Wednesday 19 January 2022

आदरांजली शिवशाहीर बाबासाहेबांना

आदरांजली शिवशाहीर बाबासाहेबांना 

आदरणीय शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंना ही काव्यसुमनांजली वाहून आज कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. राजेंद्र टिपरे सर आपण मला ही संधी देऊन माझा बहुमान केला आहे. आपली ह्या अमृतकण ह्या संकल्पनेस मानाचा मुजरा.

 ! आदरांजली शिवशाहीर बाबासाहेबांस !

शिवचरित्राचा ध्यास, शिवचरित्राचा अभ्यास
अर्पिले अखंड आयुष्य शिवशाहीरांनी त्यास
निर्मिला "राजा शिवछत्रपती" ग्रंथ हा खास
जोड दिधली "जाणता राजा" नाट्याची त्यास !

रचिला होता शिवरायांनी अदभूत इतिहास
दावीला उलगडूनी तो अमोघ वाणीतून जगास
दखलपात्र ठरला बाबासाहेबांचा हा प्रयास
गौरवीले पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषणाने त्यांस !

लाभली आयुष्याचीही साथ ह्या पुण्यकर्मास
दैवानेही केली जीवनाची शतकपूर्ती झकास
कधी कधी विरोधकांनीही केला होता विपर्यास
डगमगला नाही शिवशाहीर पुरंदरेंचा हा प्रवास !

अखंड भ्रमंती, सतत गडकोटांचा सहवास
करुनी ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास
अखेरच्या श्वासापर्यंत वाहीले होते संशोधनास
घेतला होता त्यांनी शिवसृष्टी निर्मितीचा ध्यास !

मानाचा मुजरा शिवशाहीरांच्या ह्या कार्यास
हीच ती आदरांजली शिवशाहीर बाबासाहेबांस !

रवींद्र कामठे, पुणे