्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या सीमापार असेलेल्या मराठी साहित्यिकांचा समावेश असलेला असा हा एकमेव दिवाळी अंक असावा असे मला वाटते.
 
चपराकचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील, उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे, कार्यकारी संपादिका सौ. शुभांगीताई गिरमे, सहसंपादक श्री. माधव गिर, सल्लागार श्री. ज्ञानेश्वर तपकीर, व इतर सहकारी मोरेश्वर ब्रम्हे, अरुण कमळापुरकर, सचिन सुंबे, विनोद पंचभाई, प्रमोद येवले, अश्विनी जामकर, सागर कळसाईत, रवी सोनार, सागर सुरवसे, निखील भोसले, चिन्मय साखरे इत्यादी मंडळींच्या अथक परिश्रमाचे आणि कष्टाचे चीज झाल्यासारखे भासले.  मी स्वत: ह्या सोहळ्यास उपस्थित होतो आणि ह्याची देही ह्याची डोळा हा अभूतपूर्व सोहळा अनुभवत होतो.
 
आर्थिक मंदीच्या काळातही ४८२ पानांचा दिवाळी महाविषेशांक काढून तो सफलपणे सृजन वाचकांपर्यंत पोहचवण्याची चपराक समूहाची ही सगळी धडपड, तळमळ पाहून मला आपल्या माय मराठीचे भवितव्य किती उज्वल आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवले आणि माझे हात ह्या चमूला नमन करून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यासाठी आपसूकच जुळले.
 
साहित्याला महागाई वगैरे काही नसते.  तिथे फक्त आणि फक्त इच्छाशक्ती असावी लागते हे मात्र खरे आहे.  म्हणूनच तुरस्त्र, रखड, रास्त, र्तव्यदक्ष, (चपराक) चे भविष्य उज्वल आहे आणि त्यामुळेच तुम्हां आम्हां वाचकांचे आयुष्य साहित्यापासून वंचित राहणार नाही ह्याची खात्री आहे.  आपला समाज साहित्यकुपोषित राहणार नाही ह्याची हमी चपराकदिली आहे हेच सिद्ध होते.
 
मी चपराकसमूहाचे पुनश्च मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेछ्या देतो.
 
घरी आल्याबरोबर लगेचच मी हा अंक वाचण्यास सुरवात केली. कारण माझी उत्कंठा आता अगदी शिगेला पोचली होती.  अंक हातात पडल्यापासून तो कधी एकदा वाचायला घेतो असे झाले होते.  समारंभ उरकून घरी पोचलो आणि शुभस्य शीघ्रम अंक वाचायला घेतला.  ह्या अंकामधील प्रत्यके लेखावर माझा एक वाचक ह्या नात्याने अभिप्राय नमूद करून तो चपराकच्या संपादकांना लिखित स्वरुपात पाठविण्याचा मी ह्या निमित्ताने एक संकल्पच सोडला होता तो आज पूर्ण करतो आहे.  त्याचाच हा मागोवा खाली देत आहे.  मला खात्री आहे की माझा हा आगळा वेगळा संकल्प संपादकांना आणि सृजन वाचकांना नक्कीच आवडेल.
 
  1. सर्वप्रथम ह्या दिवाळी महाविषेशांकाचे मुखपृष्ठ इतके विलोभनीय आहे कि काही विचारू नका.  आपल्या माय मराठी साहित्याचा हा इवलासा वेलू गगनावरी पोहोचलाय अशी संकल्पना मांडून संपूर्ण साहित्य क्षेत्राला नवचैतन्य देणारे असे मुखपृष्ठ आपल्या कल्पनाशक्तीतून साकारणारे कलाकार श्री. संतोष घोंगडे ह्यांचे मनोमन कौतुक करावे तितके थोडेच आहे.  संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांच्या ह्या संकल्पनेला माझा सलाम आहे.  मुखपृष्ठानेच निम्मा वाचकवर्ग ह्या अंकाकडे आकर्षित झालातर त्यात आश्चर्य वाटू नये.
  2. अंकाची मांडणी व सजावट श्री. निखील भोसले ह्या तरुण तडफदार कलाकाराने अतिशय शिताफीने आणि अहोरात्र कष्ट घेऊन केली आहे त्यामुळे त्याचेही खूप कौतुक आहे.
  3. अंकाचे अंतरंग अतिशय सुटसुटीत आणि वाचकाला नेमके काय वाचावे ह्याचे मार्गदर्शन करणारे तर आहेच, परंतु त्यामधील साहित्यिकांची मांदियाळी, वाचकांना वाचनासाठी लागणारी उर्जा देणारे आहे.
  4. ह्या दिवाळी अंकामध्ये व्यवसाईक दृष्टीकोनातून आवश्यक तेवढ्या जाहिराती आहेत परंतु त्यांचा अजिबात भडीमार केलेला नाही.  कुठेही बटबटीतपणा नाही.  त्यामुळे अंकाचे साहित्यिक मूल्य अबाधित राहिले आहे आणि वाचकाला एक प्रकारे वाचण्यास उद्युक्त करून खिळवून ठेवणारे आहे.
  5. इवलासा वेलू...गेला गगनावरी ! हा श्री. घनश्याम पाटील ह्यांचा संपादकीय लेख म्हणजे त्यांमधील तरुण, प्रगल्भ पत्रकार, लेखक, समीक्षक, कवी आणि सृजन वाचक अशा प्रतिभाशक्तीचा आविष्कारच म्हणावयास हवा.  इतक्या लहान वयात इतकी प्रगल्भता ह्या माणसामध्ये ठासून भरली आहे की वाटते हे म्हणजे दैवी चमत्कारच आहे. एकतर त्यांच्या कडे कामाची प्रचंड उर्जा आहे. सतत न थकता ५० तास काम करून हा दिवाळी महाविषेशांक वेळेत छपाईला पाठवण्याची जिद्द आहे आणि साहित्याच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड केलेली नाही हे सध्याच्या काळात खूपच कौतुकास्पद आहे.
  6. खाण्यासाठी जन्म आपुला मसपाचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी सरांच्या ह्या लेखामुळे ते स्वत: एक उत्तम खवय्ये आहेतच पण तितकाच उत्कृष्ठ स्वयापाक ही करतात हे समजले.  आपला जन्म हा फक्त खाण्यासाठीच झाला आहे ह्यात काहीच दुमत नाही हे ह्या लेखामुळे सिद्ध झाले.  रावण पिठ्ल्याने तर मला वाचतांनाच घाम फुटला होता.  पाठीवर धपाटेच खाल्ल्यासारखे वाटले.  थोडस खावं पण चवीन खावंहे मात्र मनोमन पटलं.  मिलिंद सरांनी खूप छान लेख लिहिला आहे.  अगदी तोंडाला सारखे पाणी सुटत होते आणि हे पदार्थ करून खायचा मानसही तयार होत होता.  सहज सोपी भाषा हे तर ह्या लेखाचे वैशिष्ट्य आहे.
  7. निवारा ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक अकिलन ह्यांची कथा भुसावळच्या श्री. चंद्रकांत अंबाडे ह्यांनी अतिशय उत्तमरीत्या अनिवादित केली आहे.  छोटीशीच पण अगदी संवेदनशीलतेने मांडली आहे.  प्रसंगाची खूप छान मांडणी करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.
  8. अंक तीन प्रवेश पाचही श्री. सदानंद भणगे सरांची एका रहस्याची वेध घेणारी छोटीशी पण छान कथा आहे.  वाचायला सुरवात केल्यापासून आपल्याला एक उत्कंठा लागून राहते आणि शेवटी कथा संपते तेंव्हा आपला जीव भांड्यात पडल्यासारखे होते.  हेच तर भणगे सरांच्या कथा लेखनातले वैशिष्ट्य मला अगदी प्रकर्षाने जाणवले.
  9. कसा जिंकावा संसार ?” प्रा. डॉ. द. ता. भोसले सरांची ही एक दीर्घ कथा म्हणजे राधानंद नावाच्या अपघाताने पुजारी झालेल्या एका माणसाच्या संसाराबद्दलची व्यथाच आहे. आयुष्याचे खूप मोठे तत्वज्ञान ही कथा वाचतांना जाणवते आणि भोसले सरांच्या लेखणीला साष्टांग दंडवत घालण्यास उद्दुक्त करते.  प्रसंगानुरूप केलेली ह्या कथेची मांडणी तर माझ्यासारख्या नावोदितास बरचं काही शिकवून जाते.  साधी सोपी मराठी भाषा, परंतु अतिशय प्रगल्भ विचार मांडण्याची त्यांची शैली खरोखरच वाचकांना अचंबित केल्याशिवाय रहात नाही.
  10. श्रद्धांजलीही कै ह, मो, मराठे सरांची, व्यंग कथा आहे.  राजकारणातल्या अण्णाभाऊंच्या श्रद्धांजलीची ही कथा ज्या पद्धतीने साकार झाली आहे त्यात तसे पाहायला गेले तर खूप व्यंग आहे तसेच वास्तवही आहे.  माझी त्यांच्या लिखाणाबद्दल लिहिण्याची योग्यता नाही. नुकतेच ह, मो, मराठे ह्यांचे निधन झाले.  त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
  11. श्री. भाऊ तोरसेकरांचा २०१९ आणि दोन गुजराथी हा गेले काही दशके चालू असलेल्या शहा-मोदी ह्या दोन गुजराती नेतृत्वाचा राजकारणातील वाटचालींचा लेखाजोखाच आहे.  भाऊंचे राजकीय विश्लेषण म्हणजे प्रमाणसिद्ध असते आणि कुठेही कसलीही भीड ठेवून ते लिहित नसल्यामुळे वाचकाला एक राजकीय घडामोडींचा खराखुरा आनंद मिळतो हे नक्की.
  12. तक्षशीला, चाणक्याची पाकिस्तानात उपेक्षाहा जेष्ठ पत्रकार श्री. हरीश केंची ह्यांचा लेख म्हणजे आपल्याकडील पुरातत्व खात्याचा ढिसाळ कारभारच प्रतिध्वनित करतो, जो भारतात काय आणि पाकिस्तानात काय सारखाच आहे.  एक वेगळ्या विषयाला हात घालून वाचकांना विचार करायला लावणारा हा लेख आहे.
  13. सुप्रसिध्द निवेदक श्री. सुधीर गाडगीळ ह्यांनी शब्दांकित केलेला चित्रकर्ती गायिका उषाताई मंगेशकरांचा माझा चित्रप्रवास छान आहे. उषा मंगेशकरांच्या ह्या कलेबद्दल रसिक वाचकांना फारशी माहिती नव्हती ती ह्या लेखामुळे वाचकांच्या समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
  14. अमृताहुनी गोडपंजाबी साहित्यामधील पहिली ज्ञानपीठ विजेती कवयत्री, लेखिका, अमृता प्रीतमच्या आत्मचित्राचा सारांश महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सौ. सुनीताराजे पवार, ह्यांनी खूप छान शब्दांकित केला आहे.
  15. सात्विकतेची मूर्तिमंत ओळखसुप्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे त्याच्याशी परभणीच्या सौ. अर्चना डावरे यांनी साधलेला उत्कृष्ट संवाद म्हणजे दोन प्रतिभावंत कलाकारांनी एकमेकान दिलेली उत्स्फूर्त अशी दादच म्हणावी लागेल.  अर्चनाताईंनी आपल्या अनोख्या शैलीतून शब्दांकित केलेला हा संवाद वाचतांना आशाताईच्या अभिनयाचा तो सुवर्णकाळ अनुभवता अनुभवता त्यांच्या मधील माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या व्यक्त्मत्वाचाही शब्दश: अविष्कार झाला.
  16. संयुक्त महाराष्ट्रातील खरा प्रतिभावंत शाहीर आत्माराम पाटीलहा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक प्रमुख साक्षीदार आणि जेष्ठ लेखक डॉ. माधव पोतदार यांचा लेख साहित्य विश्वाला लाभलेली एक देणगीच आहे.  माझ्या आणि नंतरच्या पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा लढा काय होता हे कदचित माहितीही नसेल.  परंतु पोतदार सरांच्या ह्या लेखामुळे आत्मराम पाटील ह्यांच्या सारख्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या मात्तबर शाहिराच्या प्रतिभासंपन्न लेखणीशी ओळख झाली.  चपराकने हा लेख प्रकाशित करून साहित्य विश्वावर फार मोठे उपकार केले आहे असे म्हणालो तर वावगे ठरणार नाही.
  17. सौ. सुरेखा शहा, सोलापूर ह्यांनी जलसंधारणाचे अनन्य साधारण असे काम करणाऱ्या कर्मयामिनी अमला रुईया ह्याच्या कार्याचा अतिशय योग्य शब्दांमध्ये सन्मान करून जलयुक्त शिवार अथवा राजस्थान सारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांचे त्यांनी कसे नंदनवन केले आहे हे वाचकांच्या समोर आणून त्यांच्या कार्याचा गौरवच केला आहे असे मला वाटते.
  18. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे सरांचा आषाढस्य प्रथम दिवसे महाकवी कालिदास हा लेख वाचकांना अगदी संक्षिप्त स्वरुपात कालीदासाच्या काव्यामधील अभूतपूर्व प्रतिभेचे दर्शन घडवतो.  मेघदूत आणि शाकुंतल ह्या खंडकाव्यांची निसर्गाच्या चौकटीत राहून मानवी भावनेचे केलेले विलोभनीय चित्र आपल्या डोळ्यासमोर तरळून जाते.  हेच तर ह्या लेखाचे वैशिष्ट्य आहे.
  19. कोल्हापूरचे जेष्ठ पत्रकार श्री. श्रीराम पचिंद्रे ह्यांची बोंडल्याचा राणा  ही एकदम वेगळ्याच धाटणीची कथा वाचायला मिळाली.  ही कथा जंगलातील एका वाघाची आहे.  कथेतून लेखकाने आपल्या निसर्गाची तसेच त्यामधील प्राण्यांची मानवाच्या हस्तक्षेपामुळे होत असलेली केविलवाणी घुसमटच व्यक्त केली आहे.  ही कथा समाज प्रबोधन करून निसर्गाप्रती आपली संवेदना जागरूक करण्यात नक्कीच यशस्वी होईल असे मला वाटते.  मी ही एक निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी असल्यामुळे मला ही कथा खूपच भावली.  चपराकचे ही कथा दिवाळी अंकात घेतल्याबद्दल आभार.
  20. पाकिस्तानला तीन तलाकहा स्वाती तोरसेकर, मुंबई, ह्यांचा भारत पाकिस्तान संबध व अफगाणिस्तान मध्ये महत्वाची भूमिका पार पडण्यासाठी अमेरिका भारताला सहाय्य देईल ! ह्या आशयाचा आतरराष्ट्रीय घडामोडींचा उहापोह करून त्यावर प्रकाशझोत टाकणारा असा खूपच प्रगल्भ व वैचारिक लेख आहे. सर्वसामान्य माणसाला जरी ह्या विषयातले फारसे कळत नसले तरी त्याच्या ज्ञानात नक्कीच भर पडते हे ह्या अशा लेखांमुळे सिद्ध होते.
  21. भोवराही विद्या बायस ठाकूर, शिरूर ताजबंद, जि. लातूर यांची दीर्घ कथा म्हणजे आपल्या समाजातील पुरुषी तसेच स्त्रीला भोगवादी समजणाऱ्या वृतींचा पर्दाफाश करणारी आहे.  एका अतिप्रसंगानंतर अनिताच्या जीवाची घुटमळ, तळमळ, घालमेल व मानिसक ताण तणाव तसेच एकंदरीत पुरुषांच्या स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टीकोनच अगदी स्पष्ट दाखवणारी अशी आहे.  ह्या कथेमुळे आज समाजात निर्धोकपणे वावरणारे, करून सरून नामानिराळे होणारे पुरुष एका स्त्रीचा संसार कसा उध्वस्त करू पाहतात ह्याचे अतिशय संयुक्तिक शब्दांकन आहे.  अर्थात स्त्रीने जर का ठरवले तर ती काहीही करू शकते.  अन्यायाला वाचाही फोडू शकते आणि पुरुषाला नेस्तनाबूत करू शकते हे दाखवून एक प्रकारे समाजाला अगदी स्पष्ट संदेशच देण्याचे काम ही कथा नक्कीच करते.  त्यातून एका लेखिकेने स्त्रीची मांडलेली ही व्यथा मन हेलावून टाकते.  विद्याताई खूप छान आणि संवेदनशील कथा आहे.  तुमचे खूप खूप अभिनंदन.
  22. पत्रकारितेचे अर्धशतक हा गडहिंग्लज जि. कोल्हापूर चे जेष्ठ पत्रकार श्री. सुभाष घुमे यांचा लेख म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितही आपल्या कामाशी असलेली निष्ठा, सचोटी आणि पत्रकारितेमधील सहजता व कष्टाने मिळवलेले जेष्ठत्व दाखवते आहे. अशा अनुभवांतूनच नवीन पिढी घडत असते हे भान चपराकने ठेवून त्यांचा हा लेख ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केला आहे त्यासाठी चपराकचे नक्कीच कौतक केले पाहिजे व घुमेसरांचे अभिनंदन केले पाहिजे. 
  23. जिथे संस्कार आहे तिथे माणुसकी आहे आणि जिथे माणुसकी आहे तिथे संस्कृती आहेखेड्यांमध्ये अजूनही माणुसकी टिकून आहे व आपली संस्कृतीही अबाधित आहे हे त्रिवार सत्य आपल्या समोर आणणारा श्री. अनिल राउत, मोहोळ, जि. सोलापूर ह्यांचा खेड्यातली दिवाळी म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला असाच आहे.  सध्याच्या आधुनिकतेच्या युगात आपल्या संस्कृतीमधील दिव्यांचा हा सण किती महत्वाचा आहे तसेच हा उत्सव म्हणजे नात्यांचा उत्सवआहे हे अधोरेखित करणारा हा एक उत्तम लेख आहे.
  24. मैत ही पुण्याचे अविनाश हळवे ह्यांची जुन्याकाळातील फक्टरीमध्ये घडणाऱ्या फाटक्या माणसांच्या माणुसकीची कथा आहे.  थोडीशी गंभीर स्वरूपातील विनोद ह्या कथे मध्ये साकारण्याचा अभिनव प्रयोग हळवे ह्यांनी केलेला आहे.  मैत म्हणजे मयत हे ह्या कथेच्या संयुक्तिक चित्रावरूनच जाणवते त्यासाठी चित्रकाराचे कौतुक आहे.
  25. मुंबईच्या सुषमा परचुरे ह्यांच्या मालदीव बेटावरील प्रवासाचा थरार  वाचला आणि त्यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाने अंगावर काटा आला. त्यांचे परिस्थितीनुरूप धारिष्ट्य व प्रसंगावधानाने आपल्या नवऱ्याचा वाचवलेला जीव मनाला खूप भावतो.  लाखात एखादी अशी घटना घडत असते त्यामुळे खचून न जाता पुन्हा एकदा नाव पर्यटनास सुरवात करावी.
  26. सर जदुनाथ सरकार म्हणजे विसाव्या शतकातील जेष्ठ इतिहासकार. त्यांच्या साहित्य संपदेचा म्हणजेच मोगलांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास असे अनेक ग्रंथ व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा त्यांचा गाढा अभ्यास इत्यादींचा मागोवा जेष्ठ साहित्यिक आणि इतिहास तज्ञ डॉ. सदाशिव शिवदे सरांनीसर जदुनाथ सरकार आणि महाराष्टह्या लेखातून घेऊन शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना दिवाळीची खूप छान भेटच दिली आहे असे म्हणावयास हवे.
  27. श्री. उमेश सणस, वाई, जि. सातारा, ह्यांचा मराठी रंगभूमी जागतिक कधी होणार ?” हा लेख म्हणजे नाट्यसृष्टीच्या नाण्याची दुखरी बाजू उलगडून तिचे बहुढंगी विलक्षण असे समीक्षण करण्याचा प्रयत्न वाटला.  मराठी रंगभूमी तेंव्हाही समृद्ध होती आणि आजही आहे.  कालानुरूप थोडेफार बदल घडलेत हे निर्विवाद आहे.  सणसांचे सगळेच मुद्धे योग्य आहेत असेही नाही.  संगीत नाटकांनी केलेले रंगभूमीचे नुकसान मात्र मला थोडेफार योग्य वाटले.  अर्थात मी त्यातला फार मोठा जाणकार नसल्यामुळे त्यावर फार भाष्य करू इच्छित नाही.  विषयाची मांडणी चागली आहे परंतु हा विषय थोडा गंभीरपणे व सर्व बाजूंचा विचार करून मांडायला हवा.  समीक्षकांच्या चष्म्यातून पाहणे योग्य होणार नाही. बाकी लेख उत्तम आहे. जरा टीकात्मकता जास्त झाली आहे एवढेच.  इतिहासातील संभाजी महाराजांची प्रतिमा भ्रष्ट करण्यात नाटके यशस्वी झालीत ह्या मताशी मात्र मी अगदी सहमत आहे.  व्यावसायिकतेने भरलेल्या अशा नाटकांनी आपल्या इतिहासाची हेळसांडच केली आहे हे मात्र अगदी प्रकर्षाने जाणवते. असो. सणसांनी हा विषयाला मांडला हे फार चांगले केले.
  28. औरंगाबादचे प्रत्रकार श्री. अनिरुद्ध जोशी ह्यांचा मराठवाडा आणि महाराष्ट्राचे अद्वैत म्हणजे दोन हजार वर्षा पासूनचा इतिहास असलेला मराठवाडा आजही कसा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे विकासापासून वंचित राहिला आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवले.  त्यात भरीला भर म्हणून मराठवाड्यास विदर्भ आघाडी मोर्चा काही कारण नसतांना स्वत:च्या फायद्यासाठी मराठवाड्यास स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात त्यांची इच्छा नसतांनाही ओढत आहे हे समजले.  असो.  राजकारण आपल्या जागी, परंतु लेखकाने मांडलेला मूळ मुद्धा म्हणजे स्वतंत्र मराठवाडा ही मागणीच कशी अयोग्य आहे ही पटणारी आहे.  त्यामुळे ह्या लेखाद्वारे काही प्रमाणात मराठवाड्याचा समस्या सर्वसामन्य माणसाला समजतील असे वाटते.  संयुक्त महाराष्ट्रातील संघर्षावर आपले थोर राजकारणी कशी त्यांची पोळी भाजून घेत आहेत हे तरी समजले.
  29. श्रीपाद ब्रम्हे जेष्ठ पत्रकार पुणे, ह्यांचा सम्या आणि गौरीच्या गोष्टी... हा संवाद्पर लेखनाचा आगळा वेगळा प्रयोग मनाला खूप भावाला.  आपल्या प्रेमाच्या माणसाशी साधलेला हा संवाद आपल्या अगदी जवळचा वाटतो, असा की जसा काही तो आपणच करतो आहोत अगदी सम्या आणि गौरी होऊन, हेच तर यश आहे ह्या लेखनाचे आणि लेखकाचे. भावनांची ही भट्टी अतिशय झकास जमली आहे.  अगदी मला तर माझ्या तरुणाईची आठवण करून गेली.  ब्रम्हे सर तुमचा हा प्रयोग नक्कीच यशस्वी झाला आहे.
  30. डॉ. चित्रलेखा पुरंदरे ह्यांनी पुण्याच्या चिंतामणी हसबनीस ह्या अवलिया चित्रकाराच्या आगळ्या वेगळ्या चित्रकलेची ओळख करून दिली आहे स्वयंप्रज्ञ चित्रकारह्या लेखातून.  अक्षरश: माझ्यातर डोळ्यातून अश्रू वाहत होते हा लेख वाचतांना.  रिसायकलिंग ऑफ व्हिजन ह्या संकल्पनेतून कोल्ड आईज अंड ओपन माइन्द्जअशी त्यांच्या चित्रप्रदर्शनाची थीम केवळ अंध माणसांनाच नाही तर डोळसांनाही सकारात्मक दृष्टी देवून जातात.  चिंतामणीसरांच्या कलेस माझा त्रिवार दंडवत.  तुमच्या ह्या कलाकृतीला माझ्या तरंग मनाचे ह्या काव्यसंग्रहामधील ही कविता समर्पित केल्याशिवाय राहवत नाही..
    एक आंधळा, बहिर्यास सांगतो, बघ ना रे, मावळतीचा सूर्य, किती लोभस दिसतो | अरे बहिरटा, किती रे तू वेंधळा, डोळ्यांनी नको रे पाहू, हा रंगतदार सोहळा | दाखवतो तुला मी, हा आगळा सोहळा, लाव तू तुझे कान माझ्या डोळा | तुझ्या दृष्टीत माझी सृष्टी, माझ्या सुरात तुझी वाणी, एक मुखाने गाऊ आपण, आज मंजुळ गाणी | डोळ्यांनी ऐकले, कानांनीही पहिले, तुझा आणि माझा सूर्य एकरूप जाहले ||
  31. बोधकथाकार डॉ. न. म. जोशी ह्यांचा साहित्यातील परिवर्तनांचे प्रवाहहा लेख म्हणजे वाचकांच्या ज्ञानात भरच टाकणारा आहे.  साहित्यसंस्थांमधील परिवर्तन, साहित्यिक चळवळीमधील परिवर्तन, साहित्यातील आशय विषयक परिवर्तन आणि अविष्कार विषयक परिवर्तन जोशी सरांनी अगदी नेटक्या शब्दांमध्ये वर्णन करून साहित्य विश्वामध्ये चालणाऱ्या घडमोडींचा वाचकांच्या दृष्टीने चांगला परामर्श घेतला आहे.
  32. काही व्यक्तिमत्व आपल्या मनावर गारुड करतात आणि आपणही त्या व्यक्तिमत्वाच्या अखंड प्रेमात पडतो, वाहवत जातो.  अगदी व. पु. काळेंनी त्यांच्या तूच माझी वहिदाह्या कथेतल्या एका वाल्या सारखी नवऱ्याच्या बनियनला भोक असतांनाही त्याच्या कुशीत जी प्रेमाने शिरते, तीच त्याची वहिदा !  सहीच वाटतयं ना !  अशा ह्या एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्वाचा अतिशय नाजूकपणे आढावा घेलाय श्री. लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी त्यांच्या वहिदा रेहमान नामक जादुई गारुडह्या लेखा मध्ये.  फारच प्रगल्भतेने वाहिदाच्या व्यक्तिमत्वाचा तसेच तिच्या सुवर्णयुग काळापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाचा सुंदर लेखाजोखा मांडला आहे.
  33. माणसाला परमेश्वराने त्याच्या आयुष्यात दिलेली सर्वात मौल्यवान भेट म्हणजे त्याच्याजवळ असलेली संवाद करण्याची कला.  संवादाचा मुळ हेतू ऐकणं, समजणे आणि पटणे असतो.  केवढे मोठे तत्वज्ञान प्राचार्य डॉ. प्र चि. शेजवलकर सरांनी त्यांच्या संवादह्या लेखात, एकदम सुटसुटीत आणि सोप्या भाषेत मांडून एक प्रकारे वाचकांशी संवादच साधला आहे असे म्हणलो तर आश्चर्य वाटायला नको.  सर म्हणतात संवाद ही एक कला आहे आणि ती ज्याला साधता येते, तो/ती आयुष्यात कायम सुखी समाधानी राहतो.  अंत:करणापासून निर्माण झालेला संवाद आपली जीवनात नेहमीच प्रसन्नता आणतो.  त्यामुळे जगण्याचा आपला आंनद द्विगुणीत होतो. हे काय ते संवादाचे सामर्थ्य आहे.  ह्या विषयावरून मला माझ्याच एक चारोळीची आठवण झाली... शब्दच जेंव्हा बनतात शस्त्र, निर्जीवही होतात तेंव्हा अस्त्र, दुखवून दुसऱ्याला नाही मिळत शांती, अशांत मन, मज आपल्याशीच करते क्रांती |
  34. सोलापूरचे अनिल पाटील यांनी विस्मृतीत गेलेली मराठी नियतकालिकेहा लेख लिहून सध्याच्या वाचन संस्कृतीचा छोटेखानी आढावाच घेतला आहे असे वाटते.  वाचाल तर वाचाल किंवा पुस्तक हेच मस्तक अशा श्ब्दप्रयोगांनीच आजची वाचन संस्कृती पुढे वाटचाल करील अशी आशा वाटते.
  35. हे विश्व तंत्र-आगमांचेहा लेख सुप्रसिध्द साहित्यिक आणि संशोधक श्री. संजय सोनावणी सरांनी लिहून आपल्या सृजन वाचकांचा तत्र शास्त्र बद्दलचे समज गैरसमज मांडण्याचा अतिशय छान प्रयत्न केला आहे.  तंत्र म्हणजे जादूटोणा, जारण-मारण अशी धारणा केवळ शहरी भागाचा नाही तर ग्रामीण भागात जास्त आहे.  त्यावर प्रकाशझोत टाकून वाचकांच्या मनातल्या बराचशा प्रश्नांना उत्तर देण्याचा अभिनव असा हा लेख आहे.
  36. औरांगाबाद्चे पत्रकार श्री. दत्ता जोशी यांनी भटकंती... पोलादी माणसाच्या शोधासाठीहा लेख लिहून महाराष्ट्रातील उद्यम जगतातील काही प्रतिभावंताची वाचकांना ओळख करून दिली आहे.  त्यांचे सायकल ते कार हा खडतर प्रवास थोडक्यात शब्दांकित करून ह्या उद्योगजगतातील माणसाची यशस्वी धडपड छान शब्दांकित केली आहे.
  37. डॉ. मंगेश कश्यप ह्यांनी मुलखावेगळी आत्मचरित्रहा साहित्य सृष्टीतला एक समृध्द असा ठेवा वाचकांना आपल्या छोटेखानी लेखामधून वेध घेतला आहे.  आत्मचरित्र म्हणजे सादर प्रतिभावंतांच्या अनुभवाची शिदोरीच असते.  त्यामधून बरेच काही शिकण्यासारखे अथवा घेण्यासारखे असते असे मला वाटते.
  38. चपराकच्या उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे ह्यांची भाग्यशाली ही कथा म्हणजे एका दत्तक मुलीच्या संस्कृत आणि भाग्यशाली आयुष्याची कथा आहे.  काही कारणाने मुल दत्तक घेणे त्यात मुलगी दत्तक घेणे म्हणजे अत्यंत भाग्याचे काम आहे असे मलातरी वाटते.  कथेची गुंफण आणि त्यामधील पात्रांची सांगड फारच छान घातली आहे.  त्यामुळे कथा वाचतांना समाजप्रबोधन होऊन पुत्र प्राप्तीपासून वंचित असलेली काही कुटुंबे मुल दत्तक घेण्यास नक्कीच प्रवृत्त होतील अशी आशा आहे.  तसेच दत्तक गेलेले मुलही स्वत:स भाग्यवान समजेल हा संदेश फारच सकारात्मक दृष्टीकोनातून वाचकांपर्यंत पोचवण्यास ही कथा नक्कीच यशस्वी झाली आहे.  बेलसरेताईंचे अभिनंदन.
  39. कविता म्हणजे मानवी संस्कृतीला आलेला सुंदर मोहर आहे. कवितेच्या विचारातूनच संस्कृती फुलात जाते.  कविता ज्ञानाच्या दिशा उजळून टाकते त्यामुळे माणसाला मनाचे सुंदर आकाश कळते.  मानवी जीवनाचं सुंदर आकाश हेच मराठी कवितेचं आकाश आहे.  हे आकाश उंच उंच गेले पाहिजे. हे विचार माझे नाहीत, तर ते पुण्यातले जेष्ठ कवी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री. उद्धव कानडे ह्यांच्या मराठी काव्यातील बदलते प्रवाहह्या लेख मधील आहते.  कानडे सरांनी अगदी संत काव्यापासून ते आजच्या पिढीतील कवींचा आणि काव्यांतील बदलत्या प्रवाहांचा अतिशय संयुक्तिक शब्दामध्ये मागोवा घेतला आहे.  एक कवी म्हणून तर मला हा लेख म्हणजे फार मोठा अभ्यासाचा विषय वाटला आणि नव काव्य निर्मितीची उर्जा मिळाली.
  40. औरंगाबादच्या प्रिया धारूरकर ह्यांचा अंमल आणि आणि हा लेख एक वेगळेच सूत्र सांगणारा आहे.  हे वास्तविक खूप छान असे स्वगत आहे असे मला वाटले.  लेखिकेने खूप वैचारिक धाटणीचा असा हा लेख लिहिला आहे तसेच तो खूपच वाचनीय आहे.
  41. ठाण्याच्या प्रवीण कारखानीस ह्यांनी मलबार हिलवरचे जीना हाऊसह्या लेखाद्वारे जीना हाऊसचा इतिहास आणि तो अखेरच्या घटका मोजत आहे हे निदर्शनास आणून दिले आहे. तसेच सरकारने तेथे मुंबईचे महापौर ह्यांचे निवासस्थान का करू नये !  असा एक सरळ साधा भाबडा प्रश्न त्यांच्या मनात घोळत होता त्याला ह्या लेखाद्वारे वाट मोकळी करून दिली आहे.
  42. सोमनाथवरील हल्ला नेमका का !हा संजय क्षीरसागर, मुंबई ह्यांचा लेख थोडासा इतिहास चाळायला लावतो.  सोमनाथवर अनंत स्वाऱ्या झाल्या त्या हिंदुद्वेषा पोटीच झाल्या आहते हे ह्या लेखावरून स्पष्ट होते.  बाकी कुठल्याही धर्माच्या धर्मस्थळांना इजा पोचवली जात नाही.  जाते ती फक्त आणि फक्त हिंदुधर्म स्थळांनाच आणि ती ही मुस्लिमांकडूनच हे हा लेख सविस्तरपणे मांडतो आहे असे आणि अजून बऱ्याच गोष्टींच्या इतिहासाचा उहापोह हा लेख करून वाचकांच्या ज्ञानात भरच घालतो.
  43. जळगावचे चंद्रकांत चव्हाण ह्यांनी माझ्या मनाहा एक अतिशय वैचारिक लेख लिहून वाचकांना विचार करावयास भाग पडलेले आहे.  प्रगतीच्या वाटेने निघालेल्या माणसांचे मन मोठे झाले आहे, पण मते संकुचित झाली आहते.  वैयक्तिक उंची वाढवण्याच्या नादात सामजिक उंची खुंटली आहे.  ह्यावर मला माझीच एक कविता अतिशय समर्पक आहे असे वाटते..
    अंदाज माणसांचा कधी बांधलाच नाही, माणूसही हा असा कधी कळलाच नाही |
    गेलीत माणसे हरवून कुठे ह्या जगी ही, साधा भोळा असा कोणही राहिलाच नाही |
    ने मला तू दूर कुठे ही रे सागरी ही, माणूस हा असा कधी गवसलाच नाही |
  44. म्हादूही धनराज बेलवाले, बार्शी ह्यांची एक लघुकथा आहे.  गावाकडच्या राहणीमानाचे छान चीत्ररंजन करणारी ही म्हादू नावाच्या अतिशय प्रामाणिक घरगड्याची कथा आहे.  म्हादू कडून गाय चरायला नेतांना खाटीकाने बघितलेले असते.  शेवटी गाय मरते आणि तिला म्हादू पुरून टाकतो व मालकांना कल्पना देतो.  खाटकाच्या ताब्यात देण्याऐवजी तो तिला पुरून टाकून तो तिला श्रद्धांजली वाहतो असे काहीसे आगळे वेगळे भावनिक नाते दाखवण्याचा ही कथा माणसाच्या एका वेगळ्याच भावनेचा कंगोरा उलगडते.
  45. काळ तर मोठा कठीण आला !हा मुंबईचे पत्रकार श्री. विकास पांढरे ह्यांचा लेख महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दुष्काळामुळे होत असलेली दैनावस्था प्रतिध्वनित करतो.  मराठवाड्यातले जिल्हावार आत्महत्येचे आकडे दाखवून त्यांनी डोळ्यात पाणीच आणले आहे.  शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे हे त्यांनी सांगून शेतकऱ्यांच्या समस्येवर उपायही सुचवला आहे.  एकंदरीत बळीराजावरचा काळ खूपच कठीण आला आहे हे मात्र अगदी खरं आहे आणि मला माझी एक कविता समर्पित करावीशी वाटते आणि ह्या बळीराजाची भावना सांगू कधी असे झाले आहे.
    वेदना माझ्या कोणा मी आता सांगू कधी ! फाटक्या आभाळाला ढिगळे लावू कधी ! कान कोणा ऐकण्यास असे मागू कधी !  पडुनी खिंडारे, शकले झाली भावनांची, आस जुळण्याची अशी आता सांधू कधी !
  46. अशी निशा पुन्हा कधी दिसेल का ?” तरुण लेखक मुकुल रणभोर पुणे ह्यांचा हा श्रीवर्धनला दुचाकीवरून भर रात्री पुण्यातून निघून फक्त समुद्र दर्शन घेण्यासाठी जाणे व सकाळी परत येणे म्हणजे एक थरारक प्रवासाचा अनुभव आहे.  तरुणाईत आपण काय काय दिव्य करू शकतो ह्याची अनुभूती मुकुलच्या ह्या लेखामुळे आली आणि माझ्या तरुणपणी केलेली महाबळेश्वरच्या सहलीची आठवण आली.  काही काही क्षण हे आठवले तरी त्यावेळेस आपण असे कसे करू शकलो असे आत्ता वाटणे अतिशय स्वाभाविकच आहे.
  47. हृषीकेश देशमुख मु पो. शिळवणी, ता. देगलूर, जि. नांदेड ह्यांचा चला मानवतेची लढाई लढू या !हा लेख आपल्या संत परंपरेतून आपल्याला मिळालेली मानवतेची शिकवण आणि माणूस हाच एक धर्म आहे व मानवता हीच एक जात ह्या विश्वात आहे असे अतिशय आशावादी चित्र निर्माण करणारा खूप प्रगल्भ विचारधारेचे लेख आहे.  लेखकाचे ह्या सकारात्मक विचारांसाठी अभिनंदन करावेसे वाटते.
  48. श्री. लक्ष्मण वाळुंज, राजगुरुनगर ह्यांनी नागपंचमी ह्या आपल्या मराठमोळ्या सणाचे आणि श्रावणातल्या एकंदरीत सर्वच सणांचे महत्व त्यांचे वैशिष्ट्य व आपल्या सामजिक संस्कृतीवरील ह्या सणांचा असलेला प्रभाव अतिशय योग्य पद्धतीने शब्दांकित करून एका रीतीने दुर्मिळ होत चाललेल्या आपल्या परंपरांचा खूप चांगला आढावा घेऊन एक प्रकारची समाज जागृतीच केली आहे असे म्हणावयास हरकत नाही व त्याचे श्रेय वाळुंज ह्यांना नक्कीच द्यायला हवे.
  49. युवक प्रतिभावंतहा तरुण लेखक कवी प्रवीण काळे ह्याचा लेख आजच्या तरुणाईचा साहित्य प्रवासाची दिशा दर्शवणारा आहे.  आजची पिढी त्यांना लाभलेल्या साधन सुविधांचा योग्य प्रमाणात वापर करून साहित्य सेवा करताहेत हे नुसतेच वाचून नाही तर प्रत्यक्ष अनुभवूनही खूप उत्स्चाहित व्हायला होते आहे.  तरुण पिढी जबाबदार आहे आणि मातृभाषेची त्यांना जाण आहे हेच हा लेख वाचकांच्या निदर्शनास आणतो.  खूप छान लेख प्रवीण.  असेच लिहित रहा आणि साहित्याची सेवा करीत रहा.  तुझे भवितव्य नक्कीच उज्वल आहे.
  50. क्षणाचा आनंद की जीवाचा खेळहा ऋतुजा कुलकर्णी हिचा स्वानुभवातून आलेला उपदेशात्मक लेख आहे.  आई वडलांचे ऐकावे.  ते नेहमी आपल्या भल्याचेच असते हे मात्र नक्की आहे.  असे अनुभव लिहून जर आपण दुसऱ्यास वाटले तर त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. त्यामुळे बाकीचेही काही शिकतील अशी आशा वाटते.  पुढच्यास ठेच मागचा शहाणाअशी एक म्हण आहे तिचा तुझ्या लेखामुळे बोध होईल असे मला तरी वाटते आहे.  तू हा लेख लिहिलास आणि चपराकने तो प्रसिद्ध केला ह्याबद्दल दोघांचेही अभिनंदन.
  51. पंढरपुरच्या स्वप्नील कुलकर्णी ह्यांनी ग्लोबल वार्मिंग, एक समस्याहा जागतिक पातळीवर चर्चिला जाणाऱ्या विषयावर आपले मत अतिशय परखडपणे प्रदर्शित करून आपली पर्यावरणाप्रतीची कृतज्ञता व्यक्त केली आहे.  अशाच समाज प्रबोधन कार्यामधून समाज आज नाही तर उद्या जागरूक होण्यास नक्कीच मदत होतील अशी मला तरी आशा वाटते आहे.  आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत असे तुझ्या ह्या लेखामुळे मला वाटले हे मात्र मी अगदी प्रामाणिकपणे नमूद करून तुझे खूप खूप अभिनंदन हा विषय मांडल्याबद्दल करतो.
  52. आदी मंगल..मध्य मंगलही रमेश वाकनीस ह्यांची भगवान गौतम बुद्धांच शांतीच, अहिंसेच तत्वज्ञान सांगणारी तसेच गौतम बुद्धांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुसूत्र पद्धतीने व अलंकारीकातेने भाष्य करणारी कादंबरीच चपराकने ह्या दिवाळी अंकात समविष्ट करून वाचकांना खूपच मौलिक असा वैचारिक फराळच दिला आहे असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.
  53. जीन्स आणि टौपही सौ. सरिता कमळापुरकर ह्यांची छोटीशी कथा मनाला चटका लवून जाते.  खूप छान शब्दांकन असलेली आणि तितकीच भावनाप्रधान कथा तिच्या रचनात्मक बांधणीमुळे वाचतांना अगदी आपलीच कथा असल्यासारखी वाटते.  ह्याचे श्रेय नक्कीच लेखिकेला द्यायला हवे.  मुळातच उत्तम कवयत्री असलेल्या आणि गोड गळा असलेल्या ह्या प्रतिभावंत लेखिकेचे कौतुक.
  54. थांबला तो संपलाहा जेष्ठ लेखक श्री. विनोद पंचभाई ह्यांचा त्यांच्या पोलीस वायरलेस विभागातील गोंदिया जिल्ह्यातल्या कामाच्या अनुभवाचा वृतांत वाचून आणि त्यांच्या कामाचे स्वरूप पाहून माझी तर अक्षरश: पाचावर धारणच बसली होती हो.  किती खडतर आयुष्य काढत आहेत ही माणसे आणि पंचभाईंना तर सलामच करावसा वाटला.  त्यांचे हे अनुभव त्यांनी शब्दांकित करून समाजावर फार मोठे संस्कार केले आहेत असे वाटते.  आपल्या समाजामध्ये अशी माणसे आहेत आणि ती आपले कर्तव्य न घाबरता आणि डळमळता बजावत आहेत म्हणून आपण आज सुखी समाधानी जीवन जगतो आहोत ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली.  फारच वाचनीय आणि बोध घेण्यासारखा लेख आहे ह्यात तर काही वादच नाही.
  55. अभिशापही अमर कुसाळकरांची, मनाचा वेध घेणारी ही दीर्घ कथा वाचून वडार समाजाची गेली कित्येक दशके जगण्यासाठीची चाललेली धडपड मला तरी अस्वस्थ करून गेली.  कुसाळकरांनी ह्या कथेमध्ये अतिशय जाणीवपूर्वक व जबाबदारीने वडार समजाच्या समस्यांचे तसेच त्यांचे आपल्या समाजामध्ये असणारे निष्कृष्ट पण गरजेचे स्थानही स्पष्ट करण्याचा खूप निकराने प्रयत्न केलेला आहे.  कथेचा शेवट जरी मनाला विषण्ण करणारा असला तरी वाचकाच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण करून प्रत्येक व्यक्तीला आदराने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, भले तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो, त्यावर विचार करायला नक्कीच लावतो.  खूपच छान मांडणी आणि तेवढीच प्रगल्भ विचारसारणी लेखकाने मांडून एक प्रकारे समाज जागुर्तीचे कार्यच केले आहे असे मला तरी वाटते आणि हेच ह्या कथेचे वैशिष्ट्य आहे.
  56. रिंगण निर्मितीची पटकथा..वर्तुळ मोडणारे रिंगणहा आकाश मनोहर फुके ह्यांचा चित्रपट निर्मितीचा खडतर आणि कष्टदायक प्रवासच दर्शवतो.  अतिशय सुबक पद्धतीने हा लेख लिहिला आहे.  सीन नं. आणि कट टूसारखे, तसेच कॅमेरा ओंन, रोल, अक्शन, कट इत्यादी सर्व सामान्य माणसाला फक्त जुजबी माहिती असलेल्या शब्दांचा अतिशय समर्पक वापर केला आहे. तसेच चित्रपटामधील कलाकारांची त्यांच्या कष्टाची तसेच चित्रपट निमितीमधील इतर विभागांची भूमिकाही कशी आणि किती महत्वाची असते ते ह्या लेखात उत्कृष्टपणे मांडले आहे.  चित्रपट निर्मिती हे एक संघटीत कार्य आहे.  कोणा एकाचे ते काम नाही, परंतु दिग्दर्शक आणि निर्माता ह्या चित्रपटाच्या यशासाठी कसे अहोरात्र धडपडत असतात ह्याचे योग्य शब्दांकन करून हा लेख ह्या क्षेत्राकडे आकर्षित होणाऱ्या प्रत्येकाला अभ्यासात्मक दुर्ष्टीने वाचावासा वाटेल हेच ह्या खाचे यश आहे.
  57. नांदेडच्या राधिका मोहरील यांचा पितृछायाहा लेख म्हणजे एक नयनरम्य आणि माणुसकीने अतोप्रोत भरलेल्या बंगल्याचे मनोगत लेखिकेने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे असे म्हणावे लागेल.
  58. नाशिकचे जेष्ठ पत्रकार श्री. संजय वाघ ह्यांचा गाव गावात राह्यलं नाही...हा सध्याच्या खेड्यापाड्यातल्या ओसाड रानांच्या मनातली खदखद भडभडा ओकतांना दिसतो आहे. वाघसरांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत अतिशय परखड शब्दांमध्ये, आधुनिकतेच्या नावावर चाललेला सगळा आतबट्ट्याचा व्यवहार व्यक्त करून, चला खेड्याकडे ही गांधीजींच्या हाकेची परद एकदा आठवण करून तिचे महत्व पटवून दिले आहे.  दिवसेंदिवस खेडीपाडी ओस पडत चाललीत आणि शहरे माणसांनी ओसंडून वाहत आहेत.  अती नागरिकीकरणाने प्रशासकीय यंत्रणेवरही भार पडत चालला आहे आणि शहरे समस्यांची आगार होत चालली आहेत.  हे वास्तवादी चित्र वाघ सरांनी लेखातून चितारून आपले डोळेच उघडले आहेत असे मला वाटते.  खूप खूप छान सर.  धन्यवाद आणि तुमचे व चपराकचे अभिनंदन.
  59. स्त्री शक्तीचे महाभारत तनिष्का व्यासपीठ हा संगमनेरचे पत्रकार श्री. नंदकुमार सुर्वे ह्यांचा, सकाळ समुहाचे श्री. अभिजित पवार ह्यांच्या कार्याचा अतिशय संयुक्तिक असा मागोवा घेणारा हा लेख आहे.  अशा लेखांमुळे आज आपल्या आसपास काय चालले आहे ते समजते तसेच आपल्याही जर का अशा गोष्टीमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर एक प्रकारे प्रेरणाच मिळते.  खूपच छान आणि अभिनव कल्पना सुर्वे सर. धन्यवाद आणि अभिनंदन.
  60. गरज वैचारिक सहिष्णुतेचीहा तरुण तडफदार लेखक अक्षय बिक्कडचा लेख म्हणजे आजच्या तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठीचे चपराकने दिलेले व्यासपीठच आहे.  तरुणाई वाचते आहे.  अभ्यासू आहे आणि वैचरिकही आहे हे ह्या लेखावरून स्पष्ट जाणवते.  त्यात चपराकचे संस्थापक संपादक हे स्वत: अशा तरुणांच्या खंबीरपणे मागे उभे राहून त्यांना लिहिण्यास कायमच प्रोत्चाहित करत असतात हे कौतुकास्पद आहे हे नक्की.  बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलेअसे मी घनश्याम पाटील सरांबद्दल बोललो तर अतिशयोक्ती होणार नाही.
  61. जिंदादिल व्यक्तिमत्व महेंद्र यादव हा गौतम कोतवाल ह्यांचा लेख म्हणजे एका कर्तुत्ववान माणसाच्या आयुष्यातील खडतर प्रवासाचा आलेखच आहे, जो की आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श म्हणून ठेवल्यास ह्या तरुणाईला त्याचा नक्कीच फायदा होईल ह्यात अजिबात शंकाच नाही.  साहित्याची खरी गरज म्हणजे समाजातल्या प्रत्यके घटका बरोबर संवाद साधणे हे होय आणि नेमके तेच असे लेख व चपराक प्रकाशन करत आहेत ह्याचेच मला जास्त अप्रूप आहे.
  62. श्री. संकेत देशपांडे पुणे ह्यांचा शेतकरी आंदोलनाने काय साधले ?”  हा लेख वाचला आणि मला गेले तीन वर्षांपासून मी सहभागी होत असलेल्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचीआठवण झाली. शेतकरी संघटनेचे आद्य प्रवर्तक कै. श्री. शरद जोशींपासून ते आज पर्यंतच्या शेतकरी संघटनेच्या श्री. गंगाधर मुटे सरांसारख्या आघाडीच्या कार्यकर्त्याच्या पुढे हाच प्रश्न पडला आहे की बळीराजाचे काय होणार? संकेत देशपांडे ह्यांनी ह्या विषयावर दिवाळी अंकात लेख लिहून सर्वसामन्य माणसाला शेतकऱ्यांच्या व्यथेची जाणीव करून दिली त्यासाठी तुमचे आभार.  ह्या विषयावर मी २०१६ ला नागपूरच्या शेतकरी साहित्य संमेलनात सादर केलेली एक कविता मला अगदी समर्पक वाटली व तेच ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हे मी ह्या निमित्ताने सर्व वाचकांच्या निदर्शनास आणून देण्याची मी ही एक सुवर्ण संधी घेतो आहे असे म्हणा हवे तर !
    प्रश्न खूप पडले होते, उत्तर त्याचे एकच होते |
    प्रश्नातच आमुच्या उत्तर हे दडलेले होते ||
    भंगलेल्या स्वप्नांना, द्वार आसवांचे खुले होते |
    आमिष गुलाबाचे हुंगतांना, काटे बोटांस बोचत होते ||
    कोपलेल्या निसर्गावर, मात करण्याचे धाडस होते |
    मातलेल्या सरकारचे, डोके ठिकाणावर कुठे होते ||
    जळलेल्या शिवारात, जगणे कस्पटासमान होते |
    पेरलेल्या जमिनीत, बियाणे कसे मुर्दाड होते ||
    मदतीच्या घोषणांचे, पिक यंदा मायंदाळ होते |
    घेणारे ते हात, मात्र दोरास लटकत होते ||
    कुठवर सहावे बळीराजाने, दु:ख त्याचे नागडे होते |
    कधी अवर्षणाने, कधी अवकाळीने, हक्क जगण्याचे वंचित होते ||
    नको भिक सबसिडी वा कर्जमाफीची, मागणे बळीराजाचे एकच होते |
    शेत मालास रास्त भाव हवा, शरद जोशींचे सांगणे होते ||   
  63. केल्याने होत आहे रेहा उद्योजक अनिल नाईक ह्यांची यशोगाथा व त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख फारच वाचनीय आहे.  अशा थोरामोठ्यांच्या अनुभवातूनच खूप काही घेण्यासारखे असते.  त्यातूनच नवीन पिढी घडण्यास मदत होते हे सिद्ध झालेले आहे.
  64. चपराकच्या कार्यकारी संपादिका सौ. शुभांगी गिरमे ह्यांचा एक अनवट वाटह्या शिर्षकाखाली तरुण पिढीची प्रगल्भ गायिका राधा मंगेशकर यांची विशेष मुलाखत खूपच आवडली.  रसिकांच्या मनातल्या तसेच माझ्याही मनातल्या काही कारण नसतांना राधा मंगेशकर बद्दलच्या गैरसमजांना मूठमाती देता आली.  खरतर मोठ्या वृक्षाखाली लहान रोपे, झाडे वाढतच नाहीत, हा आपला गैरसमज आहे आणि ह्या अशा रोपट्यांची ही स्वत:ची अशी वेगळी प्रतिभा असते हे ह्या मुलाखतीमुळे समोर आले.  शुभांगी गिरमेंनी त्यांच्या खुमासदार शैलीतून ही मुलाखत नसून राधा मंगेशकर बरोबर सर्व सृजन वाचकांच्या वतीने साधलेला एक प्रांजळ संवादच वाटला हे ह्या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणावयास हवे.  राधाला तिच्या मीरा-सूर-कबीर आणि रविंद्र संगीत ह्या कार्यक्रमांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या खूप खूप शुभेछ्या.
  65. डॉ. सरिता जोगळेकर ह्यांचा शिक्षण का शिक्षा ?” हा लेख म्हणजे आपल्या डोळ्यावरची शिक्षणाबद्दलची झापडच उडविणारा आहे.  काही कारण नसतांना आपण शिक्षणाचा जो काही बाऊ केलाय ते समजलं.  शिक्षणाचा असाही आपण खेळखंडोबाच केलायं.  त्या ऐवजी मुलांना खेळांचे आणि त्या संदर्भातील गोष्टींचे शिक्षण अथवा मार्गदर्शन दिले तर एक सदृढ अशी नवीन पिढी देशाला मिळेल, असे उद्दात्त विचार ह्या लेखातून सरिता जोगळेकर ह्यांनी व्यक्त केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सध्याच्या पिढीच्या पालकांना विचार करायला लावून आपल्या पाल्याचे भविष्य घडविण्यास मदत करणारा असा हा लेख आहे.  जो वाचकांनी जरूर वाचावा आणि योग्य वाटल्यास डॉ. सरिता जोगळेकरांचे मार्गदर्शन घ्यावे ही अपेक्षा.
  66. राजकुंवर बेलसरे ह्या तरुणीचा दि ओर्गानिक कुक हाऊस ह्या नवीन संकल्पनेवर आधारित लेख अप्रतिमच आहे. तिच्या उमेदीस आणि आरोग्याबाद्द्लच्या आधुनिक परंतु अतिशय गरजू अशा विचारांशी माझेही मत जुळून गेले.  तुमचेही जुळेल ह्यात मला शंका नाही.  तिच्या ह्या अभिनव प्रयोगास उत्तरोतर नक्कीच यश मिळेल ह्याची मला खात्री आहे. चपराकने असा लेख प्रकाशित करून ह्या तरुण तडफदार व्यक्तिमत्वास फारच मोलाची साथ दिली आहे त्यासाठी त्यांचे आभार.  वाचकांना तर ही आधुनिक खाद्य संस्कृती नक्कीच आवडेल ह्याची मला खात्री आहे.
