Monday 18 September 2017

आश्वासंनाची बुलेट ट्रेन


आश्वासंनाची बुलेट ट्रेन


काय बोलावं, कसं बोलावं, तेच सुचत नाही हो आजकाल.  मती गुंग झाली आहे माझी.  वेडबिड लागतंय की काय अस वाटतंय.  सारखे कसले तरी भास होत आहेत.  चांगली का वाईट पण विचित्र स्वप्ने पडताहेत हो.  म्हणजे मला की नाही असं वाटयला लागलंय की, आपल्या देशातली आणि राज्यातली संसद, राज्यसभा आणि विधानसभा, विधानपरिषद, हे आपले दूरचित्रवाणीवर दाखवल्या जाणाऱ्या रोजच्या मालिका बनविणारे लेखक, दिग्दर्शक, निर्मातेच चालवत आहेत, असे वाटायला लागले आहे.  म्हणजे जसे की ह्या रोजच्या मालिकेतील, मागच्या भागाचा, चालू भागाशी आणि पुढच्या भागाशी जसा काहीही संबध नसतो ना, अगदी तसेच काहीसे झाले आहे, आपल्या ह्या सरकारचे.  आपल्या देशात रोज कुठेना कुठे तरी निवडणुकांचे आदेश निघतच असतात.  त्यामुळे आपल्या अतिशय कार्यक्षम अशा ह्या संत्र्यामंत्र्यांकडून रोजच काही ना काही आश्वासंनाची खिरापत वाटली जातेच जाते.  आज तर चक्क बुलेट ट्रेनची खिरापत मिळाली.  आणि काय सांगू माझे तर डोळे अश्रूनी डबडबले हो ! म्हणजे मला तर ना हे एक दिवसाढवळ्या पडलेले स्वप्नच आपण पाहतोय की काय असे वाटायला लागले.  माझ्या मनात एक आशा निर्माण झाली, ती म्हणजे, ‘आता माझ्या अहमदाबादेतील शेतकऱ्याचा ताजा माल रोज अगदी बुलेटच्या वेगाने मुंबईच्या बाजारात येईल आणि त्याच वेगाने भरभरून पैसा अह्मादाबादेला घेऊन जाईल’.  शेवटी काय हो देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याचे हीत हेच आमचे हीत आहे हो.  अर्थात हा शेतकरी म्हणजे साधा सुधा नाही हो. तो चक्क हिऱ्यांची शेती करणारा आहे आणि म्हणुनच त्याला की नाही सर्वसामन्य बळीराजा पेक्षा जरा जास्तच सुविधा द्याय्यला हव्यात हो.  त्याचं काय आहे, एक वेळेस जेवायला नसले ना तरी चालेले, पण हिऱ्यांकडे पाहून सुद्धा ज्या प्रमाणत पोट भरते आणि शरीराला उपयुक्त असे सर्वप्रकारचे जीवनसत्व त्यापासून मिळतात हे विसरून कसे चालेल हो !  आणि हो एक विसरतो आपण नेहमी, ते म्हणजे जर का श्रीमंतांची पोटे आणि तिजोरी भरलीत तरच गरीबाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न मिळू शकते, हा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे.  ह्यालाच तर म्हणतात दूरदृष्टीने विचार करणारे सरकार.  केवढे हीत आहे हो ह्या निर्णयात हे तुम्हांला कळण्याची तुमची कुवतच नाही आणि म्हणूनच तुम्हीं फक्त मतदारच राहिले आहात हे लक्षात घ्या.  आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी एकतर वेडा आहे आणि आत्म्हत्येच्या व्याधीने ग्रस्त आहे.  त्याला कशाला ह्या व्यापातून मुक्त करायचे.  झाली की कर्जमाफीची घोषणा करून.  म्हणजे एकदा का घोषणा केली की ह्यांचे काम झाले.  निर्णयाची अंमलबजावणी वगैरे करणे दूर राहिले.  उलटे त्यावरून राजकारण चालू करून एकप्रकारे बळीराजाची चेष्टाच चालू आहे ह्याचे फार वाईट वाटते हो.  तुम्हीं बुलेट ट्रेन आणा नाही तर विमान आणा, आधी वसई ते विरार आणि अंबरनाथ ते ठाणे हा लोकलचा प्रवास सुखकर करून दाखवा आणि मग बोला असेच सगळेच मुंबईकर दिवसा ढवळ्या बोलायला लागलेत. त्यांचे तरी काय चुकले हो ह्यात. गेले २ वर्षे झाली आम्ही पाहतोय की मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कुठल्यातरी एका मोठ्या मैदानांत तुमच्याआमच्याच पैशातून कोट्यावधी रुपये खर्च करून, उभारलेल्या व्यासपीठावरून, कळ दाबून भूमिपूजन काय करताहेत.  त्याचे ताजे उदाहरण द्यायचे झाले तर ह्यांनी अगदी समुद्रात सुद्धा जाऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केलेले आम्ही अजूनही विसरलो नाही. त्यात तुम्हांला एक गमंत सागतो, म्हणजे आपले ह.भ.प (लवकरच होऊ घातलेले भारताचे अर्थमंत्री) त्यांनी तर सांगितले की बुलेट ट्रेन आहे ना, ते हे सगळे आपल्याला जपान सरकारने अगदी अगदी फुक्कट दिले आहे.  पंधरा वर्षांनंतर आपण की नाही ह्या कर्जाची फेड करायची तो पर्यंत ही बुलेट ट्रेन तुटेपर्यंत वापरायची.  खर सांगतो मंडळी तुम्हांला, गेल्या ५० वर्षात म्हणजे मला कळायला लागल्यापासून आजपर्यत अर्थशास्त्र ते काय समजलेच नव्हते, ते ह्या ह.भ.प सरांमुळे कळाले. त्यांची वाणी इतकी गोड आहे की वाटते ते प्रवचनकारच आहे की काय.  बहूतेक तो त्यांचा जोड धंदा असावा !  असो. असे जर का शिक्षक/प्राध्यापक आपल्या राज्याला / देशाला मिळाले ना तर आपले कल्याण झालेच म्हणून समजा !  मुख्यमंत्री तर काय हवेतच होते हो म्हणजे त्यांचे असे झाले होते की खिशात नाही आणा, मंडळी म्हणताहेत की, धनी अह्मादाबादेहून येतांना काहीबी करून बुलेट ट्रेन आणा”.  असो.  आपल्याला बुबा ह्यातले काहीच कळत नाही आणि असेही सर्वसामन्य माणसाला काही कळावे अशी अपेक्षाही नाही.  त्यांनी फक्त मतदानाच्या दिवशी त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार डोळे झाकून, बुद्धी गहाण ठेवून तर काही जणांनी मतांच्या ठरलेल्या किमतीनुसार मतदान करून आपला राज्यघटनेने दिलेला अधिकार बजावायचा आणि मोकळे व बाजूला व्हयाचे आणि आपल्याच हातून आपण करून घेतलेल्या आपल्याच राज्याचे अथवा देशाचे वाट्टोळे बघत बसायचे.  

