Tuesday 29 August 2017

डॉक्टर नव्हे, “देवदूत”

चपराक प्रकाशन च्या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला माझा हा लेख जरूर वाचा.  अंगावर काटा आणणारा माझ्या आयुष्यातला हा एक थरारक अनुभव आहे.  देव करो अन अशी वेळ कोणावर न येवो. त्या जेव्हा केंव्हा आठवतात ना तेंव्हा मला काय वाटते......

कधी स्वतःवर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले |
इतकी आसवे, आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले ||
 
 

डॉक्टर नव्हे, “देवदूत

साधारण तीन वर्षांपूर्वीचा म्हणजे २०१४चा हा किस्सा आहे.  स्थळ पत्रकार भवन. वेळ सकाळी ११ वाजताची.  निमित्त माझ्या दुसऱ्या म्हणजेच तरंग मनाचेह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.  सर्व मान्यवर पाहुणे वेळेवर हजर होते.  प्रकाशकाने साधारण सहा सात पुस्तकांचे प्रकाशन एकत्रित करण्याचे योजिले होते.  त्यात माझ्या बरोबर ख्यातनाम लेखक, कवी, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते श्री. गंगाधर मुटे सरांच्या माझी गझल निराळीह्या गझल संग्रहाच्या दुसऱ्या आवृतीचे प्रकाशनही होते.  मान्यवरांमध्ये जेष्ठ गझल लेखिका आणि कवयत्री सौ. संगीता जोशी उपस्थित होत्या तसेच प्रथितयश डॉक्टर आणि लेखक श्री. अविनाश भोंडवे हे ही मान्यवरांमध्ये उपस्थित होते.  डॉक्टर भोंडवे सरांना पाहिले आणि अचानक माझे मन वीस वर्षांनी मागे गेले. गतकाळातील, अंगावर काटा आणणाऱ्या त्या स्मृती ताज्या झाल्या आणि एकदम डोळे भरून आले, हातपाय गारठले, घसा कोरडा पडला.  मला काहीच सुचत नव्हते.  मान्यवर तर मंचावर बसलेले होते आणि एकएका पुस्तकाचे प्रकाशन करत होते.  लेखक / लेखिका आपले मनोगत व्यक्त करत होते.  मान्यवरांचेही मनोगत व्यक्त होत होते.  मी पहिल्या रांगेत बसलेला होतो आणि माझा नंबर कधी लागतो आहे ह्याची वाट पहात होतो.  माझे ह्या सोहळ्याकडे फारसे लक्षच लागत नव्हते.  माझे चित्तच थाऱ्यावर नव्हते.  मनात गोंधळ उडालेला होता.  तेवढ्यात निवेदकाने माझे नाव पुकारले आणि मला मंचावर येण्याची विनंती केली, तेंव्हा माझी तर भंबेरीच उडालेली होती.  माझ्या बाजूला मुटे सर बसलेले होते, त्यांनी माझ्या हातात हात मिळवून मला शुभेछ्या दिल्या त्यामुळे मी थोडासा भानावर आलो.  डॉक्टर अविनाश भोंडवे सरांच्या हस्ते माझ्या तरंग मनाचेह्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.  मला माझे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करण्यात आली.  मी स्वत:ला कसे बसे सावरले.  कारण मनात इतक्या भावना दाटून आल्या होत्या की काय बोलावे हेच मला सुचत नव्हते.  तरी एक बरं झालं, की मी माझे मनोगत लिहून आणलेले होते.  ते मी मनाचे धाडस करून व्यवस्थितपणे वाचून ती वेळ मारून नेली.  अर्थात त्याही स्थितीत माझे मनोगत रसिकांना अतिशय आवडले.  माझ्या मनातल्या वादळांची तशी फारशी कल्पना रसिकांना तरी कुठे होती !  त्यावेळेस माझे काही नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते, परंतु ते सगळे मागे बसलेले असल्यामुळे माझ्या मनातले हे द्वंद त्यांच्याही नजरेस नाही आले.  माझी बायकोही ह्या कार्यक्रमास हजर होती.  परंतु ती ही माझ्या ह्या मानसिक अवस्थेपासून अनभिज्ञ होती.  अर्थात तसेही आम्हांला पत्रकार भवन मध्ये फारसे बोलायला वेळच मिळाला नव्हता.

प्रकाशन सोहळा पार पडला.  मुटे सरांच्या पुस्तकाचे सर्वात शेवटी प्रकाशन झाले.  सर्व मान्यवरांची भाषणे झाली, आभार प्रदर्शन झाले आणि आमच्या अवती भवती रसिक प्रेक्षकांचा गराडा पडला.  जो तो आमचे मन:पूर्वक अभिनंदन करत होता. मी हसून, हात जोडून, विनम्रपणे नमस्कार करून सगळ्यांचे आभार मानत होतो. तरीही माझे सर्व लक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सरांकडेच होते.  ते हा कार्यक्रम संपवून निघून तर नाही ना जाणार ह्याचीच मला काळजी होती.  कारण आज, मला त्यांना कुठल्याही परीस्थित भेटून वीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग सांगावयाचा होता.  ते कदाचित विसरले असण्याची शक्यता दाट होती.  कारण रोज एवढे रुग्ण तपासल्यावर आणि त्याच्या उपचार केल्यावर त्यांना थोडेच प्रत्येकाचे नाव आणि चेहरा आठवत असणार.  त्यात ह्या गोष्टीला आज तब्बल वीस वर्षे होऊन गेलेली होती.

आज पुन्हा एकदा वीस वर्षांनी डॉक्टर भोंडवे सरांच्या रूपाने अवतरलेला तो देवदूत माझ्या समोर उभा होता.  ज्याच्या पायावर डोके ठेवून त्याचे पुन्हा एकदा आभार मानायचे होते आणि ते ही सहकुटुंब. अगदी खराखुरा परमेश्वर आज आमच्या समोर उभा होता.  ज्याने बरोबर वीस वर्षांपूर्वी माझ्या बायकोचे मरता मरता प्राण वाचवले होते.  त्यावेळेस जर का तिच्यावर योग्य ते तातडीने उपचार झाले नसते, तर कदाचित आजचा हा प्रसंगही आम्हांला पहायला मिळाला नसता.  त्याचे असे झाले की, डिसेंबर १९९४ मध्ये मी भल्या पहाटे सहा वाजता बायकोला घेऊन, तिची गर्भ तपासणी करण्यासाठी धनकवडीहून सातारा रस्त्याने पुणे शहरात चाललो होतो .  शंकर महाराज मठासमोर आलो असतांना एका लहानशा खड्ड्यातून माझी गाडी गेली आणि त्याच्या हिसक्याने माझी बायको माझ्याच दुचाकीवरून रस्त्यावर पडली.  तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ती रस्त्यातच बेशुद्ध पडली होती.  पहाटेची वेळ, रस्त्यावर चीट पाखरुही नव्हते.  मी गाडी तशीच सोडून पहिल्यांदा बायकोला रस्त्यामधून बाजूला घेण्याचा प्रयत्न करत होतो.  परंतु ती बेशुद्ध झाल्यामुळे मला एकट्याला तीला उचलता ही येत नव्हते.  काय करावे तेच सुचत नव्हते.  परंतु तेवढ्यात पहाटफेरीला निघालेले एका वयस्कर सद्ग्रहस्तांनी झाला प्रकार पहिला आणि ते लगेचच माझ्या मदतीला धावून आले.  त्यांनी पहिल्यांदा जवळच्या सोसायटीमधील पहारेकऱ्याला बोलावून पाणी मागवले.  आम्हीं तिच्या तोंडावर पाणी मारून पहिले, तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला.  तिला कुठेच फारशी मोठी जखम झाली नव्हती.  अगदी थोडेसे नाकाला आणि गुढ्घ्याला खरचटले होते.  परंतु ती बेशुद्ध असल्यामुळे काहीच घडले नाही.  तिला गदा गदा हलवून शुद्धीत आणण्याचा मी निष्फळ प्रयत्न करून पहिला आणि त्यात साधारण पाच मिनिटे गेली.  माझा जीव वर खाली होत होता.  कारण बायकोची काहीच हालचाल होत नव्हती.  ती निपचित पडून होती.  माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती हो.  त्याही स्थितीत मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले आणि मी त्या काकांना आणि पहारेकऱ्यास माझ्या बायकोजवळ थांबण्याची विनंती केली आणि ताबडतोब माझी दुचाकी उचलून रिक्षा आणायला पळालो.  पहाटेची वेळ त्यातून निर्मनुष्य रस्ता.  एकही रिक्षा दिसेना.  माझे तर प्राण कंठाशी आले होते.  तसाच अर्धा किलोमीटर लांब बालाजीनगर पर्यंत पोहचलो.  एका रिक्षा थांब्यावर काही रिक्षा होत्या पण कोणीही यायला तयार होईना.  शेवटी हातापाया पडून एका रिक्षावाल्याला तयार केले.  माझी दुचाकी तिथेच ठेवली आणि मी त्या रिक्षाने जिथे माझी बायको पडली होती तिथे आलो.  सर्वप्रथम मी त्या काकांचे आणि पहारेकार्यांचे मनोमन आभार मानले आणि त्यांच्या मदतीने बायकोला रिक्षात घातले व तडक बालाजीनगर येथे असलेल्या भोंडवे रुग्णालयात दाखल झालो.  अपघात झाल्यापासून साधारण पंधराव्या मिनिटाला मी बायकोला रुग्णालयात दाखल करू शकलो होतो.  माझे नशीब बलवत्तर होते की काय ! त्यावेळेस डॉक्टर अविनाश भोंडवे स्वत: रुग्णालयातच होते.  त्यांना मी घडलेला सगळा प्रकार काही सेकंदात सांगितला.  त्यांना सांगितले की, मी आम्हीं दुसऱ्या गर्भ तपासणीसाठी पुण्यात चाललो होतो तेंव्हा हा सगळा प्रकार घडला.  तसेही डॉक्टर आम्हांला चांगले ओळखत होते.  कारण बायकोच्या आई-वडिलांचे उपचार त्यांच्या रुग्णालयात झालेले होते.  त्यांना आम्हांला पाच वर्षाची एक मुलगी आहे हे सुद्धा माहिती होते त्यामुळे त्यांनी पुढचा मागचा फारसा विचार न करता बायकोवर त्यांच्यापरीने जेवढे शक्य होतील तेवढे तत्पर उपचार करायला सुरवात केली.  त्यांनी मला एकच सांगितले की मी हे जे काही उपचार करतो आहे त्यामुळे तुमची बायको वाचेल, परंतु तिच्या पोटातील गर्भाची मी कुठलीही शास्वती देऊ शकत नाही.  एखादवेळेस तुम्हांला हा गर्भ पुढे जाऊन काढूनही टाकावा लागेल कारण ह्या औषधांचे दुष्परिणाम ह्या गर्भावर होण्याची खूप जास्त शक्यता आहे.  मी डॉक्टरांनी विनंती केली की काही झाले तरी चालेल पण माझ्या बायकोचे प्राण वाचवा.  भोंडवे सरांनी ताबडतोब डॉक्टर अतुल देशपांडे सरांना बोलावून घेतले व उपचार सुरु केले.  त्यांच्या अथक प्रयत्नांना यश येऊन शेवटी माझ्या बायकोचे प्राण वाचले व तिचा जीव धोक्यातून बाहेर आला.  तरीही पुढचे जवळ जवळ तीन दिवस मला बायकोने ओळखले नाही.  डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिची स्मृती गेली होती.  माझी तर आता बोबडीच वळाली होती.  माझी तर आगीतून उठून फुफाट्यात पडल्या सारखी अवस्था झाली होती.  एकुलती एक लहान पोर घरी एकटी होती.  तिला शेजारी सांभाळत होते.  रुगणालयात बायको अशा अवस्थेमध्ये त्यात तिने मला ओळखले नाही म्हटल्यावर माझ्यावरच तर आकाशच कोसळले होते.  दुसरे काय होऊ शकते ह्याचा विचारच केलेला बरा.  शेवटी डॉक्टरांच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश आले व आम्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला.  साधारण असेच एक आठवडा गेला व नंतर ती हळू हळू बोलू लागली.  तिच्या डोक्याला कुठेही जखम नव्हती, परंतु कवटीच्या आत मेंदुभोवती असलेल्या पाण्याच्या आवरणास धक्का पोचल्यामुळे त्याचा गंभीर परिणाम झाला होता.  तिला भेटायला येणाऱ्याला वाटायचे की हिला तर काहीच झालेले नाही, उगाचच एवढी गडबड चालू आहे.  असो.  तिला धड उठून बसताही येत नव्हते की झोपताही येत नव्हते.  फारशी हालचाल केले तरी उलटी झाल्यासारखे व्हायचे, सारखे गरगरायचे.  ह्यावर उपाय म्हणजे जवळ जवळ पाच ते सहा महिने असेच झोपून राहणे आले व आराम करणे आणि वेळेवर औषधे घेणे होते.  ज्यामुळे मेंदुभोवती असलेले पाण्याचे आवरण पुन्हा जाग्यावर येऊन मेंदू नीट काम करायला लागतो.  ह्या सगळ्या दिव्यातून आम्हांला पार पडायचे होते.  पाच वर्षाचे माझे कोकरू, त्याची अवस्था तर विचारू नका.  माझ्या ह्या कोकराने  सुद्धा मला मोठी होऊन मानिसक आधार दिला होता.  तिच्या बोबड्या शब्दांमध्ये जबाबदारीची जाणीव दिसत होती.  तेंव्हा मला समजले की, वेळ आली अथवा पडली की माणसाच्या अंगात कुठून हो बळ येते हेच कळत नाही.  अगदी वयाचाही तिथे विसर पडतो हो.   शेजारी पाजारी आणि जवळच्या काही नातेवाईकांनी आम्हांला त्यांच्या परीने जेवढे शक्य होईल तेवढी मदत केली आणि ह्या अग्निदिव्यातून पार केले.  त्यांचे उपकार तर आम्हीं अजूनही फेडू शकलो नाही आणि शकणार नाही.  ह्या सगळ्यात माझी मुलगी तिच्या आईची नर्स झाली होती.  आईला वेळेवर औषधे देणे.  तिला काही हवे नको असेल तर शेजारच्या काकूंना बोलावून आणणे, इत्यादी सगळी कामे ही पोर एखाद्या पोक्त मुली सारखी करत होती.  अगदी तिचे केस विंचरून देणे इत्यादी कामे ती अगदी प्रेमाने आणि मायेने करत होती.  त्याला कारण ही तसेच होते हो, नियतीने घातलेला हा अजून एक घाव होता आमच्या कुटुंबावर.  नुकतेच सहा महिन्यांपूर्वी बायकोच्या आईचे निधन झालेले होते आणि त्या पाठोपाठ तीनच महिन्यात तिच्या वडिलांचे निधन झाले होते.  हे सगळे होऊन जेमतेम तीन चार महिनेच झाले होते.  एका मागून एक असे धक्के मी, माझी बायको आणि माझी मुलगी सहन करत होतो.  परंतु एकमेकांच्या प्रेमाने आणि मायेने एकजूट होऊन ह्या परिस्थितीस सामोरे जात होतो.  संसाराबद्दल विचार करायला आम्हांला थोडीशी उसंत मिळाली होती.  म्हणून मी आणि बायकोने दुसऱ्या अपत्याचा विचार केला होता.  दैवानेही आमचे म्हणणे ऐकलेही होते. परंतु नियतीच्या मनात आमचे हे सुख हिरावून घ्यायचे ठरलेले होते त्याला आम्हीं तरी काय करणार.  त्यामुळेच की काय नियतीने योजिल्या प्रमाणे आमच्यावर हा अजून एक ताजा घाव घातला होता.  एक मात्र नक्की होते की आम्हीं तिघेही ह्या सगळ्यातून शिकत होतो.  आयुष्य हे खूप कठीण आहे.  ते तुमची रोज परीक्षाच पहात असते.  धैर्याने ह्या सगळ्या प्रसंगांना तोंड द्यायचे असते.  कधीही कुठेही न डगमगता कठीण समयाला सामोरे जायचे असते.  पदोपदी ते आपल्याला खूप काही शिकवून जात असते. अडचणीतून मार्ग कसे काढायचे !  कोण आपले, कोण जवळचे, लांबचे.  कोणावर किती आणि कसा विश्वास ठेवायचा वगैरे वगैरे.  असे खूप अनुभव गाठीशी घेऊन ह्या वाईटातूनही खूप काही चांगले घडते हे शिकायला मिळते हे मात्र नक्की.   

