Thursday 25 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – सकारात्मक दृष्टीने साकारलेला एक भव्य प्रकल्प


अनुभवाच्या शिदोरीतून सकारात्मक दृष्टीने साकारलेला एक भव्य प्रकल्प

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

२००३हे वर्ष बहुतेक माझी कसोटीच घेणारे होते की काय कोणास ठाऊक !  आधीची नोकरी तर गेलीच होती, त्यामुळे मागील वर्षी घेतलेला भूखंडही आर्थिक नियोजन ढासळ्यामुळे विकावा लागला होता व माझ्या भविष्यातील योजनेवर बोळा फिरवला गेला होता.  मी कितीही नाही म्हणालो तरी थोडासा व्यथित होऊन हिरमुसलो होतो. 

अथक प्रयत्नांती, शिवाजीनगर येथील फायबरग्लासचे डोम बनविण्याच्या कारखान्यात ८-१० हजाराची एक नोकरी, एका मित्राच्या ओळखीने मिळाली होती.  आधी मालक असलेला माझ्या मित्राचा मित्र, नंतर माझाही खूप चांगला मित्र झाला, ही खूप मोठी उपलब्धी होती !  अहो ह्या व्यक्तीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डोम केला आहे व त्यासाठी त्याला पारखे पारितोषिक मिळाले आहे. खुद्ध लता मंगेशकर आणि त्यावेळेसचे पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेली ही आसामी, मला मित्र म्हणून ह्या नोकरी निमित्त लाभली होती.

मी कारखान्यातले सर्व व्यवस्थापन सांभाळत होतो व त्याच बरोबर माझ्यातील मार्केटिंग कौशल्याचा वापर करून वेगवेळ्या आर्किटेक संस्थेशी संधान बांधून फायबरग्लास डोमची कामेही मिळवत होतो.  असेच एक दिवस फातिमानगर नगर भागात फिरता फिरता, एका मोठ्ठ्या व्यावसाईक इमारतीचे बांधकाम माझ्या नजरेत पडले.  सवयीने, मी त्या इमारतीतील कार्यालयात गेलो व चौकशी करू लागलो.  बांधकामावरील अधिकाऱ्यास भेटून आमच्या कंपनीची माहिती देवून आमच्या लायक काही काम असेल तर सांगा असे बोलत होतो.  इतक्यात तिथे त्या इमारतीचे मालक आले व त्यांनी आमचे संभाषण ऐकले व माझ्या हातात असलेले, आम्हीं केलेल्या वेगवेगळ्या डोमचे फोटो पहायला घेतले.  त्या फोटो मध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डोमचाही फोटो होता.  त्यांनी मला विचारले की आपण आत्ता बसलो आहे त्या इमारतीमधील एक ४० फुट रुंद आणि १४० फुट लांब गाळ्यावर फायबरग्लासचा डोम करायचा आहे व तो तुमची कंपनी करू शकेल का ह्या गाळ्यात मध्ये कुठेही एकही आधार न घेता तो बनवायचा होता हे त्यातले विशेष होते !  अगदी सहज काही काम आहे का बघायला आत शिरलो तर, इथे तर कामाचे मोठ्ठे घबाडच माझ्या हाती लागले होते !  मी माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य अतिशय बेमालूमपणे झाकले व त्यांना त्याच आत्मविश्वासाने उत्तर दिले की तुमचे हे काम फक्त आम्हीच करू शकतो, जसे दिनानाथ हॉस्पिटलचे केले आहे तसे !  झाले त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यास मला घेवून ताबडतोब त्यांच्या पुलगेट येथील आर्किटेकच्या कार्यालयात यायला सांगितले.

आर्किटेकच्या कार्यालयात जावून मी त्यांना काय हवे आहे त्याची माहिती घेतली.  त्यांनी आरेखन केलेले काही कागद मला दिले आणि एक चार दिवसांत संपूर्ण कामाचे स्वरूप, त्याच्या खर्चाचा अंदाज आणि लागणारा वेळ, ह्या सहित त्यांच्या कॅम्प स्थित महात्मागांधी रोड वरील मुख्य कार्यालयात आमच्या मालकांना घेवून भेटायला या सांगितले.

५ वाजता मालक आले.  त्यांना कधी एकदा ही ह्या नवीन कामाची माहिती देतो आहे असे मला झाले होते.  न राहवून त्यांना मी आज केलेला हा प्रताप ऐकवला आणि दोन मिनिटे त्यांच्या चेहऱ्यावरील त्यांनाही बसलेला आश्चर्याचा धक्का अजमावत होतो.  ह्या कामाचा अवाका आणि त्याची आम्हांला मिळू शकणारी संधी पाहून त्यांनी माझे मनापासून कौतुक तर केलेच पण, लगेच एक चहा व एक सिगरेट पाजून मला खूशच करून टाकले. 

तीन दिवसांत आम्हीं ह्या कामाची सर्व माहिती आणि आरेखन ह्यांचा सविस्तर विचार करून अभ्यास केला.  एक डोम म्हणजे व्हाल्ट ४० फुट रुंद व १४० फुट लांब होता. हा संपूर्ण डोम फायबरग्लासमधे तयार करायचा होता व कुठल्याही आधाराशिवाय त्या गाळ्याच्या ७व्या मजल्यावर बसवायचा होता, ज्यातून साधारण ६०% उजेड येईल, पण पाण्याचा एक थेंबही आत येणार नाही, तसेच खालच्या मजल्यावर हवाही खेळती राहील अशी व्यवस्था करायची होती. 

एकंदरीतच ह्या कामाचे स्वरूप तसे अवाढव्यच होते व आमच्या कंपनीला झेपेल की नाही ह्याची शक्यता पडताळणे गरजेचे होते.  त्यामुळे ह्या कामाची आम्हीं तपशीलवार उजळणी केली, कामगारांशी चर्चा केली, शिवाजीनगरच्या कारखान्यात हा डोम कसा बनवायचा व तो फातिमानगरला कसा न्यायचा तसेच डोम ७ व्या मजल्यावर कसा लावायचा ह्याचा संपूर्ण आराखडा अक्षरश: तीन दिवस व रात्र खपून तयार केला.  लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती घेतली व त्याची उपलब्धता व किंमत जाणून घेतली.  तसेच येणाऱ्या इतर सर्व खर्चाचा अंदाज काढला, नफा किती ठेवायचा हे ठरवले व एक ठोकताळा बनवून त्याचे रीतसर कागदपत्रे तयार करून ठेवली आणि ठरल्याप्रमाणे मी आणि मालक त्या इमारतीच्या मालकांना भेटायला त्यांच्या कार्यालयात पोचलो.  पहिल्या भेटीत त्यांनी आमच्या ह्या सर्व तयारीचे खूप कौतुक केले व आमची काम करण्याच्या प्रबळ इच्चाश्क्तीची प्रशंसा केली.  त्यांच्या अनुभवी वडिलांनी तर आमची तोंडवरच स्तुती केली.  नंतर आम्हांला कळले की त्यांनी पुण्या मुंबईच्या काही कंपन्यांना विचारणा केली होती, पण आमच्या एवढे चांगले काम कोण करू शकेल की नाही अशी त्यांना शंका होती.

आमची औपचारिक बोलणी सुरु होती.  तीन चार वेळा गाठी भेटीही झाल्या.  कामाचा तपशील व आम्ही दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकावर भरपूर चर्चाही झाली.  सरते शेवटी हे कंत्राट आम्हांला देण्याचे त्यांनी घोषित केले आणि तशी वर्कऑडर, आगाऊ रकमेसहित देवून लेगेचच कामाला सुरवात करायला सांगितले व कुठल्याही परिस्थितीत हे काम ४ महिन्यातच पूर्ण करण्याचे आश्वासन आमच्याकडून घेतले होते. 

हा एक डोम म्हणजे जवळ जवळ कात्रजच्या बोगाद्या एवढा होता.  आणि आंम्हाला एक नव्हे तर दोन डोमची ऑर्डेर मिळाली होती, ज्याची किमंत काही लाखांत होती.  आजवरच्या माझ्या मार्केटिंगच्या क्षेत्रामधील ही सर्वात मोठी सफलता होती.  

हा प्रकल्प फारच खडतर तर होताच पण अतिशय जोखीमिचाही होता.  मानसिक, आर्थिक आणि शारीरक कष्टाची कसोटी पाहणारा होता.  माझ्या आजवरच्या कार्यकाळातील अतिशय बहारदार अनुभव देणारा होता.  काय नव्हते ह्या प्रकल्पात हो;
ह्या प्रकल्पाची मोठ्या विश्वासाने संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकणारा मालक मित्र होता.  अहोरात्र न थकता वेळेत काम पूर्ण करणारे कामगार होते.  रात्री अपरात्री ह्या तयार झालेल्या पाकळ्या ट्रेलरवर चढवायला मदत करणारे सहकारी होते.  फायबरग्लासच्या ३० फुटी अर्धगोलाकार ८ पाकळ्या एका वेळेस मोठ्ठ्या ट्रेलरमध्ये टाकून त्या शिवाजीनगरवरून फातिमानगर पर्यंत जीकरीने पोचवणारे (२०-२५ ट्रीप करणारे) चालक होते (ज्याची फक्त रात्री १ ते ३ दरम्यानच वाहतुकीची परवानगी होती) व त्या पाकळ्या रात्रीत ट्रेलर मधून उतरवून घेवून ७व्या मजल्यावर चढवणारे धमाल हमाल होते.  तसेच ह्या ३० फुटी एक अशा अंदाजे एका बाजूला ४५ व दुसऱ्या बाजूला ४५ अशा एकूण ९० पाकळ्या एकमेकांना अधांतरी जोडून त्याचे एका डोम (व्हाल्ट) मध्ये रुपांतर करणारे विशिष्ट कौशल्य असलेले जिगरबाज कामगार होते.  कोणा कोणाचे कौतुक करायचे !  सगळेच जण ह्या प्रकल्पात स्वत:ला झोकून देवून काम करत होते व माझ्या कारकीदीत एका अनोख्या व सफल प्रकलपाची भर घालत होते.

एक सांगतो ह्या प्रकल्पामुळे मला उलगडलेले एक गुपित सांगतो
;
सकारात्मक दृष्टीने पाहून आलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत. आयुष्यात कुठलेच काम कधीच कठीण नसते किंवा अशक्य नसते.  फक्त आपण जोखीम घेऊन आपल्या इच्छाशक्तीवर भरवसा ठेवून, निष्ठेने ते पूर्णत्वास न्यायचे असते.  यश तर नक्कीच असते आणि त्याचे फळ तर आपल्या मानसिक आणि आंतरिक समाधानातच दडलेले असते.  हा माझा तरी अनुभव आहे, जो मला तुमच्याबरोबर ह्या लेखाद्वारे पोचवावासा वाटला !

रविंद्र कामठे


Sunday 14 April 2019

पक्षी आणि पाणी



नमस्कार मित्रांनो,
ह्या वर्षी तापमानाने तर मार्च महिन्याच्या अखेरीपासूनच ४०शी गाठली आहे आणि माणसांच्या अंगाची लाही लाही होते आहे.  घरातून बाहेर पडावेसे वाटत नाही हो ! पुण्याचे अगदी नागपूर चंद्रपूर झाल्यासारखे वाटत आहे.  हे असेच चालू राहिले तर जगणेच मुश्कील होऊन बसेल असेच मला वाटते आहे. माणसांचे हे हाल आहेत तर पक्षांचे किती हाल होत असतील ह्याचा नुसता विचार जरी केला तरी भोवळ आल्यासारखे होते हो ! आपल्या ह्या सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात पक्षांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागत आहे व त्यात त्यांचा जीवही जातो हो.  हे वाचले की मन अगदी विषण्ण होते. 
म्हणूनच मी नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही पक्षांच्या पाण्यासाठीची थोडीशी सोपी पद्धत अवलंबली आहे.  टाकाऊ पाण्याच्या बाटलीतून ह्या पक्षांच्या पाण्यासाठीची एकदम सोपी पद्धत सोबतच्या फोटोत दाखवली आहे तशी तुम्हीं सुद्धा घरच्या घरी करू शकता अशी आहे.  थोडक्यात मी तुम्हांला ही पद्धत सांगतो..
दोन लिटर किंवा पाच लिटर पाण्याची बाटली घ्या.  एक स्क्रूड्रायव्हर अथवा टेस्टर घ्या.  तो मेणबत्तीवर गरम करून बाटलीच्या तळाशी एक भोक पाडा.  घरातील शोभेच्या माश्यांच्या साठीची ऑक्सिजनची एक नळी घ्या.  ती साधारण ६ इन्च लांबीवर कापा.  माश्याच्या साठी ऑक्सिजनचा एक नॉब मिळतो तो ह्या नळीच्या एका टोकाला लावा आणि नळीचे दुसरे टोक बाटलीच्या तळाला जे भोक पाडले आहे त्याच खूपसवा आणि त्यावर फेविक्विकचे तीनचार थेंब सोडा.  झाले आपले ठिबक सिंचन योजना तयार झाली.  आता जवळच्या नर्सरीतून मातीचे एक पसरट पण थोडे खोल भांडे आणा.  ह्या भांड्यावर ही बाटली साधारण फुटभर उंचीवर बांधून ठेवा.  म्हणजे अगदी थेंब थेंब पाणी सतत ह्या मातीच्या भांड्यात पडत राहील.  हे असेच सतत पाणी पडल्यामुळे एवढ्या उन्हातही ते थंड राहते.  त्यासाठी सुरवातीला निम्मे भांडे भरून पाणी ठेवा म्हणजे अगदी भर उन्हात सुद्धा पक्षांना थंडगार पाणी मिळेल.  दिवसातून एकदा तुमच्या सोयीने ह्या बाटलीतील पाणी बदलत रहा तसेच मातीचे भांडे स्वच्छ करून ठेवा.  ह्यामुळे पक्षांना थंड पाणी मिळेल आणि आपल्याला एक सात्विक आनंद मिळेल जो लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही.  हा माझा स्वत:चा अनुभव आहे.  माझ्या घरच्या सर्व दिशांना ही अशी पाण्याची सोय मी १२ ही महिने करतो. उन्हाळ्यात फक्त जरा जास्त लक्ष द्यावे लागते.
तुम्हीं जर रोज कुठे फिरायला, जात असाल तर एक बाटली आणि एक मातीचे भांडे तुमच्या ह्या नेहमीच्या ठिकाणी नेऊन ठेवा.  रोज सकाळी फिरायला जातांना बरोबर पाणी घेवून जा आणि ही रिकामी झालेली बाटली भरून या.  त्यामुळे ह्या पक्षांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही आणि तुम्हांलाही त्यांना पाणी दिल्याचे आत्मिक समाधान मिळून जाईल. ह्याचा अजून एक उपयोग म्हणजे तुम्हीं तुमच्या बागेतील झाडांनाही ठिबक सिंचन योजने द्वारे पाणी देवून ती ह्या कडक उन्हात जिवंत ठेवू शकता.
मी काही फार मोठे वैज्ञानिक संशोधन वगैरे केल्याचा आव आणत नाही.  तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी हा प्रयोग केलाही असेल.  तरीही ज्यांनी हा केला नसेल त्यांच्या साठी अजूनही वेळ गेलेली नाही.. आजकाल मी तर माझ्याबरोबर ह्या प्रकारच्या बाटल्या बनवण्याचे साहित्य बरोबरच ठेवलेले असते.  तुमच्याकडची पाण्याची बाटली द्या, मी तुम्हांला अगदी पाच मिनिटांत फोटोत दाखवल्याप्रमाणे ही ठिबक सिंचन योजना करून देवू शकतो. तेवढेच मनाला समाधान बाकी काही नाही.
कराल ना एवढचं आपल्या ह्या पक्षी मित्रांसाठी...
पर्यावरण रक्षणासाठी आपला हा खारीचा वाटा खूप अनमोल आहे हे लक्षात असू द्या.  हे पक्षी जर वाचले तरच हे पर्यावरण वाचेल हे नक्की.

रविंद्र कामठे
१४ एप्रिल २०१९

Wednesday 3 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – सहाच महिन्यांची नोकरी


अनुभवाच्या शिदोरीतून सहाच महिन्यांची नोकरी
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

मला आपल्या ह्या स्मरणशक्तीबद्दल एक कुतूहल वाटत आले आहे. निसर्गाने माणसाला जर स्मरणशक्तीचे वरदान दिले नसते तर ???? असा एक वेगळाच प्रश्न माझ्या डोक्यात घोळत बसतो, ज्याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात; नकळत मी अजून एका अनुभवाच्या भोवऱ्यात जावून अडकतो !  हा भोवरा इतका विलक्षण असतो की, त्यातून सुटका करता करता पार दमछाक होते हो ! तसं पहायला गेलं तर ह्या चांगल्या / वाईट स्मृतींवरच आपण आपले जीवन कंठत असतो हे ही तितकंच खर आहे.

१९८६च्या सुरवातीलाच मी नुकताच माझ्या पहिल्या नोकरीचा राजीनामा दिला होता; कारण शनिवार पेठेतील एका संगणक क्षेत्रातील कंपनीच्या मुलाखती मध्ये मला आधीच्या नोकरी पेक्षा चांगल्या पगाराची आणि फिरतीची नोकरी मिळाली होती.  वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरायला मिळणार व प्रवास भत्ता आणि त्यात पगारही चांगला म्हणजे महिना १२०० रुपये मिळणार होता.  तसेच माझ्या कायद्याच्या पदवीधर परीक्षेच्या अभ्यासासाठी व परीक्षेसाठी सुट्टीही मिळणार होती.  एका हातात नोकरी मिळाल्याचे पत्र होते आणि दुसऱ्या हातात विशाखापट्टणमचे रल्वेचे तिकीट होते.  म्हणजे १ तारखेला नोकरीवर रुजू झालो आणि लगेचच दुसऱ्याच दिवशी मी आणि माझ्या बरोबरचा एक सहकारी असे आम्हीं दोघेही आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमला रवानाही झालो होतो. 

ह्या सल्लागार कंपनीला महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेच्या निवृत्तीवेतेन धारकांच्या खात्यांचे संगणकीकरण करण्यासाठीचे कंत्राट मिळाले होते.  आमच्या कामाचे स्वरूप म्हणजे ह्या बँकेच्या खात्यातील निवृत्तवेतन धारकांची सर्व माहिती एका विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या फॉर्म मध्ये बँकेच्या रजिस्टरमधून टिपून घ्यायची व नंतर ती एका विशिष्ट संगणक प्रणालीत मध्ये नोंद करून त्या त्या बँकेच्या मुख्य कार्यालयालातल्या संगणकावर सुरक्षितरीत्या जमा करायची.  ही म्हणजे आजच्या काळातील बँकांच्या संगणकीय विस्ताराची नांदी होती असे म्हणावयास हवे ! आम्हांला विशाखापट्टणम येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेचे व जवळच्या एका गावातील शाखेचेही काम देण्यात आले होते व हे सगळे काम महिनाभरात उरकायचे होते.

एकंदरीत कामाचे स्वरूप फारच गमतीशीर होते, प्रवास करायला मिळेल ह्या उद्देशाने खरं तर मी ही नोकरी स्वीकारली होती आणि पगारही चांगला होता, पण जेंव्हा हे असले बिनडोक्याचे (असे मला वाटले) काम करायला लागल्यावर एक दोन दिवसांतच त्या कामाचा मला कंटाळा आला होता आणि ही नोकरी स्वीकारल्याचा पश्चाताप वाटायला लागला होता. 

एक तर ह्या नवख्या शहरात आणि त्यात रोज तास दोन तासाचा प्रवास करून अजून एका कुठल्यातरी खेडेगावात जायला लागायचे.  तिथल्या लोकांना ना धड हिंदी कळायचे ना धड इंग्रजी !  प्रवासात तर अनंत अडचणींचा सामना करायला लागायचा.  त्यांच्याशी संवाद साधतांना आमची पुरी दमछाक व्हायची.  परंतु काम पूर्ण करण्याशिवाय आमच्या कडे दुसरा काही पर्यायही नव्हता.  दक्षिण भारतात भाषेची इतकी अडचण असेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते ! म्हणजे मला तर वाटले होते की हिंदी नाही तर कमीत कमी तोडकं मोडकं इंग्रजी तरी बोलत असतील हे लोकं. पण छे; काहीही झाले तरी ते त्यांच्या भाषेतच आपल्याशी संभाषण साधण्याचा प्रयास करायचे.

ह्या महिनाभरात आम्हांला ना धड जेवायला वेळेवर मिळत होते ना धड मनासारखे काही खायला मिळत होते.  सगळीकडे फक्त भात आणि भात रस्सम पाहून आमची तर जेवणावरची वासनाच उडाली होती.  आईच्या हातच्या आणि महाराष्ट्रीयन जेवणाची प्रकर्षाने आठवण होत होती.

आपल्याला ह्या शहरामध्ये मस्तपैकी फिरायला मिळेल, तिथल्या ऐतिहासिक ठिकाणांची ओळख होईल, मनसोक्त खादडायला मिळेल, काही ओळखी होतील, संस्कृतीची ओळख होईल.. वगैरे वगैरे...पण ह्या सगळ्या भ्रामक कल्पनाच होत्या.  त्यांचे कारण कामा ज्या कामानिमित्त आम्हीं गेलो होतो त्यातच आमचा दिवस कधी उगवत होता आणि कधी मावळत होता हेच कळत नव्हते आणि भरीला भर रोज तिथल्या बसने तास दोन तासांचा करावा लागणारा तो प्रवास तर अगदी जीवावरच यायचा. एखाद दिवस सुट्टीचा मिळायचा तो, कडपे धुणे, ते वाळले की इस्त्री करणे, खोली साफ करणे, आठवड्याची झोप पूर्ण करणे वगैरेतच जायचा. 

महिन्याभरात सुट्टीच्या एक दोन संध्याकाळी आम्हीं मनाचा हिय्या करून जवळील रामकृष्ण बीच वर थोडावेळ फिरून आलो होतो आणि विशाखापट्टणमला आल्याचे सार्थक केले होते.  त्यानंतर माझे परत तिकडे कधी जाणेच झाले नाही त्यामुळे आता फारसे काही आठवतही नाही.  म्हणजे स्मरणशक्तीला ताण दिला तरी फारसे काही स्मरत नाही.
 
विशाखापट्टणमवरून रात्री अपरात्री पुण्यात परत आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कामावर हजर झालो.  नोकरी नवीन असल्यामुळे काही पर्यायही नव्हता.  रेल्वेचा प्रवास असल्यामुळे फारसा शीण नव्हता झाला, पण एकंदरीत हे काम मला मुळातच फारसे आवडले नसल्यामुळे कामावर जायचा खूप कंटाळा आला होता.  जावे तर लागणारच होते, कारण पैशांचा आणि कामाचा अहवाल साहेबाला देणे गरजेचे होते आणि ती माझी नैतिक जबाबदारीही होती.  ती टाळणे माझ्या तत्वात बसत नव्हते.  स्वत:चीच समजूत काढून मी त्यादिवशी ऑफिसला गेलो.

विशाखापट्टणमचा माझ्याकडे असेलेला सर्व अहवाल जमा केला; त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही काळ चर्चाही झाली.  ह्या चर्चेमुळे माझा ह्या कामाबद्दलचा गैरसमज थोड्या प्रमाणात कमी झाला.  मला त्यात काही तरी नाविन्य आहे हे जाणवले.  मी समजत होतो इतके काही ते काम टुकार नव्हते !  मी नवीन असल्यामुळे माझ्याबरोबरच्या सहकाऱ्याने मला माझे काम नीट समजून सांगितलेच नव्हते (जे सांगण्याची कंपनीने त्याला जबाबदारी दिली होती) आणि त्याने स्वत:चे काम टाळण्यासाठी माझ्याकडून काही बारीकसारीक कामेही करून घेतली होती, त्यामुळेच माझा कामाप्रती पूर्वगृह दुषित झाला होता, एवढेच ! 

एक शिकवण मला मिळाली की, कुठल्याही प्रकारचा कामाचा अनुभव हा आपली जिज्ञासा जागृत ठेवूनच घ्यायचा असतो.  नवीन काम असले म्हणून काय झाले, थोडेसे अवलोकन, कान आणि डोळे उघडे ठेवून केलेले निरीक्षण व कामाप्रतीचा आदर हे अतिशय महत्वाचे तत्व मला उलगडले, जे मला पुढे आयुष्यभर उपयोगी पडले हे मात्र शभर टक्के खरं आहे.

नंतर मला माझ्या कामासंदर्भातले संगणकीय प्रशिक्षण देण्यात आले.  संगणकावर काम करायला मिळते आहे पाहून माझा गैरसमज दूर झाला आणि हळू हळू माझा उत्साह वाढू लागला.  दोन तीन महिने मी अगदी मन लावून हे काम तडीस नेले.  मध्येच आठ आठ दिवसांच्या महाराष्ट्रातीलच दोन तिन शाखांची कामे करून आलो होतो.  त्यामुळे माझ्या कामावर वरिष्ठ एकदम खुश झाले आणि त्यांनी मला दादरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेची जबाबदारी दिली.  आठवड्यातून चार दिवस मी रोज सिंहगडने पुणे-दादर-पुणे करत असे व महिन्याभरात हे ही काम जबाबदारीने पूर्ण करून वरिष्ठांची शाबासकी मिळवली होती.  पुन्हा एकदा अजून एका वेगळ्या शहराची जबाबदारी माझ्यावर सोपवण्याचा त्यांचा मानस होता व त्यांनी तो मला बोलवूनही दाखवला होता.  त्याचवेळेस मी त्यांना माझ्या कायद्याच्या परीक्षेची आठवण करून दिली होती.

सारख्या फिरतीमुळे मला माझ्या कायद्याच्या पदवी शिक्षणात मोठा अडसर होऊ लागला होता.  मुळात मला अभ्यासाला आणि परीक्षेसाठी महिनाभराची रजा देण्याचे माझ्या मुलाखतीतच मालकांनी मान्य केले होते.  परंतु कामाचा ताण वाढल्यामुळे त्यांनी मला रजा देण्यास नकार दिला आणि माझ्या समोर नोकरी सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही.  माझा राजीनामा नामंजूर करण्यात आला, पण माझा नाईलाज होता व जेमतेम सहमहीनेच मला ही नोकरी करण्याचा योग आला.  कारण मला कायद्याची पदवी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे होते.  अशातच आमच्याच कर्तुत्वाने म्हणा अथवा नशिबाने म्हणा, चारीमुंड्या चीतपट होण्याचे गृह्मानही अगदी जोरावर होते... 

