Monday 20 March 2017

चपराक साहित्य महोत्सव २०१७-मागोवा



चपराक साहित्य महोत्सव २०१७ - मोगोवा

चपराक साहित्य महोत्सव २०१७ हा सलग चौथ्या वर्षी चपराक प्रकाशनच्या वतीने, श्रमिक पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे गुरवार दिनांक १९ जानेवारी २०१७ रोजी दुपारी २ ते रात्री १० ह्या वेळेत, तरुण, तडफदार, प्रगल्भ पत्रकार आणि लेखक संस्थापक संपादक श्री. घनश्याम पाटील सरांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.

 भरगच्च कार्यक्रम असलेला हा साहित्य सोहळा म्हणजे प्रतीरूपी आणि तितकेच सर्वसमावेशक असे अखिल भारतीय साहित्य संमेलनच होते असे संबोधले तर अतिशयोक्ती होणार नाही.

 रसिकांचे स्वागत चपराकचे सहसंपादक श्री. माधव गिर, कार्यकारी संपादिका सौ. शुभांगी गिरमे ताई आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखां बेलसरे ताईंनी करून कार्यक्रमास अतिशय छान सुरवात केली.  सौ. शुभांगी गिरमे ताईंनी चपराकचे गीत सादर करून कार्यक्रमास रंगत तर आणलीच परंतु आज होण्याऱ्या महोत्सवाची मनोरंजक झलकच प्रदर्शित केली. श्री. घनश्याम पाटील सरांनी अतिशय संयुक्तिक व चपखल प्रास्ताविक करून कार्यक्रमास सुरवात करून दिली.

 संमेलनाध्यक्ष सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. द. ता भोसले, उद्घाटक सरहदचे अध्यक्ष श्री. संजय नहार, प्रमुख पाहुणे मसपा पुणेचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी आणि स्वागताध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि संशोधक श्री. संजय सोनावणी असे दिग्गज लाभणे हेच मुळी घनश्याम दादांनी साहित्य क्षेत्रा मध्ये अथक कष्टाने, लेखणीच्या सामर्थ्याने आणि अतिशय मन मिळावू व लाघवी व्यक्तिमत्वाने मिळवलेली आदरणीय प्रतिष्ठा आहे असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.  सर्व दिग्गजांनी त्यांच्या भाषणातून साहित्य क्षेत्रामधील घडामोडींचा आढावा घेता घेता व उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करत असतांना, चपराक प्रकाशनचे साहित्य क्षेत्रामधील कार्य कसे आणि किती दखलपात्र आहे हे अतिशय प्रकर्षाने नमूद केले.  चपराकचे आणि विशेष म्हणजे घनश्याम दादांचे तोंडभरून कौतुक करतांना ह्या मंडळींनी हातचे काही राखून ठेवले आहे व आयोजकांनी निमंत्रित केले आहे म्हणून तोंडदेखले कौतुकही केले आहे असे कुठेही वाटले नाही.  हीच तर खरी तरी चपराकच्या कार्याची पावती आहे असे मला वाटते.

 दुसऱ्या सत्रामध्ये सुप्रसिध्द पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर सरांची घनश्याम दादा आणि दैनिक आपलं महानगरचे संपादक श्री. आबा माळकर ह्यांनी घेतलेली विशेष मुलाखत म्हणजे ह्या कार्यक्रमाचा शिरोमणी होता.  जवळ जवळ दोन तास चाललेल्या ह्या मुलाखतीने राजकारण, समाजकारण, पत्रकारिता आणि वैयक्तिक नीतिमूल्यांचा अविष्कारच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला.

 तिसऱ्या सत्रात युवा लेखक सागर कळसाईत ह्यांच्या कॉलेज गेट ह्या कादंबरीतील एका प्रकरणाचे अभिवाचन स्वतः सागर कळसाईत आणि त्यांच्या संघाच्या अप्रतिम सादरीकरणाने सर्व प्रेक्षकांना तसेच आजच्या तरुणाईला जवजवळ एक तासभर खुर्चीला खिळवून तर ठेवलेच परंतु उपस्थित असलेल्या आमच्या सारख्या जेष्ठांना भूतकाळात घेऊन गेले.  चपराकच्या ह्या प्रयोगामुळे नवोदित तरुण तरुणी साहित्य क्षेत्राकडे नक्कीच आकर्षित तर होतीलच आणि लिहिते होतील ह्याची तिळमात्र शंका नाही. हेच तर ह्या महोत्सवाचे वैशिष्ट्य मला अगदी प्रकर्षाने जाणवले.

 चौथ्या सत्रामध्ये निमंत्रित कवींचे संमेलन म्हणजे ह्या संपूर्ण साहित्य महोत्सवातील कार्यक्रमांचा कळसच होता.  चपराकने काही उपेक्षित तर काही प्रचलित असे १९ कवी आणि कवियत्रींनी ह्या संमेलनास संपूर्ण महाराष्ट्रातून निमंत्रित करून त्यांना एका व्यासपीठावर सन्मानपूर्वक कविता सादरीकरणास वाव दिल्यामुळे हा महोत्सव एका वेगळ्या उंचीवर पोचला.  प्रत्येकाने आपले हे काव्यरूपी अपत्य सृजन रसिकांच्या स्वाधीन करून उपस्थितांची दाद तर मिळवलीच, परंतु ह्या सत्राचे सुत्रसंचलन करणारे जेष्ठ कवी श्री. स्वप्निल पोरे आणि सत्राचे अध्यक्ष कवी श्री. माधव गिर व संपादक घनश्याम दादांना अगदी मनापासून कौतुकाची थाप पाठीवर देण्यास भाग पाडले. एका पेक्षा एक उत्तम, श्रवणीय आणि गेय कविता ह्या सर्व कवी मंडळींकडून महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात ऐकायला मिळाल्यावर सर्व श्रोते चपराक समूहाचे कौतक करीत गुणगुणतच सभागृहातून बाहेर पडतांना पाहिल्यावर मला माझ्या डोळ्यांच्या कडा थोड्याशा ओलावल्याचे जाणवले.

 श्री. अरुण कमळापुरकर सरांनी आभार प्रदर्शन करून ह्या अविस्मरणीय साहित्य महोत्सवाची सांगता केली तरीही प्रेक्षागृहातून कोणही बाहेर जायला तयार होत नव्हता.  रात्रीचे १० वाजले होते तरीही सर्व लेखक, कवी, कवियत्री, पत्रकार, प्रेक्षक प्रत्येकजण एकमेकांस शुभेछ्या देत होता, कोणी आभार व्यक्त करत होते तर पुढचा कार्यक्रम लवकरच जाहीर करा अशी गळ घनश्याम दादांना घालत होते.  सगळे कसे भारावून गेले होते.

 ह्या साहित्य महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे ह्या सोहळ्यात प्रकाशित होणारी पुस्तके हे होय.  सध्याचा आर्थिक मंदीच्या आणि नोटबंदीच्या काळातही असे आगळे वेगळे, १९ (एकोणीस) पुस्तके प्रकशित करण्याचे धाडस करून चपराक प्रकाशनने साहित्य क्षेत्रात त्यांचे असलेले मानाचे अढळ स्थान प्रस्थापित केले हे मात्र नक्की.

ह्या एकोणीस पुस्तकांमध्ये सर्व समविष्ट असे साहित्य म्हणजेच, २ लेख संग्रह, ७ काव्यसंग्रह, ७ कथासंग्रह, २ कादंबरी, १ लघु कादंबरी आणि घनश्याम दादांचा – अक्षर ऐवज (समीक्षा), असा अनमोल साहित्यिक खजिना सुजन वाचकांसाठी मोठ्या दिमाखात प्रकाशित करून एक वेगळाच पायंडा पाडून नवीन वर्षातील साहित्य मेजवानीच दिली आहे असे म्हणावयास हवे.



कोण म्हणतो लोक वाचत नाहीत. चपराक म्हणते तुम्हीं लिहा आम्ही तुम्हांला वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जबाबदारीने आणि निष्ठेने करतो आणि त्यांनी आज हे सिद्ध करून दाखवले आहे.   वाखाणण्यासारखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक सत्राच्या सुरवातीला पाच ते सहा पुस्तकांचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यात सदर पुस्तकाच्या लेखक, कवी, कवियत्रींना आदराने सन्मानितही करून त्यांना दखलपात्र केले हे नक्की.

हा सोहळा तर अप्रतिमच झाला त्यात काही वाद नाही.  परंतु ह्या सर्व सोहळ्या साठी चपराक प्रकाशनचा चमू गेले एक महिना दिवस रात्र काम करत होता हे मी स्वत: पहिले आहे.  ह्या पडद्यावरील आणि पडद्य्मागील कलाकारांचेही ह्या सोहळ्याच्या फलश्रुती साठी मोलाचे योगदान आहे. 

श्री. घनश्याम पाटील, श्री. माधव गिर, सौ. शुभांगी गिरमे ताई, सौ. चंद्रलेखा बेलसरे ताई, तुषार उथळे-पाटील, बजरंग दादा, ब्रम्हे काका, श्री. कमळापुरकर, श्री. समीर नेर्लेकर, सिद्धेश आणि मुद्रणालयाचे सर्व सहकारी.  ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनी आणि अपार मेहनतीने आज हा सोहळा आणि सर्वच्या सर्व १९ पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे त्यासाठी तुमचे करावे तितुके कौतुक थोडेच आहे.  

सोहळा चपराक महोत्सवाचा
आज झोकात की हो जाहला
साहित्यक मेजवानीचा आज
आस्वाद सर्व रसिकांनी लुटला ||

शब्द पडती थोटकेही कौतुकास
भारावून हर एक जण हो गेला
अथक कष्टाने चपराकचा वेलू
गवसणी गगनाला घालुनी गेला ||

यज्ञ चपराकचा साहित्य सेवेचा
यशस्वीपणे पार होता पडला
एकोणीस सारथींनी आज अश्व
साहित्यविश्वात होता उधळला ||

आभार मानून घनश्याम पाटीलांचे
कृतघ्न आम्ही नाही हो होणार
ऋणात चपराक प्रकाशन चमूच्या
आम्ही सदैवच आहोत राहणार ||


रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment