Monday 22 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – कविता सादरीकरण


अनुभवाच्या शिदोरीतून कविता सादरीकरण
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख 
२०१४ च्या मार्च मध्ये मला माझ्या प्रतिबिंबह्या काव्यसंग्रहामधील काही कविता सादर करण्याची संधी मिळाली होती.  आमच्याच कंपनीमधील लोकांना त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविधगुणदर्शनाचा हा एक अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व त्यात मला माझ्या कविता सादरीकरणासाठी दहा मिनिटे वेळ देण्यात आली होती.
  
माझ्या समोर एक मोठा प्रश्नच उभा राहिला होता की; दहा मिनिटां मध्ये मी किती कविता वाचू शकतो आणि त्यातूनही कुठल्या कविता वाचाव्यात आता आली का पंचाईत !  त्यातही संयोजकांनी मला आधीच सांगितले होते की; आपल्या कार्यक्रमाच्या निवड समितीने सर्वांच्या आग्रहाखातीर तुम्हांला हे कविता वाचन करावयास सांगण्याचे ठरवले आहे, कृपया नाही म्हणू नका.  (मनात मी म्हणालो, तुम्हांला नाही म्हणायला, मला अजून तरी वेड लागलेलं नाही. अशी सुवर्ण संधी कोण सोडेल हो ! )

सर, तुमच्या प्रेम आणि विरह ह्या विषयावरील कविता तर आपल्या कंपनीतल्या तरुण पिढीला खूपच भावल्या आहेत.  तुम्हीं ह्या वयातही (५३-५४) प्रेमावर इतकं सुश्राव्य काव्य कसं काय लिहू शकलात ह्याचे सगळ्यांचा आश्चर्य वाटते आहे !  तुमच्यावरील कामाचा ताण, तुमचे वय, तुमचं एकंदरीत कडक शिस्तीचे वागणे इत्यादी पाहून; तुम्हीं एवढे रसिक असाल, असे कधी वाटलच नव्हतं, आम्हांला !  असं म्हणून आमच्या ह्या विविधगुणदर्शन कार्यक्रमाच्या निवड समितीमधील चारपाच जणांची ही टोळी माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकून; आमच्यातल्याच दुसऱ्या एका कलाकाराकडे मोर्चा वळवून, माझ्या चेंबर मधून निघूनही गेली...

मी जरा विचारातच पडलो होतो !  ही पोरं गेल्यावर एक क्षण माझ्यावर थोडेसे दडपणच आले होते.  कविता लिहिणे ठीक आहे हो, पण त्या सादर करणे मला तरी खरच खूप अवघड वाटत होते.  कविता सादर करणे ही एक प्रगल्भ कलाच आहे नाही !  मला तसा कविता वाचनाचा काहीच अनुभव नव्हता.  नाही म्हणायला, काव्यसंग्रहांचे प्रकाशन झाल्यापासून अधूनमधून काही छोटेखानी कार्यक्रमात एखाद दुसरी कविता सादर करायची संधी लाभली होती इतकेच.  तसेच मित्रमंडळीत, आप्तेष्टांच्यात थोडेसे कौतुक म्हणून अधून मधून काही कविता सादर करायचो.  पण असं रीतसर रंगमंचावर वगैरे सादरीकरणाचा योग म्हणा अथवा संधी कधी मिळाली नव्हती.  घरगुती मैफिली मध्ये एखाद दुसरी कविता ऐकवणे वेगळे आणि अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये काही कविता ऐकवणे वेगेळे !

सादरीकरणाचा अनुभव तर सोडाच पण तशा पद्धतीचे मार्गदर्शनही आयुष्यात कधी कोणा कडून मिळालेले नव्हते.  तरीही एक वाटायचं की ह्या कविता सादर करतांना त्यामधील मला अभिप्रेत असलेलं भाव, कविता सुचतांनाची संवेदना, रसिकांपर्यंत पोचवण्याची ही एक उत्तम संधीच असावी, कवी साठी !

एकतर वयाच्या पन्नाशीत अगदी अपघातानेच कवीझालेला हा रवी’ !  त्यात हौसेला मोल नाही म्हणून पदरमोड करून स्वत:च्या पन्नाशीच्या कार्यक्रमात प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह !  परंतु, ‘रवीतू खूप चांगल्या कविता करतोस रे...अशी अगदी मनापासून दादही मिळवलेली होती.  अर्थात माझ्या ह्या काव्यप्रतिभेवर मी आजवर कधीच जबरदस्ती केली नाही व ला लावून कविता करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही, जसं सुचलं तसं मांडलं आणि रसिक वाचकांना ते रुचलं, आवडलं आणि बघता बघता रवी’, ‘कवीझाला...
 
मी जेंव्हा पहिल्यांदा कविता करायला लागलो होतो, तेंव्हा वास्तविक पाहता मला माझ्या कवितेबद्दल खूप बोलावेसे वाटे.  ती कविता लिहितांना मनात आलेले विचार मांडावेसे वाटायचे.  कवितेमधल्या ह्या ओळी मला कशा सुचत गेल्या व त्या कशावरून सुचल्या तर काही काही ओळींचा मला अभिप्रेत असलेला अर्थ उलगडून सांगण्याचा माझा अट्टाहास असायचा आणि अजून बरचं काही द्वंद्व मनात चालू असायचं. आपल्या कविता सादरीकरणात जर का मला हे सगळं योग्य पद्धतीने मांडता आले तर; कसली गंमत येईल ना, असे वाटायचं...त्यातच मी माझे गुरुवर्य कै. सुधीर मोघे ह्यांच्या कविता पानोपानीह्या कार्यक्रमाच्या प्रेरणेतून, कविता सादरीकरणाची सतत तयारी करायचो. माझ्याच आवडीच्या काही कविता, माझ्या खोलीत आरशा समोर उभा राहून मोठ मोठ्याने म्हणायचो.. (अर्थात दारं खिडक्या बंद करूनच !). न जाणो कधी संधी मिळाली तर; तयारी असावी म्हणून..आणि मला आपण फार मोठा कलाकार, म्हणजे कवी सुधीर मोघेंच्या सारखा प्रतिभावंतच झाल्याचा भास होऊ लागायचा !

आमचा हा कार्यक्रम पुण्यातल्या कोथरूड येथील मयूर कॉलनीतील बालशिक्षणच्या सभागृहात एका शनिवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित केला होता.  तरुणाईला आवडणारा विषय म्हणजे प्रेम.  ह्याच विषयावरील माझ्या ४-५ कविता (ज्या दहा मिनिटां मध्ये पूर्ण होऊ शकतील तसेच सर्वांना भावतील) मी सादर करायचे ठरवले.  चांगले महिनाभर आधी सांगितल्यामुळे मी भरपूर तयारी करून ठेवली होती.  तरीही कार्यक्रमाच्या आधी पोटात फुलपाखरे उडायची ती अगदी मुक्तपणे उडतच होती !  एक तर माझे पाठांतर खूपच कच्चे असल्यामुळे मला प्रचंड ताण आला होता.  उगाच जोखीम नको म्हणून मी चक्क माझ्या ह्या कविता छापून घेतल्या होत्या आणि त्या तशाच पद्धतीने वाचून सादर करण्याचे पक्के करून स्वत:ची मनशांती केली होती.  अर्थात मला हे कागद फक्त मानसिक आधार म्हणूनच जास्त उपयोगी पडले होते.

शेवटी तो हवा हवासा वाटणारा दिवस उजाडला.  माझे सहावे सादरीकरण होते.  एक एक करून माझ्या आधीचे कलाकार त्यांचा कार्यक्रम सादर करत होते.  मी विंगेतून पहात होतो.  बालशिक्षणचे ते ३००-३५० आसनांचे प्रेक्षागृह आमच्याच कंपनीतल्या सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खचाखच भरलेले होते.  तो भला मोठ्ठा रंगमंच पाहून तर माझे डोळेच विस्फारले होते.  मनावर तणाव जाणवत होता.  घशाला कोरड पडत होती.  हाताच्या पंज्यांना घाम सुटला होता.  सारखं पाणी पित होतो आणि मूत्राशय रिकामे करत होतो.  हे असे एकट्यानेच रंगमंचीय सादरीकरणाचा हा माझा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे पहिलटकरीणीस जे जे काही होत असेल ते ते मला निसर्गनियमानुसार होत होते !

निवेदक मित्र विकास जोशीने माझे नाव पुकारले आणि मी एका हातात ध्वनिक्षेपक आणि दुसऱ्या हातात कवितांचा कागद घेवून.. नमस्कार मंडळी.. म्हणून विंगेतून, अगदी अनुभवी कलाकाराप्रमाणे डुलत डुलत रंगमंचावर, प्रेक्षकांच्या समोर जावून उभा राहिलो.  तो क्षण...अ हा हा हा...असाच होता.  खचाखच भरलेल्या प्रेक्षागृहात अंधुकसा प्रकाश होता.  समोर पहिल्या रांगेत आमच्या कंपनीचे मालक, अधिकारी वर्ग आणि प्रमुख पाहुणे बसलेले होते.  सगळ्यांच्या नजरा फक्त माझ्याकडे होत्या, हे त्या अंधुकशा प्रकशातही मला जाणवत होते.  माझ्या डोक्यावर एक प्रकाशझोत सोडलेला होता.  माझे पाय थोडेसे लटलट कापत होते.  हातातला कागद आणि ध्वनिक्षेपक थोडासा थरथरत होता. माझ्याही नकळत मी उगाचच पायांची हालचाल करत होतो. एक आवंढा गिळला. हे सगळे मी नमस्कार.. उच्चारल्यापासून साधारण ५-१० सेकंदातली ही माझी अवस्था होती...आणि....थोडीशी प्रस्तावना करून मी माझी पहिली कविता सादर करायला सुरवात केली...
तू…..नाही म्हणशील….. ह्या भीतीने, तुला……कधी…… विचारलेच नाही....
पहिल्याच चरणाला प्रेक्षकांतून टाळ्या, शिट्ट्या आणि वाहवा हे शब्द कानावर पडले आणि माझ्यातल्या कलावंताच्या जीवनाचे सार्थक झाल्याचा एक अविस्मरणीय असा जो काही अनुभव मला आला, तो शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. रसिक प्रेक्षक माझ्या कवितांना दाद देत होते आणि मी पण उत्साहाने त्यांच्या ह्या अनमोल प्रतिक्रियेस दाद देवून माझ्या प्रेमाच्या कविता सादर करत होतो.  प्रेमाचं कोडं.. कधी हसवतं, तर कधी रडवतं ही कविता तर रसिकांना खूपच भावली होती.

कविता वाचनाचे एक शिवधनुष्य मी पेलल्याचा मला आलेला हा अविस्मरणीय अनुभव माझ्यातल्या एका कलाकाराला नक्कीच सुखावून गेला व माझ्या साहित्यक्षेत्रामधील पुढील वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरला.
 
रविंद्र कामठे
७ मार्च २०१९

No comments:

Post a Comment