ह्या सगळ्या अग्निदिव्यातून आम्हांला सुखरूप बाहेर काढणारे आमचे देवदूत डॉक्टर अविनाश भोंडवे सर ह्या प्रकाशनाच्या निमित्ताने भेटल्यावर माझे आणि बायकोचे आकाशच ठेंगणे झाले.  आम्हीं त्या गर्दीत डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना आमची ओळख करून दिली.  काही क्षण गेल्यावर त्यांनाही त्या प्रसंगाची आठवण झाली आणि त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.  मग बराच वेळ ते माझा हात हातात घेऊन अगदी भावूक होऊन पत्रकार भवन मधील खुर्चीत बसून होते.  आम्हीं त्यांचे उपकार विसरलो नाही हे ऐकून तर त्यांना खूपच आनंद झाला होता.

काव्यसंग्रहाचे प्रकाशन एकीकडे आणि भावनांचा हा न सावरणारा गोंधळ दुसरीकडे.  ह्या भावनांचे तरंग स्मृतीपटलावर उमटून त्याचे प्रतिबिंबच सारीपटलावर उमटत होते.  रसिक प्रेक्षकांना आणि आसपास जमलेल्यांना मी माझ्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनाने इतका भावूक झालो आहे असेच वाटत होते.  पण खरे तर आमचा देवदूत आज आम्हांला भेटल्याचे भाग्य आमच्या देहबोलीतून प्रतिध्वनित होत होते.  ह्या प्रसंगाला आता जवळ जवळ २३ वर्षे होऊन गेलीत आणि आमच्या सुखी, समाधानी आणि सदृढ संसाराला ३० वर्षे बघता बघता झालीत.  नियतीच्या ह्या रेट्यापुढे आमचा संसार चौकोनी होण्याच्या ऐवजी त्रीकोणीच राहिला एवढेच काय ते शल्य.  तरीही काही प्रसंग, चांगल्या-वाईट आठवणी आपल्या काळजावर कोरलेल्या जातात.  त्या जेव्हा केंव्हा आठवतात ना तेंव्हा मला काय वाटते......

कधी स्वतःवर, कधी परिस्थितीवर, मज रडू आले |
इतकी आसवे, आज ओघळीत की, आसवांनाही रडू आले ||
 
रविंद्र कामठे

2 comments:

  1. मन हेलावून सोडणारी घटना डोळे भरुन आले आता आनंदी समृद्ध जीवन लाभो हिच शुभेच्छा

    ReplyDelete