Saturday 16 June 2018

सात्विक आनंद


चपराक साप्तहिक ११ जुन ते 18 जून मध्ये छापून आलेला माझा हा सात्विक आनंद हा लेख खास तुमच्या साठी...
सात्विक आनंद 
मी सकाळी ६.३०ला नेहमीप्रमाणे चालण्याच्या व्यायामास आमच्याच जवळील एका सोसायटीत जातो, तसा आजही गेलो होतो.  त्याचवेळेस आमच्या कडे घंटागाडी घेऊन कचरा गोळा करण्याऱ्या एक काकू आणि त्यांचा लहान मुलगा मला रोज सकळी त्यांची घंटागाडी घेऊन जातांना दिसतात.  अगदी नित्यनेमाने हे मायलेक मला रोज ओळखही दाखवतात, मी पण त्यांना हसून प्रतिउत्तर देत असतो.  पण आज काकूंच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  त्याचे कारणही तसेच होते.  त्यांचा मोठा मुलगा चक्क ७८ टक्के मार्क मिळवून बारावी पास झाला होता आणि ही बातमी कधी एकदा मला सांगते असे त्यांना झाले होते.  त्यांची ही बातमी ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला आणि टचकन माझे डोळे भरून आले.  त्याला कारण म्हणजे ह्या काकूंची आणि त्यांच्या मुलाची जिद्द, इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही ही माणसे कुठून एवढे धैर्य आणतात हेच कळत नाही. त्यांची आयुष्याशी लढण्याची ही जिद्द पहिली की आपल्या आयुष्यातील समस्या थिट्या वाटू लागतात.
त्याला कारणही तसेच आहे हो..
त्याचे असे झाले की मागील वर्षी ह्या काकूंच्या यजमानांना अर्धांगवायुने ग्रासले होते.  त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांनी जंग जंग पछाडून त्यांच्यावर उपचार करून त्यांना कसे बसे घरातल्या घरात उठते बसते केले होते.  ह्या अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एका मुलीचे लग्नही करून दिले आणि मोठ्या मुलास बारावीची परीक्षाही द्यायला लावली, तेही कोणापुढे हात न पसरता.  जेंव्हा त्या आमच्याकडे कचरा गोळा करायला येतात तेंव्हा आम्ही त्यांच्या यजमानांची अगदी आपुलकीने चौकशी करत असतो.  बाकी त्यांची कुठलीच अपेक्षा नव्हती आणि नाही.  परंतु त्यांना ह्याच आपुलकीची गरज होती आणि त्याचे त्यांना खूप अप्रूप होते.  म्हणनूच त्यांना मुलगा पास झाल्याची ही बातमी कधी एकदा आम्हांला सांगतोय असे झाले असेल कदाचित !
त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी तर झालोच आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून काकूंना त्यांच्या मुलाच्या बारावीच्या यशाचे पेढे वाटण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी बक्षीस दिली.  कदाचित हाच असेल का परमार्थ देव जाणे !
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझे आवरून कार्यालयास जायला निघालो होतो आणि रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभा होतो.  ह्या काकूंचा हाच तो यशस्वी मुलगा त्यांच्या बरोबर कचऱ्याची घंटागाडी घेऊन, एवढ्या मोठ्या यशानंतरही ती घंटागाडी ढकलत आपल्या आईस मदत करतांना पाहून माझे मन ह्या काकाकाकूंसाठी अभिमानाने भरून आले.  अशीही लेकरं जगात असतात की ज्यांना मिळालेले यशही साजरे करायला वेळ नसतो आणि हे यश मिळाल्यावर अशी मुलं हुरळून न जाता अजून मोठ्या जिद्दीने उभी राहतात आणि आपल्या आईवडिलांच्या उपकाराचे पांग फेडतात.  धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी अशी लेकरं जन्म घेतात.
मला आज तर स्वत: बारावीची परीक्षा पास झाल्यावर झाला नव्हता एवढा आनंद झाला होता हो ! मनातल्या मनात मी ह्या मुलास त्याच्या भविष्यासाठी मन:पूर्वशुभेछ्या दिल्या आणि ठरवले की भविष्यात जर कधी काकूंना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही मदत लागली तर ती आवर्जून करायची.  अर्थात त्यांच्या स्वाभिमानास कुठलाही धक्का न लागू देता !





Monday 4 June 2018

“व्ह्यालेनटाईन डे”


व्ह्यालेनटाईन डे


राजू आज मावस भावाकडून आणलेले त्याचे जुनेच पण जरा चांगले कपडे घालून तयार झाला होता.  आज १४ फेब्रुवारी म्हणजे व्ह्यालेनटाईन डे होता ना ! त्याला अशी कोणीच व्ह्यालेनटाईन म्हणजे मैत्रीण नव्हती, तरी सुद्धा सर्व मित्रांनी ठरवलेले असल्यामुळे, तो नेहमी पेक्षा वेगळे आणि चांगले दिसावे म्हणून त्यातल्यात्यात जरा बरे कपडे घालून कॉलेजला जायच्या तयारीत होता. 

राजूची घरची परिस्थिती तशी काही फारशी चांगली नव्हती.  आई बिचारी थोडेफार शिवण काम करून, तसेच चार पाच जेवणाचे डबे करून आपल्या संसाराचा गाडा ओढत राजूच्या वडलांना संसारात मदत करत होती.  राजूचे वडील एका खासगी कारखान्यात जेमतेम पगाराच्या नोकरीत होते.  कायम स्वरुपाची नोकरी नसल्यामुळे अंगावर पडेल तसे काम असायचे आणि त्यामुळे जसे काम असेल तसे त्यांना पैसे मिळायचे त्यामुळे त्यांची कमाई फार नसायची, पण दोन वेळेस पुरेल इतके ते आपल्या संसारासाठी करायचे.  खालच्या वाडीतल्या भाड्याच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचा हा संसाराचा गाडा ही मंडळी कसलीही तक्रार न करता रेटत होती.  ह्या माय बापाचे एकच ध्येय होते की आपल्या दोन्ही मुलांना चांगले शिकवून मोठे करायचे व त्यांच्या सुखी संसाराचे दिवस पहायचे.  छोटेसेच पण त्यांच्या ताकदीच्या पलीकडचे हे स्वप्न पुरे करण्यासाठी हे मायबाप अहोरात्र धडपडत होते.  राजूची लहान बहिण प्रिया आत्ता कुठे विमलाबाई गरवारे शाळेत बारावीत शिकत होती.  तसे पहायला गेले तर हे गरीब पण स्वाभिमानी आणि समाधानी असे चौकोनी कुटुंब होते. 
राजू कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात होता.  त्याच्या आईने मोठ्या जिद्दीने त्याच्या साठी पैसे साठवून त्याला गरवारे कॉलेज मध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश मिळवून दिला होता.  राजू कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून थोडासा बुजला होता.  त्याचे सगळेच मित्र अगदीच चांगल्या खात्यापित्या घरचे होते आणि तोच एकटा त्यांच्यात फारच गरीब घरचा होता ह्याचा त्याला एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.  त्यामुळे तो आपल्या ह्या मित्रमंडळीत फारसा मिसळतही नव्हता.  त्याची ही मानसिक कोंडी समजून घेणारा त्याचाच एक  अगदी जिवलग मित्र प्रदीप कायम राजूला ह्या विषयावर बोलून त्याच्या मनातील ही कोंडी दूर प्रयत्न करायचा.  राजूला त्याचे बोलणे समजायचे परंतु त्याचा मुळात स्वभाव परिस्थितीच्या रेट्यामुळे बुजरा झालेला होता व आपल्या नशिबाला कायमच दोषी ठरवत होता.  प्रदीपला ही गोष्ट समजत होती पण त्याला त्याच्या मित्राच्या ह्या मानसिकतेवर उपाय सुचत नव्हता.
प्रदीपही काही फार श्रीमंत कुटुंबातला नव्हता.  राजुपेक्षा जरा बरी म्हणजे खाऊन पिऊनसुखी कुटुंबातील होता.  प्रदीपला दोन बहिणी, मोठी बहिण पद्मा जी त्यांच्याच कॉलेज मध्ये वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला शिकत होती आणि लहान पल्लवी बारावीला राजूच्या बहिणीच्याच शाळेत होती.  वडील सरकारी नोकरीत कारकून होते तर आई आपटे प्रशालेत प्राथमिक शिक्षिका होती.  त्यांचे मधल्या वाडीत दोन खोल्यांचे स्वत:चे घर होते त्यामुळे एकंदरीत चांगले चाललेले होते.  राजूच्याच वाडीत म्हणजे मधल्या वाडीत प्रदीप राहायला असल्यामुळे त्यांचे घरी येणे जाणे ही होते आणि घरातले सगळे एकमेकांना चांगले ओळखतही होते आणि मुलांचीतर खूपच चांगली मैत्री होती.  सर्वसाधारणपणे सणासुदीला तसेच काही सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांमधून ह्या दोन्ही कुटुंबाच्या भेटीगाठी होतच असायच्या. एकमेकांबद्दल आस्था असलेली ही दोन्ही कुटुंबे म्हणजे समाजासाठी अगदी आदर्श होती.  राजूचे आई वडील जरी गरीब असले तरी प्रदीपचे आई वडील त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवत होते त्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा स्वाभिमान आणि परिस्थितीपुढे हतबल न होता लढण्याची जिद्द.  गरिबीमुळे त्यांना शिकता नाही आले म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचा एक संकल्पच केला होता आणि ज्यात त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्यच पणाला लावले होते ह्याचा कोण अभिमान प्रदीपच्या वडलांना होता.  सध्याच्या काळात अशी माणुसकी असलेली माणसे शोधूनही सापडत नाहीत असेच त्यांचे मत होते आणि ते आल्या गेलेल्यांना हे अगदी निक्षून सांगत असत.

पल्लवी आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती.  तिला ह्या व्ह्यालेनटाईन डेचे फारसे काही घेणे देणे नव्हते.  तिची बारावीची परीक्षा अगदीच तोंडावर आलेली होती.  त्यात आज राजूची बहिण प्रिया आणि ती दोघी मिळून अभ्यास करत होत्या.  बरेचसे पेपर तिने सोडवायला आणले होते.  जे ती आज प्रियाकडून सोडवून घेणार होती.  पल्लवीचे हे पेपर क्लास मधेच सोडवून झालेले होते.  पण प्रिया परिस्थितीमुळे क्लास लावू न शकल्यामुळे तिला मदत म्हणून पल्लवी तिच्याकडून हे सगळे पेपर सोडवून घेऊन तिला अभ्यासात मदत करणार होती आणि त्यामुळे तिच्याही अभ्यासाची चाचणी होणार होती.  पल्लवी आणि प्रिया अभ्यासात अगदी गढून गेलेल्या होत्या बाकी कशातच त्यांचे अजिबात लक्ष नव्हते.  फक्त अभ्यास अभ्यास एके अभ्यास.  चांगल्या मार्कांनी पास होणे एवढाच त्यांचा उद्देश होता. अधून मधून त्यांची ताई पद्मा त्यांच्यावर जाता येता लक्ष ठेवत होती आणि त्यांना काही अडले नडले तर सांगतही होती.  पल्लवी आणि प्रियाच्या मैत्रीची भट्टी एकदम छान जमलेली होती.

राजू, प्रदीप आणि पद्मा ह्यांना परीक्षेचा फारसा काही ताण नव्हता.  त्यात आज व्ह्यालेनटाईन डेअसल्यामुळे पद्मा जरा लवकरच आवरून नटून थटून घरातून बाहेर पडण्याच्या बेतात होती.  पल्लवीने तिची थोडीशी गंमत केलीच होती.  की ताई आज काय विचार आहे.  कोण आहे तुझा व्ह्यालेनटाईनम्हणजे सखा / मित्र, जरा आम्हांलाही कळू देत की !  आम्हीं नाही सांगणार आई बाबांना.  आणि हो तू जर नाही सांगितले आणि आम्हांला बाहेरून कळले तर मात्र आम्ही नक्कीच घरी येऊन काडी करण्रार बरका !  पल्लवी ताईची खेचत होती हे पाहून प्रिया तिला दटावून गप्प करण्याचा प्रयत्न करत होती.  प्रियाला उगाचच कसतरी होतं होते.  अगदी संकोचून गेली होती बिचारी.  पण पल्लवी आणि पद्मा ह्या दोघी बहिणी जरी असल्या तरी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.  त्यामुळे ही अशी चेष्टा मस्करी त्यांच्यात कायमच चालायची.  खूप खेळीमेळीचे वातवरण होते त्यांच्या घरात हे ही अगदी सहजपणे प्रियाला जाणवत होते आणि तिला त्याचे खूप अप्रूप वाटत होते.   आज पल्लवी ताईची जरा जास्तच खेचत होती कारण व्ह्यालेनटाईन डेहोता ना !  शेवटी पद्मा लटकेच रागे भरून पल्लवीला म्हणाली, की माझे आई जे काही असेल ना ते तुला सांगितल्याशिवाय मी राहणार नाही.  पण काहीतरी होऊ तर दे सांगायला... (मनातल्या मनात पद्मा म्हणाली की.. कसं सांगू ग माझ्या लाडक्या पल्ले तुला (पद्मा पल्लवीला लाडाने पल्ले म्हणते)... माझ्या स्वप्नातला राजकुमार हर्षद मला सापडला आहे, फक्त योग्य वेळ पाहून मी हा विषय आई बाबांशी बोलणार आहे, अर्थात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि एखादी नोकरी लागल्या नंतर.....) असे म्हणून ती तडक तिची पर्स काखोटीला मारून कॉलेजला निघून जाते.  आज पद्मा तिच्याच विश्वात गुंग होती.. हे मात्र प्रियाला आणि पल्लवीला जाणवले.  पल्लवीने मनोमन ताईच्या मनातली गोष्ट ओळखली होती.  ताईच्या डोळ्यातील भावनांनी गद्दारी केली होती जी पल्लवीच्या नजरेतून सुटली नव्हती.  काही तरी गडबड नक्की आहे आहे हे उमजल्यामुळे पल्लवी थोडीशी सुखावली होती.  तिने मिश्किलपणे प्रियाकडे पहिले आणि गालातल्या गालात हसत पुन्हा एकदा स्वत:ला अभ्यासात गुंतवून घेतले.

पद्मा घरातून बाहेर पडते. प्रदीपही त्याचे आवरून राजूची वाट पाहत पेपर वाचत बसलेला असतो.  इकडे राजू आज खूपच आनंदी मूड मध्ये असतो.  जुनेच पण त्याला शोभून दिसणारे कपडे घातल्यामुळे स्वारी थोडीशी खुशीतच होती आणि का असू नये.  बिचारा किती दिवसांनी इतका खुश होता.  त्याने त्याच्या स्वप्नातील परीची खूप सारी स्वप्ने पहिली होती.  त्यात आज व्ह्यालेनटाईन डे असल्यामुळे का कोण जाणे त्याला उगाचच आपल्या ह्या काल्पनिक परीची सारखी आठवण येत होती.  हे वयच असं असतं ना की तिथे आपलं काहीच चालत नसतं.  हेच खर असतं.  आपल्याच नादात राजू त्याचे अत्यंत आवडते किशोर कुमारचे गाणे गुणगुणत निघतो......

हुं हुं sss फुलों कें रंगसे.. दिल की कलमसे.. तुझको लिखी रोज बाती.. कैसे बताऊ..किसं किसं तरह से.. पल पल मुझे तू सताती....तेरे ही सपने लेकर के सोया... तेरी ही यादों मै जागा.. तेरे खायलो मै उलझा रहा युं...जैसे माला मै धागा...हा sss बादल बिजली चंदन पाणी जैसा अपना प्यार sss ... लेना होगा जनम हमें.. कई कई बार... हा sssहा sss इतना मधुर.. इतना sss मधीर.. तेरा मेरा प्यार sss लेना होगा जनम हमें कई sss कई बार sss कई sss कई बार...

