Friday 20 April 2018

“काळीजकाटा” – संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा


काळीजकाटा संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा
सोलापूर मधील सांगोला तालुक्यातील चोपडी ह्या गावामधील जेष्ठ लेखक श्री. सुनील जवंजाळ ह्यांची काळीजकाटाही कादंबरी ३ फेब्रुवारी २०१८ रोजी पुण्यातील चपराकप्रकाशनने जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले ह्यांच्या हस्ते प्रकाशित करून, मराठी साहित्यात अजून एका मौल्यवान साहित्यकृतीची भर घातली आहे.  सध्या मराठी साहित्याला घरघर लागली आहे, तसेच नवनवीन साहित्य जन्माला येतच नाहीत, प्रतिभावंत लेखकही नाहीत, मराठीला वाचकच नाहीत, तसेच प्रकाशकही काळाच्या पडद्या आड जात चालले आहेत, असा कंठशोष केला जात असतांना, सोलापूर जिल्ह्यातील चोपडी सारख्या खेडेगावातून श्री. सुनील जवंजाळ सारख्या प्रतिभावंत लेखकाचा काळजाला घरे पाडणारी संवेदनशील कादंबरी प्रकाशित होणे म्हणजे निश्चितच कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे.
काळीजकाटानव्हे तर एका संवेदनशील स्त्रीमनातील व्यथांचा फुफाटा आहे असे मला ही कादंबरी वाचतांना जाणवले.  काळ्या मातीच्या पाटीवर जगण्याचे तत्वज्ञान गिरवत मोठे झालेले, ह्या कादंबरीच्या संवेदनशील नायिकेचे मायबाप हेच तिच्या साठी सर्वस्व असणे हेच आपल्या ग्रामीण संस्थेतील संस्कारांचे प्रतिक अतिशय नि:संकोच लेखकाने मांडले आहे.  सध्याच्या काळातील ह्या निष्ठुर आणि वासनांध जगात स्त्रीने तिच्या देहाची विटंबना जरी झाली तरी ते पाप न मानता, परिस्थितीपुढे खचून न जाता आपले उर्वरित आयुष्य सुखकर कसे होईल ह्याची शिकवण देणारी ही कादंबरी आहे हे जळजळीत सत्य वाचून मन व्यतिथ झाल्याशिवाय रहात नाही.  हेच ह्या कादंबरीचे यश म्हणावयास हवे. ह्यावरून कादंबरीचा विषय वाचकांच्या लक्षात आलाच असेल.  त्यामुळेच मी कथेवर जास्त भाष्य न करता तिच्या आशयावर भर माझ्या ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त वाचक ही कादंबरी वाचण्यास उद्युक्त होतील अशी आशा आहे.
समुद्रात मिसळणे आणि समुद्राचं होणे हे पावसाच्या थेंबांचं ऐश्वर्य असतंअसं आयुष्याच खूप मोठं तत्वज्ञान सांगणारा हा लेखक बाईनं सुंदर असावं, पण आतल्या आत”, असं आपल्या समाजामधील जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी दिसणाऱ्या वासनांध प्रवृत्तींचा काळा चेहराच, संयुक्तिक घटनांच्या शृंखलांच्या मदतीने अतिशय प्रभावीपणे मांडून कथेची कास शेवटपर्यंत जपतो हे फारच कौतुकास्पद आहे.  कुठेही अतिशयोक्ती नाही की कुठेही संकोच बाळगला नाही.  एका मागून एक घडत चाललेल्या घटना आणि त्यातून स्त्री मनाच्या जीवाची होत असलेली घालमेल, आपल्या मायबापांच्या भावनांचा तिने केलेला विचार आणि त्यातून त्यांच्यासाठी स्वत:च्या भावनांना दिलेली तिलांजली, मन अगदी विषण्ण करून जाते.
ह्या कादंबरीतील नायिका ही जरी ग्रामीण असली तरी ती सुशिक्षित तर आहेच पण एक लेखिका आहे.  तिच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला पुरस्काराबरोबर तिच्या अबला नारीत्वाचा गैरफायदा घेवून तिला विटंबित केले जाते व तिच्या शिरीरालाही पुरस्कृत केले जाते, हे अतिशय गंभीर पण वास्तववादी चित्र लेखकाने मांडून आपल्या समाज व्यवस्थेमधील विकृतींची फार संवेदनशीलतेने मांडणी करून वाचकांना अंतर्मुख केले आहे.  ही नायिका इतकी संवेदनशील आहे की तिच्या लेखणीतून पानावर उमटलेले शब्द रडत रडत आपल्याशी संवाद साधत आहेत असेच वाटते.  ही कादंबरी एकदा वाचायला घेतली की ती संपेपर्यंत खाली ठेववतच नाही इतका ह्या कादंबरीचा आकृतिबंध आपल्याला ह्या कथेशी एकरूप करून सोडतो.  आपल्या नकळत आपण ह्या कथेमधील नायिकेशी नाते जोडतो, तिच्या सुख दु:खात समरस होऊन जातो आणि वाचता वाचता पाणावलेल्या डोळ्यांनी तिला उर्वरित आयुष्यासाठी आशीर्वादही देवून जातो.
ही कादंबरी म्हणजे वयात येताच विटंबित झालेल्या प्रत्येक मुलीची आत्मकहाणीच आहे असे वाटू लागते.  लेखकाने ह्या कथेच्या माध्यमातून काही व्यक्तींची काळी कर्तुत्वे, समाजविघातक प्रवृत्ती, सर्वदूर पसरलेली पुरुषी वासनांध वृत्ती, तसेच ह्या आधुनिक आणि सुशिक्षित जगातही अजूनही नारीची विटंबना करण्याची बोकाळत चाललेली आपली संस्कृती अतिशय समर्थपणे मांडून वाचकांना संवेदनशील केले आहे.  एकविसाव्या शतकातही आपली नारी ही किती सोशिक आहे आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेचा बळी आहे हे प्रकर्षाने दर्शविणारी ही कादंबरी असली तरी त्याच विटंबित नारीला आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून कुठेही न डगमगता वाटचाल करण्यास उद्युक्त करणारीही वाटते हे वैशिष्ट्य.
वेदनेच्या पाउलखुणाह्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसिध्दी मिळवलेल्या ह्या कवी मनाच्या लेखकाने काही काही घटनांचा प्रभाव वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वगतांचा अतिशय प्रगल्भतेने वापर केला आहे.  तसेच बऱ्याच ठिकाणी काव्यात्मकतेने अलंकारिक भाषेचा सहज वापर करून ह्या कादंबरीच्या लेखनवैभवात फार मोलाची भर टाकली आहे.  ह्या कादंबरीवर चित्रपट अथवा नाटक एखादा जाणकार निर्माता-दिग्दर्शक नक्कीच करू शकेल अशी मला खात्री आहे आणि माझी ती सदिच्छा आहे.  मी तर म्हणेन की प्रत्यकाने एकदा का होईना ही कादंबरी वाचली तर आपल्या समाजातील बोथट झालेल्या संवेदना जागृत करण्यास नक्कीच मदत होईल असे मला तरी वाटते.  कदाचित लेखकाचा ह्या कांदबरी प्रकाशनामागे समाज प्रबोधानाचा हाच एक सकारात्मक दृष्टीकोन आणि उद्देश असावा.
सुप्रसिद्ध चित्रकार श्री. संतोष घोंगडे ह्यांनी अतिशय समर्पक असे मुखपृष्ठ साकारून ह्या कादंबरीतील कथेस योग्य तो न्याय दिला आहे तसेच चपराक प्रकाशनचे श्री. घनश्याम पाटील ह्यांनी ही कादंबरी प्रकाशित करून साहित्य विश्वास खूप मोलाची भेट दिली आहे.  श्री. सुनील जवंजाळ ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेछ्या.

रविंद्र कामठे
१० फेब्रुवारी २०१८

No comments:

Post a Comment