Friday 31 March 2017

उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव


एक प्रवास वर्णन....नागपूर जवळील उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव....
पुणे स्थित Insearch Outdoors आयोजित (८-१३ जून २०१६) ह्या वन्यजीव अभयारण्य सफारीला जायचा योग आला आणि धन्य झालो.  माझ्या आयुष्यातील हा एक फारच आगळा वेगळा अनुभव म्हणावा लागेल.  सर्वप्रथम ह्या सगळ्याचे श्रेय मी Insearch Outdoors संघाला देईन.  अप्रतिम व्यवस्थापन, जबरदस्त नियोजन, उत्कृष्ट संघटन,  वक्तशीरपणा,  तसेच व्यावसाईक परंतु एकसंध कौटुंबिक जिव्हाळा असलेला तरुणाईचा हा संघ मला तर खूपच भावला. खास करून हे श्रेय शौरी सुलाखे आणि मयुरेश कुळकर्णी ह्यांना जाते.  वय वर्ष ८ ते ८४ सगळे मिळून २३ जणांचे बांधलेले कडबोळे तर वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल.  ह्या पोरांना असलेली जैवविविधतेची, प्राण्यांची, निसर्गाची आणि भौगोलिक माहिती तर तोंडांत बोटेच घालावयाला लावते.  ही नुसती एक जंगल सफारी नसून आपल्या तुटपुंज्या ज्ञानात भरच टाकणारी एक कार्यशाळाच होती. माझ्या साठी तर हा आयुष्यातील वयाच्या ५३व्या वर्षी आलेला एक सुखद असा धक्काच होता. मी तर मंत्रमुग्धच झालो होतो. 
तसेच उमरेड येथील श्री. निशांत बरडे ह्यांच्या श्री साई शीतल विश्राम  मध्ये केलेली निवास व जेवणाची व्यवस्था तर अगदी घरच्या सारखी होती.  त्यांचे काळजी घेणारे कुटुंबीय तर कौतुकास पात्र आहेत.  त्यांनी केलेला आमचा पाहुणचार (व्यावसाईक असूनही) अगदी घरच्या सारखा होता हे फारच विशेष आहे.  असो.. वरील प्रस्तावनेनंतर मूळ मुद्द्या कडे येतो.
मी आणि आमचे कुटुंब २०११ साली आयुष्यातील पहिल्या वहिल्या, केनिया येथील मसाई मारा ह्या जंगलातील सफारीला गेलो होतो,  त्यानंतर वाटले की भारतातील जंगलामध्ये ही मजा येणारच नाही.  परंतु माझा हा एक भ्रमच होता असे मला उमरेडला जाऊन आल्यानंतर वाटते.  सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर अशा सहलीला जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आणि तो ही इतका अविस्मरणीय आहे की मी तर आता ठरवलेच आहे की सहलीला अथवा सफारीला जायचे असेल तर Insearch Outdoors बरोबरच जायचे.
गरीब रथ ह्या रेल्वेने ८ जूनला संध्याकाळी पुण्यातून प्रवास सुरु झाला.  सगळ्यांशी ओळखी होत होत सर्व सामान लावून मस्त पैकी गप्पा मारत मारत घरून नेलेल्या जेवणाचा आनंद घेत ९ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरला कधी पोचलो हेच कळले नाही.  तेथून नाष्टा करून उमरेडच्या प्रवासाला बसने सुरवात केली. वातानुकुलीत रेल्वेतून वातानुकुलीत बस मध्ये बसलो.  येथपर्यंत ठीक होते.  जेंव्हा उमरेडला उतरलो तेंव्हा एकदम नागपूरच्या वातावरणाची झलक मिळाली आणि साधारण विदर्भी उन्हाच्या तडक्याचा अंदाज आला. पोहचल्यावर काही वेळात जेवण करून लगेचच पहिल्या सफारीला जंगलामध्ये निघालो.  चार जिप्सी मध्ये आम्ही २३ जण विभागलो गेलो (एका जिप्सी मध्ये सहा) आणि जी काही धमाल आली ती तर सांगणेच कठीण आहे.  आहो वाघ राहिला लांबच, वरून सूर्यदेव तळपत होते आणि आम्ही उघड्या जिप्सी मध्ये जीव मुठीत घेऊन बसलो होतो. साथारण निवासस्थान ते जंगल हा १५ किलोमीटरचा प्रवास दुपारच्या २.३० च्या नागपूरच्या तळपत्या उन्हात तो ही उघड्या जिप्सी मध्ये म्हणजे आमची फाटलीच होती असे म्हणायला हरकत नाही.  पण जेंव्हा कऱ्हान्डला जंगलाच्या दरवाज्याशी पोचलो तेंव्हा एक वेगळीच उर्जा शरीरात निर्माण झाली.  तेथील एकंदरीत वातावरण व जवळ जवळ अजून २५ जिप्सी पाहून तर हुरुपच आला आम्हांला. चला आता वाघ बघायचे आहेत असे म्हणून सोबत आणलेल्या थंड पाण्याच्या अर्धी बाटली संपवली व कानाला पंचा बांधून तयार होऊन बसलो.  ३.३०ला जंगलाचा दरवाजा उघडला आणि एक एक करून सर्व २५ जिप्सी आत जायला निघाल्या.  पण आपल्याला संयम असतो का.. तर नाही.  १५ २० मिनिटे झाली जिप्सीत बसून पण एकही वाघ दिसला नाही.  झाले आमची म्हणजे माझी कटकट सुरु झाली.  बायको, मुलगी,  मुलीच्या सासू बाई तर माझ्या मुक्ताफलांमुळे वैतागून गेले होते.  मी मला माझ्या जावयाने व मुलीने (रेल्वेच्या प्रवासात) भेट म्हणून दिलेला फोटो काढण्याचे यंत्र (कॅमेरा) सरसावून बसलो होतो पण वाघ काही दिसत नव्हता.  इतर प्राणी, चितळ, नीलगाय,  माकडे,  सरडे, खूप सारे पक्षी,  गवे,  घोरपड दिसत होते पण वाघोबा गायब होते.  थोडासा वैतागलोच होतो.. ते बघा ते बघा असे सगळेजण एकमेकांना सांगत होते.  मी म्हणालो पक्षी का प्राणी हे जरा मला समजून सांगा,  म्हणजे मला फोटो काढण्यासाठी तसे तयार राहायला.  आमचा गाईड जिप्सीतून वाघाला शोधत होता.  आता इकडे गेला असेल,  त्या पाणवठ्यावर असेल,  येईलच लवकरच पाण्यावर वगैरे वगैरे.. पण वाघोबा काही दर्शन द्यायला तयार नव्हते.  आम्ही साधारण ४०-५० किलोमीटर जंगल पालथे घातले पण पालथ्या घड्यावर पाणीच पडले.  हा दिवस आमचा नव्हताच.  संध्याकाळी ७ वाजता परत जंगलाच्या मुख्य दाराशी आमची जिप्सी अयशस्वी होऊन आली.  सगळे एकमेकांना विचारायला लागले.. सगळ्याचा वाघाने पोपट केलेला होता हे समजल्यावर मी जरा शांत झालो.  परत निवासस्थानी उघड्या जिप्सीतून आलो व वऱ्हाडी जेवणावर ताव मारून झोपायच्या तयारीला लागलो.  तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने येऊन सांगितले की उद्या पहाटे ३.०० ला सगळ्यांनी तयार राहायचे आहे.  आपली उद्याची पहिली सफारी पहाटे ४ वाजता आहे.  झाले.  माझे तर अवसानच गळाले होते.  पण मानसिक तयारी करून झोपायचा प्रयत्न केला व १२.०० वाजता झोपलो.
दुसऱ्यादिवशी पहाटे आमची फौज पहाटे ३.३० ला पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने उघड्या जीप्शीतून मार्गस्थ झाली.  पहाटेचा गार वारा त्यात उघडी जिप्सी.  साला मना मध्ये एक विचार आला की हा वाघ ही मंडळी इकडे निवासस्थानीच का आणत नाहीत उगाच एवढ्या पहाटे उठून त्याला कशाला बघायला जायचे.. बायकोला म्हणालो अग तुझ्यासाठी सुद्धा मी एवढा फिरलो नाही किंव्हा तुझीसुद्धा एवढी प्रतीक्षा केली नाही मी कधी.  हा वाघ कोण लागून गेला. असे काहीतरी मुक्त संवाद चालू होते माझे.. अर्थात जीप्सितच.. तेवढ्यात मयुरेशची जिप्सी आम्हांला दिसली आणि त्याने सांगितले की त्यांना वाघ दिसला.. नुसता दिसला नाही तर जवळ जवळ ४५ मिनिटे तो त्यांच्या जिप्सीच्या पुढे चालत होता.. त्याने रस्त्यात शू केली, शी पण केली,  झाडावर ओरखडे मारले, स्वतःच्या धुंधीत हा जंगलाचा राजा चालत होता.  आमच्या चार जिप्सी पैकी दोन जिप्सींना हा सगळा सोहळा चित्रित करण्याची संधी मिळाली व त्यांचा आनंद गगनात मावेना असा होता. चला आमच्या पैकी निम्म्या लोकांना वाघाने दर्शन दिले ह्या विचाराने आम्ही आमच्या जिप्सीवाल्याला गाडी दामटायला सांगितले व एक झलक तरी मिळते आहे हे पाहायला वळलो.  पण त्याने आमचा परत एकदा पोपट केला होता. पण आम्ही थोडे खुश थोडे नाराज असे परतीच्या प्रवासाला लागलो.  वर लिहिल्या प्रमाणे ८ वाजता निवासस्थानी परत आलो थोडेसे आवरून जेवणा साठी तयार झालो व तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने दुपारच्या सफारीसाठी ३.०० वाजता निघायचे आहे अशी वर्दी दिली.  सगळे पट पट जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी जावून विसावलो.
