Friday 20 April 2018

पक्ष्यांसाठी दाणा पाणी



"पक्ष्यांसाठी दाणा पाणी"
दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मी पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था केली आहे. तसे पाहायला गेले तर आम्ही बागेच्या मागच्या बाजूला चिक्कूच्या झाडाखाली मातीचे एक भांडे बारमाही ठेवलेले आहेच.  ह्या पाण्यावर आपल्या वहिवाटीच्या हक्काने रोज बुलबुल, वटवट्या, कोकीळ, कोकिळा, भारद्वाज, खारुताई, कावळे, लहान लहान पक्षी, अगदी हक्काने येत असतात.  बुलबुल तर अगदी जोडीने तर कधी कधी आपल्या लेकरा बाळांसहीत मस्त पैकी डुंबूत असतात. त्यांच्या ह्या लीला पाहताना मन कसे प्रसन्न होऊन जाते. सोबत दोन छायाचित्रे देत आहे त्यावरून तुम्हांला कल्पना येईलच.
एकंदरीत कडक उन्हात पक्षांना सतत थंड पाणी प्यायला मिळावे म्हणून मी ह्या वर्षीही मी एक प्रयोग केला आहे.  दोन लिटर (पाच लिटरही घेऊ शकता) पाण्याच्या बाटलीला अगदी तळाला बॉलपेनची रिफील जाईल असे भोक पाडले, त्यात रिफील खोवली आणि फेविक्विक ने बुजवली. नंतर ह्या रिफील मध्ये खराट्याची एक काडी त्यात घुसवली.  बाटलीला वरील भागात हवा जायला एक छोटे भोक पाडले.  (दवाखान्यात सलाईनचे जे तंत्र आहे ना तेच मी इथे वापरले आहे). तसेच बाटलीच्या झाकणाला एक तार बांधली, जेणेकरून बाटली झाडाला टांगता येईल. बाटलीत २ लिटर पाणी भरले आणि ती बाटली एका झाडाला टांगली.  आता बाटलीतून थेंब थेंब पाणी पडायला लागले होते.  हो पण हे थेंब जर एक सेंकदाला एक असे हवे असल्यास त्यानुसार खराट्याच्या काडीची जाडी बदलावी.  बाटलीच्या खाली शक्यतो एक मातीचे भांडे ठेवावे ज्यात हे थेंब थेंब पाणी पडत राहील.  साधारण एक दिवसांत दोन लिटर पाणी भांड्यात पडते.  पाण्यावर उठणाऱ्या तरंगांमुळे पक्ष्यांना भांड्यात पाणी आहे ह्याची जाणीव होते तसेच सतत एक एक थेंब पाणी पडत असल्यामुळे पाणी गरमही होत नाही.  जरी ते वाहून गेले तरी खालील झाडालाही पाणी मिळते आणि पक्ष्यांना ह्या उन्हाळ्यात अगदी थंड पाणी मिळते. हे पक्षी ह्या पाण्यात अगदी मनसोक्त डुंबतात आणि त्यांच्या उन्हाचा ताव सहन करू शकतात.  आपल्यालाही त्यांना ह्या उन्हाच्या तडाख्यातून वाचविल्याचे समाधान मिळते.  मन प्रसन्न तर होतेच परंतु फार मोठे पुण्याचे काम केल्यासारखे भासते.  आत्मिक आणि सात्विक समाधान काय असते ते उमजते आणि हेच काय ते अक्षय दान आहे असे म्हणावेसे वाटते.  फारसे काही कष्ट न करता तुम्हीं हे अगदी सहज घर बसल्या करू शकता.  उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनाही हे करायला लावू शकता आणि त्यांच्या मध्ये आपल्या निसर्गाची तसेच आपली जैव विविधता जपण्याची आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव करून देऊ शकता.
जर आपण कोणी जंगलांमध्ये किंवा इतरत्र कोठे भटकत असाल तर सोबत अशा काही बनवलेल्या बाटल्या आणि मातीची भांडी घेऊन जा व ती योग्य जागी बसवा.  त्या खाली एक टीप लिहायला विसरू नका.. की बाटलीतील पाणी संपले तर कृपया बाटलीत पाणी भरावे तसेच मातीच्या भांड्यात खूप घाण साठली असेल तर ते स्वच्छ करून परत आहे त्या जागी ठेवावे”.  पहा एकदा हा प्रयोग करून आणि मग मला सांगा किती समाधान मिळते ते.
अजून एक, माझ्या ह्या प्रयोगात जर कोणा जाणकाराला काही सूचना करायच्या असतील तर सांगा मला आनंद होईल.
रविंद्र कामठे  
 
 
 

No comments:

Post a Comment