 

मला जसे समजायला लागले म्हणजे साधारण ४५ वर्षे वगैरे झाली असतील तसे, एक जाणवते आहे की देशप्रेम, राष्ट्रप्रेम, राज्यप्रेम वगैरे हे जे काही आहे ना ते फक्त शिवाजी महाराजांच्या काळापुरतेच मर्यादित होते हो.  नंतर त्याचे काय झाले हे आता आपण पाहतोच आहे की.  हातच्या कंकणाला आरसा कशाला हवा आहे.  तसेही आपलेही थोडेसे चुकतेच आहे की !  म्हणजे सरकारने कितीही सोयी सुविधा करून दिल्या तरी आमची अजून ते वापरण्याची, त्यांची निगा राखण्याची ना आमची लायकी आहे ना आमच्यात सामजिक बांधिलकीची जाणीव आहे.  अहो ती तर, ते इंग्रज आले होते ना त्यांनी जातांना नेली नाही का त्यांच्या बरोबर !  असेही आम्ही गुलामच होतो की, आम्हांला कुठे काही अधिकार होते हो तेंव्हा.  अहो, असेच एक ताजे उदाहरण देतो ते म्हणजे ज्यांची स्वत:ची कवुत तर सोडा, पण ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक वाडवडिलांच्या पुण्याईवरही निवडून येण्याची लायकी नसतांना, आणि वयाची अजून तिशीही न ओलांडलेल्याचे धारिष्ट्य होते आणि ते आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेल्या बाबासाहेब पुरंदरे सारख्या वय वर्षे ९६ पूर्ण केलेल्या, शिवाजी महाराजांचा इतिहास जगलेल्या, थोर व्यक्तिमत्वास, तुम्हीं आता एकटे फिरू नका अशी धमकी देतात हो, काय अपेक्षा करणार ह्या शंडाकडून हेच मला समजत नाही. 

 

रोज रोज दूरचित्रवाणी वर बातम्यांच्यात एक अर्धवट चर्चा सत्र घडवून आणले जाते आहे, हे तर म्हणजे राजरोसपणे आपल्या अस्मितेवरचा घालाच आहे असे वाटायला लागले आहे.  तुम्हीं म्हणाल की मग बातम्या पाहू नका.  अगदी योग्य सुचवलेत हो.  जर पत्रकारिताच विकली गेली आहे आणि तिचा बाजारच उठवायचं ठरवलं आहे तर सर्वसामन्य माणूस करणार तरी काय.  रोज कोणीतरी एक नवीन प्रवक्ता दूरदर्शन वाहिनी वर चर्चासत्रात पाठवून आपली किती छान करमणूक करत असतात हो ! मला तर ना कधी कधी आपले आदेश बांदेकर भाऊच्या पैठणीचे कार्यक्रम ह्या सगळ्या पेक्षा चांगले वाटतात.  कारण ते निदान पैठणी तरी देतात आणि वर प्रसिद्धीही नक्की देतात हो. 

 

सरकारने कसे, काय करायचे ते मात्र माझ्यासारख्या सर्वसामन्य माणसाच्या काही लक्षातच येत नाही.  आणि आले तर त्याची दिशाभूल करायला ही निवडक प्रवक्त्यांची टोळी प्रत्यके पक्षाने बहुतके पोसलेलीच असावी असे वाटले तर त्यात नवल काही नाही.  आणि हो त्यात, बरेचसे विचारवंत (म्हणजे ते थोर विचारवंत आहे हे त्यांनीच ठरवले असते) आजकाल ह्या सगळ्या वाहिन्यांच्या पाचवीलाच पुजलेले असल्यासारखे ह्या वाहिन्यांवरून वावरतांना दिसतात.

 

एकंदरीत काय तर ही सगळी शोकांतिका आपली समोर मांडण्याचे एक प्रयोजन नक्की आहे ते म्हणजे तुम्हीं आम्ही सर्वसामन्य माणसेच ह्या सगळ्या किड्यामुंग्यांसारखे भरडले जात आहोत.  वेळ जवळ आली आहे ती म्हणजे, समाज प्रबोधन करून आपल्यावर लादल्या जाणाऱ्या ह्या आश्वासंनाची बुलेट ट्रेन रोखण्याचे.  आजही आपल्या देशात जवळ जवळ ४०-४५% लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या  मुलभूत गरजा भागवता येत नाहीत त्या माझ्या देशाला खरी गरज काय आहे ते ओळखून योग्य त्या पायाभूत सुविधा जे कोणाचे सरकार असेल त्याने पुरवाव्यात ह्यातच आपल्या देशाचे आणि देशातील नागरिकांचे हीत आहे असे मला वाटते.  म्हणून हा लेख प्रपंच.

 

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०  

Tuesday 12 September 2017

एका तरुणीची जिद्दीची लढाई


एका तरुणीची जिद्दीची लढाई

 

माणसाचं आयुष्य म्हणजे समस्यांचे एक मोठे आगरच आहे असे कधी कधी वाटायला लागतं.  काही काही माणसांच्या नशिबातच कष्टच लिहिलेले असतात आणि आपल्या नशिबाचे भोग म्हणून ते मुकाटपणे भोगत आपले आयुष्य जिद्दीने जगतही असतात.  त्यावर दुसरा काही इलाजच नाही का असा एक प्रश्न मला कायमच पडतो व त्यावर उत्तर शोधण्याचा मी माझ्या परीने एक प्रयत्न करत राहतो.  त्यात ती जर का एखादी तरुण मुलगी असेल ना तर तिच्या आयुष्याची चाललेली ही फरफट मला पाहवतच नाही.  स्वत:साठी नाहीतर आपल्या आईबाबंसाठीची जगण्याची तिची धडपड आणि जिद्द पहिली की पुरुषांच्या फसव्या पुरुषार्थाची मला कीव येते व एक सत्य कथा माझ्या स्मृतीपटलावर तरळून जाते. दोन वर्षांपूर्वीची ही सत्य कथा आहे.  ही कथा आहे एका तरुणीची जान्हवीची (नाव बदलले आहे).  जिचे आज वय साधारण २४-२५ असेल.  आमच्या कार्यालयात ती हिशेबनीस विभागात कार्यरत होती. अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी, जिचे आम्हां सर्वांना खूप कौतुक होते आणि आहे.  एक दिवस ती माझ्या कडे आली आणि म्हणाली की सर मी आजपासून नोकरी सोडते आहे. मला राज्यस्तरीय परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. कामातून अभ्यासासाठी वेळच मिळत नाही, त्यामुळे आईबाबांनी सांगितले की तू नोकरी सोड आणि पूर्णवेळ अभ्यासाकडे लक्ष दे, कारण त्यांचे स्वप्न होते की तिने सरकारी नोकरीत उच्चपदावर काम करावे व स्वत:च्या पायावर उभे राहावे.  त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचे तिने ठरवले आणि नोकरी सोडून ती आता अभ्यासाला लागणार होती. 

