Monday 10 October 2022

चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येणारी श्रेयनामावली पाहिल्याशिवाय चित्रपट गृहातून अजिबात बाहेर पडायचे नाही






चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात येणारी श्रेयनामावली पाहिल्याशिवाय चित्रपट गृहातून अजिबात बाहेर पडायचे नाही, असे मी आज माझ्या मनाशी ठरवूनच टाकले आहे. त्याचे कारणही अगदी सरळ आहे;

मंडळी आज सोमवार १० ऑक्टोबर २०२२. घनश्याम पाटील सरांचा सकाळी ९ वाजता फोन आला. म्हणाले, आपल्याला सासवडला एका ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पहायला जायचे आहे. त्यांची सौ. ज्योती घनश्याम पाटील हीने लिहीलेल्या व अवधूत गुप्ते दादाने संगीतबध्द केलेल्या गाण्याच्या काही भागाचे सासवडमध्ये चित्रीकरण चालू आहे, ते पाहायला जायचे आहे. मी तर क्षणभर अवाकच झालो. माझी उत्सुकता शिगेला पोहचली होती. कधी एकदा सासवडला पोहोचतो आहे असे झाले होते. घनश्यामसरांना मी लगेचच होकार भरला. १२ पर्यंत निघू असे म्हणून पटापटा आवरायला सुरवात केली.

ज्योती ह्या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शशीका आणि गीतकार आहे त्यामुळे आम्हाला तिचा खूप अभिमान वाटत होता आणि तिचे खूप कौतुक वाटत होते. 

"मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी" हा प्लानेट मराठी निर्मित एक ऐतिहासिक चित्रपट असून,  काही वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोरोना काळातील अनंत अडचणींवर मात करत गेले २५ दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाची पर्वा न करता, ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम आपल्या पुण्याजवळील ऐतिहासिक स्थळांवर अगदी न थकता उत्साहात चालू आहे.  आचार्य अत्रेंच्या जन्मगावी म्हणजेच सासवडच्या कऱ्हा नदीच्या तीरावर, २०० जणांचा समूह गेले दोनतीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन हा ऐतहासिक ठेवा आपल्यापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचवत आहेत ह्याचेच मला जाम कौतुक वाटत होते. ज्योतीमुळे आज जेव्हा हे चित्रीकरण ह्याची देही ह्याची डोळा पाहिले आणि डोळ्यांचे पारणेच फिटले.

मुख्य सहाय्यक दिग्दर्शक हास्यजत्राफेम ऋषिकांत राऊत दादाने आमचे अतिशय उत्स्फूर्त स्वागत केले व पूर्णवेळ आमच्याबरोबर थांबून आमची दिग्दर्शक श्री. राहुल जनार्दन जाधव सर, सह दिग्दर्शक डॉ सुधीर निकम सर, कला दिग्दर्शिक श्री. संतोष फुटाणे सर, कार्यकारी निर्माता श्री. भारत सुवरे सर यांची ओळख करून दिली.  महत्वाची बाब म्हणजे ह्या सर्वांना व त्यांच्या समुहासाठी घनश्याम सरांनी चपराकचा दिवाळी अंक भेट दिल्यामुळे एवढ्या धावपळीत ह्या कलाकारांना खूप आनंद झाला.  ज्योतीच्या आग्रहाखातीर माझी “अनोख्या रेशीमगाठी” कादंबरीही ह्या कलाकारांना भेट देऊन हे सुवर्णक्षण मोबाईल मधील कॅमेऱ्यात टिपून घेण्याची संधी मी थोडेच सोडणार होतो !

समूहातील प्रत्येकाची कामाची लगबग, वरुणराजाचीही चाललेली गडबड, त्यात अंधारून आल्यामुळे व काहीवेळापूर्वी मुसळधार कोसळलेल्या पावसाने उडवलेली त्रेधा, ह्याचा विसर पडून ही सर्व मंडळी आपापल्या नेमून दिलेल्या कामावर निष्ठेने व तल्लीन होऊन काम करत होती हे पाहून त्यांना दंडवतच घालावासा वाटला.  प्रत्येकाच्या कमरेला वाॕकीटाॕकी लावलेली होती व त्यावरून त्या त्या व्यक्तीशी संपर्क साधला जात होता.  कुठेही गोंधळ नाही, गडबड नाही.  आवाज नाही व परिसरातील शांतता व पावित्र्य भंग नाही.

दिग्दर्शक राहुल सर आणि निकम सर तर आम्ही गेलो तेंव्हा काम करता करताच जेवत होते, ते ही दुपारचे ३ वाजून गेलेले होते.  पाऊस उघडला होता त्यामुळे त्यांची पटकन राहिलेले चित्रीकरण करण्याची घाई चाललेली होती, त्यात ते आमच्याशी संवाद साधत होते.  मी तर पहिल्यांदाच चित्रपट चित्रीकरणाचा हा सगळा खटाटोप पाहत होतो. मंदिराच्या परिसरात मावळ्यांच्या वेशात फिरणारी बरीचशी मंडळी दिसत होती. वेशभूषा केलेल्या जुन्या पिढीतील बाया बापड्या, लहानग्या मुली, मुले, स्पॉट बॉय, लाईट, मेकअपमन, जनरेटर, कलाकरांसाठी दोन वातानुकुलीत बस, सामानासाठीचे तीन चार ट्रक, मोठमोठ्याल्या ट्रंका, भरपूर छत्र्या, व एका बाजूला मांडवात चालू असलेले ज्याला जसा वेळ मिळेल तसे येऊन जेवणाऱ्याचे जेवण.  सगळ्यांना एकाच पद्धतीचे जेवण होते हे मला तरी फार विशेष वाटले.  मला तर हे सगळे अचंबित करून टाकणारे होते.  

प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात गेली १५ वर्षे काम केलेले असल्यामुळे ह्या सर्व मंडळींचे व खासकरून चित्रपटांचे प्रकल्प व्यवस्थापन जवळून पाहण्याची ही सुवर्ण संधीच होती असेच म्हणायला हवे.  नियोजनानुसार व आखून दिलेल्या पद्धतीने चाललेले ह्या सर्व समूहाचे काम म्हणजे सांघिक यशाचा आविष्कारच आहे. 

ह्या चित्रपटात छत्रपती ताराराणी यांची भूमिका साकारणारी गुणी कलाकार हीरकणी सोनाली कुलकर्णीही व इतर सर्व कलाकारांना चित्रपटातील वेशभूषेत पाहिल्यावर तर काही क्षण आम्ही इतिहासातील त्या काळातच आहोत की काय असेच वाटले. खूप दुर्मिळ व आयुष्यभर लक्षात राहील असा हा अनुभव आहे जो अनुभवण्याची संधी केवळ घनश्याम सर व ज्योतीमुळे मिळाली त्यासाठी दोघांचेही मन:पूर्वक आभार. 

आता कधी एकदा हा चित्रपट येतोय आणि चित्रपट गृहात जाऊन मोठ्या पडद्यावर पाहतोय असे झाले आहे. तसेच श्रेयनामावली पाहतांना उभे राहून टाळ्या वाजवून ह्या पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचे कौतुक करतो आहे असे झाले आहे.

कलाकारांच्या कामात फार व्यत्यय नको म्हणून  चार वाजता चित्रीकरण स्थळावरुन पाय निघत नसतानाही काढता पाय घेतला.

सर्व समूहाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

रवींद्र कामठे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02uMHeyJ7WMqY6DeqdP4uKrUnZqttuFo9mvAYnCG1mT5Pzd6CaGcVYMzmFjRnVBy9ol&id=1835772995&sfnsn=wiwspwa 

No comments:

Post a Comment