Wednesday 28 August 2019

गणपती बाप्पा २०१९

शिवरायांचा हा मावळा आजच तयार झालायं रंगवून. पर्यावरणाच्या चाललेल्या ह्रासाने व एकंदरीतच ध्वनी, वायू आणि पाण्याच्या प्रदूषणाने थोडासा त्रस्तही झालेला दिसत होता. डोळे वटारुन बघत होता. मला म्हणाला यंदाच्यावर्षीही तू माझे विसर्जन बादलीतच करशील आणि विरघळल्यावर माझी परत एखादी छान मुर्ती घडवशील! घे माझी शप्पथ! मी बाप्पाला म्हणालो, शप्पथ कशाला रे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे तर माझे कर्तव्यच आहे रे. मला जशी बुध्दी दिलीस ना तशीच सगळ्यांनाच दे रे बाबा. नाहीतर लवकरच तुझे बाबा रागावून तिसरा डोळा उघडून सगळे भस्मच करतील ! हो ना रे. असेही तुझे बाबा तर ह्या आमच्या पृथ्वीवरील तुझ्या भक्तांचे हे वंगाळ, चिंबाळ नाच बघून त्यांचे तांडव नृत्यही विसलेत की काय असेच वाटायला लागले आहे मला. असो. तू मात्र येशील तर स्वतःची काळजी घे. येतांना रेनकोट, स्वेटर, मफलर, कानटोपी, पायमोजे, हातमोजे, घेवूनच ये. तसेच कानात घालायला चांगल्या दर्जाचा ध्वनीरोधक कापूस आणायला विसरु नकोस. पार्वती आईला सांगून तीच्याकडून त्रिफळा चुर्ण आणायला विसरू नकोस म्हणजे भेसळयुक्त प्रसादाचा त्रास होणार नाही. शंकरबाबा चिडतीलच; कशाला जातो पृथ्वीवर म्हणून! त्यांची आमच्या वतीने समजूत घालून एवढे ह्या वर्षीचा गणेशोत्सव दिमाखात साजरा करण्याची परवानगी घेवून ये! त्यांना सांग, ह्यावर्षी जर आंम्ही उतमात केला तर पुढच्यावेळेस आंम्हाला परवानगीच देवू नका. काय तुंम्हांला प्रलय, महाप्रलय वगैरे आणायचा असेल तो आणा म्हणावं. बरं चल तुला उशीर होईल. चांगला दहा दिवसाचा मुक्काम आहे आमच्याकडे त्यामुळे तयारीला वेळही लागेल ना! आरे, आंम्हालाही तयारी करायचीयं ना तुझ्या आगमनाची, प्रतिष्ठापनेची. चल भेटूच या सोमवारी २ तारखेला गणेश चतुर्थीला. तुझा परमभक्त रविंद्र कामठे.

Wednesday 14 August 2019

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण “श्रद्धांजली”.

कै. संजय अर्जुनराव काळे ह्या माझ्या आत्येभावाला माझी भावपूर्ण श्रद्धांजली”.

आज १३ ऑगस्ट २०१९ रोजी फुरसुंगीला संजूच्या दशक्रियाविधीला गेलो होतो तेंव्हा तिथे चाललेल्या संत वाड:मयाच्या प्रवचनाने ह्या सगळ्या दु:खातून माझे मन थोडे स्थिरस्थावर होता होता अचानक बालपणात गेले. संजू माझा आत्येभाऊ. घरची परिस्थिती अत्यंत गरीब ! त्यामुळे पोरगं वाया जाऊ नये म्हणून माझ्या चुलत्यांनी आणि वडिलांनी त्याला आमच्याबरोबर शिकायला पुण्यातल्या शाळेत घातला व शिकवला मोठा केला.  किती मोठा केला, त्याचा किती कीर्तिमान होता हे बघायला आज जर माझे वडील आणि अण्णा (चुलते) असते तर एवढ्या दु:खातही त्यांची मान अभिमानाने ताठ झाली असती.
संजूने कमावलेल्या माणुसकीमुळे व त्याच्या सामाजिक कार्यामुळे ४ ऑगस्ट २०१९ रोजी त्याच्या अंत्यविधीला पुरंदर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे हजर होते व त्यांनी संजूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्याच्या कार्याचा गौरव केला होता. भेकराईनगरगंगानगरफुरसुंगीसासवडसोनुरीलोणी काळभोरहडपसर इत्यादी परिसरातील व पंचक्रोशीतील उपस्थित नगरसेवकसरपंचउपसरपंचनातवाईकआप्तेष्टमित्रमंडळी, तसेच भारत संचार निगमचे त्याचे सहकारीअधिकारी व इतर जनसमुदाय ह्यावरून त्याच्या कार्याची प्रचीती येत होती.
संजूला श्रद्धांजली वाहतांना बऱ्याच वक्त्यांनी त्याने अगदी बालपणापासून ते वयाच्या ५७ वर्षापर्यंत केलेला संघर्ष अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केला हे विशेष.  ह्या वक्त्यांनी जेंव्हा अगदी गहिवरून येत आपापल्या भावना व्यक्त केल्या तेंव्हा एवढ्या माणसांच्या गर्दीत मी सुद्धा आमच्या बालपणातील संजू बरोबर व्यतीत केलेल्या त्या अविस्मरणीय स्मृतीमध्ये कधी गेलो ते माझे मलाच कळले नाही.
पुण्या जवळील सोनुरी गावतल्या अर्जुनराव (माझे काका-अप्पा) आणि काशीबाई (म्हणजे आत्या) ह्याचा हा एकुलता एक मुलगा.  त्याला तीन बहिणी. घरची गरिबी. सोनुरीतील कोरडवाहू जमिनीत उदरनिर्वाह होणे कठीण म्हणून अप्पांनी मांजरी स्टड फार्म मध्ये नोकरी पत्करली. एक खोली. चारच भांडी. तीन दगडांची चूल. असा माझ्या आत्याचा संसार मी माझ्या बालपणी ह्याची देही ह्याची डोळा खूप वर्षे पहिला आहे.  आम्ही दिवाळीत भाऊबिजेला आत्याकडे दरवर्षी जेवायला जायचोच जायचो.  बिचारी कर्ज काढून आमच्यासाठी मटणाचे जेवण करायची व तितक्याच अगत्यानेप्रेमाने जेवू घालायची.
आमच्या अण्णां-काकूने आणि माझ्या आई-वडिलांनी संजूच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली व त्याला आमच्या बरोबर पुण्यातल्या शाळेत प्रवेश घेतला होता.  त्यानेसुद्धा ह्या संधीचा खूप चांगला फायदा करून घेतला व दोन्ही मामांचे नाव काढले (त्याची प्रचीती आज आम्हांला सुद्धा आली आणि आपसूकच डोळे पाणावले).  संजू, शिकला, पदवीधर झाला.  परत सोनुरीला गेला. काही दिवस शेती सुद्धा केली व शेवटपर्यंत करतही होता.
आता त्याला वेध लागले होते ते आपल्या एक एका बहिणीच्या लग्नाचे आणि आपल्या माय-माऊली आई वडिलांना सुखी जीवन दाखवण्याचे.  एक सांगतो अप्पा आणि आत्या सारखी प्रेमळ, मायाळू, निष्पाप, माय-माऊली मी आजवर पहिली नाही !
संजूने दिवस रात्र मेहनत केली. त्याला सुकट-बोंबील विक्री करण्याचा एक चांगला व्यवसाय मिळाला.  त्याने तो अगदी नेटाने केला त्याच्या जीवावर फुरसुंगीमधील गंगानगर मध्ये आधी भाड्याने घर घेतले.  तसेच सरकारी नोकरीच्या परीक्षा देत देत चक्क भारत संचार निगम मध्ये टेक्निकल केडर मध्ये नोकरीला लागला व अभियंता पदापर्यंत पोचलो.  पठ्ठ्याने एवढी मानाची नोकरी मिळाली तरी आपला व्यवसाय सोडला नाहीकारण ह्या व्यवसायाने त्याला त्याच्या पडत्या काळात फार मोलाची साथ दिली होती.  त्याला व्यवसायाची कधी लाज नाही वाटली.  त्याला कल्पना सारख्या अतिशय कष्टाळू व सुशील बायकोची संसाराला साथ मिळाली. त्याच्या सासऱ्यांना आणि मेव्हण्याला सुद्धा संजूचा फार अभिमान होता. ह्या व्यवसायाच्या आणि नोकरीच्या जीवावर त्याने स्वत:चे दोन मजली घर बांधले आहे. दहा पंधरा वर्षांपूर्वी जेंव्हा केव्हा आम्ही त्यांच्या कडे जात असू तेंव्हा संजूला सायकलवर पिशव्या लावून घरोघरी सुकट-बोंबील विक्री करायला अगदी निर्भीडपणे जातांना पहिले आहे.  उदिष्ट गाठण्याच्या त्याच्या ह्या ध्यासामुळे माझ्यासाठी संजू एक आदर्श होता. त्याने आपल्या दोन्ही मुलांना सुमित आणि सौरभला उच्च शिक्षित केले.  नुकतेच सुमितचे लग्नही चौफुल्याच्या पाटलांच्या मुलीबरोबर लावून दिले व त्यांना चक्क जर्मनीत नोकरी करून तिकडे आपला संसार थाटण्याची संधी दिली.  सौरभला मामाच्या साथीला व्यवसायाला जोडून दिले. असे सगळ्यांचे सगळे म्हणजे भावा बहिणीचे, संसार बैजवार लावून दिल्यावर आता कुठे जरा आराम करून लवकरच येणारे ते सोन्याचे, आनंदाचे दिवस उपभोगायचे सोडून, ही स्वारी मनाला चटका लावून चक्क स्वर्गातच निघून गेली.
त्यामुळेच आज मलाच काय पण आम्हां सर्व भावंडांना लहानपणीच्या आठवणी एकदम ताज्या झाल्या.  आमच्या पुलाच्या वाडीत आम्ही सर्व भावंडानी आणि सवंगड्यानी (मीसाधनाताईकै.अमोलसुलभा-माईराणीकिशोरसंदीपबगाडेंच्या रेखासंध्याशैला व संजू कामठ्यांचा नंदू आणि घनश्याम, इंगळ्याचा संजयराहुलकिरणसचिनभारती,रोहिणीशिवल्यांचा सुनीलअनिलबाळू, शेळके, पोखरकर, चव्हाण, शेवकरी, निगडे, इत्यादी सवंगडी) खूप धमाल मज्जा केली आहे. ते दिवस आजही माझ्या स्मृतीपाटलावर ताजे आहेत.  त्यात माझे आणि संजूचे खास जमायचे. आम्ही तसे समवयस्कच होतो. आमची नर्मदा आजी तर आम्हां दोघांना खूप जीव लावायची.  तिच्या शेळ्या आणि कोंबड्या साभाळायचो. आम्हांला थंडीत गरम पाण्याने अंघोळ करायची असायची. तेंव्हा चक्क एक एक पोतं पाठीवर टाकून आम्ही दोघं डेक्कनवरील दिघ्यांच्या गुऱ्हाळातून (आता तिथे म्याकडोनाल्ड झालयं) उसाची चिपाडे आणायचो.  आम्ही मुठेच्या काठचे पुलाच्या वाडीचे रहिवासी. त्यात सगळ्यांचीच अगदीच बेताचीच परिस्थिती असलेले पण अतिशय सुखीसमाधानी,स्वाभिमानी आणि अभिमानी कुटुंबे गुण्या गोविंदाने रहात होतो.  संजू सर्वात मोठा होता आणि आमचा म्होरक्या होता. श्रावणात आणि गणपतीत तर आमच्या एवढी धमाल कोणी कधी केलीच नसेल हे मी ठाम पणे सांगू शकतो. कधी कधी संजूच्या गमती जमती मुळे मारही खाल्लाय आम्ही. खूप खूप आठवणी आहेत आमच्या संजूच्या.
तुम्हीं म्हणाल ह्या संजुबद्द्ल तुम्हीं आज एवढे का लिहिताय ! त्याचे कारण आपल्याकडे एक म्हण आहे जगावे परी कीर्तीरूपे उरावे”, ह्या म्हणीचा सार्थ अर्क म्हणजे आमचासंजू होय.
आज जेंव्हा त्याला श्रद्धांजली वाहण्याची माझ्यावर वेळ आली तेंव्हा शब्द थिटे पडू लागले होते.  मोठ्या प्रयासाने व मनावर दगड ठेवून मी माझे हे मनोगत लिहित आहे.
हे मनोगत अथवा श्रद्धांजली लिहिण्याचा एकमेव उद्देश म्हणजे संजू सारखे आदर्श सध्याच्या काळात निर्माण व्हायला हवेत.  आपल्या काही नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळीना संजूच्या दु:खद निधनाची बातमीही मिळू शकेल व त्याच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी होता येईल व त्यांचे थोडे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करता येईल. तसेच आपल्यातच दडून बसलेल्या अजून काही संजुना शोधून काढून त्यांना योग्य वेळी योग्य ती साथ देता येईल. असे अनके संजू तयार होतील, अशी भोळी भाबडी आशा. ईश्वर संजूच्या आत्म्यास शांती लाभू देत व त्याच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती दे.
शेवटी;
काय म्हणायचं हो ह्या नियतीला ! २०१५ पासून ती एका मागून एक घावच करत सुटली आहे.  आधी थोरला चुलत भाऊ अमोल (वय ३०) निधन पावला. त्याला जावून जेमतेम सहाच महिने होत नाहीत तोवर शालन काकू (माझी चुलती- वय ७०) त्याच्या वियोगाने गेली. वर्षभराने चुलत बहिणीचा सुधाचा थोरला मुलगा निलेश (वय ४२)ला देवाज्ञा झाली. त्यानंतर वर्षभरात मामे बहिण शोभा (वय ५५) किरकोळ आजाराने जवळ जवळ एक महिनाभर मृत्यूशी झुंज देता देता नशिबापुढे हरली.  मधेच २०१७ला माझापण (वय ५५) नंबर लागला होतापरंतु काळ आला होता पण वेळ नव्हती आली”. शोभाला जावून एक वर्ष होत नाही तोवर मामे भाऊ प्रदीपचे (वय ५५) अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.  ही दु:ख कशी बशी झेलत झेलत थोडा स्वास घेतो ना घेतो तोच चुलत बहिण सुधाचाच धाकटा शैलेश (वय ३५) हृदयविकाराच्या झटक्याने देवाघरी गेला. मती गुंग करणारा हाच तो गेल्या चार वर्षांचा काळ त्यावर ४ ऑगस्ट २०१९ रोजी माझ्या आत्येभावाने म्हणजे संजय अर्जुनराव काळे (वय ५७) ह्याने कळसच चढवला आणि आम्हां सगळ्यांना दु:खाच्या खोल खोल दरीत ढकलून स्वत: निमुटपणे देवाघरी निघून गेला.

थकला हो जीव माझा माझ्याच आप्तेष्टांनाच अशी श्रद्धांजली वाहून वाहून !

नेला आहेस रे देवा तू आम्हां सर्वांच्या काळजाचा ठेवा,
चिरंतन शांती लाभू दे त्यांच्या आत्म्यास देवा ||

ओम शांती ~ ओम शांती ~ ओम शांती

रविंद्र कामठे 

Tuesday 6 August 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – आगीतून उठून फुफाट्यात

अनुभवाच्या शिदोरीतून – आगीतून उठून फुफाट्यात
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग ५ वर्षे केली.  परंतु रोज ७०-८० किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका प्याकेजिंग मशीन बनवणाऱ्या कंपनीत १९९४च्या सप्टेंबरला रुजू झालो.  चांगला दीड वर्ष म्हणजे १९९६ पर्यंत मस्त रुळलो होतो.  मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता.  कलकत्ता, दिल्ली, चंडीगड, महाराष्टभर माझी फिरतीही चालू होती. 
१९९६ला मी एक जुनी फियाट गाडीही घेतली होती.  ही गाडी म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली चार चाकी होती.  जुनी का होईना पण त्याकाळी चार चाकी गाडी असणारा आमच्या खानदानातील आणि मित्रमंडळीतील मी एकमेव होतो. खूप धमाल करत होतो आम्ही त्या काळी.  फियाट गाडी आल्यापासून तर आम्ही भिंगरी सारखे फिरत होतो.  जरा सुट्टी मिळाली की चालले फिरायला ! आख्खे कोकण त्याकाळी पिंजून काढले होते त्यावेळेस. 
ह्याच कंपनीत काम करणाऱ्या माझ्या दोन सहकारी मित्रांनी सोलर सेल बनवण्याची एक कंपनी, कंपनीच्या मालकांच्या मदतीने काढली होती व मला त्या कंपनी मध्ये येण्याची विनंती केली होती, जी मला टाळता आली नाही व मित्रांच्या सोलरच्या कंपनीत रुजू झालो.
अमेरिकेच्या अक्षय उर्जास्तोत्र साठीच्या औद्योगिक मदतीच्या धोरणा नुसार ह्या सोलर कंपनीच्या प्रकल्पाला काही अनुदान मिळाले होते.  प्रकल्प खरचं खूपच चांगला होता.  अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर केलेल्या चाचणीनुसार प्रयोगशाळेत अतिशय उत्तम रित्या सोलर सेल बनवण्यात ही मंडळी यशस्वी झाली होती आणि म्हणुनच त्यांना भारतात ह्या सोलर सेलचे उत्पादन करण्यास सांगण्यात आले होते.  ह्या प्रकल्पासाठी लागणारी जागा पाच वर्षाच्या भाडेपट्टीवर सिंहगडरोडवर सध्याच्या राजाराम पुलाजवळ मिळाली होती.  बाकी मशीन आणि इतर सामुग्री एक एक करून बनवून घेण्यात येणार होते व त्यासाठी लागणारा पैसा हा काही प्रमाणात अमेरिकेच्या मदतीने मिळणार होता व काही कंपनीच्या संचालकांच्या गुंतवणुकीतून येणार होता. 
एकंदरीत हा प्रकल्प फारच आशावादी होता व यशस्वी झाला तर भारताचे नाव तर उज्वल करणारा होता तसेच आमचे सगळ्यांचेही भवितव्य घडवणारा होता.  पण त्याचे काय आहे ना, आपण जे समजतो, योजतो, ठरवतो, कल्पना करतो, प्रयोजन करतो आणि स्वप्नरंजन करतो अगदी तसेच घडले तर काय?
१९९६ ते ११९७ हे एक वर्ष सर्व योजना सूत्रबद्ध पद्धतीने आखून ती नीटपणे प्रत्यक्षात उतरवण्यात गेले. खरी कसोटी होती ती ह्या प्रकल्पास लागणाऱ्या यंत्र सामुग्रीची. योग्य ती साधनसामुग्री पुण्यातच बनवून घेण्यात आली.  सोलर सेल बनवण्यासाठीचा कच्चा माल म्हणजे (विशिष्ट) प्रकरच्या काचा, सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईड, तसेच खासकरून बनवलेली ग्राफाईटची आणि चांदीची पेस्ट अमेरिकेहून मागवण्यात आल्या.  आता फक्त ह्या मशीनची चाचणी घेणे व लवकरात लवकर उत्पादन करणे एवढेच राहिले होते.
एक भले मोठे हवेची पोकळी असलेले मशीन बनवण्यात आले होते त्यात ह्या १०० X १०० मिलीमीटरची विशिष्ट पद्धतीने स्वच्छ केलेली एक एक काच एका मागून एक अशी एका पट्ट्याद्वारे सोडायची.  ही एक एक काच एका विशिष्ट ठिकाणी आली की साधारण ७०० डिग्री तापमानावर तापवलेल्या सोडियम सल्फाईडचा तिच्यावर एक नाजूक थर दिला जायचा व तीच काच पुढे तशीच पुढे जावून पुन्हा एकदा ७०० डिग्री तापमानावर तापवलेल्या कॅडमियम टेलूराईडच्या थराने भरायची व तशीच मशीन मधून पुढे जायची.  असे एका मागून एक १०० काचा गेल्या की हे मशीन बंद करायचे व ते थंड झाले की ह्या काचा काढून घेऊन पुढील प्रक्रिया करायला म्हणजे ग्राफाईटचा एक थर लावायला पाठ्वायाचा.  तो थर झाला की शेवटी चांदीचा थर लावायचा.  त्यांनतर लेझरने काही विशिष्ट खुणा केल्या जायच्या, ज्यामुळे हा सोलर सेल तयार व्हायचा.  तो तयार झाला की प्रयोगशाळेत त्याची तपासणी करायची व त्या नंतर तो विक्रीसाठी तयार केलेल्या वेष्टनात गुंडाळून ठेवायचा.  इतके साधे आणि सोपे गणित होते.
