Monday 20 March 2017

"स्वप्न मातृ-पितृत्वाचे". जवळ जवळ चार वर्षांनी आज त्या दोघांचे आई बाबा होण्याच्या स्वप्नास ह्या एका छोट्याश्या बातमीमुळे का होईना प्रत्यक्षात येण्यास चालना मिळाली होती आणि त्यांना जाणवले की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली आई-बाबा होण्याची इतकी सुखद संवेदनाच हरवून बसलो होतो ! चपराक साप्तहीकामधील हा लेख


स्वप्न मातृ-पितृत्वाचे
सकाळची सर्व कामे आटोपली होती.  राजू नुकतात डबा घेऊन त्याच्या कार्यालयाच्या गाडीतून गेला होता.  भाग्यश्रीने स्वत:चा डबा भरून घेता घेता तिच्या कार्यालयाची बस अजून यायला पाच मिनिटे वेळ आहे म्हणून सहज नुकत्याच आलेले वृत्तपत्र चाळायला घेतले आणि पहिल्याच पानावरील बातमीचा मथळा वाचला “गरोदर महिलांच्या मातृत्व रजेत १२ आठवड्यांची वाढ-मातृत्व रजा होणार २६ आठवड्यांची”.  ही बातमी वाचून तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिच्या मनात आता तरी मी नक्कीच आई होऊ शकते ह्या जाणीवेनेच हे आनंदाश्रू आल्याचे तिला उमगले आणि थोडीशी हळवी होऊन लाजल्यासारखेच झाले.  कधी एकदा ही बातमी राजूच्या कानावर घालते असे झाले होते तिला.  पण तो आता गाडीत असेल आणि एकटाही नसेल म्हणून फोन लावता लावता परत पर्स मध्ये ठेवला आणि ठरवले की आज संध्याकाळी घरी आल्याबरोबर राजूला ही बातमी द्यायची.  खरं तर तिला आज कामावर जावूच नये असे वाटत होते व राजूला ही फोन करून लवकर घरी ये असे सांगावे असे वाटत होते तेवढ्यात गाडीच्या आवाजाने तिची तंद्री तुटली आणि घराला कुलूप लावून ती पटकन गाडीत बसली ते ही गालातल्या गालात हसतच.  तन्वीने तिला विचारलेही काय गं भाग्यश्री आज स्वारी एकदम खुषीत दिसतेय.. एवढे काय झाले लाजायला. तन्वीच्या ह्या वाक्याने मात्र भाग्यश्री एकदम भानावर आली आणि तिला म्हणाली की थांब ना बाई सांगते तुला सगळे कामावर गेल्यावर, इथे गाडीत नको.

भाग्यश्रीने गाडीत बसल्यावर डोळे मिटून घेतले आणि तिच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग हळू हळू तरंगू लागले... गेले तीन चार वर्षे भाग्यश्री आणि राजू लग्न झाल्यापासून आपल्याला मुल हवे का नको ह्या विषयावरून एकमेकांशी नेहमीच संवाद साधत होते, चर्चा करत होते. त्यांना एकच समस्या कायम भेडसावत होती की आपल्याला ही जबाबदारी पेलवेल का ? आपल्या बाळाचे आपण नीट संगोपन करू शकू का ? त्याला सांभाळण्यासाठी दोघांपैकी कोणाला एकाला तरी नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल आणि तो कोणी द्यायचा ?  लग्न झाल्यापासून नोकरीच्या निमित्ताने आपल्याला आई वडिलांपासून वेगळे राहायला लागले होते.  असेही आजकाल एकाच्या पगारावर घर संसार चालवणे तसेही मुश्कीलच वाटू लागले होते.  मनात असूनही त्या दोघांसाठी वेळ देणेही आजकाल मुश्कील झाले होते.  त्यात बाळाची जबाबदारी वाढवली तर आपले कसे निभावेल.  राजूच्या आई बाबांना खूप वाटायचे की आमचे हातपाय चालताहेत तोपर्यंत एखादे नातवंड आमच्या अंगाखांद्यावर खेळूद्यात रे पोरांनो.  भाग्यश्रीची आईही अधून मधून राजूच्या आईबाबांच्या बोलात बोल मिसळायच्या. पण आम्हांलाच वाटायचे की सध्याच्या ह्या धकाधकीच्या आणि असुरक्षित जगात आपल्या बाळाला आणून त्याच्या आयुष्यात समस्यांची कशाला उगाच भर टाकायची.  त्यात ही रोज वाढणारी महागाई आणि त्याच्या शाळेच्या प्रवेशा पासून ते त्याला/तिला उच्च शिक्षण देवून एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठीची ओढाताण आपल्याला जमेल का ?  भाग्यश्री राजूला म्हणायची की मला चांगली ३ महिने मातृत्व रजा मिळते त्यात भर टाकून मी ती अजून तीन महिने वाढवून घेईन, अगदी बिनपगारी जरी झाली तरी काही हरकत नाही.  आणि हो जर का बाळासाठी नोकरी सोडायची वेळ आली ना तर मी ती नक्कीच सोडेन.  जेंव्हा बाळ चांगले पाच सात वर्षाचे झाले की मग पुन्हा एखादी छोटीशी नोकरी शोधून संसाराला हातभार लावेन.  राजूचीही तिच्या ह्या मताशी हळू हळू सहमती झाली होती आणि त्यापद्धतीने तो त्याच्या कामावर जास्त लक्ष देवून प्रगतीची एक एक पायरी चढू लागला होतो व संसाराचा भार जर एकट्यावर आलाच तर तो पेलण्याचे आर्थिक पाठबळ तयार करत होता.  त्यातच तिला कायमच कुतूहल वाटायचे की आपल्या कामवाल्या मावशी तीन मुले असूनही कसं काय आपला संसार करत असतील नाही... तेवढ्यात गाडी कार्यालयात पोचली आणि भाग्यश्रीची तंद्री पुन्हा एकदा तुटली..

इकडे राजुलाही कार्यालयात गेल्यावर त्याच्या मित्राकडून हीच बातमी मिळाली होती.  त्यामुळे त्याच्याही मनात भाग्यश्रीशी झालेल्या संवादाची एक चित्रफित हलकेच तरळून गेली आणि कधी एकदा ही बातमी भाग्यश्रीला देवून तिला खूष करण्याचे वेध लागले होते. ह्या खुशीतच दिवस कधी संपला हे ही त्याला कळले नाही.  घरचे वेध लागले होते.  स्वारी आज खुशीतच होती. गाडीतून उतरल्यावर भाग्यश्रीसाठी त्याने एक छान मोगऱ्याचा गजरा घेतला, तिला आवडणारी आंबा बर्फी घेतली आणि एक सुमधुर शिळ घालीत स्वारी घराच्या वाटेवर चालू लागली.  आजूबाजूचे लोकं त्याच्या ह्या वागण्याकडे थोडेसे मिश्किलपणे पाहत होते, पण राजू आज आपल्याच विश्वात गुंग होता.

भाग्यश्रीने आज नेहमीपेक्षा थोडी लवकरच घरी पोचली.  आल्याबरोबर तिने टेप सुरु करून तिची आणि राजूच्या आवडीची मदन मोहनची कॅसेट लावून एका बाजूला तिने घरातली बारीकसारीक कामे उरकून घेतली. राजूच्या आवडीचा काजू, बदाम, बेदाणे घालून साजूक तुपातला गोडाचा शिरा करून ठेवला. त्याच्या साठी कोल्ड कॉफी करून फ्रीज मध्ये ठेवली.  मधेच कपाटात ठेवलेली राजूच्या आवडीची, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याने घेतेलेली क्रीम रंगाची काठ पदर असलेली साडी काढली आणि ती अगदी चापून चेपून नेसून हलकासा शृंगार करून, तयार होऊन ती राजूची वाट पहात कोचावर बसून गाण्याच्या तालावर गुंग होत होत मातृत्वाच्या स्वप्नात इतकी रमून गेली की, तिचा डोळा कधी लागला हेच तिला कळले नाही.  ती जागी झाली तीच मुळी तिला हवा हवासा वाटणाऱ्या राजूच्या मृदू व कोमल ओठांच्या स्पर्शाने व त्याच्या त्या नेहमीच्या श्वासातील गंधाने.  भाग्यश्रीला दोन मिनिटे काहीच सुचेना, इतक्यावेळ मनाला घालून ठेवलेला बांध हलकेच गळून पडला आणि तिच्या डोळ्यांतून घळा घळा आनंदाश्रू वाहू लागले व तीने राजूला कडकडून मिठीच मारली.  दोघेही त्या घट्ट मिठीत आपल्या व्यक्त अव्यक्त भावनांना सुखद स्पर्शाने एकमेकांना कुरवाळत होते, अगदी भावविवश होऊन गेले होते. ह्या क्षणी कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते.  फक्त डोळे आणि तो एकमेकांना हवाहवासा वाटणारा सुखद स्पर्श दोघांनाही त्यांच्या स्वप्नातल्या मातृ-पितृत्वाच्या भावनेशी आयुष्यभरासाठी एकरूप करून घेत होता, सुखावत होता.

जवळ जवळ चार वर्षांनी आज त्या दोघांचे आई बाबा होण्याच्या स्वप्नास ह्या एका छोट्याश्या बातमीमुळे का होईना प्रत्यक्षात येण्यास चालना मिळाली होती आणि त्यांना जाणवले की आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली आई-बाबा होण्याची इतकी सुखद संवेदनाच हरवून बसलो होतो !
आपल्याच माणसाच्या मनातले ओळखायला एखादवेळेस असेही व्हावे लागते की काय असे म्हणायची वेळ येते !  असो.  जे काही होते ते चांगल्यासाठीच होते.

माझ्या मनाने मला सरकारच्या ह्या निर्णयाचे अभिनंदन करण्यास भाग पाडून, राजू-भाग्यश्रीच्या स्वप्नपूर्तीस आशीर्वाद दिले आणि मनातल्या भावना ह्या काव्यामधून व्यक्त करून गेले....

ते क्षण कसे काळजात होते
गंध खोल अंतरंगात होते
तू होतीस इतकी जवळ की
आसमंत सारे मिठीत होते ||
क्षण हे भावले असे आज की
ऋण क्षणांचे मज ज्ञात होते
बहरला मोगराही असा की
फुलपाखरूही स्वप्नात होते ||
सहवास लाभला असा की
दान क्षणांचे पदरात होते
भरली लोचने आसवांनी की
ओंजळ मोती साठवत होते ||
मनास इतुकेच भासले की
ते आज क्षणांच्या ऋणात होते
ते क्षण कसे काळजात होते
गंध खोल अंतरंगात होते ||

रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment