Friday 12 July 2019

पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१





पानशेतचा प्रलय - १२ जुलै १९६१

१२ जुलै १९६१, पानशेत धरण फुटून पुण्यात पुराने हाहा:कार उडाला होता. आज मला ह्या घटनेची आठवण येण्याचे कारण म्हणजे माझ्या नर्मदा आजीने (म्हणजे वडिलांची आईेने) ३६ वर्षांपूर्वी ह्या घटनेची इतंभूत माहिती सांगितली होती (तेंव्हा मी २० वर्षांचा होतो), त्याची आठवण ताजी झाली. माझ्या आजीच्या डोळ्यासमोर आमचे डेक्कन जिमखान्या जवळील पुलाच्या वाडीतील राहते घर ह्या प्रलयात पहिल्याच फटक्यात म्हणता म्हणता तिच्या डोळ्या समोर वाहून गेले होते व एका क्षणात होत्याचे नव्हते झाले होते. माझा तर तेंव्हा जन्मही झालेला नव्हता. माझ्या वडिलांचे नुकतेच लग्न झाले होते व ते नगरला नोकरीला होते. त्यांना पुराची बातमी मिळाल्याबरोबर ते त्या दिवशी संध्याकाळी पुण्यात हजर झाले तेंव्हा आमच्या घराचा फक्त मातीचा ढिगारा राहिला होता. काडी काडी करून काबाड कष्ट करून जमवलेला संसार क्षणार्धात डोळ्या समोरून वाहून गेला होता आणि ते काहीही करू शकले नाहीत. पुराच्या दुसऱ्या दिवशी सर्वजण हे मातीचे ढिगारे उपसून काही सामान मिळत आहे का ते पाहत होते, तेंव्हा पुन्हा एकदा पाणी आले म्हणून अफवा पसरली आणि सगळे जण हातातले सामान तिथेच टाकून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळत सुटले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या चोरांनी हेच गोळा केलेले सामान पळवून नेले व त्याच बरोबर ह्या लोकाची उरली सुरली आशाही चोरून नेली. आजी सांगत होती की; इतका भीषण प्रलय होता हा की विचारू नकोस. त्या प्रसंगाची आठवण जरी आली तरी मन विषण्ण होते. त्यांना सगळ्यांना मधुमालती गुणे (आताचे cross word) हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर ठेवले होते. सगळ्या बाळंतीणी आणि वाडीतील काही मंडळी ह्या मजल्यावर सुरक्षित होती. वरून हा प्रलय इतका भयानक दिसत होता की छातीत धडकीच भरत होती. डोळ्या समोरून कित्येक माणसाची, प्राण्याची मढी वाहून जात होती. काही जिवंत लोकं जीवाच्या आकांताने आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतांना दिसत होते. लष्कराचे जवान त्यांचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. लकडीपूल उध्वस्त झालेला होता. शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ, टिळक रोड, फर्गुसन रोड, भांबुर्डे सगळे सगळे पाण्याखाली होते. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसलेले होते. उध्वस्त घरांचे सांगाडे पाहून लोकं गलीतगात्र झालेले होते. जीवाच्या आकांताने आक्रोश करत होते. कोणी आपल्या घराच्या ढिगाऱ्यावर बसून टाहो फोडत होते. काही म्हणजे काही शिल्लक राहिले नव्हते. दु:खात सुख म्हणजे आमच्या वाडीत फारशी मनुष्यहानी झालेली नव्हती. अगदी मन हेलावून टाकणारा हा प्रसंग, गोधडी शिवतांना आजी मला त्यावेळेस सांगत होती. हा प्रसंग ऐकतांना माझ्या अंगावर तर काटाच आल होता, पण आजीच्याही अंगावर काटा उभा राहिला होता. तिचे डोळे पाणावले होते. आमच्या पुलाच्या वाडीतील जमीनदोस्त झालेलं हे घर नंतर माझ्या आजीने व वडिलांनी, काकांनी पुन्हा बांधले, तोवर ते सगळे रास्तापेठत एका अंधाऱ्या खोलीत रहात होते. विशेष म्हणजे एवढे सगळे रामायण-महाभारत घडूनही ही मंडळी पुन्हा एकदा आयुष्य उभारणीसाठी तयार होती. समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करून त्यांनी पुन्हा एकदा जिद्दीने नव्याने आपले आयुष्य जगण्यास सुरवात केली होती. आज ह्या गोष्टीला ५८ वर्षे पूर्ण झालीत, परंतु ह्या प्रलयाचा फटका बसलेल्या आपाद्ग्रस्तांसाठी कधीही न भरून येणारा असा हा घाव आहे हे मात्र नक्की.
माझी आजी, वडील, काका, काकू ह्या जगात नाहीत, पण त्यांच्या सुखद आणि दु:खद आठवणी मात्र नक्कीच जागरूक आहेत. माझ्या आईच्या स्मृतीत (आज रोजी तिचे वय ७९ आहे) ह्या सगळ्या कठीण प्रसंगांची आठवण काल परवा इतकी ताजी आहे हे विशेष.
आज शुक्रवार, १२ जुलै २०१९-आषाढी एकादशी आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने सर्व काही आलबेल आहे. आज ह्या जागेवर माझ्या काकांनी चार मजली इमारत उभी केली आहे व त्यात माझी बहिण व चुलत भावंडे रहात आहेत.

1 comment: