Monday 14 August 2017

भावना उच्च शिक्षणाच्या प्रवासाची

भावना उच्च शिक्षणाच्या प्रवासाची

उच्च शिक्षणासाठी आपली एकुलती एक लेक जेंव्हा अमेरिकेला जाणार असते ना, तेंव्हा तिच्या आई बाबांच्या मनोवस्थेचे जर का वर्णन करायचे असेल तर, “ आपले कोकरू आपणहून वाघाच्या गुहते सोडले  आहे की कायअसेच काहीसे त्यांना वाटत असावे.  असे मला तरी आज माझ्या लाडक्या भाचीच्या ट्रंका भरतांना जाणवले.  मनाची द्विधा अवस्था काय असते ते अगदी जवळून पाहतांना माझ्याही मनाची स्थिती थोडीशी हळवी तर झालीच होती पण अशा वेळेस सगळ्यांनीच हळवे आणि भावून होऊन चालत नाही हो असे वाटले.  २२-२३ वर्षे डोळ्यात तेल घालून जपलेले आणि वाढवलेले आपलं हे बछड साता समुद्रापलीकडे दूर ज्या देशात जाणार आहे तिथे तिला काही दिवस का होईना घराच्या सारखे अन्न मिळावे म्हणून जीवाचा आटापिटा करून गेले एक महिनाभर धडपड करून तिच्या आवडीचे तयार केलेले आणि काही विकत आणलेले पदार्थ जेंव्हा आपण ह्या ट्रंका मध्ये भरतो आणि वजन करायला गेल्यावर कळते की, एक ट्रंक २३ किलो ऐवजी ती ३० किलो आणि दसरी २७ किलोची झाली आहे.  मग जो काही गोंधळ, चर्चा, वाद विवाद सुरु होतात ना तो विचारूच नका.  २३ किलोच्या दोन ट्रंका न्यायची परवानगी आहे.  त्यात वस्तीविक पाहता थोडे कपडे, तिकडे भारतीय पद्धतीने स्वयंपाक करून खाण्यासाठी लागणारी काही निवडक भांडी, मसाले, पीठं, कडधान्य , जरुरी कागदपत्रे आणि खाद्यपदार्थ  इत्यादी नेणे जरुरी असतांना, भावनेच्या पोटी आपण ह्या ट्रंकामध्ये जरुरी सामना ऐवजी अनावश्यक खाद्यपदार्थांचीच भरती केलेली असते आणि त्यामुळे वजन वाढले आहे व त्यातून काही सामान काढावे लागणार आहे हे कळल्यावर तर मुलीच्या आईचा जीव जो काही कावरा बावरा होता व डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागतात तेंव्हा मात्र आपलेही आतडे तुटते हो.  शेवटी आई ती आईच.  तिला कसे समजवायचे हो की ती काही जंगलात किंवा दुष्काळी भागात नाही चालली आहे.  न राहवून मी शेवटी भ्रमणध्वनीचा वापर करून माझ्या एअर इंडिया मध्ये काम करण्याऱ्या एका जवळच्या मित्राला फोन करून परदेशी शिक्षणासाठीच्या प्रवासाला योग्य आणि जरुरी असणारे सामान व त्याबद्दलची इतम्भूत माहिती घेतो आणि माझाही जीव थोडासा शांत होतो.

प्रवास तर आपण सगळे नेहमीच करत असतो.  वरचेवर ट्रंकाही भारत असतो.  परंतु दोन तीन वर्षांसाठी आपले एकुलते एक लेकरू आपल्यापासून सातासमुद्रापलीकडे शिक्षणासाठी जाणार आहे म्हटल्यावर आईबापाचा प्राण कंठाशी येणे काय असते ते मला जाणवत होते. वजनाचा काटा हातात धरलेला असतो.  त्यावर मनाची अवस्था इतकी दोलायमान झालेली असते की २५ किलो वजनाची ट्रंक अंगातल्या थरथरी मुळे कधी २८ तर कधी ३० किलो वजन दाखवते.  त्यामुळे बापाच्या मनाची झालेली केविलवाणी अवस्था, विमान कंपनीला मनापासून घातलेल्या शिव्यांची लोखोली तर काय विचारूच नका.  अनुभवातून कोणी काही सुचवले तरी त्यावर लगेचच विश्वास ठेवण्याची मनस्थितीच नसते हो, अशा वेळी हे मात्र खरे.

दोन दोन तीन तीन महिने तयारी करूनही, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काहीतरी राहिले की काय असेच वाटत राहते.  भेटायला येणारे नातेवाईक, मित्र मंडळी आणि आधीच पलीकडे गेलेले मित्र, असे सगळे मिळून आपल्या भावनांचा जो काही गोंधळ करतात ना तो म्हणजे एक खमंग चिवडाच म्हणावा लागेल.  म्हटले तर तो चवदार असतो आणि त्यात तो आसवांच्या भरीने थोडासा खारटही होतो.  सूचनांची यादीची शेपूट लंकेतल्या हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतच जाते.  एकार्थाने हे चांगले पण असते आणि हवेहावेसेही वाटते.  पण कधी कधी ते मात्र गोंधळात अजूनच भर पाडते.  दोष कोणाचाच नसतो.  हा खेळ फक्त आणि फक्त भावनांचा असतो.  ऋणानुबंधांचा असतो.  अगदी ओक अकादमीच्या पुस्तकात जरी हे सगळे लिहिलेले असले तरी, भावनेपुढे ह्या पुस्तकाचे काही चालतच नाही.  अर्थात शेवटी त्याच प्रमाणे जावे लागते हे ही तितकेच खरे आहे.  व्यवस्थापनाचे आपण घेतलेले सगळे धडे ह्या प्रवासाच्या आधीच्या रात्री मात्र अजिबात उपयोगी पडत नाही ह्याचे प्रत्यंतर आल्याशिवाय रहात नाही.  कारण जसजशी संध्याकाळ होऊन रात्र जवळ येवू लागते तेंव्हा भूकही लागत नाही.  पोट रिकामे असले तरी ते भरल्यासारखेच वाटते.  नको म्हणायला एखाद दुसरा चहाचा डोस मात्र ह्या ट्रंका भरण्यासाठीचा जोर अंगात निर्माण करतो.  त्यामधील सामान एका ट्रंके मधून दुसऱ्या ट्रंकेट टाकणे आणि परत परत वजन करणे आणि ते २५ किलोच्या आत आणणे म्हणजे एक दिव्यच वाटायला लागते.  त्यात ट्रंकेचा आकार सुद्धा एवढा मोठा वाट्याला लागतो आणि त्यात भरलेले सामान म्हणजे वाटीत चमचा असेच भासायला लागते.  विमान कंपन्यांनी हे कसले वजनाचे नियम केलेत असे म्हणत म्हणत आपण दोन्ही ट्रंका २५ किलोच्या आत आणतो.  त्याचे कारणही तसेच असते हो, विमानतळावर जर का काही सामान वजन जास्त झाल्यामुळे काढायला लागले तर पोरीचा वेळही जाईल आणि आपल्या जीवाला उगाचच घोर लागून रहायचा.  ह्या आणि अशा अजून किती तरी विचारांचा शेवटी आपल्या ह्या सद्गतीत भावनानंवर विजय होतो.

मी हा सगळा अनुभव ह्याची देही ह्याची डोळा घेत होतो.  मी ही अगदी अंत:करणापासून माझा भाचीच्या परदेश वारीच्या उपक्रमात सहभागी झालो होतो.   माझ्या डोळ्यांच्या कडा अधून मधून पाणावत होत्या.  त्या मी सगळ्यांच्या नकळत हलकेच पुसून परत त्यांना हातभार लावत होतो.  मला तर दीड वर्षापूर्वी माझ्या एकुलत्याएक मुलीला लग्नानंतर सासरी पाठवण्याच्या त्या क्षणाची आठवण झाली आणि डोळे भरून आलेअगदी तेच भाव मला माझ्या बहिणीच्या आणि मेव्हण्याच्या मनात डोकावल्यावर जाणवत होते.  फक्त फरक एवढाच होता ही त्यांची पोर आज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघाली होती आणि कमीत कमी दोन वर्षे तरी भेटणार नव्हती. 

सरते शेवटी आम्हीं २५ किल्याच्या दोन ट्रंका, १४-१५ किलोची एक छोटी ब्याग आणि तिची संगणकाची एक छोटी स्याक असे चार नाग तयार करून दिवाण खोलीतील एका कोपऱ्यात ठवतो ना तेंव्हा मात्र इतकी दमणूक झालेली असली तरी एका डोळ्यात आन्दाश्रू आणि दुसऱ्यात विरहाश्रू तरळून जातात.  कोणीही कोणाच्या नजरेला नजर भिडवण्याच्या फंदात पडत नाही.  उगाचच इकडचे तिकडचे विषय काढून अर्थहीन संभाषण चालू होते. लेकीच्या आयुष्याची घडी बसवायचे पाहिलेले हे स्वप्न प्रत्यक्षात आलेले पाहून एक समाधानाचे हास्य आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटते आणि आम्हीं सगळे एक ठराव करतो की उद्या घरातून निघतांना आणि विमानतळावर निरोप देतांना कोणीही डोळ्यात पाणी येऊ देणार नाही.

दुसऱ्या दिवशी आम्हीं सगळी जय्यत तयारी करून मुंबईला विमानतळावर जाण्यासाठी प्रयाण करतो.  वाटेत माझ्या बहिणीला तिच्या मामे बहिणीचा दूरध्वनी येतो आणि ती सांगते की ती आणि तिचा नवरा दोघेही विमानतळावर येत आहेत साधारण रात्रीच्या दहा पर्यंत ते पोहोचतील.  तरीही कृपया मुलीला विमानतळाच्या मुख्य प्रवेशदारातून आत पाठवण्याची घाई करू नकोस, कारण तिचा नवरा British Airways मध्ये असून तो तिला तिच्या सामानासहित अगदी सही सलामत विमानात बसवून देण्याची व्यवस्था करतो आहे.  मध्यरात्री १.४५ मिनिटांनी तिचे विमान उडणार आहे त्यामुळे आम्हीं ह्या एका दूरध्वनीमुळे निश्चिंत झालो होतो.  एकदाचे सगळे काही व्यवस्थित झाले आणि आमचा जीव भांड्यात पडला आणि पोरगी विमानात बसून पुढील प्रवासास निघून गेली.  मनोमन मी माझ्या बहिणीच्या मामे बहिणीला आणि तिच्या नवऱ्याचे जेवढे शक्य होतील तेवढे आभार मानले.  नकळत आपल्या पाठीमागे उभ्या असलेल्या त्या अदृश्य शक्तीला माझे मन एक साष्टांग नमस्कार करून गेले.  इतक्या धावपळीच्या आयुष्यातही आपल्या माणसासाठी वेळात वेळ काढून त्यांनी केलेली ही मदत खूपच मोलाची होती तसेच इतक्या वर्षांचे ते ऋणानुबंध घट्ट करणारी होती. 
 
मला अजून एका गोष्टीची खात्री झाली की आपली माणसं जेंव्हा जेंव्हा आपल्या पासून कुठल्याही कारणाने दूर जातात ना तेंव्हा तेंव्हा डोळे भरून हे येतातच.  मनाला आपले हे ठराव वगैरे काही कळत नसते आणि ते कोणाचे ऐकतही नसते हेच खरे.

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०  


No comments:

Post a Comment