Thursday 3 August 2017

महाराष्ट्राचे दार्जीलिंग “महाबळेश्वर”




 
 
महाराष्ट्राचे दार्जीलिंग “महाबळेश्वर”

आपल्या महाराष्ट्राचे दार्जीलिंग म्हणजे “महाबळेश्वर असे म्हंटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. त्यात तुम्हीं जर का ऐन पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलात ना, तर ह्याची अनुभूती तुम्हांला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही.  स्वर्ग काय असतो, हे जर का अनुभवायचे असेल ना तर ह्या अशा रिमझिम पावसात महाबळेश्वरला एकदातरी जायलाच हवे हो !  मी आजवर वेगवेगळ्या ऋतुंमध्ये महाबळेश्वरला गेलेलो आहे,  पण महाबळेश्वरचे स्वर्गीय सुख व निसर्गाचा अदभूत आणि नयनरम्य अविष्कार जर का अनुभवायचा असेल ना तर, जुलै महिन्याच्या पावसाळ्यात एकदा तरी महाबळेश्वरला भेट द्यायलाच हवी.  इतर वेळेस माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहणारं हे गावं, ह्या सर्द हवेत एखाद्या दुलईत गुरफटून शांत पहुडलेले आहे असे वाटते.  अगदी तुरळक माणसांची गर्दी असते पाहायला मिळते.  त्यात माझ्यासारखे काही निसर्गप्रेमी फिरायला आलेले असतात.  श्रावणातला उनपावसाचा अद्द्वितीय असा खेळ चालू असतो.  वेण्णा लेक कसा ओथंबून वाहत असतो.  त्यावर ढगांची एक मखमली चादर ओढलेली असते,  जशी काही सखा / सखी एकमेकांच्या प्रेमात अगदी नखशीकांत बुडून गेले आहेत असे भासते.  त्यात जर का तुम्हीं ह्या रिमझिम पावसांच्या सरीत, जेथून आपण नेहमी नयनरम्य सूर्यास्त पाहतो, त्या ठिकाणी जर गेलात व तेथे तुम्हीं सोडून दुसरे कोणीही नाही आहे आणि ह्या अशा कुंद आणि धुंद वातावरणात जर का तुम्हांला थर्मास मधून आणलेला गरम गरम चहा पिण्याचा योग लाभला ना तर, तुमच्यासारखा नशीबवान माणूस ह्या पृथ्वीतलावर शोधून सापडणार नाही ह्याची मी तुम्हांला खात्री देतो.  कारण हा अनुभव मी नुकताच घेऊन आलो आहे म्हणून सांगतो.  वेड, वेडं लागतं हो.  आपण आपल्यालाच हरवून बसतो.  काही म्हणजे काहीच, अगदी कविता काय लेख काय, काही काही सुचत नाही.  फक्त डोळे मिटून शांतपणे अनुभवायचा असतो तो, तिथल्या पायरीवर बसून प्रतापगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून येणारा तो हवेतला अल्हाददायक गारवा.  शेवाळलेली झाडे, भिजून भिजून चिंब झालेली ती लाल माती, आणि एक अदभूत अशी निरव शांतंता.  हे सगळे इतके हवेहवेसे वाटते की आपण वातावरणातल्या ह्या सुमधुर नैसर्गिक संगीताचा आस्वाद घेत एक एक क्षण खोल खोल काळजात साठवून ठेवत जोतो.   येथून आपले पाय निघतच नाहीत आणि मला माझ्या “ओंजळ” ह्या काव्यसंग्रहामधील बरसती सरीवर सरी, ही कविता आठवते...


बरसती सरी वर सरी...
छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

उसळले चैतन्य भुवनी
थुई थुई नाचे मोर-मयुरी |
कुहू कुहू कोकिळा गाती
पाखरे गगनी विहारी |
सावळ्या नभी वाजती  
हरीची मंजुळ बासुरी ||

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

उघडूनी कवाडे मनाची
मेघ वर्षाव करी |
उधळूनी सप्तरंग धनुचे
भास्करही रास करी |
टप टप बरसुनी धारांनी
फुलविले नंदनवन भूवरी |

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

शमली तप्त ही धरिणी
अंकुरली बीजे ही उरी |
नटली जशी हिरवाईने
लेउनिया शालू भरजरी |
झुळू झुळू वाहती
झरे डोंगर दरी |

छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||

मोहरली कळी अन कळी
बाग फुलांनी बहरी |
रुणुझुणु रुणुझुणु गाती
भ्रमर ही फुलांपरी |
सळ सळे आज
आनंदी आनंद चराचरी |
छुम छुम छन न न न नाद करी | बरसती सरी वर सरी ||
 
ह्या आठवणी साठवत मी Mapro कडे मोर्चा वळवतो.  तेथे ग्रील संद्वीचवर येथेच्छ ताव मारतो आणि स्त्राबेरी आईस्क्रीम खाऊन मन तृप्त करून वर्षभराची उर्जा साठवून घेतो.

जाता जाता माझा मोर्चा आता पुस्तकाचं गावं कडे माझ्याही नकळत वळतो आणि मी मग पाचगणी जवळील भिलारवाडी ह्या “पुस्तकाचं गावं” ला भेट देतो.  “चपराक” प्रकाशनने नुकताच प्रकाशित केलेला माझ्या “प्रांजळ” ह्या काव्यसंग्रहाच्या पाच प्रती श्री. बालाजी हळदे ह्याच्याकडे सुपूर्द करतांना मला कोण आनंद होतो म्हणून सांगू.  माझा आनंद गगनात मावत नाही. शेवटी वाईच्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतो आणि त्याला विनंती करतो की मला ह्या रोजच्या धकधकीच्या जीवनात झुंजण्याचे बळ दे रे ‘महाराजा’.

 
माझा आवडत्या किशोर कुमारचे,
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
भिगे आज इस मौसम मै
लगी कैसी ये अगन....हे गाणे गुणगुणतच मी तल्लीन होऊन गाडी चालवत रहातो आणि त्याच तंद्रीत कधी घरी पोचतो तेच कळत नाही.     

 

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०  

No comments:

Post a Comment