Wednesday 3 April 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – निवृत्तीचा सोहळा


अनुभवाच्या शिदोरीतून निवृत्तीचा सोहळा

दुपारचे ४.३० वाजले होते.  मला एक फोन येतो.  सर, तुम्हीं तुमच्या चेंबरमधेच थांबा.  तुम्हांला बोलवले की वर टेरेसवर या !  पाच मिनिटांनी आमचे एक माजी आणि एक आजी संचालक, मला माझ्या पहिल्या मजल्यावरील चेंबरमधे, माझ्या निवृत्तीनिमित्त, तिथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभाच्या ठिकाणी, अतिशय सन्मानाने न्यायला आले होते.  त्या क्षणाला मला काय बोलावे हेच सुचत नव्हते.  क्षणभर मी स्तब्धच झालो होतो.  कसा बसा भावनांना आवर घालून एक आवंढा गिळला आणि त्यांच्या बरोबर चालू लागलो.  माझ्या त्या वेळेसच्या भावना मला व्यक्त करताच येणार नाहीत इतक्या संस्मरणीय आहेत !
त्यापुढे जाऊन अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे; आमच्या कार्यालयाच्या टेरेसकडे जाणाऱ्या पायऱ्यांपासून ते समारंभाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत, दुतर्फा उभे राहून सगळ्यांनी टाळ्या वाजवून मला माझ्या निवृत्ती निमित्त दिलेली सलामी म्हणजे; खऱ्या अर्थाने माझ्या आजवरच्या कार्याचा केलेला अनमोल असा गौरवच होता, असेच म्हणावयास हवे.  पाच मिनिटे चाललेला टाळ्यांचा हा कडकडाट, मला एका वेगळ्याच विश्वात घेवून गेला होता.  गेली ४० वर्षे केलेल्या कामाचे इतके अविस्मरणीय फळ लाभल्यामुळे मला कृतकृत्य झाल्या सारखे वाटत होते.  हात जोडून सगळ्यांच्या माझ्याप्रतीच्या आदराचा स्वीकार करतांना, मी अजूनच भावूक होवून, अतिशय जड अंत:करणाने व्यासपीठाकडे चालत होतो. 
माझ्या निवृत्ती निमित्त एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला असेल ह्याची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.  कंपनीच्या संचालकांचे माझ्याबद्दलच्या प्रेम, स्नेह आणि आदराने माझा ऊर अभिमानाने भरून आला होता.  माझ्या ह्या सहकाऱ्यांच्या नजरेतून, त्यांच्या हालचालीतून माझ्याबद्दलची आस्था मला अगदी स्पष्टपणे जाणवत होती आणि मी मनोमन स्वत:ला खूप नशीबवान समजत होतो.  किती मोठी दौलत मी आजवर कमावली होती तिचा हा लेखाजोखा माझे डोळे दिपवूनच गेला होता आणि मला सर्वांदेखत रुमाल काढून माझ्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू टिपायला भाग पाडून गेला.
एक एक करून माझे काही सहकारी त्यांच्या भाषणातून, कवितेतून, विनसीस मधील माझ्या आजवरच्या कारकीर्दीचा, मागोवा घेवून मला अजूनच भावूक करून टाकत होते.  माझ्यातील काही कला गुणांची त्यांनी केलेली पारख ऐकतांना मन प्रसन्न झाले होते.  आपल्या कार्याचा नुसता आढावा जरी घेतला तरी अभिमान वाटतो; इथे तर माझ्यावर कौतुकाचा नुसता वर्षाव होत होता.  अतिशय नेमक्या शब्दांमध्ये माझ्या आजवरच्या कार्याचा असा मागोवा घेतांना काही अतिशय अनमोल अशा आठवणी व्यक्त केल्या गेल्या की त्या स्मृतींवर मी उर्वरित आयुष्य नक्कीच आनंदाने घालवू शकेन !  आपल्या हयातीतच नव्हे तर योग्य वयात जर आपले कौतुक केले गेले तर माझ्या मते जगायची एक नवी उमेद नक्कीच येते व आयुष्य सार्थकी लागल्याचे सुख मिळते, हे ह्या कार्यक्रमामुळे मला उमजले.  जीवन गौरव व्हावा पण तो योग्य वयात व्हावा असे मला वाटले आणि तो आज ह्या समारंभाच्या निमित्ताने जाणवला. 
ह्या समारंभात मला बहुमुल्य भेटी तर मिळाल्याच; त्या स्वीकारतांना हात तर जड होतच होते पण अंत:करणही तितकेच जड होत होते.  काळीज हलके होवून कधी नव्हे इतके डोळे पाणावले होते.  माझा एवढा आदर सन्मान करणाऱ्या कोणाचे, कसे आणि किती आभार मानायचे ह्या विचारत मी काही क्षण गढून गेलो होतो.
शेवटी तो अतिशय अवघड असा क्षण आलाच व मला माझे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली.  आधीच मी ह्या सगळ्यांच्या प्रेमाने, स्नेहाने आणि आदराने इतका भारावून गेलो होतो की; दोन मिनिटे शांत उभे राहून भरल्या डोळ्यांनी सर्वांना अभिवादन करून बोलायला सुरवात केली.  सुरवात अर्थातच अडखळतच झाली.  अशा वेळी काय बोलायचे !  ही वेळ काय आपल्या आयुष्यात नेहमी येत असते का ! तरीही कसाबसा धीर एकवटून मी माझे मनोगत व्यक्त केले.  नियोजित वेळे आधीच म्हणजे वयाच्या ५६व्या वर्षीच मी निवृत्त होण्याचा निर्णय का घेतला होता हे ऐकण्याची सगळ्यांची इच्छा होती जी मला जाणवत होती. 
माझे निवृत्तीचे प्रयोजनही तसे खासच होते !  एक तर सध्या मला तब्बेत साथ देत नव्हती व रोजची कामाची दगदग सहनही होत नव्हती.  त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष देण्यास वेळ मिळावा व त्यातून सुधारणा झाल्यानंतर एखाद्या सामाजिक कार्यास हातभार लावून समाजाचे ऋण फेडावे. तसेच थोडेसे उशिराच सुचलेले शहाणपण म्हणजे साहित्य क्षेत्रात काही योगदान देता आले तर ते ही करावे; इतकीच प्रांजळ अपेक्षा समोर ठेवून मी हा निर्णय घेतला होता.  तब्बेतीने थोडी साथ ढिली केली होती पण परिस्थितीची आणि कुटुंबाची मजबूत साथ लाभली होती त्यामुळे आयुष्याची ही दुसरी खेळी जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने जगण्याचा माझा मानस मी व्यक्त केला होता.
हो विनसीस ही माझ्या ४० वर्षाच्या कारकिर्दीतील १३वी पण शेवटची नोकरी होती.  ह्या ४० वर्षामधील शेवटची ही ११वर्षे विनसीस मध्ये फारच सन्मानाने गेली होती त्याची प्रचीती मला ह्या कार्यक्रमात पदोपदी येत होती.  गेली ४० वर्षे मी भरपूर खूप खस्ता खाल्ल्यात.  नको इतके कष्ट केलेत. यंत्रा सारखे स्वत:चे शरीर वापरले होते.  त्यामुळे आता त्याला थोडी विश्रांती द्यावी थोडेसे स्वत:कडे लक्ष द्यावे, आपले छंद जोपासावे असे वाटले म्हणून हा योग्य वेळी घेतलेला निवृत्तीचा निर्णय सर्वच सहकाऱ्यांना अगदी मनापासून आवडला.  काहींनी तर मला प्रत्यक्ष भेटून माझे ह्या निर्णयाबद्दल खास अभिनंदन केले आणि माझा आदर्श समोर ठेवून त्यांची उर्वरित कारकीर्द पार पाडण्याची हमीच देवून गेले.  अजून काय हवे असते हो माणसाला.  कितीही पैसा कमावला तरी हे असे क्षण पदरात पडायला फक्त नशीबच असावे लागते हे ही तितकेच खरे.

ह्या कार्यक्रमासाठी खास तयार करून आणलेला केक त्यावर (All the best RK) हा संदेश. ह्या केकवर सुरी फिरवतांना खूप संमिश्र अशा भावना माझ्या मनात त्यावेळेस दाटून येवून माझ्या काळजाचे पाणी पाणी करून न राहवून मला रडवूनच गेल्या.
समारंभानिमित्त आयोजित अल्पोपहाराचा आस्वाद घेतांना उपस्थित प्रत्यकेजण, अगदी आपुलकीने, “सर तब्बेतीची काळजी घ्या”  जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा आम्हांला भेटायला या, आम्हांला मार्गदर्शन करा”, असे आवर्जून भेटून सागंत होता आणि मी स्वत:ला एक नशीबवान उत्सवमूर्ती समजत होतो.
ह्या सोहळ्याच्या आयोजन करणाऱ्या आमच्या कमिटीचे किती आभार मानायचे हेच मला काही समजत नाही.  ह्या कमिटीत माझी भाची सुद्धा होती, पण तिने मला ह्या संपूर्ण कार्यक्रमाची थोडीशी सुद्धा चाहूल लागून दिली नव्हती.  ह्या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था आमचे मनुष्यबळ अधिकारी, कार्यकारी संचालक आणि संचालिका (भारतात नसतांनाही) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती हे विशेष.  
ह्या सोहळ्यानिमित्त, बायको, मुलगी आणि जावई, ह्यांनी मला घरी न्यायला येवून दिलेला धक्का सुखद असा आयुष्याचा ठेवा होता. 

हाच तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस; शनिवार ३० मार्च २०१९.  ह्या दिवशी मी विनसीस आयटी सर्विसेस ह्या खाजगी कंपनीतून १० वर्षे ८ महिन्यांच्या अखंड कालखंडानंतर व आयुष्यातल्या ४० वर्षांच्या अथक सेवेतून वयाच्या ५६व्या वर्षी मी निवृत्त झालो होतो व माझ्याच एका कवितेशी समरस होवून गेलो होतो...
क्षण निवृत्तीचा, असतो दुभाषी,
एक मन म्हणते, निष्क्रिय झालासी, दुजे मन सांगते, सक्रीय व्हावेसी ||
क्षण निवृत्तीचा, असतो विलक्षण,
एक मन करते, भूतकाळाचे परीक्षण, दुजे मन सांगते, भविष्याची उजळण ||
क्षण निवृत्तीचा, असतो दुर्मिळ,
एक मन म्हणते, स्मृती तू उजळ, दुजे मन सांगते, क्षण हे उधळ ||
क्षण निवृत्तीचा, असतो अभिलाषी,
एक मन म्हणते, उरलास सकळासी, दुजे मन सांगते, जुळवून घे समाजासी ||

आभार म्हणून नाही पण माझ्या सहकाऱ्यांच्या प्रेमा पोटी मला म्हणावेसे वाटते की;
सुवर्णाक्षरांनी गेला लिहीला,
माझ्या निवृतीचा हा सोहाळा ।
डोळ्यांत दाटूनी आले होते पाणी
कौतुकाच्या वर्षावाने नि:शब्ध जाहली वाणी ।
कसे, किती आणि कोणा कोणाचे आभार मानू
तुमच्या ह्या स्नेहाने मन गेले भरुन ।

रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment