Wednesday 25 April 2018

पक्षांसाठी दाणापात्र आणि पाणीपात्र- एक प्रयोग २०१८


 

 
 
सध्या उन्हाचा पारा अगदी चाळीशी ओलांडून गेलाय.  माणसांच्या अंगाची तर लाही लाही होते आहे.  उन्हाचा चटका अगदी सहन होत नाही.  त्यामुळे शक्यतो माणसे घरातून अथवा कार्यालयातून बाहेर पडतच नाहीत. हे झाले माणसांचे ! परंतु पक्षांचे काय ? ते तर बिचारे ह्या कडक उन्हात दाणा-पाण्यासाठी वणवण करत उडत असतात.  उडता उडता धाडकन जमिनीवर कोसळतात.  बिचारे काय करणार ! त्यांना तर धड बोलताही येत नाही आणि कोणाला सांगताही येत नाही.  त्यांच्यावर, आम्हां माणसांनी नष्ट करत आणलेले पर्यावरण जपण्याची, जगवण्याची फार मोठी जबाबदारी असते ना ! ती जबाबदारी हे पक्षी बिचारे एवढ्या उन्हातान्हात आपल्या जीवावर उदार होऊन पार पडण्याचे कष्ट घेत असतात.  त्यात काही शहीद होतात तर काही सफल होतात.  आपण माणसांनी ह्या अशा कडक उन्हात आपल्या ह्या पक्षांसाठी आपापल्या घराच्या खिडकीत, गच्चीवर, बागेत किंवा जिथे जागा असेल तिथे, फार काही नाही तर थोडेसे दाणा आणि पाणी ठेवले तरी खूप आहे.  मी नेहमी प्रमाणे ह्या वर्षीही असेच काही प्रयोग करून पक्षांसाठी दाणा आणि पाण्यासाठीची वेगवेगळी सोय केली आहे.  तसेच ह्या वर्षी पाच लिटर पाण्याच्या बाटलीतून ठिबक सिंचन पद्धतीने पक्षांसाठी माझ्या घराच्या गच्चीत पाण्याची सोय केली आहे.  अशा रीतीने साधारण २-३ दिवस हे पाणी पुरते व ते एका थाळीत सतत थेंब थेंब पडल्यामुळे एवढ्या उन्हातही गरम होत नाही हे त्याचे वैशिष्ट.  त्यामुळे पक्षांना प्यायला थंड पाणी तर मिळतेच परंतु आपल्यालाही त्यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज पडत नाही.  सोबत काही छायाचित्रे देत आहे ज्यामुळे तुम्हांला माझ्या ह्या प्रयोगाची कल्पना येईल आणि तुम्हीं सुद्धा हा प्रयोग तुमच्या सवडीने घरी करू शकाल हे मात्र नक्की. माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा प्रयोग लवकरात लवकर अमलात आणावा आणि पक्ष्यांना जीवनदान द्यावे.

 

माझा कालचाच अनुभव सांगतो.  दोन दिवसांपुर्वी मी पक्षांसाठी दाण्याची सोय एका कचकड्याच्या दाणापात्रात करून ठेवली होती.  त्यावर कावळा आणि कोकीळ ह्याची वादावादी झाली.  त्यांच्या भांडणात दाणा ठेवलेले कचकड्याचे भांडे तुटून पडलेले होते आणि सगळी ज्वारी गच्चीत सांडलेली होती.  संध्याकाळी घरी आल्यानंतर मी गच्चीत एक चक्कर मारून झाडांना पाणी देण्यासाठी गेलो होतो तेंव्हा हा प्रकार पहिला.  एका गोष्टीचे मला खूप बरे वाटले ते की, आपण केलेला हा प्रयोग पक्षांना आवडलेला दिसतोय तसेच त्यांना त्याची खरोखर गरज दिसते आहे.   मनोमन मला खूप आनंद झाला आणि मी लगेचच कामाला लागलो.  साधारण तासाभरात एक कचकड्याची बाटली आणि भांडे घेऊन पुन्हा एक दाणापात्र तयार करून त्याच जागी बसवून मोकळाही झालो.  त्याच उत्स्फूर्ततेने वाण्याच्या दुकानातून परत एक किलो ज्वारी घेऊन आलो.  बाटलीत अर्ध्यापेक्षा जास्त ज्वारी भरून ठेवली आणि एका वेगळ्याच खुशीत स्वत:ला लोटून मोकळा झालो.  कोणाच्या नाही तर पक्षांच्यातरी आपण उपयोगी आलो ह्या भावनेने मन भरून आले आणि ह्या पर्यावरण रक्षकाच्या कामी आलो ह्याचे अप्रूप वाटून हात धुवून जेवायला बसलो.  माझ्याच एका कवितेचे शब्द मला आठवले...

जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे,

कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे ||

 

रविंद्र कामठे.

No comments:

Post a Comment