 

काही दिवस गेले आणि जान्हवीच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. त्यांच्या घरात एकदम आनंदाचे वातावरण होते. ती ही एकदम खुशीत होती. अधूनमधून ती कार्यालयात येवून सगळ्यांना भेटून जात होती, स्वत:ची आणि तिच्या कुटुंबाची खुशाली कळवत होती.  परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते हे त्या बिचारीला तरी कुठे माहिती होते. काळाने त्यांच्या ह्या सुखी कुटुंबावर एकदम घावच घातला होता.  चांदणी चौकातून गाडीवरून जात असतांना तीच्या बाबांना अपघात झाला आणि जीवावरचे त्यांच्या पायावर निभावले होते.  पण ह्या एका घटनेने त्यांचे सर्व कुटुंबच उध्वस्त झाले होते.  दवाखान्याचा अवाढव्य खर्च झाला होता आणि बाबांचा चांगला जम बसलेला बांधकाम व्यवसाय बंद पडला होता.  सर्व कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडले आणि त्यातून काही मार्गच निघत नाही असे त्यांना वाटायला लागले.  कुटुंबावर कोसळलेल्या ह्या गंभीर परिस्थितीची जान्हवीला जाणीव होती.  आई बाबांसाठी तिचा जीव तळमळतही होता.  त्यात भरीला भर म्हणून की काय तिच्या भावाने ह्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून एक दिवशी सांगितले की तो आणि त्याची बायको आता हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार आहोत कारण ह्यापुढे तुमची कुठलीही जबाबदारी घेण्याची आमच्यात ताकद नाही.  तुमच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे आमचे सुखाचे दिवस हरवले आहेत.  आम्हांला आमचा संसार उभा करायचा आहे त्यामुळे तुमचा आमचा संबध आजपासून संपला.  जान्हवीला जाणवले की, हे सगळे तिचा भाऊ जे बोलतो आहे ते तो केवळ तिच्या वाहिनीच्या सांगण्यावरून बोलतो आहे, नाहीतर तो आईबाबांशी असे वागूच शकणार नाही.  तिला त्याचा स्वभाव चांगलाच माहिती होता. तिला त्याचा त्याक्षणी खूप रागही आला होता आणि त्यांच्या स्वार्थी व फसव्या पुरुषार्थाची कीवही करविशी वाटली.  तिला वाहिनीरुपी एका स्त्रीची चीडही आली.  एक स्त्रीच आपल्या आणि आईबाबांच्या विरुद्ध कुटुंबाच्या अशा हलाकीच्या परिस्थितीतही जर का असे वागत असेल तर आपल्या नशिबालाच दोष देण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय तिच्या समोर नव्हता.  जान्हवीने आईबाबांच्या डोळ्यात पहिले, त्यांची ती केविलवाणी अवस्था आणि हतबलता तिला सहन झाली नाही.  तिने मनाशी ठरविले की ह्या परिस्थितीतून आईबाबांना बाहेर काढणे खूप गरजेचे आहे व त्यांना ह्या परिस्थितीतून फक्त तीच पुन्हा ताठ मानेने उभे करू शकते.  तिच्या मनाने तसा तिला कौल दिला आणि तिने एका क्षणात अतिशय संयमाने आपल्या भावाला व वाहिनीला ताबडतोब घरातून बाहेर पडायला सांगितले.  जान्हवीने परत एकदा आईबाबांकडे पहिले, त्यांच्या नजरेला नजर भिडवली आणि त्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा सार्थ अभिमान पाहून तिने अश्रूंना वाट करून दिली व स्वत:च्या रागावर नियंत्रणही मिळविले.

 

वेळ कोणासाठी थांबत नाही आणि घेणारे हात जरी थकले तरी देणारे कधीही थकत नाहीत हेच खरे. जान्हवीच्या पुढे आता दोनच मार्ग होते एक म्हणजे पुन्हा नोकरी करायची आणि काही काळापुरते राज्यस्तरीय परीक्षेचे स्वप्न गुंडाळून ठेवायचे.  तिने ठरवले की पुन्हा नोकरी करायची आणि आईबाबांना ह्या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर काढायचे, अपघातात निकामी झालेल्या त्यांच्या पायावर उत्तम वैदयकीय उपचार करून त्यांना जयपूरफुट बसवून पुन्हा उभे करायचे व त्यांचा ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय पुन्हा उभा करायला आईच्या साथीने मदत करायची.  मला जान्हवीचे कौतुक एका गोष्टीसाठी करावेसे वाटते की तिने हे सगळे निर्णय एका क्षणात आपल्या मनाशी पक्के ठरवून घेतले होते, ज्यासाठी तिला तिच्या आयुष्याची ऐन उमेदीची काही वर्षे खर्ची टाकावयास लागणार होती.  नियतीचा खेळ किती अजब आहे नाही.  एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू पहा ना. एकीकडे स्वत:च्या सुखी संसारासाठी आईबापांना लाथाडून गेलेला एक मुलगा आणि दुसरीकडे स्वत:च्या भविष्याचा विचारही न करणारी त्याचं आईबापाची ही मुलगी.  बहुधा देवच देत असावा असे बळ आणि बुद्धी ह्या मुलींना.  पण एक विचार मनाला चाटून जातो की, तिच्या भावाची बायकोही कोणाची तरी मुलगीच आहे ना ! अशा प्रतिकूल परिस्थितीत आपल्या नवऱ्याला साथ देण्याची व सासू सासऱ्यांना सांभाळण्याची देवाने तिला का नाही हो अशी बुद्धी दिली !  कदाचित मुलींवरील घरोघरी होणाऱ्या संस्कारांचाही हा एक भाग असावा असे मला तरी वाटते.  व्यक्ती तितक्या प्रकृती.  असो.

 

जान्हवी पुन्हा आमच्या कार्यालयात येऊन संचालकांना भेटते व सर्व परिस्थिती सांगते.  मोठ्या मनाने संचालक मंडळ जान्हवीच्या जिद्दीची प्रशंसा करून तील पुन्हा कामावर घेतात आणि जान्हवीच्या ह्या जिद्दीच्या लढाईचा दुसरा भाग चालू होतो.  दीड वर्ष ती नेटाने नोकरी करते व बाबांना आईच्या साथीने स्वत:च्या पायावर जयपूरफुट लावून उभे करते.  हळू हळू ते त्यांच्या बांधकाम व्यवसायात लक्षही घालू लागतात.  जान्हवी त्यांना तिच्या कामाच्या व्यापातून व्यवसाय उभारणीस मदतही करते आणि आश्चर्य म्हणजे त्यांचा ह्या व्यवसात पुन्हा एकदा जम बसू लागतो.  जान्हवीच्या अथक परिश्रम आणि जिद्दीपुढे नियती हात टेकते व त्यांच्या कुटुंबावर आलेले मळभ हळू हळू दूर होते.  काळ बदलतो फक्त त्यासाठी संयम, चिकाटी, निष्ठा आणि आत्मविश्वास असावा लागतो हेच जान्हवी सारखी एक तरुण मुलगी आपल्याला शिकवून जाते.

 

मी माझ्या कामात गुंग असतांना आज जान्हवी मला परत एकदा दीड वर्षांनी भेटायला माझ्या कचेरीत येते तीच मुळी अश्रूंनी डबडबलेले डोळे घेवूनच. मला दोन मिनिटे काहीच सुचत नाही.  माझ्या डोळ्यासमोर तिचा तो वर सांगितलेला भूतकाळ तरळतो.  मी स्वत:ला चिमटा काढतो व मनातल्या मनात स्वत:स एक शिवी घालतो की, अरे असेल काहीतरी चांगले कारण, उगाच कशाला वाईट विचार करतो ! मी जान्हवीच्या बोलण्यामुळे भानावर येतो, जान्हवी मला सांगते की सर आता माझ्या घरच्या सगळ्या समस्यांवर आम्ही मात केली आहे व सगळे कसे स्थिरस्थावर झाले आहे.  त्यामुळे मी आज पुन्हा एकदा नोकरी सोडून चालले आहे.  तुम्हां सगळ्यांचे मला दिलेल्या साथीबद्दल आभार मानायचे आहे आणि तुमचा आशीर्वादही हवा आहे, म्हणून मी तुम्हांला भेटायला आले आहे.  सर मी परत एकदा राज्यस्तरीय परीक्षेचा अभ्यास करून त्यात यश मिळवून माझ्या आईबाबांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.  अगदी प्रामाणिकपणे सांगतो की त्या क्षणाला मला जान्हवीला साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. केवढीशी ही पोर अजून तिचे लग्नही झालेले नाही, त्याचा विचारही तिच्या मनाला अजून शिवत नाही आणि ही वेडी आपल्या आईबाबांच्या संसारासाठी त्यांच्या सुखासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करते आहे हे पाहून माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि आपसूकच माझे हात तिच्या मस्तकावर सदा सुखी रहा असे आशिष देवून गेले.  धन्य ती जान्हवी, धन्य तिचे आई बाबा आणि धन्य तो कर्ता करविता, असे म्हणून मनोमन मला जान्हवीच्या ह्या जिद्दीला ह्या लेखाद्वारे त्रिवार कुर्निसात करावासा वाटला.

     

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०
हा लेख चपराकच्या ११ ते १७ सप्टेंबर २०१७ ह्या साप्ताहिकात प्रकाशित करण्यात आला आहे.    

 


 

Friday 1 September 2017

डॉल्बीचा किस्सा



काल ३१ ऑगस्ट २०१७, सात दिवसांच्या गणपतींचे म्हणजेच गौरी-गणपतीचे विसर्जन होते. अगदी नेहमीप्रमाणे सर्व गणेशभक्त घरचे आणि मंडळांच्या गणपती विसर्जनासाठी महानगरपालिकेने बांधलेल्या विसर्जन हौदात मोठ्या मनोभावाने विसर्जन करत होते. संध्याकाळी आठ पर्यंत हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने चालेलेले होते हो. मी धनकवडीला टेलिफोन कार्यालयासमोर राहतो आणि माझ्या घरापासून साधारण २०० मीटर वर मुख्य चौकात महानगरपालिकेने विसर्जन हौद बांधला आहे. तिथे नेहमीच विसर्जनासाठी गर्दी होते. परंतु वाहतुकीस कुठेही अडथळा न येता सगळे कसे आपले पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी झटून काम करून जबाबदारीने हे विसर्जन पार पाडत असतात. त्या बिचाऱ्यांची ह्या गणेशभक्तांच्या भावना वगैरे दुखवल्या जाण्याची एक अदृश भीती मला त्यांच्या चेहऱ्यावर कायम भासत असते.


अहो पण नमनाला घडाभर तेल का घातले ते सांगतो. साधारण रात्री ८ नंतर आमच्या भागातील मोठ्या मंडळांच्या मिरवणुका येण्यास सुरवात झाली. साधारणपणे काही मंडळांच्या गणपती पुढे एक ढोलताशा पथक, वाद्यवृंद पथक, तसेच ह्या मंडळांची सर्वात आवडती डॉल्बी तर होतीच. एक वेळ अशी आली की एका वेळेस साधारण तीन ते चार मंडळे रस्त्यावर एकाच वेळेस आल्यावर त्यांच्या आवाजाची जी काही पातळी गाठली होती ना ती की विचारूच नका. ढोलताशा पथक एक कुठला तरी ताल वाजवत होते, कोणी त्यांचा झेंडा नाचवत होते, तर वाद्यवृंद आरे दिवानो मुझे पहचानो हे गाणे वाजवत होते तर डॉल्बीबर शांताबाई, बाबुराव, आतामाझी सटकली, झिंग झिंगाट, अशी सगळी गाणी वेगवेगळ्या डॉल्बीवर एकत्रितपणे वाजत असल्यामुळे जो काही गोंधळ चालेला होता ना तो तर म्हणजे आपल्या समाजाला ठरवून बहिरे आणि ठार वेडे करण्याचा एक सामाजिक उपक्रमाच वाटला मला. त्यात आपल्या सरकारने त्यांच्या ह्या लाडक्या गणेश भक्तांसाठी मिरवणुकीतील वाद्ये वाजवण्याची मुदत रार्त्री दहाच्या ऐवजी बारा केली होती ना ! 

आमच्या सारखे वेडे साधारण ९ ते ९.३० दरम्यान जेवण करून थोडेसे वाचन करत झोपावे असे ठरवले तर, ह्या मंडळांच्या मिरवणुकीने गाठलेली आवाजाची अतिउच्च पातळीने कहरच केला. आमच्या परिसरातील सगळ्यांच्या घराच्या दारे आणि खिडक्यांची तावदाने इतकी हादरत होती की कुठल्याही क्षणी निखळून पडतील असेच वाटत होते. एक वेळ अशी आली की ही चारही मंडळे एकाच ठिकाणी आली आणि त्यांनी तर आवाजाचा इतका कहर करून आसमंत दणाणून सोडला इतका की आमच्या तर छातीत धडधडायला लागले. शेवटी आम्ही सगळी दारे खिडक्या लावून घेतले आणि झोपायचा निष्फळ प्रयत्न केला. ह्या गडबडीत रात्रीचे बारा वाजले आणि आमची ह्या आवाजी बलात्कारातून सुटका झाली. पण खरी गमंत पुढेच आहे.

सकाळी उठलो आणि कामावर जायला निघालो तर, घराचे दार उघडायलाच तयार नाही. म्हणजे माझ्या बैठ्या घराला पढे आणि मागे दार आहे. त्यात पुढच्या दाराला दोन दारे आहेत. बाहेरील सुरक्षेसाठी एक दार ते आम्ही आधी आतून बंद करतो त्याला ल्याच आहे आणि त्यानंतर आतले लाकडी दार बंद करतो. नेहमीप्रमाणे ह्या दोन्ही दारांना आतून कडी लावून काल रात्री आम्ही झोपलो होतो. परंतु आवाजाची पातळी एका क्षणी इतकी वाढली होती की आमच्या आतल्या दाराची बाहेरील कडी एकंदरीत हादर्यांमुळे आपोआप लागलेली होती. मी सकाळी प्रयत्न केला, बायकोने पण प्रयत्न केला पण आम्ही हार मानली. काही केल्या दार उघडेनाच. तरी एक बरे आमचे बैठे घर असल्यामुळे आम्ही आमचा आजच्या दिवसापुरता सगळा व्यवहार मागील दराने केला. संध्याकाळी घरी आलो. सुताराला बुलावा धाडला. एक शेवटचा प्रयत्न म्हणून एक पातळ काठीने बाहेरील दाराच्या फटीतून हात घालून आतील दाराची बाहेरून लागलेली कडी काढण्याचा प्रयास साधारण एक तास भर केला. शेवटी एका लहान मुलीला बोलावले. तिच्या हातात ती पातळ काठी देवून ती कडी काढण्याच्या आमच्या प्रयत्नांना शेवटी यश आले आणि आमची आमच्याच घरातून सुटका झाली.

हा विषय इथे मांडण्याचा माझा आग्रह एवढ्याच साठी आहे की ह्या डॉल्बीच्या आवाजाच्या पातळी मुळे अजून काय काय होत असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. अहो घरात नुकतीच जन्माला आलेली तान्ही बाळे असतात. म्हातारी कोतारी माणसे असतात. त्यांना ह्या सगळ्याचा किती त्रास होत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही हो. हे कुठेतरी थांबविले पाहिजे असे मला वाटते. समाजप्रबोधन करून हे सगळे मंडळांच्या पुढाकारानेच बंद केले पाहिजे असे मला वाटते. सगळेच जर का आपले सर्वोच्च न्यायालय ठरवायला लागले तर आपण नागरिक म्हणून आपले काहीच कर्तव्य राहणार नाही असे मला वाटते. बुद्धीच्या देवतेची आराधना करतांना आपण आपली बुद्धीच कशी हो गहाण ठेवू शकतो ! म्हणून माझे सर्व गणेशभक्तांना, मंडळांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, राजकीय, सामाजिक कार्य करण्याऱ्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपली संस्कृती जपा. तसेच आवाजाचे आणि पाण्याचे प्रदूषण करून आपल्या येणाऱ्या भावी पिढ्यांच्या समस्या वाढवू नका.

गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या आणि आम्हां गणेश भक्तांना सुबुद्धी द्या.

रविंद्र कामठे