पण आमच्या अथक प्रयत्नांना ह्या सगळ्यात कधीच यश आले नाही.  कधी कधी काचा आतल्या आत फुटायच्या, तर कधी तापमान प्रचंड वाढून काचा मशीन मधेच वितळून जायच्या.  सुरवातीच्या वर्ष दीड वर्षे हे सगळे असेच चालू होते. 
माझ्या ह्या उत्पादन विभागात आधी फारच थोडा सहभाग असायचा. पण नंतर नंतर काही इंजिनियर मंडळी कंटाळून सोडून जायला लागली व प्रकल्पाच्या कामावर त्याचा वाईट परिणाम व्हायला लागला. मग काय, “जिथे कमी, तिथे आम्ही”, ह्या संकल्पनेनुसार माझ्यावरही रात्रपाळीच्या उत्पादनाची जबाबदारी टाकण्यात आली. मी आणि माझे सहकारी मित्र, रात्रभर मान मोडेस्तोवर काम करायचो.
पण आमच्याही कामाला यश येत नव्हते.  माझ्या निरीक्षणात एक गोष्ट आली की हे जे मुख्य मशीन आहे त्यात काही ठराविक बदल करणे गरजेचे आहे.  ज्यासाठी आम्ही NCLमधे सुद्धा जाऊन काचा कशा गरम करतात व त्या कशा हाताळतात हे पाहून आलो होतो.  थोड्याफार बदलाने हे मशीन नंतर काम करायला लागले व थोडेफार उत्पादन करू लागले.  परंतु सोलर सेल तयार होण्यासाठी लागणाऱ्या सोडियम सल्फाईड आणि कॅडमियम टेलूराईडच्या थराचे गणित कुठेतरी चुकत होते.
एक दिवस मी चांदीचा थर देणाऱ्या मशीनवर काम करत असतांना, एक काच मशीन मधे अडकली.  ती काढायला मी एक पट्टी घातली तर ते मशीन जोरात खाली आले व माझा डावा हात त्या मशीन खाली सापडला.  जिवाच्या आकांताने मी ओरडत होतो.  मला भोवळ यायला लागली होती.  तेवढ्यात माझ्या एका सहकाऱ्याचे लक्ष गेले.  मी त्याला पहिले मशीन बंद करण्यास सांगितले.  मशीन बंद केल्यावर वीस मिनिटांनी अथक प्रयत्नांती माझा मशीन खाली अडकलेला हात काढण्यात आला व मला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले.  नशिबाने माझा हात शाबूत होता, मोडतोड नव्हती. फक्त सूज होती.  पण त्यामुळे मला परत मशीनवर काम करण्याची मुभा नव्हती.
आम्ही सगळे मिळून ४-५ जणांची टीम ह्या प्रकल्पासाठी दिवसरात्र खपत होतो. नोकरी न समजता अगदी स्वत:चाच प्रकल्प असल्यासारखे आमचे वागणे होते. सगळे अगदी एकरूप होऊन काम करत होतो.
ह्या प्रकल्पाने आम्हांला खूप काही शिकवले.  कागदावर कितीही आयोजन केले, नियोजन केले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाची, योग्य त्या कौशल्याची, आर्थिक नियोजनाची आणि योग्य त्या मनुष्यबळाची खूप गरज असते.  अन्यथा हे कागदावरचे नियोजन कागदावरच राहते किंवा केलेल्या कष्टांचे चीज होत नाही. 
त्यातच आम्हांला आर्थिकदृष्ट्या खूपच अडचणी येऊ लागल्या. शेवटी व्यवस्थापनाने हा प्रकल्प बंद करण्याचे ठरवले व १९९९ साली माझ्यावर पुन्हा एकदा नव्याने नोकरी शोधण्याची वेळ येवून ठेपली.
“आलीया भोगासी, असावे सादर”, असे म्हणून मी परत एकदा झाले गेले सगळे विसरून नवीन नोकरी शोधायला सुरवात केली.  अथक प्रयत्नांती ती मिळाली ही, पण ह्यावेळेस ती होती गुजरात मधील वापी मधे.  माझा नाईलाज होता.  काय करणार ! हसत मुखाने ही नोकरी मी स्वीकारली आणि वापीला रुजू झालो.   
रविवारी सुट्टी असायची म्हणून मी दर शनिवारी संध्याकाळी वापी वरून मुंबई मार्गे पुण्यात यायचो व रविवारी रात्री परत वरुणच्या बसने वापीला जायचो व सोमवारी सकाळी कामावर हजर राहायचो.  तीन महिने कसे बसे हे केले पण तिथे सुद्धा त्या कंपनीतील मधील काही स्थानिक लोकांच्या राजकारणामुळे, माझ्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष स्वभावामुळे मला अडचणी येऊ लागल्या.  मला एकंदरीत सगळे कसे असुरक्षित वाटू लागले.  तिथल्या वातावरणाचा आणि लोकांचा त्रास होऊ लागला.  काही केल्या माझे मन ह्या नोकरीत रमेना.  मग काय नाईलाजाने वरिष्ठांशी चर्चा करून त्यांच्या संमतीने ह्या कंपनीलाही राम राम ठोकून परत एकदा पुण्यात नशीब आजमावायला निघून आलो.  म्हणतात ना, “इच्छा तिथे मार्ग”.
माझे नशीब मला पुन्हा पुन्हा आगीतून उठून फुफाट्यात टाकत होते. मी परत तितक्याच उमेदीने परिस्थितीस सामोरे जात होतो.

रविंद्र कामठे