दुपारी परत तोच उघड्या जिप्सीतून रणरणत्या उन्हात प्रवास.. एक वेगळाच आनंद आणि आता तरी वाघ दर्शन देणार ह्या आशेने तयार होऊन निघालो. ह्या सफारीलाही आपला पोपट होऊ नये अशी आशा करत जंगलाच्या वाटा तुडवीत आमची जिप्सी धुराळा उडवीत वाघाला शोधात फिरत होती.  ३.३० ते ६.१५ वाजेपर्यंत साधी झलकही दाखवली नाही पठ्ठ्याने.  अगदी दिग्मुड होऊन परत निघालो.  काही जिप्सी दुसऱ्या दिशेला शोधात होत्या तर काही अजून इकडे तिकडे आशेवर फिरत होत्या.  जंगलाच्या नियमानुसार फक्त शेवटची १५ मिनिटेच राहिली होती आणि तेवढ्यात आमच्या पुढील ५०० मीटर लांब असलेल्या जिप्सीला एका ओढ्यात झोपलेली एक वाघीण दिसली आणि आमच्या जिप्सी वाल्याने लगेच गाडी दामटून त्या ओढ्याशी नेली व आम्हांला त्या वाघिणीचे दर्शन घडवले.  एकदाचा जीव भांड्यात पडला.  सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.  जो तो फोटो काढण्यात गुंग होता.  ती वाघीण (चांदी/बरखा) शांतपणे ओढ्यात पहुडली होती आणि तुच्छतेने आमच्या कडे हे कोण वेडे आलेत म्हणून पाहत होती.  (ह्या जंगलात प्रत्यक वाघाला नाव दिले आहे. तेवढ्यात जवळ जवळ १०-१५ जिप्सी तेथे येऊन धडकल्या आणि प्रेतेकाला त्या वाघिणीचे फोटो काढण्याची एक स्पर्धाच मला जगलात अनुभवायला मिळाली.  लोक ओरडत होते, भांडत होते.  सगळे नियम धाब्यावर बसवून जेवढे शक्य होईल तेवढे त्या वाघीणीस त्रास होईल असेच वागत होते. पण करणार काय येथे आलेला प्रत्यके प्रवासी हा फक्त वाघ बघायला आला असल्यामुळे कोणाचेच कोणाशी काहीच चालत नव्हते.  पण एकदाचा एक तरी वाघ दिसला ह्या आनंदात आम्हीं वेळ संपत आली म्हणून मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने वाटचाल करायला सुरवात केली होती.  एकंदरीच मजाच आली होती.  काळवंडलेले सगळे चेहरे वाघ दिसल्यामुळे थोडेसे उजळले होते एवढेच. परत निवासस्थानी ८ वाजता पोचलो.  दमलेले काहीजण जेवण करून झोपायच्या तयारीला लागले होते आणि काहीजणांनी म्हणजे परुष लोकांनी गप्पांची मैफिल रंगवली होती. 
इतक्यात शौरी आणि मयुरेशने सागितले की उद्या पहाटे दोन जिप्सी ३० किलोमीटर लांब असलेल्या गोठणगावं जगलात पहाटे जाणार आहोत व दोन जिप्सी दुपारी जाणार आहते.  जे सकाळी गोठणगावंला जाणार नाहीत ते जवळच एका जंगलात पक्षी दर्शनाला जाणार आहेत. आमचा नंबर पहाटेचा होता त्यामुळे गपचूप गप्पांची मैफिल उरकती घेवून जेवण करून झोपयला गेलो. 
भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून ३.१५ ला ३० किलोमीटर उघड्या जिप्सीतून प्रवास करून आम्ही गोठणगावं जंगलात पोह्चोलो. हा अनुभव गोठवनाराच होता पण जंगल वेगळे असल्यामुळे व येथे वाघ दिसण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आशावादी होतो.  सफारी सुरु झाली.  जंगल खूपच छान होते. गाईड मुलगी होती.  पण वाघ साहेब आजही आमच्यावर नाराज होते.  घूम घूम घुमवले पण साहेबांनी काही आम्हांला दर्शन नाही दिले.  काही लोकांना मिळाले पण साले आमचे नशीबच जरा गांडू होते.  पण एक मात्र चांगले होते की बाकीचे प्राणी मात्र अगदी जवळून पाहता आले.  पक्षी तर फारच छान होते. माकडांनी तर त्यांच्या माकडचेष्टांनी आमची खूपच करमणूक केली होती.  कोणीतरी सांगितले की काल मयुरेशला दिसलेला श्रीनिवास नावाचा वाघ आज ह्या जंगला मध्ये आलेला आहे व त्याने काही जिप्सींना दर्शन दिले आहे तसेच T६ नावाची वाघीण सुध्दा दिसली आहे. आम्हांलाच दिसली नव्हती.  असो.  पण मला एकंदरीत सर्व सफारी मध्ये जी काही मजा आणि अनुभव येत होता तो अफलातून असाच होता.  वाघ दिसणे न दिसणे हे नशिबाचा भाग समजून मी संपूर्ण सफारीचा मनमुराद आनंद लुटत होतो. खरोखर मी ह्या सगळ्या वातावरणात रंगून गेलो होतो आणि माझ्यातील कवीला साद घालत होतो...आणि सुचले की अंदाज वाघांचा कधी बांधलाच नाही... वाघ हा असा मला सहज दिसलाच नाही...वाघासाठी केली वणवण.. त्याने केला आमचा पोपट.
तिकडे आमचा दुसरा समूह सकाळी जाऊन दुसऱ्या जंगलात जाऊन खूप पक्षी पाहून आला होता व एकदम खुश होऊन मस्त पैकी निवासस्थानी आराम करत होता कारण त्यांना दुपारच्या सफारीला जायचे होते. परत एकदा ३० किलोमीटरचा उघड्या जीप्सीतील प्रवास करून दुपारी ११ वाजता पोचलो... नाष्टा केला आणि आडवे झालो. 
तेवढ्यात मयुरेश आला आणि म्हणाला जिप्सीत एक जागा आहे.. कोणाला दुपारच्या सफारीला यायचे आहे का.. झाले...मी लगेच तयार होऊन बसलो.. व निघण्याच्या तयारीला लागलो कारण मला असाही पक्षी बघण्यात फारसा रस नव्हता. 
परत तोच पहाटे सारखा प्रवास दुपारच्या विदर्भातील चांदण्यात, एक वेगळाच अनुभव आणि मनाला उभारी देणारा असा प्रवास का सोडायचा ह्या भावनेने तयार झालो आणि जिप्सीत जावून बसलो.  वाघ दिसो अथवा न दैसो मला त्याच्या काही घेणे देणेच नव्हते.  कारण जगलात तर वाघ आहेच पण असा अनुभव परत घेता येईल का नाही ह्या विचारांनी मला थोडीशी भुरळच घातली होती.  तसा मी वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भांदक येथे २० वर्षांपूर्वी फिरलेलो होतो पण ते कामा निमित्त. दुपारी ३.१५ ला परत मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो, ३.३० ला जंगलात प्रवेश केला.. सचिन नावाच्या गाईडशी गप्पा मारल्या, जो पुण्यात नोकरीला होता.  मला जरा वाघ दिसण्याची अथवा तो नक्कीच दाखवेल अशी वेडी आशा मनात निर्माण झाली.  पण हे समजलेच नाही की हे जंगल आहे आणि येथे राज्य त्या वाघाचे आहे सचिनचे नाही.  तरीही खूप खूप प्रयत्न करूनही ह्या सफारीलाही अगदी ३०-३० मिनिटे एका ठिकाणी थांबून वाट पाहूनही वाघ साहेबांनी दर्शन दिले नाही.  पण माझी काहीच तक्रार नव्हती.  कारण मला दोन तीन प्रवाश्यांनी सागितले होते की ही त्यांची १६वी सफारी आहे पण अजून त्यांना वाघ दिसला नाही.  मी तर खूपच नशीबवान होतो की मला तिसर्याच सफारीला वाघाचे दर्शन झाले होते.  असो.  ह्या वेळेसही खूप सारे प्राणी आम्हांला दिसले जे सुध्दा ह्या जंगलाचा एक भाग आहेत.  पण लोक फक्त आणि फक्त वाघच बघायला येतात आणि स्वत:चा हिरमोड करून घेतात.  उशिरा का होईना मला हे समजले आणि मी संपूर्ण सफारीचा आनंद घेऊ शकलो हे मात्र एकदम खरे आहे.
रात्री परत निघालो आणि पावसाने आम्हांला गाठले.  जिप्सी उघडी असल्यामुळे थोडेशे भिजायला झाले पण तो ही एक मस्त अनुभव मनातील करपलेल्या कातडीला प्रफुल्लीत करून गेला आणि रात्री गप्पांच्या फडात आपसूकच एक उर्जा देऊन गेला. कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी ओळख होऊन गप्पा व प्रत्येकाचे अनुभव ऐकण्यात गुंग होऊन गेलो.  माझ्या काही कहाण्या ऐकवल्या व त्यांच्याही ऐकल्या तसेच काही वयस्कर मंडळींकडून मोलाचे सल्ले व आपुलकीच्या चार गोष्टी ऐकून मन कसे भरून आले होते.  कोण कुठली ही माणसे पण दोन रात्रीत अगदी घरचीच वाटायला लागली होती. हेच तर ह्या सहलीचे फलित होते असे मला तरी वाटले.
सहलीचा शेवटचा दिवस, सकाळी ६ वाजता उठून जवळील एका जंगलात पक्षी पाहण्यासाठी बाहेर पडलो.. खूप पक्षी व पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे किडे पाहायला मिळाले.  शौरीने आम्हांला एकंदरीतच ह्या विषयातील दिलेली माहित मला तर अचंबित करून गेली.  आपण किती अज्ञानी आहोत ह्याची जाणीव झाली.  शौरी आणि मयुरेश काय किंव्हा Insearch Outdoors चा संघ काय, तुम्हांला फक्त जंगलात फिरवत नाहीत तर आपल्या सृष्टी सौदर्याची आपल्याला जाण करून देतात हे त्यामधील वैशिष्ट्य म्हणावे लागेल.  निसर्ग सौदर्य कसे अनुभवायचे व कसे पाहायचे आणि किती आजमवायचे हे आयुष्यात उशिरा का होईना मला शिकवून गेले.
पक्षी पाहून आलो तर नाष्टा तयार होता.  परतीच्या प्रवासाची तयारी करायाची होती आणि थोडासा आरामही.  दुपारी १.३०ला जेवण करून आम्ही तयार होतो न होतो तोच आम्हांला नागपूरला पोहोचवायला बस तयार होती.  परत ४ वाजता नागपुरात प्रवेश आणि प्रसिद्ध हल्दीराम दुकानातील संत्रा बर्फी खरेदी उरकून सगळेजण रेल्वेच्या वातानुकुलीत प्रतीक्षालयात विसावलो व ६.३० मिनिटांनी सुटणाऱ्या गरीब रथ गाडीची वाट पाहत पहुडलो होतो.  आमच्यातील काही जाणकार (माझ्यासारखे) जवळील उपहार गृहातून गाडी मधील रात्रीच्या जेवणाच्या व्यवस्थेत गुंतून गेलो.
एकंदरीत ही जंगल सफारी खूपच छान आणि अगदी व्यवस्थित पार पडली.  खूप सुखावून गेली आणि परत परत अशा सहलींना जाण्यासाठी मनाची तयारी करून गेली.  मी तर ठरवले आहे की आता अशा सहलींची एकही संधी सोडायची नाही.  अर्थातच Insearch Outdoors बरोबरच.

रविंद्र कामठे, पुणे

Friday 24 March 2017

सध्या महाराष्ट्राच्या विधान सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचे जोरदार राजकारण चालू आहे. त्यावरील "शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण" हा लेख वाचा http://ravindrakamthe.blogspot.in


शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण

सध्या महाराष्ट्राच्या विधान सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीचे जोरदार राजकारण चालू आहे.  सर्वच पक्ष ह्या दोन्ही प्रश्नांकडे अतिशय कळकळीने आणि तळमळीने हा विषय जेवढा शक्य होईल तेवढा तापवून त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा त्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय प्रांजळ प्रयत्न करतांना दिसत आहेत.  ह्या राजकीय पक्षांची धोरणे आणि त्यांचे त्यात असलेले छुपे कारस्थानाचे त्यांना लखलाभ असे म्हणायची वेळ आता सर्व सामान्य माणसावर आली आहे.  ह्या विषयांवर चर्चा चर्विचरण एकद्या नटसम्राटालाही लाजवले अशा पद्धतीने बेलामुपणे चालू आहे.  सगळ्याच पक्षांनी आपली सगळी शक्तीच ह्या विषयांवर केंद्रित करून त्यांना शक्य होईल तेवढे तेच कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत आणि त्याचा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून होणारा फायदा आपल्या पदरात पाडून घेण्याची एक प्रकारची रस्सीखेच चालली असून त्यात ते काही अंशी यशस्वीही होतील ह्यात शंकेला कुठेच जागाच उरली नाही. त्याचे कारण तुम्हीं मारल्या सारखे करा आम्ही रडल्यासारखे करतो आणि सामान्य जनतेची व शेतकऱ्यांची जेवढी करता येईल तेवढी दिशाभूल करू. ह्या सगळ्यामधून शेतकऱ्याच्या हातावर तुरी देण्याची ह्या राजकीय धुराणींची चाल मात्र नेहमीप्रमाणे यशस्वी होईल हे सांगावयाला कोण्या ज्योतिषाची मात्र नक्कीच गरज नाही.  असंघटीत शेतकरी वर्ग आणि कै. शरद जोशींसारख्या नेतृत्वाच्या अभावाचा फायदा ही सगळी राजकारणी मंडळी त्यांच्या स्वार्थापोटी उठवत असून मतांचे राजकारण साधू पहात आहेत ह्याचे फारच दु:ख होते. 

दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधन क्षेत्रामध्ये जर आपला देश गेल्या दोन दशकांमध्ये उल्लेखनीय प्रगती करून सगळ्या जगाचे लक्ष वेधू शकतो तर शेतकऱ्यांच्या ह्या समस्यांवर तोडगा का काढू शकत नाही !  हे म्हणणे असे वाटणे किती स्वाभाविक आहे नाही. आपल्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचा स्वार्थ आणि आपमतलबीपणाच ह्या सगळ्यास कारणीभूत आहे अथवा तेच ह्या सगळ्या समस्येचे मूळ आहे असे मला तरी वाटते. एखादी समस्या अथवा प्रश्न भिजत ठेवून त्यावर येनकेन प्रकाराने राजकारण करत करतच गेली ६० वर्षे आपण फक्त आणि फक्त ह्या आपल्या अन्न्दात्याचे आर्थिक, शारीरक आणि कौटुंबिक शोषण करून एकप्रकारे सरकारच्या हातातले खेळणेच करून टाकले आहे असे म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही.   

मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचची कर्जमाफी हे दोन वेगळे विषय आहेत त्यांची एकेमेकांशी सांगड घालून एकप्रकारची दिशाभूल करण्याचे एक राजकीय षड्यंत्र गेले कित्येक दशके रचले आहे त्याचेच परिणाम आजचा शेतकरी भोगतो आहे.  त्यात शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तींशी द्यावी लागत असलेली झुंज त्याचे कंबरडेच मोडत आहे हे तर हे सगळेच राजकीय पक्ष सोयीस्करपणे विसरून जात आहोत हे नक्की. मी काही शेतीमधील तज्ञ अथवा अभ्यासक नाही, एक सर्व सामान्य माणूस आहे ज्याला रोज खायला अन्न लागते आणि ते पिकविणारा आमचा बळीराजा गेले काही दशके त्याच्या हक्कासाठी लढतो आहे, पण त्याला योग्य तो न्याय ना सरकार दरबारी ना दैवाच्या दरबारी मिळतो आहे ह्याचे शल्य माझ्या संवेदनशील मनाला बोचते आहे.  त्यामुळेच एक सुज्ञ नागरिक म्हणून मला जे काही वाटते ते मी व्यक्तिस्वातंत्र्यामुळे ह्या लेखाच्या माध्यमातून मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे. 

मूळ मुद्दा शेतकरी आत्महत्या का करतो हा आहे. त्यावर ह्या विषयामधील तज्ञांनी, अभ्यासकांनी भरपूर संशोधन करून काही प्रमुख कारणे नक्कीच शोधली गेली आहेत. कुठलाही शेतकरी त्याला हौस म्हणून आत्महत्या नक्कीच करत नाही हे निश्चित.  जरी मी ह्या विषयामधील तज्ञ अथवा अभ्यासक नसलो तरी गेले काही वर्षे शेतकरी चळवळीशी जोडला असल्यामुळे व संमेलनाच्या वेळी शेतकऱ्यांशी आणि काही जाणकारांशी केलेल्या चर्चेमधून मला ह्या समस्येच्या मुळाशी काही प्रमाणात जाण्याचा व  त्यातूनच मला जेवढे समजले तेवढे मी माझ्या कुवतीने मांडण्याचा एक लहानसा प्रयत्न येथे केला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेली काही ठोस कारणे जी बऱ्याचदा वेगवेगळ्या स्तरांमधील चर्चेतूनही समोर आलेली आहेत ती म्हणजे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असलेला अल्पभूधारक शेतकरी, मोठ्या प्रमाणात असलेली कोरडवाहू शेती, पारंपारिक शेती पध्दत, आधुनिक शेतीविषयक ज्ञानाचा अभाव, बियाणांच्या आणि खतांची कमतरता आणि वाढलेल्या किमतीवाढलेली शेतमजुरी, सिंचनाच्या अभावी शेतीला न मिळणारे पाणी, दरसाली नियमित येणारी नसर्गिक आपत्ती, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक, शेतमाल साठवण्यासाठी तालुका पातळीवर असलेला गोदामांचा अभाव, शेतमालासाठी विपणन व्यवस्थेचा अभाव, धनदांडग्या आडत्यांचा राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर असलेला प्रभाव, ह्या सगळ्या तणावामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या, तसेच शेती तंत्रज्ञानाचा आणि साधन सामुग्रीचा अल्पभूधारकांना न मिळणारा लाभ, सहकार क्षेत्राचा कमी झालेला प्रभाव, शेती विमा विषयक अज्ञानाचा अभाव, विविध सरकारी योजनांचे खरोखर गरजू शेतकऱ्यांपर्यंत न पोचलेले फायदे, इत्यादी आणि अशी अजून खूप कारणे आपल्याला शोधून काढता येतील.  परंतु ह्या सगळ्यांची कारणमीमांसा करून त्यावर ठोस अशी काही उपाय योजना अमलात आणण्यासाठीचे निस्वार्थी असे कुठलेच धोरण हे कुठल्याच राजकीय पक्षाला आणि त्यांच्या अंमलाखाली असलेल्या प्रशासनाला का राबवता आले नाही हा मला एक पडलेला साधा प्रश्न आहे आणि ज्याचे उत्तर शोधण्याचा मी एक निष्फळ प्रयत्न करतो आहे व ते मला तरी सापडले नाही.

कागदोपत्री शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे म्हणजे वरील सर्व समस्यांपासून राजकीय लाभापोटी काढलेली एक पळवाट आहे की काय असे वाटावे असेच वर्तन आजवरच्या सर्वच राजकारण्यांच्या कृतीतूनच पाहायला मिळते.  जसे काही हेच जणू आपल्या शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा अविर्भाव आणू पाहत आहते. पण त्यांना एक समजत नाही की समस्येच्या मुळाशी घाव घातल्याशिवाय त्या समस्येचा नायनाट होणार नाही.  हे समजते आहे पण ते प्रत्यक्षात आणून स्वत:च्या पायावर कोणी धोंडा पाडून घायचा असा प्रश्न तर ह्या राजकीय पक्षांना पडला नसेल ना !  सोन्याचे अंडे देणारी ही कोंबडी एकदम कशी कापून खायची बरे !  इतक्या वर्षांच्या प्रलंबित सरकारी धोरणांमुळेच हा विषय एक महाकाय रूप धारण करून आज महाराष्ट्रासामोरच नाही तर संपूर्ण देशा समोर आज राक्षसासारखा आ वासून उभा आहे आणि त्यावर आपण फक्त चर्चाच करतो आहोत.  युद्ध पातळीवर प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे त्यामुळे कर्ज माफी हा म्हणजे तात्पुरता इलाज जरी असला तरी आता तो करण्यावाचून सरकार समोर दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध राहिला नाही हे नक्की.  आत्ता जरी कर्ज माफी केली तरी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही ह्याची सुध्दा खबरदारी घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर काही ठोस अशा उपाय योजना ठरवून त्यांची आत्यंतिक प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे हीच काळाची खरी गरज आहे.

कदाचित लेखणीची ताकदच आपल्या ह्या बळीराजाला त्याच्या ह्या धर्मसंकटातून बाहेर काढू शकेल असा मला विश्वास वाटतो आणि म्हणूनच आम्हीं लटिके ना बोलूह्या ब्रीद वाक्याने शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून गेले तीन वर्षे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करून शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न व त्यावरील उपाय योजना, कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय साधण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला जातोय व त्याची दखल सर्वच क्षेत्रामधील मान्यवरांनी, तज्ञांनी, समाजसुधारकांनी, अभ्यासकांनी, अर्थशास्त्रज्ञांनी, पत्रकारांनी, साहित्यिकांनी व सर्वसामन्य माणसांनी घेतल्यामुळे ह्या चळवळीला दिवसेंदिवस यशही येत आहे हाच एक आशेचा किरण म्हणावा लागेल. तरीही ह्या चळवळीला अजूनही खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे हे मात्र ह्या निमित्ताने नमूद करावेसे वाटते. हा माझा वैयक्तिक दृष्टीकोन आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
रविंद्र कामठे   

Thursday 23 March 2017

चतुरस्त, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष - प्रकाशक - ही एक वस्तुस्थिती आहे आणि मी ती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर वाचकांच्या माहितीसाठी देणे मला जास्त संयुक्तिक वाटले म्हणून हा लेख प्रपंच. वाचा. http://ravindrakamthe.blogspot.in


चतुरस्त, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष - प्रकाशक
सध्याच्या काळात एक ओरड जिकडे तिकडे चालू आहे की, चांगले आणि प्रामाणिक प्रकाशक आजकाल मिळतच नाहीत.  त्यामुळे नवोदितांचे उत्कृष्ट साहित्य प्रकाशित होतच नाही आणि झालेच तर भरमसाठ पैसे देवूनच ते प्रकाशित करावे लागते आहे. त्यामुळे एक प्रकरचा निरुत्साह ह्या नवोदितांमध्ये प्रसरत चालला आहे आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार त्यामुळे खंडितच होतो आहे. अशी आणि अजून काही रडगाणी सध्या अगदी लहान थोर, नवोदित-प्रस्तावित साहित्यिक करत सगळीकडे भाषणबाजी करतांना राजरोसपणे दिसत आहेत. सगळ्यांना माझे एकच सांगणे आहे की चांगला आणि प्रामाणिक प्रकाशक शोधणे व त्याचाशी आपले व्यवसायिक आणि साहित्यिक संबंध प्रथापित करणे ही त्या त्या साहित्यिकाचीच जबाबदारी आहे.  नुसती आवई उठवून चार संभांमध्ये भाषणे ठोकून अथवा कट्ट्यांवर गप्पा मारून हे होणे कसे शक्य आहे !  त्यासाठी तुम्हांला थोडेसे कष्ट, माणसांची पारख आणि साहित्याविश्वमधील घडामोडींचा परामर्श घेऊन, नियमितपणे वाचन करूनच अनुभवायला हवे.  तुमचाही प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द, महत्वाकांशा, सातत्य आणि साहित्यविश्वाशी अतूट नाते असल्याशिवाय हे कसे साध्य होऊ शकते !  असेल हरी तर देईल खाटल्यावरीअसे म्हणणाऱ्यानी हा विचार सोडून दिलेलाच बरा, असा माझा त्यांना मैत्रत्वाचा सल्ला आहे.

