Wednesday 26 June 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – जामीन मैत्रीचा


अनुभवाच्या शिदोरीतून जामीन मैत्रीचा
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

माझ्या मित्राच्या मदतीने सुरु करून बारगळलेला धंदा एकदाचा बंद करून मी मोकळा झालो. दुष्काळात तेरावा नकोअशी अवस्था झाली होती माझी. माझा हा मित्र आजकाल अधून मधून कंपनीत दांड्या मारत होता, म्हणून एक दिवस मी अगदी सहज त्याच्या सिंहगड रोडवरील आनंद नगर मधील त्याच्या राहत्या बंगल्यावर त्याला भेटायला गेलो आणि त्याची अवस्था पाहून मला गलबलूनच आले हो !
नियतीचा खेळ किती वाईट असतो ह्याची प्रचीती मी ह्याची देही ह्याची डोळा घेत होतो.  त्याची काही चुकी नसतांना त्याच्यावर झालेल्या आघाताने तो तर पूर्णपणे कोसळून गेला होता. काहीतरी मोठी अडचण असणार त्याशिवाय हा पठ्ठ्या असं वेड्यासारखं वागणार नाही आणि आमचा चांगला चालेलला धंदा बंद पडू देणार नाही ह्याची मला खात्री होती; म्हणूनच मी एवढे सगळे रामायण घडूनही त्याला भेटून त्याच्याकडून खरी परिस्थिती जाणून घ्यायचे ठरवले होते. 
एकंदरीत परिस्थिती फारच गंभीर होती. त्यावेळेस काहीही न बोलता मित्राला दुसऱ्यादिवशी माझ्या घरी संध्याकाळी जेवायला बोलवून त्याच्या घरातून निमुटपणे निघून आलो.
दुसऱ्यादिवशी संध्याकाळी ह्या मित्राला जेवायला बोलावले होते, पण त्याला बोलतेही करायचे होते म्हणून रमची व्यवस्था करून ठेवली होती.  तो ठरल्याप्रमाणे आला काही वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, एक दोन पेग झाल्यावर मी मूळ मुद्याला हात घातला आणि काय सांगू, विस्तवात हात घातल्यासारखा माझा हात आणि मनही पोळून निघाले हो !  त्याने जे काही सांगितले ते ऐकतांना माझ्या पायाखालची जमीनच सरकल्याचा भास होत होता.
त्याच्या बंगल्या समोरील बंगल्यातल्या मुलीवर त्याचे प्रेम होते.  त्यांनी ९ वर्षापूर्वीच प्रेमविवाह केला होता व त्यांना ८ वर्षाचा मुलगाही होता.  ह्याने आपले घरदार गहाण ठेवून आणि स्वत:ची टूरिष्ट कंपनी विकून बायकोला नोकरीसाठी अमेरिकेला पाठवले होते. तिकडेच स्थाईक व्हायचे ठरले होते म्हणे त्यांचे ! ती आणि मुलगा दोन महिन्यांपूर्वीच अमेरिकाला गेले होते.  अजून एक दोन महिन्यांनी तिने व्हिसासाठीचे लागणारे पत्र दिल्यावर हा पण अमेरीकला जाण्याचे स्वप्न पहात होता. 
पण, त्याच्या बायकोने तिकडून ह्याच्या व्हिसासाठी पत्र पाठवायच्या ऐवजी ह्याला चक्क घाटस्पोटाची नोटीस पाठवली होती.  का तर म्हणे ज्या मित्राने तिला अमेरिकेत नोकरी मिळवून दिली आहे त्याच्यावर तिचे प्रेम बसले होते व तो तिला त्यांच्या मुलासहित स्वीकारायला तयार होता, हे अजून वरती तोंड करून तिने ह्याला अगदी निर्लज्जपणे सांगितले होते. जगात अशीही माणसे असतात ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता. 
एखाद्याच्या प्रारब्धात इतकेही वाईट लिहिलेले असेल ह्यावर माझा तरी विश्वासच बसत नव्हता.
तिने पाठ्वेलेल्या घाटस्पोटाच्या नोटीसीने हा स्वत:तर गर्भगळीत होऊन गेला होता आणि त्याचे आईवडील तर आजारीच पडले होते.  तिने त्यांच्या एकत्रित असलेली सर्व बँकेच्या खात्यांवर स्थगिती आणली होती. थोडक्यात काय तर माझ्या ह्या मित्राला आणि त्याच्या कुटुबियांना तिने चक्क भिकेला लावले होते.  किती आपमतलबी आणि निष्ठुर असतात ना लोकं.  आपलेच दात आणि आपलेच ओठ’, सांगयचे तरी कोणाला !
