Sunday 7 July 2019

अनुभवाच्या शिदोरीतून – तांडव मृत्यूचे


अनुभवाच्या शिदोरीतून तांडव मृत्यूचे
चपराक साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेला हा माझा लेख
अंगावर काटा आणणारा तो काळा कुट्ट दिवस असेल माझ्या आयुष्यातला ! १९९०च्या मे मधील मन विषण्ण करणारा तो दिवस !  माणूस नियतीपुढे किती शुद्र आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव होते आणि हतबल व्हायला होते.

तो गुरवार होता.  दुपारची १ ची वेळ होती.  कामाला सुट्टी असल्यामुळे मी नुकताच माझी आयुर्विम्याची कामे उरकून घरी पोचलो होतो.  थोडे लिंबू सरबत घेवून पंख्याखाली जरा शांतपणे बसलो होतो आणि बघता बघता माझा डोळा लागला होता.  इतक्यात दिवाणखान्यातला दूरध्वनी खणखणू लागला.  समोरून अतिशय घाबरलेल्या आणि रडकुंडीला आलेल्या अवस्थेत माझा आत्येभाऊ बोलत होता.  त्याने तो जो काही निरोप मला फोनवरून दिला तो ऐकून त्या क्षणी मी स्तब्धच झालो होतो.  इतक्यात बायको आतल्या खोलीतून आली आणि कोणाचा फोन आहे हे विचारल्यावर मी खाडकन भानावर आलो.  माझ्या दोन नंबरच्या आत्येबहिणीचा वडकी गावाजवळ एसटीच्या अपघातात मृत्यू झालाय, तिच्या नवऱ्याला आणि दोन लहान मुलांनाही बहुतेक खूप लागले आहे असे त्याने मला सांगून, तू जसा असशील तसा ताबडतोब निघून वडकीला ये म्हणाला.  एकतर तो निरोप ऐकून माझाच धीर खचलेला होता हो. ह्या बातमीने माझी छाती धडधडत होती.  काय करावं ह्या अशा वेळेला तेच सुचत नव्हतं.  कसं बसं स्वत:ला सावरले आणि बायकोला अगदी थोडक्यात ही वाईट बातमी सांगितली. 

दुसऱ्या क्षणाला डेक्कनला घरी फोन केला.  काकूने फोन घेतला.  तिला विचारले तर अण्णा कामानिमित्त कुठेतरी बाहेर गेलेत आणि त्यांना यायला उशीर होणार आहे.  माझे वडील तर भल्या पहाटेच त्यांच्या मित्राबरोबर नाशिकला लग्नाला गेले होते व त्यांनाही यायला संध्याकाळ होणार होती.  काकूला ही वाईट बातमी देवू का नको असे झाले होते. तिला हा धक्का सहन होईल का नाही ! असे एक क्षण मला वाटून गेले, पण निरोप देण्याव्यतिरिक्त माझ्यासमोर दुसरा काही पर्यायही नव्हता.  घरात मोठे माणूस कोणीच नव्हते.  त्यामुळे ह्या अकल्पित प्रसंगामुळे आलेल्या जबाबदारीची जाणीव होऊन निरोप देवून पुढील कामास लागलो.  सारासार विचार करून बायकोला डायरीत लिहून ठेवलेल्या काही नातेवाईकांना फोन करून ही बातमी देण्याची जबाबदारी टाकली.  मोटरसायकल काढून तडक दिवेघाटाच्या खाली असलेल्या वडकी गावा कडे धाव घेतली.

अपघातस्थळी पोचल्यावर जे काही दृश्य पहिले ते मात्र फारच भीषण भयानक होते हो.  अक्षरश: मृत्यूने तांडव घातलेले होते, असे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही. दिवे घाट संपल्यावर वडकी नाक्याच्या उतारावर एसटीच्या चालकाचा ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे गाडीवरील ताबा सुटला व त्याने ती एसटी सरळ तिथल्या बसथांब्यावर घालून मोठा अपघात टाळायचा प्रयत्न केला होता.  पण त्याच्या ह्या प्रयत्नात ह्या बस थांब्यात माझ्या आत्येबहिणीचा आणि अजून तीन जणांचा जागीच बळी घेतला होता.  बिचारी ती, तिचा नवरा आणि दोन पोरं नुकत्यात मांढरदेवीचे दर्शन घेवून आले होते व मांजरीला घरी जायला बसची वाट पाहत ह्या बस थांब्यावर उभे होते.  तिला कुठे माहिती होते की तिचा आज तिचा काळ ह्या थांब्यावर तिची वाट पाहतो आहे ते ! 

प्रत्यक्ष अपघात पाहिलेल्या एक दोन जणांनी अक्षरश: थरथर कापत मला सांगितले की, ही बाई फारच जिगरबाज होती हो.  बसथांब्यावर उभ्या असलेल्या कोणाला काही समजायच्या आतच एसटी ह्या थांब्यात घुसली होती.  बहूतेक तिने भरधाव वेगात वेडीवाकडी वळणे घेत येणारी ही एसटी पाहिली असावी व तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी.  थांब्याचा पहिलाच खांब ह्या एसटीने तोडला. त्याचवेळेस एका क्षणात ह्या बाईने जीवाच्या आकांताने तिच्या डाव्याबाजूला उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याला आणि दोन्ही पोरांना हाताने बाजूला ढकलले होते. म्हणूनच ते वाचले. पण तो खांब मात्र तिच्या पोटात घुसला आणि बिचारी जागेवरच गतप्राण झाली.  हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले हो.  तिच्या बरोबर अजून तीन लोकांचा जीव घेवून ती एसटी ह्या बस थांब्यातच अडकून पडली होती व रस्त्यावर पडलेल्या रक्तामांसाच्या सड्यामुळे मृत्यूने घातलेल्या तांडवाची मला स्पष्ट जाणीव झाली.  मृत आणि जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पोलीस घटनास्थळी येवून पंचनामा करत होते
  
मी मागचा पुढचा फारसा विचार न करता तडक तसाच सुसून रुग्णालय गाठले.  आयुष्यात पहिल्यांदाच मी ससूनची पायरी चढत होतो. तिथल्या धीरगंभीर वातावरणाने माझ्या पोटात भीतीने गोळा आला होता.   बाहेरच धायमोकलून रडत बसलेला माझा आत्येभाऊ दिसला.  बिचारा एकटाच होता.  मला पाहिल्याबरोबर माझ्या गळ्यात पडून खदखदून रडत होता बिचारा आणि मी मात्र स्थितप्रज्ञासारखा खांद्यावर पडणाऱ्या त्याच्या आसवांनी भिजून जात मनोमन थिजून उभा होतो.  कुठून एवढं मानिसक बळ मला आलं होतं हेच काही समजत नव्हतं !

आत्येभाऊ थोड्यावेळाने शांत झाल्यावर त्याच्याकडे मी बहिणीची चौकशी केली तेंव्हा त्याने तिचे आणि अजून तीन जणांचे पार्थिव तिकडे डेडहाउसमधे पोस्टमार्टेम साठी नेले आहे सांगितले.  आमच्या मेव्हण्याची आणि तिच्या दोन पोरांची चौकशी केल्यावर तो म्हणाला की ते काय तिकडे आत वार्डात आहेत.  एवढ्या मोठ्या अपघातात त्या तिघांना फक्त खरचटले होते.  आमच्या बहिणीने स्वत:चा जीव देवून ह्या तिघांचे प्राण वाचवलेत होते ह्याची प्रचीती मला आली आणि त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली अपघाताची घटना एकदम माझ्या नजरेसमोर तरळून गेली.  केवढी समय सूचकता दाखवली होती तिने त्या समयी, हे प्रत्यक्षात ह्या तिघांना जिवंत पाहिल्यावर मला जाणवले !
 
संध्याकाळचे ७ वाजून गेले होते.  दुपारी ४ वाजल्यापासून डेडहाउस मध्ये पोस्टमार्टेम नेलेले आमच्या बहिणीचे शव अजूनही आमच्या ताब्यात देण्यात आले नव्हते. त्यामुळे मी जरा चौकशी करून येतो म्हणून चक्क ह्या डेडहाउस मध्ये गेलो होतो.  सगळी कडे स्पिरीटचा वास येत होता.  नाकाला रुमाल लावून मी तसाच पुढे जात होतो.  एका वार्डच्या आवारातून दुसऱ्या एका मोठ्या खोलीत प्रवेश करत असतांना माझ्या हातून चुकून बाजूच्या एका खोलीचा दरवाजा ढकलला गेला आणि काय सांगू मला आतले दृश्य पाहून भोवळच आली. 

अहो एका मोठ्या टेबलावर माझ्या ह्या आत्येबहिणीचे शव तिच्या पोटात घुसलेल्या बांबूसहित तसेच पडून होते आणि आजूबाजूला त्याच अपघातात मृत झालेले अजून तीनही शव तसेच पोस्टमार्टेमच्या प्रतीक्षेत होते.  त्याचे कारण दुपार पासून ह्या विभागातल्या डॉक्टरांना वेळेच मिळाला नव्हता इतक्या अपघाताच्या केसेस आज आल्या होत्या.  धीर करून मी तसाच पुढे त्या खोलीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कार्यालात गेलो.  नशिबाने मला तिथे दोन डॉक्टर आणि वार्ड कर्मचारी भेटले त्यांना विनंती करून माझ्या बहिणेचे शव जेवढे शक्य होईल तेवढे लवकर आमच्या ताब्यात देण्याची तजवीज केली, जी त्यांनी मान्य करून तासाभरात ते पार्थिव आमच्या ताब्यात दिले.  तोवर माझे वडील, काका आणि बाकी सगळे नातेवाईक ससूनमध्ये जमलेले होते व मला आता थोडा धीर आला होता.  त्याच रात्री आम्हीं मांजरीला जावून तिच्या पार्थिवाला अग्नी देवून काळाचा हा घाला कसा बसा सहन करून जड अत:कारणाने परतलो होतो.

इतक्या वर्षांनी हा सगळा अनुभव लिहितांना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला होता व काळजावर झालेले ते घाव ताजे करून गेला. 

वास्तविक पाहता हे असले अनुभव कधी कोणाच्या आयुष्यात येऊच नये असे वाटते.  परंतु एक मात्र नक्की की; जी नियती आपल्यावर हे असे घाव घालत असते, तीच नियती आपल्याला ह्या अशा प्रसंगातून मार्ग काढायला आणि सावरायलाही शिकवत असते. हेच काय ते निसर्गाचे चक्र असावे ! 

अमावस्ये शिवाय पौर्णिमेचे महत्व कसे कळणार !
   
रविंद्र कामठे

No comments:

Post a Comment