Wednesday 29 May 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – आणि...चतुर्भुज झालो...

अनुभवाच्या शिदोरीतून – आणि...चतुर्भुज झालो...
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख

१९८५ ला मी आयएलएसच्या लॉं कॉलेजमधे दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला.  आमचा ८ जणांचा एक समूह होता जो नेहमी लॉं कॉलेजच्या सायकलस्टॅण्डवरच न चुकता गप्पा ठोकत बसलेला असायचा. आमच्यात एक अतिशय हुशार, हजरजबाबी, गोरीगोमटी, खुशालचेंडू, बॉबकटमधे शोभून दिसणारी, बिनधास्त प्रवृतीची, एक मैत्रीणही अधून मधून येत असायची. ती पण नोकरी करून शिकत होती. कॉलेजला आली की आमच्यात येवून गप्पा मारायची. 
एका वर्षात तिचे आणि माझे सुत जमायला लागले होते.  एकमेकांच्या घरीही येणे जाणे झाले होते.  ती मला आवडायला लागली होती.  हळू हळू माझ्या मनात तिच्या बद्दल तिला आपली सहचारिणी करण्याचे विचार यायला लागले होते. परंतु तिला हे कसे सांगायचे ! ह्या विचाराने ओठांवर आलेले शब्द परत घशात जायचे.  ती जर रागावली आणि नाही म्हणाली तर उगाचच एक चांगली मैत्रीण गमावल्याचे दु:ख नशिबी यायचे, असे वाटायचे. त्यातून आमच्या जातीही वेगळ्या. कसे जमायचे ! असा विचार कित्येकवेळेला मनात यायचा आणि पुन्हा मूग गिळून गप्प बसायचो.  असचं एक वर्ष कसं गेलं तेच कळलं नाही.  
१९८६ साल उजाडलं.  आमची मैत्री मात्र दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती.  मी आता लॉं च्या तिसऱ्या वर्षात गेलो होतो आणि ती दुसऱ्या वर्षात. मध्यंतरी मी शेतकी कॉलेजची नोकरी सोडून दुसऱ्या एका खाजगी कंपनीमधे चांगल्या पगारावर रुजू झालो होतो.  एकदिवस मनाचा हिय्या करून, खूप सारी हिंमत गोळा करून तिला आपल्या मनातले सांगयचे ठरवून टाकले.  फार फार तर काय होईल; ती नाही म्हणेल, एवढेच ना !  
खूप विचार करून फेब्रुवारी महिन्यात एक दिवशी दुपारी कॉलेजच्या कट्ट्यावर बसलो असतांना, नमनाला घडाभर तेलही न घालवता, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे” असे एका दमात तिला सांगून मोकळा झालो !
पुढची पंधरा मिनिटे एकदम निरव शांततेत गेली.  मी आपला हातावर हात चोळत इकडे तिकडे पहात तिच्याकडून काय उत्तर येते आहे ह्याची वाट बघत चुळबुळ करत बसलो होतो. पंधरा मिनिटांनी तिने तिचे मौनव्रत सोडले आणि अतिशय शांतपणे मला सांगितले की;
“मला नाही जमणार तुझ्याशी लग्न करायला”.
“मी लग्नच करायचे नाही असे ठरवले आहे”.
“माझ्या काही वैयक्तिक अडचणी आहेत”
असे सांगून कॉलेजमधून निघूनही गेली.
मी एकदम हिरमुसलो होतो.  त्या दिवशी मी मात्र खूप उदास झालो होतो. तिच्या काय वैयक्तिक अडचणी आणि जबाबदाऱ्या असतील; ज्यामुळे तिने लग्नाला नकार दिला ह्यावर विचार करत बसलो.  विचारांती ठरवले की ह्या विषयावर तिच्याशी पुन्हा एकदा सविस्तरपणे बोलायचे.  पण आमच्या परीक्षा जवळ आल्यामुळे आता अभ्यासावर लक्ष देणेही गरजेचे होते.  माझे लॉचे शेवटचे वर्ष होते.  ही पदवी मिळाली की चांगली नोकरी मिळवायची होती, त्या उद्देशाने मी सगळे विसरून अगदी जोमाने अभ्यासाला लागलो. 
शेवटचा पेपर दिला व ती आणि मी कॉलेजच्या कट्ट्यावर परत एकदा भेटलो.  ह्या वेळेस तिच्या नकाराचा होकारात बदल करण्याचे मनोमन पक्केही केले होते.  अतिशय भावनिक तणाव होता आमच्या दोघांवर !  तसे आमचे काही लग्नाचे वयही नव्हते. माझे वय २४ आणि ती २३. 
मी तिला सरळच विचारले की;
“तुझी वैयक्तिक अडचण काय आहे” ! 
“तू माझ्याबरोबर लग्नाला का तयार नाहीस” !
काय कारण आहे, “तू मला नाही म्हणायचे” ! 
मी तिला अगदी निकराने विचारले की, जे काही असेल ते अगदी स्पष्टपणे बोल.  त्यावर तिने उत्तर दिले की; “मी एकुलती एक मुलगी असल्यामुळे माझ्यावर माझ्या आई बाबांची जबाबदारी आहे”. त्यामुळे मी लग्नच न करण्याचे ठरवले आहे.
मला तुझ्याशीच काय पण कोणाशीच लग्न करायचे नाही.  तुझ्या भावनांचा मला आदर आहे, पण पण.......
तिचे वाक्य अर्धवट तोडत मी तिला सांगितले की, एवढेच जर कारण असेल तर;
“तुझ्या आई-बाबांची संपूर्ण जबाबदारी तुझ्याबरोबर मी सुद्धा घ्यायला तयार आहे”. “आपण दोघे मिळून त्यांचा सांभाळ करू”.
माझ्या ह्या एका वाक्याने तिला काय वाटले कोणास ठावूक.  तिने माझ्याशी लग्न करायला होकार दिला. पण अजून एक मेख होती ती म्हणजे की, दोघांच्याही घरच्यांचा आमच्या आंतरजातीय विवाहास असणारा तीव्र विरोध !
माझ्या घरच्यांचा विरोध तर इतका कठीण होता की जेंव्हा जेंव्हा माझ्या लग्नाचा विषय निघायचा तेंव्हा तेंव्हा भांडणे होऊन अगदी हमरातुमरी व्हायची. त्या सगळ्यांना मी जर असा आंतरजातीय विवाहाचा पायंडा पाडला तर आमच्या घरातील मुलींची लग्नेच होणार नाहीत, त्यांचे नाक कापले जाईल, समाजातली त्यांची इभ्रत कमी होईल, वगैरे वगैरे. सामंजस्याने ह्यातून काही मार्ग निघेल असे मला तरी वाटत नव्हते.  पण काळ हेच काय ते त्यावर औषध होते हे मी जाणून होतो.  
दोघांच्या घरच्यांच्या संमतीने जेंव्हा केव्हां लग्न होईल तेंव्हाच लग्न करून आपला संसार सुरु करायचा असे आम्ही एकमताने ठरवले होते. पुला खालून खूप पाणी वाहून गेले होते. आमचा संघर्ष तर चालूच होता. शेवटपर्यंत तो करावाच लागणार होता ह्याची मनोमन जाणीवच नाही तर खात्रीच होती.
परंतु नियतीच्या मनात जे होते तेच झाले शेवटी. तिच्या घरची तणावाची परिस्तिथी जरा निवळली होती.  तिच्या काही नातेवाईकांशी मी स्वत: चर्चा करून त्यावर तोडगा काढला होता व आमच्या लग्नाला त्यांची संमती मिळवली होती. पण माझ्या घरचे मात्र अडून बसले होते. समजून सांगून काहीच उपयोग होत नव्हता.  माझा तर संयम सुटतच चालला होता.
आम्ही दोघे मात्र आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे, ह्या अशा परिस्थितीतही, आम्ही आमच्या संसाराची जुळवाजुळव करण्याची योजना आखली होती.  तिच्या घराच्या जवळच माझ्या एका मित्राचे घर होते ते भाड्याने घेऊन तिथे, अगदी चमचा वाटी पासून लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत आणून आम्ही संसार थाटायला सुरवात केली होती.  तिच्या घरच्यांशी बोलून लग्नाची तारीखही पक्की केली होती. तिच्या साठी लग्नाचा शालू (रु. २५०/- त्या काळचा) वगैरेची खरेदी झाली होती.  माझे पण नवीन कपडे घेवून झाले होते. जस जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस तसा माझ्यावरील ताण वाढत होता.  आता माझी खरी कसोटी लागणार होती.  माझ्या घरी हे सगळे कसे सांगायचे, हा एक मोठा प्रश्न माझ्या समोर आ वासून उभा होता. शेवटी कधीही न संपणाऱ्या ह्या वादावर मीच काय तो एकदाचा पडदा टाकायचे ठरवले. लग्नाच्या आदल्या दिवशी (२२ मे ला) अंगातले सगळे बळ एकवटून, होते नव्हते तेवढे धारिष्ट्य गोळा करून माझ्या घरच्यांना सांगून टाकले की, “माझे उद्या लग्न आहे”, “तुम्हांला यायचे असेल तर या नाही तर राहिले”. असे सांगून बरोबर आणलेले हार खुंटीला अडकवले आणि झोपून गेलो.  सकाळी लवकर उठून आवरून कोणाशी काहीही न बोलता घरातून गपचूप निघून आलो.  
नंतर काय झाले माहित नाही, पण नियतीने सगळे कसे व्यवस्थित जुळवून आणलेच ! माझ्या घरच्यांचे मतपरिवर्तन होऊन सगळेजण (धाकटा भाऊ सोडून) २३ मे १९८७ ला सकाळी लग्नाला हजर झाले. बायकोच्याच राहत्या घरी अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आमचे लग्न धार्मिक पद्धतीने लागले.  लग्न लागेपर्यंत माझ्या मनावर खूप दडपण होते. परंतु नशिबाची साथ होती म्हणून सगळे कसे विनासायास पार पडले.  अतिशय थरारक, पण अविस्मरणीय असा हा “चतुर्भुज”होण्याचा हा सुखद अनुभव आज लिहितांनाही अंगावर काटा येतो.  कुठून एवढे बळ त्यावेळेस आमच्या अंगात आले होते कोणास ठावूक ! आयुष्यातील महत्वाच्या निर्णयाबद्दल आम्हांला कधीच पश्चात्ताप झाला नाही.
काळानुरूप, आमच्या दोघांच्याही घरच्यांचा विरोध निवळत गेला.  आमचा स्वाभिमान, जिद्द, सकारात्मक दृष्टी, संयम, सचोटी, ठामपणा, संसाराप्रतीची निष्ठा, जबाबदारीची असलेली जाणीव, आमची नाती जोपासण्याची कला, ह्यामुळे आमचा संसार दिवसेंदिवस फुलतच गेला आणि दोघांच्या घरच्यांच्या मनात तसेच समाजातही आम्हांला आदराचे स्थान देऊन गेला, जे आजवरही टिकून आहे.
आज आमच्या संसाराला ३२ वर्षे पूर्ण झालीत आणि आमचा संसारही तितकाच सुखाचा चाललाय.  आमच्या संसाराच्या वेलीवर मुलीच्या रूपाने एक गोजिरवाणे फुलही उमलले, फुलले आणि आता तिच्या तिच्या संसारात ते बहरलेही आहे ह्याचेच खूप खूप सुख आणि समाधान आहे !
आयुष्यात मनापासून ठामपणे घेतेलेला कुठलाही निर्णय हा तुम्हांला नेहमी यशस्वीच करतो हा माझा तरी अनुभव आहे !

रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment