Wednesday 27 February 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – पहिली नोकरी


अनुभवाच्या शिदोरीतून पहिली नोकरी

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

गरवारे महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा मी विद्यार्थी.  त्यातल्या त्यात सोपे जावे म्हणून वाणिज्य शाखा निवडलेली आणि चक्क पहिल्याच प्रयत्नांत पासही झालेलो !  म्हणजे तसे काही फार चांगले मार्क नव्हते मिळाले, पण होते साधारण ५५% वगैरे असतील.  माझ्या मानाने आणि मी केलेल्या अभ्यासावरून हे सुद्धा मला अमंळ जास्तच वाटले होते हो !  फार खोलात जावून मी अभ्यास कसा केला आणि किती केला असले प्रश्न विचारू नका, कारण आता ह्या गोष्टीला जवळ जवळ ३५ वर्षे होवून गेलीत.  आमच्या काळात शिक्षणाला महत्व की काय ते नुकतेच कुठे यायला लागले होते एवढेच.   आमच्या आख्या खानदानात मी म्हणे पहिलावाहिला पदवीधर होतो, जो की पहिल्या इय्यतेपासून ते पदवीधर होई पर्यंत एकदाही नापास झालेला नव्हता.
 
नमनाला घडाभर तेल वाया घातले कारण ह्या निकालाच्या आधारावर मला १ जून १९८३ ला माझ्या आयुष्यातली पहिली नोकरी मिळाली होती.  त्याचं असं झालं की, महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीच्या काळात, सकाळ मधील जाहिरात पाहून नोकरीसाठी सहज अर्ज केला होता. नेमका निकाल लागायला आणि त्यांनी मुलाखतीला बोलावण्याचा योगायोग जुळून आला होता.  मुलाखत झाल्यावर तासभर बसवून ठेवले आणि नंतर सांगितले की आम्हीं तुम्हांला ही नोकरी देत आहोत.  कारकूनम्हणून माझी निवड झाली होती आणि मला महिना रुपये ३५०/- पगार ठरवण्यात आला होता.  आयुष्यातल्या पहिल्याच लढाईत आम्ही चक्क घोडंमैदान मारलेलं होत राव, अजून काय पाहिजे होतं !  पुढच्या यशस्वी आयुष्याची ही तर नांदीच होती असे आत्ता म्हणावयास हरकत नाही.

३५ वर्षांपूर्वी ३५० रुपये महिना पगार, म्हणजे मी तर आनंदने नाचतच घरी पोचलो होतो.  कारण महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षापासून म्हणजे १९८० पासून मी जमेल तसे छोटे मोठे काम करून महिन्याला ५०-७५ रुपये स्वखर्चासाठी कमावत असे (महाविद्यालयात जायला लागल्यापासून मी आमच्या एका मेव्हण्यांच्या फोटो स्टुडीओ मधे सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ६ ते ९ असे पडेल ते काम करायचो व फोटोग्राफी पण शिकायचो हो ).  म्हणूनच महिन्याला ३५० रुपये म्हणजे माझ्यासाठी फारच मोठी व स्वकष्टाची कमाई होती, ह्याचे कोण एक अप्रूप मला वाटत होते म्हणून सांगू.  

ही नोकरी पुण्यातल्या हिंगणे खुर्दमधील विठ्ठलवाडी स्थित एका लहानश्या कारखान्यातील होती.  ह्या कारखान्यात मोठ मोठ्या कंपन्यांना लागणारे इलेक्ट्रिकल कंट्रोल प्यानेल बनवत असत.  माझ्या कामाचे स्वरूप म्हणजे सकाळी ७ वाजता कारखान्यातील कामगारांची हजेरी घेणे, रोजचा पत्रव्यवहार तपासणे, त्याची नोंद करणे, मालक, हिशेबनीस आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे.  थोडक्यात काय ते सांगतील ते काम करणे.  हो पण मी काही सांगकाम्या सारखं काम केलं नाही बर का !  थोडेफार स्वत:चे डोकेही चालवत असे, अर्थात अजिबात आघाऊपणा न करता बर का.  एक सांगतो पहिलीच नोकरी असल्यामुळे, मी मनातल्या मनात ठरवले होते की कुठल्याच कामाला नाही म्हणायचे नाही.  जेवढे काय शिकून घेता येईल तेवढे शिकून घ्यायचे, कामाचा अनुभव गाठीशी बांधायचा.
 
जुलै महिन्याच्या ७ तारखेला माझा पहिला पगार झाला त्या दिवशी कधी एकदा घरी जातोय आणि आईला वडिलांच्या हातात पगाराचे पाकीट ठेवतोय असे झाले होते मला.  ह्यात जो काही आनंद झाला होता तो शब्दांमध्ये सांगणे जरा कठीणच आहे हो.  स्वाभाविकच आहे हो हे सगळे, म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी कळायला लागल्यापासून ते २३व्या वर्षापर्यंत दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझे वडील न चुकता माझ्या आईच्या हातात त्यांच्या पगाराचे पाकीट ठेवत असत (सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांचा पगार महिन्याच्या शेवटच्या दिवशी होत असे).  आई ते पाकीट देवा पुढे ठेवत असे आणि नंतर पुन्हा वडिलांच्याकडे देत असे.  वडील त्यातले त्यांच्या खर्चासाठी ठराविक रक्कम काढून घेत असत आणि उरलेली रक्कम आईला परत त्याच पाकिटात टाकून देत असत.  त्यादिवशी संध्याकाळी वडील आमच्या सगळ्यांसाठी म्हैसूरपाक आणि फरसाणही आणत असतं.  तोच पायंडा मी पुढे चालू ठेवायचे ठरवले होते बाकी काही नाही.  माझ्या ह्या पगारातले १५० रुपये मला आई काढून देत व उरलेले २०० रुपये ती घर खर्चाला ठेवत असे.

मी लहानपणापासून माझ्या वडिलांना काबाड कष्ट करतांना पाहिलेलं असल्यामुळे, कुठल्याही कामाची लाज बाळगायची नाही हे ठरवले होते.  काम हेच आपले दैवत आहे असे समजायचे, माझ्यावर झालेले हे संस्कार ह्या पहिल्यावहिल्या नोकरीत खूप कामी आले.  तसेच आपल्या सहकाऱ्यांबद्दल कुठलेही मत बनवायचे नाही हे सुद्धा मला समजले.  माझ्या अनुभवावरून वरून सांगतो की आपले सहकारी चांगले अथवा वाईट असं काही नसतं, ते आपण त्यांचाशी कसे वागतो त्यावर अवलंबून असतं !

आम्हीं त्याकाळी डेक्कनला पुलाच्या वाडीमध्ये रहायला होतो आणि आमच्या घरापासून विठ्ठलवाडी साधारण ४-५ किलोमीटर लांब होती.  तेंव्हा पहिले काही महिने मी रोज सायकलवरून कामाला जात असे.  सकाळी ६.३० वाजता मी घरून निघत असे आणि बरोबर ६.५५ला कारखान्यात पोहचत असे.  बरोबर ७ वाजता सगळे कामगार, बाकीची मंडळी आणि आमचे मालक सुद्धा, कामावर हजर रहात असत.  जर का एखाद्याला थोडासा जरी उशीर आठवड्यातून तीन वेळा झाला तर त्याचा अर्धा दिवसाचा पगार कापला जात असे.  त्यामुळेच मला त्यांची हजेरी घेण्यासाठी ७ च्या आत हजर राहावे लागत असे.  अर्थात ह्या वक्तशीरपणाचा मला माझ्या उर्वरित आयुष्यात खूप म्हणजे खूपच फायदा झाला हे ही तितकंच खरं आहे.  ते म्हणतात ना, कुठल्याही चांगल्या सवयी आणि संस्कार हे कधीही वाया जात नाहीत, उशिरा का होईना त्याचे फळ आपल्याला मिळतेच मिळते ! 

साधारण तीन ते चार महिन्यात माझ्या डोक्यात एक दुचाकी घ्यावी असा विचार डोकावला होता.  तो मी माझ्या चुलत्यांना बोलून दाखवला.  त्यांचा माझ्यावर खूप जीव असल्यामुळे त्यांनी त्याला लगेच होकार भरला व दुसऱ्या दिवशी टिळक रोडवरील दुकानात जावून चौकशीही करून आले होते.  ४००० रुपये किमतीची टीव्हीएस५० कर्ज काढून घ्यायचे ठरले.  पण मला ते दुकानवाले कर्ज देईनात कारण खाजगी नोकरी होती ना माझी.  मग काय काकांनी त्यांच्या नावावर कर्ज काढले आणि पुढे मी महिन्याला १०० रपये हप्त्याने ते फेडले.  माझ्या आयुष्यातील कर्ज आणि हप्ते ह्यांची हीच काय ती मुहूर्तमेढ म्हणावयास हरकत नाही.  ह्या हप्त्यांनी आयुष्य मात्र सुखी केले, अर्थात ते वेळेवर भरले म्हणून हे मात्र तितकेच खरं आहे !
 
