Thursday 23 March 2017

चतुरस्त, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष - प्रकाशक - ही एक वस्तुस्थिती आहे आणि मी ती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर वाचकांच्या माहितीसाठी देणे मला जास्त संयुक्तिक वाटले म्हणून हा लेख प्रपंच. वाचा. http://ravindrakamthe.blogspot.in


चतुरस्त, परखड, रास्त, कर्तव्यदक्ष - प्रकाशक
सध्याच्या काळात एक ओरड जिकडे तिकडे चालू आहे की, चांगले आणि प्रामाणिक प्रकाशक आजकाल मिळतच नाहीत.  त्यामुळे नवोदितांचे उत्कृष्ट साहित्य प्रकाशित होतच नाही आणि झालेच तर भरमसाठ पैसे देवूनच ते प्रकाशित करावे लागते आहे. त्यामुळे एक प्रकरचा निरुत्साह ह्या नवोदितांमध्ये प्रसरत चालला आहे आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार त्यामुळे खंडितच होतो आहे. अशी आणि अजून काही रडगाणी सध्या अगदी लहान थोर, नवोदित-प्रस्तावित साहित्यिक करत सगळीकडे भाषणबाजी करतांना राजरोसपणे दिसत आहेत. सगळ्यांना माझे एकच सांगणे आहे की चांगला आणि प्रामाणिक प्रकाशक शोधणे व त्याचाशी आपले व्यवसायिक आणि साहित्यिक संबंध प्रथापित करणे ही त्या त्या साहित्यिकाचीच जबाबदारी आहे.  नुसती आवई उठवून चार संभांमध्ये भाषणे ठोकून अथवा कट्ट्यांवर गप्पा मारून हे होणे कसे शक्य आहे !  त्यासाठी तुम्हांला थोडेसे कष्ट, माणसांची पारख आणि साहित्याविश्वमधील घडामोडींचा परामर्श घेऊन, नियमितपणे वाचन करूनच अनुभवायला हवे.  तुमचाही प्रामाणिकपणा, सचोटी, जिद्द, महत्वाकांशा, सातत्य आणि साहित्यविश्वाशी अतूट नाते असल्याशिवाय हे कसे साध्य होऊ शकते !  असेल हरी तर देईल खाटल्यावरीअसे म्हणणाऱ्यानी हा विचार सोडून दिलेलाच बरा, असा माझा त्यांना मैत्रत्वाचा सल्ला आहे.

२०१३ ते २०१५ ह्या काळात माझे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. परंतु मला म्हणावेसे असे समाधान मिळालेच नव्हते.  त्यांचे एकमेव कारण की त्या प्रकाशन संस्थेच्या असलेल्या अंतर्गत अडचणी, ज्या की त्या प्रकाशकालाच माहिती असाव्यात.  माझा पहिला काव्यसंग्रह माझ्याच हौसे खातीर स्वखर्चाने प्रकाशित करून घेतला होता.  नंतर २०१४ आणि २०१५ साली माझा दुसरा आणि तिसरा काव्यसंग्रह प्रकाशित केले होते, ते ही परत एकदा त्याच पद्धतीने व माझ्याच अतिशहाणपणामुळेच म्हणावे लागेल.  मला ह्यात फारसे काही वावगे काही वाटलेच नव्हते.  कारण तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यामुळे मी अगदी खूष होतो व २०० प्रती घेऊन त्या आप्तेष्टांमध्ये वाटण्यातच मी गुंग होतो.  मुळातच माझ्याशी एक हजार प्रतींचा करार करून मला माझ्या २०० प्रती दिल्यावर, उरलेल्या प्रती विक्रीसाठी ठेवल्या आहेत असे सांगणे व त्या मला कधीच कुठल्याच पुस्तक विक्रेत्याकडे न आढळल्यामुळे माझी फसवणूक झाली आहे असे वाटणे स्वाभाविकच होते.  माझे ह्या क्षेत्रामधील अज्ञान पाहून त्यांनी जेमतेम ३००-४०० प्रतीच छापल्या असाव्यात ह्या शंकेला कुठेतरी जागा आहे, पण हे समजायला मला फार उशीर झाला होता कारण नंतर हे प्रकाशक महाशय ह्या व्यवसायातून गायबच झालेले होते.  ह्या सगळ्यात मी वर नमूद केल्याप्रमाणे माझे स्वत:चे चुकेलच होते कारण मी तरी कुठे प्रकाशनाबाबत गंभीर होतो. म्हणूनच की काय मी ह्या प्रकाशकाला अजिबात दोष देत नाही.  असतील त्यांच्या काही वयक्तिक अडचणी. पण त्यामुळे माझा साहित्य प्रवास काही काळ खंडित झाला हे मात्र नक्की. असो.

तरीही, मी ह्या प्रकाशकाचे मनोमन आभार मानतो कारण त्यांच्यामुळे मला साहित्यक्षेत्रामधील विवध गोष्टींची ओळख झाली, अनुभव मिळाले, दिग्गजांच्या गोठी भेटी झाल्या, त्यांच्याबरोबर चर्चा करता आली आणि योगायोगाने शेतकरी साहित्य चळवळीच्या कार्याध्यक्ष्यांची ओळख होऊन एक चांगला साहित्यिक मार्गदर्शक मित्र लाभला. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते असे वाटले. हे माझेच उदाहरण मी दिले आहे, कारण ह्या जगात जसे वाईट असते तसेच चांगलेही असते, फक्त ते आपल्याला कष्टाने शोधावे लागते.  हे येथे सांगण्याचे एकमेव कारण की जर तुम्हांला खरोखर जर साहित्यविश्वात प्रामाणिकपणे काही करायचे असेल तर त्यासाठी एकतर तुमचे लिखाण उतम दर्जाचे आणि प्रगल्भ असायला हवे, ते योग्य त्या प्रकाशन संस्थेच्या हातात द्यायला हवे, जाणकार परीक्षक, समीक्षकांकडून ते तावून सलाखून, पारखून घ्यायला हवे आणि मगच ते सृजन वाचकांच्या सुपूर्त करावयाला हवे.  हे सगळे जर का तुम्हांला एकाच प्रकाशन संस्थेकडे मिळाले तर तो तुमच्या साहित्यविश्वातल्या प्रवेशासाठी आणि पुढील कामगिरीसाठीचा एक राजमार्गच समजावा.  हे माझे मत आहे आणि ते तुमच्यावर बांधील नाही.  ज्याने त्याने आपापल्यापरीने हा मार्ग योजावा.

२०१३ पासून मी माझ्या कवितेच्या माध्यमातून साहित्यसेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे.  सतत लिहिते राहण्याचा माझा प्रयत्न आहे.  त्यामुळेच माझा चौथा काव्यसंग्रह प्रांजळहा २०१६ पासून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत होता आणि मागील अनुभवावरून मी ठरविले होते की फक्त पुस्तकच छापायचे असेल तर प्रकाशकाची काही गरज नाही.  ते आपणही करू शकतो. असेही आजकाल नवोदित कवींच्या काव्यसंग्रहाला फारशी मागणी नसते वगैरे वगैरे.  असे म्हणत असतांना माझी सामाजिक आंतरजालच्या माध्यामतून श्री. घनश्याम पाटील सरांशी ओळख झाली आणि त्यांच्या प्रतिभेमुळे चपराक प्रकाशनशी मी जोडला गेलो व माझा प्रांजळहा काव्यसंग्रह चपराक प्रकाशनने १९ जानेवारी २०१७ ला चपराक साहित्य महोत्सवात प्रकाशित करून माझ्यातल्या लेखकाला, कवींला पुन:ऊर्जित केले.

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.  ह्याचे यथा योग्य अवलंब करणारा एक तरुण तडफदार, विश्वासक, आश्वासक, मार्गदर्शक, सहाय्यक, असा एक अवलिया लेखक, सच्चा पत्रकार, उत्तम वक्ता, संवेदनशील संपादक आणि प्रामाणिक प्रकाशक व तितकाच माणुसकीने ओतप्रत भरलेलं, असे एक चालते बोलते व्यक्तिमत्व म्हणजेच चपराक प्रकाशनचे संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील हे नाव प्रामुख्याने माझ्या डोळ्यापुढे येते.  जेमतेम ३२ वर्षे वय असलेले हे व्यक्तिमत्व साहित्याक्षेत्रामध्ये गेले १५ वर्षे अतिशय प्रामाणिकपणे आपले योगदान देत आहे ह्याचे मला फारच कौतक वाटते.  लातूर सारख्या खेडेगावातून किल्लारी भूकंपानंतर हा तरुण, वयाच्या १२व्या वर्षी पुण्यात शिक्षणासाठी येतो काय अनं स्वत:चे चपराकहे साप्ताहिक, मासिक आणि प्रकाशन संस्था स्थापन करून, सामान्य माणसाचा उंचावलेला स्वरहे ब्रीद घेऊन चतुरस्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भूमिकेतून चपराकची वाटचाल स्वत:च्या आणि समुहाच्या साथीने व अविरत कष्टाने नावारूपाला आणतो काय ! हे सगळे अचंबितच करायला लावणारे आहे.  घनश्याम पाटीलांचा हा सगळा प्रवास पहिला की माझ्या सारख्या वयाच्या पन्नाशीनंतर का होईना साहित्याची सेवा करण्याच्या उर्मीला एक प्रोत्साहन देऊन जाते व लिहिण्याचा दृढनिश्चय करावयास भाग पाडते. अतिशय रोखठोक आणि परखड विश्‍लेषण केल्याने, सातत्याने ठाम भूमिका घेऊन, सत्याचा कैवार घेतल्याने चपराक हे नाव गेले काही वर्षे प्रामुख्याने कायमच चर्चेत राहिले आहे. तसेच ते वाचकप्रियही ठरले आहे व त्यांच्या विरोधकांसाठी, प्रतिस्पर्धी प्रकाशन संस्थांसाठी डोकेदुखीही ठरली आहे हे येथे नमूद करणे फारच गरजेचे वाटते.

मला चपराक प्रकाशनची कार्यपद्धती तर अतिशय भावली आहे.  येथे तुमच्या साहित्याची विशेष कदर असणारी व आस्था असणारी जाणकारांची एक फळीच घनश्याम पाटीलांच्या नेतृत्वाखाली अविरत कार्यरत असते. नुसतेच प्रकाशन नाही तर तुमच्यातल्या साहित्यिकाला पारखून ते तुम्हांला लिहिते करतात, वाचते करतात आणि जरूर तेथे योग्य ते मार्गदर्शनही करतात तसेच चपराक साप्ताहिक आणि मासिकात तुमच्या लेखनाला जागा देवून तुमचा यथायोग्य सन्मानही करतात. जर का तुमचे साहित्य प्रकाशनायोग्य नसेल तर तुम्हांला नाही सुध्दा ऐकण्याची पाळी तुमच्यावर येऊ शकते, अगदी तुम्हीं स्वत: प्रकाशनाचा सर्व खर्च जरी करण्यास तयार असलात तरी सुद्धा ! त्यामुळेच माझ्यासारखे नवोदित म्हणा, प्रस्थापित किंवा काही कारणांमुळे विस्थापित झालेले साहित्यिकही आज चपराक प्रकाशनकडे आवर्जून धाव घेतांना दिसतात. चपराकचे काम २४ तास, ३६५ दिवस विनाखंड घनश्याम पाटीलांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमाने चालू असते.  साहित्यसेवेच्या ह्या व्रताला वाहून घेतलेल्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या संस्था आणि माणसे राहिल्या आहेत त्यात चपराक प्रकाशनचे नाव अग्रस्थानी असले तर त्यात शंका घेण्याचे कारणच नाही. हेच तर चपराकच्या विरोधकांचे आणि प्रतिस्पर्ध्यांचे दुखणे आहे हे मात्र नक्की.

चार ते पाच वर्षांच्या प्रयत्नांनी व योगायोगाने मला असा प्रकाशक, मार्गदर्शक, तितकाच प्रगल्भ सहकारी, मित्र व चपराक समुहा सारखा जाणकार परिवार मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझ्या सारख्या एका नवोदिताला आशेचा एक किरण दिसून मी परत एकदा लिखाणाकडे चपराकमुळे आकर्षित झालो हे मात्र मला येथे आवर्जून सांगावयास हवे.  मी हे काही चपराकच्या किंवा घनश्याम पाटीलांचे कौतुक करण्याच्या दृष्टीकोनातून लिहित नाही तर ही एक वस्तुस्थिती आहे आणि मी ती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर वाचकांच्या माहितीसाठी देणे मला जास्त संयुक्तिक वाटले म्हणून हा लेख प्रपंच.

रविंद्र कामठे,
९८२२४०४३३०  

1 comment:

  1. मनःपूर्वक धन्यवाद सर!

    ReplyDelete