Friday 21 July 2017

आत्महत्या, एक पाप, की अपराध !

आत्महत्या, एक पाप, की अपराध !

 आंतरजालामुळे सामाजिक माध्यमातून विशेष संदेश पाठवून काही माणसे आपले अमुल्य असे जीवन संपुष्टात आणत आहेत.  आजकाल “आत्महत्या” करण्याचा हा एक नवीनच पायंडा पडत चालला आहे की काय असे वाटायला लागले आहे.  ही बातमी वाचून मन खूपच विचलित होऊन गेले होते.  गेले काही वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबरोबरच सर्वसामन्य माणसाच्या आत्महत्या हा ही विषय अतिशय गहन होत चालला आहे.  नैराश्याची परिभाषाच बदलेली आहे काय असे वाटायला लागले आहे.  किती कारणांनी सध्या आत्महत्या होत आहेत ! हे जर पाहिलं तर लक्षात येते की माणसांना आपले हे मौलिक जीवन जगण्यापेक्षा संपवणेच जास्त इस्ट आणि सोपे वाटू लागले आहे की काय !  असा एक साधा सरळ प्रश्न मलाच काय पण तुम्हांलाही पडला असेल !  त्यामुळेच माझ्या मनात एक शंका उपस्थित झाली आहे की, आत्महत्या हे एक पाप आहे, की अपराध ?  ह्याच प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करू पाहतोय.

एखादी व्यक्ती आत्महत्येस अनेक कारणांनी प्रवृत्त होते; जसे की, नोकरीच मिळत नाही किंवा चांगली नोकरी मिळत नाही अथवा मिळालेली नोकरी काही कारणांनी जाते.  लग्नच होत नाही, आणि झाले तर मनासारखी बायको अथवा नवरा मिळत नाही.  एकतर्फी प्रेमात मित्र/मैत्रीणीचे प्रेम लाभत नाही. तर विवाहानंतर काही कारणांनी म्हणावे असे शारीरिक आणि मानसिक सुख लाभत नाही.  शाळेत अभ्यास करूनही चांगले गुण मिळत नाहीत.  काही ना काही कारणांमुळे सतत अपमान होत असतो.  प्रयत्नपूर्वक कष्ट करूनही समाजात स्थान अथवा प्रतिष्ठा लाभत नाही.  जन्मजात अपंगत्व आलेले असते तर कधी कधी अपघाताने अपंगत्व येते.  काही माणसे शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात, तर वाईट संगतीतून व्यसनाच्या आहारी जातात, नंतर ही व्यसने सुटता सुटत नाहीत.  प्रयत्न करूनही बऱ्याचदा मनासारखे काहीच घडत नाही, तसेच आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करत असते, तर कधी कधी एकतर्फी प्रेमातून मन निराश होते.  आयुष्यात कधी कधी अतिप्रसंग घडतात, बलात्कारासारख्या घटनांना सामोरे जावे लागते.  कामाच्या ताणामुळे अथवा व्यवसायिक व्यस्ततेतून मानसिक दडपण येते.  दीर्घ आजारातून सुटका होत नसते, शाळेत अथवा कामाच्या ठिकाणी सतत अपमानीत वागणूक मिळते.  आयुष्यात कधी कधी खूप खडतर प्रसंग येतात, त्यामधून एक प्रकारचे नैराश्य आणि वैफल्यग्रस्त झाल्याची भावना मनात निर्माण होते. सतत येणारे अपयश व साप्तनिक भावना बळावल्यामुळे, अथवा दुर्लक्षित राहिल्यामुळे असो किंवा कधी कधी आर्थिक अडचणींवर मात करता न आल्यामुळे म्हणा, अशी आणि अजून कितीतरी वेगवेगळी कारणे माणसाला आत्महत्येस प्रवृत्त करत असतात.  समाजातील सर्वच थरांमधील विश्लेषणातून हे निष्कर्ष समोर आलेले आहेतच, मी फक्त ते माझ्या परीने परत एकदा तुमच्या सामोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे बाकी काही नाही.   आत्महत्या ही जरी एक वैयक्तिक समस्या असली तरी तिचे गंभीर परिणाम समाजावर होत आहते आणि त्यामुळेच ह्या समस्येवर प्रत्येकाने थोडासा विचार करून योग्य ते उपाय करायला हवे असे मला अगदी प्रकर्षाने वाटते आहे. 

मी हे सगळे तुमच्या समोर मांडून माझे मन थोडेसे हलके करण्याचा प्रयत्न करतो आहे.  कारण, मी,  माझ्या अगदी जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या बाबतीत हा प्रकार अगदी जवळून अनुभवला आहे. त्यावेळेस वेळे अभावी म्हणा अथवा मला वेळेत न समजल्यामुळे म्हणा, मी त्यांच्या उपयोगी पडू शकलो नाही ह्याची मला कायमच खंत वाटत आली आहे.  म्हणजे, एक व्यक्ती त्याच्या कामाच्या ताणातून आणि संसारातील कटकटीतून सुटका होण्यासाठी वैफल्यग्रस्त होऊन, आपला भरला संसार सोडून घरातून कायमचा निघून जातो काय आणि त्याचा गेली ८ वर्षे कुठेही तपास लागत नाही, हे सत्य पचवायला किती जड आहे हे तुम्हीं समजू शकता !  तर दुसरी अशीच कमकुवत मनाची एक व्यक्ती केवळ आणि केवळ आर्थिक अडचणींमुळे, निराशेपोटी वयाच्या २८ वर्षी, मागे बायको आणि दोन लहान मुले ठेवून, स्वत:चे आयुष्य गळफास लावून संपवते, तेंव्हा तर मला त्या व्यक्तीचा मनापासून रागच आला होता. आणि मध्यंतरी माझ्या एका मित्राने स्वत:चे आयुष्य संपवले होते, तेंव्हा तर माझी पायाखालची जमीनच सरकली होती.  कारण माझ्या ह्या मित्राचा प्रेमविवाह झालेला होता, तरीही त्याला सोडून त्याची ही प्रेमाची बायको त्यांच्या लहान ७ वर्षाच्या मुलासकट दुसऱ्याच एका माणसाबरोबर अमेरिकेस पळून जाते आणि तिकडून ह्याला घटस्पोटाची नोटीस पाठवते.  त्यामुळे तो खच्ची तर होतोच पण न्यायालयाच्या खेटा मारता मारता, कर्ज बाजरीही होतो, समाजात अपमानित होतो आणि त्याच मानसिक अवस्थेत स्वत:चे आयुष्य संपवून ह्या समस्येतून स्वत:ची सुटका करून घेतो.  परंतु त्याच्या मागे त्याचे संपूर्ण खानदान उध्वस्त तर होतेच होते, पण देशोधडीलाही लागते.  हो ही सत्य घटना आहे ह्यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, कारण ह्यात मी सुद्धा त्याला आर्थिक मदत करून पोळलो गेलेलो आहे.  अगदी त्याच्या मृत्युनंतर जवळ जवळ दोन वर्षे मी माझ्या पगारातून हप्ते लावून त्याचे हे कर्ज फेडलेले आहे.  अर्थात ती माझी नैतिक जवाबदारी होती म्हणूनच.  तरीही ह्या पैकी कोणालाही मी आत्म्हत्येपासून परावृत्त करू शकलो नाही, कारण मला ते इतकी टोकाची भूमिका घेतील आणि असे वेड्यासारखे वागतील ह्याची थोडीशीही शंका कधी आलीच नाही व मला त्यांच्या बदलत्या मानसिकतेची पुसटशी कल्पनाही आली नाही, ह्याचेच शल्य बोचते आहे.