ह्या कारखान्याचे मालक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते व त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे व घेण्यासारखे होते.  त्यांचा सचोटी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, कामाप्रती असलेली निष्ठा, सहकाऱ्याबद्दल असलेला आदर, ग्राहकांच्याप्रती असलेली आत्मीयता आणि बांधिलकी,  सकारात्मक दृष्टीकोन, उत्कृष्ठ नियोजन आणि तितकेच काटेकोरपणे नियोजनाचं केलेलं पालन, समयसुचकता, आलेल्या अडचणींवर मात करण्याची क्षमता व जोखीम घेण्याची ताकद.  असे आणि अजून बरेचसे गुण मला त्यांच्या बरोबर काम करतांना जवळून न्याहाळता आले आणि माझ्यात त्यातले काही गुण नक्कीच रुजवता आले अस मला आजतरी वाटते आहे. 

एक सांगतो कुठलेही संस्कार हे आपल्याला हाताला धरून कोणीही कधीही शिकवत नाही, ते आपल्याला आपणहून पुढाकार घेऊन आत्मसाद करायचे असतात आणि आचरणात आणायचे असतात हे जेमतेम वर्ष दीडवर्षाच्या ह्या पहिल्या वहिल्या नोकरी मुळेच मला उमजले. 

ह्या नोकरी नंतर गेल्या ३५ वर्षात मी जवळ जवळ १४ नोकऱ्या केल्यात परंतु माझ्या ह्या पहिल्या नोकरीचा तो अविस्मरणीय असा काळ आजही माझ्या स्मृतीपटलावर शाबूत आहे.

रविंद्र कामठे
१२ फेब्रुवारी २०१९  

अनुभवाच्या शिदोरीतून – प्रवास चंद्रपूरचा


अनुभवाच्या शिदोरीतून प्रवास चंद्रपूरचा
ज्याचे जळते | त्यालाच कळते

१८-२४ फेब्रुवारी २०१९ च्या  साप्तहिक चपराक मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख...

साधारण १९८९-१९९४ ह्या पाच वर्षांचा तो काळ, काल अगदी सहज माझ्या स्मृतीपटलावर तरळून गेला.  एखादी जुनी चित्रफितच मी पाहतो आहे की काय इतका तो काळ माझ्या नजरेसमोर अगदी काल पर्वा घडल्याप्रमाणे एक एका प्रसंगाची आठवण करून देत होता.  खूप कष्टाचे पण आयुष्यातील मोलाचे असे ते सर्व अविस्मरणीय क्षण आजही आठवले तरी अंगावर रोमांच उभे रहातात आणि ह्या आठवणींमध्ये रमून जायला होते.

१९८९ साली मी आकुर्डी येथील एका खाजगी कंपनी मध्ये सहाय्यक विपन्नन अधिकारी पदावर रुजू झालो होतो.  मी राहायला धनकवडीला आणि कंपनी आकुर्डीला, त्यात कंपनीची बस नव्हती आणि येण्याजाण्याची सोय आपली आपण करायची होती. हे एक फार मोठे आव्हानच होते माझ्यासाठी.  अर्थातच माझ्या समोर ही नोकरी स्वीकारण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता.  एकतर मोठी व नावाजलेली कंपनी होती आणि नोकरी चांगल्या पगाराची होती.  मला आमच्या संसाराच्या उन्नतीसाठी ती करणे भागही होते.  रोज येवून-जावून ७० किलोमीटरचा प्रवास होता, तो मी बस अथवा इतर कुठल्याही सार्वजनिक वाहनाने करणे त्याकाळी शक्य नव्हते, कारण ते खूप वेळ खाऊ होते.  माझी मुलगी त्यावेळेस दीड वर्षांची होती.  वयस्कर सासू सासरे घरी असायचे.  बायकोच्या नोकरीच्या वेळा दर आठवड्याला बदलत असायच्या, कधी सकाळची, तर कधी दुपारची नाही तर रात्र पाळी असायची. त्यामुळे मला संध्याकाळी ७ पर्यंत घरी पोचणे खूप गरजेचे असायचे.  शेवटी मी आणि बायकोने खूप विचार करून एक निर्णय घेतला आणि मोठ्या धाडसाने कावासाकी ही मोटरसायकल विकत घेतली.  अर्थातच रु. २०,००००/-चे कर्ज काढून हो !  त्याकाळी मला मिळणारा पगार होता रु. ४०००/- महिना.  त्यात गाडीचा हप्ता रु. १२००/- महिना.  पेट्रोलचा खर्च रु. ८००/- महिना म्हणजे माझा निम्मा पगार गाडीच्याच नादात संपणार होता.  परंतु खूप विचारांती आम्हीं ही जोखीम घ्यायची ठरवली होती.  मग काय माझा रोजचा तो ७० किलोमीटरचा जुन्या पुणे-मुंबई हमरस्त्यावरील जीवघेणा प्रवास सुरु झाला, तो पाच वर्षे न थकता, न रडता आणि कुढता अखंड चालूच होता.  अतिशय अभिमानाने एक सांगावायसे वाटते की दर वर्षी मला माझ्या चागल्या कामाची आणि कष्टाची फळे ह्या कंपनीने दिली आणि खरोखरच आमच्या संसाराच्या उन्नतीसाठी खूप मोठा हातभार लावला हे ही तितकेच खरे आहे.  त्यामुळेच की काय ह्या कंपनीमधील ती कष्टाची पण अतिशय सुखद अशी पाच वर्षे आमच्या आयुष्यातील फार मोलाची आहेत.  काय नाही दिले ह्या पाच वर्षांनी मला !  माझ्यावर अगदी प्रेमाने विश्वास टाकणारे मालक लाभले, उत्कृष्ट सहकारी मिळाले, जीवाला जीव देणारे मित्र मिळाले, आर्थिक प्रगती झाली आणि एक सुखी व समाधानी आयुष्य लाभून कष्टाचे चीज झाले.

कंपनी मधील पाच वर्ष्यांच्या ह्या प्रवासात माझ्या आठवणीत अगदी खोलवर रुजलेला आणि मला आयुष्यात खूप काही शिकवून गेलेला हा अनुभव म्हणजे माझी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती (भांदक) तालुक्यातील चांदा दारुगोळा निमिती कारखान्यास दिलेल्या ३०-४० प्रवास भेटी !  होय ह्या ६० महिन्याच्या काळात मी जवळ जवळ ३०-४० वेळा चंद्रपूरला ह्या कारखान्यात कामा निम्मित जात होतो आणि प्रत्यके वेळेस गाठीला नवीन अनुभव घेऊन येत होतो हे मला चांगले आठवते आहे.  १९९० च्या फेब्रुवारी च्या सुरवातीला मला आमच्या व्यवस्थापकांनी आमच्या बंडगार्डन रोड येथील मुख्य कार्यालयात बोलावून घेतले आणि सागितले की उद्यापासून तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी टाकण्यात येणार व त्यासाठी तुम्हांला उद्या चंद्रपूर येथील चांदा दारुगोळा कारखान्यात जावे लागेल.  हे काम जर तुम्हीं जबाबदारीने व यशस्वीरीत्या पार पाडलेत तर तुमची पदोन्नती तर होईलच, पण तुमच्या पगारातही भरघोस वाढ करण्यात येईल.  अर्थातच व्यवस्थापनाने हा निर्णय तुमच्या आजवरच्या कामाचा विचार करून व गेल्या वर्षभरातील तुमच्यातील सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहून घेतलेला आहे !  माझ्यासाठी हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असेच झाले होते हो.  त्यादिवशी मोठ्या हिरीरीने घरी आलो, घरच्यांना सर्वात आधी ही आनंदाची बातमी सांगितली.  सगळ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता.  त्याच उत्साहात मी माझी दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाण्याची तयारीही करून टाकली होती.  खूप दिवसांनी मी साधारण एका आठवड्यासाठी घरापासून दूर जाणार होतो.  त्यामुळे थोडेसे भावविवश व्हायला झाले होते, परंतु लगेचच स्वत:ला सावरून उर्वरित तयारीस लागलो होतो.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे सकाळी कंपनीत गेलो आणि तेथूनच चंद्रपूरच्या कामाची सर्व कागदपत्रे, जाण्यासाठीचे खर्चाचे पैसे, व इतर माहिती घेऊन संध्याकाळी जरा लवकरच म्हणजे ५ वाजता घरी यायला निघालो.  पुण्याहून चंद्रपूरला जायला थेट गाडी नव्हती.  रात्री १०.४० ला पुण्याहून कोल्हापूर-नागपूर- महाराष्ट्र एक्सप्रेस ह्या रेल्वेने वर्धा किंवा नागपूर पर्यंत जायचे.  वर्ध्याला दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता ही रेल्वे पोचेते व नागपूरला साधारण ५.३० वाजता पोचते.  एकतर वर्ध्याहून आर्वी चंद्रपूर ही ५ वाजताची एसटी पकडायची किंवा नागपूरला जावून ६.३० ची नागपूर चंद्रपूर ही एसटी घ्यायची.  म्हणजे पुण्यातून आदल्यादिवशी रात्री १० वाजता निघालेली आमची स्वारी हा सगळा द्रविडीप्राणायम करून दुसऱ्यादिवशी साधारण रात्री १०-११च्या दरम्यान म्हणजेच २४-२५ तासांनी चंद्रपूरला पोहोचायची.  अर्थातच ह्या सगळ्या प्रवासात कधीही येण्याजाण्याच्या प्रवासात आरक्षण वगैरे केल्याचे मला स्मरत नाही.  चंद्रपूर स्टेशनच्या जवळच पोलीस ग्राउंडच्या समोर सिद्धार्थ नावाचे जरा उत्तम दर्जा असलेले एक लॉज मला सापडले होते.  मी नेहमी ह्याच लॉजमध्ये उतरायचो.  कारण रात्री ११ वाजता जरी पोचलो तरी ह्या लॉजमध्ये बार असल्यामुळे जेवणाची सोय व्हायची.  अर्थातच एक बिअर आणि बोनलेस बटर चिकन हा माझा ठरलेला बेत मी जेंव्हा जेंव्हा गेलोय तेंव्हा तेंव्हा न चुकता पाळलेला आहे हे सांगावयास नको !  दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून मला चंद्रपूरहून भांद्क चांदा कारखान्याला जाणारी एसटी पकडावी लागायची.  जी मला चांदा दारुगोळा कारखान्याच्या कर्मचारी वसाहतीमधील बस थांब्यावर सोडायची.  तिथून माझ्या एका सहकारी मित्राने दिलेल्या सुचनेनुसार काही ठराविक कर्मचाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट द्यावी लागायची. त्यांच्या मुलाबाळांसाठी काही भेटवस्तू आणलेल्या असायच्या त्या त्यांच्या सुपूर्त करायच्या व नंतरच दारुगोळा कारखान्याच्या मुख्य दरवाज्याकडे वाटचाल करायची, जो साधारण एक किलोमीटर दूर होता व तेथे जायला नशीब असेल तरच रिक्षा मिळायची. नाही तर गपगुमान डोक्यावर समान घेऊन चालत जाण्याशिवाय पर्यायही नसायचा.  अगदीच कोणाला दया आलीच तर तो सायकलवर डबलसीट न्यायचा.  पण हा योग तसा दुर्मिळच म्हणायला हरकत नाही.   ह्या भेटवस्तू देण्याची जी काही प्रथा अथवा परंपरा आमच्याच आधीच्या काही भाऊबंधांनी घालून ठेवलेली होती आणि ती आता कोणालाही मोडताही येत नव्हती.  ज्याने कोणी ती मोडण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांची कामं न झाल्यामुळे वैतागून शेवटी ह्याच मार्गाला आला होता हे ही एक जळजळीत सत्य होते.  (प्रवाहाच्या विरुध्द पोहायला गेल्यावर जे होते ते !).  कधी कधी आपल्याला आपली तत्वे, संस्कार गुंडाळून ठेवावी लागतात ना त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे असे मला वाटते. 

मी नवीन असतांना मला ही प्रथा माहित नव्हती, त्यामुळे तर मी चक्क दोन दिवस दारुगोळा कारखान्याच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर असलेल्या सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांच्या कृपेने तिथे असेलेल्या प्रतीक्षा कक्षामधे माश्या मारत बसून काढलेले आहेत.  कारण मला माझ्या कामासाठी त्यांच्या कार्यालयात जायची परवानगीच मिळत नव्हती आणि ती कशी मिळवायची ह्याची तेथील सुरक्षा कर्मचारी दादच लागू दिली नव्हती.  प्रत्यके सरकारी खात्यात अशीच काहीशी त्यांच्या त्यांच्या सोयीची व्यवस्था आपल्याच माणसांनी करून ठेवलेली असते फक्त ती माहित व्हायला तुमच्या कडे एक वेगळीच प्रतिभाशक्ती आणि धैर्यशीलता असावी लागते हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.  अर्थातच इच्छा तिथे मार्गही नक्कीच असतात हे मला पदोपदी जाणवत होते.  शेवटी पुण्यातीलच एक भले गृहस्थ मला भेटले व त्यांनी सहज बोलता बोलता माझी चौकशी केली.  जेंव्हा त्यांना मी इथे दोन दिवस नुसता बसून आहे कळल्यावर त्यांनी मला इथल्या सर्व कारभाराची, हाताचे काहीही राखून न ठेवता अगदी इतंभूत माहिती देवून, माझ्यापुढील खूप मोठ्या समस्येचे निराकारण केले.  तेंव्हा पासून मी जेंव्हा जेंव्हा भांद्क येथील दारुगोळा कारखान्यात गेलोय तेंव्हा तेंव्हा अगदी एका दिवसांत म्हणजे सकाळी जावून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळी कामे आटोपून ट्रेझरीचा धनादेश घेऊन पुन्हा पुण्याकडे यायला निघालेलो आहे.  फार विलक्षण अनुभव आहे हा !   माझ्या आयुष्यात मी सदिच्छा भेटवस्तूंचा एवढा जालीम उपाय आणि त्याचा इतका तात्काळ परिणाम अजून कुठेही अनुभवला नसेन.  असो.

