Wednesday 2 November 2022

शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार येसाजी कामठे

 शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार येसाजी कामठे यांची "लाडोबा" ह्या  २०२२ च्या  दिवाळी अंकातील शौर्यगाथा 



 

माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आपले सर्वाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीच्या काळात योगदान दिलेल्या एका मावळ्याची स्वराज्य उभारणीच्या काळातील योगदानाची माहिती सांगणार आहे.

मित्रांनो शिवरायांच्या काळात त्यांना असंख्य मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फार मोलाची साथ देऊन आपापला  खारीचा वाटा उचलला आहे.  ज्याची फार थोड्या प्रमाणात इतिहासात नोंद घेतली आहे. 

असाच शिवरायांचा एक मावळा होता, पुण्याच्या दक्षिणेला असेलेल्या कोंढव्याचा येसाजी कामठे, ज्याने शिवरायांना स्वराज्याच्या उभारणीसाठी आपल्या तलवारीने नव्हे तर चक्क घण आणि पहारीने साथ दिली होती. अशा ह्या वीर येसाजी कामठे यांची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा एक छोटासा प्रसंग सांगतो आहे.

आदिलशाहीतील पुण्याच्या जहागिरीचे काम शहाजीराजांनी त्यांची पत्नी जिजाऊवर सोडून ते दक्षिणेला राज्यकारभारासाठी निघून गेले. त्यावेळेस शिवबा जेमतेम १५ वर्षांचे होते.  शहाजीराजांचा स्वराज्य उभारणीचा मनसुबा जिजाऊ आऊसाहेबांना चांगलाच ज्ञात होता व आपल्या लाडक्या पुत्राकडून त्या हे जोखमीचे कार्य अतिशय शिताफीने करून घेत होत्या. 

त्यांच्या तालमीत शिवबाही हळू हळू तयार होत होता.  रायरेश्वरावर आपल्या काही निवडक मावळ्यांच्या साथीने शिवबाने स्वराज्य स्थापनेची घेतलेली शपथ तर आपल्याला माहितीच आहे. त्याचवेळेस आपला शिवबा, शिवाजी राजा झाला होता.

मित्रांनो, शिवाजी राजे आपल्या प्रजेला केवळ लढाईचे हुकुम देत नव्हते तर, रयतेसाठी समृद्ध शेती असावी म्हणून सतत प्रयत्न करीत असतं.  पुण्याच्या जवळ कात्रज घाटाच्या पलीकडे शिवगंगा नदीच्या तीरावर जिजाऊसाहेबांनी वसविलेल्या शिवापूर गावात त्यांनी आमराईही तयार केली होती.

शिवगंगेच्या खोऱ्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी हे सर्व पाणी नदीवाटे वाहून जात असे व उन्हाळ्यात शिवगंगा पाण्याअभावी कोरडी पडत असे.  त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्यातही रयतेला प्यायला व शेतीला पाणी मिळावे ह्यासाठी नदीवर दगडी बांध घालण्याचा शिवरायांनी निश्चय केला.

यासाठी शिवरायांनी बारा मावळातील पाटलांना बोलावून आपल्या मनातील धरणाची संकल्पना सांगितली. ह्या धरणाच्या पाण्याचा खालील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी उपयोग करून तो प्रांत सुजलाम सुफलाम करण्याची त्यांची अतिशय महत्वाकांशी योजना होती.  शिवरायांच्या ह्या दूरदृष्टीला सर्वांनी मुजरा केला आणि लगोलग सगळे आपापल्या परीने कामाला लागले.

परंतु त्यांच्या वाटेतील एक भली मोठी धोंड काही केल्या फुटेना.  त्यामुळे सर्व पाटील चिंतेत पडले व महाराजांना त्यांनी त्यांची अडचण सांगितली. ती प्रंचड धोंड पहारीने व घणांनी फोडून काढल्याशिवाय पुढचे कामच चालणे अशक्य होते.  शिवाजी महाराजांनी हे अतिशय त्रासाचे व जोखमिचे काम येसाजी पाटील कामठे नावाच्या कोंढववेकर मराठ्यावर सोपविले. 

“मी परत येईपर्यंत ही प्रंचड धोंड फोडून अडथळा दूर करा” ! असे सांगून महाराज निघून गेले.  महाराज परत यायच्या आतच येसाजी कामठे पाटलाने जीवाची पर्वा न करता ती अगडबंब धोंड फोडून काढून, अडथळा पार होता की नव्हता करून टाकला होता व त्याचे छोटे धोंडे धरणाच्या भिंतीला रचले होते. 

एवढी अवाढव्य धोंड फोडून अडथळा दूर केलेला पाहून शिवाजी महाराज येसाजीवर फारच खुश झाले.  येसाजीची पाठ थोपटून ते त्याला बक्षीस म्हणून मोहरा देऊ लागले. तेंव्हा येसाजी महाराजांना म्हणाला की, “मला पैकं नकोत, जर मला काही द्यायचं असेल तर धान्य देणारी जमीन द्या ! पैकं खर्च होऊन जातील ! गावची पाटीलकी जरी आमच्या कडे असली तर इनामाची जमिन मुसलमानाच्या ताब्यात आहे. आमची इनामातील जमिन परत मिळावी ही विनंती”.

महाराजांना समजले की मुसलमान अंमलदाराने येसाजीचा भाऊ बावाजी यास कोंढाण्यावर बोलावून ठार मारले आहे व त्याची जमिन बळकावली आहे.   महाराजांनी तत्काळ येसाजीच्या विनंतीवरून त्यांची जमीन त्यांना इनाम म्हणून परत त्याच्या पदरात घातली व भाऊबंधाना त्यांचा हिस्सा देवून ती कसायला सुरवात करण्यास सांगितले.

मित्रांनो, स्वराज्याचे सुराज्य झालेल्या शिवगंगेच्या खोऱ्यात आजही हे छोटेसे धरण दिमाखात उभे आहे व त्यामुळे मी वीर येसाजी कामठे यांचे वंशज आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी योगदान देणाऱ्या आमच्या वीर येसाजी कामठे ह्यांना आमचा हा मानाचा मुजरा.

जय जिजाऊ | जय शिवाजी | जय भवानी | जय येसाजी |