तसे पहायला गेले तर माणसाचे जीवन किती सुंदर आहे नाही !  ते जगण्यासाठी आहे, मरण्यासाठी नाही, कारण जन्मताच प्रत्येकाचा मृत्यू लिहिलेला असतो हो. जीवन मरणातील जे अंतर आहे तेच हे आपले आयुष्य आहे आणि ते आपण आपल्या कर्तुत्वाने घडवून सुंदर तर नक्कीच करू शकतो !  ह्या निमित्ताने मला माझ्याच एका कवितेतील काही ओळी आठवल्या...

जगण्यासाठी मरतो कशाला,  मरण्यासाठीच जगणे हे. 
कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे. 
नको करूस क्रोध त्रागा, जो तुलाच तुझ्यापासून दुरावेल. 
तू तुझाच आहेस, परंतु सर्वांना हवा आहेस | 
दु:ख हे सर्वांनाच असते,  नाही त्यातून तुला सुटका. 
दु:खातही सुख शोधावे,  हेच जीवनाचे सार्थक आहे. |

मराठी-हिंदी तसेच एकंदरीत सर्व भाषिक चित्रपट सृष्टीने तर, जीवन ह्या विषयावर आपल्याला खूप भरभरून भावविश्व दिलेले आहे.  ह्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी, कवी, गीतकार, संगीतकारांनी, चित्रपट, नाटक, संगीत इत्यादी माध्यामतून खूप मोलाचे समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे हे आपण कधी विसरू शकणार नाही.  ह्याच सगळ्याचा विचार करतांनाच, मला शोर ह्या चित्रपटातील, स्वर्गीय मुकेश ह्यांच्या दर्दभऱ्या आवाजातील गाण्याच्या ह्या हृदयाला भिडणाऱ्या ओळी अगदी सहज आठवल्या, इतके प्रभावी असे हे माध्यम आहे.  आज ३५ वर्षानंतरही ह्या चित्रपटामधील कधी दृश्ये डोळ्यासमोर उभी राहिली आणि डोळे भरून आले व त्या चित्रपटामधील पात्रांशी, कथेशी, गाण्याशी एकरूप होऊन, जगण्याची नवी उमेद देऊन गेली..

कुछ पाकर खोना है,  कुछ खोकर पाना है,
जीवन का मतलब तो, आना और जाना है |
दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है,
जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहाणी है |
एक प्यार का नगमा है....

आपल्याकडे जीवनावर खूप समृद्ध असे साहित्य उपलब्ध आहे आणि नवनवीन कवी, गीतकार, संगीतकार त्यावर जीव तोडून काम करत असतात व एकप्रकारे समजाचे ऋणच फेडत असतात, असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.  मनोरंजनाचा भाग जरी त्यात असला तरी, ह्या मनोरंजनातूनच चिंतन करून आयुष्याकडे सकारात्मक दुर्ष्टीने पाहण्याचा आपला दृष्टीकोन तयार करण्यात ते बऱ्याच अंशी नक्कीच यशस्वी होतात, असे मला तरी वाटते.  अगदी तसेच, जमीर ह्या चित्रपटामधील किशोर कुमारच्या अतिशय मुलायम आवाजातील हे गाणे व त्यामधील प्रतिभावंत गीतकाराच्या शब्दांची ताकद, नैराशेने ग्रासलेले मनात एक नवचैतन्य निर्माण करून जाते..


जिंदगी...............

हसने गाणे के लिये है पल, दो पल,
इसे खोना नही, खोके रोना नही.....जिंदगी....
तेरे गिरने मै भी, तेरी हार नही,
के तू आदमी है, अवतार नही.....

ह्या प्रमाणे असेच काहीसे प्रगल्भ तत्वज्ञान मोठ मोठ्या गीतकारांनी आपल्या समोर मांडले आहे.. जसे..

समझोता गमों से करलो,
के जिंदगीमे गम ही मिलते है,
पतझड आते ही रहते है,
के मधुबन फिरभी खिलते है......

हेच विचार वैफल्यग्रस्त आणि निराशावादी माणसांना योग्य पद्धतीने सांगण्याची, समजून देण्याची काळाची गरज त्यावेळीही होती आणि आजही आहे.  आपल्यासारख्या आशावादी विचारसरणीच्या लोकांची ही एक सामाजिक जबाबदारी आहे असे मला वाटते.  आत्महत्येचे हे भूत त्याशिवाय अशा मानसिकरीत्या पिडीत लोकांच्या मानगुटीवरून खाली उतरणार नाही आणि हे पाप किंवा अपराध त्यांच्याकडून घडू न देण्याचे आपले कर्तव्यच आहे असे मला ह्या निमित्ताने म्हणावयाचे आहे. 
 
असेही कायद्याने आत्महत्या करणे हा एक गुन्हा आहे.  पण हा गुन्हा सिद्ध करून तरी काय साध्य होणार आहे हो.  गेलेला जीव तर काही त्यामुळे परत तर येत नाही ना !  तसेच वैदकीय दृष्ट्या जर्जर आजारांनी पिडीत असलेले आणि अगदी जगण्यात अथवा त्यांना जगवण्यात कुठलेच हाशील नसलेल्या जीवांनाही आपला कायदा इच्छामरण देण्याची परवानगी देत नाही हो.  हे सद्धा लक्षात घ्यायला हवे.  नुसते कायदे करून काय साध्य होणार आहे.  माणसांची आयुष्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची वृत्ती बदलणेच जास्त संयुक्तिक वाटते. 

बरं, आत्महत्या काही सध्याच होत आहेत असेही नाही !  पूर्वीही होतच होत्या, पण त्यांचे प्रमाण सध्या जरा जास्तच वाढलेले दिसते आहे.  तसेच अतिशय फुटकळ कारणांसाठी माणूस आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवत आहे.  ह्याला अपवाद असले तरीही आत्महत्येस कुठलेही कायदेशीर अथवा वैचारिक असे कुठलेच अधिष्ठान नाही हे सुद्धा विसरून चालणार नाही.  आत्महत्या हा एक पर्याय तर नक्कीच नाही.  परंतु आपण जर ह्या विषयावर थोडासा उहापोह केला तर तुम्हीही माझ्या ह्या मताशी सहमत व्हाल.  कारण माझ्या दृष्टीने आत्महत्या करणे म्हणजे, आपल्या आयुष्यात उदभवलेल्या समस्यारूपी परिस्थितीपासून पळून जाणे होय.  तो निश्चितच एक फार मोठा अपराध आहे व तसेच ते पापही आहे असेच माझे मत आहे.  आयुष्यात संघर्ष हा हवाच.  सर्व काही जर आपल्याला सुखासुखी मिळाले तर त्याची मजा फार काळ रहात नाही.  परंतु तीच गोष्ट जर आपल्याल्या अथक परिश्रमाने मिळाली तर त्याच्यासारखे सुख आणि समाधानही नसते !  नेमके हीच भावना, परिस्थितीशी दोन हात करण्याची जिद्द ज्यांच्या ठाई नसते ते आपले मनोबल हरवून बसतात आणि नियतीच्या दृष्ट चक्रात अडकतात आणि आपले जीवन संपवतात.  त्यामुळे ते स्वत:ची आणि आपल्या आप्तेष्टांच्या भावनांची प्रतारणा करतात.  म्हणूनच आत्महत्या हे नुसते पाप नसून तो एक फार मोठा अपराधच आहे व एक गंभीर सामाजिक समस्याही आहे असे मला वाटते.

जीवनामध्ये लवकरात लवकर सफल होण्याचे अनेक मार्ग आज आपल्या समोर आहेत, परंतु हे मार्ग सगळ्यांनाच सापडतात असेही नाही.  त्यामुळेच मनाने दुर्बल असणारी माणसे अगदी टोकाचा विचार करून स्वत:चे आयुष्य संपवतात ना, तेंव्हा मनाला फार वेदना होतात हो.  जो जातो ना तो सुखी होतो. परंतु त्याच्या मागे राहणारी रक्ताची माणसे आयुष्यभर ह्या व्यथेत फरफटत जातात, अगदी त्यात त्यांचा दोष असला तरी आणि नसला तरीही. 

गेले काही वर्षे सर्वात जास्त आत्महत्या आपला बळीराजा करतांना दिसतो आहे. रोज कुठे ना कुठे कित्येक शेतकरी आपले नैराश्यपूर्ण जीवन संपुष्टात आणत आहेत आणि त्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्यास आपला समाज, सरकार, प्रशासन आणि व्यवस्थापन कमी पडते आहे. त्यात भरीला भर अताश्या, शहरी भागातही, भौतिक गरजांच्या मागे लागून होणाऱ्या आत्म्हत्येंचे प्रमाणही मन विचलित करण्या इतपत वाढलेले दिसते आहे.  माणसांमधील माणुसकी लयाला जात चालली आहे असेच भासते आहे.  ह्या सगळ्यामुळे मन अगदी दु:खीकष्टी होते आहे.  कोणाशी बोलावे, कसे व्यक्त व्हावे आणि आपल्या मनातील विचार समाजापर्यंत कसे पोचवावे ह्या दृष्टीकोनातून मी हा लेख प्रपंच मांडला आहे.  माझ्या ह्या प्रयत्नांतून मी एक जरी आत्महत्या रोखू शकलो अथवा एका व्यक्तीला जरी आत्म्हत्येपासून परावृत्त करू शकलो, तर माझे हे जीवन सार्थकी लागेल अशी भावना माझ्या मनात डोकावते आहे.

नैराशेने ग्रासलेली अशी वैफल्यग्रस्त माणसे आपल्या आसपास वावरत असतील तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवा.  त्यांना बोलते करावे.  त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घ्यायला हव्यात.  त्यांच्याशी शक्यतो सकारात्मक दृष्टीने संवाद साधायला हवा.  कुठलाही पूर्वग्रहदूषित न ठेवता त्यांच्याशी सतत बोलत राहावे.  त्यांच्या एकंदरीत वागणुकीवर आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे.  आपल्याबरोबर अजून काही लोकांना, तसेच त्यांच्या जवळच्या माणसांना त्यांच्या ह्या मनस्थितीची व्यवस्थित जाणीव करून द्यावी आणि शक्य असल्यास अशा लोकांना कधीही एकटे अथवा मोकळे सोडू नये.  तुमच्याने जर हा विषय हाताळता येत नसेल तर योग्य वेळी जवळच्या एखाद्या समुपदेशन केंद्रास अथवा चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे अशा व्यक्तीस दाखवावे आणि त्यावर लगेचच उपचार सुरु करावेत.  तुमच्या ह्या प्रयत्नांना कुठेही आणि कुठल्याही परिस्थितीत खंड पडू देऊ नये, तसेच संवाद, समुपदेशन आणि उपचार अर्धवट सोडू नयेत.

आपल्या समाजामध्ये जिद्दीने लढणारी आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी अनेक उद्हारणे आहेत.  अशा लोकांचा आदर्श डोळ्यासमोर जरूर ठेवला पाहिजे.  विकलांग आणि अपंग माणसे तर ह्याचे अगदी ज्वलंत उदाहरण आहेत.  ही माणसे त्यांच्याकडे निसर्गाने काही कमी दिले आहे म्हणून रडत बसत नाहीत किंवा नियतीला कोसत आयुष्य कंठत नाहीत.  उलट ते तितक्याच जिद्दीने व ताकदीने अथक परिश्रमाने स्वत:ला त्यात झोकून देऊन आलेल्या परिस्थितीशी सामना करतात व आयुष्याची ध्येय पार करतात, हे मी नुकतेच एका अंध अनाथ कल्याण केंद्राच्या कार्यक्रमास गेलो होतो तेंव्हा अनुभवले आहे.  संदीप नावाच्या हा अंध विद्यार्थी उत्तम तबलावादक आहे.  मी त्याला सहज विचारले की तुझे आयुष्यातले सर्वात मोठे ध्येय काय आहे !  तर त्याने मला जे उत्तर दिले ते ऐकून मी तर अचंबितच झाले.  तो म्हणाला मला उस्ताद झाकीर हुसेन ह्यांच्या सारखे जगप्रसिद्ध तबलावादक व्हायचे आहे.  अशी अजून किती तरी उदाहरणे प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी दिसत असतील.  त्यांच्या कडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे आणि त्यातूनच शिकण्यासारखे खूप काही आहे.  हाच एक आशावाद माझ्या मनात सारखा डोकावतो आहे.

माणसाचे मन हे फार चंचल आणि अस्थिर असते.  आजकाल छोट्या छोट्या घटनांनीही ते कधी विचलित होईल ह्याची शास्वती देताच येत नाही.  समस्येच्या मुळापर्यंत जावून तिचा समूळ नायनाट करणे हाच एकमेव पर्याय अशा आत्म्हत्येंचे प्रमाण रोखण्यास उपायकारक ठरू शकतो आणि अशा मनोदुर्बल घटकांना एक आधार आपण नक्कीच देवू शकतो, अशी माझी तरी अतिशय तीव्र भावना आहे.  त्याच भावनेपोटी मी तुम्हांला वरील उपाय योजना सुचविण्याचा एक छोटासा प्रयास ह्या लेखाद्वारे करतो आहे व आत्म्हत्येसारख्या पाप वा अपराधातून ह्या पीडितांना मुक्त करण्याचा माझा ध्यास आहे.
 
रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०

Monday 3 July 2017

|| विठ्ठला ||


|| विठ्ठला ||

सावळ रूप तुझे विठ्ठला, भावते रे ते मनाला,
ओढ तुझ्या भेटीची लागते जीवाला, चैनही पडत नाही पायाला ||
 
आस पंढरीच्या वारीची, मन धावे चंद्रभागेच्या तीरी,
तुझ्या दर्शनाच्या बारी, विठ्ठल विठ्ठल करतेय वारी ||
 
टाळ मृदुंगाचा नाद जगी, रिंगण रंगेतेय जागो जागी,
बाया बापुडे फेर धरी, तुझ्या नामाचा गजर करी ||

भागवत धर्माची पताका घेउनी हाती, ग्यानबा तुकाराम पालखी नाचती,
आभाळातून आशिष बरसती, भजनात वारकरी तल्लीन होती ||

युगानु युगे उभा तू विटेवरी, विठ्ठल रखुमाईची पंढरी,
टेकता माथा तुझिया चरणी, जन्म हा लागतो सार्थकी ||

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, गजर तुझा नामाचा आसमंत दुमदूमी ||

 
रविंद्र कामठे.
प्रतिबिंब काव्यसंग्रह.

“क्षण”


क्षण

 काही क्षण हे असे असतात की जे काळजात खोलवर रुतून बसलेले असतात.  आपण जेंव्हा एकांतात असतो तेंव्हा हे क्षण असे काही छळतात ना की विचारू नका !  ह्या क्षणांचे गणित जरा वेगळेच असते.  ते काय व कसे आपल्या स्मृतीपटलावर अवचित उमटून जाते ना तेच तर कधी कधी कळतच नाही.  त्यात जर का हे क्षण प्रेमाचे असतील ना तर काही विचारूच नका.  मनाची जी काही हळवी आणि केविलवाणी अवस्था होऊन जाते ना की पाहायलाच नको !  हेच ते क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात आधी कधी तरी येवून गेलेले असतात.  पण त्यावेळेस त्या क्षणांचे महत्व म्हणा अथवा त्यांची प्रगल्भता आपल्याला जाणवलेली नसते.  असे हे क्षण आपल्या उतरणीला लागेलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून जातात तेंव्हा मात्र मन कसे गलबलून येते.  ह्या क्षणांमध्ये पुन्हा पुन्हा हरवून जावेसे वाटू लागते.  परत एकदा आपण तरुण झालो आहोत असेच काहीसे वाटायला लागते.

 आपले हे हळवे मन विचलित होऊन जाते.  मग त्या क्षणांच्या गुंत्यात अजूनच गुरफटून गेल्या सारखे होते.  त्या हरवलेल्या क्षणांची महती कळायला लागते आणि काय आश्चर्य, काही काळासाठी का होईना आपण ह्या क्षणांच्या आठवणींमध्ये इतके रमून जातो की त्यातून बाहेर येवूच नये असे वाटते.  ह्या क्षणांच्या ऋणात राहणे आपल्यला सुखद वाटायला लागते.  माझ्या मनात जे काही चालले आहे ना अगदी तेच माझ्या सारख्या समवयस्क असलेल्यांच्या मनातही नक्की चालू असणार ह्याची मला खात्री वाटते.  अहो, मी फक्त कागदावर उतरवण्याचे धारिष्ट्य केले आहे एवढेच.  त्याचे काय आहे, की त्यामुळे आपले मन जरा हलकं होतं व अजून असेच काही सुखद क्षण राहिलेत की काय असे वाटायला लागते आणि आपले मन त्या क्षणांच्या शोधात भरकटायला लागते हो. 

माझा एक अनुभव आहे, जो मी तुम्हांला सांगतो.  ह्या क्षणांच्या ऋणात म्हणा किंवा त्यांच्या आठवणीत मन जे काही रमते ना, ते दुसऱ्या कशातही रमत नाही, बर का !  त्यामुळे माझे तुम्हांला एक सांगणे आहे, की तुम्हीं जरा तुमच्या स्मरणशक्तीला थोडासा ताण द्या आणि आठवा ते सुखद, हळवे, कोमल, मोकळे, रसिक, सुहासिक, प्रांजळ, अगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू, असे काही क्षण आणि बघा ना, आपल्या मनाचे सोंदर्य कसे झळाळून निघते ते !  मला तर ना, ह्या क्षणांचा मोह आवरतच नाही.  जरा वेळ मिळाला की मी त्यांच्यात रममाण होऊन जातो.  अगदी भान हरवून बसतो.

तसे पाहायला गेले तर काही काही क्षण हे थोडेसे दुखरे ही असतात हो.  पण त्याच्याही आठवणी जर का ताज्या झाल्या ना की आपल्याला आपण आयुष्यात केलेल्या चुकांची आपसूकच आठवण येते.  आपल्या नकळत आपण त्यात भरडल्या गेलेल्यांची क्षमा मागून जातो.  आपल्याला माहिती असते की आता फार उशीर झालेला आहे.  तरी आपले मानसिक समाधान मिळविण्याचा आपला हा एक प्रामाणिक प्रयत्न मनाला थोडासा दिलासाही देवून जातो.  शेवटी काय आहे, ह्या जन्मी केलेल्या पाप-पुण्याचे मोजमाप आणि त्याचा हिशेब येथेच द्यावा लागतो.  सगळा ठोकताळा येथेच बांधावा लागतो.  हा नियतीचा नियम आहे.  स्वर्ग-नर्क काही नसते हो.  हे सुखद क्षणच आपले स्वर्ग असते तर दुखरे क्षण हे नर्क असावे असे वाटते.  क्षणाच्या ऋणात राहूनच कर्म करत राहायचे असते.  जीवन हे असेच असते, ते हसत हसत जगायचे असते.

रविंद्र कामठे,

९८२२४०४३३०