Wednesday 14 September 2022

अनोख्या रेशीमगाठी कादंबरीवरील कोकणवासी शुभेच्छुकांचा अभिप्राय.

 "अनोख्या रेशीमगाठी" ही लेखक रवींद्र कामठे उर्फ रवी काकांची कादंबरी म्हणजे त्यांच्यातल्या लेखकाला पडलेले अतिशय, सुंदर, प्रेमळ, सात्विक आणि निरागस असे स्वप्न आहे. 

काकांनी ज्या उत्कटतेने ही कादंबरी लिहिली आहे त्याला तोड नाही. नात्यांची रेशमी धाग्यांनी घातलेली वीण, त्यांच्यातील संवाद, परंपरेला फारशी तडजोड न करता घातलेली मुरड, लग्नसंस्थेतील व कुटुंब व्यवस्थेतील विविध विषयांना हात घालून सोडवलेला तीढा, कोकणातील आंजर्ले गावातील निसर्गसौंदयाचे व तेथील माणसांचे त्यांच्यातील चांगुलपणाचे व त्यागवृत्तीचे दर्शन घडवून समाजाला सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणारी आहे. दोन पीढ्यांचा तीढा सोडवतांना वापरलेली संवाद शैली तर इतकी वाखाणण्याजोगी आहे की वाचतांना पदोपदी भावूक व्हायला होते व डोळे पाणवतात. हे ह्या कादंबरीचे फार मोठे बलस्थान आहे व यशही आहे.

विधवा आणि विधूर यांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न लिव्ह ईन रिलेशनशीप सारख्या सध्याच्या काळातील कळीच्या उपायाने सोडवून काकांनी हा गंभीर मुद्दाही अगदी सहजपणे चर्चेत आणला आहे.

कादंबरी हातात घेतल्यापासून ती पूर्णपणे वाचून होईपर्यंत खाली ठेवावीशीच वाटत नाही. त्याचे कारण काकांनी वापरलेली अतिशय साधी व सोपी भाषाशैली आणि वाचकाशी साधलेला संवाद, कादंबरीची नेटकी मांडणी हे होय. 

चुका शोधण्यापेक्षा, गुणांकडे लक्ष दिल्यास वाचनाचा आनंद तर मिळतोच मिळतो, परंतू आपल्यातला एक संवेदनशील माणूसही जागृत होतो.

आम्ही तर ह्या कादंबरीच्या प्रेमात पडलो आहे. तीच्या विषयाशी समरस झालो आहोत. आम्ही मुळचे कोकणातलीच व संसारही कोकणातच केलेली माणसे. पण काकांनी एकंदरीतच आपल्या कुटुंबव्यवस्थेतील, परिवारातील वाद विवाद, भांडणे, द्वेष, मत्सर, इर्शा, राग, लोभ, राजकारण, समाजकारण व चुलीतली वादळे अक्षरक्षः चुलीत घालून, माणुसकीची नवी दिक्षाच दिली आहे असे आम्हाला तरी प्रामाणिकपणे वाटते.

काकांनी आपल्या रोजच्या आयुष्यातले इतके छोटे छोटे प्रसंग भावनेने ओथंबून वाचकांसमोर  अतिशय सहजतेणे मांडले आहेत की, काही वेळेस आपण निःशब्द होतो. भावूक तर होतोच होतो पण त्याचवेळेस संवेदनशीलही होतो.

कदाचित तुम्हाला आम्ही काकांच्या कादंबरीचे फार कौतुक करते आहे असे वाटेल, परंतू आमचा नाईलाज आहे. जे उत्तम आहे ते सांगायला का संकोच का करायचा. 

आम्हाला तर प्रत्येक प्रसंग भावला आहे. पात्रांची निवड, त्यांच्यातला संवाद, त्यांची आत्मियता, कळकळ, तळमळ, जिव्हाळा, माया, काय काय म्हणून सांगू. जे काही चांगलं आहे ते ओतप्रोत भरलेलं असल्यामुळे, आपण कधी कधी माणूस म्हणून किती वाईट वागतो हे जाणवले.  

इथे एक प्रसंग आवर्जून सांगावासा वाटतो, तो म्हणजे, आंजर्ल्याहून परतीच्या वाटेवर जीथे दीपाचा अपघाती मृत्यू झालेला असतो त्याठिकाणी पूजाने दीपकला गाडी थांबवायला लावून आजीने तीच्या भरलेल्या ओटीतल्या अर्ध्या ओटीने दीपाची ओटी भरुन तीच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठीची केलेली प्रार्थना होय व त्याला प्रभारकरनेही आश्चयचकीत होऊन तीला दिलेली साथ, लेखकाला वाचकाच्या मनात सर्वोत्तम स्थान मिळवून देण्यास भाग पाडतो. 

तसेच स्त्रीयांच्या आयुष्यातील रजोनिवृत्तीचा जो काळ असतो त्यावरही काकांनी अगदी थोडक्यात पण मार्मिक भाष्य करुन स्त्रीच्या नाजुक मनस्थितीचे दर्शन घडवून तीला लागणाऱ्या मानसिक आधाराची गरज सुस्पष्ट करुन एक प्रकारे समाज प्रबोधनच केल्याचे उमजते. 

दीपकच्या भाषणाने कादंबरीचे प्रयोजन व उद्दिष्ट सफल झाल्याचे समाधान लाभते.

आयुष्य इतकंही सोपं नाही

जितकं आपण समजत असतो..

आयुष्य इतकंही अवघड नाही

जितकं आपण ते करुन ठेवतो.... 

काकांनी आमच्या कोकणातल्या अनुभवी आजीच्या मनात घातलेल्या ह्या ओळी किती चपखल बसतात हे जाणवले.

आम्हाला आजवर रवी काकांचा लेखक हा गुण फारसा माहित नव्हता. अर्थात तो तेवढ्या गांभीर्याने घेतला नव्हता. त्यांचा प्रांजळ काव्यसंग्रह चाळला होता. तारेवरची कसरत अनुभवकथन येताजाता वाचले होते. त्यातले बरेचसे प्रसंग माहित असल्यामुळे त्यांच्यातल्या लेखकाकडे दुर्लक्ष झाले होते असे आता वाटते. त्यासाठी काका तुमची क्षमा मागतो.

काका तुमची ही कादंबरी आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. असो. 

अजून फार काही लिहित नाही कारण "अनोख्या रेशीमगाठी" कादांबरीचे कौतुक एक वाचक ह्या नात्याने करावे तेवढे थोडेच आहे. 

पुण्याच्या चपराक प्रकाशनचे एका पेक्षा एक उत्कृष्ट दिवाळी अंक काकांमुळेच वाचायला मिळाले आहेत. चपराक प्रकाशनने ह्या कादंबरीचे सर्वार्थाने सोने केले आहे असे म्हणावयास हवे. त्यासाठी घनश्याम पाटील यांचे आभार व्यक्त करायला हवेत.

आपले शुभेच्छुक.


No comments:

Post a Comment