Sunday 14 April 2019

पक्षी आणि पाणी



नमस्कार मित्रांनो,
ह्या वर्षी तापमानाने तर मार्च महिन्याच्या अखेरीपासूनच ४०शी गाठली आहे आणि माणसांच्या अंगाची लाही लाही होते आहे.  घरातून बाहेर पडावेसे वाटत नाही हो ! पुण्याचे अगदी नागपूर चंद्रपूर झाल्यासारखे वाटत आहे.  हे असेच चालू राहिले तर जगणेच मुश्कील होऊन बसेल असेच मला वाटते आहे. माणसांचे हे हाल आहेत तर पक्षांचे किती हाल होत असतील ह्याचा नुसता विचार जरी केला तरी भोवळ आल्यासारखे होते हो ! आपल्या ह्या सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात पक्षांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागत आहे व त्यात त्यांचा जीवही जातो हो.  हे वाचले की मन अगदी विषण्ण होते. 
म्हणूनच मी नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही पक्षांच्या पाण्यासाठीची थोडीशी सोपी पद्धत अवलंबली आहे.  टाकाऊ पाण्याच्या बाटलीतून ह्या पक्षांच्या पाण्यासाठीची एकदम सोपी पद्धत सोबतच्या फोटोत दाखवली आहे तशी तुम्हीं सुद्धा घरच्या घरी करू शकता अशी आहे.  थोडक्यात मी तुम्हांला ही पद्धत सांगतो..
दोन लिटर किंवा पाच लिटर पाण्याची बाटली घ्या.  एक स्क्रूड्रायव्हर अथवा टेस्टर घ्या.  तो मेणबत्तीवर गरम करून बाटलीच्या तळाशी एक भोक पाडा.  घरातील शोभेच्या माश्यांच्या साठीची ऑक्सिजनची एक नळी घ्या.  ती साधारण ६ इन्च लांबीवर कापा.  माश्याच्या साठी ऑक्सिजनचा एक नॉब मिळतो तो ह्या नळीच्या एका टोकाला लावा आणि नळीचे दुसरे टोक बाटलीच्या तळाला जे भोक पाडले आहे त्याच खूपसवा आणि त्यावर फेविक्विकचे तीनचार थेंब सोडा.  झाले आपले ठिबक सिंचन योजना तयार झाली.  आता जवळच्या नर्सरीतून मातीचे एक पसरट पण थोडे खोल भांडे आणा.  ह्या भांड्यावर ही बाटली साधारण फुटभर उंचीवर बांधून ठेवा.  म्हणजे अगदी थेंब थेंब पाणी सतत ह्या मातीच्या भांड्यात पडत राहील.  हे असेच सतत पाणी पडल्यामुळे एवढ्या उन्हातही ते थंड राहते.  त्यासाठी सुरवातीला निम्मे भांडे भरून पाणी ठेवा म्हणजे अगदी भर उन्हात सुद्धा पक्षांना थंडगार पाणी मिळेल.  दिवसातून एकदा तुमच्या सोयीने ह्या बाटलीतील पाणी बदलत रहा तसेच मातीचे भांडे स्वच्छ करून ठेवा.  ह्यामुळे पक्षांना थंड पाणी मिळेल आणि आपल्याला एक सात्विक आनंद मिळेल जो लाखो रुपये खर्च करूनही मिळणार नाही.  हा माझा स्वत:चा अनुभव आहे.  माझ्या घरच्या सर्व दिशांना ही अशी पाण्याची सोय मी १२ ही महिने करतो. उन्हाळ्यात फक्त जरा जास्त लक्ष द्यावे लागते.
तुम्हीं जर रोज कुठे फिरायला, जात असाल तर एक बाटली आणि एक मातीचे भांडे तुमच्या ह्या नेहमीच्या ठिकाणी नेऊन ठेवा.  रोज सकाळी फिरायला जातांना बरोबर पाणी घेवून जा आणि ही रिकामी झालेली बाटली भरून या.  त्यामुळे ह्या पक्षांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही आणि तुम्हांलाही त्यांना पाणी दिल्याचे आत्मिक समाधान मिळून जाईल. ह्याचा अजून एक उपयोग म्हणजे तुम्हीं तुमच्या बागेतील झाडांनाही ठिबक सिंचन योजने द्वारे पाणी देवून ती ह्या कडक उन्हात जिवंत ठेवू शकता.
मी काही फार मोठे वैज्ञानिक संशोधन वगैरे केल्याचा आव आणत नाही.  तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी हा प्रयोग केलाही असेल.  तरीही ज्यांनी हा केला नसेल त्यांच्या साठी अजूनही वेळ गेलेली नाही.. आजकाल मी तर माझ्याबरोबर ह्या प्रकारच्या बाटल्या बनवण्याचे साहित्य बरोबरच ठेवलेले असते.  तुमच्याकडची पाण्याची बाटली द्या, मी तुम्हांला अगदी पाच मिनिटांत फोटोत दाखवल्याप्रमाणे ही ठिबक सिंचन योजना करून देवू शकतो. तेवढेच मनाला समाधान बाकी काही नाही.
कराल ना एवढचं आपल्या ह्या पक्षी मित्रांसाठी...
पर्यावरण रक्षणासाठी आपला हा खारीचा वाटा खूप अनमोल आहे हे लक्षात असू द्या.  हे पक्षी जर वाचले तरच हे पर्यावरण वाचेल हे नक्की.

रविंद्र कामठे
१४ एप्रिल २०१९

No comments:

Post a Comment