आपल्या स्वप्नातल्या परीच्या धुंदीत तो इतका गुंग असतो की त्याने प्रदीपच्या घरात प्रवेश केला आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही.  तेवढ्यात पल्लवी आतल्या खोलीतून बाहेर येत असते आणि तिची हलकीशी धडक राजूला बसते.  ह्या धक्क्याने राजू एकदम भानावर येतो, अगदी गोंधळून जातो.  त्याला काहीच कळत नाही. तिला सॉरी सुद्धा म्हणायचे त्याच्या लक्षात येत नाही. तो अगदी ओशाळून जातो.  त्याचे गुणगुणने पल्लवीने हलकेसे ऐकलेले असते आणि का कोण जाने ती ही एकदम लाजून जाते. पट्कन आतल्या खोलीत जाते आणि प्रदीपला राजू आल्याची वर्दी देते.  राजुच्याही अंगात एक वेगळीच लहर उमटून जाते.  काय ते त्यालाच कळत नाही.  काही तरी वेगळच वाटतंय.  नक्की काय तेच लक्षात येत नाही त्याच्या.  पल्लवीचा तो ओझरता स्पर्श. तिची ती लाजून खाली गेलेली नजर. तिने जाता जाता टाकलेला तो तिरपा कटाक्ष. त्याला काही काही म्हणून समजत नाही.  तो पुरता गोंधळून जातो.  आजच आपल्याला हे असे का होते आहे हेच त्याला उमजत नाही.  गेली इतकी वर्षे तो पल्लवीला ओळखत असतो तरीही आजच असे विचित्र भाव मनात का आले हेच त्याला काही केल्या कळत नव्हते. त्यात त्यालाही पल्लवीच्या त्या हलक्याश्या स्पर्शाने मानत उमटलेली हवी हवीशी असलेली कंपने जाणवतात आणि तोही थोडासा लाजून ओशाळून जातो.  इतक्यात प्रदीप बाहेर येतो आणि राजूची तंद्री तुटते. दोघेही आपापल्या सायकल काढून कॉलेज कडे जायला निघतात. 

हो पण राजू आज राजू राहिलेला नसतो.  त्याला आज त्याची व्ह्यालेनटाईन सापडलेली असते.  कधी एकदा पल्लवीला एकांतात भेटतोय आणि तिला मनातले हे विचार सांगतोय असे राजूला झालेलं असते.  एकीकडे त्याला त्याच्या ह्या इतक्या उत्कटतेने प्रदर्शित झालेल्या भावनेचे आश्चर्यही वाटत असते आणि दुसरीकडे मनात थोडीशी भीतीही वाटत असते.  त्याच्या मनातली ही भावना जर पल्लवीच्या मनात नसेल तर ?  तसेच दोघांच्याही घरच्यांना हे मान्य होईल का ?  प्रदीपला काय वाटेल ?  त्याला फसवल्या सारखे तर नाही ना वाटणार ? सायकल चालवत असतांनाच, असे आणि अजून किती तरी प्रश्न राजूच्या मनात ह्या पाच दहा मिनिटांत येऊन जातात आणि तो त्याचाही कळत नकळत मनातल्या ह्या भावनांच्या गुंत्यात गुरफटत जातो. शेवटी कंटाळून तो काही अनुत्तरीत प्रश्न नियतीवर सोपवून देतो आणि प्रदीप बरोबर सायकल चालवत कॉलेजवर पोहचतो.  जे जे होईल ते ते पाहो.  जेंव्हा केंव्हा योग्य वेळ आणि संधी मिळेल तेंव्हा आधी पल्लीवीशी बोलायचे आणि मनातल्या भावनांना वाट करून द्यायची तसेच पल्लवीची जर हीच भावना असेल तर दोघांनी मिळून योग्य तेंव्हा पद्मा ताईला विश्वासात घेऊन प्रदीपशी बोलायचे.  सरते शेवटी पल्लवीच्या आणि स्वत:च्या आई बाबांशी बोलायचे असे सगळे एका दमात राजू स्वत:च्या मनाशी ठरवतो आणि प्रदीपसह इतर मित्रांशी गप्पा मारू लागतो.  राजूचा हा बदलेला मूड पाहून त्याचे सगळे मित्र आज थोडेसे आश्चर्य चकितच होतात.  फारसे कोणीच काही बोलत नाही आणि आजचा हा दिवस तसाही जरा आगळा वेगळाच असतो.  आपल्या मनातल्या भावना जेवढ्या आपल्यापाशीच कशा राहतील ह्याची प्रत्येकजण काळजी घेतो.

हो ह्यात प्रदीपचा समावेश होता हे ही तितकेच खरे.  तो ही त्याची व्ह्यालेनटाईन शोधत असतो.  त्यात सकाळी सकाळी राजूची बहिण प्रिया आज पल्लवी बरोबर बारावीचा अभ्यास करायला घरी आलेली असते.  प्रदीपला प्रिया अगदी कळायला लागल्यापासून आवडत असते.  परंतु राजूच्या भितीपाई तो कधी आपल्या मनातलं कोणास सांगूही शकत नव्हता आणि प्रियालाही त्याने ह्याची थोडीशी भनक लागलेली होती, परंतु प्रियाही घरच्यांच्या भीतीने व्यक्त होत नव्हती.  आज मात्र प्रियाला पाहिल्याबरोबर प्रदीपच्या मनात तिच्या बद्दल प्रेमाची एक उत्कट भावना मनात डोकावली आणि एक क्षण वाटले की तिला सांगून टाकावे की तू माझी व्ह्यालेनटाईन आहेस.  त्याला थोडीशी कल्पना आली होती की प्रीयालाही तो आवडतो ते.  तसे तिने एक दोन वेळा नजरेने व्यक्तही केले होते.  परंतु जो पर्यंत आपण तिला प्रत्यक्ष विचारत नाही आणि तिच्याकडून होकार घेत नाही तो पर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता.  त्याने सकाळीच ठरवले होते की आज संधी पाहून प्रियाला आपल्या मनातले सांगायचे आणि नतंर मग बाकीच्यांचा विचार करायचा.  ठरलं प्रदीपच्या मनाशी त्याने हे पक्के केले होते आणि त्याच विचारांच्या गर्तेते तो राजू बरोबर सायकलवरून कॉलेजला जातांना विचार करत होता.  कधी कॉलेज आले ते त्याला कळलेच नाही.  अर्थात आज सगळेच मित्र जरासे गोंधळल्या सारखे दिसत होते.  का कोण जाणे ! कोणाच्या मनात काय चालले आहे.  सगळे आपलेच मित्र त्यात समवयस्क.  आपल्या मनातलेच विचार त्यांच्याही मनात चालले असतील ! काय माहिती !   जाऊदेत उगाच जास्त खोलात नको जायला.  नाही तर आपलेही पितळ उघडे पडायचे असे म्हणून सगळेचजण आज जरा जास्तच चिडीचूप होते हे अगदी प्रत्येकाला जाणवत होते पण कोणीच पुढाकार घेवून बोलत नव्हते. तेरी भी चूप’, ‘मेरी भी चूप’. म्हणजे ही तर अत्यंत समंजस आणि सोयीस्करपणे ठरवलेली गंमतच होती.

पद्मा घरून निघते आणि वैशालीत वाट पहात असलेल्या हर्षदला भेटते.  गेले वर्षभर हर्षद आणि पद्मा भेटत असतात.  आज तर हर्षदला कधी एकदा पद्मा कडून लग्नासाठी होकार मिळवतो असे झालेले असते.  हर्षद आणि पद्मा आजच्या व्ह्यालेनटाईन डे च्या शुभ मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकण्याचे ठरवतात. फक्त एकच अडचण असते ती म्हणजे आपापल्या घरच्यांना कधी आणि कसे सांगयचे ते !  शेवटी विचार करून दोघेही ठरवून टाकतात की अजून दोन वर्ष तरी लग्न करायचे नाही. फक्त साखरपुडा करायचा.  म्हणजे पद्मा पदवीधर होऊन नोकरी करू लागेल आणि हर्षद त्याच्या सध्याच्या नोकरीत कायम होऊन स्वत:चे भाड्याचे का होईना जरा मोठे घर घेऊ शकेल.  असा सामंजस्याचा मार्ग आज दोघही ह्या भेटीत ठरवून आपापली वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदारीच्या जाणीवेने थोडेसे सुखावतात आणि त्यांच्या लग्नाच्या विचारांची आपापल्या घरी सांगण्याची मानसिक तयारी करतात.  एकंदरीत दोघांच्याही घरची मंडळी थोडीसे पुढारलेल्या विचार सरणीचे असल्यामुळे त्यांच्या लग्नास फार अडचणी येतील असे त्यांना वाटले नाही.  त्यामुळेच आज पद्मा आणि हर्षद दोघेही खूप खुश होऊन मस्त पैकी वैशालीतल्या गरम गरम कॉफीची चव घेत आपल्या भावी संसाराची स्वप्ने रंगवत बसतात.  पद्माला कॉलेजला आज जाण्याची फारशी गरजच वाटत नव्हती त्यामुळे तीही हर्षद बरोबर निवांत गप्पा मारत वैशालीत बसलेली होती.
इकडे अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून प्रिया आणि पल्लवी थोडेसे पाय मोकळे करायला संभाजी बागेत फेर फटका मारायला जातात.  आज का कोण जाणे पण दोघीही काहीश्या वेगळ्याच मूड मध्ये असतात.  इतक्या गप्पा मारणाऱ्या ह्या मैत्रिणी एकदम शांत शांत असतात.  कोणीच कोणाशी काहीच बोलत नसते.  बागेत जाऊन पाणीपुरी खातात, एक एक भेळ खातात तरीही कोणीच काही बोलत नाही.  एकदम दोघींना पाहिलेल्या ती सध्या काय करतेह्या मराठी चित्रपटाची आठवण येते आणि इतक्यावेळची शांतता भंग होते.  दोघीही एकदम ह्या चित्रपटाविषयी आपले मत मांडायला सुरवात करतात.  जेंव्हा दोघी बोलता बोलता एकमेकींच्या डोळ्यात पाहतात तेंव्हाच त्यांना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवते आणि इतक्या वर्षींच्या मैत्रीची झलक जाणवते.  पल्लवी प्रियाला विचारते की जे मला वाटते आहे तेच तुलाही वाटते आहे का !  नेमका हाच प्रश्न प्रिया पल्लवीला विचारते आणि सर्वात शेवटी दोघीही एकदम विषयावर येतात आणि सकाळी सकाळी झालेल्या मनोमिलनाच्या गोष्टी एकमेकींना सांगून मन मोकळे करतात.  दोघीही आपला व्ह्यालेनटाईन कोण आहे ते सांगून मोकळ्या होतात आणि मनावरचं खूप मोठं ओझ कमी झाल्याचं मनोगत व्यक्त करतात.  काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी गत झाल्याचे त्यांना अगदी स्पष्ट जाणवत होते आणि त्यामुळे त्या दोघीही अगदी मन मोकेळे पणाने हसून मनावर आलेला ताण पाणावलेल्या डोळ्यांनी कमी करतात.
राजू आणि प्रदीपही तिकडे आपल्या मनातली तळमळ व्यक्त करण्यासाठी धडपडत असतात.  शेवटी त्यांची इतक्या वर्षांची मैत्री असते आणि आज जर आपण मन मोकळे केले नाही तर आयुष्यभर आपण एकमेकांना माफ नाही करू शकणार असेच दोघांनाही वाटत असते.  फार फार तर काय होईल.  नकार मिळेल एवढेच ना ! असा विचार करून दोघेही एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत.  कोणी आधी बोलायचे ह्यात त्यांच्यातही ती सध्या काय करतेह्या चित्रपटाविषयी चर्चा सुरु होते आणि त्यामुळेच का होईना दोघेही आपापल्या भावना एकमेकांशी व्यक्त करून मोकळे होतात.  मनावरच खूप मोठं ओझं उतरल्याची भावना घेऊन राजू आणि प्रदीपला आता कॉलेज मध्ये नको थाबायला असे वाटते आणि ते लगेचच सायकल काढून घरी जायला निघतात.  वाटेतच येता येता गुडलक चौकात त्यांना पद्मा आणि हर्षद येतांना दिसतात.  प्रदीप हर्षदला ओळखत असतो.  तो पद्मा ताईचा खूप चांगला मित्र आहे हे त्याला माहिती असते.  थोडेसे थांबून दोघेही त्यांच्याशी बोलतात.  खुशीच्या नादात पद्माताई प्रदीप आणि राजूला तिचा आणि हर्षदचा आजचा निर्णय अगदी भर चौकात रस्त्यातच सांगून टाकते.   म्हणजे पद्माला तर कधी एकदा प्रदीपला सांगते असे झालेले असते आणि शेवटी ती तिचे मन मोकळे करून सुटकेचा निश्वास सोडते.  राजू आणि प्रदीपला त्यांचा हा ठाम निर्णय मनोमन पटलेला असतो आणि त्या दोघांमध्ये आडकाठी नको म्हणून त्यांना मन:पूर्वक शुभेछ्या देवून हे दोघे तेथून लगेचच काढता पाय घेतात.  अर्थात प्रदीप पद्माताईला लवकर घरी ये, तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे हे सांगायला विसरत नाही.  पद्माही त्याला लवकर घरी येण्याचे कबूल करते आणि हर्षद बरोबर निघून जाते.
राजू आणि प्रदीपला त्यांच्या मनात चाललेली त्यांची ही घालमेल कधी एकदा पल्लवीला आणि प्रियाला सांगतो असे झालेले असते.  तरीही त्यांच्या मनाची तेवढी तयारी झालेली नसते म्हणून अजून थोडे धारिष्ट्य गोळा करण्यासाठी ते तडक संभाजी बागेकडे आपल्या सायकलींचा मोर्चा वळवतात.  मस्त पैकी पाणीपुरी आणि भेळ खायची, एकमेकांशी थोडेसे ह्या विषयावर बोलायचे तसेच आपल्या व्ह्यालेनटाईनशी काय आणि कसे बोलायचे ते ठरवायचे आणि मग योग्य संधी साधून आजच संध्याकाळी मन मोकळे करायचे असा मस्त नियोजन करून मंडळी संभाजी बागेत पोचतात.  सायकली लावून पाणीपुरीच्या गाडीवर पोचतात आणि समोरचे दृश्य पाहून दोघांनाही काही सेकंद काहीच सुधरत नाही.  कारण समोर पल्लवी आणि प्रिया एकमेकींशी मनमोकळ्या हसत खेळत गप्पा मारत बसलेल्या असतात.  राजू आणि प्रदीपने तोंडाचा वासलेला आ अजून मिटलेलाच नसतो.  पल्लवी आणि प्रियाला जेंव्हा हे दोघे दिसतात तेंव्हा त्यांचीही अवस्था काही वेगळी नसते.  त्या तर पूर्णपणे गांगरून जातात. आता काय बोलायचे आणि कसे बोलायचे.  कोणी आधी बोलायचे असे आणि अजून किती तरी विचार त्यांच्या मनात येतात.  शेवटी चौघेही एक एक पाणीपुरी मागवतात आणि काही तरी करून बोलण्याचा प्रयत्न करतात.  न राहवून ती सध्या काय करतेह्या चित्रपटाचा विषय निघतो आणि विषयाला कोंडी फुटते.  आपलं पाहिलं प्रेम हेच आपल्या आयुष्यात किती महत्वाचं असतं आणि ते कधीही विसरता येऊ शकत नाही.  मग आपण का नाही आपल्या ह्या पहिल्या प्रेमाची कबुली द्यायची.  जर का आपण हे योग्य वेळी केले तरच ह्या जीवनाला अर्थ आहे.  नाहीतर ह्या चित्रपटामधील अन्या आणि तन्वी सारखी जीवाची तडफड करून घेण्यात काय हशील आहे नाही ! एक एक करून चौघेही ह्या चित्रपटाच्या विषयावरून गप्पांच्या ओघात आपला कोण व्ह्यालेनटाईन आहे हे नकळत सांगून बसतात आणि चौघेही जण त्या एका क्षणा मुळे एकदम सुखावून जातात.  राजू-पल्लवी आणि प्रदीप-प्रिया ह्यांना आपले हे स्वप्न तर नाही ना असेच वाटते.  काही क्षणासाठी ते चौघेहीजण इतके सुखावून जातात की कधी एकदा हे सगळे पद्माताई आणि हर्षदला सांगतोय असे त्यांना झालेले असते.  ह्या आनंदाच्या भरात प्रदीप पद्माताई आणि हर्षदने ठरवलेल्या लग्नाची बातमी बाकीच्यांना देऊन हा क्षण अजून गोड करून टाकतो.  पल्लवी आणि प्रिया एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि आयुष्यभर एकमेकींना सदा सुखी आणि समाधानी ठेवण्याची लगेचच शपथ घेऊन मोकळ्याही होतात. 
एकंदरीत ह्या वर्षीचा व्ह्यालेनटाईन डे राजू-पल्लवी, प्रदीप-प्रिया आणि पद्मा-हर्षद साठी फारच सुखावह असा असतो.  त्यामुळेच सगळे जण हा दिवस जल्लोषात साजरा करण्यासाठी डेक्कनच्या म्हणजे त्यांच्या घराच्या जवळील झेड ब्रिजवर जमण्याचे ठरवून टाकतात.  संध्याकाळी सात वाजता झेड ब्रिजवर ह्या तीन जोड्या त्यांच्या भावी आयुष्याच्या आणा भाका शपथा मोठ्या जल्लोषात आणि जमलेल्या तमाम प्रेमी युगलांच्या अर्थात त्यांना काहीही संबंध नसलेल्यांच्या उपस्थितीत घेणार असतात आणि मग घरी कसे, कधी, केंव्हा, कोणी, सांगायचे ह्याचे नियोजन करण्याचे ठरवतात.
संध्याकाळी सात वाजता नेहमीचा फुलवाला रवी झेड ब्रिजवर गुलाबाची फुले घेऊन फिरत असतो.  आज त्याच्या ह्या फुलांना भाव तर खूप असतो आणि घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपता टिपता तो ही त्याच्या गतस्मृतीत काही क्षणांसाठी स्वत:ला विसरून ह्या अविस्मरणीय क्षणांचा आनंद लुटणार असतो.  खरं म्हणजे तो ह्या एका कारणासाठीच आजच्या दिवशी ही गुलाबाची फुले घेऊन फिरत असतो.  त्याला ती विकून चार पैसे कमविण्याची अजिबात हौस नसते.  त्याला हवा असतो तो ती फुले घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरील ते सात्विक समाधान आणि आनंद. जो त्याला आयुष्यात कितीही पैसे दिले तरी विकत घेता येऊ शकत नाही असेच वाटत असते आणि म्हणुनच तो जाणून बुजून व्ह्यालेनटाईन डे च्या दिवशी झेड ब्रिजवर गुलाबाची फुले घेऊन दाखल झालेला असतो. 
रविचे मन झेड ब्रिज वरील हा प्रेमाचा जल्लोष पाहून प्रसन्न होऊन जातं.  ह्या जगात कोणलाच कधीही कुठलेही दु:ख नसावे असेच वाटून जातं.  इतक्यात पद्मा, हर्षद, राजू, पल्लवी, प्रदीप, पल्लवी झेड ब्रिजवर ठरल्याप्रमाणे येतात.  रवी कडून ते एक एक गुलाबाचे फुल घेतात आणि नदी पलीकडील ओंकारेश्वराच्या आणि अष्टभूजेच्या साक्षीने आपल्या व्ह्यालेनटाईनला देऊन, आयुष्याच्या जोडीदारासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात.  रविही त्यांना सदा सुखी आणि समाधानी रहा असा आशीर्वाद देतो आणि गुलाबाचे पैसे न घेताच जायला निघतो तेवढ्यात राजू रविला थांबवून पैसे घेण्याचा आग्रह करतो. परंतु रवि पैसे घेत नाही उलट त्याला फुलों के रंगसे.... ह्या गाण्याचा मुखडा ऐकवून त्याच्या मनातले भाव व्यक्त करून शेवटचं राहिलेलं गुलाबाचं फुल हातात घेऊन निघून जातो. 
रविच्या हातातील शेवटच्या गुलाबाच्या फुलास कोणी व्ह्यालेनटाईन असेल का ? असा प्रश्न मात्र ह्या सगळ्यांना पडतो....


रविंद्र कामठे १४ फेब्रुवारी २०१८

मातृतुल्य रसिक वाचक सौ. शकुंतला जोशी ह्यांची माझ्या "प्रांजळ" काव्यसंग्रहास मिळालेली कौतुकाची थाप.





मातृतुल्य रसिक वाचक सौ. शकुंतला जोशी ह्यांची माझ्या "प्रांजळ" काव्यसंग्रहास मिळालेली कौतुकाची थाप. 

सौ. शकुंतला श्यामसुंदर जोशी (वय ७४) कसबापेठ पुणे, ह्यांचा चपराक प्रकाशन पुणे ह्यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या प्रांजळह्या काव्यसंग्रहाला दिलेला अनमोल असा अभिप्राय त्यांच्याच शब्दांमध्ये पुनर्मुद्रित करून माझ्या सर्व रसिक वाचकांसाठी खाली देत आहे.
हा अभिप्राय मला त्यांनी स्वत: लिहिलेल्या आंतरदेशीय पत्राद्वारे पाठविला आहे, तो जसाचा तसा शब्दांकित करून हा अनमोल ठेवा जतन करू इच्छित आहे.  माझ्यासाठी हा एक फार मोठा पुरस्कारच आहे. असे रसिक वाचक आहेत म्हणूनच तर आपले मराठी साहित्य जिवंत आहे असे म्हणलो तर अतिशयोक्ती होणार नाही.
पत्र क्रमांक ७९९२ | वार बुधवार | वेळ स. ७ | तिथी तृतीय | दिनांक २ मे २०१८
सन्माननीय,
श्री. रविन्द्र दादा,
सौ. वंदनाताई,
स.न.वि.वि.
कुटुंबियांना यथोचित स.न.अ.शु.आ.
मी आपला प्रांजळकाव्यसंग्रह वाचला.
काव्यसंग्रह वाचल्याची कारणे-
  1. मनोरंजक २) रंजकता ३) वाचनीय ४) संग्राह्य ५) मननीय ६) चिंतनीय ७) ह्रुद ८) स्तुत्य ९) सार्थ नाव १०) प्रेरणादायी १०) अर्थपूर्ण ११) प्रत्येक कविता वेगळी १२) उत्तम लेखन शैली १३) सुसुगता १४) सुसंबद्धता १५) उत्तम शब्द भांडार १६) गेयता १७) प्रासादिक १८) अभ्यास १९) सिद्धहस्त लेखणी २०) समर्थ लेखणी २१) उत्तम कल्पकता २२) उच्च कल्पना २३) स्वागतार्ह २४) वेधक २५) भावोत्कटता २६) भारावून गेले २७) प्रभावित झाले २८) प्रगल्भता २९) लालित्य ३०) लोभस ३१) वास्तवता ३२) सकारात्मक ३३) आत्मकेंद्रित ३४) विविधता ३५) प्रत्येक कविता वेगळी ३६) संवेदनाक्षम ३७) सुसंवाद ३८)  सुसूत्रता ३९) अनुभवसिद्ध लेखणी ४०) उत्तम मांडणी ४१) आत्मकेंद्रित ४२) अलीपृता ४३) मातीचे शेतीचे नाते सांगणाऱ्या कविता ४४) सृजनता ४५) मनाला भावणारा काव्यसंग्रह.
माझ्या पत्रसंग्रहात अनेक साहित्यिक, रसिक, राजकीय, कलाकार बंधू भागीनीची पत्रे आहेत.  त्या पत्रसंग्रहाला मी फुलोरानाव दिले आहे.  त्या फुलोरा पत्रसंग्रहात आपले पत्र यावे ही इच्छा.  आपण पत्र पाठवावे ही विनंती.  आपले पात्र येईल असा विश्वास.  आपले पत्र येण्याने आनंदाभिमान वाटेल.  आपले पत्र येण्याने फुलोरा फुलेल ! बहरेल ! शान वाढेल.
आपल्या पत्राची वाट पाहणारी
आपली भगिनी
सौ. शकुंतला जोशी (वय ७४).
ह्या अभिप्रायास माझ्या कुवतीने मी दिलेले उत्तरही खाली देत आहे....
आदरणीय सौ. शकुंतला शामसुंदर जोशी,
अमेय अपार्टमेंट, मुजुमदार बोळ, कसबा पेठ,
पुणे ४११०११
स.न.वि.वि,
सौ. शकुंतलाजी, सर्वप्रथम आपल्या चरणी माझा नमस्कार अपर्ण करतो तो स्वीकारून मला उपकृत करावे.
आपण सस्नेह लिहिलेले आंतरदेशीय पत्र मिळाले.  चपराक प्रकाशनपुणे ह्यांनी प्रकाशित केलेल्या माझ्या प्रांजळह्या काव्यसंग्रहावरील आपला उत्स्फूर्त अभिप्राय वाचून मनाला खूप खूप आनंद झाला.
आपण माझा हा काव्यसंग्रह वाचल्याची नमूद केलेली ४५ कारणे म्हणजे माझ्या ह्या कलाकृतीला लाभलेले ४५ आशीवार्द्च आहेत असे मला अगदी मनापासून वाटले. 
आपण माझ्या आईच्या वयाच्या आहात हे तुम्हीं पत्रात नमूद केलेल्या आपल्या वयानुसार समजले आणि आपल्याबद्दलचा माझ्या मनातला आदर द्विगुणीत झाला हे मात्र नक्की.  आजवर असा अभिप्राय कोणाला लाभला असेल असे मला तरी वाटत नाही आणि त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. ह्या पृथ्वीतलावर आईच्या आशीर्वादाशिवाय मोठा कुठलाच पुरस्कार नाही.  आपला हा आशीवार्द माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कारच आहे असे मला वाटते.
आपल्या फुलोराह्या पत्रसंग्रहात माझ्या ह्या पत्रास जागा मिळाली हे मी माझे खूप मोठे भाग्य समजतो. 
आज मला कळले की, “कलाकार हा कधीच मोठा नसतो, तर, त्याचे रसिक त्याला मोठा करतात”. 
मी आपला खूप खूप ऋणी आहे.
रविंद्र कामठे
पुणे