त्याच्या ह्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्याने एक चांगला वकील शोधला होता.  परंतु त्यांची फी ह्याला परवडणारी नव्हती त्यामुळे त्याने सारस्वत बँकेतून कर्ज घेण्याचे ठरवले होते व मला जामीन राहण्याची विनंती केली होती.  मी आणि माझ्या अजून एका मित्राने त्याला जामीन दिला आणि त्याला कर्ज मिळवून दिले.
पुढे त्याची कोर्टात केस सुरु झाली.  जिच्यासाठी घरदार गहाण ठेवले होते ह्या वेड्याने, तिने त्याला चक्क भावनिकदृष्ट्याच फसवले नव्हते तर आर्थिकदृष्ट्याही नागवले होते. असो.
त्याला जेवढी शक्य असेल तेवढी मदत करून त्याला त्याच्या नशिबाच्या हवाली करून आम्हीं आमच्या मैत्रीला जागलो होतो.  एकतर आमचेही कंबरडे ह्या जागतिक आर्थिकमंदी मुळे आधीच मोडलेले होते.
असेच काही महिने गेले.  आमच्या कंपनीची आर्थिक परिस्थितीसुद्धा डबघाईला आलेली होती त्यामुळे मी वैतागून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.  मी आणि माझा दुसरा एक मित्र (ज्याने ह्या मित्राला जामीन दिला होता) दोघांनी एकाच वेळेस नोकरीला रामराम केला.  मी सोलरच्या एका कंपनीत नोकरीला लागलो आणि मित्र दुसऱ्या आयटी कंपनीत गेला.
वर्षभर आमचा फारसा संपर्क नव्हता.  एक दिवस अचानक मला सारस्वत बँकेची नोटीस आली. माझ्या मित्राने कर्जाचे हप्ते थकवले आहेत ते तुम्हीं ताबडतोब येवून भरावे अशी ती नोटीस होती.  आता आली का पंचाईत.  मी आणि माझा दुसरा मित्र भेटलो आणि आमच्या ह्या मित्राचा शोध घ्यायला लागलो.  आधीची कंपनी त्याने सोडून बरेच दिवस झाले होते व त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नव्हता.  त्याला फोन करून संपर्क करायचा प्रयत्न केला तर तो आमचा फोन घेत नव्हता.  शेवटी त्याने एकदा आम्हांला एकदा सार्वजनिक टेलिफोन बूथवरून केल्याचे मला आठवले.  त्या नंबरवरून आम्ही त्याचा पत्ता शोधून काढला.  त्याच्या घरी गेलो. हा आजारीच होता आणि आई वडीलही आजारीच होते. फार काही न बोलता त्याला बँकेने पाठवलेली नोटीस दाखवली आणि त्याला बँकेत जावून पैसे भरायची विनंती केली. हो म्हणाला बिचारा ! आम्हांला शंका होती ! पण आमची तरी कुठे हे हप्ते भरण्याची ताकद होती, म्हणून त्याच्या कडून तसे पत्र घेऊन ते बँकेला देवून अशीच वेळ मारून नेली होती, जी आम्हांला नंतर महागात पडली.
असेच दोन वर्ष गेली.  मी सोलरची नोकरी सोडून डोमच्या नोकरीत लागलो होतो. वर्षभरात ती पण सोडून हिंजेवाडीच्या आयटी कंपनीत नुकताच रुजू झालो होतो.  तिथे माझा हा दुसरा मित्र पण योगायोगाने रुजू झालेला होता.  सगळे कसे व्यवस्थित चालले होते.  रोज स्वत:च्या गाडीने धनकवडी ते हिंजेवाडी आणि परत आलिया भोगासी असावे सादरअसे माझे रटाळवाणे गुऱ्हाळ चालूच होते.
एक दिवस परत आम्हांला ह्या मित्राच्या कर्जाचे मुद्दल आणि व्याज धरून एक लाख रुपये भरण्याची सारस्वतची नोटीस आली आणि आमचे धाबेच दणाणले. गेली दोन वर्षे आमचा ह्या मित्राशी फारसा संपर्क नव्हता त्यामुळे काही कळायलाच मार्ग नव्हता. थोडीफार चौकशी केल्यावर कळले की आमच्या ह्या मित्राने दोन महिन्यांपूर्वीच आत्महत्या करून स्वत:ची ह्या समस्येतून सुटका करून घेतली होती.  पण आम्हीं मात्र पुरते अडकलो होतो.  त्याच्या घटस्पोटाच्या केसचे पुढे काय झाले हे शेवटपर्यंत कळलेच नाही.  पण आमची तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखीअवस्था झाली होती.
नोटीस घेवून मी आणि माझा मित्र सारस्वत बँकेच्या लवादासमोर हजर झालो.  त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.  ज्या मित्राने हे कर्ज घेतले आहे त्याने आत्महत्या केली आहे ह्याची नोंद घ्यायला लावली.  त्याच्या घरच्या परिस्थितीचे आकलन करून दिले.  मित्राच्या अडचणीमध्ये त्याला मदत करण्यासाठी म्हणून आम्हीं ह्या कर्जाला जामीन राहिलो होतो व जामीनदाराच्या जबादारीने हे कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती.  फक्त आमची एकच विनंती होती की बँकने व्याज माफ करावे व फक्त मुद्दल वसूल करावे.  आमच्या मैत्रीच्या भावनेची कदर करून लवादाने आमची ही विनंती मान्य केली व मुद्दलाचे ५०हजार रुपये १५ दिवसांत भरण्याचा आदेश आमच्या हाती ठेवला.  दु:खात सुखअसे म्हणून मी माझ्या कौशल्याने आयसीआयसी बँकेचे ५० हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि ते सारस्वत बँकेत भरून हा विषय कायमचा संपवून टाकला. नतंर १२ महिने कर्जाचे निम्मे निम्मे हप्ते आम्हीं दोघे मित्र भरत होतो.
ह्या अनुभवातून एक नक्की शिकलो की वेळ कोणावरही सांगून येत नाही.  माणूस वाईट कधीच नसतो; परिस्थिती त्याला वाईट बनवत असते.


रविंद्र कामठे

Monday 24 June 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – चुकलेला काळजाचा ठोका

अनुभवाच्या शिदोरीतून – चुकलेला काळजाचा ठोका
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
जन्म ते मृत्यू हे जे काही अंतर असते ते म्हणजे आपले आयुष्यआपल्या आयुष्याची दोरी ही परमेश्वराच्या हातात असते.  ह्या दोरीचे म्हणजेच आपल्या आयुष्याच्या लांबी रुंदीचे गणित हे आपल्या संचितावर अवलंबून असावे हे मला इतक्या वर्षांच्या अनुभवांती उमजले.
समजायला लागल्यापासून ते आजवर म्हणजे गेली ५६ वर्षांचे आयुष्य पार करून आमची गाडी त्याच्या उत्तरार्धाकडे कधी लागली हेच समजले नाही.  वयाच्या १५व्या वर्षापासूनच अर्धवेळ काम करून शिक्षण करू लागल्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला स्वत:कडे लक्ष द्यायला असा फारसा वेळच शिल्लक रहायचा नाही. त्यात त्या वयात, माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांशी ओळखी होत गेल्या आणि त्यांच्या बरोबर उठबस करता करता माझ्याही नकळत काही अतिशय वाईट सवयी कधी लागल्या हे कळलेच नाही. शिक्षणाबरोबर माझे हे अर्थार्जनाचे उद्योग चालूच होते व माझ्या व्यक्तिमत्वास दिवसेंदिवस प्रगल्भ बनवत होते हे ही तितकेच खरं आहे. माणसाचा स्वभाव हा फार अनुकरणीय आहे.  त्यात तुम्हांला जर चांगल्या लोकांच्या संगती असतील तर ठीक.  नाहीतर वाईट संगतीस लागून आपली गाडी कधी वाममार्गाला लागते हेच कळत नाही. आपल्या सद्विवेक बुद्धीस थोडसा ताण दिला की आपोआप आपल्याला चांगल्या किंवा वाईटाची प्रचीती यायला लागते.
ह्या सगळ्याचा दोष आपण उगाचच आपल्या मित्रांना त्यांच्या संगतीला देवून स्वत:ची जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा निष्फळ प्रयत्न करतो असे मला वाटते.  हा सगळा दोष फक्त आणि फक्त तुमच्या एकट्याचा असतो.  तुमची अक्कल तुम्हीं त्यावेळेस जर का गहाण ठेवली नाही तर तुमच्यावर ही वेळच येणारच नाही !  स्वत:च्या मनावर जेंव्हा आपला ताबा नसतो ना तेंव्हा हे असे एकमेकांवर दोषारोपण करून स्वत:च्या मनाची समजूत काढावी लागते. पण एक आहे की तुम्हीं काहीही करा, जे काही शरीर भोग असतील, ते मात्र तुमचे तुम्हांलाच सहन करावे लागतात !  उशिरा का होईना, आलेले शहाणपण काही कामाचे नसते.  तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबाचेही काही कारण नसतांना हाल होतात हे मात्र नक्की.
हे एवढे रामायण सांगायचे कारण काय तर; वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे ४१ वर्षांपूर्वी १९७८ साली मी पहिल्यांदा सिगरेट प्यायला शिकलो.  हो, संभाजी बागेत मित्रांच्या संगतीत मला सिगरेट पिण्याची दीक्षा देण्यात आली. ही दीक्षा इतकी जबरदस्त होती की ह्या व्यसनातून मला माझी सुटका करून घायला चक्क ४० वर्षे म्हणजे २०१७ साल उजाडावे लागले.
मला सिगरेटचे व्यसन लागले होते त्यानंतर ओघाओघाने दारूचेही व्यसन लागले.  ही दोन्हीही व्यसने माझ्या आयुष्याला जवळ जवळ ४० वर्षे एखाद्या जळू सारखी चिकटून राहिली व ती माझ्या शरीराची कधीही न भरून येणारी हानी करूनच गळून पडली.  अक्षरश: घूस कशी जमीन पोखरते तशी ही व्यसने तुम्हांला आतून पोखरून टाकतात, पण हे आपल्याला खूप उशिरा उमजते.  तरुणाईत अंगात एक प्रकारचा जोश असतो आणि त्यात आपली प्रतिकारशक्ती कितीही नाही म्हटले तरी प्रज्वलित असते.  परंतु जसे जसे आपण, वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करू लागतो, तस तसे ह्या व्यसनांचे दुष्परिणाम दिसायला लागतात.  तेंव्हा मात्र बऱ्यापैकी उशीर झालेला असतो हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. तोच तर उद्देश आहे माझा हा अनुभव लिहिण्याचा, की “पुढच्यास ठेच मागचा शहाणा”.  पण तसे होत नाही.
इतक्या वर्षांच्या व्यसनांचा, कामाच्या ताणाचा, अस्थिर मनाचा, विचलित भावनांचा, तारेवरील कसरतीचा, संघर्षाचा, एकत्रित परिणाम होऊन २०१७च्या २७ ऑक्टोंबरला मात्र माझ्या काळजाचा ठोका काही क्षणांसाठी चुकला होता.  काळजाचा ठोका चुकण्याचाच तेवढा अनुभव माझ्या गाठीशी नव्हता, म्हणून की काय नियतीने त्याचेही प्रयोजन करून अगदी व्यवस्थित नियोजनबध्दतेने जसे मला ह्या वेदनेच्या खाईत लोटले, तसेच अगदी अलगद वरही काढले होते.
हृदयविकार म्हणजे एक महाभयंकर संकट आहे.  भल्याभल्यांची एका क्षणात वाट लागून आयुष्य उध्वस्त होते. माझे मात्र नशीब बलवत्तर म्हणून दोन पुंगळ्यावर निभावले. २०१७ च्या मे महिन्यापासूनच मी धूम्रपान आणि मद्यपान सोडले होते. तसेही जरा उशिराच सुचलेले हे शहाणपण मला आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर घेऊन चालले होते. तब्ब्येतीची आजवर केलेली हेळसांड तसेच कामाच्या ताणामुळे व अविरत कष्टाने केलेली शरीराची झीज भरून काढायचे प्रयोजन करून ते अमलात आणणे एवढेच राहिले होते. परंतु ही तर वादळापूर्वीची शांतता होती असे आत्ता जाणवते.