रविंद्र कामठे

अनुभवाच्या शिदोरीतून – निवृत्तीचा सोहळा


अनुभवाच्या शिदोरीतून निवृत्तीचा सोहळा

दुपारचे ४.३० वाजले होते.  मला एक फोन येतो.  सर, तुम्हीं तुमच्या चेंबरमधेच थांबा.  तुम्हांला बोलवले की वर टेरेसवर या !  पाच मिनिटांनी आमचे एक माजी आणि एक आजी संचालक, मला माझ्या पहिल्या मजल्यावरील चेंबरमधे, माझ्या निवृत्तीनिमित्त, तिथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या ठिकाणी, अतिशय सन्मानाने न्यायला आले होते.  त्या क्षणाला मला काय बोलावे हेच सुचत नव्हते.  क्षणभर मी स्तब्धच झालो होतो.  कसा बसा भावनांना आवर घालून एक आवंढा गिळला आणि त्यांच्या बरोबर चालू लागलो.  माझ्या त्या वेळेसच्या भावना मला व्यक्त करताच येणार नाहीत इतक्या संस्मरणीय आहेत !
त्यापुढे जाऊन अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे; आमच्या कार्यालयाच्या टेरेसकडे जाणाऱ्या पायऱ्यांपासून ते समारंभाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत, दुतर्फा उभे राहून सगळ्यांनी टाळ्या वाजवून मला माझ्या निवृत्ती निमित्त दिलेली सलामी म्हणजे; खऱ्या अर्थाने माझ्या आजवरच्या कार्याचा केलेला अनमोल असा गौरवच होता, असेच म्हणावयास हवे.  पाच मिनिटे चाललेला टाळ्यांचा हा कडकडाट, मला एका वेगळ्याच विश्वात घेवून गेला होता.  गेली ४० वर्षे केलेल्या कामाचे इतके अविस्मरणीय फळ लाभल्यामुळे मला कृतकृत्य झाल्या सारखे वाटत होते.  हात जोडून सगळ्यांच्या माझ्याप्रतीच्या आदराचा स्वीकार करतांना, मी अजूनच भावूक होवून, अतिशय जड अंत:करणाने व्यासपीठाकडे चालत होतो. 
माझ्या निवृत्ती निमित्त एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला असेल ह्याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.  कंपनीच्या संचालकांचे माझ्याबद्दलच्या प्रेम, स्नेह आणि आदराने माझा ऊर अभिमानाने भरून आला होता.  माझ्या ह्या सहकाऱ्यांच्या नजरेतून, त्यांच्या हालचालीतून माझ्याबद्दलची आस्था मला अगदी स्पष्टपणे जाणवत होती आणि मी मनोमन स्वत:ला खूप नशीबवान समजत होतो.  किती मोठी दौलत मी आजवर कमावली होती तिचा हा लेखाजोखा माझे डोळे दिपवूनच गेला होता आणि मला सर्वांदेखत रुमाल काढून माझ्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू टिपायला भाग पाडून गेला.
एक एक करून माझे काही सहकारी त्यांच्या भाषणातून, कवितेतून, विनसीस मधील माझ्या आजवरच्या कारकीर्दीचा, मागोवा घेवून मला अजूनच भावूक करून टाकत होते.  माझ्यातील काही कला गुणांची त्यांनी केलेली पारख ऐकतांना मन प्रसन्न झाले होते.  आपल्या कार्याचा नुसता आढावा जरी घेतला तरी अभिमान वाटतो; इथे तर माझ्यावर कौतुकाचा नुसता वर्षाव होत होता.  अतिशय नेमक्या शब्दांमध्ये माझ्या आजवरच्या कार्याचा असा मागोवा घेतांना काही अतिशय अनमोल अशा आठवणी व्यक्त केल्या गेल्या की त्या स्मृतींवर मी उर्वरित आयुष्य नक्कीच आनंदाने घालवू शकेन !  आपल्या हयातीतच नव्हे तर योग्य वयात जर आपले कौतुक केले गेले तर माझ्या मते जगायची एक नवी उमेद नक्कीच येते व आयुष्य सार्थकी लागल्याचे सुख मिळते, हे ह्या कार्यक्रमामुळे मला उमजले.  जीवन गौरव व्हावा पण तो योग्य वयात व्हावा असे मला वाटले आणि तो आज ह्या समारंभाच्या निमित्ताने जाणवला. 
ह्या समारंभात मला बहुमुल्य भेटी तर मिळाल्याच; त्या स्वीकारतांना हात तर जड होतच होते पण अंत:करणही तितकेच जड होत होते.  काळीज हलके होवून कधी नव्हे इतके डोळे पाणावले होते.  माझा एवढा आदर सन्मान करणाऱ्या कोणाचे, कसे आणि किती आभार मानायचे ह्या विचारत मी काही क्षण गढून गेलो होतो.
शेवटी तो अतिशय अवघड असा क्षण आलाच व मला माझे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली.  आधीच मी ह्या सगळ्यांच्या प्रेमाने, स्नेहाने आणि आदराने इतका भारावून गेलो होतो की; दोन मिनिटे शांत उभे राहून भरल्या डोळ्यांनी सर्वांना अभिवादन करून बोलायला सुरवात केली.  सुरवात अर्थातच अडखळतच झाली.  अशा वेळी काय बोलायचे !  ही वेळ काय आपल्या आयुष्यात नेहमी येत असते का ! तरीही कसाबसा धीर एकवटून मी माझे मनोगत व्यक्त केले.  नियोजित वेळे आधीच म्हणजे वयाच्या ५६व्या वर्षीच मी निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला होता हे ऐकण्याची सगळ्यांची इच्छा होती जी मला जाणवत होती. 
माझे निवृत्तीचे प्रयोजनही तसे खासच होते !  एक तर सध्या मला तब्बेत साथ देत नव्हती व रोजची कामाची दगदग सहनही होत नव्हती.  त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळावा व त्यातून सुधारणा झाल्यानंतर एखाद्या सामाजिक कार्यास हातभार लावून समाजाचे ऋण फेडावे. तसेच थोडेसे उशिराच सुचलेले शहाणपण म्हणजे साहित्य क्षेत्रात काही योगदान देता आले तर ते ही करावे; इतकीच प्रांजळ अपेक्षा समोर ठेवून मी हा निर्णय घेतला होता.  तब्बेतीने थोडी साथ ढिली केली होती पण परिस्थितीची आणि कुटुंबाची मजबूत साथ लाभली होती त्यामुळे आयुष्याची ही दुसरी खेळी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जगण्याचा माझा मानस मी व्यक्त केला होता.
हो विनसीस ही माझ्या ४० वर्षाच्या कारकिर्दीतील १३वी पण शेवटची नोकरी होती.  ह्या ४० वर्षामधील शेवटची ही ११वर्षे विनसीस मध्ये फारच सन्मानाने गेली होती त्याची प्रचीती मला ह्या कार्यक्रमात पदोपदी येत होती.  गेली ४० वर्षे मी भरपूर खूप खस्ता खाल्ल्यात.  नको इतके कष्ट केलेत. यंत्रा सारखे स्वत:चे शरीर वापरले होते.  त्यामुळे आता त्याला थोडी विश्रांती द्यावी थोडेसे स्वत:कडे लक्ष द्यावे, आपले छंद जोपासावे असे वाटले म्हणून हा योग्य वेळी घेतलेला निवृत्तीचा निर्णय सर्वच सहकाऱ्यांना अगदी मनापासून आवडला.  काहींनी तर मला प्रत्यक्ष भेटून माझे ह्या निर्णयाबद्दल खास अभिनंदन केले आणि माझा आदर्श समोर ठेवून त्यांची उर्वरित कारकीर्द पार पाडण्याची हमीच देवून गेले.  अजून काय हवे असते हो माणसाला.  कितीही पैसा कमावला तरी हे असे क्षण पदरात पडायला फक्त नशीबच असावे लागते हे ही तितकेच खरे.

ह्या कार्यक्रमासाठी खास तयार करून आणलेला केक त्यावर (All the best RK) हा संदेश. ह्या केकवर सुरी फिरवतांना खूप संमिश्र अशा भावना माझ्या मनात त्यावेळेस दाटून येवून माझ्या काळजाचे पाणी पाणी करून न राहवून मला रडवूनच गेल्या.
समारंभानिमित्त आयोजित अल्पोपहाराचा आस्वाद घेतांना उपस्थित प्रत्यकेजण, अगदी आपुलकीने, “सर तब्बेतीची काळजी घ्या”  जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा आम्हांला भेटायला या, आम्हांला मार्गदर्शन करा”, असे आवर्जून भेटून सागंत होता आणि मी स्वत:ला एक नशीबवान उत्सवमूर्ती समजत होतो.
ह्या सोहळ्याच्या आयोजन करणाऱ्या आमच्या कमिटीचे किती आभार मानायचे हेच मला काही समजत नाही.  ह्या कमिटीत माझी भाची सुद्धा होती, पण तिने मला ह्या संपूर्ण कार्यक्रमाची थोडीशी सुद्धा चाहूल लागून दिली नव्हती.  ह्या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था आमचे मनुष्यबळ अधिकारी, कार्यकारी संचालक आणि संचालिका (भारतात नसतांनाही) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती हे विशेष.  
ह्या सोहळ्यानिमित्त, बायको, मुलगी आणि जावई, ह्यांनी मला घरी न्यायला येवून दिलेला धक्का सुखद असा आयुष्याचा ठेवा होता. 

हाच तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस; शनिवार ३० मार्च २०१९.  ह्या दिवशी मी विनसीस आयटी सर्विसेस ह्या खाजगी कंपनीतून १० वर्षे ८ महिन्यांच्या अखंड कालखंडानंतर व आयुष्यातल्या ४० वर्षांच्या अथक सेवेतून वयाच्या ५६व्या वर्षी मी निवृत्त झालो होतो व माझ्याच एका कवितेशी समरस होवून गेलो होतो...
क्षण निवृत्तीचा, असतो दुभाषी,
एक मन म्हणते, निष्क्रिय झालासी, दुजे मन सांगते, सक्रीय व्हावेसी ||
क्षण निवृत्तीचा, असतो विलक्षण,
एक मन करते, भूतकाळाचे परीक्षण, दुजे मन सांगते, भविष्याची उजळण ||
क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ,
एक मन म्हणते, स्मृती तू उजळ, दुजे मन सांगते, क्षण हे उधळ ||
क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी,
एक मन म्हणते, उरलास सकळासी, दुजे मन सांगते, जुळवून घे समाजासी ||

आभार म्हणून नाही पण माझ्या सहकाऱ्यांच्या प्रेमा पोटी मला म्हणावेसे वाटते की;
सुवर्णाक्षरांनी गेला लिहीला,
माझ्या निवृतीचा हा सोहाळा ।
डोळ्यांत दाटूनी आले होते पाणी
कौतुकाच्या वर्षावाने नि:शब्ध जाहली वाणी ।
कसे, किती आणि कोणा कोणाचे आभार मानू
तुमच्या ह्या स्नेहाने मन गेले भरुन ।

रविंद्र कामठे