२०१३ ते २०१५ ह्या काळात माझे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. परंतु मला म्हणावेसे असे समाधान मिळालेच नव्हते.  त्यांचे एकमेव कारण की त्या प्रकाशन संस्थेच्या असलेल्या अंतर्गत अडचणी, ज्या की त्या प्रकाशकालाच माहिती असाव्यात.  माझा पहिला काव्यसंग्रह माझ्याच हौसे खातीर स्वखर्चाने प्रकाशित करून घेतला होता.  नंतर २०१४ आणि २०१५ साली माझा दुसरा आणि तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित केले होते, ते ही परत एकदा त्याच पद्धतीने व माझ्याच अतिशहाणपणामुळेच म्हणावे लागेल.  मला ह्यात फारसे काही वावगे काही वाटलेच नव्हते.  कारण तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यामुळे मी अगदी खूष होतो व २०० प्रती घेऊन त्या आप्तेष्टांमध्ये वाटण्यातच मी गुंग होतो.  मुळातच माझ्याशी एक हजार प्रतींचा करार करून मला माझ्या २०० प्रती दिल्यावर, उरलेल्या प्रती विक्रीसाठी ठेवल्या आहेत असे सांगणे व त्या मला कधीच कुठल्याच पुस्तक विक्रेत्याकडे न आढळल्यामुळे माझी फसवणूक झाली आहे असे वाटणे स्वाभाविकच होते.  माझे ह्या क्षेत्रामधील अज्ञान पाहून त्यांनी जेमतेम ३००-४०० प्रतीच छापल्या असाव्यात ह्या शंकेला कुठेतरी जागा आहे, पण हे समजायला मला फार उशीर झाला होता कारण नंतर हे प्रकाशक महाशय ह्या व्यवसायातून गायबच झालेले होते.  ह्या सगळ्यात मी वर नमूद केल्याप्रमाणे माझे स्वत:चे चुकेलच होते कारण मी तरी कुठे प्रकाशनाबाबत गंभीर होतो. म्हणूनच की काय मी ह्या प्रकाशकाला अजिबात दोष देत नाही.  असतील त्यांच्या काही वयक्तिक अडचणी. पण त्यामुळे माझा साहित्य प्रवास काही काळ खंडित झाला हे मात्र नक्की. असो.

तरीही, मी ह्या प्रकाशकाचे मनोमन आभार मानतो कारण त्यांच्यामुळे मला साहित्यक्षेत्रामधील विवध गोष्टींची ओळख झाली, अनुभव मिळाले, दिग्गजांच्या गोठी भेटी झाल्या, त्यांच्याबरोबर चर्चा करता आली आणि योगायोगाने शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्याध्यक्ष्यांची ओळख होऊन एक चांगला साहित्यिक मार्गदर्शक मित्र लाभला. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते असे वाटले. हे माझेच उदाहरण मी दिले आहे, कारण ह्या जगात जसे वाईट असते तसेच चांगलेही असते, फक्त ते आपल्याला कष्टाने शोधावे लागते.  हे येथे सांगण्याचे एकमेव कारण की जर तुम्हांला खरोखर जर साहित्यविश्वात प्रामाणिकपणे काही करायचे असेल तर त्यासाठी एकतर तुमचे लिखाण उतम दर्जाचे आणि प्रगल्भ असायला हवे, ते योग्य त्या प्रकाशन संस्थेच्या हातात द्यायला हवे, जाणकार परीक्षक, समीक्षकांकडून ते तावून सलाखून, पारखून घ्यायला हवे आणि मगच ते सृजन वाचकांच्या सुपूर्त करावयाला हवे.  हे सगळे जर का तुम्हांला एकाच प्रकाशन संस्थेकडे मिळाले तर तो तुमच्या साहित्यविश्वातल्या प्रवेशासाठी आणि पुढील कामगिरीसाठीचा एक राजमार्गच समजावा.  हे माझे मत आहे आणि ते तुमच्यावर बांधील नाही.  ज्याने त्याने आपापल्यापरीने हा मार्ग योजावा.

२०१३ पासून मी माझ्या कवितेच्या माध्यमातून साहित्यसेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे.  सतत लिहिते राहण्याचा माझा प्रयत्न आहे.  त्यामुळेच माझा चौथा काव्यसंग्रह प्रांजळहा २०१६ पासून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत होता आणि मागील अनुभवावरून मी ठरविले होते की फक्त पुस्तकच छापायचे असेल तर प्रकाशकाची काही गरज नाही.  ते आपणही करू शकतो. असेही आजकाल नवोदित कवींच्या काव्यसंग्रहाला फारशी मागणी नसते वगैरे वगैरे.  असे म्हणत असतांना माझी सामाजिक आंतरजालच्या माध्यामतून श्री. घनश्याम पाटील सरांशी ओळख झाली आणि त्यांच्या प्रतिभेमुळे चपराक प्रकाशनशी मी जोडला गेलो व माझा प्रांजळहा काव्यसंग्रह चपराक प्रकाशनने १९ जानेवारी २०१७ ला चपराक साहित्य महोत्सवात प्रकाशित करून माझ्यातल्या लेखकाला, कवींला पुन:ऊर्जित केले.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.  ह्याचे यथा योग्य अवलंब करणारा एक तरुण तडफदार, विश्वासक, आश्वासक, मार्गदर्शक, सहाय्यक, असा एक अवलिया लेखक, सच्चा पत्रकार, उत्तम वक्ता, संवेदनशील संपादक आणि प्रामाणिक प्रकाशक व तितकाच माणुसकीने ओतप्रत भरलेलं, असे एक चालते बोलते व्यक्तिमत्व म्हणजेच चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील हे नाव प्रामुख्याने माझ्या डोळ्यापुढे येते.  जेमतेम ३२ वर्षे वय असलेले हे व्यक्तिमत्व साहित्याक्षेत्रामध्ये गेले १५ वर्षे अतिशय प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहे ह्याचे मला फारच कौतक वाटते.  लातूर सारख्या खेडेगावातून किल्लारी भूकंपानंतर हा तरुण, वयाच्या १२व्या वर्षी पुण्यात शिक्षणासाठी येतो काय अनं स्वत:चे चपराकहे साप्ताहिक, मासिक आणि प्रकाशन संस्था स्थापन करून, सामान्य माणसाचा उंचावलेला स्वरहे ब्रीद घेऊन चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून चपराकची वाटचाल स्वत:च्या आणि समुहाच्या साथीने व अविरत कष्टाने नावारूपाला आणतो काय ! हे सगळे अचंबितच करायला लावणारे आहे.  घनश्याम पाटीलांचा हा सगळा प्रवास पहिला की माझ्या सारख्या वयाच्या पन्नाशीनंतर का होईना साहित्याची सेवा करण्याच्या उर्मीला एक प्रोत्साहन देऊन जाते व लिहिण्याचा दृढनिश्चय करावयास भाग पाडते. अतिशय रोखठोक आणि परखड विश्‍लेषण केल्याने, सातत्याने ठाम भूमिका घेऊन, सत्याचा कैवार घेतल्याने चपराक हे नाव गेले काही वर्षे प्रामुख्याने कायमच चर्चेत राहिले आहे. तसेच ते वाचकप्रियही ठरले आहे व त्यांच्या विरोधकांसाठी, प्रतिस्पर्धी प्रकाशन संस्थांसाठी डोकेदुखीही ठरली आहे हे येथे नमूद करणे फारच गरजेचे वाटते.

मला चपराक प्रकाशनची कार्यपद्धती तर अतिशय भावली आहे.  येथे तुमच्या साहित्याची विशेष कदर असणारी व आस्था असणारी जाणकारांची एक फळीच घनश्याम पाटीलांच्या नेतृत्वाखाली अविरत कार्यरत असते. नुसतेच प्रकाशन नाही तर तुमच्यातल्या साहित्यिकाला पारखून ते तुम्हांला लिहिते करतात, वाचते करतात आणि जरूर तेथे योग्य ते मार्गदर्शनही करतात तसेच चपराक साप्ताहिक आणि मासिकात तुमच्या लेखनाला जागा देवून तुमचा यथायोग्य सन्मानही करतात. जर का तुमचे साहित्य प्रकाशनायोग्य नसेल तर तुम्हांला नाही सुध्दा ऐकण्याची पाळी तुमच्यावर येऊ शकते, अगदी तुम्हीं स्वत: प्रकाशनाचा सर्व खर्च जरी करण्यास तयार असलात तरी सुद्धा ! त्यामुळेच माझ्यासारखे नवोदित म्हणा, प्रस्थापित किंवा काही कारणांमुळे विस्थापित झालेले साहित्यिकही आज चपराक प्रकाशनकडे आवर्जून धाव घेतांना दिसतात. चपराकचे काम २४ तास, ३६५ दिवस विनाखंड घनश्याम पाटीलांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने चालू असते.  साहित्यसेवेच्या ह्या व्रताला वाहून घेतलेल्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या संस्था आणि माणसे राहिल्या आहेत त्यात चपराक प्रकाशनचे नाव अग्रस्थानी असले तर त्यात शंका घेण्याचे कारणच नाही. हेच तर चपराकच्या विरोधकांचे आणि प्रतिस्पर्ध्यांचे दुखणे आहे हे मात्र नक्की.

चार ते पाच वर्षांच्या प्रयत्नांनी व योगायोगाने मला असा प्रकाशक, मार्गदर्शक, तितकाच प्रगल्भ सहकारी, मित्र व चपराक समुहा सारखा जाणकार परिवार मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझ्या सारख्या एका नवोदिताला आशेचा एक किरण दिसून मी परत एकदा लिखाणाकडे चपराकमुळे आकर्षित झालो हे मात्र मला येथे आवर्जून सांगावयास हवे.  मी हे काही चपराकच्या किंवा घनश्याम पाटीलांचे कौतुक करण्याच्या दृष्टीकोनातून लिहित नाही तर ही एक वस्तुस्थिती आहे आणि मी ती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर वाचकांच्या माहितीसाठी देणे मला जास्त संयुक्तिक वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०  

Wednesday 22 March 2017

"प्रेम" हा माझा लेख - रसिक मासिकाच्या मार्चच्या अंकामध्ये छापून आला होतो तो आपल्यासमोर सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. http://ravindrakamthe.blogspot.in

"प्रेम" हा माझा लेख - रसिक मासिकाच्या मार्चच्या अंकामध्ये छापून आला होतो तो आपल्यासमोर सादर करताना अत्यंत आनंद होत आहे.  तो खास आपल्यासाठी ... http://ravindrakamthe.blogspot.in. https://shabdrasik.blogspot.in/
प्रेम म्हणजे काय ? ते कसे असते, ते कसे होते, ते कोणावर जडते, का जडते, कधी जडते, केंव्हा जडते ? ह्या सारखे अनंत प्रश्न जेंव्हा आपल्याला पडतात ना तेंव्हा समजावे की आपणा आपल्या नकळत कोण्याच्यातरी प्रेमात पडलेलो आहोत. हा सगळा जो काही खेळ आहे तो आपल्या भावनांचा असतो आणि त्यावर आपला कधीच ताबा नसतो. आपल्यातल एक कवी हळूच जागा होतो आणि म्हणू लागतो...असे कधी वाटलेच नाही....

तू नाही म्हणशील ह्या भीतीने,
तुला कधी विचारलेच नाही ||
लाखात एक तू दिसतेस कशी,
हे तुला कधी सांगितलेच नाही ||
माझ्या स्वप्नातील तू एक परी होतीस,
हे तुला कधी भासवलेच नाही ||
तू नाही म्हणशील हीच भीती मला खात होती,
तू ही कधी प्रेमात पडशील,
असे कधी वाटलेच नाही ||

हीच तर खरी प्रेमात पडल्याची लक्षणे आहेत असे वाटते कि नाही ? ह्या सख्याला सारखे वाटत असत की .... प्रेम म्हणजे प्रेम असत, जस दिसत तस नसत, म्हणनच तर, सारे जग फसत || ( कालानुरूप बदलत चाललेली ही प्रेमाची परिभाषा आहे )
वास्तविक पाहता ह्या सख्याला प्रेमाच कोड पडलेलं असतं....आणि तो म्हणू लागतो......

प्रेमाच कोड कधी हसवत तर कधी रडवत  ||
प्रेमाच्या ह्या वेडाला अश्रुंच नसत कधी वावड,
प्रेमात तर घालावच लागत कायम साकड ||
सरळ सरळ वाटणार मार्गही होतात वाकड,
जिगरीने करायच असत प्रयत्न थोड थोड ||
करायचं नसत कधी आपल्या प्रेमाच लफड,
कधी कधी खावी लागतात पाठीवर लाकड ||
प्रेमात नसत घाबरायच हृदय असाव निधड,
नाही तर प्रेमही पडत थोडस तोकड ||
प्रेम नसत कधीही कोणाच वाकड,
बघणाऱ्यांच्याच नजरेत असत कोड ||
म्हणूनच तर .........
प्रेमाच कोड कधी हसवत तर कधी रडवत  ||

त्याच्या सखीलाही प्रेमाचं वेड लागले दिसतंय.. ती ही सख्याच्या प्रेमात पडते आणि म्हणू लागते ........

ढगातून येताना आणशील कारे पाऊस थोडा,
सुकलाय रे पार माझ्या भावनांचा ओढा ||
नकोसा वाटतो आता मला हा जीव थोडा,
स्वप्नांना माझ्या कोणीतरी घालतंय खोडा ||
कसही करून काहीही करून आता मला सोडा,
सखा माझा थांबलाय घेउनीया घोडा ||
नकोय मला तुमच्या उपदेशाचा काढा,
प्रेमाचा माझ्या नुकताच सुटलाय तिढा ||
जाऊद्यात मला उधळूनी सोडा आता हा नाडा,
जखडून ठेवलय हो तुम्ही मला तुमच्या ह्या वाडा ||
बरसू लागल्या रिमझिम सरी, रान सार हिरवं गार करी,
थांब सख्या रे तू पळभरी, धावून येते मी लवकरी ||

हा सखा सखीच्या इतका प्रेमात बुडालेला असतो आणि तो तिच्यावर किती प्रेम करतो आहे हे तिला सांगातो की ह्या कवितेतून सांगतो... मज तुझ्या काळजात राहणे आहे.

माझे तुला इतुकेच सांगणे आहे
लोचनी तुझ्या प्रीतीचे चांदणे आहे ||
सहज तुला पाहतांना भासले की
हे तुझे जरा वेगळे वागणे आहे ||
हाती घेतला जेंव्हा तुझा हात गं
तेंव्हाच उमगले हे लाजणे आहे ||
हलकेच ओठ तू कसा दाबलास तो
कळले मजला तुझे बहाणे आहे ||
सांजवेळी बकुळीने मोहरले हे
मन माझे झाले तुझे दिवाणे आहे ||
शपथ तुला मी ह्या चंद्राची घालतो
मज तुझ्याकाळजात राहणे आहे ||

मला तरी वाटते की माणसाने आयुष्यात एकदातरी प्रेमात पडाव..... बरोबर आहे कि नाही ?  अर्थात हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.

रविंद्र कामठे

१४ फेब्रुवारी २०१७. (ह्या सर्व कविता माझ्या प्रकाशित झालेल्या प्रतिबिंब”,” तरंग मनाचे”, “ओंजळ आणि प्रांजळ ह्या काव्य संग्रहांमधील आहेत)http://ravindrakamthe.blogspot.in

Monday 20 March 2017

"स्वप्न मातृ-पितृत्वाचे". जवळ जवळ चार वर्षांनी आज त्या दोघांचे आई बाबा होण्याच्या स्वप्नास ह्या एका छोट्याश्या बातमीमुळे का होईना प्रत्यक्षात येण्यास चालना मिळाली होती आणि त्यांना जाणवले की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली आई-बाबा होण्याची इतकी सुखद संवेदनाच हरवून बसलो होतो ! चपराक साप्तहीकामधील हा लेख


स्वप्न मातृ-पितृत्वाचे
सकाळची सर्व कामे आटोपली होती.  राजू नुकतात डबा घेऊन त्याच्या कार्यालयाच्या गाडीतून गेला होता.  भाग्यश्रीने स्वत:चा डबा भरून घेता घेता तिच्या कार्यालयाची बस अजून यायला पाच मिनिटे वेळ आहे म्हणून सहज नुकत्याच आलेले वृत्तपत्र चाळायला घेतले आणि पहिल्याच पानावरील बातमीचा मथळा वाचला “गरोदर महिलांच्या मातृत्व रजेत १२ आठवड्यांची वाढ-मातृत्व रजा होणार २६ आठवड्यांची”.  ही बातमी वाचून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिच्या मनात आता तरी मी नक्कीच आई होऊ शकते ह्या जाणीवेनेच हे आनंदाश्रू आल्याचे तिला उमगले आणि थोडीशी हळवी होऊन लाजल्यासारखेच झाले.  कधी एकदा ही बातमी राजूच्या कानावर घालते असे झाले होते तिला.  पण तो आता गाडीत असेल आणि एकटाही नसेल म्हणून फोन लावता लावता परत पर्स मध्ये ठेवला आणि ठरवले की आज संध्याकाळी घरी आल्याबरोबर राजूला ही बातमी द्यायची.  खरं तर तिला आज कामावर जावूच नये असे वाटत होते व राजूला ही फोन करून लवकर घरी ये असे सांगावे असे वाटत होते तेवढ्यात गाडीच्या आवाजाने तिची तंद्री तुटली आणि घराला कुलूप लावून ती पटकन गाडीत बसली ते ही गालातल्या गालात हसतच.  तन्वीने तिला विचारलेही काय गं भाग्यश्री आज स्वारी एकदम खुषीत दिसतेय.. एवढे काय झाले लाजायला. तन्वीच्या ह्या वाक्याने मात्र भाग्यश्री एकदम भानावर आली आणि तिला म्हणाली की थांब ना बाई सांगते तुला सगळे कामावर गेल्यावर, इथे गाडीत नको.

भाग्यश्रीने गाडीत बसल्यावर डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग हळू हळू तरंगू लागले... गेले तीन चार वर्षे भाग्यश्री आणि राजू लग्न झाल्यापासून आपल्याला मुल हवे का नको ह्या विषयावरून एकमेकांशी नेहमीच संवाद साधत होते, चर्चा करत होते. त्यांना एकच समस्या कायम भेडसावत होती की आपल्याला ही जबाबदारी पेलवेल का ? आपल्या बाळाचे आपण नीट संगोपन करू शकू का ? त्याला सांभाळण्यासाठी दोघांपैकी कोणाला एकाला तरी नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल आणि तो कोणी द्यायचा ?  लग्न झाल्यापासून नोकरीच्या निमित्ताने आपल्याला आई वडिलांपासून वेगळे राहायला लागले होते.  असेही आजकाल एकाच्या पगारावर घर संसार चालवणे तसेही मुश्कीलच वाटू लागले होते.  मनात असूनही त्या दोघांसाठी वेळ देणेही आजकाल मुश्कील झाले होते.  त्यात बाळाची जबाबदारी वाढवली तर आपले कसे निभावेल.  राजूच्या आई बाबांना खूप वाटायचे की आमचे हातपाय चालताहेत तोपर्यंत एखादे नातवंड आमच्या अंगाखांद्यावर खेळूद्यात रे पोरांनो.  भाग्यश्रीची आईही अधून मधून राजूच्या आईबाबांच्या बोलात बोल मिसळायच्या. पण आम्हांलाच वाटायचे की सध्याच्या ह्या धकाधकीच्या आणि असुरक्षित जगात आपल्या बाळाला आणून त्याच्या आयुष्यात समस्यांची कशाला उगाच भर टाकायची.  त्यात ही रोज वाढणारी महागाई आणि त्याच्या शाळेच्या प्रवेशा पासून ते त्याला/तिला उच्च शिक्षण देवून एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठीची ओढाताण आपल्याला जमेल का ?  भाग्यश्री राजूला म्हणायची की मला चांगली ३ महिने मातृत्व रजा मिळते त्यात भर टाकून मी ती अजून तीन महिने वाढवून घेईन, अगदी बिनपगारी जरी झाली तरी काही हरकत नाही.  आणि हो जर का बाळासाठी नोकरी सोडायची वेळ आली ना तर मी ती नक्कीच सोडेन.  जेंव्हा बाळ चांगले पाच सात वर्षाचे झाले की मग पुन्हा एखादी छोटीशी नोकरी शोधून संसाराला हातभार लावेन.  राजूचीही तिच्या ह्या मताशी हळू हळू सहमती झाली होती आणि त्यापद्धतीने तो त्याच्या कामावर जास्त लक्ष देवून प्रगतीची एक एक पायरी चढू लागला होतो व संसाराचा भार जर एकट्यावर आलाच तर तो पेलण्याचे आर्थिक पाठबळ तयार करत होता.  त्यातच तिला कायमच कुतूहल वाटायचे की आपल्या कामवाल्या मावशी तीन मुले असूनही कसं काय आपला संसार करत असतील नाही... तेवढ्यात गाडी कार्यालयात पोचली आणि भाग्यश्रीची तंद्री पुन्हा एकदा तुटली..

इकडे राजुलाही कार्यालयात गेल्यावर त्याच्या मित्राकडून हीच बातमी मिळाली होती.  त्यामुळे त्याच्याही मनात भाग्यश्रीशी झालेल्या संवादाची एक चित्रफित हलकेच तरळून गेली आणि कधी एकदा ही बातमी भाग्यश्रीला देवून तिला खूष करण्याचे वेध लागले होते. ह्या खुशीतच दिवस कधी संपला हे ही त्याला कळले नाही.  घरचे वेध लागले होते.  स्वारी आज खुशीतच होती. गाडीतून उतरल्यावर भाग्यश्रीसाठी त्याने एक छान मोगऱ्याचा गजरा घेतला, तिला आवडणारी आंबा बर्फी घेतली आणि एक सुमधुर शिळ घालीत स्वारी घराच्या वाटेवर चालू लागली.  आजूबाजूचे लोकं त्याच्या ह्या वागण्याकडे थोडेसे मिश्किलपणे पाहत होते, पण राजू आज आपल्याच विश्वात गुंग होता.

भाग्यश्रीने आज नेहमीपेक्षा थोडी लवकरच घरी पोचली.  आल्याबरोबर तिने टेप सुरु करून तिची आणि राजूच्या आवडीची मदन मोहनची कॅसेट लावून एका बाजूला तिने घरातली बारीकसारीक कामे उरकून घेतली. राजूच्या आवडीचा काजू, बदाम, बेदाणे घालून साजूक तुपातला गोडाचा शिरा करून ठेवला. त्याच्या साठी कोल्ड कॉफी करून फ्रीज मध्ये ठेवली.  मधेच कपाटात ठेवलेली राजूच्या आवडीची, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने घेतेलेली क्रीम रंगाची काठ पदर असलेली साडी काढली आणि ती अगदी चापून चेपून नेसून हलकासा शृंगार करून, तयार होऊन ती राजूची वाट पहात कोचावर बसून गाण्याच्या तालावर गुंग होत होत मातृत्वाच्या स्वप्नात इतकी रमून गेली की, तिचा डोळा कधी लागला हेच तिला कळले नाही.  ती जागी झाली तीच मुळी तिला हवा हवासा वाटणाऱ्या राजूच्या मृदू व कोमल ओठांच्या स्पर्शाने व त्याच्या त्या नेहमीच्या श्वासातील गंधाने.  भाग्यश्रीला दोन मिनिटे काहीच सुचेना, इतक्यावेळ मनाला घालून ठेवलेला बांध हलकेच गळून पडला आणि तिच्या डोळ्यांतून घळा घळा आनंदाश्रू वाहू लागले व तीने राजूला कडकडून मिठीच मारली.  दोघेही त्या घट्ट मिठीत आपल्या व्यक्त अव्यक्त भावनांना सुखद स्पर्शाने एकमेकांना कुरवाळत होते, अगदी भावविवश होऊन गेले होते. ह्या क्षणी कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते.  फक्त डोळे आणि तो एकमेकांना हवाहवासा वाटणारा सुखद स्पर्श दोघांनाही त्यांच्या स्वप्नातल्या मातृ-पितृत्वाच्या भावनेशी आयुष्यभरासाठी एकरूप करून घेत होता, सुखावत होता.

जवळ जवळ चार वर्षांनी आज त्या दोघांचे आई बाबा होण्याच्या स्वप्नास ह्या एका छोट्याश्या बातमीमुळे का होईना प्रत्यक्षात येण्यास चालना मिळाली होती आणि त्यांना जाणवले की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली आई-बाबा होण्याची इतकी सुखद संवेदनाच हरवून बसलो होतो !
आपल्याच माणसाच्या मनातले ओळखायला एखादवेळेस असेही व्हावे लागते की काय असे म्हणायची वेळ येते !  असो.  जे काही होते ते चांगल्यासाठीच होते.

माझ्या मनाने मला सरकारच्या ह्या निर्णयाचे अभिनंदन करण्यास भाग पाडून, राजू-भाग्यश्रीच्या स्वप्नपूर्तीस आशीर्वाद दिले आणि मनातल्या भावना ह्या काव्यामधून व्यक्त करून गेले....

ते क्षण कसे काळजात होते
गंध खोल अंतरंगात होते
तू होतीस इतकी जवळ की
आसमंत सारे मिठीत होते ||
क्षण हे भावले असे आज की
ऋण क्षणांचे मज ज्ञात होते
बहरला मोगराही असा की
फुलपाखरूही स्वप्नात होते ||
सहवास लाभला असा की
दान क्षणांचे पदरात होते
भरली लोचने आसवांनी की
ओंजळ मोती साठवत होते ||
मनास इतुकेच भासले की
ते आज क्षणांच्या ऋणात होते
ते क्षण कसे काळजात होते
गंध खोल अंतरंगात होते ||

रविंद्र कामठे

चपराक साहित्य महोत्सव २०१७-मागोवा



चपराक साहित्य महोत्सव २०१७ - मोगोवा

चपराक साहित्य महोत्सव २०१७ हा सलग चौथ्या वर्षी चपराक प्रकाशनच्या वतीने, श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे गुरवार दिनांक १९ जानेवारी २०१७ रोजी दुपारी २ ते रात्री १० ह्या वेळेत, तरुण, तडफदार, प्रगल्भ पत्रकार आणि लेखक संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.

 भरगच्च कार्यक्रम असलेला हा साहित्य सोहळा म्हणजे प्रतीरूपी आणि तितकेच सर्वसमावेशक असे अखिल भारतीय साहित्य संमेलनच होते असे संबोधले तर अतिशयोक्ती होणार नाही.

 रसिकांचे स्वागत चपराकचे सहसंपादक श्री. माधव गिर, कार्यकारी संपादिका सौ. शुभांगी गिरमे ताई आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखां बेलसरे ताईंनी करून कार्यक्रमास अतिशय छान सुरवात केली.  सौ. शुभांगी गिरमे ताईंनी चपराकचे गीत सादर करून कार्यक्रमास रंगत तर आणलीच परंतु आज होण्याऱ्या महोत्सवाची मनोरंजक झलकच प्रदर्शित केली. श्री. घनश्याम पाटील सरांनी अतिशय संयुक्तिक व चपखल प्रास्ताविक करून कार्यक्रमास सुरवात करून दिली.

 संमेलनाध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. द. ता भोसले, उद्घाटक सरहदचे अध्यक्ष श्री. संजय नहार, प्रमुख पाहुणे मसपा पुणेचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी आणि स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक श्री. संजय सोनावणी असे दिग्गज लाभणे हेच मुळी घनश्याम दादांनी साहित्य क्षेत्रा मध्ये अथक कष्टाने, लेखणीच्या सामर्थ्याने आणि अतिशय मन मिळावू व लाघवी व्यक्तिमत्वाने मिळवलेली आदरणीय प्रतिष्ठा आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.  सर्व दिग्गजांनी त्यांच्या भाषणातून साहित्य क्षेत्रामधील घडामोडींचा आढावा घेता घेता व उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असतांना, चपराक प्रकाशनचे साहित्य क्षेत्रामधील कार्य कसे आणि किती दखलपात्र आहे हे अतिशय प्रकर्षाने नमूद केले.  चपराकचे आणि विशेष म्हणजे घनश्याम दादांचे तोंडभरून कौतुक करतांना ह्या मंडळींनी हातचे काही राखून ठेवले आहे व आयोजकांनी निमंत्रित केले आहे म्हणून तोंडदेखले कौतुकही केले आहे असे कुठेही वाटले नाही.  हीच तर खरी तरी चपराकच्या कार्याची पावती आहे असे मला वाटते.

 दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिध्द पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर सरांची घनश्याम दादा आणि दैनिक आपलं महानगरचे संपादक श्री. आबा माळकर ह्यांनी घेतलेली विशेष मुलाखत म्हणजे ह्या कार्यक्रमाचा शिरोमणी होता.  जवळ जवळ दोन तास चाललेल्या ह्या मुलाखतीने राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आणि वैयक्तिक नीतिमूल्यांचा अविष्कारच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

 तिसऱ्या सत्रात युवा लेखक सागर कळसाईत ह्यांच्या कॉलेज गेट ह्या कादंबरीतील एका प्रकरणाचे अभिवाचन स्वतः सागर कळसाईत आणि त्यांच्या संघाच्या अप्रतिम सादरीकरणाने सर्व प्रेक्षकांना तसेच आजच्या तरुणाईला जवजवळ एक तासभर खुर्चीला खिळवून तर ठेवलेच परंतु उपस्थित असलेल्या आमच्या सारख्या जेष्ठांना भूतकाळात घेऊन गेले.  चपराकच्या ह्या प्रयोगामुळे नवोदित तरुण तरुणी साहित्य क्षेत्राकडे नक्कीच आकर्षित तर होतीलच आणि लिहिते होतील ह्याची तिळमात्र शंका नाही. हेच तर ह्या महोत्सवाचे वैशिष्ट्य मला अगदी प्रकर्षाने जाणवले.

 चौथ्या सत्रामध्ये निमंत्रित कवींचे संमेलन म्हणजे ह्या संपूर्ण साहित्य महोत्सवातील कार्यक्रमांचा कळसच होता.  चपराकने काही उपेक्षित तर काही प्रचलित असे १९ कवी आणि कवियत्रींनी ह्या संमेलनास संपूर्ण महाराष्ट्रातून निमंत्रित करून त्यांना एका व्यासपीठावर सन्मानपूर्वक कविता सादरीकरणास वाव दिल्यामुळे हा महोत्सव एका वेगळ्या उंचीवर पोचला.  प्रत्येकाने आपले हे काव्यरूपी अपत्य सृजन रसिकांच्या स्वाधीन करून उपस्थितांची दाद तर मिळवलीच, परंतु ह्या सत्राचे सुत्रसंचलन करणारे जेष्ठ कवी श्री. स्वप्निल पोरे आणि सत्राचे अध्यक्ष कवी श्री. माधव गिर व संपादक घनश्याम दादांना अगदी मनापासून कौतुकाची थाप पाठीवर देण्यास भाग पाडले. एका पेक्षा एक उत्तम, श्रवणीय आणि गेय कविता ह्या सर्व कवी मंडळींकडून महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात ऐकायला मिळाल्यावर सर्व श्रोते चपराक समूहाचे कौतक करीत गुणगुणतच सभागृहातून बाहेर पडतांना पाहिल्यावर मला माझ्या डोळ्यांच्या कडा थोड्याशा ओलावल्याचे जाणवले.

 श्री. अरुण कमळापुरकर सरांनी आभार प्रदर्शन करून ह्या अविस्मरणीय साहित्य महोत्सवाची सांगता केली तरीही प्रेक्षागृहातून कोणही बाहेर जायला तयार होत नव्हता.  रात्रीचे १० वाजले होते तरीही सर्व लेखक, कवी, कवियत्री, पत्रकार, प्रेक्षक प्रत्येकजण एकमेकांस शुभेछ्या देत होता, कोणी आभार व्यक्त करत होते तर पुढचा कार्यक्रम लवकरच जाहीर करा अशी गळ घनश्याम दादांना घालत होते.  सगळे कसे भारावून गेले होते.

 ह्या साहित्य महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे ह्या सोहळ्यात प्रकाशित होणारी पुस्तके हे होय.  सध्याचा आर्थिक मंदीच्या आणि नोटबंदीच्या काळातही असे आगळे वेगळे, १९ (एकोणीस) पुस्तके प्रकशित करण्याचे धाडस करून चपराक प्रकाशनने साहित्य क्षेत्रात त्यांचे असलेले मानाचे अढळ स्थान प्रस्थापित केले हे मात्र नक्की.

ह्या एकोणीस पुस्तकांमध्ये सर्व समविष्ट असे साहित्य म्हणजेच, २ लेख संग्रह, ७ काव्यसंग्रह, ७ कथासंग्रह, २ कादंबरी, १ लघु कादंबरी आणि घनश्याम दादांचा – अक्षर ऐवज (समीक्षा), असा अनमोल साहित्यिक खजिना सुजन वाचकांसाठी मोठ्या दिमाखात प्रकाशित करून एक वेगळाच पायंडा पाडून नवीन वर्षातील साहित्य मेजवानीच दिली आहे असे म्हणावयास हवे.



कोण म्हणतो लोक वाचत नाहीत. चपराक म्हणते तुम्हीं लिहा आम्ही तुम्हांला वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जबाबदारीने आणि निष्ठेने करतो आणि त्यांनी आज हे सिद्ध करून दाखवले आहे.   वाखाणण्यासारखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक सत्राच्या सुरवातीला पाच ते सहा पुस्तकांचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यात सदर पुस्तकाच्या लेखक, कवी, कवियत्रींना आदराने सन्मानितही करून त्यांना दखलपात्र केले हे नक्की.

हा सोहळा तर अप्रतिमच झाला त्यात काही वाद नाही.  परंतु ह्या सर्व सोहळ्या साठी चपराक प्रकाशनचा चमू गेले एक महिना दिवस रात्र काम करत होता हे मी स्वत: पहिले आहे.  ह्या पडद्यावरील आणि पडद्य्मागील कलाकारांचेही ह्या सोहळ्याच्या फलश्रुती साठी मोलाचे योगदान आहे. 

श्री. घनश्याम पाटील, श्री. माधव गिर, सौ. शुभांगी गिरमे ताई, सौ. चंद्रलेखा बेलसरे ताई, तुषार उथळे-पाटील, बजरंग दादा, ब्रम्हे काका, श्री. कमळापुरकर, श्री. समीर नेर्लेकर, सिद्धेश आणि मुद्रणालयाचे सर्व सहकारी.  ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आणि अपार मेहनतीने आज हा सोहळा आणि सर्वच्या सर्व १९ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे त्यासाठी तुमचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे.  

सोहळा चपराक महोत्सवाचा
आज झोकात की हो जाहला
साहित्यक मेजवानीचा आज
आस्वाद सर्व रसिकांनी लुटला ||

शब्द पडती थोटकेही कौतुकास
भारावून हर एक जण हो गेला
अथक कष्टाने चपराकचा वेलू
गवसणी गगनाला घालुनी गेला ||

यज्ञ चपराकचा साहित्य सेवेचा
यशस्वीपणे पार होता पडला
एकोणीस सारथींनी आज अश्व
साहित्यविश्वात होता उधळला ||

आभार मानून घनश्याम पाटीलांचे
कृतघ्न आम्ही नाही हो होणार
ऋणात चपराक प्रकाशन चमूच्या
आम्ही सदैवच आहोत राहणार ||


रविंद्र कामठे