गेली ३५-४० वर्षे नित्यनियमाने केलेल्या धूम्रपान आणि मद्यपान सारख्या व्यसनांनी माझ्या शरीरावर फार खोलवर दुष्परिणाम केले होते हे मलाच काय पण, डॉक्टरांना सुद्धा माझ्या काळजाचा ठोका एकदा चुकल्यावरच जाणवले.  मी अगदी अभिमानाने सांगायचो की “मी रोज नियमितपणे व्यायाम वगैरे करतो, त्यामुळे माझ्यावर ह्या व्यसनांचा काही एक परिणाम होणार नाही” !  पण एक सांगतो की, ही म्हणजे मी स्वत:चीच बेमालूमपणे फसवणूक करून घेत होतो हे नक्की. 
माझे सुदैव असे की ह्या अनपेक्षितपणे आलेल्या प्रसंगातून केवळ माझ्या आयुष्याची दोरी बळकट होती म्हणून मी वाचलो.  अन्यथा दिवाणखान्यातील फोटोत जावून त्याला घातलेल्या चंदनाच्या हाराचा (न येणारा) सुवास घेत गपचूप बसावे लागले असते !
मी जेंव्हा रुग्णालयात दाखल झालो होतो व ऑपरेशन टेबलवर होतो, तेंव्हा मी उपभोगलेल्या ५४ वर्षांचा तो सर्व काळ अलगदपणे डोळ्यासमोरून तरळून गेला. मन थोडेसे विषण्ण झाले होते. केलेल्या चुकांचा इतक्या उशिरा का होईना मागोवा घ्यायचा प्रयत्न करत होतो व पुन्हा एकदा ग्लानीत जात होतो.  डॉक्टर माझे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि मी मात्र मला नव्याने आयुष्य जगण्याची अजून एक संधी दे म्हणून गणपतीबाप्पाची आराधना करत होतो.
मला अजूनही आठवते आहे की, माझ्या हृदयातील १०० प्रतिशत असलेला अडथळा काही केल्या निघत नव्हता.  जवळ जवळ ४०-४५ मिनिटे डॉक्टर जिकीरीने प्रयत्न करत होते, पण काही केल्या त्यांना यश येत नव्हते.  मी त्यांचे हे सगळे प्रयत्न उघड्या डोळ्यांनी पहात होतो. बाप्पाला त्यांना यश दे म्हणून विनवत होतो.  कारण डॉक्टरांना जर यश आले तरच माझे प्राण वाचणार होते !  शेवटी बाप्पाने माझी विनंती ऐकली. पहिला अडथळा पार करून त्यात एक पुंगळी सरकवण्यात डॉक्टरांना यश आले.  दुसरा अडथळा सुद्धा ९५ प्रतिशत होता.  पण तो त्या मानाने जरा लवकरच सुटला.  दोन्ही पुंगळ्या आपापल्या जागी व्यवस्थित बसवून डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले.  तुम्हांला पुन्हा एकदा हे जीवन जगण्याची संधी मिळाली आहे, तिचे सार्थक करा असे सांगितले.
उंबरठ्यावर मृत्यूच्या, जीवनाचे महत्व कळतं... असे मी मनातल्या मनात म्हणलो व डॉक्टरांचे आणि बाप्पाचे मनोमन आभार मानून पडून राहिलो.  काही क्षणांसाठी चुकलेला काळजाचा ठोका मात्र माझ्या डोळ्यात अंजनच घालून गेला. नशिबाने मिळालेली ही संधी आता मात्र वाया घालवायची नाही ह्या उद्देशाने मी पुन्हा एकदा नव्याने आयुष्य सुरु करायचे ठरवले आणि त्यानुसार उपचार घेऊ लागलो.
आजवर आयुष्यात खूप केली मस्ती,
आतामात्र मला घ्यावी लागली बस्ती... अशीच काहीशी अवस्था झाली होती माझी.
घरातच मोठ्या हौसेने मी बार केला होता. रम, व्हिस्की, होडका, रेडवाईन, कॉफी लिकर, टकीला जीनच्या खंब्यांनी कायम भरलेला असायचा.  आता मात्र त्याच बार मधे दशमूलारिष्ट काढा, महासुदर्शन काढा, अभयारिष्ट, महारास्नादी काढा, भूनिंबादि काढा, अशा आयुर्वेदिक औषधांनी तो व्यापून टाकला आहे. हेच काय ते माझे संचित असावे का ! माझ्या ह्या अनुभवातून तुम्हांला जो काही बोध घ्यायचा असेल तो घ्यावा ही नम्र विनंती, म्हणून हा लेख प्रपंच !

रविंद्र कामठे