Sunday 19 March 2017

प्रांजळ माणसाची प्रांजळ कविता

‘प्रांजळ’ हा माझा चौथा कवितासंग्रह नुकताच ‘चपराक प्रकाशन’तर्फे प्रकाशित झाला. या संग्रहासाठी शेतकरी साहित्य चळवळीचे कार्याध्यक्ष आणि कवी श्री. गंगाधरजी मुटे यांची प्रस्तावना लाभलीय. ती खास आपल्यासाठी...

प्रांजळ माणसाची प्रांजळ कविता

काव्य म्हणजे एक छोटासा पण अत्यंत प्रभावी असा साहित्यप्रकार. मर्यादीत शब्दात अमर्याद आशयाचे प्रकटीकरण करण्याची क्षमता आणि लयबद्धता या मुख्य वैशिष्ट्यामुळे अनादी काळापासून कविता मानवी मनावर अधिराज्य गाजवत आली आहे. संतमहात्म्यांनी अशाच काव्यप्रकाराचा उपयोग संस्काराच्या उत्क्रांतीची दिशा बदलण्यासाठी केला, आणि यशस्वीही झालेत. जेथे न पहुचे रवी, तेथे पहुचे कवी असे म्हटले गेले आहे पण जेथे रवीचे किरण पोहचू शकत नाही तेथे कवितेतील आशय निसंशय पोहचतो  हे  खरे आहे.

काळ बदलत गेला तसतसा माणूसही बदलत गेला. माणसाच्या माणूसकीची परिभाषा बदलत गेली तसतसी काव्यप्रकाराची काव्यात्मकताही बदलत गेली. मानवतेच्या र्हावसाबरोबरच काव्याच्या वैश्विक व्याप्तीची जागा आत्मकेंद्रीत  आशयाने घेतली. त्याला खतपाणी घातले आधुनिक शिक्षणप्रणालीने. व्यक्ती जितकी जास्त शिक्षित तितका ती व्यक्ती जास्त आत्मकेंद्रीत झाल्याने व याव्यक्तींच्या कचाट्यात काव्य सापडल्याने काव्याची उत्क्रांतीही हळुहळू आत्मकेंद्रीत आशयाच्या दिशेने होत गेली.
 मी थोर आहे त्यामुळे माझी कविताही थोर आहे, अशा प्रवृत्तीने तर कळसच केला. अवजड, दुर्बोध, आशयहीन व प्रतिभेशी दुरान्वयाने संबंध नसलेले शब्दांचे शब्दजंजाळ निर्जीव मनोरे रचून त्यालाच साहित्यिक दर्जाची कविता संबोधण्याचा आटापिटा सुरू केला. शिक्षित माणसांच्याच हाती सारी शासन-प्रशासनाची गुरुकिल्ली असल्याने त्यात ते यशस्वी झालेतही, पण अशिक्षितांचे काव्य लोकाभिमुख होते त्यातुलनेने सुशिक्षितांचे काव्य मात्र पाठ्यपुस्तक किंवा वाचनालयाच्या चार भिंतीच्या आत बंदिस्त झाले. कविता म्हणजे शब्दांचा गारुडी खेळ नव्हे; शब्दाला शब्द जोडून निर्जीव यमके साधत केलेल्या शब्दसमुहाच्या आशयहीन करामती तर नव्हेच नव्हे, अहं भावनेवर विजय मिळवून हृदयाची आंदोलने प्रांजळपणे व्यक्त होणे म्हणजे कविता, हा मूलभूत विचार मागे पडला.
 अशातच एका प्रांजळ माणसाची प्रांजळ कविता रसिकांच्या भेटीला येत आहे.  आय टी ट्रेनिंग कंपनी मध्ये नोकरी करीत असलेल्या या कवीचा तसा शेतीमातीशी काहीही थेट संबंध नाही पण शेतीमातीत जन्म घेतलेल्या आणि मी शेतकरीपुत्र असल्याची शेखी मिरवणार्याश अनेक स्वनामधन्य कवींपेक्षा श्री रविंद्र कामठे यांची शेतीविषयातली कविता उजवी आणि शेतीच्या वास्तवाशी अधीक जवळचे नाते सांगणारी आहे. काळ्या मातीच्या कुशीत जन्म घेतलेले शेतकरीपुत्र शहरी माणसाला काय आवडेल याचा विचार करूनच व शेतीच्या लुटारुंशी सलगी करून शेतीच्या शोषकांना पोषक अशी कविता लिहित असताना; एक शहरी माणूस शेतीच्या वेदनांना नेमकेपणाने हात घालतो, ही तशी दुर्लभ घटनाच मानायला हवी. श्री रविंद्र कामठे हे गेली तीन वर्ष अ. भा. मराठी शेतकरी शेतकरी साहित्य चळवळीच्या सानिध्यात आहेत, कदाचित ही साहित्य चळवळीची उपलब्धी आहे, असे मानले तर ते फ़ार अप्रासंगिक ठरेल असे मला वाटत नाही.
 मात्र शेती हा त्यांच्या कवितेचा मुख्य विषय नाही. त्यांची कविता जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकत विविधांगी चौखूर उधळत जाणारी आहे. त्यांच्या कवितेने स्वत:ला एखाद्या विषयात बंदिस्त न करून घेता प्रेमापासून ते आध्यात्मिक आशयापर्यंत स्वत:ला वैविध्यपूर्ण फ़ेरफ़टका मारून आणलेले आहे.
एका कवितेत ते सखीला नाजूक प्रश्न विचारताना म्हणतात
 सांग ना सखे काय तुला होते हवे
नव्हते का ग प्रेम तुझ्यावर केले?

 श्रृंगारावर हळुवार भाष्य करताना कवी लिहितात;
 रात्र सारी गेली इष्काच्या ह्या दरबारात
चांदणे अजूनही श्रृंगाराच्या नशेत होते

 आयुष्याच्या खडतर प्रवासात परिस्थितीचे चढउतार नित्याचेच.प्रत्येकाच्या वाट्याला येणारा कसोटीचा काळ. आपल्या अनुभूतीवर सकारात्मक भाष्य करताना कवी म्हणतात;
 केलेत मी परिस्थितीशी दोन हातही
येता जाता क्रित्येकांनी नाकारले होते

एका हाताने दिले, दुज्याने नेले बरेचदा
नशिबा तरी माझे मन सैरभैर नाही

 संधीचा गैरफ़ायदा घेऊन सौदा करणार्यान आप्तेष्टांवर टिकास्त्र सोडताना एका कवितेत कवी लिहितात;
 सौदाच असा केला होता, ह्या आप्तेष्टांनी
जसे काही हेच, ह्या समाजाचे वाणी होते  
    
 सरकार कोणाचेही असो, सताबदल झाला तरी कारभाराची तर्हासमात्र सगळी सारखीच असते. सरकार नामक यंत्रणेवर आसूड ओढण्यासही कवी कचरत नाही.
 नाही सरकारात कुठल्याही खरा जोर
येथे सगळ्या खुळ्यांचाच कारभार आहे   
  
 येतांना माणूस रिकाम्या हाताने येतो आणि जातानाही रिकाम्या हातानेच जातो. पण संपत्ती, धनद्रव्याच्या मायेने कुणाला सोडले आहे? पण कवी मात्र नशीबाकडे जास्त काहीच मागत नाही;
 देताना तू छप्पर फ़ाडून देतोस म्हणे
ओंजळीत मावेल इतकेच दे नशिबा आता

 शेतीशी थेट संबंध नसूनही शेतीची व्यथा कामठे सरांच्या कवितेने नेमकेपणाने समजून घेतली, याचे मला फ़ार कौतुक वाटते. देवाची कृपा होईल, निसर्ग देवता प्रसन्न झाली की बदाबदा पाऊस कोसळेल. बदाबदा पाऊस कोसळला की रान हिरवेगार होईल. रान हिरवेगार झाले की सुगीचे दिवस येऊन शेतकर्या ची गरिबी एका रात्रीतून संपुष्टात येईल अशा येरागबाळ्या आशावादाचा आणि अर्थवादाचा लवलेश नसलेल्या शास्त्रशून्य भिकार कल्पनाविलासामध्ये स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणविणारे कवी घरंगळत असताना शेतकरी पूत्र नसलेल्या श्री कामठे यांची कविता प्रगल्भतेने शेतीविषय हाताळते, हे विस्मयकारक आहे. तीन दशकापूर्वी युगात्मा शरद जोशींनी ओसाड माळरानात फ़ेकलेले शेतीअर्थशास्त्राचे बियाणे आता सर्वदूर अंकुरायला लागले आहे, याची सशक्त जाणीव करून द्यायला लागले आहे.
राजकाराणी आमुचे थोर वाचाळ
करिती घोषणा सबसिडीच्या नाठाळ
*********
प्रश्न खूप पडले होते
उत्तर त्याचे एकच होते
शेतमालास रास्त भाव
प्रश्नाचे एकच उत्तर होते
*********
कुठवर सहावे बळीराजाने
दु:ख त्याचे नागडे होते
कधी अवर्षणाने, कधी अवकाळीने
हक्क जगण्याचे वंचीत होते
*********
नाही घासाघीस वा कीच कीच मॉलमधे
करतो भाव चार आण्याच्या भाजीवरलं
*********
कृषी क्रांतीच खरी खात्री वाटू लागली
शेतकरी चळवळीच बीज रुजू लागलं
*********
करतो मशागत कष्टाने काळ्या मातीची
दैवाच्या दरबारात तो निराधार आहे  
बळ येऊ दे आता दहा हत्तीचं
राज्या तुझ्यावरच देशाची मदार आहे 

 वास्तव आणि प्रगल्भ शेतीसाहित्यकृती निर्मितीत प्रांजळ मनाची प्रांजळ कविता म्हणून या काव्यसंग्रहाचे रसिक, वाचक व समीक्षक नक्कीच स्वागत करतील, याची खात्री आहे.

गंगाधर मुटे
9730582004
संस्थापक अध्यक्ष
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

'प्रांजळ' कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना (डावीकडून) चंद्रलेखा बेलसरे, संजय नहार, प्रा. द. ता. भोसले, मिलिंद जोशी, संजय सोनवणी, रवींद्र कामठे आणि घनश्याम पाटील.

No comments:

Post a Comment