Wednesday 21 February 2018

‘जू’- जहरी वेदनांचा विलक्षण जोखड


ज्यानं फक्त आनंद मिळतो असंच आपण लिहू नये;
असं लिहिल्यानं काय फायदा
?
ज्या लिखाणामुळे आपल्याला खोल जखमा होतात
,
दु:ख होतं

आणि ज्यामुळे आपण खडबडून जागे होतो.

असंच लेखन आपण नेहमी करावं.

काफ्काचे हे विचार ज्ञानेश्वराच्या श्लोकासारखे

माझ्या हाती लागले होते.

तुकारामाच्या वास्तव अभंगासारखं त्यांनी मला

अंतर्बाह्य झिंजाडून सोडलं..

हे आठवायचं कारण श्री. रविंद्र कामठे सरांनी जूवाचून जो अभिप्राय मला दिला; त्यातच सारंकाही मिळाले..

ऐश्वर्य पाटेकर

||‘जू’- जहरी वेदनांचा विलक्षण जोखड- रविंद्र कामठे||

माझ्या सर्वांगाचा थरकाप उडाला होता, ओठ थरथरत होते, घशाला कोरड पडली होती, मती गुंग झालेली होती, मन अगदी सुन्न होऊन गेलं होतं, अतिशय विलक्षण असं द्वंद माझ्या मनात चाललेलं होतं, हाताच्या मुठी वळल्या होत्या, डोळ्यात अंगार दाटला होता आणि आता मी कुठल्याही क्षणी नामदेवह्या नराधमास आणि त्याला साथ देणाऱ्या प्रत्येकास अगदी हाल हाल करून यमसदनी पाठवून देतो की काय असे मला वाटू लागले होते. इतकी चीड आणि राग माझ्या मनात दाटून आला होता. त्याचे एकमेव कारण म्हणजे सुप्रसिध्द कवी श्री.ऐश्वर्य पाटेकर ह्यांची सकाळ प्रकाशनने प्रकाशित केलेली जूही कादंबरी मी वाचत होतो आणि त्यामधील प्रत्येक पान वाचतांना माझ्या मनात वरील विचार, माझ्याही कळत नकळत उमटत होते. माझ्या बोथट झालेल्या संवेदना आपसूकच जागृतावस्थेत येऊ लागल्या होत्या आणि मी अगदी उद्विग्न होऊन ह्या कादंबरीचे एक एक पान डोळ्यात प्राण आणून वाचण्याचा प्रयत्न करत होतो. कधी कधी डोळ्यात जमा झालेल्या आसवांनी पानांवरील अक्षरेही दिसेनाशी होत होती. काही काही अश्रू, विनापरवाना माझ्या हातातील पुस्तकाच्या पानावर पडून अगणित अत्याचार सहन करणाऱ्या त्या माऊलीच्या चरण कमलावर अगदी अलगद जाऊन विसावत होते. तिला, तिच्या एकुलत्या एक लेकराच्या मायेला, माई, आक्की, तावडी, पमी ह्या बहिणींच्या डोळ्यातील आसवांना दिलासा देण्याचा हलकासा प्रयत्न माझे मन करत होते. ही कादंबरी वाचतांना खरं तर माझ्याच मानेवर कोणीतरी असंख्य वेदनांचा, जखमांचा, अत्याचारांचा जूठेवला आहे की काय असेच मला सारखे भासत होते. आपल्या आसपास, गावागावांमध्ये, शहरांमध्ये रोज कितीतरी मायबहिणींवर समाजातील अघोरी पुरुषीवृत्ती, त्यांच्यातील वासना शमविण्यासाठी अगणित अत्याचार करतांना किती खालच्या थराला जाऊ शकतात, ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जूही कादंबरी होय. अशा राक्षसी प्रवृत्ती ह्या कादंबरीमुळे माहित झाल्या व त्यांच्याशी लढण्याची ताकद माझ्या मनात उजागर झाली हे मात्र नक्की.

आयुष्याची झालेली ही फरफट जेंव्हा केव्हा ह्या माउलीने लेखकास म्हणजे तिच्याच लेकरास भावड्यास सांगितली असेल किंवा त्याला ती त्याच्या बहिणींकडून कळली असेल तेंव्हा कवी मनाचे लेखक ऐश्वर्य पाटेकर म्हणजे ह्या कथेतील भावड्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल ह्याची नुसती कल्पनाच केलेली बरी. त्यांच्या चारही भगिनींनी आणि अंबर मामा, मामी, आजोब, आजी, काही सखे शेजारी ह्यांनी ज्या जिद्दीने ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या आईला साथ दिली आहे त्याला तर ह्या जगात तोड नाही. म्हणजे पहा ना एक स्त्री स्वत:च्या आणि आपल्या लेकरांच्या अस्तित्वाची लढाई स्वत:च्या नवऱ्याकडून त्याच्या दुसऱ्या बायकोशी आणि सासूशी, म्हणजे स्त्रीशीच लढते आहे आणि ह्या लढाईत तिला तिच्याच मुली, म्हणजे पुन्हा स्त्रीच ह्या जहरी वेदनांच्या जोखडातून सुटण्यासाठीची मदत करतात, किती विलक्षण आहे, नाही हे नियतीचे रूप! काळ्यापाण्याची शिक्षा सुद्धा कदाचित ह्या जुलमी अत्याचारांपुढे फिकी पडावी इतकं भीषण आणि भयानक सत्य आहे हे सगळं, ह्या वर विश्वासच बसत नाही. कसं सहन केलं असेल हे ह्या सगळ्यांनी हे त्याचं त्यांनाच ठाऊक ! त्यासाठी मनावर दगड ठेवून प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने एकदा का होईना ही कादंबरी वाचायला हवी असे माझे आवाहन आहे.

ही कादंबरी वाचतांना माझ्या तर अंगावर सरसरून काटा येत होता, मन गलबलून येत होतं. तरीही कादंबरी हातातून एका क्षणासाठी सुद्धा खाली ठेववत नव्हती. अहो आत्मकथन झालं म्हणून काय झालं! हे असलं आत्मकथन लिहायला मनाची केवढी मोठी जिगर असावी लागते! कोणालाही हे सहज शक्य नाही. किती वेदना झाल्या असतील लेखकाला, भावड्याला हे सगळं कागदावर मांडताना ह्याची कल्पनाच केलेली बरी! नेमकी तीच जिगर लेखक ऐश्वर्य पाटेकरांच्याकडे असल्यामुळेच त्यांनी हे शिवधनुष्य पेलून आपल्या साहित्यविश्वाला ह्या अनमोल अशा कादंबरीची भेट दिली आहे; असे म्हणलो तर अतिशयोक्ती होणार नाही. नाहीतर मला सांगा, आपल्याला कुठे कळल्या असत्या ह्या अघोरी आणि विकृत पुरुषांची काळी कृत्ते आणि त्यांना साथ देणारी निर्लज्ज व फालतू माणसे ? लेखकाच्या स्वानुभवातून आलेला हा दु:खद आणि वेदनांनी भरलेला जोखड / जू वाचकांच्या मानेवर इतका भारी भक्कम बसतो की तो उतरवतांना काळीज पिळवटून जातं, हात पाय लटलट कापतात, पोटात गोळा येतो तर कधी कधी मळमळतही. काही काळासाठी वाचक स्वत:ला विसरून जातो व मनोमन लेखकास त्याच्या सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी आशीर्वाद देतो व त्याच्या माऊलीवर आणि बहिणींवर झालेले अत्याचार विसरण्याचे बळ द्यावे अशी प्रार्थना ईश्वर चरणी करतो.

लेखकाने त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीतील हे जहाल विष जरी वाचकांच्या निदर्शनास आणून दिलं असलं तरी त्यामागे एक अतिशय चांगला असा समाज प्रबोधनाचा उदात्त उद्देशच असला पाहिजे असे मला तरी वाटते. नाहीतर कोण कशाला काळजाला झालेल्या ह्या विखारी जखमा परत परत उकलून काढेल हो आणि स्वहस्ते ह्या जखमांवर मीठ चोळून घेईल हो ! वाचतांना काळजाला जी काही भगदाडे पडतात ना, तेंव्हा असे वाटते की अशी वेळ तर आपल्या वैऱ्यावरही येऊ नये. मला तर ह्या माउलीचे आणि तिच्या लेकरांचे खूप खूप कौतुक वाटते आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याच्या सकारात्मक दृष्टीस साष्टांग दंडवत घालावास वाटतो. कादंबरीच्या शेवटी हा भावड्या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही दहावीची परीक्षा पास होतो तेंव्हाच त्याच्या इंदूआईच्या आणि चारही बहिणींच्या आयुष्याचा संघर्ष संपून त्यांना आता चांगले दिवस येणार आहेत ह्याची चाहूल लागते आणि एक वाचक म्हणून आपणही एवढ्या दु:खात सुखावून जातो. हेच तर ह्या कादंबरीचे आणि लेखकाचे यश आहे.

रणांगणात पुरुषत्व दाखवयाचे सोडून हे असले पळपुटे जेंव्हा आपल्याच बायकामुलांवर अत्याचार करतात ना तेंव्हा,त्याची कीव तर येतच नाही, पण घृणा वाटते. ह्या उलट एवढे अत्याचार सहन करूनही आपली ही माऊली, हे सगळे तिच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे गेल्यानंतर रणचंडिकेचे रूप जेंव्हा धारण करते ना तेव्हा भल्या भल्यांची पाचावर धारण बसते हे मात्र तितकेच खरे आहे. लेखकाने स्वत:च्या आयुष्यातील हा जळजळीत इतिहास अतिशय प्रभावीपणे कुठलाही आडपडदा न ठेवता, आपल्या समोर मांडून आपल्या समाजाचे विद्रूप रूपही दाखवले आहे. तसेच परिस्थितीपुढे हार न मानता सत्यासाठी लढण्याची आणि आपल्या लेकरांच्या अस्तित्वासाठी एक माय माऊली नियतीलाही तिच्या पायाशी लोळण घ्यायला लावू शकते हा संदेश सर्वसामान्य माणसात पोहोचवण्याचे फार मोठे उद्दात्त सामाजिक काम केले आहे.

जूह्या कादंबरीची कथा ही काल्पनिक नसून ही प्रत्यक्ष लेखकाच्या म्हणजेच भावड्याच्या आयुष्यामधील ३०-३५ वर्षापुर्वीं घडलेल्या घटनांचा लेखाजोखाच आहे, हे वास्तव पचवणे खरंच खूपच अवघड जाते. ह्या जगात आपलीच माणसे आपल्याच पोटच्या पोरांशी, लग्नाच्या बायकोशी इतक्या निष्ठुरपणे कशी वागू शकतात! हे तर न उकलेले कोडंच आहे. कवी मन असूनही ज्या निर्भीडपणे ह्या कहाणीचा एक एक पदर उलगडून त्याचा एक प्रकारे चित्रपटच वाचकांच्या नजरे समोर उभा करण्यात ऐश्वर्य पाटेकर निश्चितपणे यशस्वी झाले आहेत. ज्या ग्रामीण भागात ही कहाणी घडली आहे त्या भागातील बोलीभाषेचा आणि संवादांचा अतिशय उत्तमरीत्या वापर करून वाचकांच्या मनावर पकड धरण्यास आणि कथेचा लेखकाला असलेला अपेक्षित परिणाम साधण्यात ही कादंबरी यशस्वी होते. लेखकाची ही आगळी वेगळी शैली वाचकांना कथेशी एकरूप करते हा माझा तरी अनुभव आहे. प्रत्येकाने एकदा तरी ही कादंबरी वाचून आपल्या संवेदना पारखून घायला हव्यात असे मला अगदी प्रकर्षाने वाटते.

सकाळ प्रकाशनचेह्या उत्तम कादंबरीचे प्रकाशन करून आम्हां सृजन वाचकांना मोलाचा ठेवा दिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. तसेच श्री. अन्वर हुसेन ह्यांनी त्यांच्या कुंचल्यातून कथेचा गाभाच रेखाटून ह्या कादंबरीस एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे हे निश्चित. त्यांचेही अभिनंदन.

जेष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले सरांची प्रस्तावना लाभलेल्या आणि जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले सरांची कौतुकाची थाप ब्लर्बवर मिळालेल्या ह्या कांदबरीच्या, साहित्य अकादमीचा २०११ सालचा युवा साहित्यिक पुरस्कार विजेते कवी-लेखकाचे, श्री. ऐश्वर्य पाटेकर ह्यांचे माझ्या सारख्या नवोदिताने कौतक ते काय आणि किती करावे. माझी ती पात्रताही नाही आणि योग्यताही.

श्री. ऐश्वर्य पाटेकर ह्यांनी स्वत: ही कादंबरी मला पोस्टाने पाठवून माझा जो काही सन्मान केला आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. एक साहित्यप्रेमी, सृजन वाचक आणि संवेदनशील नागरिक म्हणून मला माझा ह्या कादंबरी विषयीचा अभिप्राय देण्याची मुभा मी ह्या निमित्ताने घेतो आहे. श्री. ऐश्वर्य पाटेकर ह्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मन:पूर्वक शुभेछ्या देतो.

सर्वात शेवटी भावड्याच्या इंदूआईस माझा हा काव्यात्मक दंडवत घालतो आणि माझे मनोगत थांबवतो...

दगडास देव कधी मनाला नाही
मंदिरात देव कधी दिसला नाही |
कुठे कुठे शोधिले मी देवास असे
चरणी आईच्या कधी शोधला नाही ||

भावड्याला मात्र त्याचा देव त्याच्या इंदूआईतच सापडला आणि त्यांच्या आयुष्यावरचा जूउतरला....

रविंद्र कामठे, पुणे
महाशिवरात्र मंगळवार १३ फेब्रुवारी २०१८

No comments:

Post a Comment