चंद्रपूरहून परतीचा प्रवास फारच चित्तथरारक  असायचा.  चांदा दारुगोळा कारखाना ते भांद्क रेल्वे स्टेशन हे अतंर साधारणपणे ८-१० किलोमीटर असेल.  कारखान्याच्या मुख्य गेट जवळ कधी कधी काही रिक्षा असायच्या ज्या की कोणते तरी भाडे घेऊन आलेल्या आणि परतीच्या भाड्याची वाट पाहत थांबलेल्या असायच्या.  परंतु त्या नेहमी असतीलच ह्याची मात्र खात्री नसायची.  संध्याकाळी परतीच्या प्रवासात रिक्षा मिळणे म्हणजे नशिबाचच खेळ असायचा.  आजवरच्या प्रवासात माझे दैव मात्र बलवत्तरच राहिले आहे त्यामुळे मला नेहमीच रिक्षा मिळायची.  त्यात मी त्याने मागितलेल्या भाड्याच्या रकमेत कधीही घासाघीस करायचो नाही.  कारण माझे एकमेव उद्दिष्ट बल्लारशाहुंन नागपूरला निघालेली प्रवासी गाडी पकडण्याचे असायचं.  ही प्रवासी गाडी बरोबर ५.४५ ला भांद्क रेल्वे स्टेशनमध्ये यायची व जेमतेम ५-१० सेकंद थाबायची.  अर्थात ही गाडी चुकली तर मात्र भांद्कमधेच एका रात्रीचा मुक्काम करावा लागायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल त्या एसटी ने नागपूरला किंवा वर्ध्याला जावे लागायचे आणि तिथून मुंबई अथवा पुण्याला जाणारी रेल्वे पकडावी लागायची.  एक दिवसांनी प्रवासही वाढायचा जो अतिशय कंटाळवाणा वाटायचा.  एक दोनदा माझ्यावर तशी वेळही आली होती आणि मला चक्क जैन धर्मशाळेत मुक्काम करावा लागला होता.  व्यवस्था खूपच चांगली होती पण त्यांचे अतिशय कडक नियम पाळणे व बिना कांदा लसणाचे जेवण मात्र जात नसे.  तसेच एकदा तर मी चंद्रपूरहून लाल डब्याने शिर्डी पर्यंत आणि शिर्डीहून पुण्यापर्यंत प्रवास केलेला आहे.  फक्त पुण्यात उतरल्यावर माझीच हाडे मला मोजता येत नव्हती अशी अवस्था झाली होती.  असो. 

त्यामुळेच की काय माझा प्रयत्न पाच वाजायच्या आत सर्व कामे उरकण्याचा असायचा (जो आपल्या हातात अजिबात नसतो) जो बऱ्याचदा सफलही व्हायचा.  भेट वस्तूंची किमयाच असायची ही, त्यात माझे काहीच कर्तुत्व नसायचे.  मी त्याचे श्रेय घेणे अनाठाई होईल.  पाचवाजता कामं उरकून रिक्षा मिळून निघेपर्यंत ५.१० झालेले असायचे.  रिक्षावाल्यास फक्त विनंतीवजा आर्जव करायची की आपल्याला बल्लारशा प्रवासी रेल्वे पकडायची आहे.  बास एवढे त्याला पुरेसे असयाचे.  त्याप्रमाणे भाड्यात वाढही व्हायची, पण मला काळजी नसायची.  एका रात्रीच्या मुक्कामापेक्षा त्याला १०-२० रुपये जास्त देणे केव्हाही माझ्याच फायद्याचे असायचे.  अहो मला ह्या कलाकार रिक्षावाल्यांचे फारच कौतुक वाटायचे, ह्या जास्तीच्या पैशांमुळे ते ज्या अंतरासाठी ४० मिनिटे लागतात तेच अंतर ही मंडळी अगदी २५-३० मिनिटांत कापायचे.  अर्थात ह्या सगळ्या प्रवासात मी माझे बुड सीटवर टेकल्याचे स्मरतच नाही कारण त्याने रिक्षाचे विमानच केलेलं असायचं हो.  असो.  बऱ्याचदा मी ५.३०-५-४० पर्यंत भांद्क रेल्वे स्थानकात पोहचत असे.  अडचण एकच असायची की बल्लारशाहुंन येणारी प्रवासी गाडी २ नंबरवर प्ल्याटफॉर्मवर यायची.  त्यात भांद्क हे अगदीच छोटे स्थानक असल्यामुळे रेल्वेक्रॉसिंग साठी पादचारी जिनाही नव्हता.  जीव मुठीत घेऊन रेल्वे रुळ ओलांडून पलीकडे जावे लागायचे.  एकदा तर ७० डबे असलेली दगडी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी स्थानकात लाल सिग्नल मिळाला म्हणून उभी होती आणि पलीकडे जाण्याचा मार्गच तिने अडवलेला होता.  काही नेहमी ह्या गाडीने प्रवास करणारे प्रवासी जोखीम घेऊन ह्या थांबलेल्या मालगाडीच्या डब्याच्या खालून वाकून निघून जात होते.  मी पण तसा विचार केला होता पण दोन डाग सामान असल्यामुळे माझी हिम्मत होत नव्हती.  प्रवासी गाडी यायची वेळही होत आलेली होती.  शेवटी एका सद्गृहस्थाने मला मदत केली आणि मला त्या डब्यांच्या खालून वाट काढून दिली व सुखरूप पलीकडे पोचवले होते.  तेवढ्यात त्या मालगाडीला हिरवा कंदील मिळाला आणि धडाम्म आवाज करून ती मार्गस्थ झाली.  दोन तीन सेकंदाचाच काय तो फरक होता, त्यामुळे माझ्यातर काजळात धस्सच झाले होते.  चला वाचलो असे म्हणून पलीकडे पोचलो, तेवढ्यात प्रवासी गाडीही आली.  त्या सद्गृस्थाचे मनोमन आभार मानले आणि गाडी पडकली.  तिकीट तपासनीसास गाठले आणि आरक्षण मिळवले.  एक सांगतो, आमच्या सारखे नेहमी प्रवास करणाऱ्यांचे तिकीट आरक्षणा वाचून काही आडत नाही.  हे जे आमचे तिकीट तपासनीस मित्र असतात ना त्यांना आमच्या व्यथा माहित असतात आणि त्यांनी आमच्या सारख्यांसाठी काही तिकिटे नक्कीच राखून ठेवलेली असतात.  अर्थात ह्यात स्वार्थातून परमात्म साधण्याचा त्यांचा छोटासा प्रयास असतो हे ही तितकेच खरं आहे.  ह्या गाडीला नागपूर दादर ह्या एक्स्प्रेसचे दोन डबे असायचे व ते वर्ध्याला अलग होवून नागपूरहून येणाऱ्या गाडीस रात्री ११ वाजता जोडले जायचे.  त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे तिकीट तपासनीसाला थोडासा मस्का आणि योथोचीत दाम देवून व्यवस्थित शयन कक्षाचे आरक्षण मिळायचे.  वर्ध्याला रात्री ८ पर्यंत ही गाडी पोचायची आणि नागपूरहून दादरला जाणारी गाडी साधारण ११ वाजता यायची.  ३ तास ह्या डब्यांमध्ये काढावे लागायचे.  सामानाला साखळी लावून कुलूप लावायचे आणि स्टेशन समोरील साठेंच्या  (हो वर्ध्याचे माझी खासदार कै. वसंतराव साठे ह्यांचा) हॉटेलात जावून जेवायचं हा तर माझा नेहमीचाच शिरस्ताच झाला होता.  हे सगळं इतकं अंगवळणी पडलं होतं की काही विचारू नका !  जेवण झालं की दिवसभराचा थकवा जाणवायला लागायचा आणि शेवटी कंटाळून मी डब्यात जावून पथारी (म्हणजे सीटवर इंग्रजी वृतपत्र अंथरून, अंगावर एक धोतर पांघरून) टाकून मोकळे व्हायचो.   मला तर माझ्या ह्या प्रवासात वर्ध्याला नागपूर दादर गाडीला हे दोन डबे कधी जोडले जातात आणि गाडी वर्ध्याहून कधी निघायची हेच कळायचे नाही,  कारण आमची स्वारी दमून भागून झोपलेली असायची.  त्यात आमचे आरक्षण एकदम वरचे असल्यामुळे लोकांचा त्रासही फारसा व्हायचा नाही.  नेहमी प्रवास करणारे असल्यामुळे हे सगळे तसेही खूप अंगवळणी पडलेले होते.  पहाटे ६ / ७ वाजता ए चाय गरम” “चाय गरमह्या हाकेने जाग यायची.  तेंव्हा उठायचे, नाशिकरोड च्या अलीकडील कुठले स्टेशन आले आहे ते पहायचे.  तोंड धुवून मस्तपैकी एक गरम चहा घ्यायचा. निशिकरोड स्टेशन ८ वाजता यायचे.  मी शक्यतो नाशिकरोडलाच उतरत असे (तिकीट दादर पर्यंतचे असायचे, कारण चुकून झोप लागली तर वांदे नको व्हायला) आणि तिथून पुण्याला जाणारी एसटी पकडत असे.  म्हणजे त्याचं गणित असं होतं की, ह्या रेल्वेने दादरला पोचायला २ वाजायचे आणि दादरहून पुन्हा पुण्याला ५ पाच तास प्रवास, म्हणजे पुण्यात पोचायला संध्याकाळ व्हायची.  त्यामुळे मी नाशिकरोडला उतरून चक्क पुण्याला जाणारी कुठलीही एसटी पकडायचो आणि ५ तासात म्हणजे १ ते दोन च्या दरम्यान घरी पोचायचो.  अर्थात हा शोध जेंव्हा तुम्हीं नेहमी प्रवास करता तेंव्हाच अनुभवातून लागतो हे मात्र नक्की.