  67. युवा लेखक आणि कादंबरीकार सागर कळसाईत ह्याचा पहिलं पाऊल महत्वाचं ! हा लेख म्हणजे तरुणाईस साहित्य क्षेत्राकडे येण्यास उद्युक्त करणाराच आहे.  सागरच्या कॉलेज गेट आणि लायब्ररी फ्रेंड ह्या दोन्ही कादंबऱ्या मी वाचल्या आहेत आणि तो म्हणतो तसेच पहिल्यांदा सुरवात करून आपल्या लिखाणात जर सातत्य ठेवले तर यश नक्कीच आहे.  हे त्याने सिद्ध केले आहे.  तुम्हीही प्रयत्न करून पाहू शकता हाच ह्या लेखाचा उद्देश असावा असे वाटले.  खूपच छान सागर.  मी तुझ्या ह्या मताशी नक्कीच सहमत आहे आणि सुजन वाचकही होतील ह्यात मला तिळमात्र शंका नाही.
  68. दत्तात्रय वायचळ ह्यांची मुक्ताही कथा आपल्या संवेदनशील मनाला गरिबीचा विचार करायला लावते. गरिबी म्हणजे समस्यांचे उगमस्थानच असावे असे वाटते.  लेखकाने ह्या छोट्याश्या कथेतून खूप मोठा आशय वाचकांच्या समोर ठेवला आहे. ही आपल्या भारतीय संस्कृतीला पूरक अशीच एका स्त्रीच्या खडतर आयुष्याची कहाणी आहे.
  69. लव्ह स्टोरी २०९० ही निखिल भोसेकर ह्या तरुण लेखकाने फारच आगळी वेगळी २०९० साली येऊ घातलेल्या प्रेमाची कल्पना मांडून विचार चक्राला चलनाच दिली आहे.  कल्पनाशक्तीचा किती विलास आपल्या लेखनातून येऊ शकतो त्याची ही छोटीशी झलक आपल्याला ह्या लेखकाने दाखवली आहे.  त्यासाठी त्याचे अभिनंदन.
  70. मोल ह्या लेखात प्रल्हाद दुधाळ ह्यांनी आयुष्याचे मोल अतिशय संक्षिप्त रुपात आपल्या ह्या लेखात मांडले आहे.  बोथट झालेल्या आपल्या संवेदना ह्या लेखामुळे नक्कीच जागृत होतील.  आपल्या आयुष्यातील नात्यांचे मोल ज्यांना समजेल त्यांना आयुष्याचे मोल समजलेअसा बोध मी तरी ह्या लेखातून घेतला आहे.
  71. जामनगरच्या लेखिका आसावरी इंगळे ह्यांनी आभासी जग अन नात्यांचा गुंता हा सध्याच्या समाजाला सतावत असलेल्या ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकून ह्या आभासी जगाचे आपल्या नातेसंबंधावरील दुष्परिणाम मांडण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे.  कदाचित ह्यामुळे  सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल असे वाटते.  अर्थात सामाजिक विषयांवर विविध प्रकारचे लेखन होतच असते.  प्रत्येकजण आपल्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यानुसार आपले मत व्यक्त करू शकतो आणि समाज सुधारणेस आपापल्यापरीने हातभार लावू शकतो हे निश्चित आहे.  तोच उद्देश ह्या लेखाचा असावा आणि त्यास हातभार लावण्याचा प्रकाशकांचा असावा असे मला वाटते.
  72. तरुणाईला साद दुर्गसंवर्धनाचीहा रविंद्र कामठे ह्यांचा लेख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गसंपदेचा तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणाकरिता लेखणीतून सर्वसामान्यांना केलेली एक कळकळीची विनंतीच आहे.
दुर्ग हेच सार राज्याचे, शिवरायांस ते उमजले,
रक्त इथे स्वराज्यासाठी, होते कितीक हो सांडले ||
एकच राजा होऊनी गेला, शिवबाचा छत्रपती हो जाहला,
इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला, शिल्पकार हा महाराष्ट्रास लाभला ||
जय शिवाजी | जय भवानी |
शिवरायांचा हा अभूतपूर्व इतिहास आपल्याला कायमच प्रेरणा देत आला आहे आणि पिढ्यानपिढ्या देत राहील ह्यात शंका नाही.  म्हणूनच राजांचा हा इतिहास जपण्यासाठी रविंद्र कामठे चपराक दिवाळी अंकाच्या माध्यमातून तरुणाईला दुर्ग संवर्धनाची साद घालत आहेत.  तिला आपापल्यापरीने जरूर साथ दया.
  1. पाय पाहिजे जमिनवरहि अहिराणी भाषेतील कथा धरणगाव, जळगावातील प्रा. बी. एन. चौधरी ह्यांनी अतिशय समर्थपणे मांडून रसिक वाचकांना ह्या अनोख्या प्रादेशिक भाषेची ओळख करून दिली आहे.  चपराकने ही कथा प्रकाशित करून त्यांचा साहित्य विश्वामधील सर्वसमावेशक कार्याचा सिद्धांत सृजन वाचकांसमोर ठेवून एक नवीन पायंडा पडला आहे.  त्यासाठी चपराकचे अभिनंदन आणि चौधरी सरांचेही खूप खूप अभिनंदन. ही कथा वाचतांना आपण त्या प्रदेशातच फेर फटका मारतोय आणि ह्या कथेमधील पात्रांशी संवाद साधतो आहे असेच वाटत होते आणि त्याचे श्रेय सर्वस्वी चौधरी सरांच्या लेखणीस द्यायला हवे. भाषेचा गोडवा पूर्ण दिवाळीत माझ्या जिभेवर रेंगाळत होता हे मात्र नक्की.
 
चपराकच्या दिवाळी महाविषेशांकामधील सर्व लेख, कथा, तसेच कविता अतिशय वाचनीय तर आहेतच परंतु वेगवेगळ्या विषयांना हात घालून त्यांनी सृजन वाचकांना दिवाळीत खूप चविष्ट असा साहित्यिक फराळ देवून उपकृत केले आहे.
 
ह्या अंकात साधारण शंभरहून अधिक कविता आहेत. त्यांची निवड करतांना किती कष्ट झाले असतील ह्याची कल्पना ह्या कविता वाचतांना येते.  सर्वच कविता खूपच वाचनीय आहते. सगळ्याच कवी/कवयत्रींची नावे येथे देणे शक्य होणार नाही.  तरी त्यांनी राग मानू नये.  त्यातल्या मला आवडलेल्या व आवर्जून उल्लेख कराव्याशा वाटलेल्या कविता म्हणजे; माधव गिर सरांची – “बाबा तुमच्या काळजाचं”, रवि वसंत सोनार ह्यांची – “मराठीचे गुणगानआणि दत्तू ठोकळे ह्यांची – “कविता येते कशी, जरा कळाया पाहिजे
 
एकंदरीत चपराकचा हा दिवाळी महाविषेशांक वाचण्याचा माझा अनुभव फारच अफलातून होता.  ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रकृती अस्वाथ्यामुळे मला जबरदस्तीची विश्रांती घ्यावी लागली आणि नेमका त्याच काळात मला माझ्या विश्रांतीत आणि मनावर आलेला ताण, दडपण कमी करण्यास ह्या अंकाने खूप मोलाची साथ दिली आहे हे मात्र अगदी नि:संकोचपणे मला सांगावेसे वाटते.
 
पुन्हा एकदा चपराक समूहाचे, ह्या अंकामधील सर्व साहित्यिक मित्र मंडळींचे अभिनंदन करतो आणि शुभेछ्या देतो.
 
धन्यवाद,
 
रविंद्र कामठे
२२ नोव्हेंबर २०१७
**माझा हा अभिप्राय म्हणजे माझे वैयक्तिक मत आहे. माझी कोणाचीही भावना दुखविण्याचा हेतू नाही ह्याची कृपया सर्वांनी दखल घ्यावी ही विनंती.