Thursday 25 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – सकारात्मक दृष्टीने साकारलेला एक भव्य प्रकल्प


अनुभवाच्या शिदोरीतून सकारात्मक दृष्टीने साकारलेला एक भव्य प्रकल्प

चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 

२००३हे वर्ष बहुतेक माझी कसोटीच घेणारे होते की काय कोणास ठाऊक !  आधीची नोकरी तर गेलीच होती, त्यामुळे मागील वर्षी घेतलेला भूखंडही आर्थिक नियोजन ढासळ्यामुळे विकावा लागला होता व माझ्या भविष्यातील योजनेवर बोळा फिरवला गेला होता.  मी कितीही नाही म्हणालो तरी थोडासा व्यथित होऊन हिरमुसलो होतो. 

अथक प्रयत्नांती, शिवाजीनगर येथील फायबरग्लासचे डोम बनविण्याच्या कारखान्यात ८-१० हजाराची एक नोकरी, एका मित्राच्या ओळखीने मिळाली होती.  आधी मालक असलेला माझ्या मित्राचा मित्र, नंतर माझाही खूप चांगला मित्र झाला, ही खूप मोठी उपलब्धी होती !  अहो ह्या व्यक्तीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डोम केला आहे व त्यासाठी त्याला पारखे पारितोषिक मिळाले आहे. खुद्ध लता मंगेशकर आणि त्यावेळेसचे पंतप्रधान कै. अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेली ही आसामी, मला मित्र म्हणून ह्या नोकरी निमित्त लाभली होती.

मी कारखान्यातले सर्व व्यवस्थापन सांभाळत होतो व त्याच बरोबर माझ्यातील मार्केटिंग कौशल्याचा वापर करून वेगवेळ्या आर्किटेक संस्थेशी संधान बांधून फायबरग्लास डोमची कामेही मिळवत होतो.  असेच एक दिवस फातिमानगर नगर भागात फिरता फिरता, एका मोठ्ठ्या व्यावसाईक इमारतीचे बांधकाम माझ्या नजरेत पडले.  सवयीने, मी त्या इमारतीतील कार्यालयात गेलो व चौकशी करू लागलो.  बांधकामावरील अधिकाऱ्यास भेटून आमच्या कंपनीची माहिती देवून आमच्या लायक काही काम असेल तर सांगा असे बोलत होतो.  इतक्यात तिथे त्या इमारतीचे मालक आले व त्यांनी आमचे संभाषण ऐकले व माझ्या हातात असलेले, आम्हीं केलेल्या वेगवेगळ्या डोमचे फोटो पहायला घेतले.  त्या फोटो मध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डोमचाही फोटो होता.  त्यांनी मला विचारले की आपण आत्ता बसलो आहे त्या इमारतीमधील एक ४० फुट रुंद आणि १४० फुट लांब गाळ्यावर फायबरग्लासचा डोम करायचा आहे व तो तुमची कंपनी करू शकेल का ह्या गाळ्यात मध्ये कुठेही एकही आधार न घेता तो बनवायचा होता हे त्यातले विशेष होते !  अगदी सहज काही काम आहे का बघायला आत शिरलो तर, इथे तर कामाचे मोठ्ठे घबाडच माझ्या हाती लागले होते !  मी माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य अतिशय बेमालूमपणे झाकले व त्यांना त्याच आत्मविश्वासाने उत्तर दिले की तुमचे हे काम फक्त आम्हीच करू शकतो, जसे दिनानाथ हॉस्पिटलचे केले आहे तसे !  झाले त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यास मला घेवून ताबडतोब त्यांच्या पुलगेट येथील आर्किटेकच्या कार्यालयात यायला सांगितले.

आर्किटेकच्या कार्यालयात जावून मी त्यांना काय हवे आहे त्याची माहिती घेतली.  त्यांनी आरेखन केलेले काही कागद मला दिले आणि एक चार दिवसांत संपूर्ण कामाचे स्वरूप, त्याच्या खर्चाचा अंदाज आणि लागणारा वेळ, ह्या सहित त्यांच्या कॅम्प स्थित महात्मागांधी रोड वरील मुख्य कार्यालयात आमच्या मालकांना घेवून भेटायला या सांगितले.

५ वाजता मालक आले.  त्यांना कधी एकदा ही ह्या नवीन कामाची माहिती देतो आहे असे मला झाले होते.  न राहवून त्यांना मी आज केलेला हा प्रताप ऐकवला आणि दोन मिनिटे त्यांच्या चेहऱ्यावरील त्यांनाही बसलेला आश्चर्याचा धक्का अजमावत होतो.  ह्या कामाचा अवाका आणि त्याची आम्हांला मिळू शकणारी संधी पाहून त्यांनी माझे मनापासून कौतुक तर केलेच पण, लगेच एक चहा व एक सिगरेट पाजून मला खूशच करून टाकले. 

तीन दिवसांत आम्हीं ह्या कामाची सर्व माहिती आणि आरेखन ह्यांचा सविस्तर विचार करून अभ्यास केला.  एक डोम म्हणजे व्हाल्ट ४० फुट रुंद व १४० फुट लांब होता. हा संपूर्ण डोम फायबरग्लासमधे तयार करायचा होता व कुठल्याही आधाराशिवाय त्या गाळ्याच्या ७व्या मजल्यावर बसवायचा होता, ज्यातून साधारण ६०% उजेड येईल, पण पाण्याचा एक थेंबही आत येणार नाही, तसेच खालच्या मजल्यावर हवाही खेळती राहील अशी व्यवस्था करायची होती. 

एकंदरीतच ह्या कामाचे स्वरूप तसे अवाढव्यच होते व आमच्या कंपनीला झेपेल की नाही ह्याची शक्यता पडताळणे गरजेचे होते.  त्यामुळे ह्या कामाची आम्हीं तपशीलवार उजळणी केली, कामगारांशी चर्चा केली, शिवाजीनगरच्या कारखान्यात हा डोम कसा बनवायचा व तो फातिमानगरला कसा न्यायचा तसेच डोम ७ व्या मजल्यावर कसा लावायचा ह्याचा संपूर्ण आराखडा अक्षरश: तीन दिवस व रात्र खपून तयार केला.  लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती घेतली व त्याची उपलब्धता व किंमत जाणून घेतली.  तसेच येणाऱ्या इतर सर्व खर्चाचा अंदाज काढला, नफा किती ठेवायचा हे ठरवले व एक ठोकताळा बनवून त्याचे रीतसर कागदपत्रे तयार करून ठेवली आणि ठरल्याप्रमाणे मी आणि मालक त्या इमारतीच्या मालकांना भेटायला त्यांच्या कार्यालयात पोचलो.  पहिल्या भेटीत त्यांनी आमच्या ह्या सर्व तयारीचे खूप कौतुक केले व आमची काम करण्याच्या प्रबळ इच्चाश्क्तीची प्रशंसा केली.  त्यांच्या अनुभवी वडिलांनी तर आमची तोंडवरच स्तुती केली.  नंतर आम्हांला कळले की त्यांनी पुण्या मुंबईच्या काही कंपन्यांना विचारणा केली होती, पण आमच्या एवढे चांगले काम कोण करू शकेल की नाही अशी त्यांना शंका होती.

आमची औपचारिक बोलणी सुरु होती.  तीन चार वेळा गाठी भेटीही झाल्या.  कामाचा तपशील व आम्ही दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकावर भरपूर चर्चाही झाली.  सरते शेवटी हे कंत्राट आम्हांला देण्याचे त्यांनी घोषित केले आणि तशी वर्कऑडर, आगाऊ रकमेसहित देवून लेगेचच कामाला सुरवात करायला सांगितले व कुठल्याही परिस्थितीत हे काम ४ महिन्यातच पूर्ण करण्याचे आश्वासन आमच्याकडून घेतले होते. 

हा एक डोम म्हणजे जवळ जवळ कात्रजच्या बोगाद्या एवढा होता.  आणि आंम्हाला एक नव्हे तर दोन डोमची ऑर्डेर मिळाली होती, ज्याची किमंत काही लाखांत होती.  आजवरच्या माझ्या मार्केटिंगच्या क्षेत्रामधील ही सर्वात मोठी सफलता होती.  

हा प्रकल्प फारच खडतर तर होताच पण अतिशय जोखीमिचाही होता.  मानसिक, आर्थिक आणि शारीरक कष्टाची कसोटी पाहणारा होता.  माझ्या आजवरच्या कार्यकाळातील अतिशय बहारदार अनुभव देणारा होता.  काय नव्हते ह्या प्रकल्पात हो;
ह्या प्रकल्पाची मोठ्या विश्वासाने संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकणारा मालक मित्र होता.  अहोरात्र न थकता वेळेत काम पूर्ण करणारे कामगार होते.  रात्री अपरात्री ह्या तयार झालेल्या पाकळ्या ट्रेलरवर चढवायला मदत करणारे सहकारी होते.  फायबरग्लासच्या ३० फुटी अर्धगोलाकार ८ पाकळ्या एका वेळेस मोठ्ठ्या ट्रेलरमध्ये टाकून त्या शिवाजीनगरवरून फातिमानगर पर्यंत जीकरीने पोचवणारे (२०-२५ ट्रीप करणारे) चालक होते (ज्याची फक्त रात्री १ ते ३ दरम्यानच वाहतुकीची परवानगी होती) व त्या पाकळ्या रात्रीत ट्रेलर मधून उतरवून घेवून ७व्या मजल्यावर चढवणारे धमाल हमाल होते.  तसेच ह्या ३० फुटी एक अशा अंदाजे एका बाजूला ४५ व दुसऱ्या बाजूला ४५ अशा एकूण ९० पाकळ्या एकमेकांना अधांतरी जोडून त्याचे एका डोम (व्हाल्ट) मध्ये रुपांतर करणारे विशिष्ट कौशल्य असलेले जिगरबाज कामगार होते.  कोणा कोणाचे कौतुक करायचे !  सगळेच जण ह्या प्रकल्पात स्वत:ला झोकून देवून काम करत होते व माझ्या कारकीदीत एका अनोख्या व सफल प्रकलपाची भर घालत होते.

एक सांगतो ह्या प्रकल्पामुळे मला उलगडलेले एक गुपित सांगतो
;
सकारात्मक दृष्टीने पाहून आलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत. आयुष्यात कुठलेच काम कधीच कठीण नसते किंवा अशक्य नसते.  फक्त आपण जोखीम घेऊन आपल्या इच्छाशक्तीवर भरवसा ठेवून, निष्ठेने ते पूर्णत्वास न्यायचे असते.  यश तर नक्कीच असते आणि त्याचे फळ तर आपल्या मानसिक आणि आंतरिक समाधानातच दडलेले असते.  हा माझा तरी अनुभव आहे, जो मला तुमच्याबरोबर ह्या लेखाद्वारे पोचवावासा वाटला !

रविंद्र कामठे


No comments:

Post a Comment