मी जेंव्हा जेंव्हा चंद्रपूरला जायचो तेंव्हा तेंव्हा माझ्या कंपनीचे मालक मी परत कधी येतोय ह्याची चातकासारखी वाट पहायचे, त्याचे कारण मी येतांना त्या काळचे ५-८-१० लाख रुपयांचा ट्रेझरीचा चेक आणायचो.  ह्या पैशांवर कंपनीची बरीचशी मदार असायची आणि म्हणूनच चंद्रपूरच्या साधारणपणे एक दीड महिन्यातून ठरलेल्या प्रत्येक दौऱ्यासाठी मलाच जाण्यासाठी हमखास गळ घातली जायची.  त्याचे कारणही मी जेंव्हा जेंव्हा गेलेलो तेंव्हा तेंव्हा नक्कीच पैसे घेऊनच परत येत असे.  माझ्यावर त्यामुळे आमच्या मालकांचा खूप विश्वास बसलेला होता व ते मला खूप आदराने वागावयाचे.  एक मात्र आहे की माझ्या बरोबरच्या इतर काही सहकाऱ्यांना माझा फार हेवा वाटायचा.  त्यांना वाटायचे साला, मालकांच्या अगदी मर्जीतला झाला आहे त्यात त्याच्या मनाला येईल तेवढे पैसे त्याला खर्च करायची मुभा आहे ज्याचा हिशोब तर सोडाच पण पावती, बिलं वगैरे काहीच नाही.  सदिच्छा भेटींवरच खूप खर्च करतोय पठ्ठ्या, मग का नाही काम होणार ! आम्हांला संधी मिळाली तर आम्ही सुद्धा यशस्वी होवून दाखवू !  माझ्या पाठीमागे अशी खूप चर्चा होत असे आणि माझा एक सहकारी मित्र मला आल्यावर त्याचा वृतांत सांगत असे.  मी त्याला नेहमी सांगायचो की, तू लक्ष देवू नकोस.  मालक काय ते बघून घेतील.  कारण त्यांना आणि मलाच मी चांदा कारखान्यात जावून जे काही दिवे लावले आहे ते माहिती आहेत आणि त्यांचा माझ्यावर पूर्ण भरवसा आहे.  मी १९९४ साली नोकरी सोडल्यानंतर नंतर मला कळले की चांदा कारखान्याने ते कंत्राटच संपले होते व ते कंपनीला परत मिळाले नव्हते.

अशा रीतीने साधारण ४-५ दिवसांचा जीवाची दमणूक करणारा, पण कार्य सफलतेचा आगळा वेगळा आनंद देणारा हा प्रवास मनाला नेहमीच उभारी देवून जायचा.  ह्या चारपाच दिवसांत माझा दुचाकी वरचा रोजचा ७० किलोमीटरचा प्रवास मात्र नक्कीच वाचायचा व ह्या प्रवासचा थकवा एकदम नाहीसा व्हायचा, हे ही नसे थोडके !

ज्याचे जळते, त्यालाच कळते

रविंद्र कामठे
१६ फेब्रुवारी २०१९